सनातन संस्था – फासीवादी सरकारच्या छत्रछायेत बहरणारा आतंकवाद
नारायण खराडे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुरोगामी विचारवंत-लेखक कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाला महाराष्ट्र पोलिसांनी नुकतीच अटक केली. वाशी व ठाणे येथील स्फोट, मडगाव गोवा येथील २००९ मधील बाँबस्फोट व आता कॉ. पानसरेंची हत्या, अशा एका पाठोपाठ एक दहशतवादी कारवायांमध्ये संस्थेच्या “साधकां”चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे एकीकडे सनातनवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे, तर दुसरीकडे हा संस्थेला बदनाम करण्याचा डाव असून त्याच्या विरोधात सर्व हिंदू धर्माभिमान्यांनी एक होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. सध्या देशात पसरत असलेली धार्मिक कट्टरतेची लाट आणि त्याला सरकारकडून मिळत असलेले पाठबळ पाहता, संस्थेवर बंदी घातली जाईल अशी अपेक्षा करणे शहाणपणाचे होणार नाही. मात्र या निमित्ताने सनातन संस्था कोणत्या प्रकारचे “ईश्वरी राज्य” स्थापन करू इच्छिते, ते उघड झाले आहे.
सनातन संस्थेची स्थापना व्यवसायाने संमोहन तज्ञ असलेल्या जयंत आठवले यांनी १९९० साली केली. संस्थेचे संकेतस्थळ व अन्य ठिकाणी दिलेल्या संस्थेच्या माहितीनुसार जिज्ञासूंना शास्त्रशुद्ध भाषेत आध्यात्मिक ज्ञान देणे हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे. त्यासाठी ‘सनातन प्रभात’ नावाचे वृत्तपत्र, धार्मिक साहित्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशन, नियमित सत्संग मेळावे, भव्य हिंदू धर्म जागृती परिषदा यांसारखे उपक्रम संस्था राबवीत असते. त्याचबरोबर २००८ साली ‘श्री शंकरा’ या चॅनेलवर धर्मसत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग हे संस्थेचे कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरूवात झाली. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसेच भारताबाहेरही संस्थेची केंद्रे असून ही केंद्रे कोवळ्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्त्वाबद्दल जागृत करण्याचे, त्यांना संघटित करण्याचे व त्यांचे धार्मिक उन्नयन करण्याचे काम करीत असतात. साधकांवर कोणत्याही धर्माची मूल्ये लादली जात नसल्याचा दावा करतानाच “हिंदू राष्ट्रा”ची स्थापना करण्याचे संस्थेचे उद्दीष्टही संस्थेने कधी लपवलेले नाही. “धर्मद्रोह्यां”विरोधात लढा उभारण्याला संस्थेने नेहमीच अग्रक्रम दिलेला आहे. “क्षात्रधर्म”, “दुष्टांचे निर्दालन” यांसारख्या शब्दांतून आक्रमक धार्मिकतेचा प्रचार संस्था सतत करीत असते. अगोदर केवळ सनातन प्रभातच्या जळजळीत लेखांमधून शाब्दिक पातळीवर चाललेल्या या धर्मयुद्धाला पहिल्यांदा २००८ साली ठाणे व वाशी येथील नाट्यगृहांत ठोस रूप प्राप्त झाले! “आम्ही पाचपुते” या नाटकात हिंदू देवी देवतांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ ३१ मे रोजी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात व त्यानंतर ४ जून रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनच्या पार्किंगच्या ठिकाणी असे दोन सौम्य बाँबस्फोट करण्यात आले. या स्फोटांमध्ये ७ जण जखमी झाले. या प्रकरणात संस्थेच्या ६ साधकांना अटक करण्यात आली. पैकी चौघांची न्यायालयाने सुटका केली व दोघांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मात्र न्यायालयाने दोषींनी कोणत्याही संस्थेच्या वतीने हे स्फोट घडवून आणल्याचे म्हटले नाही. यानंतर पुढच्याच वर्षी २००९ साली मडगाव गोवा येथे पुन्हा एक बाँबस्फोट झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ऐन उत्सवाच्या गर्दीच्या ठिकाणी बाँब ठेवण्यासाठी जात असतानाच बाँबचा स्फोट झाल्याने संस्थेच्याच दोन साधकांना “मोक्ष” प्राप्त झाला आणि साहजिकच पुन्हा