भूतकाळाच्या कडू आठवणी, भविष्याची सोनेरी स्वप्ने आणि भय व आशेची ती रात्र
मॅक्सिम गोर्की यांच्या ‘आई’ कादंबरीचा एक प्रकरण
‘‘सत्याचा प्रभाव असा असतो’’

एकदा रात्रीचं जेवण आटोपून पावेलने खिडकीचा पडदा ओढून घेतला व खुर्चीच्या वरच भिंतीतील खिळयाला दिवा टांगून तो कोपऱ्यात वसून वाचू लागला. स्वयंपाकघरातली आवरासावर झाल्यावर आई बाहेर आली व हळूच त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. त्याने डोके वर करून तिच्याकडे पाहिले. ‘हिला काय हवं आहे?’ असाच प्रश्न त्याचे डोळे विचारीत होते.

“काही नाही, उगीच आले होते, पाशा!” एवढंच पुटपुटून ती लगेच घरात निघून गेली. पण तिच्या मनात खळबळ माजली होती ते तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. आत जाऊनही तिला चैन पडेना. ती हात धुवून परत बाहेर आली व त्याच्याजवळ जाऊन अखेर तिने त्याला विचारलेच,

“तू सारखा काय वाचीत असतोस रे एवढं?”

त्याने पुस्तक मिटले व तो म्हणाला,

“बैस इथे, ममी!”

आता आपल्याला काहीतरी विशेष महत्त्वाचे ऐकायला मिळणार अशा तयारीने ती त्याच्याजवळ बसली व मानचा हिय्या करून तो काय सांगतो त्याची वाट पाहू लागली.

पावेल तिच्याकडे न पाहाताच हळू आवाजात बोलू लागला. त्याच्या आवाजात कां कुणास ठाऊक एक प्रकारचा करारीपणा होता. तो म्हणाला,

“सरकारने आक्षेपार्ह ठरविलेली ही पुस्तकं मी वाचीत असतो. आपल्या कामगारांच्या परिस्थितीची खरीखुरी जाणीव करून देणारं सत्य त्यांत सांगितलं आहे, म्हणून सरकारने त्यांच्यावर बंदी घातली आहे. ही पुस्तकं गुप्तपणे छापली जातात व ती मजजवळ सापडली तर ते मला पकडून तुरूंगात डांबतील – हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याबदळ मला तुरूंगाची हवा खावी लागेल! आलं का लक्षात?”

हे ऐकून आपला श्वास कोंडला जात आहे असे आईला वाटू लागले. तिने आपले डोळे उघडले व ती मुलाकडे पाहू लागली तेव्हा समोर कोणी तरी परका, अपरिचितच माणूस बसला आहे की काय असा तिला भास झाला. त्याला आवाज निराळा भासत होता – नेहमीपेक्षा गंभीर, सकंप अन् खोल! तो आपल्या ऐटदार मऊ मिशांवरून बोटं फिरवीत होता व खाली वळलेल्या भुवयाखालून त्याचे डोळे कोपऱ्यात विचित्रपणेच टक लावून पाहाता होते. तिला त्याची भीती वाटली व त्याच्या विषयी अनुकंपाही वाटू लागली.

“हे तू का करतोस, पाशा?” तिने विचारले.

त्याने मस्तक वर उचलून तिच्याकडे पाहिले व शांतपणे उत्तर दिले,

“मला सत्य समजून घ्यायचे आहे म्हणून!”

त्याचा स्वर मृदु पण निश्चयी होता. त्याच्या नजरेतही करारीपणा होता. आपल्या मुलाने कसल्या तरी गुप्त व भयंकर कार्याला वाहून घेतले आहे एवढे तिला कळून चुकने. घडणाऱ्या गोष्टी अपरिहार्य असतात असे समजून त्या स्वीकारण्याची व निमूटपणे मान तुकविण्याची सवय तिच्या अंगी भिनून गेली होती. आतासुद्धा पाशाने जे सांगितलं त्यामुळे ती दुःखाने इतकी दडपून गेली व तिच्या अंतःकरणात अशा असह्य वेदना सुरू झाल्या की तिच्या तोंडातून एक शब्दसु़द्धा बाहेर पडला नाही. ती फक्त मुळुमुळू रडू लागली.

“रडू नकोस, आई.” पावेल अत्यंत मृदू व प्रेमळ स्वरात तिला म्हणाला. पण तिला मात्र त्या स्वरात असा अर्थ ध्वनित झाला की तो आपला निरोप घेऊन कोठेतरी दूर जाण्याला निघाला आहे!

