बलात्कारी गुंडांना आश्रय देणारे फॅसिस्ट भाजप सरकार

✍ ललिता

2 नोव्हेंबर रोजी आय.आय.टी. बनारस हिंदू विद्यापीठात घडलेल्या बलात्काराप्रकरणी दोन महिन्यांनंतर तिघा जणांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर बलात्काराचा आरोप दाखल करण्यात आला. हे तिन्ही बलात्कारी भाजपच्या आय.टी. सेलचे नेते आहेत, हे सुद्धा तपासामध्ये उघड झाले. या क्रूर अमानवीय घटनेशी जोडलेले लोक हे भाजपचे नेते आहेत, ही बातमी अजिबात आश्चर्यकारक नाही.  भाजपने सतत ब्रिजभूषण शरण सिंग, कुलदीपसिंग सेंगर, चिन्मयानंद इत्यादीसारख्या बलात्कारी नेत्यांना संरक्षण दिलेलं आहे. आज वाढत्या स्त्री विरोधी अत्याचारांचे प्रमुख कारण भांडवली पितृसत्तात्त्मक समाजव्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेला टिकवण्याचं व मजबूत करण्याचे काम फॅसिस्ट भाजप सरकार काम करत आहे. त्यांच्या पक्षात गुंड, बलात्कारी आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेले मंत्री सामील आहेत, ही याचीच साक्ष आहे.

‘बीजेपी से बेटी बचाओ’

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात असलेल्या  बनारस हिंदू विद्यापीठात 3 तरुणांना- कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद उर्फ अभिषेक चौहान ह्यांना 2 महिन्यांच्या आंदोलनानंतर 31 डिसेंबरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली गेली. त्यांनी आय.आय.टी. बी.एच.यू.च्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला; त्या मुलीला बंदुकीचा धाक दाखवत चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ बाहेर सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केला. जेव्हा ह्या घटनेविरुद्ध आंदोलन वाढायला लागले तेव्हा हे नेते मध्य प्रदेशला पळाले. 2 महिन्यानंतर जेव्हा ते परत वाराणसीत परतले तेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केली.

ह्या मुद्द्यावर आय.आय.टी.चे विद्यार्थी आरोपींना अटक करण्याची मागणी करत संघटित झाले. ही घटना 2023 मध्ये आय.आय.टी कॅम्पस मध्ये घडलेल्या अनेक लैंगिक अत्याचारांपैकी एक आहे. अटक झाल्यानंतर आय.आय.टी. बीएचयू च्या विद्यार्थी संघाने महिलांच्या संरक्षणासाठी आवाज उचलला; परंतु आता याच्या परिणामी विद्यापीठ प्रशासनाने आपले स्त्री विरोधी चरित्र दर्शवत उलट महिलांवरच निर्बंध लादणे सुरू केले आहे. महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, बाहेरील लोकांच्या प्रवेशावर निर्बंध, बॅरिकेड लावणे आणि महिला विद्यार्थिनीच्या हालचालींवर निर्बंध लादणे अशी पावले ह्या घटना रोखण्यासाठी उचलली गेली आहेत. महिलांना आता नवीन नियमांचा सामना करावा लागत आहे, परंतु कॅम्पसमधील पुरुषांचे जीवन नेहमीप्रमाणे सुरु आहे.

महत्वाची गोष्ट ही आहे की हे तीन भाजपचे बलात्कारी नेते मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सहभागी होते आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत, ज्याचा अर्थ हाच आहे कि ते पक्षात सहभागी होते आणि त्यांनी भाजपमधील त्यांच्या स्थानाचा पुरेपूर फायदा घेतला. पोलिस तपासादरम्यान, त्यांनी कॅम्पसमध्ये 3 अन्य छेडछाडीच्या घटनांमध्ये सामील असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांनी राजकीय संबंधांचा वापर करून स्थानिकांसोबत गुंडगिरी केल्याची तक्रार केली आहे. कुणाल पांडेची पत्नी एका भाजपच्या नगरसेवकाची मुलगी आहे. कटू सत्य हे आहे की केवळ या तीन बलात्काऱ्यांनाच भाजपने आश्रय दिला आहे असे नाही तर इतरही असे अनेक आहेत. भाजप ‘बेटी बचाव’ चा नारा देत असते पण आज भाजपपासून बेटी बचाव असे म्हणायची वेळ आली आहे.

