कथा – नागडा राजा
येह शेङ ताओ
अनुवाद- नागेश भारत धुर्वे
हैन्स एण्डरसनची गोष्ट तुम्ही वाचली किंवा ऐकली असेल. त्या गेाष्टीत एक राजा होता. त्याला नवनवीन कपडे घालण्याचा नाद होता. या राजाला एके दिवशी दोन बदमाशांनी उल्लू बनवलं. त्या बदमाशांनी पैजेवर सांगितलं की ते राजासाठी एक असा सुंदर पोषाख तयार करतील ज्याचा कुणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही. आणि हो, या पोषाखाची एक आगळी मजा असणार आहे. हा पोषाख कुठल्याही मूर्ख किंवा आपल्या पदासाठी अयोग्य व्यक्तीला दिसणार नाही. राजाने ताबडतोब आपल्यासाठी पोषाख बनविण्याचा आदेश देऊन टाकला. मग काय, लगोलग बदमाशसुद्धा माप घेण्याचा, कापण्या-शिवण्याचा अभिनय करू लागले. पोषाख शिवण्याचं काम कसं चाललंय हे बघण्यासाठी राजानं वारंवार आपल्या मंत्र्यांना पाठवलं. प्रत्येक वेळी जाऊन ते राजाला सांगत, आम्ही आमच्या डोळयांनी पोषाख बघून आलोय. खरोखर, खूपच सुंदर पोषाख तयार होतोय. खरं तर त्यांनी काही ओ की ठो पाहिलं नव्हतं. पण स्वतःला मूर्ख म्हणवून कसं घ्यायचं? अन् त्याच्याही पुढे, आपल्या पदासाठी आपण अयोग्य आहोत हे म्हणवून घेणं तर त्यांना अजिबात नको होतं.
राजानं ठरवलं, ज्या दिवशी नवा पोषाख तयार होईल त्या दिवशी एक जंगी समारंभ करायचा. आणि त्या दिवशी राजा नवा पोषाख घालून नगरात फिरेल. संपूर्ण राज्यात तशी दवंडी पिटली गेली.
तो दिवस उजाडताच बदमाशाने राजाचे सगळे कपडे उतरवले . ते राजाला नवीन अवतारात सजवण्याचा – नटवण्याचा अभिनय करु लागले. राजाचे दरबारी आणि नोकरचाकर सुदधा एका स्वरात राजाचं गुण-गान करु लागले. कारण पुन्हा तेच. त्यांनाही स्वताःला मूर्ख अथवा आपल्या पदासाठी अयोग्य म्हणवून घ्यायचं नव्हतं. मग काय, राजा आपलं गुण-गान ऐकून आनंदाच्या भरात नागडाच बाहेर निघाला.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनासुद्धा स्वतःला मूर्ख म्हणवून घ्यायचं नव्हतं. सर्वजण राजाचा नवा पोषाख बघून अशी काही प्रशंसा करीत होते, जणू काही त्यांना खरोखरच पोषाख दिसत होता. पण तेवढयात एक लहान मुलगा भाबडेपणाने बोलून गेला, “अरे त्या माणसानं तर अंगावर काहीच घातल नाय.”
तिथे असणा-या प्रत्येक माणसाच्या कानावर लहान मुलाचे हे शब्द पडले, आणि सर्व माणसे हसू लागली, ओरडू लागली, “आरं खरच की! राजाच्या अंगावर साधा एक कपडयाचा तुकडा सुद्धा नाय.” क्षणात राजा समजून चुकला की आपल्याला गंडवलेलं आहे. पण आत्ता कुठे खेळ सुरू झाला होता. आणि खेळ मध्येच थांबवणं म्हणजे आणखीनच बदनामी. राजानं ठरवलं, हे असंच सुरू ठेवायचं अन् तो छाती फुगवून दिमाखात चालू लागला.
याच्या नंतर काय झालं ? त्याबद्दल मात्र हैन्स अॅंडरसननं काहीही सांगितलेलं नाही. प्रत्यक्षात मात्र या गोष्टीत अजून बरंच काही व्हायचं होतं.