“आपण हे कसलं आयुष्य जगतो याचा तूच विचार कर, आई! तूच आता चाळीस वर्षांची आहेस, पण तुझ्या वाट्याला आजवर काही तरी सुख आलं आहे का? बाबा तुला मारीत-त्यांना स्वतःला जो छळ सहन करावा लागला, जे खडतर जीवन जगावं लागलं, त्याचा सगळा राग ते तुझ्यावर काढीत होते, हे त्यातलं रहस्य आता मला समजलं आहे. कोणतीतरी शक्ती त्यांना दडपून होती, पण ते काय होतं हे त्यांना उमजलं नाही. तीस वर्षे ते या ठिकाणी गुलामासारखे राबले. इथल्या कारखान्यात त्यांनी कामाला सुरवात केली तेव्हा फक्त विभाग होते, त्या ठिकाणी आता सात झाले आहेत!”

ती उत्सुकतेने त्याचं म्हणणं ऐकत होती, पण त्याचबरोबर तिला एक प्रकारचं भयही वाटत होतं. तिच्या मुलाच्या नेत्रांत एक प्रकारचं तेज विलसत होतं. समोरच्या टेबलावर छाती टेकून तिच्या  अश्रूपूर्ण नयनांकडे पाहात तो त्याला नव्यानेच आकलन झालेल्या सत्याचं विवरण करणारं त्याचं पहिलं भाषण करीत होता. त्याच्या बोलण्यात तारूण्याचा दुर्दमनीय उत्साह, आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विद्याथ्र्याला साजेसा अभिमान व त्यावरील दृढ श्रद्धेमुळे वाटणारा आत्मविश्वास, प्रतीत होत, होता. त्याच्या बोलण्याचा मुख्य हेतु आईला समजावून सांगण्यापेक्षाही स्वतःची कसोटी पाहणे हा होता. काही वेळ बोलून झाल्यावर योग्य शब्द सुचेनात म्हणून तो थांबला तेव्हा त्याला आपल्यासमोर बसलेल्या आईच्या व्यथित चेहऱ्याची तीव्रतेने जाणीव झाली. तिच्या प्रेमळ नेत्रांत अश्रू तरळत होते व ती त्याच्या बोलण्याने चकित होऊन त्याच्याकडे टक लावून पहात होती. आपल्या आईची त्याला करूणा आली व तो तिच्या जीवनाविषयी पुनः बोलू लागला.

“तुला आतापर्यंत कोणतं सुख भोगायला मिळांल? आनंदाचे असे काही तरी प्रसंग तुला आठवतात का ?”

तिचे त्याचं बोलणं ऐकून दुःखाने आपली मान हालवली. तिला काहीतरी नव्याच प्रकारची संवेदना होत होती. तिला दुःख होत होतं व आनंदही होत होता. तिच्या आजवर सतत विव्हळणाऱ्या अंतःकरणावर मायेची फुंकर घातली जात होती. आजवर कुणीच तिच्याशी तिच्या जीवनाबद्दल बोललं नव्हतं. मुलाच्या शब्दांनी तिच्या सुप्त विचारांना नव्याने चालना मिळाली होती. जीवनाविषयी तिला वाटणाऱ्या उबगाची व असंतोषाची भावना जवळजवळ मरून गेली होती ती पुनः उचंबळून आली. विस्मृतीच्या उदरात गडप झालेल्या तारुण्यातील भावना व आशा आकांक्षा पुनःजाग्या झाल्या. तरुणपणी ती बरोबरीच्या मैत्रिणींशी संसाराविषयी बोलायची, पण ती स्वतः व त्या मैत्रिणीसुद्धा दुःखाच्याच कर्मकहाण्या सांगत आपल्या खडतर जीवनाचे मूळ कशात आहे याबद्दल कुणीच कधी विचार केला नव्हता. पण आज तिचा पुत्र तिच्यासमोर बसून जे बोलत होता व त्याच्या डोळयांत व चेहऱ्यावर जे भाव व्यक्त होत होते ते तिच्या अंतःकरणाला जाऊन भिडत होते. आपल्या मुलाला आपल्या आईचे जीवन पूर्णपणे समजले आहे, आल्या दुःखाला त्याच्या तोंडून वाचा फुटत आहे व त्याला आपल्याविषयी सहानुभूती वाटत आहे, या जाणिवेने तिचे अंतःकरण त्याच्याविषयीच्या अभिमानाने भरून आले.

मानेच्या दुःखाची जाणीव कुणालाच नसते, हे ती जाणून होती. परंतु आज तिचा मुलगा स्त्रियांच्या कर्मकहाणीविषयी जे बोलत होता ते तिच्या परिचयाचे कटु सत्य होते, व त्याच्या त्या बोलण्याने तिच्या हृदयातील मृदु भावना चाळवल्या जाऊन तिच्या अंतःकरणाचे पाणीपाणी होत होते.

