देशाचे ‘हिरोज्’ अडकलेत कोरोनाच्या मृत्यूसापळ्यात! 350 हुन अधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू!!

पूजा

‘कोविड ड्युटी’ करत असतांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या आरोग्यकर्मचाऱ्यांबद्दल केंद्र सरकारकडे कोणत्याही स्वरूपातली अधिकृत माहिती उपलब्ध नाही! देशाचे आरोग्य मंत्री असणाऱ्या डॉ.हर्षवर्धन यांचे हे विधान आणि मोदी सरकारच्या ‘कोरोना वॉरियर्स’ साठीच्या कृतज्ञतापूर्ततेसाठी चालवलेल्या थाळी-टाळी-मेणबत्ती-टॉर्च-पुष्पवर्षावाच्या खेळाने पुनःश्च मोदींच्या दांभिकतेचे दर्शन आपल्याला घडवून आणले आहे. जगभरात स्वतःचे कौतुक करवून घेत फिरणाऱ्या प्रधानमंत्र्याच्या देशाने कोरोनामुळे जितके डॉक्टर्स आणि आरोग्यकर्मचारी गमावले तितके जगभरात इतर कुठल्याही देशाने गमावले नाहीत. 16 सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन ( IMA, आय.एम.ए.) ने जाहीर केलेल्या अहवालानुसार तब्बल 382 कोविड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्स चा मृत्यू झाला असून त्यात वय वर्ष 27 पासून ते 87 पर्यंतच्या वयोगटातील तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश व दिल्लीतील डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशभरात अनेक नामांकित डॉक्टरांचा तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु होऊनदेखील त्याची दखल घेतली गेलेली नाही, आजतागायत त्यांच्या सुरक्षेसाठी देखील आवश्यक ती पाऊले उचलली गेलेली नाहीत.

बीबीसी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार देशभरातल्या विविध ठिकाणच्या हॉस्पिटल्स मध्ये पी.पी.ई. किट्स उपलब्ध नाहीत. मुंबईत सायन हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉ.यश सबरवाल यांनी बी.बी.सी. मराठी ला सांगितले की डॉक्टर्स हे रुग्णाचा पहिला संपर्क असून देखील आम्हाला एड्स (एच.आय.व्ही.) कीट्स वापरून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. भारताकडे मुळात पुरेसे डॉक्टर्स नसतांना म्हणजे सरासरी 1,457 लोकांमागे एक डॉक्टर (झारखंड सारख्या मागासलेल्या राज्यांत तर 8,180 लोकांमागे एक डॉक्टर) अशी परिस्थिती असतांना देखील त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून मुळीच खबरदारी घेतली गेलेली नाही. डेक्कन क्रोनिकल मध्ये 7 जुलै ला प्रकाशित केलेल्या बातमी नुसार प्रचंड मोठा ‘व्हायरल लोड’ आणि रुग्णांसोबत येणाऱ्या सततच्या संपर्कामुळे आरोग्यकर्मचाऱ्यांमध्ये कोरोना मृत्यदर हा 6.1 टक्के इतका आहे! ह्या मृत्यूंमध्ये तरुण तसेच कुठल्याही प्रकारच्या आजाराची लागण नसलेले आरोग्यकर्मी देखील आहेत. ह्या बातमी अनुसार 25 नर्सेसचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून 2 नर्सेस आणि 2 डॉक्टर्स यांचा मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे गाडी चालवताना अपघाती मृत्यु झाला. लोकांमध्ये असणाऱ्या आजाराप्रती असलेली सामाजिक डागाची भावना (‘सोशल स्टिगमा’)  व त्यामुळे होणारी उपेक्षा आणि तणाव ह्या कारणाने 5 नर्सेस आणि एका डॉक्टरने आत्महत्या देखील केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. काही उदाहरंणे अशी देखील आहेत ज्यात कोरोनाबधित डॉक्टरांसोबतच त्यांच्या जीवनसाथींचा देखील कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. ‘द प्रिंट’ च्या एक अहवालानुसार 14 जुलै पर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात 2000 हुन अधिक आरोग्यकर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आरोग्यकर्मचाऱ्यांकडून पी.पी.ई. किट्सचा अभाव, विलगीकरणाच्या स्वास्थ्यपूर्ण सुविधा तसेच मानसिक आधार यांची वारंवार मागणी केली जात आहे.