काही घडलंच नाही अशा आविर्भावात राजा आपली भव्य मिरवणूक घेऊन पुढे चालू लागला. तो इतका आखडून चालत होता की त्याची खांदे आणि पाठीची हाडे दुखायला लागली. त्याच्या अदृश्य पोशाखाचा मागचा भाग उचलून चालण्याचा अभिनय करणारे सेवक मोठ्या कष्टाने ओठ दाबून हसणं आवरत होते. त्यांनासुद्धा स्वतःला मूर्ख म्हणवून घ्यायची इच्छा नव्हती. अंगरक्षक डोळे जमिनीवर खिळवून चालत होते. एखादयाची नजर आपल्या जोडीदाराच्या चेह-यावर गेली, तर त्याला हसू फुटायचं. पण जनतेचं सगळं रोखठोक असतं. तिला ओठ दाबून, डोळे जमिनीवर खिळवून चालण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे राजाने अंगावर काहीच घातलेलं नाही, हे नागडं सत्य समोर येताच लोक जोर जोरात हसायला लागले.
“आयला, चांगलाच राजा हाय हयो, आँ. नागडाच चाललाय,” एकानं उत्याहात म्हटलं.
“हम.. मला वाटतं, याचं डोकं फिरलंय,” दुसरा हसत म्हणाला.
“च् च् च् घानेरडा कीडा,” अजुन एक जण म्हणाला.
“आरं त्याचा खांदा अन् पाय बघीतलं का? कशी, उलटया पंखाची कोंबडीच हायं असं वाटतया,” चौथ्यानं टोमणा मारला.
असल्या या टोमण्यांनी राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने मिरवणुक थांबवली आणि आपल्या मंत्र्यांना दरडावंल, “हया मुर्खांचं आणि देशद्रोह्यांचं तोंड जास्तच चालायला लागलंय, तुम्ही त्यांना बोलण्यापासून रोखत कां नाही? माझे नवीन कपडे खुपच उठावदार आहेत. ते परिधान केल्यामुळे माझी ऐट, माझा रूबाब वाढलाय, म्हणून तुम्हीच तर सांगत होता. त्यामुळे यापुढे मी फक्त आणि फक्त हेच कपडे घालणार, दुसरं काहीच घालणार नाही. जो कोणी, मी नागडा आहे असं म्हणण्याचे धाडस करेल तो कपटी आणि गद्दार आहे. त्याला तात्काळ अटक करुन फासावर लटकवा. हा नवीन कायदा मी आजपासूनच लागू करतोय. ताबडतोब ही घोषणा करून टाका.”
ह्या नवीन कायद्यामुळे राज्याच्या मंत्र्यांची पळापळ सुरू झाली. मंत्र्यांनी दणक्यात नगरभर या नवीन कायदयाची दवंडी पिटली. हया जीवघेण्या कायदयाच्या भीतीमुळे लोकांचा हसणं आणि टोमणे मारणं बंद झालं. राजाने प्रसन्न मनाने मिरवणुकीस पुढे जाण्याचा आदेश दिला. पण तो थोडासाच पुढे जातो न जातो तोच हसण्याचा आणि टोमण्यांचा आवाज त्याच्या कानात फटाकड्यांसारखा वाजू लागला.
“त्याच्या अंगावर कपडयाचा एक तुकडा देखील नाय.”
“कसलं घाणेरड पिवळं जरट शरीर हाय.”
“आरं,त्याचं पोट तरी बघा, जसा सडलेला भोपळा हाय!”
“हम… खरचं की, याचे कपडे लईच भारी हायत राव!” अशा प्रत्येक टोमण्याबरोबर हास्याचा स्फोट ऐकू यायचा.
राजाला परत राग आला. त्यान वखवखलेल्या नजरेनं मंत्र्यांना पाहिलं आणि खेकसला, “हे ऐकल का तुम्ही!”
“हो महाराज ऐकलं आम्ही,” थर थर कापत मंत्र्यांनी उत्तर दिलं.
“मग? मी नवीन कायदा सुरु केलाय हे विसरलात वाटतं?”
राजाचं बोलण पूर्ण व्हायच्या आतच मंत्र्यांनी शिपायांना आदेश दिला, जे कुणी हसत होते, किंवा टोमणे मारत होते, त्यांच्या मुसक्या आवळा. सगळीकडे गोंधळ उडाला. शिपाई इकडून तिकडे पळत सुटले. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अडवू लागले. त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली. काही लोक पडले, काही जण एकमेकांना तुडवुन पळुन जाण्यात यशस्वी झाले. आता हसणं, खिदळणं अन् टोमण्यांच्या जागी ओरडणं, विव्हळणं कानावर पडू लागलं. सुमारे पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलं. राजाने त्यांना मारुन टाकण्याचा आदेश दिला. कारण लोकांना समजलं पाहिजे, माझ्या तोंडून निघालेला शब्द अखेरचा शब्द असतो, आणि त्याची केाणीही चेष्टा करु शकत नाही, राजा म्हणाला.
