2024 : फॅशिस्ट भाजप-संघाच्या यंत्रणेच्या विखारी भाषणांनी आणि धर्मवादाने माखलेले वर्ष
✍️ ललिता
सेंटर फॉर स्टडी ऑफ ऑर्गनाईझ्ड हेट (संघटित विद्वेषाच्या अभ्यासाकरिता केंद्र) या अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील अभ्यासगटातर्फे 2024 मध्ये भारतात 165 व्यक्तिगत विद्वेषी भाषणांची नोंद केली गेली आहे. म्हणजे दिवसाला जवळपास 3 विद्वेषी भाषणे. मुस्लिम समुदायाच्या नरसंहाराची मागणी करणारी भाषणे, विरोधकांना निशाणा बनवण्यासाठी केली गेलेली धर्मवादी भाषणे, लव्ह जिहाद आणि लॅंड जिहाद सारख्या नकली मुद्यांना उचलत धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे, गेल्या वर्षभरात सतत हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी फॅशिस्ट संघ-भाजप परिवाराकडून दिली गेलीत. राजकीय सभांपासून ते धार्मिक मिरवणूकांपर्यंत अनेक प्रसंगी 74.4 टक्क्यापर्यंत विद्वेषी भाषणांमध्ये वाढ झालेली दिसते, ज्यांना भाजप, हिंदू राष्ट्रवादी गट, आणि अनिर्बंध सोशल मीडियाने वेगाने पसरवले. हरियाणा आणि महाराष्ट्रातील सर्वसाधारण निवडणुकांनी अशा धर्मवादी आणि विद्वेषी भाषणांकरिता सुपिक जमीन पुरवली. उत्तर प्रदेशात 2024 मध्ये सर्वाधिक विद्वेषी भाषणांची नोंद झाली आहे.
सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी ॲंड सेक्युलरिझम (समाज आणि धर्मनिरपेक्षतेच्या अभ्यासाकरिता केंद्र) द्वारे प्रसारित एका अहवालात म्हटले आहे की केंद्रबिंदू बनलेल्या महाराष्ट्रात धार्मिक दंगलींमध्ये 84 टक्के वाढ झाली आहे, आणि देशात 2024 मध्ये झालेल्या 59 पैकी 12 दंगली राज्यात झाल्या आहेत. या वाढीतून दिसून येते की महाराष्ट्रात फॅशिस्ट परियोजना जोरात राबवली जात आहे. या धार्मिक दंगलींमध्ये 3 हिंदू आणि 10 मुस्लिम मिळून 13 जीव गेले. यापैकी बहुसंख्य धार्मिक दंगली या धार्मिक मिरवणुका किंवा उत्सवादरम्यान भडकावल्या गेल्या, ज्यात अयोध्येतील राम मंदिराची प्राणपतिष्ठापना (जानेवारीत चार दंगली), सरस्वती पूजा मिरवणूक (सात), गणपती उत्सव (चार) आणि बकरी ईद (दोन) सामील आहेत. अहवालात म्हटले आहे की 2024 मध्ये 13 जमावाद्वारे हत्येच्या घटना झाल्या, ज्यात 11 मृत्यू झालेत, ज्यात एक हिंदू, एक ख्रिश्चन आणि नऊ मुस्लिम मरण पावले आहेत.
या सर्व संघटित, नियोजित, लक्ष्यवेधी हिंसेला सत्तेचे समर्थन लाभले आहे. महाराष्ट्रात जुलै मध्ये विशाळगढ किल्ल्यावर अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या वेळी हिंसा भडकली. जवळपासच्या गावातील मुस्लिम कुटुंबांच्या घरांवर एका फॅशिस्ट जमावाने हल्ला करत मालमत्तेची नासधूस केली आणि यात मोठे नुकसान व इजा झाल्या. नोव्हेंबर मध्ये उत्तरप्रदेशातील संभल येथे शाही जामा मशिदीच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाद्वारे सर्व्हेच्या दरमुयान धार्मिक हिंसा भडकली. उत्तरप्रदेशातील बहारीच येथे ऑक्टोबर मध्ये एका हिंदू व्यक्तीच्या हत्येनंतर धार्मिक दंगली झाल्या, ज्यात लूटमार आणि संपत्तीचे नुकसान झाले. मंदिरांच्या जागी मशिदी आहेत, मशिदी बेकायदेशीर आहेत असे म्हणत मशिदी ध्वसत कराव्या यासाठी हिमाचल प्रदेशातील मंडी आणि शिमल्यातील मलिआना येथे सप्टेंबर महिन्यात फॅशिस्ट गुंडसेनांनी “निषेध” केला.
