गरीबी दूर करण्याचा एकच रस्ता – समाजवादी व्यवस्था

लेनिन

(सदर लेख रशियन क्रांतीकारक नेते लेनिन यांनी रशियाच्या परिस्थितीत ११५ वर्षांपूर्वी लिहीला होता. भारताच्या परिस्थितीशी त्याचे आजही प्रचंड साम्य आणि महत्व आहे.)

एका बाजूला संपत्ती व चैन वाढत आहे, आणि तरीही आपल्या श्रमाने जे लोक ही सर्व संपत्ती निर्माण करतात अशा लक्षावधी लोकांना दारिद्र्यात व दैन्यात जिणे कंठावे लागत आहे. शेतकरी उपासमारीने मरत आहेत, कामगार बेकार होऊन वणवण फिरत आहेत, आणि तरीही व्यापारी लाखो पोती धान्य रशियातून परदेशी निर्यात करीत आहेत, माल विकता येत नाही, मालाला बाजारपेठ उरलेली नाही म्हणून फॅक्टऱ्यांमधले कामकाज थंडावले आहे.

बहुतांश सर्व जमीन, त्याचप्रमाणे फॅक्टऱ्या, कारखाने, यंत्रे, इमारती, जहाजे इत्यादींवरील काही थोड्या श्रीमंत लोकांची मालकी हे प्रथमत: या सर्वाचे कारण आहे. या जमिनीवर आणि या फॅक्टऱ्यांमध्ये व कारखान्यांमध्ये लक्ष-दशलक्षावधी लोक काम करतात, पण त्यांची मालकी आहे काही सहस्त्र किंवा दशसहस्त्र श्रीमंत लोकांकडे, जमीनदारांकडे, व्यापाऱ्यांकडे आणि फॅक्टरी मालकांकडे. मजुरीसाठी, वेतनासाठी, भाकरीच्या एका तुकड्यासाठी लोक या श्रीमंत लोकांसाठी काम करतात. कामगारांच्या जेमतेम निर्वाहासाठी जे आवश्यक आहे त्यापेक्षा जे काहीअधिक उत्पादन होते ते सर्व श्रीमंतांच्या घशात जाते. हा आहे त्यांचा नफा, त्यांचे “उत्पन्न”. यंत्रांच्या उपयोगातून आणि उत्पादनाच्या पद्धतीत करण्यात येणाऱ्या सुधारणांमधून जो काही लाभ निर्माण होतो तो सारा जमीनमालकांच्या व भांडवलदारांच्या तिजोरीत जातो. हे जमीनमालक व भांडवलदार अमाप संपत्तीचा संचय करतात, आणि कामगारांच्या पदरात पडतात त्या फक्त दीड दमड्या. काम करण्यासाठी कामगारांना एकत्र आणले जाते. मोठमोठ्या जमीनजुमल्यांवर आणि मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये कधी शेकडो तर कधी कधी हजारो कामगार कामावर ठेवले जातात. कामगार ज्यावेळी अशा रीतीने एकत्र आणले जातात आणि ज्यावेळी अत्यंत विविध प्रकारची यंत्रे उपयोगात आणली जातात त्यावेळी श्रम अधिक उत्पादक बनते. यंत्रांशिवाय वेगवेगळे काम करून अनेक कामगार जेवढे उत्पादन करत असत तेवढे उत्पादन आता एकटा एक कामगार करतो. परंतु या अधिक उत्पादक श्रमाचे लाभ अवघ्या श्रमिक जनतेच्या पदरात पडत नाहीत तर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मोठमोठ्या जमीनमालकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि फॅक्टरी मालकांच्या पदरात पडतात.

आपण अनेक वेळा असे सांगितलेले ऐकतो की जमीनदार आणि व्यापारी लोकांना “काम पुरवितात”, गरिबांच्या मिळकतीची ते “सोय करतात”. उदाहरणार्थ असे सांगितले जाते की, शेजारची फॅक्टरी किंवा शेजारचा जमीनदार स्थानिक शेतकऱ्यांचे “पोषण करीत असतो”. वास्तविक कामगार स्वत:च्या श्रमाने स्वत:चे पोषण करत असतात आणि जे स्वत: काम करीत नाहीत त्यांचेही पोषण करत असतात. परंतु जमीनदाराच्या जमिनीवर, कारखान्यामध्ये किंवा रेल्वेमध्ये काम करण्यास परवानगी मिळावी म्हणून कामगार आपले सर्व उत्पादन मालकाला मोफत देऊन टाकतो, आणि त्याला स्वत:ला मात्र त्याचा जेमतेम निर्वाह चालेल इतकेच मिळते. म्हणूनच प्रत्यक्षात जमीनदार आणि व्यापारी कामगारांना नोकरी देतात हे म्हणणे चूक आहे, उलट आपल्या श्रमाचा पुष्कळसा भाग मोफत दुसऱ्याच्या आधीन करून आपल्या श्रमाने कामगार सर्वांचे पोषण करीत असतात.

