थॉमस संकारा : आफ्रिकन क्रांतिकारी
थॉमस संकाराच्या जन्म व स्मृतीदिनानिमित्त त्याच्या कार्याची ओळख करून देणारा लेख
✍ राहुल साबळे
आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशात ज्याने भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले, जगातील साम्राज्यवादी देशांना घाबरून सोडले, ज्याला वयाच्या 37 व्या वर्षी आपले प्राण गमवावे लागले. ज्याला आफ्रिकेचा चे गुवारा म्हणून ओळखले जाते, तो थॉमस संकारा (21 डिसेंबर 1949 – 15 ऑक्टोबर 1987). कॉंग्रेससारख्या भांडवलदार वर्गाच्या पक्षाच्या नेतृत्वात दबाव-तडजोड-दबाव या तडजोडीच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढलेल्या भारतातील जनतेपर्यंत आफ्रिकेतील देशांमध्ये झालेल्या क्रांतिकारी स्वातंत्र्यलढ्यांची आणि साम्राज्यवाद विरोधी लढ्यांची माहिती पोहोचूच दिली जात नाही. साम्राज्यवादाविरोधात मूलगामी लढा उभारणाऱ्या थॉमस संकाराच्या जीवनाबद्दल म्हणूनच जाणले पाहिजे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अप्पर व्होल्टा(बुर्कीना फासो) देश फ्रेंच वसाहत होता. या सत्तेविरोधात बुर्किनाजी लोकांच्या स्वातंत्र्यलढ्याची परिणती 1960 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यात तर झाली, परंतु फ्रेंचांनी सत्ता सोडताना मॉरिस यामिएगोच्या नेतृत्वातील वोल्टेईक डेमोक्रॅटिक युनियन या फ्रेंच धार्जिण्या पक्षाकडे सूत्रे सोपवली. यानंतर अनेक लष्करी बंडांनी भरलेल्या बुर्कीना फासोच्या इतिहासात, फ्रेंच साम्राज्यवादाच्या विरोधात स्वतंत्र भांडवली विकासात थॉमस संकाराचे राजकीय जीवन एक महत्त्वपूर्ण टप्पा होता.
थॉमस संकाराचे प्रारंभिक जीवन
थॉमस इसिडोर नोएल संकाराचा जन्म 21 डिसेंबर 1949 रोजी अप्पर व्होल्टा (आता बुर्कीना फासो) मधील याको शहरात झाला. त्या वेळी अप्पर व्होल्टा ही फ्रेंच वसाहत होती आणि त्याचे वडील वसाहतिक सरकारच्या नोकरीत असलेल्या काही आफ्रिकन लोकांपैकी एक होते. थॉमस संकारा अभ्यासू आणि मेहनती होता, तो विशेषतः गणित आणि फ्रेंचमध्ये चांगला होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने पौरोहित्यात प्रवेश करावा, परंतु थॉमसने त्याऐवजी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.