त्या दिवसानंतर राजाने कुठलाच पोषाख अंगावर चढवला नाही. अंत:पुरापासून दरबारापर्यंत सर्वत्र राजा नागडाच फिरे, अन् मध्येच स्वत:चा पोषाख नीटनेटका करण्याचा अभिनयसुद्धा करी. त्याच्या राण्या आणि दरबारी सुरुवातीला त्याच्या घाणरेडया पिवळया शरीराबरोबर फिरत, राजाच्या अशा वागण्यामुळे त्याची मजा पण घेत. मात्र हळुहळू ते काही झालंच नसावं, असा आव आणायला शिकले. त्यांना या सगळ्या प्रकाराची सवयच झाली. आता ते राजाकडे असे काही पाहत, जणू त्याने अंगभर कपडे घातलेलेच आहेत. दुसरं काही ते करूशी शकत नव्हते, कारण दुसरा पर्यायच नव्हता. नाहीतर फक्त नोकरीच नाही, जीवसुद्धा जायची पाळी. एवढे सारे करूनदेखील जराशी चूक झाली तर ती त्यांच्या नाशाचे कारण ठरू शकली असती.
ऐक दिवशी राजाची प्रिय राणी त्याला खुश करण्यासाठी आपल्या हाताने त्याला मदिरापान करवीत होती. तिने एका प्याल्यात लाल दारू भरुन तो राजाच्या ओठाला लावला लाडात येऊन म्हणाली, हे प्या आणि देव तुम्हाला अमरत्व प्रदान करील. हे ऐकून राजा इतका खुष झाला की त्याने एका दमातच ग्लास रिकामा केला. पण त्यामुळे त्याला ठसका लागला, अन् थोडीशी दारु त्याच्या छातीवर सांडली.
“अहो, तुमच्या छातीवर तर डाग लागला,” राणी उद्गारली.
“काय ? माझ्या छातीवर!”
आपल्याकडून भयंकर चूक झाल्याचे राणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिचा चेहरा पिवळा पडला. “नाही, तुमच्या छातीवर नाही,” तिनं कापऱ्या आवाजात स्वतःची चूक दुरुस्त केली, “तुमच्या पोषाखावर डाग लागलाय.”
“पण तू तर म्हणालीस, माझ्या छातीवर डाग लागलाय म्हणून. म्हणजे याचा अर्थ मी कपडेच घातलेले नाहीत. मूर्ख कुठली! तू दगाबाज आहेस. आणि तू माझा कायदा मोडला आहेस!” एवढं बोलून राजाने हुकूम सोडला, “हिला जल्लादाकडे घेऊन चला.” राजाचे शिपाई आले आणि राणीला फरफटत घेऊन गेले.
राजाचा एक खूपच विद्वान मंत्रीसुदधा राजाच्या हेकटी स्वभावाचा बळी ठरला. जे चाललंय त्याकडे दुर्लक्ष करायची सवय त्याने लावली होती खरी, पण भरल्या दरबारात सिंहासनावर नागडा बसणाऱ्या माणसाला राजा म्हणायची त्याला लाज वाटत होती. मनातल्या मनात तो त्याला ‘टकलं माकडच’ म्हणायचा. पण त्याला या सगळयाची भीती वाटयची. एखादया दिवशी मनातल ओठवर आलं तर. नको त्या प्रसंगी हसू फुटलं तर. तसे झाले तर त्याचा सर्वनाश ठरलेला होता. त्यामुळे त्याने आपल्या वृध्द आईला बघण्यासाठी घरी जाण्याचं खोटं कारण देत रजा मागितली.
“एका मातृभक्त मुलाची विनंती मी कशी काय फेटाळू शकतो,” राजा म्हणाला आणि राजाने त्याला रजा दिली. रजा मिळाल्यामुळे मंत्र्याला हायस वाटलं. आपल्या खांद्यावरचं खूप मोठ ओझ उतरल्यासारखं वाटलं त्याला. त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि पुटपुटला, “देव पावला, आता या नागड्या राजाला पाहावं लागणार नाही.”
