दु:खाच्या कारणांचा शोध घेणारा कलाकार : बर्टोल्ट ब्रेष्ट
(14 ऑगस्ट या बर्टोल्ट ब्रेष्टच्या स्मृतीदिनानिमित्त)
✍ स्वप्नजा
आशा ठेवलीस की
तेव्हाही गीतं गायली जातील.
अंधाराबद्दल आणि त्याच्या नसण्याबद्दल
आणि जगत गेलास
एका अंधाऱ्या काळात
आणि त्या विरोधात जगत गेलास.”
– शशिप्रकाश
शशिप्रकाश यांची कविता “ब्रेष्ट बाबत” फार थोड्या पण योग्य शब्दात बरेच काही सांगून जाते. ब्रेष्टने दोन महायुद्धे अगदी जवळून पाहिली, लाखो माणसांचे मृत्यु पाहिले, शोषित कष्टकऱ्यांचा आवाज ऐकला, फॅशिस्ट जर्मनीतील अतिशय अंधाऱ्या काळात तो जगला आणि त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोधात लिहीत राहिला, लढत राहिला आणि जगभरातील युवकांना, कार्यकर्त्यांना लढत राहण्याची प्रेरणा देत राहिला. त्याने फक्त समाजातील दुःख नाही रेखाटले तर दुःखाच्या कारणांचा शोध घेत त्याचा नायनाट कसा करता येईल यावर सुद्धा लिहिले आणि म्हणूनच “दु:खाच्या कारणांचा शोध घेणारा कलाकार” असं वर्णन त्याचं केलं जातं, असा हा युजन बर्थोल्ड फ्रेडरिक ब्रेष्ट उर्फ बर्टोल्ट ब्रेष्ट.
ब्रेष्टचा जन्म 1898 ला जर्मनी मध्ये झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑग्सबुर्गमध्ये पूर्ण झाल्यानंतर 1917 मध्ये त्याने म्युनिख युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर बनण्यासाठी प्रवेश घेतला. पण या दरम्यान सुद्धा हाडाचा कलाकार, साहित्यिक आणि जनतेचा कलावंत असलेल्या ब्रेष्टचं मन सगळ्यात जास्त कविता आणि नाट्य लेखनातच गुंतलेलं असायचं. पहिल्या महायुद्धाच्या अंतिम वर्षात ब्रेष्टला सैन्यात सामील होण्यासाठी बोलावणं आलं, मेडिकलचा अभ्यास करत असल्यामुळे त्याला सैन्याच्या वैद्यकीय कोरमध्ये भर्ती करण्यात आलं. सैन्याच्या नोकरीने त्याच्या जीवनावर जो प्रभाव टाकला, त्यामुळे तो आयुष्यभर युद्धविरोधी राहिला. त्याने युद्धावर अनेक कविता लिहिल्या, आणि त्यातही युद्धाचा फायदा मूठभर भांडवलदारांना होतो आणि ज्याही देशात युद्ध होत आहे त्या सगळ्या देशातील गरीब, कामगार-कष्टकरी जनताच त्यात मरते आहे हे वास्तव रेखाटले.
“युद्ध जे येत आहे
पहिले युद्ध नाही.
या अगोदरही युद्ध झालीत.
शेवटचे युद्ध संपले
तेव्हा काही विजेते बनले आणि काही पराजित.
विजेत्यांमध्ये सामान्य माणूस भुकेने मेला
पराजितांमध्ये मेला तो सुद्धा तो भुकेलेलाच.”
फार कमी वयापासूनच त्याने नाटक लिहायला सुरुवात केली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने “बाल” हे त्याचं पहिलं नाटक लिहिलं. 1919 मध्ये त्याचं दुसरं नाटक “ड्रम्स इन द नाईट” लिहिल्यावर एक यशस्वी आणि सक्षम नाटककार म्हणून ब्रेष्टला मान्यता मिळायला जास्त वेळ लागला नाही. त्याने त्याच्या जीवन काळात एकूण 35 नाटकं लिहिली. मार्क्सवादी विचारधारेने प्रभावित होऊन सगळ्यात पहिलं लिहिलेलं नाटक म्हणजे “अ मॅन इज अ मॅन” आणि त्याच्या इतर अनेक नाटकांपैकी प्रसिद्ध असलेली नाटके म्हणजे “द थ्री पेनी ऑपेरा”, “गॅलेलियो”, “मदर करेज”, “द गुड वूमन ऑफ सेंट जोआन”, “सेंट जोआन ऑफ द स्टॉकयार्ड्स”, इत्यादी. मॅक्सिम गोर्कीची कादंबरी आई (मदर) वर आधारित हेच शीर्षक देऊन एक नाटक लिहिलं. “सेंट जोआन ऑफ द स्टॉकयार्ड्स” या नाटकामध्ये त्याने 1929 मधील भयानक आर्थिक मंदीचा पर्दाफाश केला आहे. जगभरातील अनेक भाषांमध्ये ब्रेष्टच्या कवितांचा आणि नाटकांचा अनुवाद झाला आहे. मराठी भाषेत सुद्धा “कॉकेशियन चॉक सर्कल” याचा “अजब न्याय वर्तुळाचा” या नावाने अनुवाद कवी चि. त्र्य. खानोलकर यांनी केला आहे. तसेच “द थ्री पेनी ऑपेरा” या नाटकाचा मराठी अनुवाद (रुपांतर) “तीन पैशाचा तमाशा” या नावाने पु. ल. देशपांडे यांनी केला आहे.
