फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे?
सहावा आणि शेवटचा भाग
फासीवादाचा सामना कसा कराल ?
लेखक : अभिनव
मराठी अनुवाद : अमित शिंदे
गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या खोल आर्थिक मंदीमुळे एकीकडे लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागत असताना बहुतेक देशांमध्ये एक तर फासीवादी पक्ष सत्तेत आले आहेत किंवा बळकट तरी झाले आहेत. (जसे आपल्या देशात फासीवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व करणारा भाजप) असे पक्ष सत्तेत येताच कामगारांच्या अधिकारांवर जोरदार हल्ला चढवतात आणि कॉर्पोरेट घराण्यांचा नफा वेगाने वाढविणारी धोरणे बनवतात. जर्मनीत हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांना आपण इतिहासातील फासीवादाचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी लाखो-कोट्यावधी निर्दोष माणसांची कत्तल केली आणि आजसुद्धा तमाम फासीवादी त्यांना आपले गुरू मानतात. अशा परिस्थितीत, आर्थिक अरिष्ट किंवा मंदी म्हणजे नेमके काय असते, ती फासीवादाला कसा जन्म देते, फासीवाद कसा ओळखावा आणि त्याच्याशी लढण्याचा खरा मार्ग कोणता, यांसारख्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
एखादा फासीवादी पक्ष सत्तेत असतो तेव्हाच फासीवादाचा धोका असतो, आणि फासीवादी पक्ष सत्तेतून बाहेर पडताच फासीवादाचा धोका टळतो, असे मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचा पराभव झाला होता, तेव्हा अनेकांचा असा गैरसमज झाला होता की फासीवादाचा धोका आता टळलेला आहे. त्यांचा समज किती बालीश होता हे स्पष्ट झालेच आहे, व आता फासीवादाचा धोका सर्वांत भयंकर रूपात आपल्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे. फासीवाद म्हणजे काय? हे समजून घेतल्याशिवाय आपण काही झाले तरी त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रभावी मार्ग शोधून काढू शकत नाही. त्याच्या सर्वच सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक पैलूंची योग्य जाणीव विकसित करूनच आपण त्याला पराभूत करण्याचा एक व्यावहारिक कार्यक्रम आखू शकतो. २००९ मध्ये जे लोक म्हणत होते की फासीवादाचा धोका आता टळला आहे तेच लोक २०१४ मध्ये मोदी सत्तेवर येताच रडू-विव्हळू लागले आणि फासीवाद फासीवाद म्हणून ओरडू लागले आहेत. त्यांच्या मते भाजप सत्तेत असला, तर फासीवादाचा धोका असतो आणि जर भाजप सरकार बनवू शकला नाही तर फासीवादाचा धोका टळतो! फासीवादाची एवढी बालीश समज असल्यामुळेच हे लोक फासीवादाला पराभूत करण्याचा जो कार्यक्रम तयार करतात तोसुद्धा विसंगतींनी भरलेला असाच असतो. महागठबंधन किंवा व्यापक डाव्या आघाडीच्या बळावर फासीवाद संपवण्याची योजना बनवणाऱ्या डॉन क्विहोतेंची सध्या कमी नाही. ते फक्त निवडणूकीच्या माध्यमातून फासीवादाला पराभूत करण्याचे शेखचिल्लीचे स्वप्न पाहत आहेत. परंतु हे खरेच शक्य आहे का? निवडणूकीच्या माध्यमातून फासीवाद संपवला जाऊ शकतो का?
या प्रश्नावर गंभीरपणे विचार करणे व फासीवाद विरोधी लढ्याला योग्य दिशा देणे आज गरजेचे आहे. अशा वेळी, हा दीर्घ लेख फासीवादाची एक सुस्पष्ट समज निर्माण करण्यास वाचकांना साहाय्यक ठरेल, असे आम्हांला वाटते. हा लेख फासीवाद निर्माण होण्याच्या आर्थिक-राजकीय कारणांवर विस्ताराने चर्चा करतो, जर्मनी आणि इटलीमधील फासीवादाच्या इतिहासाचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढतो, भारतातील सर्वांत मोठी फासीवादी शक्ती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकंदर जन्मकुंडली मांडतो आणि शेवटी फासीवादाशी लढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यावहारिक कार्यक्रम सादर करतो. फासीवादाच्या निरनिराळ्या सैद्धांतिक पक्षांवरही हा लेख प्रकाश पाडतो व इतिहासात केल्या गेलेल्या सैद्धांतिक चुकांची समीक्षासुद्धा करतो.
हा निबंध सर्वप्रथम २००९ साली कामगारांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या मजदूर बिगुल या मासिक वृत्तपत्रात सहा भागांमध्ये प्रसिद्ध झाला होता. हा निबंध मुळात हिंदीत लिहिला गेला होता व या लेखाने मांडलेल्या प्रस्थापनांना गेल्या पाच वर्षांतील घटनाक्रमाने योग्य सिद्ध केले आहे.