भाजपच्या राजवटीत वाढते स्त्री-अत्याचार

देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करतात की महिलांना शिकवलं पाहिजे आणि महिलांना सम्मान दिला पाहिजे. 2014 मध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले होते की बलात्काराच्या घटना ऐकून आपली मान शरमेने खाली झुकते.

त्यांच्याच पक्षाचे स्टार मंत्री आणि खासदार ब्रिजभूषण, कुलदीप सिंग सेंगर, साक्षी महाराज, चिन्मयानंद यांसारख्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या पक्षाला “प्रसिद्धी” दिली आहे. देशाच्या नामांकित महिला कुस्तीपटुंनी ब्रिजभूषणवर पाठलाग, छळ करणे, धमकावणे, लैंगिक शोषण असे वेगवेगळे गंभीर आरोप केले आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून अनेक महिला व पुरुष कुस्तीपटू रस्त्यावर उतरले, आंदोलन केले तरीसुद्धा भाजपने ब्रिजभूषणला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. आज हा पक्ष अशा गुंड, बाहुबली बलात्कारी नेत्यांना आश्रय देत आहे. ज्या देशाला गौरव मिळवून देतात, अश्या महिला कुस्तीपटूच आज देशात सुरक्षित नाहीयेत तर सामान्य कामगार कष्टकरी महिलांची स्थिती कशी असेल?

कठुआ, उन्नाव, मुज्जफरपुर, हाथरस, बलरामपुर मधील घटना वारंवार डोळ्यासमोर येतात ज्यामध्ये भाजपने त्यांची महिला विरोधी विचारधारा उघडपणे जगासमोर मांडली. हाथरस मध्ये घडलेल्या बलात्कारच्या घटनेनंतर आरोपीच्या समर्थनात जात महापंचायत होऊ दिली आणि अनेक पत्रकारांना अटक केली. 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत बिल्कीस बानो वर सामूहिक बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना गुजरात मधील भाजप सरकारने तर शिक्षा संपण्याच्या अगोदरच जेलमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली आणि त्यांचा हिंदुत्ववादी शक्तिंनी सत्कार सुद्धा केला.

लैंगिक गुन्हेगारांसहित सर्व गुन्हेगारांना आश्रय देणारा भाजप सर्वाधिक मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये 39 टक्के नेत्यांवर बलात्कार, अपहरण, लैंगिक अत्याचारासहीत इतर अनेक आरोप दाखल आहेत. म्हणूनच जेव्हा मणिपूर मध्ये महिलांची नागडी धिंड काढली जाते, तेव्हा भाजप एक शब्दही  बोलत नाही आणि महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी सुद्धा गप्प बसतात. त्यांचे मंत्री आसाराम बापू, राम रहीमसारख्या बलात्काऱ्यांना भेटताना दिसतात.  भाजप आणि संघ परिवाराच्या अनेक संघटनांच्या रॅलीत भारत माता की जयचे नारे देतांना असे गुन्हेगार मंत्री आणि भक्त दिसतात, आणि कोणालाही त्याबद्दल आक्षेप नसतो.  श्रद्धा वालकर हत्या, कुस्तीपटूंचे आंदोलन, वाराणसीत घडलेल्या लैंगिक अत्याचार, अशा अनेक घटना आहेत, ज्या जनतेच्या स्मृतीतून काढण्याचे किंवा त्यांना धार्मिक रुप देऊन त्यांचे स्त्रीविरोधी चरित्र लपवण्याचे काम आज गोदी मीडिया करत आहे.

सरकारच जेव्हा बलात्काऱ्यांचे रक्षक असेल, तेव्हा गुन्ह्यांमध्ये वाढ नाही होणार तर काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 4 टक्के वाढ झाल्याचे तपशीलवार नमूद केले आहे. 2020 मधील 3,71,503 प्रकरणांवरून 2022 मध्ये 4,45,256 प्रकरणे वाढली आहेत. यातील 7.1 टक्के गुन्हे हे बलात्काराचे आहेत.

आज भाजप रामराज्याच्या बाता मारते. परंतु महिलांवर वाढते अत्याचार, वाढते बलात्कार हेच यांचे रामराज्य आहे.

