क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 5
माल, उपयोग-मूल्य, विनिमय-मूल्य आणि मूल्य

अभिनव

मानवी श्रमातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे एक  वैशिष्ट्य असते, ते म्हणजे त्यांचे उपयोगी असणे. त्या कुठल्या ना कुठल्या मानवी गरजांची पूर्तता करतात. तसे नसेल तर कोणी त्यांना बनवणार नाही. त्यांच्या उपयुक्त असण्याच्या या गुणाला आपण उपयोग-मूल्य म्हणतो. उपयोग-मूल्याच्या स्वरूपात वस्तूंचे हे उत्पादन प्राचीन काळापासून जेव्हा मनुष्याने आपल्या गरजांसाठी निसर्गात बदल करून वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली, म्हणजेच उत्पादन सुरू केले, तेव्हापासून चालत आले आहे. एखाद्या वस्तूचे उपयोग-मूल्य हा पूर्वप्रदत्त नैसर्गिक गुण नसून तो ऐतिहासिक आणि सामाजिक गुण असतो. एखाद्या ऐतिहासिक कालखंडात एखादी गोष्ट ठराविक लोकांना उपयोगी पडू शकते आणि कालांतराने असे होऊ शकते की ती वस्तू उपयुक्त राहणार नाही. पण कुठल्याही वेळी माणसांच्या श्रमाने निर्माण झालेली एखादी वस्तू माणसाची गरज भागवत असेल तर ती त्यात एक उपयोग-मूल्य निर्माण करते. एकेकाळी, समाजात बहुतांश वस्तूंचे उत्पादन  प्रत्यक्ष उपभोगासाठीच केले जात होते, मग त्यांचा प्रत्यक्ष उपभोग प्रत्यक्ष उत्पादकांकडून केला जात असो किंवा उत्पादक वर्गाने निर्माण केलेल्या वरकड उत्पादनाला हडपून घेणाऱ्या शोषक-सत्ताधारी वर्गाकडून केला जात असो. अशा कालखंडांबद्दल आपण असे म्हणू शकतो की वस्तूंचे उत्पादन प्रामुख्याने उपयोग-मूल्यांच्या स्वरूपात होत होते.

परंतु उपयोग-मूल्याव्यतिरिक्त मानवी श्रमातून तयार होणाऱ्या वस्तूंमध्ये आणखी एका प्रकारचे मूल्य असू शकते, ज्याला आपण विनिमय-मूल्य म्हणतो. म्हणजे अशा वस्तू ज्यांचे उत्पादन श्रीमंत वर्ग वा प्रत्यक्ष उत्पादक वर्गाद्वारे प्रत्यक्ष उपभोगासाठी केले जात नाही तर बाजारात विक्री किंवा विनिमय करण्यासाठी केले जाते. आपण अशा वस्तूंना केवळ उपयोग-मूल्य मानू शकत नाही, कारण त्यांचे उत्पादन प्रत्यक्ष उत्पादक आणि श्रीमंत शोषक वर्गाद्वारे प्रत्यक्ष वापरासाठी केले जात नाही तर बाजारात विक्री किंवा विनिमय करण्यासाठी केले जाते. एखाद्या वस्तूचा दुसऱ्या कुठल्यातरी वस्तूबरोबर किंवा पैशाबरोबर विनिमय होण्याचा हा गुण त्या वस्तूला उपयोग मूल्यापेक्षा काहीतरी अधिक बनवतो. आता त्या वस्तूला केवळ उपयोग-मूल्य नाही तर विनिमय-मूल्यही आहे. ज्या वस्तूंचे उपयोग-मूल्य तसेच विनिमय मूल्य असते, म्हणजेच ज्या वस्तू बाजारात विकण्यासाठी तयार केल्या जातात, त्यांना आपण माल म्हणतो. माल म्हणजे त्या वस्तू किंवा सेवा ज्यांचे उत्पादन प्रत्यक्ष उपभोगासाठी नसून विक्रीसाठी केले जाते आणि ज्यांचे एक उपयोग-मूल्य आणि एक  विनिमय-मूल्य असते. विनिमय-मूल्य हा कोणत्याही मालाचा अन्य दुसऱ्या मालासोबत एका  निश्चित प्रमाणात विनिमय होण्याचा गुण आहे. त्याचे दोन पैलू आहेत: पहिला, त्याचा इतर मालांसोबत विनिमय होऊ शकण्याचा गुण, जो त्याचा गुणात्मक पैलू आहे आणि दुसरा, त्याचा इतर मालांसोबत एका निश्चित प्रमाणात विनिमय होण्याचा गुण, जो त्याचा परिमाणात्मक पैलू आहे.

तुमच्या हे लक्षात आले असेल की मालांचा उल्लेख करताना आम्ही येथे वस्तूंसोबत “सेवा”  शब्दाला सुद्धा जोडले आहे. कारण हे की प्रत्येक माल स्पर्श करता येणारी भौतिक वस्तूच असावी हे गरजेचे नाही. माल एक सेवा देखील असू शकते, जिचा उपयुक्त परिणाम असतो आणि जिला विकल्या जाते. तिचा उपयुक्त परिणाम तिच्यामध्ये मूल्य तयार करतो आणि ज्याअर्थी तिला विकण्यासाठी तयार केले आहे त्यामुळे त्याचे विनिमय-मूल्यही असते आणि त्यामुळे ती सुद्धा एक माल आहे. उदाहरणार्थ, वाहतूक सेवेत कोणती वस्तू तयार होत नाही. ती एक उपयुक्त परिणाम निर्माण करते. हा उपयुक्त परिणाम आहे वस्तू आणि लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा. या मालाचे उत्पादन (म्हणजे स्थान बदलणे) आणि त्याचा वापर (ग्राहकांकडून वस्तू आणि/किंवा व्यक्तींच्या स्थानामध्ये बदल) एकाच वेळी घडतात. परंतु जर ही सेवा निर्माण करणार्‍या उत्पादकाने ती लोकांना विकली तर ती देखील एक माल आहे. म्हणूनच मार्क्सने म्हटले होते की, “एक सेवा म्हणजे दुसरे काही नसून उपयोग-मूल्याचा उपयुक्त परिणाम होय.” (कार्ल मार्क्स, 1992, कॅपिटल, खंड 1, पेंग्विन पब्लिकेशन्स, पृ. 299). जर उपयोग-मूल्य असलेली ही सेवा प्रत्यक्ष उपभोगासाठी नसून विनिमयासाठी अर्थात विक्रीसाठी निर्माण केली जात असेल तर ती देखील एक माल आहे.