संपादक
इटली, जर्मनी आणि भारतामध्ये फासीवादाची उत्पत्ती आणि त्याचा विकास ह्यांचे ऐतिहासिक विश्लेषण केल्यानंतर आपण फासीवादाच्या उद्याच्या सर्वसामान्य ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांचा उहापोह केला. ह्यातून एक सामान्य निष्कर्ष म्हणून हे सत्य समोर येते की भांडवली संकट क्रांतिकारी आणि प्रतिक्रियावादी अशा दोन्ही शक्यतांना जन्म देते. जर एखाद्या समाजात ह्या क्रांतिकारी शक्यतांना मूर्त रूप देण्यास सक्षम अशी अनुभवी आणि विवेकी क्रांतिकारी पार्टी अस्तित्वात नसेल, आणि फासीवादी शक्तींनी समाजात खोलवर घुसखोरी केलेली असेल तर प्रतिक्रियावादी शक्यता सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकते. जर्मनी आणि इटलीमध्ये हेच झाले होते आणि एका प्रकारे भारतामध्ये सुद्धा भगव्या फासीवादी उत्थानामागे एक मोठे कारण क्रांतिकारी नेतृत्वकारी शक्तीची अनुपस्थिती हे आहेच. ह्यावर आपण वरच विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. आपण लक्षात घेतलेली दुसरी गोष्ट, ती म्हणजे कामगार आंदोलनामध्ये सामाजिक-लोकशाहीवाद्यांकडून झालेला विश्वासघात हेही आहे, ज्यामुळे थांबवता येऊ शकत असलेले फासीवादी उत्थान थांबवणे कठीण होऊन बसले. अर्थातच हे दुसरे कारण पहिल्या कारणाशी घट्ट जोडले गेले आहे. भांडवली संकटाच्या काळात कामगार आंदोलनाचे नेतृत्व जर क्रांतिकारी विकल्प न देता संपूर्ण आंदोलनास सुधारवाद, अर्थवाद, अराजक संघाधिपत्यवाद आणि ट्रेड युनियनवादाच्या चौकटीत बंदिस्त करणार असेल तर भांडवली व्यवस्था तिच्या नैसर्गिक गतीने तिच्या सर्वात प्रतिक्रियावादी हुकुमशाहीकडेच कूच करेल. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की एक संघटीत व मजबूत, परंतु अर्थवादी, सुधारवादी आणि ट्रेड युनियनवादी कामगार आंदोलन भांडवलशाहीला तिच्या संकट काळात वेगाने फासीवादाकडे घेऊन जाते (जर्मनी आणि इटलीमधील फासीवाद्यांच्या उत्थानाबद्दल केलेले विश्लेषण बघा). तिसरी गोष्ट म्हणजे, जरी हे सत्य असले की फासीवाद वास्तवामध्ये मोठ्या भांडवलदार वर्गाची सेवा करतो, पण हे सत्य नाही की ह्याचा सामाजिक आधार फक्त मोठ्या भांडवलदार वर्गापुरताच मर्यादित असतो. मोठ्या भांडवलदार वर्गाला कामगार आंदोलनाचा दबाव मोडून काढण्यासाठी एका अशा शक्तीची गरज असते जिचा जनाधार व्यापक असेल. फासीवाद्यांच्या रुपात त्यांना ती शक्ती मिळते. भांडवली संकट मोठ्या प्रमाणात शहरी आणि ग्रामीण निम्न भांडवलदार वर्ग आणि मध्यम वर्गाला उध्वस्त करून असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये पोहचवते. दिशाहीन शहरी बेरोजगार तरुणांमध्ये आणि शहरी आणि ग्रामीण निम्न भांडवली वर्गामध्ये फासीवादी शक्ती प्रचार करतात आणि त्यांच्या डोक्यात अल्पसंख्यांक आणि संघटीत कामगार आंदोलनाच्या विरुद्ध विष पेरतात. असुरक्षितता आणि अनिश्चितता ह्यामुळे बेहाल झालेल्या निम्न-भांडवलदार वर्गामध्ये प्रतिक्रियावादाची जमीन अगोदरच अस्तित्वात असते आणि तो वर्गही फासीवाद्यांच्या प्रचाराचा बळी ठरतो. फासीवाद ग्रामीण आणि शहरी मध्यम वर्गांमध्ये, निम्न-भांडवलदार वर्ग आणि लंपट सर्वहारा वर्गाच्या जीवनातील दिशाहीनता, हताशा, लक्ष्यहीनता आणि सांस्कृतिक मागासलेपणाचा फायदा उठवत दीर्घ तयारीनिशी त्यांच्यामध्ये आधार तयार करतो. या प्रक्रियेतून फासीवादी आंदोलन उभे राहते आणि हे वर्ग त्याचा सामाजिक आधार बनतात. फासीवादी सत्तेत आल्यानंतरच ह्या वर्गांच्या लक्षात येते की फासीवाद खऱ्या अर्थाने मोठ्या भांडवलदारांचा निर्मम आणि पाशवी चाकर आहे. त्यानंतर हे वर्ग त्यापासून वेगळे होऊ लागतात. पण ही नंतर घडणारी गोष्ट आहे. प्रभावी क्रांतिकारी प्रचार आणि पक्षाच्या अभावी फासीवादाच्या उभारीची जमीन ह्याच वर्गांमध्ये तयार होते.
चौथी गोष्ट जी आपण परिणामांच्या स्वरुपात बघितली ती म्हणजे, ज्या देशांमध्ये भांडवलशाही कुठल्याही क्रांतीच्या माध्यमातून सत्तेत आलेली नाही, तिथे सबंध अर्थव्यवस्था, समाज आणि राजकारणात लोकशाही विरोधी आणि निरंकुश प्रवृत्तींचा बोलबाला असतो. इथपर्यंत की, भावी समाजवादी क्रांतीच्या मित्र वर्गांमध्येही ह्या प्रवृत्ती रुजलेल्या असतात. मूलगामी जमीन सुधारणांच्या अभावी ग्रामीण भागात युन्कर आणि श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग अस्तित्वात येतो, जो फासीवाद्यांसाठी व्यापक सामाजिक आधार म्हणून काम करतो. मध्यम शेतकऱ्यांचा एक हिस्सा सुद्धा क्रांतिकारी प्रचार, आंदोलन आणि संघटनेच्या अभावी फासीवाद्यांच्या प्रचारास बळी पडतो. भांडवली लोकशाही क्रांतीच्या अभावी शहरी मध्यम वर्गांमध्ये सुद्धा लोकशाही मुल्यांचा आणि परंपरांचा अभाव असतो. हा मध्यम वर्ग युरोपमधल्या मध्यम वर्गासारखा नाही, ज्याच्या मध्ये तार्किकता, वैज्ञानिकता आणि गतिमानता मोठ्या प्रमाणात भिनली होती आणि जो मानवतावाद आणि लोकशाही मुल्यांचा जनक होता. आर्थिकदृष्ट्या तो मध्यम वर्ग बनला आहे पण वैचारिकदृष्ट्या आणि आत्मिक पातळीवर त्याच्यात ज्याला आधुनिक मध्यमवर्गीय मुल्ये म्हणता येईल असे काहीही नाही. हेच कारण आहे की हा शहरी सुशिक्षित मध्यमवर्गसुद्धा फासीवाद्यांच्या समोर नांगी टाकतो आणि त्यांच्या प्रभावाखाली येतो. भांडवली लोकशाहीचा अभाव हीच ती गोष्ट होती जिने जर्मनी आणि इटलीला फासीवादाच्या उदयासाठी आणि विकासासाठी अनुकूल जमीन तयार करून दिली, जे फ्रांसमध्ये अशक्य होते. हा केवळ योगायोग नव्हता की फ्रांसमध्ये फासीवाद्यांना कधीही पाय रोवता आले नाहीत.
