कामगारांची जीवन स्थिती, कामगारांच्या तोंडून. मुक्काम पोस्ट : मंडाळा (मुंबई)
✍ बबन, राहुल
मुंबईतील मोठ्या लोकसंख्येला राहण्याचे पर्याय संपुष्टात येऊ लागल्यावर मुंबईच्या परिघावर असलेल्या मानखुर्द-गोवंडी भागात1980 नंतर झोपडपट्टी वसायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मानखुर्दमध्ये एका बाजूला वाशीची खाडी आणि दुसऱ्या बाजूला देवनार डम्पिंग ग्राउंड असलेल्या मंडाळा या भागात कोणत्याही प्रकारचे परवाने नसलेले काही छोटे-छोटे कारखाने उभे रहायला सुरुवात झाली. ज्यात प्रामुख्याने भंगाराचा पुनर्वापर करता येईल असे कारखाने, लोखंड वितळवून त्यापासून लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे कारखाने तसेच तेल कारखाने उभे राहायला सुरुवात झाली. आज या भागात अनेक कारखाने चालत आहेत. तिथे काम करणाऱ्या कामगारांची जीवन-परिस्थिती व कामाची स्थिती अत्यंत विदारक असल्याचे दिसून येते. प्रत्येक कारखान्यात साधारणतः पाच ते पंधरा कामगार काम करत असतात. या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही. कोणत्याच प्रकारची सामाजिक सुरक्षा दिली जात नाही; कारण येथे कोणतेच कामगार कायदे लागू केले जात नाहीत. अनेक वेळेस दुर्घटना झाल्यावर मालक सरळ अंग काढून कामगारांना आहे त्या स्थितीत सोडून देतात. याविरोधात कुठेही दाद मागण्याची व्यवस्थाच नसल्याचे कामगारांसोबत बोलल्यानंतर कळून येते. कामगारांसोबत झालेल्या संवादाचे आणि त्यांच्या मनोगताचे शब्दांकन खाली मांडले आहे.
“मालकांकडे मजुरांचे अनेक पर्याय आहेत पण आमच्यासाठी सर्व पर्याय एकसारखेच आहेत.”
सामाजिक सुरक्षेबद्दल बोलत असतांना एका कारखान्यात काम करत असलेल्या मनोज कुमार यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, “इथे कोणत्याच सामाजिक सुरक्षा दिल्या जात नाहीत. मालक सरळ बोलतो, काम करायचे असेल तर करा किंवा सोडून द्या! काम करायला लोकांची कमी नाही. अशात दुसरीकडे देखील कामाचे चांगले पर्याय उपलब्ध नाहीत, मग नाईलाजाने आहे ते काम करावे लागते. नाही तर घर कसे चालवायचे? ”
“ही मशीनच आत्ता माझी रोजीरोटी आहे.”
करीम मूळचे राजस्थानचे आहेत. दहा वर्षापूर्वी मुंबईत आले तेव्हा एका नातेवाईकाच्या ओळखीने एका कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला लागले तेव्हा त्यांना शंभर रुपये प्रत्येक दिवसाला मजुरी मिळत होती. पुढे काम करत असतांना लेथ मशीन चालवायला शिकले आणि त्यावर काम करायला लागले. आत्ता मशीनवर पीस रेटने काम करता एका पीसचा एक रुपया अशा पद्धतीने सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत उभ्याने काम केल्यावर पाचशे पीस फिनिशिंग करतात तेव्हा त्यांना दिवसाला पाचशे रुपये मजुरी मिळते. पुढे ते सांगतात की, “या रोजंदारीवर घराचा सर्वच खर्च चालवावा लागतो. त्यात दोन मुलाचे शिक्षण, घरभाडे, किराणा आणि इतर सर्वच बाबी आल्या मग अशात जेमतेम पोट भरून आयुष्य सुरू आहे. ही मशीन चालवायला शिकलो नसतो तर तीनशे रुपया पेक्षा जास्त मजुरी मिळाली नसती मग जास्तच अवघड झाले असते. आत्ता ही मशीनच माझी रोजीरोटी आहे.”
“अल्लाह करेगा, और कभी ना कभी तो अच्छे दिन आयेंगे!”
मोसिन यांचा स्वत:चा पत्र्यापासून डबे बनवण्याचा एक छोटा कारखाना आहे. ज्यात ते आपल्या एक मुलाला आणि दोन नातेवाईकांना घेऊन काम करतात. वर्षानुवर्षे परिस्थिती बदलली नसली तरी ईश्वरावर भाबडी श्रद्धा ठेवत मोसिन म्हणतात की “घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मला शिक्षण करता आले नाही. त्यामुळे मी मजुरी करत चार पैसे कमावून या भाड्याच्या दुकानात आपला स्वतःचा धंदा सुरू केला ज्यात मी मालक पण आहे आणि कामगार पण. सोबतच माझे दोन नातेवाईक ज्यांना कामाची गरज होती त्यांना मी गावाकडून बोलावून घेतले आणि माझ्यासोबत कामाला लावले आहे. पण या कामात कितीही कष्ट केले तरी काही विशेष मिळकत होत नाही. प्रत्येक महिन्याला जेवढी गुंतवणूक करतो तेवढे पैसे परत मिळतील एवढीच मिळकत आहे. यात कारखान्याचा सर्व खर्च निघून प्रत्येक महिन्याला आमच्या चार जणांच्या रोजंदाऱ्या निघणे देखील आत्ता अवघड झाले आहे. असे वाटते कधी-कधी हे काम सोडून कुठे नोकरी करावी पण शिक्षण कमी असल्यामुळे दुसरे कुठे चांगले काम मिळेल याची देखील शाश्वती नाही. मग नाईलाजाने आहे ते काम करत राहावे लागते. ‘अल्लाह करेगा और कभी ना कभी तो अच्छे दिन आयेगे!’ पण मार्केट थंडावलेले असल्यामुळे काहीच होत नाही.”