राजाला या कुजबुजण्याची भणक लागली. त्याने आपल्या सेवकानां विचारलं, “काय म्हणाला हा?” गडनडीत सेवकांना काय उत्तर द्यावं सुचलं नाही, त्यांनी खरं खरं सांगून टाकलं.
“असं आहे तर, तू रजा यासाठी मागितलीस की तुला मला पाहायला आवडत नाही,” राजा ओरडला, “तू माझा कायदा मोडला आहेस. तुला कायमच्या रजेवर पाठवतो. आणि रजासुद्धा अशी की तू आयुष्यात पुन्हा घराचं तोंड पाहू शकणार नाहीस.” त्यानंतर राजान जल्लादांना आदेश दिला, याला घेवुन जा, आणि याचं मुंडकं छाटून टाका.
अशा घटनांमुळे अंतःपुरात आणि दरबारात प्रत्येक माणूस सावध राहयाला लागला. पण सामान्य जनता अजून राण्या आणि दरबाऱ्यांसारखी चलाखी शिकली नव्हती. त्यामुळे जेव्हा राजा आपलं सोंग आणि घाणेरडं शरीर घेऊन जनतेच्या समोर जाई तेव्हा त्यांना हसणं आवरणं कठीण जायचं. त्यानंतर खुनांचं सत्रच सुरु व्हायचं. एके दिवशी राजा यज्ञ करण्यासाठी मंदिरात गेला. तेव्हा त्याच्या शिपायांनी तीनशे लोकांना जल्लादाच्या हवाली केलं. ज्या दिवशी तो आपल्या सैन्याच्या हवालीसाठी गेला त्या दिवशी पाचशे लोकांचे खून प़डले. आणि ज्या दिवशी तो राज्याच्या दैा-यावर गेला, त्या दिवशी हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात आले.
एका दयाळू वृध्द मंत्र्यान विचार केला, राजाने सगळया मर्यादा ओलांडलेल्या आहेत. आता काही तरी केलं पाहीजे. पण राजा आपली चूक कबूल करणा-यातला नव्हता. त्याला त्याची चूक दाखवून देणं म्हणझे स्वतःच्या पायावर कु-हाड मारुन घेण्यासारखं होत. तेव्हा वृध्द मंत्र्यान विचार केला, काहीही करुन राजाला परत कपडे घालायला भाग पाडलं तर लोकांचं हसणं आणि टोमणे मारणं थांबेल. आणि आपोआपच लेाकांचे प्राणसुध्दा वाचतील. काय कराव ज्याने सापही मरेल आणि काठीसुद्धा मोडणार नाही. कित्येक दिवस आणि रात्री हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता.
अन् एके दिवशी त्याला एक युक्ती सुचली. तो राजाकडे गेला आणि म्हणाला, “हे राजन! तुमचा एक प्रमाणिक सेवक या नात्याने मी तुम्हाला काही सुचवू इच्छितो. राजन तुम्हाला नवनवीन कपडे घालण्याची आवड आहे. त्यामुळे तुमचा रूबाब वाढतो. पण हल्ली मी बघतोय की, आपण राज्याच्या कारभारात इतके व्यस्त झाला आहात की, आपल्याला नवनवीन कपडे घालण्याचं भानच राहिलेलं नाही. जो पोषाख तुम्ही सध्या घातला आहे, त्याचा रंग उडाला आहे. त्यामुळे मला वाटते की तुमच्यासाठी एक नवीन पोषाख तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या शिंप्यांना आदेश द्यावा.”
“काय म्हणालात? माझ्या कपडयांचा रंग उडालाय?” राजा आपल्या नसलेल्या कपडयांवरून हात फिरवत म्हणाला. “बकवास! हा जादुई पोषाख आहे. याचा रंग कधीच उतरत नाही. तू ऐकलं नव्हतंस वाटतं, मी घोषणा केली होती की मी या पोषाखाशिवाय काहीच घालणार नाही. मी हा पोषाख उतरवावा अशी तुझी इच्छा आहे. जेणेकरून मी खराब दिसावं. हो ना ? वारे वा! चल, जाऊ दे, तुझे वय आणि मागची सेवा बघून मी तुला जीवदान देतो. पण तुझं उरलंसुरलं जीवन आता काळोख्या कोठडीतच जाणार.”