आपल्या विश्लेषणाच्या माध्यमातून पुढे आलेले हे काही मुख्य निष्कर्ष होते. आपल्याला फासीवादाविरुद्ध कसे लढायचे आहे हे ह्या निष्कर्षांच्या आधारेच आपल्याला ठरवावे लागेल. उघडच आहे की आपल्याला फासीवादावर राजकीय आणि विचारधारात्मक हल्ला चढवावाच लागेल; आपल्याला फासीवादी विचारधारेचे वर्गीय चरित्र सामान्य जनतेसमोर उघडे करावेच लागेल; आपल्याला फासीवाद्यांची खरी जन्म-कुंडली आणि त्यांचा इतिहास जनतेसमोर उघड करावाच लागेल; आपल्याला त्यांच्या भरती केंद्रांवरती हल्ला करावाच लागेल आणि जे वर्ग फासीवाद्यांचा सामाजिक आधार बनू शकतात त्यांच्यामध्ये प्रभावी आणि व्यापक राजकीय प्रचार करावा लागेल; आपल्याला कामगार आंदोलनामध्ये जबरदस्त राजकीय प्रचार करून कामगार वर्गाला त्याचे ऐतिहासिक लक्ष्य आणि उत्तरदायित्व, म्हणजेच समाजवादी क्रांती आणि कम्युनिझमकडे अग्रेसर होण्याबाबत जागरूक करावे लागेल. ह्याच प्रक्रियेमध्ये आपल्याला कामगार वर्गामध्ये उपस्थित असलेल्या वर्ग-विजातीय प्रवृत्तींच्या विरुद्ध संघर्ष करावा लागेल आणि त्याला अर्थवाद, दुरुस्तीवाद आणि सुधारवाद यांच्या चौकटीतून बाहेर काढावे लागेल. आपल्याला सामाजिक-लोकशाहीवादी आणि दुरुस्तीवादी ह्यांना संपूर्ण जनतेसमोर नग्न करण्यामध्ये कुठलीही हयगय करता येणार नाही.
आपले विश्लेषण आपल्याला सांगते की फासीवादास अप्रतिरोध्य बनवण्यात सगळ्यात मुख्य भुमिका जर कोणाची असेल तर ती आहे दुरुस्तीवादाची. भारतसुद्धा ह्यासाठी अपवाद नाही. आज कामगार चळवळी मध्ये भारतीय मजदूर संघ ही सगळ्यात मोठी ट्रेड युनियन बनली आहे,त्या पापाचे जर कोणी वाटेकरी असतील तर त्या आहेत आयटक, सिटू आणि एक्टु सारख्या अर्थवादी, सुधारवादी, ट्रेड युनियनवादी आणि दुरुस्तीवाद्यांच्या विश्वासघातकी ट्रेड युनियन्स. ह्या गोष्टी आपण स्पष्टपणे समजतो पण तरीही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसाठी काही मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे. आमच्या मते काही अनिवार्य गोष्टी आहेत ज्यावर अंमल करणे फासीवादाविरुद्धच्या आपल्या संघर्षामध्ये गरजेचे आहे.
- कामगार आघाडीवर कम्युनिस्ट क्रांतिकारकांसमोरील सर्वात महत्वाचे आव्हान आहे ते म्हणजे अर्थवादी, सुधारवादी, ट्रेड युनियनवादी, दुरुस्तीवादी आणि अराजक संघाधिपत्यवाद्यांच्या विरोधात निर्णायक, विनातडजोड आणि सघन संघर्ष. कामगार चळवळी मधील हे भरकटलेपणच कामगारांना फासीवादी दैत्यासमोर वैचारिक आणि राजनैतिक पातळीवर असुरक्षित करतात. हे विचलन कामगार आंदोलनामध्ये आणण्याचा अपराध कित्येक वर्षांपूर्वीच मार्क्सवादाची कास सोडून दुरुस्तीवादी झालेल्या संसदीय डाव्यांनी केला आहे. कामगारांमध्ये भाकपा, माकपा आणि भाकपा (माले-लिबरेशन) सारख्या पक्षांच्या विश्वासघात आणि दांभिकपणाचा भांडाफोड करणे हे कम्युनिस्ट क्रांतिकारकांचे महत्वाचे काम आहे. फासीवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी कामगारांमध्ये ज्या स्वप्नांची गरज असते त्या स्वप्नांचीच हत्या ह्या पक्षांनी केली आहे. आपल्याला ती स्वप्ने कामगारांमध्ये पुनर्जीवित करावी लागतील आणि त्यांचा प्रसार करावा लागेल. याच्या शिवाय आपण फासीवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली झुंजार एकता आणि संघटन उभे करू शकणार नाही. आपल्याला कामगारांमधील अराजकीय प्रवृत्तींचा सुद्धा जबरदस्त विरोध करावा लागेल. ह्या अराजकीय प्रवृत्तींमध्ये सर्वात प्रमुख आहेत – अराजकतावाद आणि अराजकतावादी संघाधिपत्यवाद. या प्रवृत्ती कामगारांच्या ऐतिहासिक उत्तरदायित्वाबद्दलची चेतना कामगारांमध्ये तयार करण्यामध्ये सर्वात मोठी बाधा निर्माण करतात. या प्रवृत्ती कामगार वर्गामध्ये गैर-पार्टी क्रांतीवाद आणि कामगार वर्गाच्या “स्वायत्त” संघटना उभ्या करण्याच्या विचारांना प्रोत्साहन देतात. इथे स्वायत्त होण्याचा अर्थ आहे विचारधारात्मक आणि राजकीयदृष्ट्या अनाथ! ह्या फसव्या स्वायत्ततेचा भांडाफोड केला पाहिजे आणि कामगार वर्गामध्ये क्रांतिकारी विचारधारा आणि पक्षाचे महत्व वारंवार अधोरेखित केले पाहिजे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अराजकतावादी संघाधिपत्यवादी जॉर्ज सोरेल यांचे अधिकांश अनुयायी इटली मध्ये फासीवाद्यांच्या आश्रयास गेले होते. हा केवळ एक योगायोग नव्हता.