फरक समजून घेण्यासाठी काही उदाहरणे विचारात घेऊयात:

– एका शेतकरी कुटुंबाद्वारे स्वत:च्या वापरासाठी तांदूळ उत्पादन केले जाणे हे माल उत्पादन नाही, परंतु जर ते तांदळाचे उत्पादन बाजारात विक्रीसाठी करत असतील तर ते  माल उत्पादन आहे.

– जर सुतार स्वत:ला बसण्यासाठी एक खुर्ची बनवतो, तर तो फक्त उपयोग-मूल्य तयार करतो आणि म्हणून माल तयार करत नाही. पण जर तीच खुर्ची बाजारात विकण्यासाठी तो बनवत असेल, तर ते माल उत्पादन आहे.

– एका कार कंपनीच्या कारखान्यात तयार केलेली कार ही एक माल आहे कारण कार कंपनीचा मालक तिचे उत्पादन स्वतः चालवण्यासाठी करत नाही तर बाजारात विकण्यासाठी करतो.

– जर एखाद्या घरातील कुटुंबातील सदस्य घरात साफसफाईची सेवा देत असेल, तर ते अशा सेवेचे उत्पादन आहे जी माल नाही. पण जर तीच सेवा  त्याने बाजारातून विकत घेतली आणि या कामासाठी मजूर ठेवला, तर ती माल बनली आहे कारण कामगार स्वतःच्या प्रत्यक्ष वापरासाठी ती सेवा तयार करत नसून त्या कुटुंबाला विकण्यासाठी तिचे उत्पादन करत आहे.

या उदाहरणांवरून आपण माल आणि केवळ उपयोग-मूल्ये म्हणून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवा यांच्यात फरक करू शकतो. मानवी श्रमाची जी उत्पादने प्रत्यक्ष वापरासाठी नसून विक्रीसाठी तयार केली जातात, त्यांना आपण माल म्हणतो. ही उत्पादने वस्तू असू शकतात किंवा ती सेवा असू शकतात. प्रत्येक मालामध्ये हे दोन्ही गुणधर्म, म्हणजे उपयोग-मूल्य आणि विनिमय-मूल्य,  असणे आवश्यक आहे. जर एखाद्या वस्तू किंवा सेवेची काही उपयुक्तताच नसेल, तर कोणी ती वापरणार पण नाही आणि विकतही घेणार नाही. म्हणजेच, प्रत्येक विनिमय-मूल्याचा वाहक केवळ कुठलेतरी उपयोग-मूल्यच असू शकते. परंतु प्रत्येक उपयुक्त वस्तू ही माल नसते. एखादी वस्तू किंवा सेवा तेव्हाच माल बनू शकते जेव्हा तिला खरेदी-विक्रीसाठी बनवले गेले असेल.

इतिहासात असा काही काळ होता का जेव्हा सामान्यतः वस्तूंना विनिमय-मूल्य नव्हते आणि फक्त उपयोग-मूल्यच होते? होय! वस्तूंची निर्मिती प्रत्यक्ष उपभोगासाठी नव्हे तर देवाणघेवाणीसाठी व्हावी यासाठी समाजात श्रमविभागणीची एक विशिष्ट पातळी विकसित होणे आवश्यक असते. यालाच आपण सामाजिक श्रम विभाजन म्हणतो. साहजिकच, ज्या समाजात किंवा समुदायात सर्व लोक एकाच वस्तूचे किंवा समान वस्तूंचे उत्पादन करत असतील, तेथे देवाणघेवाण म्हणजेच खरेदी-विक्रीची गरज भासणार नाही. एखाद्या दूध उत्पादकाजवळ दुसऱ्या दूध उत्पादकाशी विनिमय करण्यासाठी काहीच नसेल. तो दूधाचा दूधाशी विनिमय का करेल? म्हणून श्रमाच्या सामाजिक विभाजनाची  एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतरच देवाणघेवाण सुरू होऊ शकते. हे एखाद्या समुदायातील उत्पादक शक्तींच्या विकासामुळे आणि विविध वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या त्या समुदायातील लोकांमुळे झाले असेल किंवा विविध वस्तूंचे उत्पादन करणारे समुदाय आपापसात संपर्कात आल्याने घडले असेल, परंतु हे मात्र निश्चित आहे की विनिमय, व्यापार आणि बाजाराची उत्पत्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा समाजात श्रमांचे विभाजन होते. जोपर्यंत समाजात श्रमाची ही सामाजिक विभागणी होत नाही, म्हणजेच जोपर्यंत विविध लोक किंवा लोकांचे गट वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करत नाहीत, तोपर्यंत देवाणघेवाण, खरेदी-विक्री, व्यापार, बाजार इ. ची सुरुवात होऊ शकत नाही. इतिहासात असेही काही काळ होते जेव्हा श्रमाचे कोणतेही सामाजिक विभाजन नव्हते किंवा ते अत्यंत आदिम टप्प्यावर होते. त्यावेळी विनिमय सुरू झाला नव्हता. त्या काळी वस्तूंची निर्मिती केवळ उपयोग-मूल्याच्या स्वरूपात होत होती. विशेषतः आदिम टोळी समाजात अशीच परिस्थिती होती.

परंतु उत्पादक शक्तींच्या विकासासह श्रमांचे सामाजिक विभाजन झाले आणि विनिमय सुरू झाला. यासोबतच अनेक वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष वापरासाठीच्या उत्पादनाबरोबरच विविध वस्तूंचे मुख्यतः विनिमयासाठी उत्पादन सुरू झाले आणि यासोबतच त्यांचे विनिमय मूल्यही निर्माण झाले आणि त्यांचे रूपांतर मालामध्ये झाले. यासोबत मालाचे उत्पादन सुरू झाले. ज्या समाजात बहुसंख्य वस्तू आणि सेवांचे मालामध्ये रूपांतर होते, प्रत्यक्ष उत्पादकांची श्रमशक्तीसुद्धा स्वत: मालामध्ये रूपांतरित होते आणि माल उत्पादन प्रभुत्वशाली बनते, त्यालाच आपण भांडवली समाज म्हणतो.

