उच्चभ्रूंसाठी ‘कोल्डप्ले’ चा शो, बाकीच्यांसाठी दैन्य!

✍️ शशांक

कोल्डप्ले या जगातील एका प्रसिद्ध बॅंडच्या जानेवारी 2025 मध्ये मुंबईत आणि अहमदाबादेत झालेल्या शो चे कवित्व अजून संपलेले नाही. कोल्डप्लेच्या मुंबईतील कॉन्सर्टचे वर्णन द टाईम्स ऑफ इंडियाने “जीवनात शोभेलसे साहस” असे केले होते, तर हिंदुस्तान टाईम्सने अहमदाबाद कॉन्सर्टचे “आतापर्यंतचा सर्वात मोठा” म्हणून कौतुक केले. अशा मथळ्यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांवर वर्चस्व गाजवले, देशाच्या “विश्वगुरू” दर्जाचा (ही पदवी आपल्या पंतप्रधानांनी देशाला दिली आहे) पुरावा म्हणून ब्रिटिश रॉक बँडचे भारतात आगमन अभिमानाने साजरे केले गेले. भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सने या गोष्टीचा जोरदार प्रचार केला आणि अगदी भारताला कॉन्सर्टसाठी “जागतिक राजधानी” घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेतील अफाट शक्यता” देखील अधोरेखित केल्या, आणि या शो ला भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतीक म्हणून मांडले.

सरकार आणि कॉर्पोरेट-नियंत्रित माध्यमांच्या मते, उर्वरित जग गंभीर आर्थिक आव्हानांना तोंड देत असतानाही भारत पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वीपणे चमकत आहे. आता अजून काय मागावे बरे? शेवटी, कोल्डप्लेचे क्रिस मार्टिन त्यांच्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात भव्य व्यासपीठावर प्रस्तुती करत होते. अशा भव्यदिव्य शों द्वारे देशाची प्रतिमा झळकत असताना, वाढती बेरोजगारी, वाढत्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किंवा महागाईबद्दल काळजी का करावी? “नव्या भारतात” आपले स्वागत आहे, जिथे सरकार प्रगतीची काळजीपूर्वक तयार केलेली प्रतिमा चमकावण्यासाठी करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत आहे.

भारत चकाकत आहे, परंतु कोणासाठी तर लोकसंख्येच्या सर्वात श्रीमंत 10-20 टक्के लोकांसाठी. “अच्छे दिनच्या” युगात राहणाऱ्या या अल्पसंख्याक लोकांसाठी यापेक्षा चांगले दिवस तर कधीच नव्हते. पण उर्वरित 80-90 टक्के लोकांचे काय? या बहुसंख्यांक लोकांसाठी जीवन म्हणजे भारतीय भांडवलदार वर्गाच्या विकासाच्या कथेशी जुळवून घेत जगण्याचा एक दैनंदिन संघर्ष आहे. आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम आणि जागतिक मान्यता यांच्या कोडकौतुकात उच्चभ्रू लोक मिरवत असताना, उर्वरित लोकसंख्येला मात्र समृद्धीचा हा भ्रम टिकवून ठेवण्याचा भार उचलावा लागतो आहे.

एकीकडे हजारोंची तिकिटे , दुसरीकडे 25,000 रुपयांपेक्षा कमी कमावणारे 90 टक्के लोक !

जेव्हा या संगीत कार्यक्रमाची तिकिट-विक्री सुरू झाली, तेव्हा असे वृत्त आले की श्रीमंत लोक काळ्या बाजारात तिकिटे खरेदी करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लाखो रुपये देण्यास तयार होते. हे आपल्या देशातील तीव्र विषमतेवर प्रकाश टाकते. 2014 पासून परिस्थिती आणखी बिकट झाली आहे; कारण फॅसिस्ट मोदी सरकारने मागील प्रशासनाकडून वारशाने मिळालेल्या नवउदारमतवादी धोरणांना आक्रमकपणे तीव्र केले आहे. अलीकडेच, “भारतात उत्पन्न आणि संपत्तीची असमानता, 1922-2023: अब्जाधीशांच्या राज्याचा उदय” या शीर्षकाच्या एका पेपरमध्ये असे नमूद केले आहे की 2022-23 मध्ये लोकसंख्येच्या वरच्या 1% लोकांचा उत्पन्नातील आणि संपत्तीतील वाटा अनुक्रमे 22.6% आणि 40.1% पर्यंत वाढला, त्याचवेळी वरच्या 10% लोकांचा संपत्तीमध्ये वाटा 65% होता आणि खालच्या 50% लोकांचा वाटा फक्त 6.4% होता.