1966 मध्ये, वयाच्या 17 व्या वर्षी, थॉमस संकाराने देशाची राजधानी वागाडूगू येथील लष्करी विद्यालयात प्रवेश केला. तेथे असताना, संकाराने लेफ्टनंट-कर्नल संगौले लामिझाना यांच्या नेतृत्वाखाली अप्पर व्होल्टामध्ये पहिले लष्करी बंड पाहिले. लष्करी विद्यालयात सामाजिक शास्त्रांमध्ये प्रशिक्षित अनेक स्थानिक प्राध्यापक होते, ज्यांनी थॉमस संकाराला वसाहतवादविरोधी, साम्राज्यवादविरोधी आणि मार्क्सवादी यांसारख्या अनेक विचारधारांची ओळख करून दिली. तीन वर्षांनंतर, संकाराने वागाडूगू सोडले आणि मादागास्करमध्ये पुढील लष्करी प्रशिक्षण घेतले. मादागास्करमध्ये असताना त्याने राष्ट्राध्यक्ष फिल्बर्ट सिरानाना यांच्या सरकारच्या विरोधात लोक उठाव पाहिला होता. 1972 मध्ये, संकारा अप्पर व्होल्टाला परतला तेथे त्याने अप्पर व्होल्टा आणि माली यांच्यातील सीमा युद्धात भाग घेतला आणि या संघर्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
संकारा गिटार वादक सुद्धा होता. वागाडूगूमध्ये टाउट-अ-कू जाझ नावाच्या बॅंडमध्ये सुद्धा तो सामील झाला होता. बॅंडचा उत्कृष्ट गिटारवादक म्हणून त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती. संगीतकार म्हणून यश मिळवूनही त्याने आपली लष्करी कारकिर्द सुरू ठेवली. 1976 मध्ये, तो देशाच्या दक्षिणेकडील पो शहरात कमांडो प्रशिक्षण केंद्राचा कमांडर बनला. त्याच वर्षी, तो कम्युनिस्ट ऑफिसर्स ग्रुप नावाच्या गुप्त संघटनेत सामील झाला. ज्यामध्ये ब्लेझ कंपाओरे याचाही समावेश होता, ज्याने भविष्यात थॉमस संकाराच्या मृत्यूचा कट रचला.
राष्ट्रपतीपदापूर्वीचे जीवन
1981 मध्ये, थॉमस संकाराला राष्ट्रपती साये झर्बो यांच्या लष्करी सरकारच्या अंतर्गत माहिती मंत्री म्हणून पहिले सरकारी पद मिळाले. त्याच्या मंत्रिपदाच्या काळात इतर मंत्र्यांचे ऐयाश जीवन पाहून तो अवाक झाला होता आणि त्याने स्वतःला त्यापासून शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. इतर लोक महागड्या गाड्यांमधून कामाला निघाले, तर संकाराने सायकल चालवली. संकारा निर्भीड आणि प्रामाणिक राहिला, त्याने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, ज्यामुळे सरकारी घोटाळे उघडकीस आले, साहजिकच इतर सहकाऱ्यांना तो नापसंत होत गेला. एप्रिल 1982 मध्ये त्याने मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच वर्षाच्या उत्तरार्धात, दुसरे बंड झाले आणि सत्तापालट होऊन मेजर डॉक्टर जीन-बॅप्टिस्ट ओएड्रॉगो सत्तेवर आले. त्यांनी थॉमस संकाराला पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. बदललेल्या सरकारमध्ये सुद्धा संकराने प्रगतीशील सुधारणांना लागू करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा आपल्या सहकाऱ्यांचा राग ओढवून घेतला. त्याच्यावरील अविश्वास इतका वाढला की त्याला चार महिन्यांत बडतर्फ करण्यात आले आणि नंतर तुरुंगात टाकण्यात आले.
विद्यमान सरकारसाठी ती एक घातक चूक सिद्ध झाली, कारण संकाराने सैन्यात मोठा पाठिंबा मिळवला होता आणि त्याच्या तुरुंगवासामुळे त्याचा सहकारी अधिकारी ब्लेझ कंपाओरे याला बंडाचे नेतृत्व करण्यासाठी आणि जीन-बॅप्टिस्ट ओएड्राओगोचे सरकार पदच्युत करण्यासाठी महत्त्वपूर्ण गती मिळाली. 4 ऑगस्ट 1983 रोजी थॉमस संकाराला अप्पर व्होल्टाचे अध्यक्ष करण्यात आले.
थॉमस संकाराचा राष्ट्रपती काळ
थॉमस संकारावर चे गुवारा सारख्या क्रांतिकारकांच्या विचारांचा आणि कामाचा प्रभाव होता. त्याने संपूर्ण जीवन साम्राज्यवादाविरोधी संघर्षासाठी समर्पित केले होते. त्याचा राष्ट्रपती काळ हा केवळ चार वर्षाचा होता पण त्या चार वर्षांत त्याने देशातील लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.