प्रतिगामी विचारांना जोपासणारे भाजप सरकार

भाजप आणि संघ परिवार सुरुवातीपासून महिला विरोधी आहेत. त्यांचे “गुरु” गोळवलकर, जे स्त्रीपुरुष समानतेच्या विरोधात होते, म्हणाले होते कि महिला ह्या भारतीय संस्कृतीच्या वाहक आहेत, म्हणजे सर्व संस्कृती रक्षणाची, बंधने अंगावर घेण्याची जबाबदारी फक्त महिलांची आहे, आणि पुरुष मात्र मनमर्जी स्वातंत्र्य उपभोगायला मोकळे आहेत. काही वर्षांपूर्वी मोहन भागवत, आर.एस.एस.चे सरसंघचालक म्हणाले होते कि बलात्कार हे इंडिया मध्ये होतात, भारतात होत नाहीत; थोडक्यात त्यांचे म्हणणे होते की यांच्या हिंदुत्ववादी “संस्कारी” भारतात स्त्री अत्याचार होतच नाहीत! त्यांचा हा दावा खोटा ठरवण्यात संघ-भाजप परिवारातील नेत्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही हेच खरे!  यांचेच “विचारवंत” सावरकर म्हणाले होते कि  गैर -हिंदूंना त्यांची जागा दाखवण्यासाठी बलात्कार हे एक शस्त्र आहे. याचा अर्थ असा की यांची हिंदुत्वाची विचारधारा स्त्रीला एक वस्तू समजते जिच्यावर धर्माच्या नावाने अत्याचार करणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे! या दुटप्पीपणाचाच परिणाम आहे की एका बाजूला संस्कार आणि शिस्त शिकवणारी भाजप दुसऱ्या बाजूला बलात्कार आणि लैंगिक अत्याचारावर मौनव्रत धारण करून स्वत:ची अक्षमता लपवण्यासाठी “नारी शक्ती दूत” ॲप घेऊन येते आणि महिला आरक्षणाचे आमिषही दाखवते.

भाजप हा एक फॅसिस्ट पक्ष असून तो महिलांच्या खऱ्या प्रश्नांवर कधीच बोलणार नाही. भारतातील महिला श्रमशक्तीचा सहभाग 23 टक्के होता, जो जगातील सर्वात कमी आहे.  महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र तेव्हाच होणार जेव्हा शिकण्याची, काम करण्याची संधी सर्व महिलांना आणि सर्व जनतेला मिळेल. भाजप अस्मितावादी राजकारणाला समर्थन देते जेणेकरून कामगार कष्टकरी वर्ग रोजगार, शिक्षण, आरोग्य यासारख्या खऱ्या प्रश्नांभोवती एकजूट होऊ नये आणि शोषण, अत्याचार, जनतेची अमाप लूट सतत सुरू रहावी. म्हणून हा पक्ष महिला हिताचे कायदे सुद्धा लागू करत नाही कारण ह्यांना फक्त मालक वर्गाच्या हितासाठी काम करायचंय आणि लोकांच्या प्रश्नांना सोडवण्याबाबत त्यांना काही घेणं देणं नाहीये. हे नियम कायदे त्वरित लागू झाले पाहिजे, लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी, ते कोणत्याही पक्षाचे, जातीचे असो, त्यांना अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे. यांनी केलेला महिला आरक्षणाचा कायदा एकीकडे लागू झालेलाच नाही, आणि दुसरीकडे खरेतर या कायद्यामुळे मूठभर उच्चभ्रू महिलांना नेता बनण्याची संधी मिळणे सोडून व्यापक महिला समुदायाचे कोणतेही हित साध्य होणार नाही.

हे समजणे सुद्धा गरजेचे आहे की समाजाच्या नसानसात रुजलेल्या पुरुषसत्तावादी वर्चस्ववादी मानसिकतेला केवळ नियम कायद्यांनी बदलता येणार नाही. त्यासाठी एका दीर्घकालीन परिवर्तनासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल. समाजात बदल आणण्यासाठी केवळ कायदे आणून महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीयेत. महिलांवर अत्याचाराला ही नफेखोर व्यवस्था जबाबदार आहे, जी स्त्रीला उपभोगाची वस्तू आणि पुढची पिढी जन्माला घालणारी एक मशीन म्हणून बघते. पितृसत्ता वर्ग आणि खाजगी संपत्तीच्या उदयासोबत जन्माला आली होती, म्हणून स्त्रियांचे शोषण थांबवायचे असेल आणि आपल्याला खरी स्त्रीमुक्ती हवी असेल तर आपल्याला वर्ग आधारित शोषण, खाजगी संपत्ती आणि खाजगी नफ्यावर टिकलेल्या ह्या व्यवस्थेला उखडून टाकावं लागेल.