8 मार्च रोजी भिलवाडा, राजस्थान येथील एका कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे 13 डॉक्टर्स व आरोग्यकर्मींना कोरोनाची लागण झाली व त्यातील तिघांचा मृत्यू झाला. 24 एप्रिल रोजी मुंबईतील गोवंडी भागात 2 हॉस्पिटल्स मध्ये काम करणाऱ्या एक 36 वर्षांच्या डॉक्टरचा कोरोना संक्रमण झाल्याने अनेक अवयव निकामी (मल्टिपल ऑर्गन फेल्यूअर) होऊन मृत्यू झाला. सुरवातीला जवळच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये बेड्स नसल्यामुळे दूर असलेल्या सायन मध्ये भरती करण्यात आल्यानन्तर ऑक्सिजन बेड अभावी सोमैय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांनतर डायलिसिस ची गरज भासल्यामुळे व सुविधा सोमैय्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा रहेजा हॉस्पिटल ला हलवण्यात आले. त्यावेळी देखील व्हेंटिलेटर ची सुविधा असलेली रुग्णवाहिनी उपलब्ध न झाल्यामुळे साध्या रुग्णवाहिनीतून रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांनतर यकृत आणि किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत स्वतः डॉक्टर असलेल्या मृत डॉक्टरच्या भावाने वेळेत उपचार व इतर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे भावाला गमावल्याचे दुःख व्यक्त केले. हिंदुस्थान टाइम्स च्या वृत्तानुसार 24 मे रोजी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या डॉक्टरचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. 17 जून रोजी कालवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एक 49 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याच महिन्यात 24 डॉक्टर्स एकट्या ठाणे जिल्ह्यात कोरोनाशी झुंज देत होते. 3 जून रोजी मुंबईतील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि नाक, कान, घसा तज्ञ डॉ. चित्तरंजन भावे यांचा देखील मृत्यू झाला. एका कोरोनाबधित रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. लोकसत्ता ने दिलेल्या बातमीनुसार त्यांना रहेजा रुग्णालयात नेले असता 10 तास बेड साठी ताटकळत वाट बघावी लागली.