- कामगार आघाडी व्यतिरिक्त सर्वसाधारण मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग आणि त्याच बरोबर ग्रामीण सर्वहारा, अर्ध-सर्वहारा, गरीब आणि मध्यम शेतकरी ह्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दुरुस्तीवादी संसदीय डाव्या पक्षांना नग्न करावे लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की हे ढोंगी कम्युनिस्ट आहेत आणि ह्यांनी कम्युनिस्ट विचारधारा आणि कामगार वर्गाशी विश्वासघात केला आहे. शहरी आणि ग्रामीण मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचे ह्यांचे दावे सुद्धा खोटे आहेत आणि वास्तविक पाहता ह्यांचे लक्ष्य याच भांडवली व्यवस्थेचे रक्षण करणे आहे, जिच्या मध्ये सामान्य मध्यमवर्गाला काहीही भविष्य नाही आणि त्याच्या नशिबात शेवटी उध्वस्त होऊन सर्वहारा आणि अर्ध-सर्वहाराच्या रांगेत जाणे लिहिले आहे. हे यासाठी सुद्धा महत्वाचे आहे कारण मध्यम वर्ग आणि सामान्य कष्टकरी जनतेचा एक मोठा हिस्सा दुरुस्तीवादी नेतृत्वाचे कारनामे बघून संसदीय डाव्या पक्षांचा तिरस्कार करतोच, पण त्याच बरोबर अज्ञानातून समाजवाद आणि साम्यवादाच्या आदर्शांपासून सुद्धा दूर होतो. त्यामुळेच ढोंगी मार्क्सवाद्यांना कामगार वर्गामध्येच नव्हे तर भावी समाजवादी क्रांतीच्या सर्व मित्र वर्गामध्ये नग्न करणे हे एक मुख्य आणि गरजेचे कार्य बनते.
- प्रामुख्याने कामगार वर्गामध्ये, परंतु त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण निम्न भांडवली वर्ग, अर्ध-सर्वहारा, गरीब जनता आणि मध्यम शेतकरी, भूमिहीन मजुर आणि निम्न मध्यम वर्गामध्ये क्रान्तिकारी कम्युनिस्ट पार्टीला सातत्याने राजकीय प्रचाराची कार्यवाही चालवत हे दाखवून द्यावे लागेल की भांडवलशाही एक परजीवी आणि मरणासन्न व्यवस्था आहे, जी आपली ऐतिहासिक भूमिका बजावून स्वतःची प्रासंगिकता गमावून बसली आहे. आता ती जनतेला बेरोजगारी, महागाई, गरिबी, भूकबळी, असुरक्षितता आणि अनिश्चिततेशिवाय दुसरे काहीही देऊ शकत नाही. भांडवली व्यवस्था केवळ स्वतःच्या जडत्वामुळे टिकून आहे आणि तिची खरी जागा इतिहासाची कचरापेटी हीच आहे. भांडवली समाज आणि व्यवस्थेमधील दैनंदिन आणि प्रतीकात्मक घटनांच्या माध्यमातून सातत्याने तिला नग्न करावे लागेल. कामगार, तरुण, विद्यार्थी, बुद्धिवादी आणि स्त्रियांच्या पत्र-पत्रिकांच्या माध्यमातून प्रत्येक संधी साधून भांडवलशाहीच्या ऐतिहासिक निरर्थकतेला जनतेपुढे मांडावे लागेल. भांडवली संकटाच्या काळात आणि भांडवली निवडणुकांच्या काळात ह्या व्यवस्थेचा आणि समाजाचा क्रान्तिकारी विकल्प घेऊन जोरदारपणे सामान्य कष्टकरी जनतेच्या सर्व वर्गांमध्ये जावे लागेल. हीच ती वेळ असते जेव्हा जनता तिच्या राजकीयीकरणासाठी मानसिक दुष्ट्या खुली आणि तयार असते. परंतु जेव्हा अशा संधी नसतात तेव्हा सुद्धा सातत्याने, न थकता आणि तात्कालिक यशाची अपेक्षा न करता भांडवलशाही विरोधी कम्युनिस्ट राजकीय प्रचार कधी सावकाश तर कधी खूप आक्रमकपणे चालवावयास हवा. परंतु न थांबता आणि न थकता तो चालवावा लागेल हे नक्की.