“पण मग तू काय करणार आहेस?” तिने त्याला मध्येच थांबवून विचारले.

“मी प्रथम स्वतः अभ्यास करणार, अन् मग इतरांना शिकवणार. आम्ही कामगारांनी अभ्यास करायला हवा. आपले जीवन इतके खडतर कां असते हे नीट समजून घ्यायला हवं.”

त्याच्या निळया नेत्रांतील नेहमीचा कठोरपणा व गांभीर्य जाऊन त्याजागी मार्दव व प्रेमळपणाचे नवे तेज दिसू लागले ते पाहून ती हर्षित झाली. तिच्या ओठांवर स्मिताची रेखा उमटली. तिच्या अंतरंगात दोन परस्परविरोधी भावनांचा संघर्ष सुरू होता. जीवनातील दुःखांची इतकी तीव्र व स्पष्ट जाणीव आपल्या मुलाला झाली आहे हे पाहून तिला त्याच्याविषयी एकीकडे अभिमान वाटत होता, तर त्याचबरोबर दुसरीकडे त्याचे वय अजून फार कोवळे आहे, आणि तो इतरांपेक्षा अजिवात निराळं बोलत आहे व तिच्या स्वतःसकट सर्वानाच अटळ वाटणाऱ्या जीवनातील दुःखांविरूद्ध व हालअपेष्टांविरूद्ध एकाकीच लढण्याचा त्याचा निर्धार आहे, या विचाराने ती चिंताग्रस्त होत होती.

तिला वाटणे, आपण याला म्हणावे, “बेटा! तू एकटा काय करणार?”

पण आपण असं म्हटलं तर त्याच्याविषयीचं वाटणारं कौतुक व आदर यात काहीतरी कमीपणा येईल, अचानकपणे इतकी हुशारी दाखविणाऱ्या व अपल्याला अगम्य असं काहीतरी नवंच बोलणाऱ्या आपल्या मुलाच्या मोठेपणाला त्यामुळे बाधा येईल, असा विचार येऊन तिने ओठावर आलेले ते शब्द मागे परतवले.

आपल्या आईच्या ओठांवरचे स्मित, आपलं बोलणं ऐकण्यातील तिनची एकाग्रता, तिच्या नेत्रांतील प्रेमळ भाव, हे सर्व पावेलने पाहिले आणि आपण प्रतिपादन करीत असलेले सत्य तिला पटवून देण्यात आपल्याला यश आले आहे असे त्याला वाटले. आपल्या शब्दांतील ही शक्ती प्रत्ययास येऊन त्याला युवकसुलभ अभिमान वाटला व त्यायोगे त्याचा आत्मविश्वास दुणावला. तो आवेशाने बोलत होता. मधूनमधून त्याच्या चेहऱ्यावर स्मित दिसू लागे, तर क्षणात त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरे. मधूनमधून त्याच्या शब्दांत जळजळीत चीड व्यक्त होई व त्याचे शब्द इतके कठोर असत की ते ऐकून ती भयभीत होऊन जाई व मस्तक हालवून त्याला मृदु स्वरात विचारी,

“तू म्हणतोस ते शक्य आहे, पाशा?”

“होय, शक्य आहे!” तो निर्धाराने उत्तर देई, आणि मग बहुजनसमाजाचे हित साधण्याची तळमळ असलेले काही लोक जनतेत सत्याचा प्रचार कसा करीत होते आणि त्यामुळे मानवजातीचे शत्रू त्यांना तुरूंगांत डांबून व सक्तमजुरीची शिक्षा देऊन त्यांचा कसा छळ करीत होते, याचे वर्णन करू लागे.

“असा ज्यांचा छळ होत आहे असे लोक माझ्या माहितीचे आहेत. ते खरोखर धरतीमातेचे सुपुत्र आहेत,” तो आवेगाने म्हणाला.

त्या लोकांविषयीच्या विचाराने तिला अधिकच भय वाटू लागलं व हे सारं खरंच का म्हणून पुनःविचारावंसं तिला वाटलं, पण तिला ते शब्द उच्चारण्याचा डोक्यात भरवले होते व ज्यांच्याविषयी नीट आकलन होणे तिच्या तर्कशक्तीपलीकडचे होते, त्यांच्याबद्दलच्या हकीकती ती श्वास रोखून ऐकू लागली, अखेर ती त्याला म्हणाली,

“पहाट होत आली आता, तू आता जाऊन थोडी तरी झोप घे पाहू.”

“हो, झोपतोच मी आता,” तो तिच्याकडे वाकून म्हणाला. “पण मी सांगितलं ते सारं समजलं ना तुला?”

“हो,” ती उसासा टाकून म्हणाली, पुनः तिच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले व ती एकदम मोठ्याने म्हणाली, “अशानं तुझा सत्यानाश होईल, बेटा!”