जून 2024 मध्ये, छत्तीसगडमधील रायपूर येथे, एका जमावाने गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली, ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि दहा दिवसांनी एकाचा मृत्यू झाला. गुजरातमधील आणंदमध्ये, जून 2024 मध्ये चिखोदरा गावात क्रिकेट सामन्यादरम्यान जमावाने सलमान वोहरा या 23 वर्षीय मुस्लिम तरुणाला मारहाण करून ठार मारले. हरियाणातील चरखी दादरी येथे, ऑक्टोबर 2024 मध्ये हंसवास खुर्द गावात, गोमांस खात असल्याचा आरोप करून जमावाने कचरा वेचणाऱ्यांवर हल्ला केला. पश्चिम बंगालमधील 26 वर्षीय स्थलांतरित कामगार साबीर मलिक याला मारहाण करून ठार मारण्यात आले, तर त्याचा काका असीरुद्दीन पळून गेल्यामुळे बचावला. 10 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत, परंतु 6 जण अजूनही फरार आहेत. हरियाणातील फरिदाबादमध्ये, 12 वीचा विद्यार्थी आर्यन मिश्राचा 30 किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला आणि गोरक्षकांनी त्याला गोवंश तस्कर समजून गोळ्या घालून ठार मारले. धुळे येथे धावत्या ट्रेनमध्ये, मुंबईजवळील इगतपुरीजवळ एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीवर तरुण गुंडांनी गोमांस घेऊन जात असल्याचा संशय घेऊन हल्ला केला. अनेक प्रकरणांमध्ये, जनतेच्या संतापामुळे पोलिसांनी काही लोकांना अटक केली, परंतु जेव्हा राग शांत होतो आणि खटला थंड्या बस्त्यात गुंडाळला जातो, हे सर्वांना माहिती आहे. गोरक्षकांकडून गोहत्या किंवा तस्करी करणाऱ्यांना ठार मारण्याचे उघड आवाहन ऑनलाइन फिरत असल्याचे दिसून येते आणि याला सरकारचे समर्थनही मिळते. अनेक प्रकरणांमध्ये, असे आढळून आले आहे की पीडित व्यक्तीच्या ताब्यात सापडलेले मांस गोमांस नाही, तरीही गोरक्षकांमुळे अनेक जीव गेले आहेत.
भाजप थेट विद्वेषी भाषण कार्यक्रमांचा सर्वात मोठा आयोजक म्हणून उदयास आला आहे. त्यांनी 340 अशा मेळाव्यांचे आयोजन केले आहे जे सर्व नोंद झालेल्या प्रकरणांपैकी २९.२ टक्के आहे. विहिंप आणि बजरंग दलाने 279 विद्वेषी भाषण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील फॅसिस्ट संघटनांची युती असलेला ‘सकल हिंदू समाज’ (एसएचएस) 56 विद्वेषी भाषण कार्यक्रमांसाठी जबाबदार होता, ज्यात सुरेश चव्हाणके, काजल हिंदुस्तानी आणि भाजप आमदार टी. राजा सिंह आणि नितीश राणे सारखे विखारी वक्ते बोलावले गेले होते. 2014 मध्ये एका मुस्लिम तंत्रज्ञान व्यावसायिकाच्या हत्येतील आरोपी असलेल्या धनंजय देसाई यांच्या नेतृत्वाखालील हिंदू राष्ट्र सेनेने (एचआरएस) देखील आपल्या कार्याचा विस्तार केला, आणि 19 विद्वेषी भाषण कार्यक्रम आयोजित केले. हिंदू जनजागृती समिती (एचजेएस), राष्ट्रीय हिंदू शेर सेना, शिवशक्ती आखाडा आणि श्री राम सेना यासारख्या लहान गटांनी देखील मुस्लिमविरोधी आणि ख्रिश्चनविरोधी प्रचार पसरवण्यात भूमिका बजावली. मुस्लिम व्यवसायांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे समर्थन करणारी 111 भाषणे आणि मशिदी आणि मुस्लिम घरे उद्ध्वस्त करण्याचे आवाहन करणारी 274 भाषणे आयएचएल अहवालात नोंदवली गेली आहेत. किमान 123 भाषणांमध्ये हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध सशस्त्र होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहवालात ख्रिश्चनांना लक्ष्य करणाऱ्या 115 विद्वेषी भाषणांच्या घटनांचा समावेश आहे, ज्याचा पडताळा चर्च आणि ख्रिश्चन संस्थांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होण्यात दिसून येतो. सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीसने त्यांच्या ‘नफरत का नक्षा’ या नकाशावर जातीय भाषणे, चिथावणी यांचा बारकाईने मागोवा घेतला आहे.