एकदा पोलिसांची वक्रदृष्टी संस्थेकडे वळली. या प्रकरणात संस्थेच्या पाच साधकांना पोलिसांनी अटक केली परंतु पुराव्याअभावी नंतर त्यांची सुटका करण्यात आली. रुद्रा पाटील याच्यासह अन्य दोन आरोपी मात्र अजूनही फरार आहेत. २०१३ साली नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यापासूनच यामागे सनातन संस्थेचा हात असल्याचे बोलले जात होते. आता कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात समीर गायकवाड याला अटक करण्यात आल्यानंतर नरेंद्र दाभोळकर तसेच एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतही सनातनचा हात असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला सनातनचा नेहमीच विरोध होता. अंधश्रद्धा विरोधी विधेयकाला समर्थन दिल्याबद्दल नरेंद्र दाभोळकर यांच्या विरोधात संस्थेने एफआयआर नोंदवलेली होती. २०११ साली न्यूज चॅनेलवरील एका चर्चेदरम्यान संस्थेचे प्रतिनिधी अभय वर्तक निरुत्तर होऊन चर्चा अर्ध्या१वर सोडून निघून गेले. या चर्चेत डॉ. दाभोळकर यांचा सहभाग होता व पत्रकार निखिल वागळे या चर्चेचे संचालन करीत होते. या घटनेनंतर संस्थेने सनातन प्रभात या आपल्या वृत्तपत्रातून वागळे यांच्या विरोधात मोहीम उघडली व त्यांचा खाजगी मोबाईल क्रमांक छापून वागळेंना फोन करून जाब विचारण्याचे आवाहन आपल्या साधकांना केले. त्यानुसार वागळेंनासुद्धा फोनवरून सतत धमक्या मिळू लागल्या. आता समीर गायकवाड याला अटक झाल्यानंतर, निखिल वागळे हेसुद्धा संस्थेचे लक्ष्य होते, हे उघड झाले आहे. संस्थेच्या “धर्मद्रोह्यां”च्या यादीत कॉ. पानसरे हेही होतेच व संस्थेने त्यांच्या विरोधात मडगाव येथील न्यायालयात १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. तसेच “तुमचा दाभोळकर करू का?” अशा शब्दांत संस्थेने कॉ. पानसरेंना धमक्यासुद्धा दिल्या होत्या.
डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे व प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येतही मडगाव येथील बाँब प्रकरणात फरारी असलेल्या रुद्रा पाटील व अन्य साधकांचा हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हत्या जेथे झालेल्या आहेत त्या भागांत संस्था अत्यंत सक्रिय आहे. संस्थेच्या साधकांकडून वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत, व त्यांचा वापर या हत्यांमध्ये झालेला असण्याची शक्यता आहे. दाभोळकरांच्या खून्याचे घटनेच्या साक्षीदाराने दिलेल्या वर्णनावरून बनवलेले रेखाचित्र मडगाव स्फोटातील एका फरारीच्या चेहऱ्याशी जुळणारे आहे. असे असूनही संस्थेने या हत्यांमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे, तसेच समीर गायकवाड हा संस्थेचा साधकसुद्धा निर्दोष असल्याचे सांगत त्याच्या बचावासाठी वकिलांची भलीमोठी फौज उभी केली आहे.
गायकवाड याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा संस्थेवर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव वाढतो आहे. गोवा येथील संस्थेचे प्रमुख कार्यालय असलेल्या बांदोडा येथील ग्रामस्थांनीसुद्धा संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अन्य कट्टरतावादी हिंदू संघटना व शिवसेनेसा भाजपसारखे पक्ष कधी उघडपणे व कधी छुपेपणाने संस्थेची पाठराखण करीत आहेत. संस्थेवर बंदी घालण्यासाठी तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून येणे गरजेचे असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात तरी संस्थेवर बंदी येण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या विरोधी बाकांवर बसून सनातनवर ताबडतोब बंदी घालण्याची मागणी करणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते याआधीच सनातनवर बंदी कां घालण्यात आली नाही यासाठी एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत.