पुढे. आजकालच्या सर्व देशांत लोकांच्या दारिद्रयाचे कारण हे आहे की, कामगारांकडून तयार होणारा सर्व प्रकारचा माल हा विक्रीसाठी असतो, बाजारपेठेसाठी असतो. फॅक्टरी मालक आणि कारागीर, जमीनदार आणि सुखवस्तू शेतकरी विविध माल उत्पादित करतात, गुराढोरांची पैदास करतात, शेते पेरतात व धान्य पिकवितात ते पैसे कमविण्याच्या उद्देशाने – विक्रीसाठी. सर्वत्र पैशाची सत्ता सुरू झाली आहे. मानवी श्रमाने उत्पादित झालेल्या सर्व मालाचा पैशाच्या मोबदल्यात विनिमय केला जातो. पैशाच्या जोरावर तुम्ही काहीही विकत घेऊ शकता. पैशाच्या जोरावर तुम्ही माणसालाही विकत घेऊ शकता, म्हणजेच, ज्याच्याजवळ काही नाही अशा माणसाला ज्याच्याजवळ पैसा आहे अशा माणसासाठी तुम्ही काम करायला भाग पाडू शकता. पूर्वी सत्ता चालत असे ती जमिनीची – हा प्रकार होता भूदास मालकी पद्धतीत: ज्याच्याजवळ जमीन असे त्याच्या हातात सत्ता व अधिकार असे. तथापि आज पैशाची, भांडवलाची, सत्ता सुरू झाली आहे. आज पैशाच्या जोरावर तुम्ही हवी तितकी जमीन खरेदी करू शकता. तुमच्याजवळ जमीन असली तरी पैशाशिवाय तुम्ही फारसे काही करू शकत नाही. नांगर किंवा इतर अवजारे खरेदी करण्यासाठी, गुरेढोरे विकत घेण्यासाठी, कपडे व इतर शहरी माल खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसा हवा – मग कर भरण्याची तर गोष्टच सोडा. पैशासाठी जवळ जवळ सर्व जमीनदारांनी आपला जमीनजुमला बँकांकडे गहाण ठेवला आहे. पैसा मिळविण्यासाठी सरकार जगभरातील श्रीमंत लोकांकडून व बँकवाल्यांकडून पैसा उसनवार घेते आणि या कर्जांवर वर्षाला व्याजापोटी लक्षावधी रूबल (अनुवादक : रशियाचे चलन रुबल आहे) देते.

आज पैशासाठी एकाची दुसऱ्याविरूद्ध तुंबळ हाणामारी सुरू आहे. स्वस्तात माल विकत घेण्यासाठी व तो चढ्या भावात विकण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे, एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी, विकता येईल तेवढा जास्तीत जास्त माल विकण्यासाठी, दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी, फायदेशीर बाजारपेठ किंवा फायदेशीर करार दुसऱ्यापासून लपवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पैशासाठी चाललेल्या या एकूण झोंबाझोंबीमध्ये सर्वात जास्त फटका जर कोणाला बसत असेल तर तो छोट्या माणसाला, छोट्या कारागिराला किंवा छोट्या शेतकऱ्याला. श्रीमंत व्यापारी किंवा श्रीमंत शेतकरी त्याला मागे टाकून केव्हाच पुढे निघून जातो. छोट्या माणसाकडे कोणतीही गंगाजळी नसते, तो हातापोटावर जगत असतो. एखादी अडचण आली किंवा दुरापत्ती ओढवली तर आपल्या मालकीची अगदी शेवटची वस्तूही त्याला गहाण ठेवावी लागते किंवा आपली गुरेढोरे कवडीमोलाने विकावी लागतात. एकदा का तो कुलकाच्या (अनुवादक: कुलक म्हणजे श्रीमंत शेतकरी) किंवा सावकाराच्या पंज्यात सापडला की त्या जाळ्यातून सुटका करून घेण्यात त्याला क्वचितच यश येते आणि बहुधा त्याची पार धुळधाणच होते. दर वर्षी सहस्त्र-दशसहस्त्र छोटे शेतकरी आपल्या झोपड्याना टाळे लावतात, आपल्या ताब्यातली जमीन मोफत ग्राम सामायीकीच्या हवाली करतात व वेतन-कामगार, शेतमजूर, अकुशल कामगार, कामगारवर्गीय श्रमिक म्हणून जीवनाला सुरुवात करतात. पण पैशासाठी चाललेल्या या झगड्यात श्रीमंत मात्र अधिकाधिक श्रीमंत होत जातात. बँकांमध्ये ते लक्षावधी आणि कोट्यवधी रूबलच्या राशीच्या राशी जमा करून ठेवतात आणि केवळ स्वत:च्याच पैश्यांवर नव्हे तर इतरांनी बँकांत जमा केलेल्या ठेवींवरही अफाट नफा कमवतात. छोट्या माणसाने बँकेत किंवा बचत खात्यात ठेवलेल्या शे-पन्नास किंवा शे-दोनशे रूबलवर त्याला रूबलला तीन किंवा चार कोपेक (अनुवादक: १०० कोपेक म्हणजे १ रुबल) दराने व्याज मिळते, परंतु या शे-पन्नासच्या ठेवींवर श्रीमंत माणूस मात्र लाखो रूबल कमवितो आणि आपली उलाढाल वाढविण्यासाठी या लाखो रूबलचा उपयोग करून तो रूबलला दहा किंवा वीस कोपेक नफा काढतो.