फ्रेंच साम्राज्यवादाच्या प्रभावाला संपवण्यासाठी आणि देशाच्या क्रांतिकारी भांडवली विकासासाठी संकाराने अनेक पावले उचलली.
थॉमस संकाराने देशाचे नाव बदलून “बुर्कीना फासो” केले, ज्याचा अर्थ मूर आणि ड्युला या देशातील दोन प्रमुख भाषांमध्ये “प्रामाणिक आणि जबाबदार लोकांची भूमी” असा होतो. त्याने देशाचा ध्वजही बदलला आणि नवीन राष्ट्रगीत लागू केले. अध्यक्षपद मिळाल्यावर त्याने जन विकास कार्यक्रम हाती घेतले. त्याचे पहिले धोरण बुर्कीना फासोच्या लोकांचे जीवनमान सुधारणे हे होते. त्याने लोकांना घरे, आरोग्यसेवा आणि अन्न पुरवण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या, ज्यामुळे देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात कमी झाली. संकाराने सर्व जमीन आणि तेल संपत्तीचे राष्ट्रीकरण केले आणि फ्रेंच भांडवलाला हादरे दिले.
मेंदुज्वर, पोलिओ आणि गोवरचा सामना करण्यासाठी त्याने देशभर लसीकरण मोहीम सुरु केली. 1983 ते 1985 पर्यंत, दोन दशलक्ष म्हणजेच लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांचे लसीकरण करण्यात आले. संकाराच्या कारकिर्दीत बुर्कीना फासो हा एड्सच्या साथीला ओळखणारा पहिला आफ्रिकन देश ठरला होता. त्याने देशात गृहनिर्माणाला प्राधान्य दिले गेले आणि देशातील मोठ्या झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करण्यासाठी विटांचे कारखाने उभारण्यात आले. एका विशाल रेल्वे आणि रस्त्याच्या जाळ्याने लवकरच देशाच्या सर्व भागांना जोडले आणि जंगलतोड रोखण्यासाठी एक कोटी झाडे लावली. संकारा हा निर्विवादपणे पहिला आफ्रिकन नेता होता ज्याने पर्यावरणाच्या समस्येला इतके अधिक प्राधान्य दिले, विशेषत: अशा वेळी जेव्हा पर्यावरणाच्या समस्येला जगावर परिणाम करणारा प्रमुख घटक म्हणून पाहिले जात नव्हते. झाडे झुडुपे जाळणे, गुरांना मोकाट चरण्यासाठी सोडणे आणि बेकायदेशीर सरपण तोड थांबविण्यासाठी संकाराने विविध कायदे अंमलात आणले.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि विकासात पिछाडलेल्या बुर्कीना फासोमध्ये थॉमस संकाराच्या कार्यामुळे जनतेचा व्यापक पाठिंबा मिळाला. सामान्यत: सरकारी मंत्र्यांना परवडणाऱ्या सुखसोयी नाकारून त्याने आपल्या देशातील लोकांशी एकता दाखवली. त्याने मर्सिडीजचा गाडीचा सरकारी ताफा विकला आणि त्याच्या जागी बुर्कीना फासोमध्ये उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार रेनॉल्ट वापरली. बुर्किनाबे लोकांसाठी उपलब्ध नसलेली अनावश्यक लक्झरी म्हणून त्याने त्याच्या कार्यालयात वातानुकूलन (एसी) वापरण्यास नकार दिला. त्याने स्वतःला जनतेसमोर एक नम्र माणूस म्हणून सदर केले. भिंती आणि सार्वजनिक इमारती सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वत:च्या प्रतिमेचा त्याने विरोध केला.