परंतु माल उत्पादन भांडवली समाजासोबत अस्तित्वात आले नाही.  तर प्राचीन काळीच आदिम जमातींमध्ये एका अतिशय प्राथमिक प्रकारच्या विनिमयाची सुरूवात झाली होती आणि आदिम टोळी समाजाचे विघटन होऊन गुलाम समाजाच्या स्वरूपात प्रथम वर्ग समाजाचा उदय आणि विकासाचा टप्पा येईपर्यंत माल उत्पादन चांगले विकसित झाले होते. परंतु माल उत्पादन हे अद्याप प्रभुत्वशाली उत्पादन बनले नव्हते आणि त्यासोबत उत्पादनाचे इतर अनेक प्रकार अस्तित्वात होते, ज्यामध्ये उत्पादक वर्गाद्वारे किंवा त्यांना लुटणाऱ्या शासक-शोषक वर्गाद्वारे प्रत्यक्ष वापरासाठी वस्तू आणि सेवा उत्पादित केले जात होते आणि उत्पादनाचे हे स्वरूप अजून समाजात माल उत्पादनापेक्षा जास्त महत्त्व ठेवून होते. उदाहरणार्थ, गुलाम समाज आणि सरंजामशाही समाजातही माल उत्पादन अस्तित्वात होते, परंतु अजून इतर प्रकारचे उत्पादन त्याच्याबरोबर केवळ अस्तित्वातच नव्हते, तर त्याहून अधिक महत्त्वाचे होते. म्हणून माल उत्पादन उत्पादनाच्या इतर प्रकारांपेक्षा अजून प्रबळ बनले नव्हते आणि म्हणूनच या समाजांमध्ये, विशेषतः गुलाम समाजात, माल उत्पादनाचा लक्षणीय विकास झालेला असूनही ती अद्याप प्रभुत्वशाली उत्पादन पद्धत बनली नव्हती, श्रमशक्ती अजून मालात रूपांतरित झाली नव्हती आणि त्यामुळे अजून भांडवली माल उत्पादन सुरु झाले नव्हते. या प्रकारच्या माल उत्पादनास साधारण माल उत्पादन म्हणतात.

भांडवली समाजातही प्रत्येक वस्तू आणि सेवा मालाच्या स्वरूपात तयार होत नाहीत. जसे की शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनाचा तो भाग ज्याचा वापर ते आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्ष वापरासाठी करतात. आज हा भाग फारच छोटा आहे कारण एकूण कृषी उत्पादनापैकी 90 टक्के भाग हा आता विक्रीयोग्य अधिशेषाच्या श्रेणीत येतो. एक छोटासा असला तरी हिस्सा आहे, जो केवळ उपयोग-मूल्य म्हणूनच निर्माण केला जातो. इतर प्रकारची उत्पादने आणि सेवा ज्या मालामध्ये रूपांतरित होत नाहीत त्या सरकारी सार्वजनिक वितरणाचा भाग असतात, मग ते सरकारी शाळांमधील मोफत शिक्षण असो, मोफत धान्य वितरण असो किंवा इतर कोणतीही सेवा किंवा वस्तू असो. याशिवाय, भांडवली समाजात कुटुंबातील सदस्यांनी घरामध्ये केलेले घरगुती काम देखील माल उत्पादनाच्या श्रेणीत येत नाही कारण त्याची खरेदी-विक्री केली जात नाही. ते निश्चितपणे उपयुक्त असते आणि कुठले ना कुठले उपयोगी वस्तू किंवा सेवा तयार करते. परंतु त्याचे कोणतेही विनिमय मूल्य नसते कारण ते विनिमयासाठी तयार केले जात नाही. परंतु अशा प्रकारची सर्व उत्पादने आणि सेवा हा भांडवली समाजाच्या एकूण उत्पादनाचा एक छोटासा भाग असतो, तर मोठा भाग हा विक्री आणि खरेदीसाठी उत्पादित केल्या जाणार्‍या वस्तू आणि सेवांचा म्हणजेच मालाचा आहे.

आता थोडं खोलात जाऊ या.

विनिमय मूल्य म्हणजे काय? एखाद्या वस्तूचा अन्य इतर वस्तूंशी विनिमय होण्याचा गुण. परंतु कुठलाही विनिमय एका निश्चित प्रमाणातच होऊ शकतो. विनिमय मूल्य आपल्याला यापेक्षा वेगळे काहीही सांगत नाही, उदाहरणार्थ, दोन लीटर दूधासोबत किती किलोग्राम तांदळाचा विनिमय होईल किंवा दोन मीटर कापडासाठी किती किलोग्रॅम गहू दिले जातील, इ. परंतु दोन वस्तूंचा एका निश्चित प्रमाणात विनिमय होण्यासाठी त्यांच्यात काहीतरी समान असले पाहिजे ज्याची तुलना करता येईल. कारण एका निश्चित प्रमाणात दोन वस्तूंची देवाणघेवाण या दोन वस्तूंचे उत्पादक त्यांच्यातील समान गोष्टींची तुलना केल्याशिवाय करू शकत नाहीत. आता दोन लीटर दूध आणि तीन किलो तांदळात काय समान आहे? किंवा, दोन मीटर कापड आणि चार किलो गहू यात काय समान आहे? साहजिकच, त्यांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये किंवा त्यांच्या उपयोग-मूल्यात काहीही साम्य नाही. मार्क्सने दाखवल्याप्रमाणे, प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटलने सांगितले होते की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी, त्यांच्यात काहीतरी समान असले पाहिजे ज्याची तुलना करता येईल. ती समाईक गोष्ट काय आहे?