नाटकातल्या पात्रांबरोबर प्रेक्षकांनी एकरूप होऊ नये आणि ते नाटक बघत आहे हे विसरू नये म्हणून ब्रेष्टने विशेष प्रयत्न केले. नाटकाचा संदेश पोहोचवण्यासाठी त्याने नाटकाची शैली विकसित केली. ज्याला “एपिक थिएटर” असं म्हटलं जातं. एपिक थिएटर हे पारंपारिक नाटकापासून वेगळे आहे. यामध्ये रंगमंचावर निवेदनाला अधिक महत्त्व आहे, नाट्यतंत्रे प्रेक्षकांपासून लपवली जात नाहीत, ‘हे वास्तव नाही तर हे नाटक आहे’ हे सतत प्रेक्षकांना सांगत राहणे, ही एपिक थिएटरची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. जीवनाच्या अखेरच्या वर्षांत, ब्रेष्ट आपल्या नाट्यरचनांच्या विचारधारेला ‘द्वंद्वात्मक नाटक’ (डॉयलेक्टिकल थियेटर) असे नाव देऊ लागले. द्वंद्वात्मक थिएटर वास्तवात ब्रेष्टच्या एपिक थिएटरच्या सिद्धांताचा तार्किक विकास होता. पीटर ब्रुक हे ब्रेष्टच्या थिएटरला दिलेल्या योगदानाबद्दल बोलताना म्हणतात की ‘‘थिएटर सोबत गांभीर्याने जोडलेला कोणताही व्यक्ती, ब्रेष्ट कडे दुर्लक्ष करू शकत नाही. ब्रेष्ट आपल्या काळातील एक केंद्रिय व्यक्तित्व आहे, आज सगळ्या थिएटरचे काम कोणत्या न कोणत्या बिंदूवर ब्रेष्टच्या वक्तव्यांनी आणि प्राप्तींनीच सुरू होते, किंवा परतून त्याच्यापर्यंत येते”.
ब्रेष्टने 500 हून अधिक कविता लिहील्या. ब्रेष्टच्या कवितांमध्ये तिखट पण साधी-सुधी भाषा सापडते. त्याच्या कलेची मुख्य प्रवृत्ती भांडवली दृष्टिकोनावर तीव्र आघात करण्याची होती. भांडवलशाहीच्या आर्थिक संकटामुळे जन्माला आलेल्या फॅशिझमशी तुम्ही भांडवलशाही सोबत लढल्याशिवाय लढू शकत नाही हे त्याला योग्यरित्या कळलं होतं.
