कामगारांच्या स्वस्त होत चाललेल्या मरणाला जबाबदार कोण?

बबन ठोके

1 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो (एन.सी.आर.बी., NCRB) कडून ‘अपराध आणि आत्महत्यां’ संबंधित माहिती असलेला अहवाल नेहमी प्रमाणे सार्वजनिक करण्यात आला. याच रिपोर्ट मध्ये एक भाग असा देखील आहे ज्यात ‘ भारतात दुर्घटनेमुळे मृत्यू आणि आत्महत्या’ (accidental deaths and suicide’s in India) या संबंधी स्वतंत्र माहिती दिली आहे. या रिपोर्ट नुसार 2019 मध्ये 139,123 आत्महत्या झाल्याच्या नोंदी आहेत. हे आकडे 2018 च्या तुलनेत 5,000 ने जास्त आहेत.

एन.सी.आर.बी. अहवालातील आकड्यांनुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती पैकी प्रत्येकी चौथा व्यक्ती हा असंघटित क्षेत्रातील कामगार, मजूर आहे जो नाक्यावर व रोजंदारी पद्धतीने काम करत असतो. या आत्महत्येची टक्केवारी मागील पाच वर्षात 6टक्क्यांनी वाढली आहे. 2019चे आकडे हे 2018 च्या तुलनेत 3.4 टक्क्यांनी वाढलेले आहेत. यात आत्महत्या करणाऱ्या मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण हे 139,123 आत्महत्या पैकी 32,563 म्हणजे 23.4 टक्के एवढे आहे,जे फार गंभीर आहे. याशिवाय घरगुती कामात गुंतलेल्या महिलांच्या आत्महत्येचा आकडा हा 21,359 म्हणजेच 15.4 टक्के एवढा आहे. स्वयंरोजगारांच्या नावाखाली छोट्या-मोठ्या कामात गुंतलेल्यांच्या आत्महत्येचा आकडा 16,098 म्हणजेच 11.8 टक्के एवढा आहे. बेरोजगारांमध्ये हा आकडा 14,019 म्हणजेच 10.1 टक्के एवढा आहे. व्यावसायिक व वेतनभोगी असलेल्यांमध्ये हा आकडा 12,725 म्हणजेच 9.01 टक्के आहे. विद्यार्थ्यांमध्ये 10,335 म्हणजेच 7.04 टक्के एवढा आहे. एनसीआरबीच्या आकड्या नुसार हे स्पष्ट होते की समाजातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि बेरोजगार युवकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच 2019 मध्ये 18 वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या आकडा हा 9,613 एवढा आहे. 18 ते 30 वयातील तरुणांचा आकडा हा 48,774 आहे. यातून हे देखील स्पष्ट होते की, यात आत्महत्या करणाऱ्या मध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती हा तरुण वर्गातील आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आत्महत्या करण्याचा 2015 मधील आकडा पहिला तर 23,779 आहे. हा आकडा 2016 मध्ये 19 टक्क्यांनी वाढला म्हणजे या वर्षी 21,902 मजुरांनी आत्महत्या केल्या. यानंतर 2017 मध्ये 28,737 मजुरांनी आत्महत्या केल्या जी 22.01 टक्क्यांची वाढ होती. वर्ष 2018 मध्ये हा आकडा 30,124 पर्यंत गेला म्हणजेच 22.4 टक्क्यांची वाढ. हे सर्व आकडे प्रत्येक वर्षाला असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अतिशय खराब होत चाललेल्या परिस्थितीचे वास्तव दर्शवतात. दुसरं हे की सर्वसाधारणतः कमी उत्पन्न असलेल्या व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आत्महत्या व बेरोजगार असलेल्यांच्या आत्महत्या ह्या वाढत चालल्या आहेत. 2019 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 2/3 हे मजुरी करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार होते ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी होते. सरकारी म्हणण्यानुसार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या कामगाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 5 लाख च्या दरम्यान असते (जर नियमित मिळाले तर, जे कधीच मिळत नाही). 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असण्याचा अर्थ असा होतो की, प्रत्येक दिवसाला 278 रू किंवा त्यापेक्षा देखील कमी रोजंदारी असणे. कित्येक राज्यात मिळणाऱ्या मनरेगा मजुरी पेक्षा सुद्धा ही मजुरी कमी आहे. पोटही भरू शकत नाही इतक्या कमी मजुरीमध्ये जेव्हा आज कामगार वर्गाला जगावे लागत आहे, जेव्हा व्यवस्थेने जीवनच मरणप्राय करून ठेवले आहे, तेव्हा निर्माण होणारी असहायता समजणे अवघड नाही.

असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रवासी मजूर, भूमिहीन शेतमजूर हे भारतीय श्रमशक्तीच्या 80 टक्के आहेत जे लॉकडाऊन मध्ये मागील सहा-सात महिन्यापासून दोन वेळेच्या जेवणाला सुद्धा मोताद झाले आहेत. अशातच गेल्या अनेक वर्षांचे एन.सी.आर.बी. अहवाल आणि त्यातले वाढते आकडे पाहिल्यावर असे दिसून येते की सरकार साठी प्रत्येक वर्षी अपराध आणि आत्महत्या संबंधी माहिती व आकडे प्रसारित करणे हे फ़क्त एक कारकुनी काम झाले आहे. आत्महत्या कमी करण्यासाठी संरचनात्मक निर्णय घेणे, कामगार कष्टकऱ्यांच्या जीवनाला सुरक्षित बनवणे यासाठी सरकारचे कोणतेही प्राधान्य नाही. जास्तीत जास्त काही दिवस अशा बातम्यांचे मीडिया इव्हेंट तयार केले जातात काही वर्तमान पत्रात 2-4 दिवस समीक्षा आणि तज्ञांची मते छापली जातात. त्यानंतर पुढच्या वर्षी याच प्रक्रियेची पुनरावृत्ती पाहायला मिळते.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, आत्महत्या करणे हे कोणत्याच समस्येवर समाधान नाही. तरी सुद्धा तरुण आणि असंघटित क्षेत्रातील कष्ट करणाऱ्या सर्ववयीन कामगारांच्या आत्महत्या हे फार क्रूर आणि भयावह सत्य आहे. उमेदीच्या काळात तरुणांनी आपला जीवन प्रवास संपवणे याला कारण आहे की ज्या समाजात आपण जगतो तो कोणत्याही प्रकारची समाजिक सुरक्षितता, एकता, बंधुभावाची भावना, आत्मियता निर्माण करतच नाही. नफ्यासाठी चालणारी अर्थव्यवस्था सतत गरिबी निर्माण करत जाते, गरिब-श्रीमंत दरी वाढवत जाते, बहुसंख्यांक कामगार वर्गासाठी जीवनाच्या अत्यंत मुलभूत गरजांची पूर्तता करणे सुद्धा अशक्य बनवते आणि एका हताशेकडे घेऊन जाते. आत्महत्या करणाऱ्यांना समाजात जगण्यापेक्षा आपले आयुष्य संपवून घेणे हा उपाय वाटतो हे याच व्यवस्थेच्या रोगाचे द्योतक आहे. भांडवली जुलमी व्यवस्था ज्यात नफा केंद्रस्थानी असतो आणि माणसाचे महत्व एक ‘श्रमशक्ती’, कामाचे एक साधन, यंत्रासारखे दुसरे यंत्र यापेक्षा काहीही ठेवले जात नाही. रसातळाला गेलेले जीवन जगण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणे हा पर्याय ही व्यवस्था उभी करते. कामगारांच्या आत्महत्या या खरे तर व्यवस्थेने नियोजनबद्ध पद्धतीने घडवलेले खूनच आहेत. परंतु स्वत:चे जीवन संपवणे हा ना स्वत:च्या प्रश्नावर उपाय आहे ना त्याच्या खऱ्या रुपावर म्हणजे प्रश्नाच्या सामाजिक-आर्थिक रुपावर. जीवनाचे दुर्दम्य संघर्ष करत असतानाच आज संघटीत होऊन आपण आपले जीवन नाही, तर आपले जीवन नरक बनवणाऱ्या भांडवली व्यवस्थेला संपवण्यासाठी संघटीत झाले पाहिजे. जीवनापासून न पळता कामगार वर्गाने त्याला धैर्याने, संघर्षाने सामोरे जाऊन दुनिया बदलण्याच्या कामी लागले पाहिजे.

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020