आज आधुनिक काळातही सनातन संस्थासारख्या संघटना आपल्या समाजात अधिकाधिक बळकट का होत आहेत, व त्यांचा समाजावर होणार एकंदर परिणाम कशा स्वरूपाचा आहे हे समजून घेणे – प्रामुख्याने कष्टकरी समाजाच्या दृष्टीने – अतिशय महत्त्वाचे आहे. आज व्यवस्थेने सर्वसामान्य माणसाचे जगणे कधी नाही इतके बेभरवशाचे बवनलेले आहे. एकीकडे विज्ञानातील प्रगतीबद्दल आपण वाचत ऐकत असतो, तर दुसरीकडे बहुसंख्यांना हलाखीचे व दारिद्र्याचे, कष्टाचे जीवन जगावे लागते. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करीत आहे. शिक्षणसुद्धा दिवसेंदिवस महागडे होत चालल्यामुळे या मूलभूत अधिकारापासूनसुद्धा माणसे वंचित राहतात. आरोग्य क्षेत्रातील बाजारूपणामुळे चांगल्या आरोग्यसुविधांपासूनही बहुसंख्य समाज वंचित आहे. अशा अनेक समस्यांची यादी बनवता येईल. या प्रश्नांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक सततची व भयंकर अशी अनिश्चितता निर्माण केलेली आहे. आर्थिक क्षेत्रातील अनिश्चितता स्वाभाविकपणे हळूहळू माणसाचे एकंदर जीवन व्यापू लागते व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी माणसे एखाद्या पारलौकिक शक्तीचा आधार शोधू लागतात. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातील अडीअडचणी दूर होण्यासाठी सामाजिक परिस्थिती बदलणे हाच खरा उपाय असतो. त्यासाठी ठोस सामाजिक लढे उभारावे लागतात. नाहीतर सर्वसामान्य माणूस दुसरा कोणताही पर्याय दिसत नसल्यामुळे दैववाद, धार्मिकता, अंधश्रद्धा यांच्या आहारी जातो. ‘सनातन’सारख्या संस्थांची आधारभूमी तयार होते ती अशी. अशा संस्था लोकांचे लक्ष खऱ्या समस्यांपासून, खऱ्या उपायांपासून विचलित करतात व त्यांच्यात भ्रामक जाणिवा निर्माण करतात. यातून एकीकडे परिवर्तनाचे लढे कमकुवत तर होतातच शिवाय सत्ताधारी वर्गाला सोयीच्या विचारांचा प्रचार करून व्यवस्था बळकट करण्याचे, व फॅसिस्ट पक्षांना मजबूत सामाजिक आधार देण्याचे काम अशा संस्था करतात. समाजात पसरलेले दारिद्र्य, विषमता, भेदभाव, दलितांवर-स्त्रियांवर होणारे भीषण अत्याचार यांना ‘सनातन’ने कधी विरोध केला आहे का? उलट अशा प्रकरणांमध्ये नेहमीच अत्यंत प्रतिगामी व मानवद्रोही भूमिकाच सनातनने घेतलेली आहे, व आपली “ईश्वरी राज्या”ची व “धार्मिक उत्थाना”ची पुंगी कर्कशपणे वाजवण्याचे काम केले आहे. सनातन संस्था व अशाच अन्य धार्मिक कट्टरतावादी संस्थांचे हे सत्यस्वरूप सर्वसामान्य जनतेने ओळखले पाहिजे. तसेच अशा कट्टरतावादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्यांनीसुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की फक्त तर्कशुद्धतेचा प्रचार करणे पुरेसे नाही तर ज्या सामाजिक विषमतेमुळे दैववादाला, धार्मिक भावनेला खतपाणी मिळते ती नष्ट करण्यासाठी परिवर्तनाचा व्यापक सामाजिक लढा उभारणे गरजेचे आहे. त्याशिवाय सनातनसारख्या संस्थांची आधारभूमी नष्ट होणार नाही. वेगवेगळ्या समस्यांनी, दुःखांनी ग्रासलेले जीवन बदलण्यासाठी सर्वसामान्य जनतेला योग्य मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देणे, हे प्रागतिक शक्तींसमोर आज असलेले खरे आव्हान आहे.
कामगार बिगुल, नॉव्हेंबर २०१५