तो उठला व खोलीच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागला.

“ते काही असू दे, पण मी काय करतो, कुठे जातो, हे मी तुला सांगितलं आहे. आणि तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर तू माझ्या या कार्याच्या आड येऊ नकोस अशी तुझ्याजवळ भीक मागतो, ममी!”

“माझ्या लाडक्या बेटा!” ती हुंदके देत म्हणाली. “कदाचित् तू मला हे सारं सांगितलं नसतं तरच बरं झाले असतं रे!”

त्याने आईजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन प्रेमभराने घट्ट दाबून धरला.

त्याने ज्या सहृदयतेने ‘ममी’ हा शब्द उच्चारला होता व ज्या विलक्षण व नव्याच आवेगाने तिचा हात दाबला होता त्याने ती भारावून गेली.

ती अडखळत म्हणाली, “नाही बेटा, मी तुझ्या आड येणार नाही. पण जपून राहा बरं, जपून राहा बाळ!” कोणत्या संकटापासून त्याचा बचाव करायचा होता याची तिलाच स्पष्ट कल्पना नव्हती, म्हणून ती शोकाकुलपणे एवढंच म्हणाली, “तू दिवसेंदिवस किती सारखा वाळत चालला आहेस रे!”

तिने आपली प्रेमळ नजर त्याच्या उंच शरीरावर वरपासून खालपर्यंत फिरवली व ती म्हणाली,

“तुला योग्य वाटेल तसं कर. मी तुझ्या मार्गाच्या आड कधीच येणार नाही. पण माझं एकच सांगणं आहे. कोणाशीही बोलताना सावधगिरीने वाग. लोकांपासून जपून राहा. लोक एकमेकांना पाण्यात पहात असतात. लोक फार स्वार्थी, लोभी अन् मत्सरी असतात. दुसऱ्याच्या वाईटावर टपलेले असतात. तू एकदा त्यांच्याकडे वोटं दाखवून त्यांचे दोष काढू लागलास म्हणजे ते तुझा द्वेष करतील अन् तुझा नाश करतील!”

पावेल दरवाज्यातच उभा राहून तिचे हे व्यथित अंतःकरणातून निघणारे उद्गार ऐकत होता. तिचे बोलणे झाल्यावर तो किंचित हसून म्हणाला,

“तू म्हणतेस ते बरोबर आहे-लोक वाईट आहेत हे खरं आहे. पण सत्य नावाची काही तरी चीज आहे हे मला कळून आल्यापासून मला वाटू लागलं आहे की लोक काही तितके वाईट नाहीत. माझ्यात हा बदल कसा झाला ते मला ठाऊक नाही, पण मी अगदी लहान होतो तेव्हा मला सर्वांची भीती वाटे, नंतर मी मोठा होऊ लागलो तसा सर्वांविषयी तिरस्कार वाटू लागला. काही लोक फार क्रूर होते म्हणून, आणि इतरांचा का ते मला ठाऊक नाही, पण तिरस्कारच वाटत होता एवढं खरं! पण आता सगळंच निराळं वाटू लागलं आहे. मला आता लोकांचा राग येण्याऐवजी त्यांची दया येते. कां कुणास ठाऊक, पण लोक दुष्ट असतात त्याला सर्वस्वी ते जबाबदार असतात असं नाही हे कळून आल्यापासून मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली आहे?”

मधूनच जणू काय आपल्या अंतरंगातून येणारा आवाज ऐकण्यासाठी तो थांबला व नंतर विचारमग्न होत शांतपणे उद्गारला,” हा सर्व सत्याचं आकलन झाल्याचा परिणाम!”

त्याच्याकडे एक नजर टाकून उसासा टाकीत आई पुटपुटली,

“देवा तूच याचं रक्षण! तुझ्यात काहीतरी भयंकरच बदल घडून आला आहे बेटा!”

थोड्या वेळाने पावेलला झोप लागल्यावर आई स्वतःच्या बिछान्यावरून हळूच उठून त्याच्या बिछान्याजवळ जाऊन उभी राहिली. तो गाढ झोपी गेला होता. त्याच्या तांबुस चेहऱ्यावरील कठोर व निश्चयी भाव व्यक्त करणाऱ्या रेषा पांढन्या शुभ्र उशीवर स्पष्ट उठून दिसत होत्या. ती हात छातीवर घट्ट दाबून उभी होती. तिचे ओठ हालत होते, पण त्यातून शब्द बाहेर पडत नव्हते. तिच्या नेत्रांवाटे बाहेर पडणारे टपोरे अश्रूंचे थेंब तिच्या गालांवर ओघळत होते.

 

कामगार बिगुल, डिसेंबर २०१६