कामगार वर्गाच्या नियमित आणि वाढत्या भांडवली शोषणाव्यतिरिक्त, नवउदारमतवादी धोरणांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांकरिता आणि श्रीमंतांकरिता कर कपात आणि कर्जमाफीला प्राधान्य दिले आहे, तर उर्वरित लोकसंख्येवर अप्रत्यक्ष करांचा भार टाकला आहे ज्यामुळे आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, द हिंदूने केलेल्या एका तपासणीत असे दिसून आले आहे की 2019 मध्ये सवलतीच्या कर प्रणालीद्वारे भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांनी अंदाजे 3.14 लाख कोटी रुपयांचे कर वाचवले आहेत. दरम्यान, गेल्या 10 वर्षांत बँकांनी 16.5 लाख कोटी रुपयांचे बुडीत कर्ज माफ केले आहे. ही बुडीत कर्जे माफ करण्यासाठी निधी कुठून आला? तो या बँकांमध्ये जमा केलेल्या सामान्य भारतीयांच्या बचतीतूनच आला. कष्टकरी जनतेकडून श्रीमंतांकडे संपत्तीचे हस्तांतरण पद्धतशीरपणे सुव्यवस्थित केले गेले आहे आणि सरकारने हे वास्तव उघड करणारे अहवाल दडपण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे. खरं तर, असे म्हटले पाहिजे की देशातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आयटी, उत्पादन किंवा सेवा नाही – तर असमानता आहे.

श्रीमंतांसाठी वाहतूक नियोजन; सामान्यांसाठी चेंगराचेंगरी आणि मृत्यू

कोल्डप्लेसारख्या घटनांमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की आपल्या सरकारांसाठी सामान्य कामकऱ्यांचे जीवन निरुपयोगी आहे तर श्रीमंतांच्या कार्यक्रमांना सार्वजनिक पैशाने सर्व संरक्षण दिले जाते.

कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी नवी मुंबईत अनेक प्रवास निर्बंध लागू करण्यात आले होते, ज्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. तुर्भे पासुन खारघर पर्यंत 8-10 किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी झाली. मजेची बाब म्हणजे, तथाकथित ‘उच्च-मध्यमवर्गीय’, जे क्वचितच वाहतूक कोंडीबद्दल तक्रार करण्याची संधी सोडतात, त्यांना या गर्दीची पर्वा नव्हती, कारण ती त्यांच्या आवडत्या ब्रिटिश रॉक बँडच्या कार्यक्रमाकरिता झाली होती. नवी मुंबईतील नेरुळ आणि जुईनगरमध्ये पोलिसांच्या मोठ्या तैनातीतून सरकारने दिलेले लक्ष स्पष्टपणे दिसून येत होते.

मुंबईतील कॉन्सर्टमध्ये उपस्थितांसाठी एक विशेष रेल्वे सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. याच मुंबईत 2023 मध्ये गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये दररोज किमान सात मृत्यू झाले होते; या अनुभवाच्या, शहरातील कामगार वर्गीय प्रवाशांच्या दैनंदिन संघर्षांच्या अगदी विरुद्ध कोल्डप्ले चे चित्र आहे. स्पष्टपणे, लोकल ट्रेनवर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या जीवनाची सरकारला काळजी नाहीये, तर कोल्डप्लेसारख्या धंद्याची नफ्याची गणिते सांभाळणे जास्त गरजेचे वाटते.

अजून एक उदाहरण घेऊयात. अलाहाबादमधील महाकुंभात, ज्याच्या नियोजनाचा मोठा गाजावाजा केला गेला, एक स्पष्ट वर्गीय दरी उघड झाली आहे. इथे ‘व्हीआयपी’ पाहुण्यांना मोकळे रस्ते उपलब्ध करवले गेले आणि सामान्य लोकांना लांबच्या लांब रांगांमध्ये उभे राहण्यास भाग पाडले गेले. या गैरव्यवस्थापनामुळे 29 जानेवारी रोजी चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे किमान 79 लोकांचा मृत्यू झाला. अधिकृत आकडेवारी केवळ 30 मृत्यूंचा दावा करत असली तरी, ही तफावत अजून काही नाही तर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा आणखी एक प्रयत्न आहे

म्हणून, ‘न्यू इंडिया’मध्ये, जर तुम्ही वरच्या वर्गात असाल, तरच तुमचे जीवन मूल्यवान आहे.