- कामगारांच्या पक्षास कामगार, विद्यार्थी-युवक, बुद्धीजीवी, स्त्रियांच्या आघाडी बरोबरच सर्व आघाड्यांवर अतार्किक, अवैज्ञानिक आणि निरंकुश विचारांच्या विरोधात प्रचार करावा लागेल ज्यांचा उपयोग फासीवादी शक्ती निम्न-भांडवली वर्ग, मध्यम वर्ग, लम्पट सर्वहारा, इत्यादी वर्गांना सोबत घेण्यासाठी करतात. उदाहरणार्थ, वंशवाद, सांप्रदायिकतावाद, प्रांतवाद, भाषावाद, जातिवाद इत्यादी. ह्या विचारधारांचा उपयोग करून फासीवादी शक्ती जनतेच्या असंतोषाला भांडवलशाही विरोधी असंतोषामध्ये रुपांतरीत होण्यापासून परावृत्त करतात; एखाद्या अल्पसंख्यांक समुदाय किंवा जातीच्या विरोधात ह्या असंतोषाचे ध्रुवीकरण करतात आणि एक निरंकुश प्रतिक्रियावादी आणि बहुसंख्यांक राजकारण करत फासीवादी सत्ता कायम करतात. ह्या विचारधारांचा विरोध आपल्याला बुर्झ्वा मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या जमिनीवर उभे राहून न करता सर्वहारा वर्गाच्या वर्ग चेतनेच्या जोरावर करावा लागेल. बुर्झ्वा मानवतावादी आवाहन आणि धर्मनिरपेक्षतेचा राग आलापून कधीही सांप्रदायिक फासीवादाचा प्रतिकार होऊ शकलेला नाही व होऊ शकणारही नाही. सर्वहारा वर्ग चेतनेच्या जमिनीवर उभे राहून केला जाणारा झुंजार आणि आक्रमक प्रचारच ह्या विचारांचा प्रभाव संपवू शकतो. आपल्याला ह्या सबंध आर्थिक, सामाजिक समस्यांचा स्त्रोत जनतेच्या समोर आणावा लागेल आणि सांप्रदायिक प्रचारा मागच्या खऱ्या हेतूंचा भांडाफोड करावा लागेल. त्याच बरोबर, असा प्रचार करणाऱ्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणावे लागेल आणि त्यांचा खरा उद्देश जनतेला सांगावा लागेल. धार्मिक कट्टरपंथी फासीवादाचा सामना ह्याच पद्धतीने केला जाऊ शकतो. वर्गनिरपेक्ष धर्मनिरपेक्षता आणि ‘मजहब नहीं सिखाता’ सारख्या पोपटपंचीचा जनतेवर कुठलाही प्रभाव पडत नाही.
- फासीवादी सत्तेमध्ये असल्यावर किंवा सत्तेमध्ये येऊन गेलेले असतील तर त्यांचा भांडाफोड करणे तुलनेमध्ये सोपे असते. भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारमुळे ती सर्व कामे झालीत जी होण्यासाठी सामान्य परिस्थितीमध्ये क्रांतिकारी शक्तीला दुप्पट वेळ लागला असता. सत्तेमध्ये येताच फासीवाद्यांचा धनलोलुप, पतित, चरित्रहीन, सत्ता-लोलुप, खुर्ची-प्रेमी, अनैतिक चेहरा समोर येऊ लागतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरून धार्मिक पावित्र्य, नैतिकता आणि शिस्त यासारखे बुरखे गळून पडू लागतात. ह्याचा पुरेपूर उपयोग क्रांतिकारी शक्तीने करून घेतला पाहिजे आणि जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत फासीवाद्यांच्या भ्रष्टाचार, नैतिकपतन आणि धनलोलुपता यांच्यावर निशाणा साधला पाहिजे आणि त्याचा भांडाफोड केला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यांच्या विश्वासार्हतेवर निर्णायक घाव घालू शकतो. हे महत्वाचे आहे की फासीवाद्यांना कुठल्याही प्रकारे जनतेमध्ये रुजण्याची संधी देता कामा नये. ह्या उद्देशपूर्तीमध्ये हा प्रचार मोठी भूमिका बजावेल.
- फासीवादाच्या सामाजिक आधारांमध्ये ज्या वर्गांना फासीवाद स्वतःच्या पेशीय शक्तीच्या रुपात भ्रष्ट करतो ते वर्ग आहेत – आर्थिक आणि क्षेत्रीय रुपात भांडवली विकासामुळे उध्वस्त झालेले वर्ग. क्रान्तिकारी पार्टीला ह्या वर्गांना संगठीत करण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीपासून करावा लागेल आणि त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच भांडवलशाही विरोधी राजकीय प्रचार गेला पाहिजे. त्यांना अगदी सुरुवाती पासूनच हे सांगावे लागेल की त्यांच्या उध्वस्त होण्यामागे, त्यांच्या जीवनामधील असुरक्षितता आणि अनिश्चिततेमागे भांडवली व्यवस्था जबाबदार आहे. ही व्यवस्था त्यांना दुसरे काही देऊ सुद्धा शकत नाही. अशा वर्गांमध्ये लंपट सर्वहारा वर्ग, असंघटीत आणि अनौपचारिक क्षेत्रांमध्ये काम करणारा सर्वहारा वर्ग, शहरी निम्न-मध्यवर्गीय बेरोजगार आणि अर्द्ध-बेरोजगार, ग्रामीण भागांमधून उध्वस्त केले गेलेले किंवा उध्वस्त होत असलेले गरीब शेतकरी प्रमुख आहेत.