महिलांच्या स्थितीत क्रांतिकारी सुधार
देशभरातील महिलांची परिस्थिती सुधारणे हे संकारा सरकारच्या मुख्य कामांपैकी एक काम होते. त्याच्या शब्दांत “क्रांती आणि स्त्रीमुक्ती एकत्रच चालते. आम्ही स्त्रीमुक्तीबद्दल धार्मिक कृती म्हणून किंवा मानवी करुणेच्या भावनेने बोलत नाही. क्रांतीचा विजय होण्यासाठी स्त्रीमुक्ती ही मूलभूत गरज आहे.” सत्तेत आल्यावर पहिल्याच वर्षी त्याने कुटुंब विकास मंत्रालय आणि बुर्कीना महिला संघाची स्थापना केली. ज्याचा हेतू त्याच्या शब्दांत “आमच्या देशातील महिलांना यशस्वी लढा देण्यासाठी एक संरचना आणि योग्य साधने देणे” होता. त्याने बहुपत्नीत्व आणि हुंडाबळी प्रथांवर बंदी आणली; त्याचबरोबर स्त्रियांचे जबरदस्ती होणारे विवाह आणि स्त्रीचे जननेंद्रिय विच्छेदन प्रथेवर बंदी आणली. त्याने स्त्रियांना नवीन अधिकार दिले ज्यात विधवा आणि अनाथांसाठी वारस हक्काचा समावेश होता. महिलांना शिक्षणात प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण मंत्रालयाने विविध उपक्रम राबवले तसेच बर्याच महिलांना सरकार आणि सैन्यात वरिष्ठ पदे देण्यात आली होती, जी त्या वेळी कोणत्याही आफ्रिकन देशात अभूतपूर्व होती. संकाराने आपल्या भाषणांत सुचवले की पुरुषांनी समाजातील स्त्रियांचे स्थान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी स्त्रियांना अपेक्षित असलेले काम करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात, संकाराने महिलांना सरकारी पदांवर नियुक्त केले आणि घटनेत दुरुस्ती केली, मंत्रीमंडळात प्रत्येक वेळी किमान पाच महिला मंत्री असणे बंधनकारक केले.
थॉमस संकाराचा साम्राज्यवाद विरोधी लढा
थॉमस संकारा हा मार्क्सवाद लेनिनवादाने प्रभावित होता. फ्रेंच साम्राज्यवादाला नाकारत, जागतिक साम्राज्यवादी भांडवलाच्या विरोधात बुर्कीना फासोच्या स्वतंत्र विकासाचा तो प्रवर्तक होता. भांडवलशाहीचा विरोध करून बुर्कीना फासोला एक समाजवादी देश बनवण्याचे स्वप्न तो बाळगून होता. देशातील साम्राज्यवादी शक्ती असलेला फ्रांस तसेच इतर साम्राज्यवादी देशांचा तो खुला विरोध करत होता. त्याने बुर्कीना फासोमधील प्रत्येक गाव आणि शहराला क्रांतीच्या संरक्षणासाठी समित्यांमध्ये संघटित करण्याचे आवाहन केले. संकाराने सर्व जमिनींचे राष्ट्रीयीकरण केले होते आणि शेतीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. क्रांतिकारी भूसुधार लागू करत त्याने सामंतांच्या जमिनींचे शेअकऱ्यांमध्ये पुनर्वाटप करवले. शेतीतील सुधारणांमुळे त्याच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या तीन वर्षांमध्ये अन्नधान्य उत्पादनात 75 टक्क्यांनी वाढ झाली होती, अशा देशात ज्या जेथे बहुतेक लोक शेतीवर फक्त उदरनिर्वाह करणारे होते.
जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक राष्ट्राध्यक्ष म्हणून, संकाराचा विश्वास होता की बुर्कीना फासो परदेशी मदतीशिवाय स्वतःला टिकवून ठेवू शकतो. त्याने आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाकडून (IMF) मदत पॅकेजेस नाकारले. त्याला ठाऊक होते की त्या मदतीसोबत अनेक अटी सुद्धा जोडल्या गेल्या आहेत. त्याचे प्रसिद्ध घोषणा आहे, “जो तुम्हाला खायला देतो तो त्याच्या इच्छा तुमच्यावर लादतो.” जुलै 1987 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीच्या परिषदेत, त्याने इतर आफ्रिकन देशांना राजी करण्याचा प्रयत्न केला की आपण एकत्रितपणे आपल्या पूर्वीच्या वसाहतींना त्यांचे आर्थिक कर्ज देण्यास नकार देऊयात. त्याने सांगितले की कर्जाची उत्पत्ती वसाहतवादाच्या उत्पत्तीकडे जाते आणि ज्या कर्जासाठी आपण जबाबदार नाही ते आपण का फेडावे. उलट इतरांवर आपले असे काही देणे आहे की ज्याची किंमत ते पैशात फेडू शकत नाहीत, म्हणजेच आपल्यावर केलेल्या अन्याय अत्याचाराची, देशाच्या केलेल्या लुटीची आणि आपल्या सांडलेल्या रक्ताची.
संकाराने संपूर्ण आफ्रिकेतील साम्राज्यवादी राजवटीला हादरून सोडले होते. त्याच्या धोरणांमुळे बुर्कीना फासोतील भांडवलदार वर्गाचा एक हिस्साही नाखूष होता. त्याचे क्रांतिकारी विचार आणि कामांमुळे आफ्रिकेतील इतर देश प्रभावित होण्याची दाट शक्यता होती म्हणूनच, फ्रान्सने संकराचा माजी साथी ब्लेझ कंपाओरे यांचा वापर करून त्याच्या हत्येला पाठिंबा दिला आणि अमेरिकेने सुद्धा याचे समर्थन केले. 15 ऑक्टोबर 1987 रोजी कंपाओरेने संकाराची हत्या केली आणि स्वत: बुर्कीना फासोचा अध्यक्ष झाला. कंपाओरेच्या सरकारने आणि बुर्कीना फासोत संकराने सुरु केलेली सारी धोरणे उलटून लावली, नैसर्गिक साधनसंपत्तीचे खाजगीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आणि देश पुन्हा नग्न भांडवलशाहीच्या वाटेवर चालू लागला.
बुर्कीना फासो: फ्रेंच प्रभावाकडून रशियन साम्राज्यवादी प्रभावाकडे
बुर्कीना फासो हा आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी असणारा चौथ्या क्रमांकाचा देश आहे, तसेच देशात विविध खनिज संपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तरीही जवळपास 40 टक्के लोकसंख्या राष्ट्रीय गरिबी रेषेखाली जगत आहे. संकाराच्या सुधारांना मागे वळवल्याच्या परिणामी आजही देशातील 42 टक्के किशोरवयीन मुली शाळाबाह्य आहेत, आजही फक्त 14 टक्के लोकसंख्येला वीज उपलब्ध आहे. संसाधनांसाठी कराव्या लागणाऱ्या कठोर संघर्षामुळे देशात अनेक अतिरेकी गट नियंत्रण मिळवू लागले, सरकारच्या ताब्यात फक्त 60 टक्के जमीन उरली आहे. 2022 मध्ये, शेजारच्या माली देशापासून येणाऱ्या जिहादी बंडखोरांच्या हल्ल्यात आजपर्यंत किमान 10,000 लोक मारले गेले आहेत आणि 20 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