ती समान गोष्ट म्हणजे सर्व वस्तू मानवी श्रमाचे उत्पादन असणे. सर्व वस्तूंना आपापसात विनिमय करण्यायोग्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या सर्व वस्तू ह्या मानवी श्रमाने बनलेल्या असणे. कोणत्याही मालाच्या उत्पादनात लागलेले मानवी श्रमाचे प्रमाणच त्याचे मूल्य ठरवते आणि विनिमय-मूल्य हे स्वतःमध्ये दुसरे काही नसून दोन वस्तूंच्या मूल्यांचे प्रमाण असते. उदाहरणार्थ, एक मीटर कापड तयार करण्यासाठी 4 तास मानवी श्रम लागतात आणि 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 1 तास मानवी श्रम लागतात, तर एक मीटर कापडाचा 4 लिटर दुधाशी विनिमय होईल. निश्‍चितपणे, जेव्हा एका जमातीतील लोकांनी एखादी दुसरी वस्तू बनवणाऱ्या टोळीतील लोकांशी प्रथमच योगायोगाने त्यांच्या मालाची देवाणघेवाण केली असेल तेव्हा त्यांनी मानवी श्रमांचा अचूक अंदाज लावला नसेल. परंतु जेव्हा ही देवाणघेवाण अथवा विनिमय पुन्हा-पुन्हा केले जाईल तेव्हा निश्चितच दोन जमातींचे लोक त्यांच्या उत्पादनात किती श्रम लागलेले आहेत याचा अंदाज लावू लागतील आणि त्या आधारावर त्यांच्या उत्पादनांच्या देवाणघेवाणीचे गुणोत्तर ठरवतील.

पण मालांची किंमत ठरवताना आपण कोणत्या प्रकारचे मानवी श्रम मोजतो? जेव्हा आपण दोन प्रकारचे माल, उदाहरणार्थ कापड आणि दूध यांबद्दल बोलतो तेव्हा त्यामध्ये लागलेल्या विशिष्ट प्रकारच्या श्रमांची तुलना करणे शक्य नाही. कापड तयार करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचे ठोस विशेष श्रम लागतात, तर दूध तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे ठोस विशेष श्रम लागतात. या दोघांची तुलना कशी होऊ शकते? त्याचप्रमाणे, प्रत्येक भिन्न प्रकारच्या मालांच्या उत्पादनामध्ये विशिष्ट प्रकारचे ठोस श्रम खर्च केलेले असतात. यालाच आपण मूर्त श्रम म्हणतो, ज्याचा अर्थ दुसरा काही नसून हा आहे की ते विशिष्ट प्रकारचे ठोस श्रम आहे. प्रत्येक मालाच्या उत्पादनात विविध प्रकारचे मूर्त श्रम वापरले जातात आणि त्यांच्या आधारावर वस्तूंची गुणात्मक आणि परिमाणात्मक तुलना करता येणे शक्य नाही. म्हणजेच मूर्त श्रमाच्या आधारे वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी म्हणजेच विनिमयासाठी आवश्यक असलेल्या गुणात्मक आणि परिमाणात्मक तुलनेचे काम शक्य नाही कारण मूर्त श्रमाचे विविध प्रकार ही समान तुलना करण्यायोग्य गोष्ट नाही ज्याच्या आधारे मालांचे मूल्य आणि त्यांच्यातील गुणोत्तराच्या रूपात त्यांचे विनिमय मूल्य निर्धारित केले जाऊ शकेल.

जेव्हा आपण वस्तूंचा विनिमय करतो, तेव्हा आपण त्यांच्या उत्पादनात गुंतलेल्या मूर्त श्रमाला नजरेआड करतो आणि त्या श्रमाला सर्वसाधारणपणे मानवीय सामाजिक श्रमाच्या स्वरूपात बघतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण सर्वसाधारणपणे याला मानवी श्रमशक्तीचा खर्च मानतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपण सर्वसाधारणपणे याकडे मानवी श्रमाच्या म्हणजेच उत्पादकाच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेच्या खर्चाच्या रूपात बघतो. याला आपण दुसऱ्या पद्धतीने देखील समजू शकतो. आपण कोणत्याही समाजाच्या एकूण उत्पादनाला त्या समाजाच्या एकूण श्रमाची निर्मिती म्हणून समजू शकतो. अशा प्रकारे, प्रत्येक उत्पादन एकूण सामाजिक श्रमाचा एक भाग दर्शवते. एकूण सामाजिक श्रम म्हणून आपण सर्वसाधारणपणे मानवी सामाजिक श्रम बघतो, संपूर्ण समाजाच्या एकूण श्रमशक्तीचा खर्च बघतो, ना की विविध प्रकारचे विशिष्ट मूर्त श्रम. थोडक्यात, सर्व प्रकारच्या मूर्त श्रमांच्या विशिष्ट, ठोस वैशिष्ट्यांना नजरेआड करून आणि त्यातून अमूर्तन करून प्रत्येक मालामध्ये लागलेल्या मानवीय श्रमांना सर्वसाधारणपणे मानवीय सामाजिक श्रम आणि मानवीय श्रमशक्तीच्या खर्चाच्या रूपात बघतो. म्हणजेच, आपण ते अमूर्त श्रम म्हणून पाहतो. अमूर्त श्रमच मालांमध्ये असलेली ती समान, तुलनीय गोष्ट आहे जिच्या गुणात्मक आणि परिमाणात्मक तुलनेच्या आधारे दोन मालांचा एका निश्चित प्रमाणात विनिमय शक्य होतो.