- लेनिनने खूप अगोदरच सांगितले होते की फासीवाद आणि प्रतिक्रियावाद दहा पैकी नऊ वेळा जातीयवादी, वंशवादी, सांप्रदायिकतावादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बुरखा ओढून येतो. तसे तर आपण सुरुवातीपासूनच बुर्झ्वा राष्ट्रवादाच्या प्रत्येक रूपाचा यथासंभव विरोध केला पाहिजे, परंतु विशेषत: फासीवादी सांस्कृतिक अंधराष्ट्रवाद कामगार वर्गाच्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकी एक आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर सांस्कृतिक राष्ट्रवाद, प्राचीन हिंदू राष्ट्राच्या प्रत्येक गौरवशाली मिथकाचा आणि खोट्या प्रतीकाचा विरोध करावा लागेल आणि त्यांना जनतेच्या मान्यतेमध्ये खंडित करावे लागेल. ह्यात आपल्याला विशेष मदत ह्या सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांच्या इतिहासामधून मिळेल. निर्विवादपणे अंधराष्ट्रवादाचा उन्माद पसरवण्यामध्ये गुंतलेल्या ह्या संघटनांना काळा इतिहास असतो जो विश्वासघात, भ्रष्टाचार आणि पतन ह्यांनी भरलेला असतो. आपल्याला फक्त हा इतिहास जनतेपुढे मांडायचा आहे आणि त्याच्या समोर हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे “राष्ट्र” कोणते आहे ज्याबद्दल फासीवादी बोलत आहेत ते कोणत्या पद्धतीचे राष्ट्र स्थापन करू इच्छित आहेत आणि कोणाच्या हिताची सेवा करण्यासाठी आणि कोणाच्या हिताचा बळी देऊन ते हे “राष्ट्र” स्थापन करू इच्छित आहेत. “राष्ट्रवादी” नारे आणि त्या विचारधारेचे निर्मम खंडन – ह्या शिवाय आपण आपला संघर्ष पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीत. राष्ट्रचेतनेच्या जागी आपल्याला वर्गचेतना जागवावी लागेल. बुर्झ्वा राष्ट्रवादाच्या प्रत्येक प्रजातीसाठी “राष्ट्र” हे केवळ आणि केवळ बुर्झ्वा वर्ग आणि त्यांचे हितसंबंध यांपुरते मर्यादित असते. कामगार वर्गाला हाडाचे पाणी करून ह्या राष्ट्राच्या सेवेमध्ये लीन व्हावे लागते. ह्या व्यतिरिक्त काहीही विचार करणे राष्ट्र-विरोधी असते. राष्ट्रवाद हे कामगारांमध्ये खोटा गर्वबोध निर्माण करून त्यांची वर्ग चेतना कुंद करण्याचे एक प्रभावी बुर्झ्वा हत्यार आहे आणि त्याचे हे रूप जनतेसमोर उघड करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ कामगार वर्गामध्ये केले पाहिजे असे नाही, तर त्या प्रत्येक वर्गामध्ये केले गेले पाहिजे जे वर्ग भावी समाजवादी क्रांतीचे मित्र वर्ग असणार आहेत.
- सामाजिक-लोकशाहीवादी आणि दुरुस्तीवादी कामगार आंदोलनामध्ये सर्वहारा वर्ग चेतना कुंद करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करतात. जरी बौद्धिक चर्चांमध्ये ते वर्ग संघर्षाची भाषा बोलत असले तरी, प्रत्यक्ष कार्यपद्धतीमध्ये ते वर्ग संघर्षाऐवजी वर्ग सहयोगाची बीजे कामगार वर्गामध्ये रुजवण्याचे काम करतात. कामगारांना वर्ग सहयोगाचे ज्ञानामृत पाजत असताना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी काही काळापूर्वी म्हटले होते की आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की आता रशिया किंवा चीन प्रमाणे हिंसक क्रांतीचा काळ लोटला आहे; कामगार वर्गाला भांडवलदारांबरोबर सहयोगाचे धोरण राबवावे लागेल; उद्योगांच्या विकासामध्ये, भरभराटीमध्येच दोन्ही वर्गाचे हित आहे. इथे बुद्धदेव यांनी शब्दशः तीच गोष्ट विशद केली आहे जी एका जर्मन सामाजिक-लोकशाहीवादी नेत्याने म्हटली होती. कार्ल लीजन यांनी उद्योगपतींशी झालेल्या करारनाम्यावेळी हीच गोष्ट म्हटली होती. कार्ल लीजन जर्मन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षाचे एक नेता होते. कम्युनिस्ट क्रांतिकारकांनी वर्ग सहयोगाच्या अशा प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडले पाहिजे आणि दुरुस्तीवाद्यांचे खरे स्वरूप कामगारांसमोर उघड केले पाहिजे. त्यांनी कामगारांना हे समजावून सांगितले पाहिजे की श्रम आणि भांडवलामध्ये कोणतीही तडजोड शक्य नाही. ऐतिहासिकदृष्ट्या ह्या दोन्हीही अंतर्विरोधी शक्ती आहेत आणि इतिहासाने त्यांच्या समोर एक आणि एकाच विकल्प ठेवला आहे, तो आहे – संघर्ष, आणि ह्या संघर्षामध्ये शेवटी विजय हा श्रमाचाच असणार आहे.
- कम्युनिस्ट क्रांतीकारकांना भांडवली विकासाच्या चालू काळात अनौपचारिक आणि असंघटीत क्षेत्रांमधील कामगारांना संघटीत करण्यावर जास्त भर द्यायला हवा. आज भारतामधील कामगार वर्गाच्या एकूण संख्येच्या ९० टक्क्यांहून जास्त भाग असंघटीत क्षेत्रामध्ये काम करत आहे. संघटीत कामगारांची एक मोठी संख्या पांढरपेशा कामगारांमध्ये रुपांतरीत झाली आहे. हे पांढरपेशे स्वतःला कामगार म्हणवून घेण्याऐवजी कर्मचारी म्हणून घेणे पसंद करतात आणि त्यांचा एक मोठा भाग एक तर दुरुस्तीवादी ट्रेड युनियन्सचा भाग बनला आहे किंवा फासीवादी भारतीय मजदूर संघाचा, जी आता भारतामधील सर्वात मोठी ट्रेड युनियन बनली आहे. अनौपचारिक व असंघटीत क्षेत्रामध्ये फासीवादी शक्ती सातत्याने सुधार कार्यक्रम, कीर्तन-जागरण इत्यादींसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करून आपले अस्तित्व निर्माण करण्याचे काम करत