१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन
जगातील कामगारांनो एक व्हा!
मुक्तीचा मार्ग धरावा लागेल, शोषणाविरुद्ध लढावे लागेल
भांडवलशाहीशी लढून, स्वप्नांना संकल्पात उतरावे लागेल

आज दिवस घोषणेचा
आम्हीही आहोत माणुस
हवी आम्हाला चांगली दुनिया
करतो ऐलान
घृणीत गुलामी कोण्या रुपात
नाही आम्हा स्वीकार
मुक्ती आमचे अमीट स्वप्न
मुक्ती आमचे गान

साथिंनो,

जगभरात ज्या काही घटनांनी मानवी समाजमनावर एक अमीट छाप सोडली आहे व कामगार-कष्टकऱ्यांच्या जगण्यात आमूलाग्र परिवर्तने घडवून आणली आहेत, त्यापैकी एक घटना म्हणजे १ मे चा शिकागो कामगारांचा लढा. आज हा दिवस जगातील कामगारांचा जणू महोत्सव बनला आहे. याच दिवशी कामगार वर्गाच्या नायकांनी प्राणाहुती दिली, व बदल्यात कामाचे तास आठ यासह इतर श्रम-कायदे प्राप्त करून घेतले. हा मे दिवस कामगारांच्या याच झुंजार लढ्याला आणि बलिदानाला आठवण्याचा, त्यातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे.

आज जेव्हा फासीवादी मोदी सरकार श्रम-कायद्यात सुधारणेच्या नावाखाली, लढून मिळवलेल्या कायद्यांना मोडीत काढत आहे व धनदांडग्या भांडवलदारांना चरायला कुरण मोकळे सोडणारे कायदे करत आहे अशा प्रसंगी तर या संघर्षाची आठवण ताजी करणे अगत्याचे होवून बसते.

आज पासून तब्बल १३३ वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकागो मधील कामगारांनी माणसासारखं जगता याव म्हणून संघर्षाला सुरुवात केली. त्यावेळी दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत १८/२० तास गुराढोरांसारखं कारखान्यात राबावं लागत असे. असुरक्षित, अनिश्चित, अमानवीय स्थितीत पिचणारा कामगार त्या यंत्राचा जणू वाढवलेला भाग होता. या दयनीय अवस्थेविरोधात कुणी ब्र जरी काढला तरी मालक, त्यांचे गुंड वा पोलीस धाडून हल्ले करत असत. अशा वेळी शिकागोच्या धाडसी कामगारांनी जनावरांसारखं राबायला नकार देत, ‘आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन’ ही घोषणा दिली आणि शिकागोसह संपूर्ण अमेरिकेतले कामगार रस्त्यावर आले व या घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडला. भ्याड मालकांनी कामगारांच्या एका सभेवर भाडोत्री गुंडा करवी हल्ला केला, ज्यात ६ कामगारांची हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांकडून हल्ला करून मालकांनीच बॉंब फेकला ज्यात काही पोलीस व कामगारांचा मृत्यू झाला. बॉम्ब फेकण्याच्या खोट्या आरोपाखाली आठ कामगार नेत्यांवर खटला चालवण्यात आला व चार कामगार नेते, अल्बर्ट पार्सन, ऑगस्ट स्पाईस, एन्जेल्स व फिशर यांना फाशी देण्यात आली. आपल्या प्रिय नेत्यांच्या अंत्ययात्रेत जवळ जवळ ६ लाख कामगार सामील झाले होते.

शिकागोतल्या या ठिणगीने जगभरातील कामगारांना चेतवले व आठ तासाच्या कामाची मागणी जगभरातील कामगारांची मागणी बनली. अखेरीस कामगारांनी त्यांच्या संघर्षाच्या आणि बलिदानाच्या जोरावर ही मागणी कमावली आणि आठ तासाचा कामाचा दिवस करायला जगभरातील भांडवलदारांना भाग पाडले.