मूर्त श्रम आणि अमूर्त श्रम यावरून गोंधळात पडण्याची गरज नाही. हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे श्रम नाहीत, जे वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी होतील. जे मूर्त श्रम मालाच्या उत्पादनात म्हणजेच अशा वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनात लागतात ज्यांना विनिमयासाठीच बनवले जात आहे, त्यांना अमूर्त श्रम म्हणून आपण पाहू शकतो. जेव्हा विनिमयाची गरज भासते तेव्हाच उत्पादकांना त्यांच्या मूर्त श्रमाचे अमूर्तन (ॲब्स्ट्रक्शन) करून त्याला सर्वसाधारणपणे मानवी श्रमशक्तीचा खर्च म्हणून पाहणे आवश्यक बनते. जेव्हा विनिमय होतो तेव्हाच श्रमाचे अमूर्तन करण्याची गरज निर्माण होते, कारण या आवश्यकतेशिवाय, म्हणजेच विनिमय नसेल तर, मूर्त श्रमाचे अमूर्तन करून अमूर्त श्रमापर्यंत येण्याची काही आवश्यकताच नसेल. कारण हे की विनिमयासाठीच एक तुलनीय गोष्ट म्हणून आपल्याला एखाद्या वस्तू किंवा सेवेमध्ये लागलेल्या श्रमाला सर्वसाधारणपणे मानवी सामाजिक श्रम किंवा मानवी श्रमशक्तीचा खर्च म्हणून बघण्याची गरज भासते. येथे आपण विविध प्रकारच्या मूर्त श्रमांचे अमूर्तन करतो, त्यामुळे या वस्तू आता आपल्यासाठी केवळ मानवी श्रमाचे उत्पादन राहतात. मूर्त श्रम वेगवेगळ्या मालांमध्ये विविध प्रकारच्या उपयोग-मूल्यांना जन्म देतात. या भिन्न उपयोग-मूल्यांच्या आधारे कुठलाही विनिमय शक्य नाही कारण त्यांची तुलना करता येत नाही. परंतु जेव्हा आपण मालांकडे केवळ मानवी श्रम-शक्तीच्या खर्चाची उत्पादने म्हणजेच वस्तुरूप ग्रहण केलेल्या मानवी सामाजिक श्रमाच्या एका निश्चित प्रमाणाच्या स्वरूपात बघतो, तेव्हा त्यांच्यात असलेले सर्व विशिष्ट भेद नाहीसे होतात. आता ते एकाच सामाजिक पदार्थाचे (social substance) म्हणजे साधारण मानवी सामाजिक श्रमाचे फक्त विविध प्रमाण म्हणूनच राहतात. मार्क्स लिहितात:

“जर आपण मालांच्या उपयोग मूल्याकडे दुर्लक्ष केले, तर त्यांचा केवळ एकच गुणधर्म उरतो तो म्हणजे ती सर्व मानवी श्रमाची उत्पादने आहेत. पण अगदी श्रमाच्या उत्पादनाचेही आपल्या हाती रुपांतर झालेले असते. जर आपण त्यांचे उपयोग-मूल्यापासून अमूर्तन केले, तर आपण त्या भौतिक घटकांपासूनसुद्धा अमूर्तन करतो ज्यामुळे ते एक उपयोग-मूल्य बनलेले असते. आता ती एक टेबल, घर किंवा सुताचा एक तुकडा किंवा इतर कोणतीही उपयुक्त वस्तू राहिलेली नाही. इंद्रियांनी अनुभवता येणारे हे सर्व गुण आता नाहीसे होतात. आता ते सुतार, गवंडी किंवा सूत कातणारा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पादक श्रमांचे उत्पादन राहत नाहीत. श्रमाच्या उत्पादनांचे उपयुक्त गुणधर्म नाहीसे होण्यासोबतच त्यांच्यामध्ये लागलेल्या विविध प्रकारच्या श्रमांचे उपयुक्त चरित्रदेखील नाहीसे होते; याचा अर्थ म्हणजे त्यांच्यामध्ये लागलेल्या श्रमाच्या विविध मूर्त स्वरूपाचे नाहीसे होणे. आता त्यांना वेगवेगळे करून पाहिले जाऊ शकत नाही, परंतु ते सर्व आता एकाच प्रकारचे श्रम, म्हणजेच अमूर्त रूपातील मानवीय श्रमात संक्षेपित (reduce) होतात.” (कार्ल मार्क्स, 1992, भांडवल, खंड-1, पेंग्विन पब्लिकेशन्स, पृ. 128)

स्पष्ट आहे की अमूर्त श्रमाचा प्रश्न तेव्हाच येईल जेव्हा आपण माल उत्पादनाविषयी बोलत असू, केवळ उपयोग-मूल्य म्हणून उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाबाबत नाही.  श्रमाच्या अमूर्ततेची गरज तेव्हाच निर्माण होईल जेव्हा विनिमयाची गरज असेल. अमूर्त श्रमाचा व्यय सर्वसाधारणपणे मानवी सामाजिक श्रमाचा व्यय असतो जो प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या उत्पादनात खर्च होतो, मग त्याचे ठोस रूप आणि वैशिष्ट्य म्हणजेच त्याचे मूर्त रूप काहीही असो. विशिष्ट प्रकारचे मूर्त श्रम विशिष्ट प्रकारचे उपयोग-मूल्य तयार करतात, जेव्हा की अमूर्त श्रम मूल्य निर्माण करतात. वास्तवात मालाचे मूल्य दुसरे काही नसून वस्तूचे रूप धारण केलेले अमूर्त श्रम आहे, किंवा मार्क्सच्या शब्दात ‘थिजलेले अमूर्त श्रम’ (congealed labour) आहेत.

पण अमूर्त श्रम मोजले कसे जातात? आपण हे जाणतो की श्रमाला केवळ श्रमकाळातच मोजले जाऊ शकते. पण इथे आपल्यासमोर एक समस्या येते. समजा आपण बूट बनवणाऱ्या क्षेत्रातील पाच बूट उत्पादकांना घेतले जे समान प्रकारचे बूट तयार करतात. एक बूट बनवण्यासाठी पहिल्या उत्पादकाला 3 तास, दुसऱ्याला 4 तास, तिसऱ्याला 5 तास, चौथ्याला 6 तास आणि पाचव्याला 7 तास लागतात. म्हणजेच पहिल्या उत्पादकाचे 3 तासाचे श्रम खर्च झाले आहे, दुसऱ्याचे 4 तास, तिसऱ्याचे 5 तास, चौथ्याचे 6 तास आणि पाचव्याचे 7 तासाचे श्रम खर्च झाले आहे. पहिल्या उत्पादकाच्या बुटाचे श्रम-मूल्य 3 तास आहे, तर पाचव्याच्या बुटाचे श्रम-मूल्य 7 तास आहे. तर मग काय एकाच प्रकारचे बूट बाजारात पाच वेगवेगळ्या मूल्यांत किंवा किमतीत (ज्याबद्दल आपण आता सुरुवातीला एवढे मानू की ही मूल्याची मौद्रिक अभिव्यक्ती आहे) विकले जातील? नाही! आपल्या सर्वांना माहीत आहे की हे शक्य नाही. स्पष्ट आहे की जर ग्राहकाला एकाच प्रकारचा बूट पाच वेगवेगळ्या किमतीत मिळाला तर तो सर्वात स्वस्त बूट खरेदी करेल. म्हणून आपण अमूर्त श्रम मोजण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादकांद्वारे खर्च झालेल्या श्रमकाळाला म्हणजेच वैयक्तिक श्रमकाळाला वापरू शकत नाही. कोणत्याही उत्पादनाच्या क्षेत्रात श्रमाचे प्रमाण मोजण्यासाठी आपण सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळ वापरतो. खरं तर अमूर्त श्रम स्वतःमध्येच एक सामाजिक पदार्थ आहे आणि त्याला वैयक्तिक श्रमकाळाने मोजले जाऊ शकत नाही. ते केवळ सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळानेच मोजले जाऊ शकते.