आहेत. ह्या वर्गाच्या फासीवादीकरणासाठी त्यांच्यामध्ये सेवा-भारती सारखे उपक्रम चालवले जात आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना भ्रष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे जरी सत्य असले की कामगार वर्गाच्या ह्या भागाचे फासीवादीकरण करणे सर्वात अवघड आहे तरीही आपल्याला सातत्याने ह्या वर्गाला संघटीत करण्याचा प्रयत्न सर्वात आधी करावा लागेल. तसेही असंघटीत कामगार एकूण कामगारांच्या संख्येच्या बहुसंख्य असल्यामुळे आपल्याला त्यांच्या विविध संघटना बनवणे, त्यांच्या मध्ये त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरु करणे, सुधाराचे कार्यक्रम हाती घेणे आणि त्यांच्या मध्ये अदम्य आणि शक्तिशाली सामाजिक आधार बनवण्यासाठीचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. आपल्याला त्यांच्या मध्ये सातत्याने, व्यापक आणि सघन राजकीय प्रचार करावा लागेल. जुन्या कामगार वर्गासारखा नवीन कामगार वर्ग चेतानाविहीन नाही, उलट कामासाठी सातत्याने वणवण फिरलेला असल्यामुळे तो समस्त भांडवली वर्गाला आपल्या शत्रूच्या रुपात बघतो आणि संघटीत होण्याच्या शक्यतेने संपन्न आहे. दुसरी गोष्ट, ह्या वर्गाचा एक मोठा भाग हा तरुण आहे, जी की आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. कामगारांच्या ह्याच वर्गामधून आपण त्यांच्या लढवय्या संघटना बांधू शकतो आणि आपल्याला तशा संघटना बनवाव्या लागतील. स्पष्टच आहे की असंघटीत क्षेत्रामधील कामगारांमध्ये कारखाना आधारित युनियन्स बांधण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्या रहिवासी ट्रेड युनियन्स बांधाव्या लागतील. ट्रेड यूनियनच्या व्यतिरिक्त, रहिवासी भागांमध्ये झुंझार, लढवय्या संघटना उभ्या कराव्या लागतील. ज्याप्रकारे जर्मनीत कारखान्यांमध्ये कारखाना ब्रिगेड्स उभ्या केल्या होत्या त्याच धर्तीवर आपल्याला असंघटीत कामगारांच्या रहिवासी क्षेत्रांमध्ये अशा संघटना उभ्या कराव्या लागतील ज्या त्यांच्या ट्रेड युनियन्स पेक्षा वेगळ्या असतील. ट्रेड युनियन्सचे एक विशिष्ट कार्य असते आणि त्यांना त्याच कामासाठी उपयोगात आणले गेले पाहिजे. फासीवादी हल्ल्यांना निष्क्रिय करण्यासाठी कामगार वर्गाच्या वेगळ्या अशा झुंझार आणि लढवय्या संघटना असायला हव्यात.
- फासीवादाच्या कार्यपद्धतीची एक खास बाब ही आहे की आपल्या राजकीय आणि संघटनात्मक हिताच्या पूर्ततेसाठी आणि आपल्या शत्रूंचा सफाया करण्यासाठी ते दहशतीच्या राजकारणाचा उपयोग करतात. जर्मनी आणि इटली प्रमाणेच भारतीय फासीवाद्यांनी बजरंग दल, विश्व हिन्दू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या दहशत निर्माण करू शकणाऱ्या संघटना उभ्या केल्या आहेत. ह्या दहशतवादी संघटना राज्य मशिनरीच्या मर्यादेबाहेर राहून बुर्झ्वा वर्गाची हुकुमशाही लागू करण्याचे काम इमाने-इतबारे करतात. कामगार नेते, ट्रेड युनियन कार्यकर्ते, कम्युनिस्ट, उदारवादी यांच्यावर हल्ले करणे आणि त्यांच्या हत्या करणे हा ह्या संघटनांचा भारतामधील इतिहास आहे. संप मोडून काढण्यासाठी ह्या दहशतवादी संघटनांचा उपयोग फासीवाद्यांनी भारतामध्ये सुद्धा केला आहे. महाराष्ट्रामध्ये संपकरी कामगार आणि त्यांच्या नेत्यांवर शिवसेनेच्या गुंडांनी केलेले हल्ले कोण विसरू शकतो. आपल्याला फासीवादाला विचारधारा आणि राजकारण ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये पराभूत करावे लागेल, पण त्याच बरोबर आपल्याला त्यांना रस्त्यावरच्या संघार्षामध्येसुद्धा पराभूत करावे लागेल. त्यासाठी आपल्याला कामगारांच्या झुंझार आणि लढवय्या संघटना बांधाव्या लागतील. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जर्मनीमधील कम्युनिस्टांनी फासीवाद्यांशी सामना करण्यासाठी कारखाना ब्रिगेड्स उभ्या केल्या होत्या, ज्या फासीवाद्यांना रस्त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम होत्या. त्यानंतर हा प्रयोग बंद झाला आणि फासीवाद्यांनी जर्मनीमध्ये त्यांची सत्ता कायम केली. कामगार वर्गाचा एक मोठा भाग अद्यापही तेथे सामाजिक-लोकशाहीवाद्यांच्या प्रभावामध्येच होता आणि क्रांतिकारी कम्युनिस्टांची पकड पुरेशी मजबूत झालेली नव्हती. परंतु त्या छोट्याश्या प्रयोगाने हे सिद्ध केले होते की फासीवादी गुंडांचा सामना रस्त्यांवरच केला जाऊ शकतो. त्यांच्या बरोबर वाद-विवाद आणि तर्क-वितर्क करण्याची कुठलीही शक्यता नाही. सांप्रदायिक दंगली आणि फासीवादी हल्ले रोखण्यासाठी असेच झुंझार दस्ते विद्यार्थी आणि तरुणांमध्ये उभे केले गेले पाहिजेत. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असे आत्मरक्षण आणि जनरक्षणाच्या हेतूने शारीरिक प्रशिक्षण आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्याचे काम क्रांतिकारी विद्यार्थी आणि तरुणांच्या संघटनांना करावे लागेल. त्यांनी स्पोर्ट्स क्लब, जिम, मनोरंजन क्लब इत्यादी सारख्या संस्था उभ्या कराव्या लागतील, जिथे राजकीय शिक्षण-प्रशिक्षण आणि बुद्धीप्रामाण्यावाद आणि वैज्ञानिकतेचा प्रसार करण्याचे काम सुद्धा केले जाईल.