याच प्रकारे शेकडो लोकांना फासावर लटकवण्याचं काम चाललेच होते. तरीही लोकांचं हसणं बंद न झाल्यामुळे राजा आणखीच भडकला. त्याने आणखी कडक कायदा केला. ह्या वेळेस त्यानं आदेश दिला, ज्यावेळी तो रस्त्यावर येईल त्यावेळी कुठूनही, कुठल्याही माणसाचा कसलाही आवाज जरी आला तरी त्याला हात्तीच्या पायाखाली तुडवल जाईल.
कायदयाची घोषणा होताच राज्यभरातले गणमान्य नागरिक विचार करू लागले. राजाची चेष्टा करणं किंवा त्याला हसणं हे चांगलं नाहीये हे खरं, मात्र इतर कारणास्तव ते बोलले किंवा त्यांनी साधी कुजबूज केली तरी त्यासाठी फुकटची शिक्षा कां म्हणून भोगायची? आणि तीसुद्धा देहदंडाची. सर्व लोक मिळून राजाकडे गेले. राजमहलाच्या बाहेर अगदी गुडघ्यांवर येऊन म्हणाले, आम्ही राजाला एक विनंती करायला आलोय.
भेदरलेला राजा बाहेर आला, अन खोटं अवसान आणून म्हणाला, “कशाला आलाय इथं? विद्रोह करण्याचा विचार आहे का?” गणमान्य नागरिकांनी वर बघायचं धाडस न करता उत्तर दिलं, “नाही महाराज, तुम्ही आम्हाला चुकीचं समजलात. आम्ही असं काहीही करणार नाही.” सुस्कारा सोडत राजाने ऐटीत आपल्या अदृश्य पोषाखाची किनार ठिक केली आणि पहिल्यापेक्षा कडक शब्दात म्हणाला, “मग एनढ्या मोठया संख्येनं कशाला आला आहात?”
“आम्ही एक विनंती करायला आलोय. आमचं हसण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला परत दया. जे लोक तुमच्यावर चिखलफेक करतात, तुम्हांला हसतात ते मूर्ख आहेत. आणि त्याना मारलंच पाहिजे. पण आम्ही सगळे राजभक्त, इमानदार नागरिक आहोत. आमची तुम्हांपाशी प्रार्थना आहे, तुमचा हा नवीन कायदा रद्द करा”.
“स्वातंत्र्य? आणि तुम्हाला? जर तुम्ही स्वातंत्र्याची इच्छा बाळगत असाल तर तुम्ही प्रजा म्हणून या राज्यात राहू शकत नाही. जर तुम्हांला माझी प्रजा म्हणून इथं राहायचं असेल तर माझे कायदे मान्य करावे लागतील. आणि माझे कायदे पोलादासारखे मजबूत आहेत. मी ते रद्द करु? कधीच नाही!” – एवढं बोलून राजा वळाला आणि आपल्या महालात निघून गेला.
नागरिकांना पुढे बोलण्याची हिमंत झाली नाही. भीत भीत त्यांनी हळूच मान वर केली, आणि पाहतात तर राजा निघून गेलाय. आता ते माघारी जाण्यावाचुन काहीही करू शकत नव्हते. मग लोकांनी एक नवीन शक्कल लढवली. ज्या ज्या वेळेस राजा बाहेर येई, त्या त्या वेळी ते दाराला कडी लावून घरात बसत. रस्त्यावर ढुंकूनसुद्धा बघत नसत.
एके दिवशी राजा मंत्री आणि अंगरक्षकांबरोबर राजमहालाच्या बाहेर निघाला. सगळे रस्ते सामसूम होते. दुतर्फा घरांचे दरवाजे बंद होते. जो एकच आवाज येत होता तो त्याच्याच पावलांचा होता. जणू रात्रीच्या निरव शांततेत कुठलीशी सेना मार्च करीत होती.
अचानक राजा थांबला. कान टवकारत ओऱडला, “हा आवाज ऐकताय ना?” मंत्र्यांनीसुद्धा एकण्याठी कान टवकारले.
“हो, लहान मूल रडतंय,” एक जण म्हणाला.
“एक बाई गाणं म्हणतेय,” दुस-याने सांगितलं.