हा सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळ काय आहे? कोणत्याही उत्पादनाच्या क्षेत्रात कोणत्याही वेळी अस्तित्वात असलेल्या उत्पादनाच्या सरासरी परिस्थितीच्या आधारावर मालाचे उत्पादन करण्यासाठी जो वेळ लागतो, त्याला आपण सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळ म्हणतो. उत्पादनाची सरासरी परिस्थिती म्हणजे काय? उत्पादनाची सरासरी परिस्थिती म्हणजे उत्पादकता, कुशलता, तंत्रज्ञान इ. ची सरासरी पातळी. उत्पादनाच्या सरासरी परिस्थितीत एखाद्या मालाचे उत्पादन करण्यासाठी उत्पादकाला जेवढा वेळ लागतो त्याला आपण सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळ म्हणतो. सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळानुसार मोजल्यानंतर कोणत्याही मालाच्या उत्पादनात जेवढे अमूर्त श्रम लागतात त्याला आपण त्या मालाच्या उत्पादनासाठी लागणारे सामाजिकदृष्ट्या आवश्यक अमूर्त श्रम म्हणतो आणि हेच त्या मालाचे मूल्य निर्धारित करते. आता आपण आपली व्याख्या थोडी परिष्कृत करूयात: एखाद्या मालाचे मूल्य त्यामध्ये लागलेल्या मानवी अमूर्त श्रमांच्या प्रमाणाने निर्धारित होते ज्याला सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळानुसार मोजले जाते. आपल्या वरील उदाहरणात जर सरासरी परिस्थितीत बूट उत्पादन क्षेत्रात बूट तयार करण्यासाठी 5 तास लागत असतील तर त्या मालाला त्याच्या सामाजिक किंवा बाजार मूल्यानुसार विकल्यास पहिल्या उत्पादकाला काही अतिरिक्त नफा मिळेल, दुसऱ्याला त्यापेक्षा कमी अतिरिक्त नफा मिळेल, तिसऱ्याला सामान्य सरासरी नफा मिळेल कारण त्याची उत्पादकता बूट उत्पादन क्षेत्रातील सरासरी उत्पादकतेएवढी आहे,  चौथ्या आणि पाचव्या उत्पादकांना तोटा सहन करावा लागेल आणि जर त्यांना बूट उत्पादन क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर त्यांनासुद्धा कालांतराने त्यांची उत्पादकता वाढवावी लागेल. ही उत्पादनाच्या एखाद्या क्षेत्रातील माल उत्पादकांमध्ये होणारी स्पर्धा आहे. उत्पादनाच्या एका क्षेत्रात होणाऱ्या या स्पर्धेच्या आधारे मालाचे सामाजिक मूल्य किंवा बाजार मूल्य निर्माण होते जे सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळानुसार निर्धारित होते. हे समजणे सोपे आहे की मालाचे बाजार मूल्य किंवा सामाजिक मूल्य वेगवेगळ्या उत्पादकांच्या वैयक्तिक श्रमकाळानुसार निर्माण होऊ शकत नाही, कारण विनिमय ही स्वतःच एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि विनिमयासाठी मूल्याचे निर्धारण स्वतः एका सामाजिक प्रक्रियेद्वारेच होते.

अजून एक समस्या उरली आहे ज्याबद्दल बोलणे आवश्यक आहे: कुशल श्रम आणि अकुशल श्रमाची समस्या.