सरकार आणि पोलिसांकडून या भाषणांवर फारसा अंकुश ठेवला जात नाही किंवा शिक्षाही होत नाही, आणि अशी भाषणे देणाऱ्या फॅशिस्टांवर दाखल केलेले खटलेही धुळीला मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश देऊनही, एकट्या महाराष्ट्रात 19 गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल झालेले नाहीत. निवडणूक आयोग, पोलिस आणि न्यायालयांची निष्क्रियता हे समाजाचे फॅशिस्टीकरण कसे पूर्ण झाले आहे याचे पुरावे आहेत. भारतीय राज्यसत्तेच्या सर्व अवयवांना अंतर्गतरित्या ताब्यात घेण्यात आले आहे कारण फॅशिस्ट समाजाच्या प्रत्येक मज्जापेशीत शिरले आहेत. हिंदुत्व फॅशिस्टांनी तळागाळातील सर्व सत्तासंस्था आणि संघटनांमध्ये खोलवर प्रवेश केला आहे.
बांगलादेशमधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातील बंड, शेख हसीनाची हकालपट्टी आणि हिंदूविरोधी हिंसाचार, विशेषतः हिंदू भिक्षू चिन्मय दास यांच्या अटकेनंतर, भारतात मुस्लिमविरोधी मोर्चे निघाले, जिथे शेजारील देशातील धर्मवादाचा वापर भारतात धर्मवादी हल्ल्यांना खतपाणी घालण्यासाठी केला गेला. नोव्हेंबर 2024 मध्ये, दास यांच्यासाठी देशभरात निषेध होत असताना, उत्तर प्रदेशातील संभल येथे मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या (जी हिंदू मंदिरावर बांधल्याचा आरोप होता) पुरातत्व सर्वेक्षणाला विरोध केल्याबद्दल चार मुस्लिम पुरुषांची हत्या करण्यात आली.
झारखंड निवडणुकीत भाजपने बांगलादेशी “घुसखोर”च्या बागुलबुवाचा वापर करून निवडणूकीत फायदा मिळवला. नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर घुसखोरीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. भाजपची निवडणूक रणनीती भीती आणि धार्मिक असंतोष निर्माण करण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होती. एक सामान्य कथन असे बनवले गेले होते की विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस आणि भारत आघाडी, हिंदूंचे हक्क हिरावून घेण्याचे आणि त्यांच्या संसाधनांचे मुस्लिमांना पुनर्वितरण करण्याचे काम करत होते. बांसवाडा येथे मोदींनी दावा केला की विरोधी काँग्रेस पक्ष हिंदू महिलांच्या दागिन्यांसह सर्व काही विकणार आहे आणि त्यांची संपत्ती मुस्लिमांमध्ये पुनर्वितरण करणार आहे. मोदी, आदित्यनाथ आणि शहा यांनी वारंवार दावा केला की विरोधी पक्ष हिंदूंची मालमत्ता काढून घेतील आणि ती “बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या निर्वासितांना” देतील. जाती आणि धर्माच्या आधारावर विभागून कामगार जनतेला एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा, आणि काळजीने जपलेल्या मौल्यवान वस्तू गमावण्याच्या भीतीचा वापर जातीय उन्माद निर्माण करण्यासाठी करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.
आयएचएलच्या अहवालात सोशल मीडियाचाही मागोवा घेण्यात आला आहे ज्यामध्ये फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर प्रत्यक्ष द्वेषपूर्ण भाषणांचे 995 व्हिडिओ आल्याचे दर्शविले आहे. एकट्या फेसबुकने 495 द्वेषपूर्ण भाषणाचे व्हिडिओ प्रसारित केले गेले होते, तर 211 यूट्यूबवर टाकण्यात आले होते. याव्यतिरिक्त, भाजप नेत्यांनी दिलेली 266 अल्पसंख्याकविरोधी द्वेषपूर्ण भाषणे एकाच वेळी अनेक प्लॅटफॉर्मवर लाईव्ह-स्ट्रीम करण्यात आली. यावरून दिसून येते की द्वेषपूर्ण भाषणाविरुद्धची धोरणे घोषित केलेली असूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने धार्मिक विद्वेषी प्रचाराचा प्रमुख मंच म्हणून काम केले. मृत्युदंडाच्या धमक्या, मुस्लिम महिलांचे फोटो अश्लील फोटोंमध्ये रूपांतरित करणे, खोटेपणा आणि चुकीची माहिती पसरवणे यासारख्या गोष्टी दाखवतात की आज सोशल मीडिया द्वेषाचे डबके बनले आहे.