“जे भांडवलशाहीला विरोध न करता फॅशिझमला विरोध करतात, जे पाशविकतेतून आलेल्या पाशवीपणाची निंदा करतात, ते अशा लोकांसारखे आहेत ज्यांना बछड्याला न मारता मांस खाण्याची इच्छा आहे. ते बछड्याला खाऊ इच्छितात, पण त्यांना रक्त बघवत नाही. वजन करण्यापूर्वी कसायाने हात पुसले तर ते समाधानी होतात. ते पाशविकतेला जन्म देणाऱ्या संपत्ती–संबंधांच्या विरोधात नाहीत, ते फक्त स्वत:मध्ये पाशविकतेच्या विरोधात आहेत. ते पाशविकतेविरोधात आवाज उठवतात, आणि ते त्या देशांमध्ये असे करतात जेथे असे संपत्ती–संबंध प्रचलित आहेत, परंतु जिथे मांसाचे वजन करण्यापूर्वी कसाई हात धुतो.“
(“सत्य लिहिण्यातील पाच अडचणी”)
उपासमार, बेरोजगारी आणि बेइमानी संपवण्याचे खोटे वायदे करत आणि समाजात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी कम्युनिस्ट, वैज्ञानिक, कलाकार, यहुदी यांना खोटा शत्रू म्हणून उभं करत, जनतेशी गद्दारी करत 30 जानेवारी 1933 रोजी जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर आला. 27 फेब्रुवारी 1933 रोजी बर्लिनमधील रायशटॅग इमारतीला आग लागली, कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांवर खोटे आरोप लावले गेले आणि त्यांना अटक करण्यात आली, त्यानंतर लगेच कलाकारांवर हल्ले सुरू झाले, ते कलाकार जे या व्यवस्थेविरोधात प्रखर भाष्य करतात आणि वास्तववादी चित्रण करतात, त्यांची पुस्तकं जाळले गेली. तेव्हा हे तर स्पष्ट होते की जर्मनीत राहून वास्तव दर्शविणारे नाटक किंवा कविता करणे अशक्य होते, 28 फेब्रुवारी रोजी ब्रेष्टने जर्मनी सोडली आणि त्याच सोबत त्याच्या जीवनात निर्वासनाचा दीर्घकालीन काळ सुरू झाला. ‘चपलांपेक्षा जास्त देश बदलत’ तो जनतेला सांगत राहिला की फॅशिझम आणि कोणत्याही प्रकारच्या कट्टरतेचा द्वेष केला पाहिजे. ब्रेष्टच्या मृत्यूच्या 68 वर्षांनंतर आजही तो प्रासंगिक आहे. तो जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने लिहिणारा, विचार करणारा आणि कष्टकरी जनतेला दिशा देणारं साहित्य लिहिणारा कलाकार होता. महागाई, गरिबी, उपासमार, बेरोजगारी हे सगळं आपल्या फुटक्या नशीबामुळे नाहीये, आपल्याला वाचवायला कोणी येणार नाहीये तर आपल्यालाच यासाठी लढावं लागणार आहे हे दर्शवणारी ‘मदर’ या नाटकातली कविता –
“जर थाळी तुमची रिकामी
जर थाळी तुमची रिकामी
तर विचार करावा लागेल की अन्न कसे खाणार
हे तुमच्यावर आहे की पलटून टाका सरकारला उलटे
जोवर की रिकामं पोटं नाही भरत
स्वत:ची मदत
स्वत:च करा
कोणाची वाट पाहू नका
जर काम नसेल आणि तुम्ही असाल गरीब
तेव्हा खायचं कसं हे तुमच्यावर आहे
सरकार तुमचं असावं हे तुमच्यावर आहे
करून टाका खाली डोकं वर पाय
तुमच्यावर आहे की सरकारला उलथून टाका
तुमच्यावर हसतात ते की तुम्ही गरीब
वेळ नका घालवू, स्वत:ला पुढे न्या
योजनेला अंमलात आणायला
गरिब–गुरिबांना आपल्या जवळ घेऊन या
ध्यानात ठेवा की
काम होत रहावे
होत रहावे, होत रहावे
लवकरच ती वेळ येईल जेव्हा ते म्हणतील
कमजोरांच्या जीवनात हसू दरवळेल
हसू दरवळेल, हसू दरवळेल”
(‘मदर’ नाटकातून)
“कला ही समाजाचा आरसा नाही तर समाज बदलण्यासाठी घाव घालणारा हातोडा आहे” ही त्याची कलेविषयक भुमिका होती आणि हीच भुमिका त्याच्या कवितांमधून आणि नाटकांमधून व्यक्त होते. अन्याय कधी अनंतकाळ टिकू शकत नाही. अपप्रचार आणि जनतेमध्ये असलेले सत्ताधारी वर्गाचे वर्चस्व अनंत काळ चालू शकत नाही, जनता सुद्धा आपल्या जीवनातील वास्तव समोर ठेऊन या अपप्रचाराविरोधत आणि शोषणा विरोधात आवाज उचलेल, कधी ना कधी जनतेचे शोषण करणाऱ्या समाज व्यवस्थेचा नायनाट होईल, अशी आशा दाखवत, अंधाऱ्या काळात लढणाऱ्या युवकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, कामगार कष्टकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी बर्टोल्ट ब्रेष्ट नेहमीच एक प्रेरणास्तंभ बनून राहील.
“एक दिवस असा येईल
पैसा मग कामी ना येईल
आणि हे लवकरच होईल
ही रचना बदलून जाईल”
जो पर्यंत या जगात रंगभूमी आहे, कविता आहेत आणि कोणत्याही काना-कोपऱ्यात फॅशिस्ट शक्ती अस्तित्वात आहे तो पर्यंत ब्रेष्ट तुमच्या आमच्या मनात, विचारात, जिवंत असेल आणि लढण्याची प्रेरणा देत राहील!
(कवितांचा अनुवाद: अभिजित)