म्हणूनच सामाजिक-लोकशाहीवादी कामगार म्हणतात की लोकांच्या दारिद्र्याचे निर्मूलन करण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संपूर्ण देशातील विद्यमान व्यवस्था खालपासून वरपर्यंत आमूलाग्र बदलणे आणि त्या जागी समाजवादी व्यवस्था स्थापन करणे, दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बड्या जमीनमालकांकडून त्यांचा जमीनजुमला काढून घेणे, फॅक्टरी मालकांच्या हातातून फॅक्टऱ्या काढून घेणे, बँकवाल्यांच्या हातातून भांडवल काढून घेणे, त्यांची खाजगी मालकी रद्द करणे व ती संपूर्ण देशातील श्रमजीवी जनतेच्या हाती सोपविणे हा होय. हे घडून आल्यानंतर कामगारांच्या श्रमाचा उपयोग इतरांच्या श्रमावर जगणाऱ्या श्रीमंत माणसांच्या कारणी लागणार नाही तर स्वत: कामगार आणि ज्यांना कामगारानी निवडून दिले आहे असे लोक त्या श्रमाचा उपयोग करतील. सामायिक श्रमाची फळे आणि सर्व सुधारणांमुळे व यंत्रांमुळे निष्पन्न होणारे लाभ समग्र श्रमजीवी जनतेच्या, सर्व कामगारांच्या पदरात पडतील. अशा वेळी संपत्तीची वाढ अधिक वेगाने होईल, कारण कामगार भांडवलदारांसाठी जे काम करतात त्यापेक्षा स्वत:साठी ते अधिक चांगले काम करतील; कामाचा दिवस अधिक लहान होईल; कामगारांचे जीवनमान अधिक उंचावेल; त्यांच्या जीवनाची संपूर्ण परिस्थितीच समग्रतेने बदलून जाईल.

परंतु संपूर्ण देशातील विद्यमान व्यवस्था बदलणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी अपार परिश्रमांची, प्रखर व खंबीर लढ्याची आवश्यकता लागेल. सर्व धनिक लोक, मालमत्ता धारण करणारे सर्व दौलतदार, सर्व भांडवलदार आपल्या साऱ्या शक्तीनिशी आपल्या धनदौलतीचे, संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावतील. अधिकारी आणि सैन्यदळे धनिक वर्गाच्या हातात आहे. जे जे इतरांच्या श्रमावर जगतात त्या सर्वांविरुद्ध लढा करण्यासाठी कामगारांनी एकभावाने, एकविचाराने स्वत:ला एकवटले पाहिजे. कामगारांनी स्वत: एकजुट झाले पाहिजे व सर्व गरिबांना एकाच एका श्रमिक वर्गात, एकाच एका कामगारवर्गात एकजुटित करण्यासाठी मदत केली पाहिजे. कामगारवर्गाच्या दृष्टीने हा लढा साधा नसेल, पण त्याचे पर्यावसन कामगारांच्या विजयात झाल्याशिवाय निश्चितच रहाणार नाही; कारण भांडवलदारवर्ग किंवा जे इतरांच्या श्रमावर जगतात असे लोक हे एकूण लेाकसंख्येशी ताडून पहाता नगण्य वाटावेत इतके अल्पसंख्य आहेत, तर विशाल बहुसंख्या ही कामगारवर्गाची आहे. दौलतदारांविरुद्ध कामगार म्हणजे हजारोंविरुद्ध लाखो.