देशात मागील आठ महिन्यात दोन वेळा सत्ता पालट झाला ज्यात इब्राहिम तरोरे या लष्करी अधिकाऱ्याने याने सैन्यात बंड करून दुसऱ्यांदा लष्करी सैन्य स्थापन केले आहे तो सध्या बुर्कीना फासोचा राष्ट्रपती आहे. 2023 मध्ये त्याने फ्रेंच सैन्याची हकालपट्टी करून फ्रांस कडून मिळणारी आर्थिक मदत थांबवली आहे. हल्लीच दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की रशिया त्यांचा चांगला मित्र आहे आणि सतत शस्त्र पुरवठा करत आला आहे. थोडक्यात फ्रेंच साम्राज्यवादाच्या प्रभावाखालून निघून आता बुर्कीना फासो रशियन-चिनी साम्राज्यवादी अक्षाच्या प्रभावात येत आहे. रशिया त्याच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा बाळगून आहेच, आणि आफ्रिकेतील बाजार व खनिज संपदेवर त्याची नजर आहे. अशात जिहादी बंडखोरांच्या विरोधात लढण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने आणि पुन्हा एकदा देशात “लोकशाही आणि शांतता” स्थापित करण्याच्या हेतूने रशियाला बुर्कीना फासो, नायजर, माली सारख्या आफ्रिकन देशात पकड मजबूत करण्याची चांगली संधी मिळाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या रशिया आफ्रिका परिषदेत रशियन सरकारने अनेक देशांना मानवतावादी सहाय्य करण्यासाठी यूएन वर्ल्ड फूड प्रोग्रामला स्वयंसेवी सहाय्य म्हणून 10 दशलक्ष यूएस डॉलर्सचे योगदान देण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी 2.5 दशलक्ष यूएस डॉलर्स बुर्कीना फासोला जाणार आहेत. तसेच रशिया बुर्कीना फासोत वाहतूक, व्यापार, वीज निर्मिती इत्यादी साठी मदत करणार आहे. थॉमस संकाराचे नाव धेऊन, त्याच्या स्वप्नांना साकार करण्याचे वादे करून इब्राहिम तरोरे जनतेवर प्रभाव तर टाकत आहे, परंतु संकाराचे शब्द “जो तुम्हाला खायला देतो तो त्याच्या इच्छा तुमच्यावर लादतो.” मात्र सोयीस्करपणे वगळून.
संकारा मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांनी प्रभावित एक क्रांतिकारी नेता होता, ज्याच्याकडे एका क्रांतिकारी पक्षाच्या निर्मितीच्या दूरदृष्टीकोनाचा अभाव होता. वैयक्तिक त्याग, प्रामाणिकपणा, मेहनत, आणि जनतेप्रती समर्पण यामुळे तो देशाच्या भांडवली विकासाच्या प्रक्रियेत अत्यंत प्रगतीशील भुमिका निभावत असताना त्याने साम्राज्यवादाविरोधात लढा दिला. या प्रक्रियेत त्याने जनतेच्या पुढाकारावर तर विश्वास ठेवला, परंतु समाजाच्या आमूलाग्र भांडवली आणि समाजवादी परिवर्तनाकरिता आवश्यक अशा लेनिनवादी बोल्शेविक पक्षाच्या उभारणीचे काम तो करू शकला नाही. त्याच्या अभावामध्ये संकाराच्या मृत्यूनंतर बुर्किना फासोमधील भांडवलदार वर्गाचे अधिनायकत्त्व अधिकच मजबूत होत गेले.
आज आफ्रिकेतील बहुसंख्य देशांसहीत जगातील बहुसंख्य देशांमध्ये भांडवली आर्थिक व्यवस्था रूढ आहे, आणि समाजवादी क्रांत्यांचा टप्पा आहे. परंतु एका सशक्त कामगार वर्गीय आंदोलनाच्या आणि कामगार वर्गाच्या क्रांतिकारी पक्षाच्या अनुपस्थित भांडवली अधिनायकत्व टिकून आहे. संकारासारख्या क्रांतिकारी नेत्यांच्या जीवनापासून धडे घेत असताना, क्रांतिकारी कामगार पक्ष उभारणीच्या पायाभूत कार्यभाराच्या अपरिहार्यतेची जाणीव गरजेची आहे.
कामगार बिगुल, नोव्हेंबर