कविता – चेटकिणी

कविता कृष्णपल्लवी, अनुवाद: गणेश विसपुते

चेटकिणी खूप हसतात
निलाजऱ्या आणि जिद्दी असतात
अत्यंत बडबड्या असतात अन् प्रत्येक मुद्यावर
वाद घालत राहतात न थकता.
चेटकिणी आपल्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय स्वतःच घेतात.
आणि म्हणूनच अतिशय भयावह असतात.
लोकांना खातरी असते की सगळ्या स्त्रियांना
त्या बिघडवू शकतात आणि या जगाचा नरक बनवू शकतात.
बुद्धिवाद्यांप्रमाणे
चेटकिणी तडजोडी करत नाहीत,
आणि कोणत्याही शांतीप्रिय सदगृहस्थांप्रमाणे
कोणतीही किंमत देऊन शांतता विकत घेण्याचा प्रयत्नही.
काळाप्रमाणे चालणं आणि स्वतःला तसं ढाळण्याचा
कोणताही प्रयत्न त्या करत नाहीत.
चेटकिणी प्रतिवाद करतात, प्रश्न विचारत राहतात,
मतभेद दाखवतात, पलटवार करतात.
चेटकिणी दिवसाउजेडी जगातल्या सगळ्या
स्त्रियांमध्ये मिसळून गेलेल्या असतात
पण सहसा त्यांच्या सवयीनं ओळखल्या जातातच.
कित्येकदा एखाद्या पुरुषाला अचानक लक्षात येतं
की त्याची पत्नी किंवा मुलगी एक चेटकिण बनलेली आहे.
मग दुनियेतले तमाम मांत्रिक अघोरी तांत्रिक त्यांना
अनेक प्रकारे बांधून, समजावून पाहतात आणि
हारून मग तऱ्हेतऱ्हेच्या शिक्षा देतात.
सहसा त्यांना दूर देशी निर्वासित केलं जातं
पण त्या नेहमी परत येतात आणि न थांबता
पुन्हा आपली कामं करू लागतात.
त्या उद्विग्न अन् अशांत आत्मे असतात
चराचराच्या कोपऱ्या-कोपऱ्यांत भटकणारे.
त्या असतात शापित यक्षकन्या
ज्यांनी क्षमायाचना करण्याचा वा देवलोकी जाण्यासाठीच्या
परवान्यासाठी अर्ज केल्याचा कुठलाही इतिहास सापडत नाही.
चेटकिणींच्या दुःखांच्या कहाण्या विरळच दिसतात
अमावस्येच्या रात्री स्मशानातल्या नीरव एकांतात
चेटकिणी कुठल्याशा ऐतिहासिक वेदनेनं
रडतात रक्ताची आसवं गाळत
आणि कवींसाठी मिथकीय रहस्यं
निर्माण करतात
चेटकिणी तिरस्कृत वटवाघळांशी बोलतात
आणि रात्रभर भणभणत
त्यांच्यासह आकाशात सूर मारत उडत राहतात
त्या छमछम पैंजणं वाजवत
त्यांच्या उलट्या पावलांसह नाचत
दाट ओलसर रानांतल्या खाचरांतल्या
तलावापर्यंत जातात न्हायला
आणि पुन्हा नजीकच्या पिंपळावर चढून
त्याच्या सगळ्यात उंच फांदीवरून
तमाम स्त्रियांच्या उदास झोपेत आणि स्वप्नांमध्ये
दण्णदिशी उडी मारतात.

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020