कोल्डप्लेचे क्रिस मार्टिन यांनी स्टेजवरजय श्री रामअसे म्हटले आणि गर्दी बेभान झाली

मुंबईत एक अनपेक्षित क्षण घडला जेव्हा बँडचा मुख्य कलाकार क्रिस मार्टिन याने चाहत्यांनी धरलेल्या फलकांपैकी एकावर “जय श्री राम” असे पाहिले, आणि नारा दिला. प्रेक्षकांकडून या कृतीचे जोरदार “स्वागत” करण्यात आले.

डोळेझाक करणाऱ्यांना सोडून सर्वांना माहीत आहे की देशभरात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी फॅसिस्ट शक्तींनी या जयघोषाचा वापर केला आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझमच्या मते, 2024 मध्ये भारतात जातीय हिंसाचारात 84 टक्के वाढ झाली आहे. श्रीमंतांमध्ये अशा जयघोषांचे सामान्यीकरण आश्चर्यकारक नाही, कारण त्यांना या तणावांचा फटका बसत नाही. ते त्यांच्या ‘गेटेड सोसायटीत’ सुरक्षितपणे राहतात आणि त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि परदेशात स्थायिक होण्यासाठी पाठवतात, परंतु अशा घटनांच्या परिणामी कामगार वर्गातील कुटुंबे उद्ध्वस्त होतात. आपल्या देशातील विशेषाधिकारप्राप्त लोकांसाठी जो क्षण मनोरंजनाचा बनला आहे, तो प्रत्यक्षात जातीय विषाचे बळी ठरणाऱ्यांसाठी आघाताचा स्रोत आहे. कोल्डप्लेने या घोषणेचा वापर केल्याने हे दिसून येते की कोल्डप्ले सारख्या व्यावसायिक बँडना फॅशिस्ट विचारांबद्दल तीव्र ओढ आहे आणि ते नफ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय घोषणा वापरण्यास तयार असतात.

हा बँड इंग्लंडला परतला आहे, धार्मिक आणि जातीय रेषांवर आधीच खोलवर ध्रुवीकरण झालेला देश मागे सोडून. तथापि, भारतात आपण जे पाहतो ती विसंगती नाही तर जगभरातील सर्व भांडवली समाजांचे सामान्य वास्तव आहे. व्यवस्थागत विषमता आणि तिला लपवण्यासाठी अस्मितेच्या आधारावर समाजाची विभागणी हे भांडवली व्यवस्थेचे सार्वत्रिक वास्तव आहे. कार्ल मार्क्सने ‘कॅपिटल’ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, भांडवली समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे एका ध्रुवावर संपत्तीचा संचय आणि त्याच वेळी विरुद्ध ध्रुवावर दैन्य, कष्टाची वेदना, गुलामगिरी, अज्ञान, क्रूरता आणि मानसिक अधोगतीचा संचय. सत्ताधारी भांडवलदार वर्ग त्यांचे राज्य चालू ठेवण्यासाठी, समाजातील ही खरी दरी लपवण्यासाठी आणि कामकरी जनतेमध्ये खोटे विभाजन निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतो.

सर्व भांडवली सरकारे भांडवलदार वर्गाची सेवा करण्यासाठीच अस्तित्वात आहेत. म्हणूनच बेरोजगारी, महागाई आणि सुविधांचे असमान वाटप यासारख्या समस्या अपघाती नाहीत; तर त्या व्यवस्थेच्या रचनेचा भाग आहेत. दरम्यान, बहुसंख्यांक जनतेला विभाजित करून आपले राज्य टिकवून ठेवण्यासाठी भांडवली व्यवस्थेचे लाभार्थी जातीयवाद, धर्मवाद आणि इतर प्रकारच्या भेदभावी प्रचाराचा वापर करतात. या व्यवस्थेत, कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमांचे उद्दिष्ट उन्मादाला प्रोत्साहन देणे, सामाजिक जाणीवेला सुन्न करणे, प्रगतीबद्दल खोट्या कल्पना निर्माण करणे आणि शासक वर्गाची वर्ग एकता वाढवणे आहे.

श्रीमंत, त्यांचा कॉर्पोरेट मीडिया आणि त्यांची सरकारे, कोल्डप्ले सारख्या व्यावसायिक कलाकारांच्या मदतीने आपल्याला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि ही व्यवस्था, जी ऐतखाऊ आणि कामकऱ्यांमधील दरी वाढवत राहते, नष्ट करण्यासाठी आपल्याला कामगार-कष्टकऱ्यांच्या सांस्कृतिक आंदोलनाची, आपली कामगार वर्गीय संस्कृती विकसित करत रूजवण्याची गरज आहे.