“तेा माणूस नक्कीच दारूच्या नशेत पार झिंगलेला असणार, मूर्ख कुठला, मोठमोठयानं हसतेाय,” तिसरा मंत्री म्हणला.
आपल्या मंत्र्यांना या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटताहेत हे बघून राजा लालेलाल झाला. “तुम्ही माझ नवीन कायदा विसरलात वाटतं?” – त्याने गर्जना केली. रागानं त्याचे डोळे बाहेर आले होते, आणि त्याची लुळी छाती धडधडत होती.
मंत्र्यानी लगेच आदेश दिला – ज्या कुणी आवाज काढलाय, भले तो म्हातारा असो, तरुण असो, पुरुष असो वा स्त्री किंवा आणखी कुणी. त्याला जेरबंद करून जल्लादाच्या हवाली करा.
पण तेवढ्यात असं काही घडलं ज्याची राजाने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. शिपायांनी घराचे दरवाजे तोडताच बायका-पुरुष, लहान मुलांचा घोळका घरांतून बाहेर पडला. ते राजाभवती उड्या मारू लागले आणि हाताचे पंजे घारींसारखे उगारत ते राजाच्या शरीरावर तुटून पडले. तो ओरडत होते, “ओरबडा, फाडा, त्याचा खुनी पोषाख फाडून टाका.”
लोकांनी राजाच्या बाहया पकडून मोडल्या. महिला त्याच्या छाताडावर बुक्क्या मारीत होत्या. दोन लहान मुलं त्याच्या काखेत आणि पोटात गुदगुल्या करीत होती. चहू बाजूंनी वेढलेल्या राजाला निसटण्याची वाट दिसेना. त्याने आपले तोंड गुडघ्यात लपवले आणि खारुताईसारखा अंग चोरून बसला. पण सगळं व्यर्थ. काखेत होणा-या भयनाक गुदगुल्या आणि शरीराजी होणारी भयंकर जळजळ तो सहन करु शकत नव्हता. काही केल्या तो या संकटातून सुटू शकत नव्हता. त्याच्या तोंडातून राग, भय आणि आश्चर्याचे संमिश्र आवाज निघत होते. तो कपाळ ताणून लोकांना घाबरवण्याचा, धमकावण्याचा प्रयन्त करीत होता. ते बघून हसता हसता लोकांच्या पोटात दुखू लागलं.
लोकांच्या घरातून शिपायांनी पाहिलं, राजा राजा फार मजेशीर दिसत होता. जणू कुत्र्यांनी घेरलेलं माकड. आपण त्याच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे, हेसुद्धा ते पार विसरून गेले. तेही इतरांच्या हसण्यात सामील झाले. हे पाहून पहिल्यांदा तर मंत्री घाबरले, त्यांनी राजाकडे पाहिलं, आणि मग तेही खळखळून हसू लागले.
हसता हसता अकस्मात मंत्र्यांना आठवलं, आपण राजाचा कायदा मोडतोय, आपल्याला अटक होऊ शकते. अगोदर जेव्हा जनता राजाची खिल्ली उडवत होती, त्यावेळी मंत्रीच त्यांना दंड देत होते. मात्र आता ते स्वत:च राजावर हसू लागले होते. पुन्हा त्यांनी राजाकडे पाहिलं. त्यांच पूर्ण शरीर काळनिळं पडलं होतं. जळक्या वाकळासारखं. राजा पावसात भिजलेल्या कोंबडीच्या पिलासारखा दिसत होता. त्याला बघून मंत्र्यांना पुन्हा हसू फुटलं.
“हे अगदी स्वाभाविक नाही का? विनोदी गोष्टींवर लोकांना हसू येणारच. पण राजाने तर कायदा करून लोकांच्या हसण्यावरच बंदी आणली होती. काय फालतू कायदा आहे!” मग मंत्रीसुध्दा लोकांबरोबर ओरडू लागले “ओरबडा! याचे खोटे कपडे फाडून टाका!”
आपले मंत्री आणि शिपाईसुद्धा जनतेच्या बाजूने गेले आहेत आणि आता ते आपल्याला जरासुद्धा भीत नाहीत, हे पाहून राजाला प्रचंड धक्का बसला. आपल्या मस्तकात हातोड्याचा जोरदार प्रहार झाल्यागत वाटलं त्याला, आणि पुढच्या क्षणी तो जमिनीवर कोसळला!