पण आज हेच लढून मिळवलेले श्रम-कायदे कायद्याच्या पुस्तकात सडत आहेत. त्यात पुन्हा जगभरातली सरकारे उरलेसुरलेले अधिकारही हिरावून घेत आहेत. आज भारतातील ९३ टक्के श्रमिक ठेक्याने, रोजंदारीवर व पीस रेटवर १२/१४ तास काम करताहेत, म्हणजे या श्रम कायद्यांना काहीच अर्थ राहत नाही. जे काही थोडे कायदे शिल्लक राहिलेत, त्यांनाही मोदी सरकार संपवू पाहत आहे. महाराष्ट्रात ४१००० कारखाने आहेत पैकी ३९०००  कारखान्यांमध्ये ३०० हून कमी कामगार काम करतात. केंद्रातील मोदी सरकारने एक मसुदा अधिसुचना जाहीर केली आहे ज्याच्या आधारे औद्योगिक विवाद कायदा आणि मॉडेल स्टेन्डींग ऑर्डर च्या नियमांमध्ये दुरुस्तीकरून उद्योगांमध्ये ‘फिक्स्ड टर्म नियुक्ती’ करायला मंजूरी मिळेल. सरकारच्या या कायद्यानुसार ज्या कारखान्यात कामगारांची संख्या ३०० पर्यंत असेल, त्याला मालक कधीही बंद करू शकेल, म्हणजे ३०० कामगारांना मालक जेव्हा वाटेल तेव्हा लाथ मारून कामावरून काढू शकतो. एका बाजूला कारखाने, खाणी, बांधकाम इ. क्षेत्रात कामगारांना नरकासम जगायला भाग पाडले जात आहे, तर दुसरीकडे कारखान्याच्या बाहेर, चौकातील बेरोजगारांची फौज उभी आहे. भांडवलशाहीत मनमानी वेतन देण्याचं व कामगार कपात करण्याच स्वातंत्र्य मालकवर्गाला हीच फौज प्रदान करते. आज देशातील बेरोजगारांची संख्या आकड्यात सांगायची तर काम करण्याच्या वयातील १०० पैकी फक्त ४० लोकांकडे रोजगार आहे, बाकी ६० लोक या बेकारांच्या फौजेत सामील आहेत. १५ ते २९ वर्षाच्या ३३ कोटी तरुणांपैकी ३० टक्के ना शिक्षण घेताहेत न काम करताहेत. जून २०१६ मध्ये मुंबईत हमालाच्या ५ जागेसाठी २४२४ अर्ज आले होते, पैकी ९८४ डिग्री घेतलेले होते तर रेल्वेच्या ९०,००० जागेसाठी २.८ कोटी अर्ज आले आहेत. हा आकडा भारतातल्या बेरोजगारांच्या फौजेचं भयावह वास्तव स्पष्ट करायला पुरेसा आहे. कामगार कारखान्यात अल्प मजुरीवर राबताहेत, युवक दारोदार भटकत आहेत, देश जणू ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे.

अशा वेळी मे दिवसाच्या कामगार आंदोलनातील शहीद नेता स्पाईस याच्या शब्दानां पुन्हा आठवण्याची गरज आहे, जेव्हा तो मृत्यूची शिक्षा ठोठावली जात असताना ओरडून म्हणाला होता, “तुम्हाला वाटत असेल कि आम्हाला फासावर लटकावून तुम्ही कामगार आंदोलनाला, गरीबी आणि दुरावस्थेत कणा तुटेपर्यत कष्ट करणाऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकाल, जर हीच तुमची इच्छा असेल तर खुशाल आम्हाला फाशी द्या. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही एका ठिणगीला चिरडत आहात, पण पुढे तुमच्या आजूबाजूला, मागे, पुढे, सगळीकडे ज्वाळा भडकू लागतील. ही जंगलाची आग आहे. तुम्ही कधीच ती विझवू शकणार नाही.” आज शहीद कामगारांच्या संघर्षातून प्रेरणा घेवूनच या शतकाच्या कामगार आंदोलनाची नवी सुरुवात करावी लागेल. हे सांगण्यासाठी की कामगार यंत्राचा एक भाग नाही. यंत्रे माणसाच्या सुविधेसाठी आहेत त्यांना गुलाम बनवण्यासाठी आणि भांडवलदारांच्या नफ्यासाठी नाहीत आणि हे सांगण्यासाठी सुद्धा की अजून आम्ही हरलो नाहीत, आपल्याला एकजूट होत संघर्ष करावा लागेल.

क्रांतिकारी अभिवादनासह

उठा मजुरांनो, पुढे या! लढून नवा समाज घडवा!!
जगातील कामगारांनो एक व्हा!

बिगुल मजदूर दस्‍ता
क्रांतिकारी मजदूर मोर्चा
नौजवान भारत सभा

मुंबई संपर्क: शहीद भगतसिंह पुस्तकालय, रूम २०४, हिरानंदानी बिल्डींग, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द (प), मुंबई.
फोन नं. – ९६१९०३९७९३, ९१४५३३२८४९

अहमदनगर संपर्क: शहीद भगतसिंह पुस्तकालय, सिद्धार्थनगर, गुगळे क्लिनिकच्या मागे, अहमदनगर.
फोन नं. – ९१५६३२३९७६, ७३८५२४२०११

पुणे संपर्क: ९४२२३०८१२५

ईमेल :  bigulakhbar@gmail.com फेसबुक पेज www.facebook.com/kamgarbigul
वेबसाइट : www.marathi.mazdoorbigul.net