प्रत्येक उत्सव आता मांस विक्रीच्या नावाखाली हल्ले करण्याचा एक प्रसंग आहे; प्रत्येक मशिदीखाली संशयास्पदपणे एक मंदिर आहे; प्रत्येक चित्रपट, प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक संस्था आता फॅसिस्टांना पोसण्याची आणि मुस्लिमांवर हल्ले वाढवण्याची प्रयोगशाळा बनली आहे. हिंदूत्ववादी गट ज्या क्रूरतेने हिंसाचार करत होते, तिही वाढत चालली आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, भाज्या आणि गॅस सिलिंडरसारख्या सामान्य वस्तूंच्या किमती वाढत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचे नवे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. भारत हा जागतिक स्तरावर युवा बेरोजगारीमध्ये आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून नोंदवला जात आहे. या मुद्द्यांवर जनतेला एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी, आपल्याला धर्माच्या आधारावर लढण्यास सांगितले जात आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद, यूपीएससी जिहाद सारखे मुद्दे उपस्थित करून वाढती महागाई, बेरोजगारी, निरक्षरता, खाजगीकरण, पर्यावरणीय संकट, भ्रष्टाचार इत्यादीसारख्या खऱ्या समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे! मुस्लिमांच्या नावाखाली एक बनावट शत्रू आपल्या सर्व समस्यांसाठी जबाबदार म्हणून उभा केला जात आहे. त्यांना धार्मिक विषाचा अतिरेक केला जात आहे जेणेकरून फूट आणखी वाढेल. भांडवलदार वर्ग आणि त्याची सेवा करणारी भांडवली सत्ताच सामान्य जनतेच्या दुःख, असुरक्षितता, लूट आणि लूटमारीसाठी जबाबदार आहेत. म्हणूनच, केवळ अल्पसंख्याक मुस्लिमच नाही तर ट्रेड युनियन्स, कम्युनिस्ट, आकुंचन पावत चाललेल्या लोकशाही नागरी हक्कांविरुद्ध आवाज उठवतारे कार्यकर्ते, यांनाही ‘राष्ट्रविरोधी’ म्हणत शत्रूरूपी प्रस्तुत केले जात आहे.
आज, संघाच्या या अजेंड्याला हाणून पाडण्यासाठी, सामान्य कामकरी आणि कामगार वर्गाला या बनावट मुद्द्यांमध्ये अडकण्याऐवजी त्यांचे खरे प्रश्न ओळखावे लागतील. यासोबतच, त्यांना या दंगलखोरांना आपल्या रस्त्यांवरून आणि परिसरातून बाहेर काढावे लागेल. कोणत्याही किंमतीत हिंदुत्ववादी फॅशिस्टांच्या अजेंड्याला अजेंड्याला बळी पडता कामा नये आणि हे देखील समजून घेतले पाहिजे की फॅशिझम धर्म, जात, पंथ, राष्ट्र इत्यादींचा वापर करतो आणि भांडवलाच्या शक्तींची उघडपणे सेवा करण्याच्या उद्देशाने जनतेची एकता तोडतो. जितक्या लवकर आपण त्याचे वास्तव समजून घेऊ, तितक्या लवकर आपण आपल्या विखुरलेल्या शक्तींना संघटित करू शकू आणि फॅसिझमचा निर्णायक पराभव करू शकू.
शहीद भगतसिंहाचे शब्द या काळात आठवणे अत्यंत गरजेचे आहे:
“लोकांचे परस्परांशी होणारे झगडे थांबविण्यासाठी लोकांमध्ये वर्ग भावना रुजणे आवश्यक आहे. गरीब, कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजे, की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या हातचलाखीपासून स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे. त्यांच्या तावडीत सापडून काहीही करता कामा नये. जगातील सर्व गोरगरिबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे वा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखे आहेत. धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रीयतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावे आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत, यातच तुमचे भले आहे. या प्रयत्नांमुळे तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट एक ना एक दिवस तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.”
– ‘धार्मिक दंगली आणि त्यावरील उपाय’ मध्ये शहीद भगतसिंह