“नवऱ्याच्या कमाईमधून घर चालत नाही त्यामुळे मला हे काम कराव लागत आहे.”
मंडाळाच्या एका चाळीत दोन मुले व पती यांच्या सोबत वाहीदा राहायला असतात. नवरा नाक्यावर बिगारी काम करतो. नवऱ्याला काम नियमित लागत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याचा रोजचा खर्च चालवणे अवघड होते असल्यामुळे वाहीदा मंडाळ्यातील एका कारखान्यात कामाला लागल्या. या कारखान्यात भंगार आणि डम्पिंग मधील कचऱ्यातील काचेच्या बाटल्या फोडून त्याचे झाकण वेगळे करणे आणि फुटलेल्या काचा वेगळ्या करून पुढे ते वितवळण्यासाठी बाहेरच्या कारखान्यात पाठवण्याचे काम केले जाते.
वाहीदांना कामाविषयी विचारले असता त्या सांगतात की, “माझं शिक्षण नाही झाले त्यामुळे दुसरे कुठले काम मिळत नाही, म्हणून हे काम करावे लागते. या कामात आठ तासाचे तीनशे आणि बारा तासाचे चारशे रुपये मिळतात.” थोडक्यात ओव्हरटाईमचा दर हा नियमित कामाच्या दरापेक्षाही कमी आहे! हाताला काच लागू नाही म्हणून जे हॅंडग्लोव्ह्स दिले जातात ते फार चांगल्या दर्जाचे नसल्याने ते फाटून हाताला काच लागत असल्याचे त्यांच्या हाताकडे पाहून लक्षात आले. सुरक्षा उपकरण का दिली जात नाहीत? यावर वाहीदा सांगतात कि, “ग्लोज द्यायला मालक सांगतो कि, त्यासाठी पैसे लागतात. त्याचा पैसा तुमच्या पगारातून कमी करावा लागेल. त्यामुळे आहे त्या स्थितीत काम करावे लागत आहे.”
मंडाळा मधल्या या छोट्या-छोट्या कारखान्यात करीम, मोसीन, वाहीदा सारखे हजारहून जास्त कामगार काम करत आहेत, ज्यांना नाईलाजास्तव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत 10 ते 12 तास काम करावे लागत आहे आणि तेही अल्पशा पगारात ज्यात त्यांचे घर मुश्किलीने चालत आहे. अनेक कामगारांना त्यांचे काम सोडता येत नाही कारण दुसरे काम मिळेल की नाही याची खात्री नाहीये. अनेक कामगार पोटाला चिमटा घेऊन मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च करत आहेत. काही कामगारांना आशा आहे की आज ना उद्या त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होईल पण काही कामगारांनी अशा हलाखीच्या जीवनालाच आपले नशीब मानले आहे आणि ईश्वराप्रती भाबडी आशाही बाळगून आहेत.
इथल्या काही कारखान्यातील मालक हे छोटे भांडवलदार आहेत आणि त्यांच्या वर्कशॉप मध्ये साधारण पाच ते पंधरा कामगार कामाला आहेत. हे भांडवलदार शक्य तेवढे त्यांच्या कामगारांचे शोषण करून नफा कमविण्याचे काम करत आहेत मग ते अत्यंत अल्प पगारावर दहा ते बारा तास काम करून घेतात, ओव्हर टाइम मधले पैसे कापतात. कामगारांनी पगार वाढीची मागणी केली तर त्यांना कामावरून काढण्याची धमकी सुद्धा देतात. काही निम्न-भांडवलदार स्वतःच कारखान्याचे मालक आणि कामगार पण आहेत आणि ते स्वतःच स्वत:चे शोषण करत आहेत कारण ते जेवढी मेहनत करतात त्यातून स्वत:ला पुरेल एवढी कमाई होतेच असे नाही.
कामगारांना जाणीव आहे कि त्यांचे शोषण केले जात आहे परंतु त्यांच्यात वर्ग चेतनेचा अभाव आहे आणि त्यामुळे कामगारांत कोणतीही एकता अजून कायम झाली नाही, याचे स्पष्ट कारण हेच आहे की त्यांना योग्य राजकीय शिक्षण देऊ शकणाऱ्या कामगार वर्गीय क्रांतिकारी शक्ती तेथे काम करत नाहीयेत. मुंबई शहराच्या एका कोपऱ्यात मंडाळा आहे, जेथील हजारो कामगारांचे जीवन कधीच कोणत्या सरकारच्या चिंतेचा विषय बनले नाही त्यामुळे हजारो कामगार तुटपुंज्या पैशावर हलाखीच्या स्थितीत कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय काम करण्यासाठी मजबूर असल्याचे दिसून येत आहे.