- आपण उदारवादी बुर्झ्वा राज्याबद्दल जनतेमध्ये असलेले सर्व भ्रम मोडून काढण्याचे काम केले पाहिजे. आपल्याला हे दाखवून द्यावे लागेल की कशा प्रकारे भांडवलशाहीच्या नैसर्गिक गतीमध्ये उदारवादी किंवा कल्याणकारी बुर्झ्वा राज्याच्या नशिबी संपून जाणे लिहिले आहे. भांडवलशाहीमध्ये उदारवादी किंवा कल्याणकारी बुर्झ्वा राज्याची नैसर्गिक गती पतनाच्या दिशेनेच असते. फासीवाद भांडवली अर्थव्यवस्थेच्या पतनशील अवस्थेमध्येच जन्मास येतो.जी परिस्थिती क्रांतिकारी शक्यतांना जन्म देते तीच परिस्थिती फासीवादी प्रतिक्रियावादालाही जन्म देते. आपल्याला उदारवादी भांडवलशाहीचे खरे रूप जनते समोर आणण्यासाठीची प्रत्येक संधी साधावी लागेल आणि जनतेला सांगावे लागेल की उदारवादी भांडवलशाही तिला काहीच देणार नाही; ती सातत्याने संकटाच्या दलदलीत रुतणार आहे आणि तिच्या कडून मिळणारे श्रम अधिकार, नागरी अधिकार उत्तरोत्तर संपुष्टात येतील.
- आपल्याला लोकशाही, नागरिक आणि मानवअधिकारांवरील हल्ल्यांविरुद्ध नागरिक-लोकशाहीवादी अधिकार संघटनांच्या माध्यमातून संघर्ष करावा लागेल. ही एक हरलेली लढाई असते हे आपल्याला माहितीच आहे; परंतु ह्या हरलेल्या लढाईलाच आपण आपल्या दीर्घकालीन लढाईचे हत्यार म्हणून उपयोगात आणू शकतो. आपल्याला ह्या अधिकारांवर येत असलेले गंडांतर आणि दिवसेंदिवस आकुंचन पावत असलेला लोकशाही अवकाश याविरुद्ध जनतेमध्ये सातत्याने प्रचार आणि प्रसार करावा लागेल. खास करून शिक्षित शहरी मध्यमवर्गामध्ये हा प्रचार केला गेला पाहिजे. ह्या माध्यमातून आपण समस्त भांडवली लोकशाहीचे खरे स्वरूप जनतेच्या समोर उघड करू शकतो आणि त्याचा पर्याय म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या प्रगतीशील सर्वहारा लोकशाहीचा विकल्प मांडू शकतो. त्या व्यतिरिक्त, आपल्याला श्रम अधिकारांवरील हल्ल्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष आणि प्रचार करत राज्य संस्थेला त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बाध्य केले पाहिजे. ह्या व्यतिरिक्त, आपल्याला सर्व अपूर्ण लोकशाही कार्यभार पूर्ण करून घेण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. ज्या देशांमध्ये भांडवलशाही ही कुठल्याही क्रांतीशिवाय आली आहे, अशा देशांमध्ये अपूर्ण लोकशाही कार्यभारांची एक मोठी यादीच आहे. आपल्याला ह्या अधिकारांसाठी संघर्ष करावा लागेल. ह्यामागे दोन उद्देश आहेत. एक तर हा की असा संघर्ष भांडवली राज्याच्या “ब्रीदिंग स्पेस” ला कमी करून तिच्यामध्ये घुसमट निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करतो आणि दुसरा उद्देश म्हणजे, लोकशाही कार्यभार पूर्ण होण्याबरोबरच समाजामधील विविध वर्गांमध्ये प्रतिक्रियावादाचा आधार कमकुवत होतो. हेच कारण आहे की अपूर्ण किंवा अर्धवट लागू झालेल्या जमीन सुधारणांना लागू करणे ही क्रांतिकारी कम्युनिस्टांची एक महत्वाची मागणी बनते. ही मागणी ग्रामीण भागांमधील प्रतिक्रियावादाची जमीन कमकुवत बनवते आणि वर्ग चेतना जागृत करते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बुर्झ्वा व्यवस्थेमध्ये लोकशाही अधिकारांच्या संघर्षामध्ये कामगार आंदोलनामध्ये बऱ्याच वेळा सर्वखंडनवादी अराजकतावादी दृष्टीकोन प्रभावी होतो आणि आपण दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या लोकशाही अवकाशामागील धोके ओळखू शकत नाही. अशा वेळी आपल्याला काही ठोस वर्ग संघर्ष केला जावा असे वाटते, नागरिक आणि लोकशाहीवादी अधिकारांवरील हल्ल्यांच्या विरुद्ध संघर्ष आपल्याला अप्रासंगिक वाटू लागतो. हे एक खूप भयंकर असे वैचारिक विचलन आहे. हंगेरियन कम्युनिस्ट जॉर्ज लूकाच यांनी ह्या प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांच्या “ब्लम थीसिस”मध्ये धोका दाखवून दिला आहे, त्याबद्दल सावध केले आहे आणि ह्या प्रवृत्तीला आत्मघातकी म्हटले आहे. लोकशाही अवकाश आक्रसण्याबरोबरच कामगार वर्गाला गोलबंद आणि संघटीत करण्याचे काम अधिकच कठीण होऊन बसते. लेनिनने असेच नाही म्हटलेले की बुर्झ्वा लोकशाही ही सर्वहारा वर्गासाठीची सर्वश्रेष्ठ युद्धभूमि आहे. त्यामुळे कामगार चळवळीला न केवळ श्रम अधिकारांवरील हल्ल्याच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे परंतु त्यांच्या नागरिक आणि लोकशाही अधिकारांवरील हल्ल्यांच्या विरोधातही संघर्ष केला पाहिजे. हा संघर्ष त्यांच्या नागरिक म्हणून असलेल्या ओळखीवरील शक्तिशाली दावासुद्धा असेल, जो राजकीय संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी आणि कामगार वर्गामध्ये राजकीय चेतना विकसित करण्यामध्ये महत्वाचे पाऊल ठरेल.
कामगार बिगुल, जानेवारी २०१८