जेव्हा आपण अमूर्त श्रमाच्या प्रमाणाद्वारे मूल्य ठरवण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण साधारण किंवा अकुशल श्रमाबद्दल बोलत आहोत की जटिल किंवा कुशल श्रमाबद्दल? कुशल श्रमाचा एक तास अकुशल श्रमाच्या एका तासाएवढा असतो का? कुशल श्रमशक्तीचे मूल्य अकुशल श्रमशक्तीच्या मूल्याएवढे असते का? आम्हा कष्टकऱ्यांना आमच्या अनुभवावरून हे माहीत आहे की कुशल कामगाराला जास्त मजुरी मिळते, तर अकुशल कामगाराला कमी मिळते. आपल्याला हे माहीत आहे की एका तासाचे कुशल श्रम जास्त मूल्य निर्माण करते आणि एका तासाचे अकुशल श्रम त्यापेक्षा कमी मूल्य निर्माण करते. तर मग कोणत्या प्रकारचे श्रम मूल्य ठरवतात? मूल्य साधारण/अकुशल श्रमाद्वारे निर्धारित केले जाते, कारण कुशल श्रमाच्या एका तासाला अकुशल श्रमाच्या तासांच्या एका निश्चित प्रमाणात बदलले जाऊ शकते आणि अतिशय अचूकतेने आणि वैज्ञानिकतेने बदलले जाऊ शकते. हे काम राजकीय अर्थशास्त्रज्ञ नेहमीच करतात. कसे? आपल्याला हे माहीत आहे की अकुशल कामगार तो असतो ज्याचे कौशल्य अशा स्तरावरील असते जे समाजातील कोणतीही व्यक्ती विशेष प्रशिक्षणाशिवाय एका निश्चित काळाच्या उत्पादक श्रमाच्या  अनुभवानंतर प्राप्त करू शकतो. कुशल कामगार तो असतो ज्याच्या कौशल्याची पातळी कुठलेतरी प्रशिक्षण घेतल्यानंतरच शक्य होते. हे प्रशिक्षण काय आहे? प्रशिक्षणाची ही प्रक्रिया प्रत्यक्षात कौशल्याची निर्मिती असते, ज्यात इतर श्रमशक्ती खर्ची होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही आयटीआय किंवा पॉलिटेक्निकमध्ये एखाद्या प्रकारच्या उत्पादक श्रमाचे कौशल्य शिकला असाल तर ते शिकवण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक इ. काम करतात. त्यांच्या श्रमातून जन्माला आलेले शिक्षण आणि प्रशिक्षण स्वतः एक माल असते, जे तुम्ही फी भरून विकत घेता. प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी वस्तूंच्या उत्पादनात लागता तेव्हा तुमची श्रमशक्ती कंपाऊंड किंवा जटिल श्रमशक्तीच्या  रूपात उत्पादन प्रक्रियेत सक्रिय होते. याचा अर्थ असा की तुमच्या श्रमशक्तीच्या माध्यमातून तुमच्या कौशल्याच्या उत्पादनात खर्च झालेल्या इतर श्रमशक्तीही या उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. परिणामी, कौशल्याच्या उत्पादनात खर्च झालेल्या श्रमशक्तींनी पुरविलेल्या सामाजिक श्रमाद्वारे निर्मित मूल्याच्या आधारावर आपण कुशल श्रमाच्या एका तासाचे साधारण श्रमाच्या तासांच्या एका निश्चित संख्येत रूपांतर करू शकतो. दुसऱ्या शब्दांत, कौशल्याच्या निर्मितीमध्ये खर्च केलेल्या श्रमशक्तीच्या आधारावर तुम्ही एक गुणांक (कोइफिशन्ट) काढू शकता, ज्याच्याशी गुणाकार करून तुम्ही एका तासाच्या जटिल/कुशल श्रमाच्या एका तासाला साधारण/अकुशल श्रमाच्या तासांच्या ठराविक संख्येमध्ये बदलू शकतो. उदाहरणार्थ, राजमिस्त्रीच्या श्रमाचा एक तास हा अकुशल बांधकाम कामगाराच्या तीन तासांच्या श्रमाच्या समतुल्य असू शकतो. ही गणना अत्यंत वैज्ञानिक आणि अचूक पद्धतीने केली जाऊ शकते आणि केली जाते. त्यामुळे, कुशल आणि अकुशल श्रम यांच्यातील फरकामुळे मूल्य निश्चित करण्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही. जेव्हा आपण मूल्य निर्धारित करताना श्रमाचे प्रमाण मोजतो, तेव्हा आपण अमूर्त साधारण सामाजिक श्रम मोजतो. त्यासाठी वरील गुणांकाच्या आधारे कुशल श्रमाला अकुशल श्रमात बदलावे लागते. या प्रक्रियेला ‘जटिल श्रमांचे साध्या श्रमात संक्षेपण (reduction)’ असे म्हणतात. मार्क्स याबद्दल लिहितात:

“अधिक जटिल श्रमाचे मोजमाप हे केवळ सघनीकृत किंवा गुणित साधारण श्रमाच्या रूपातच होऊ शकते, ज्याद्वारे जटिल श्रमाच्या कमी प्रमाणाला साधारण श्रमाच्या अधिक प्रमाणाएवढे मानले जाते. अनुभव दर्शविते की हे संक्षेपण निरंतर होत राहते… विविध प्रकारच्या श्रमांना त्यांच्या मापाचे एकक म्हणून साधारण श्रमात ज्या प्रमाणात संक्षेपित केले जाते, ते एका सामाजिक प्रक्रियेद्वारे निर्धारित केले जाते जी उत्पादकांच्या पाठीमागे सतत चालू राहते.” (कार्ल मार्क्स, 1992, भांडवल, खंड-1, पेंग्विन प्रकाशन, पृष्ठ 135)

जसे की आपण पाहू शकतो, कुशल आणि अकुशल श्रमातील फरक अमूर्त श्रमाच्या प्रमाणाद्वारे मूल्य निश्चित करण्यात कोणतीही अडचण निर्माण करत नाही. हा कुठलाही काल्पनिक विचार नाही आहे ज्यावरून वास्तविकता निर्धारित होईल, उलट वास्तविकतेच्या अध्ययनाच्या आधारावरच स्मिथ आणि रिकार्डो यांच्यासारख्या अभिजात राजकीय अर्थशास्त्रज्ञांनी आणि सर्वात महत्त्वाच्या स्वरूपात मार्क्सने हा सिद्धांत काढला.

आता आपण शेवटच्या समस्येकडे येऊयात, ज्याचा मूल्याच्या श्रम सिद्धांताशी थेट संबंध नसला तरी त्याच्या आकलनात हे महत्त्वाचे आहे.  याविषयी आपण पुढेही बोलूच, परंतु आत्ता त्याबद्दल थोडक्यात चर्चा करणे उपयुक्त ठरेल.

सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम हा शब्द आपण दोन अर्थाने वापरतो. पहिला अर्थ म्हणजे तो ज्यावर आपण वर चर्चा केलेली आहे. म्हणजे, अमूर्त श्रमाचे ते प्रमाण जे एखाद्या मालाच्या उत्पादनासाठी आवश्यक असते, जे त्याचे मूल्य ठरवते आणि ज्याला सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळाद्वारे मोजले जाते. परंतु सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमाचा आणखी एक दुसरासुद्धा अर्थ आहे. संपूर्ण समाजाच्या पातळीवर श्रमाचे ते प्रमाण  जे समाजाच्या गरजेनुसार निश्चित मालाला निश्चित प्रमाणात उत्पादित करते त्याला आपण सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम म्हणतो. माल-उत्पादक समाजात विनिमयाच्या मध्यस्थीद्वारेच संपूर्ण सामाजिक उपभोग होतो. येथे सर्व उत्पादक मिळून हे ठरवत नाहीत की समाजाला कोणत्या मालाची किती प्रमाणात आवश्यकता आहे आणि त्याच्यानुसार संपूर्ण सामाजिक श्रमाचे उत्पादनाच्या विविध शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात योजनाबद्ध पद्धतीने वाटपही ते करत नाहीत. म्हणजेच सामाजिक श्रम विभागणी जाणीवपूर्वक आयोजित केली जात नाही. माल-उत्पादक समाजात वेगवेगळे खाजगी माल उत्पादक त्यांच्या उत्पादनाच्या साधनांसह आणि श्रमशक्तीसह उत्पादन करतात आणि एकमेकांशी स्पर्धा करतात, जी बाजारात घडते. कोणालाच हे माहिती नसते की समाजात त्याच्या मालासाठी पुरेसे खरेदीदार असतील की नाही. ही एक अराजक प्रक्रिया असते ज्यामध्ये सामाजिक गरजांचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यांकन केले जात नाही आणि त्यानुसार सामाजिक श्रम विभाजन ठरवले जात नाही. परिणामी, कधी एखाद्या मालाचे गरजेपेक्षा जास्त तर कधी कमी उत्पादन होते. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. 1970 आणि 1980 च्या दशकात भारतातील वस्त्रोद्योगात परिवर्तन होत होते. मोठ्या पारंपारिक कापड गिरण्यांमध्ये सूती कापडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन अनेक दशकांपासून सुरू होते. परंतु या काळात यंत्रमागाचे आगमन झाले आणि कृत्रिम कापडांचे उत्पादन सुरु झाले ज्याची उत्पादकता जास्त होती. परिणामी, हे कृत्रिम कापड अधिक परवडणारे आणि टिकाऊ होते. त्यामुळे त्यांची मागणीही समाजात वाढू लागली व त्यामुळे त्यांचा पुरवठा त्यांच्या मागणीपेक्षा कमी होता. त्याच वेळी जुन्या पारंपारिक कापड उद्योगात उत्पादित सुती कपड्यांची मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या भावात घसरण होऊ लागली आणि बहुतांश मालाची विक्रीही होऊ शकली नाही. जो माल विकल्या गेला नाही त्याला समाजाने सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमाचे उत्पादन म्हणून स्वीकारले नाही. यासोबतच वस्त्रोद्योगात गुंतवणूक करणाऱ्या भांडवलदारांनी त्यांच्या भांडवलाचा काही भाग इतर उद्योगांकडे आणि पॉवरलूम आणि कृत्रिम कापडाच्या उत्पादनाकडे वळवला. जुन्या वस्त्रोद्योगातून भांडवलाचा प्रवाह नवीन वस्त्रोद्योगाकडे जाण्यासोबतच सामाजिक श्रमाचा एक भागही नवीन वस्त्रोद्योगांकडे स्थानांतरित झाला. म्हणजेच, जुन्या कापड उद्योगात जे श्रम लागत होते ते सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमापेक्षा जास्त होते आणि त्याचा काही भाग वाया जात होता, ज्याच्या उत्पादाला बाजारात कुठलाही खरेदीदार मिळत नव्हता. परिणामी, सामाजिक श्रमविभाजन, म्हणजेच सामाजिक श्रमाचे उत्पादनाच्या विविध क्षेत्रांमधील वाटप देखील बदलले. नवीन प्रकारच्या वस्त्रोद्योगातील मालाच्या चढ्या किमती हे त्याला समाजाने दिलेले एक प्रकारचे प्रोत्साहन होते, जेणेकरून जुन्या वस्त्रोद्योगातून भांडवल व मजूर इकडे आकर्षित होतील आणि त्यासोबतच सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमानुसार श्रमविभागणीत बदल होईल. एका माल-उत्पादक समाजात सामाजिक श्रम विभाजन अशाच प्रकारे अराजक गतीने बदलते. काही मालांना समाज सामाजिकदृष्ट्या आवश्यक मानत नाही, त्यांचे मूल्य वास्तवीकृत होऊ शकत नाही, ते वाया जातात आणि त्या मालांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात लागलेल्या श्रमांना सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम म्हणून मान्यता प्राप्त होत नाही. अशाप्रकारे मूल्याचा नियमच एका माल-उत्पादक समाजात सामाजिक श्रम विभाजन निर्धारित करतो आणि कोणते श्रम सामाजिकदृष्ट्या आवश्यक आहे आणि कोणते सामाजिकदृष्ट्या अनावश्यक आहे हे निर्धारित करतो.

थोडक्यात, मूल्याचा मार्क्सवादी श्रम सिद्धांत सांगतो की प्रत्येक वस्तू किंवा सेवा जी विनिमयासाठी उत्पादित केली जाते ती माल आहे. म्हणून माल ती वस्तू किंवा सेवा आहे जिला उपयोग-मूल्य आणि विनिमय-मूल्य असते. परंतु विनिमय-मूल्य हे वास्तवात दुसरे काही नसून विनिमय करावयाच्या मालांच्या मूल्यांचे गुणोत्तर आहे आणि त्यांची अभिव्यक्ती आहे. खरी गोष्ट म्हणजे उपयोग-मूल्य आणि मूल्य समजून घेणे आहे. कोणत्याही मालाचे मूल्य त्याच्या उत्पादनात लागलेल्या अमूर्त श्रमांच्या प्रमाणात निर्धारित केले जाते, जे सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळात मोजले जाते. मूल्य म्हणजे दुसरे काही नसून वस्तुरूपातील किंवा ‘थिजलेले श्रम’ आहे. हे मूल्यच मालांच्या बाजारभावाचा आधार असतात आणि बाजारातील किमती याच मूल्यांभोवती फिरतात, जरी प्रत्येक मालाचे मूल्य आणि त्याची बाजार किंमत  साधारणपणे एकसमान नसतात. हे आपण नंतर पुढे समजून घेऊ.

मूल्याचा श्रम सिद्धांत त्याच्या वैज्ञानिक स्वरूपात मार्क्सने विकसित केला. मार्क्सने ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांच्या मूल्याच्या श्रम सिद्धांतातील त्रुटी दूर केल्या आणि स्पष्ट केले की भांडवलदार वर्गाचा नफा हा कामगार वर्गाने निर्माण केलेल्या सामाजिक अधिशेषाचेच एक रूप आहे. मार्क्सने ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांच्या मूल्याच्या श्रम सिद्धांतातील त्रुटी कशा दूर केल्या आणि भांडवलदार वर्गाच्या नफ्याचे स्त्रोत कसे उघड केले ते आपण पुढे पाहू.

(पुढील अंकात सुरु)
(मूळ लेख- मजदूर बिगुल, ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित)

अनुवाद- जयवर्धन