स्त्री मुक्ती लीग तर्फे मानखुर्द, मुंबई येथे ‘मुक्ती चे स्वर’ वाचनालयाचे उद्घाटन!!
भांडवली पितृसत्तेविरोधात एकजूट होऊन लढण्याचे केले आवाहन!
✍ बिगुल पत्रकार
गेली काही वर्षे स्त्री मुक्ती लीग मुंबईतील मानखुर्द-गोवंडी भागात स्त्री मुक्तीच्या प्रश्नावर क्रांतिकारी कार्य करत आहे. आजच्या भांडवली व्यवस्थेत होणाऱ्या स्त्रियांच्या सामाजिक-आर्थिक दुहेरी शोषणाविरोधात, नफाकेंद्री व्यवस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या वस्तुकरणाविरोधात स्त्री मुक्ती लीग वेगवेगळ्या प्रकारे जमिनीवर काम करत आहे. यातील काही कामं म्हणजे सावित्री फातिमा अभ्यास गट चालवणे, राजकीय, सामाजिक विषयांवर महिला बैठक घेणे, फिल्म स्क्रिनिंग आणि चर्चासत्रे, ऑनलाईन चर्चासत्रे, विविध कार्यशाळा, व्याख्यानं आयोजित करणे, पोस्टर प्रदर्शन लावून, पत्रकं वाटून अभियान चालवणे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेऊन ती लिखित रूपात सर्वांसमोर ठेवणे, आंदोलन करणे, अभियान चालवणे व त्यायोगे स्त्री मुक्तीकरिता एकजूट होऊन लढण्याचे आवाहन करणे, इत्यादी. याच कामांना पुढे नेत, जनतेतून आर्थिक सहयोग उभा करून स्त्री मुक्ती लीगच्या कार्यालयीन जागेचे 9 जुलै, 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले जिचे नाव ठेवले गेले – ‘मुक्ती चे स्वर’ वाचनालय! यावेळी स्त्री मुक्ती लीगच्या समन्वयक पूजा यांनी मांडले की मुक्ती के स्वर ही अशी जागा आहे जिथे विविध पुस्तकं असलेलं वाचनालय आहे, जिथे स्त्रिया मीटिंगस् करू शकतात, सावित्री फातिमा अभ्यास गटाअंतर्गत मुलींना, महिलांना जिथे शिकवले जाईल, नाटक, गाणी, कविता इत्यादींचा सराव केला जाईल, संगणक शिकवला जाईल, फिल्म स्क्रिनिंग, व्याख्यानं आयोजित केली जातील.
उद्घाटनप्रसंगी क्लारा झेटकिन, रोझा लक्झेंबर्ग, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख, प्रीतीलता वाडेदार, दुर्गाभाभी, तसेच स्त्री मुक्ती लीग सोबत आयुष्यभर संघर्षात सामील असलेल्या साथी मीनाक्षी आणि शालिनी यांच्यासारख्या देशातील व देशाबाहेरील स्त्री मुक्तीच्या संघर्षात सामील महिला क्रांतिकारकांचे फोटोज, स्त्री मुक्तीच्या संघर्षाला प्रेरणादायी अशा काव्यपंक्ती, कोटस्, यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स यांनी सर्व मंच व्यापला होता. उद्घाटनाच्या दिवशी पाऊसाने हजेरी लावलीच परंतु तरीही मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून, तसेच मानखुर्द – गोवंडीमधील वेगवेगळ्या वस्त्यांमधील स्त्री मुक्ती लीगचे हितचिंतक उद्घाटन कार्यक्रमात सामील झाले. संविधान चौक ते आर-15 बिल्डिंग पर्यंत ‘स्त्री मुक्ती का रास्ता, इंकलाब का रास्ता’, ‘मार्ग मुक्तीचा बनवावा लागेल, जगायचे असेल तर लढावे लागेल’, ‘भांडवली पितृसत्ता मुर्दाबाद’ अशा स्त्री मुक्ती लढ्याशी संबंधित घोषणा देत, महिला क्रांतिकारकांचे पोस्टर्स, घोषणा लिहिले प्लाकार्ड्स, बॅनर, दफ्त्या पकडत, डफली वाजवत रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान ‘मुक्ती चे स्वर’ बद्दल माहिती देणारे पत्रक तसेच स्त्री मुक्ती लीगची भूमिका मांडणारे पत्रक मराठी, इंग्रजी, हिंदी ह्या भाषांमध्ये वितरित करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाच्या इमारतीच्या खाली सफदर हाशमी लिखित पथनाट्य ‘औरत’ पासून प्रेरित ‘एका कष्टकरी बाईची कहाणी’ हे सडक नाटक, गीत, रॅप, काव्यवाचन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रस्तुती करण्यात आली. यावेळी ललिताने स्त्री मुक्ती लीगची व्यापक भूमिका मांडली, शशांकने भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर वाढलेले अत्याचार व काही प्रमुख घटना ज्यांविरोधात स्त्री मुक्ती लीगने आंदोलने केलीत त्यांचा आढावा मांडला तर पूजाने ‘मुक्ती चे स्वर’ सारख्या जागांची गरज अधोरेखित केली, ‘मुक्ती चे स्वर’च्या उद्घाटनासाठी ज्यांना आमंत्रित केले होते अशा एन.आर.सी. सारख्या काळ्या कायद्याविरोधात उभ्या राहिलेल्या संघर्षात ठामपणे उभे राहिलेल्या महिलांची ओळख मांडली तसेच ह्या गरिबविरोधी कायद्याबद्दल थोडक्यात मांडणी केली. प्रज्ञाने उपस्थित सर्वांना ‘मुक्ती चे स्वर’ची सदस्यता घेण्याचे तसेच आर्थिक सहयोग देण्याचे आवाहन केले. त्यानंतर ‘मुक्ती चे स्वरच्या’ खोलीला लावलेल्या रिबीन कापण्याचा कार्यक्रम घोषणांच्या व टाळ्यांच्या गजरात पार पडला.
यानंतर कार्यालयात बसल्यानंतर उपस्थित अनेकांनी आपली मतं मांडली, ‘मुक्ती चे स्वर’ची सदस्यता घेण्याची इच्छा दर्शवली तसेच काही महिलांनी शिकण्याची तर काहींनी शिकवायला येण्यासाठी नावनोंदणी केली. समान व निःशुल्क शिक्षण हा आपला अधिकार आहे, आणि ही जबाबदारी संपूर्णपणे सरकारची असतानाही सरकार मात्र कामगार, कष्टकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवून खाजगी धंदेबाज शिक्षणाला प्रोत्साहन कसे देते यावर शिक्षण हक्काच्या संदर्भात चर्चा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा जोरदार घोषणा, क्रांतिकारी रॅप व गीतांची प्रस्तुती करण्यात आली.
मार्ग मुक्तीचा बनवावा लागेल, जगायचे असेल तर लढावे लागेल!
स्त्री मुक्तीचा रस्ता, इंकलाबचा रस्ता!!