मोदी सरकारने कोरोनाला हरविण्यासाठी जनतेला केलेली टाळी-थाळी-दिवे सारखी सगळी आव्हानं भाजप-भक्त जनतेने अतिउत्साहाने पूर्ण केल्या नंतरही कोरोनाचा प्रसार काही थांबला नाही. सध्या कोरोना हा मोठ्या शहरांपासून छोट्या शहरंपर्यंत व खेड्यांपर्यंत पोहचला असून तिथूनही अनेक कोरोना लोकं कोरोनाचे बळी ठरत असून त्यात डॉक्टर्स देखील आहेत. टाइम्स ऑफ इंडिया च्या 30 ऑगस्ट च्या वृत्तानुसार विदर्भातील मुर्तिझापूर कोविड केअर केंद्रात 5 महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या डॉ. विवेक फडके, वय 55, यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर अवघ्या 44 तासांत मृत्यू झाला. बुलढाणा येथील जानेफळ तालुक्यात काम करणाऱ्या डॉ. गोपाळ क्षीरसागर, वय 37, तसेच भुसावळ येथील डॉ.उमेश खानापूरकर यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. डॉ. खानापूरकर हे संपूर्ण भुसावळ जिल्ह्यात गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. 22 ऑगस्ट च्या टाइम्स ऑफ इंडियातील बातमीनुसार राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय डॉक्टरचा ड्युटी वर असतांनाच कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावात ग्रामीण रुग्णालयात प्रभारी अधिक्षकाचे काम सांभाळणाऱ्या डॉ.कल्पेश वाघ यांचे 19 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे निधन झाले. सोनगीर गाव हे धुळ्यापासून तासाभराच्या अंतरावर असून गावात सोयीसुविधांनी युक्त रुग्णालय नसल्याने उपचारासाठी धुळ्यालाच यावे लागते. सोनगीरसारख्या धुळ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक खेड्यांमधील तसेच आदिवासी भागातील रुग्ण धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. चुडामण पाटील, वय 50 वर्षे, यांच्याकडे तपासणी साठी येत असत. आरोग्य क्षेत्रात सर्वत्र माणुसकीला दूर सारून पैसे उकळण्याचा धंदा सुरु असतांना डॉ. चुडामण पाटील हे धुळ्यातील व आजूबाजूच्या खेड्यांतील गरीब जनतेचे एकमेव विश्वासस्थान होते. धुळ्यात अनेक वर्षे त्यांनी मानवतावादी दृष्टिकोन बाळगत रुग्णसेवा केली. त्यांचा देखील 13 ऑगस्ट रोजी कोरोनाने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 12 सप्टेंबर ला नागपुरातील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वरीष्ठ फिजिशियन म्हणून प्रोफेसर म्हणून काम केलेल्या व दांडे रुग्णालयात सध्या काम करत असलेल्या डॉ संजय पुरी, वय 66 तसेच सीताबर्डी येथील एका रुग्णालयात कोविड ड्युटी करत असलेल्या डॉ. नाना मेश्राम ह्या दोघांनीही कोरोनाशी लढतांना अखेरचा श्वास घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉ.सोनाली कुरहडकर एका 24 वर्षीय अवयवांच्या हालचालींवर इलाज करणाऱ्या ( ऑक्युपेशनल थेरपिस्ट) डॉक्टरचा देखील कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. कोरोना ड्युटी वर नसलेल्या परंतु रुग्णालयात इतर विभागांत काम करणाऱ्या आरोग्यकर्मींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे यावरून दिसून येते.

टाइम्स ऑफ इंडिया च्या 13 जुलै ला छापून आलेल्या बातमी नुसार 1,200 हुन अधिक डॉक्टरेतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांपर्यंतच सुरक्षा उपकरणे पुरेसे पोहचत नाहीत तर इतर कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहचणे एक अशक्य गोष्ट आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरातील स्वच्छता कर्मचारी, स्मशान भूमीत काम करणारे कामगार, सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफ सफाई करणारे कामगार ह्यांना देखील सुरक्षा उपकरणांची सर्वाधिक गरज असतांना त्यांच्याकडून सुरक्षा न पुरवताच काम करवून घेतले जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरणाची सोय नाही, अत्यंत लहान अश्या त्यांच्या घरांमध्ये विलगीकरणाचे पालन करणे कठीण ठरत आहे. अत्यन्त तणावग्रस्त वातावरणात देशभरातील आरोग्यकर्मी काम करत आहेत. त्यांना कुणालाही दिवे, मेणबत्ती, थाळी, टाळी यांची गरज नाही. त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद मानायचे तर त्यांची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी. त्यासाठी एकंदरीत देशातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे, व्यापक कोरोना चाचण्या करून कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या, लक्षणे दाखवणाऱ्या किंवा न दाखवणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण अत्यंत गरजेचे आहे. तसेच आरोग्यकर्मींच्या सुरक्षेसाठी डॉक्टर्स व रुग्णालयातील प्रत्येक स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणांची व्यवस्था करणे नितांत आवश्यक आहे, परंतु मोदी सरकारने कामगार कष्टकरी व देशातील गरीब जनतेप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मरायला रस्ता मोकळा करून दिला आहे आणि मरणाच्या रस्त्यावरून धोका पत्करत चालण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडेही कोणताही पर्याय उरलेला नाही! सरकारकडे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची कुठलीही माहिती उपलब्ध नाही यात काहीच आश्चर्य नाही कारण या फॅसिस्ट सरकारला खरोखर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनाचे काहीही देणेघेणे नाही!

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020