मुंबईतील मानखुर्द परिसरातील अग्नितांडव नफेखोरीचा खेळ आहे!

बबन

5 फेब्रुवारी, शुक्रवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला झोपडपट्टीला लागूनच असलेल्या गोदामाला भयंकर आग लागून जवळपास पन्नास गोदाम जळून खाक झाले. बाजूलाच घनदाट लोकवस्ती असलेली झोपडपट्टी आहे पण सुदैवाने तिथे कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळेस वाचलो पण दुसऱ्यांदा झाले तर काय होईल या विचाराने चेहऱ्यावर प्रचंड भिती आणि जीव मुठीत घेऊन या ठिकाणी लोक बाहेर रस्त्यावर येऊन उभे होते. अग्निशामक दलाकडून या आगीला नियंत्रणात आणायला 8 ते 10 तासाचा वेळ लागला कारण झोपडपट्टी आणि लहान-लहान गल्ल्या असल्याकारणामुळे घटनास्थळी पोहचलेल्या 20 ते 22 अग्निशामक दलांच्या गाड्यांना आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप कठीण जात होते. अग्निशामक दलाकडून या आगीला तिसऱ्या स्तराची, म्हणजे भीषण प्रकारची, आग असल्याचे जाहीर केले आहे.

मंडाला परिसरात लागलेली आग ही दुर्घटना नसून भांडवली व्यवस्थेने घडवून आणलेले अग्नितांडव आहे कारण यामागे नफ्याचे मजबूत  गणित आहे. या परिसरातील जागा ही सरकारी आहे यावर गेल्या 25-30 वर्षापासून घनदाट लोकवस्ती बसायला सुरुवात झाली ती आज प्रचंड जोराने वाढत आहे कारण हातावर  पोट घेऊन जीवन जगणाऱ्या कष्टकऱ्यांना राहायला आणि भाड्याला परवडेल अशी जागा म्हणूनच मंडाला भाग ओळखला जातो. या ठिकाणी राहत असलेले लोक प्रामुख्याने नाका कामगार आणि नवी मुंबई सह मुंबई शहरातील उच्चभ्रू आणि कुलीन वर्गांच्या नागरी परिसरात आणि कॉर्पोरेट ऑफिस मध्ये हाउसकीपिंग चे काम करत असतात.  पण या इलाक्याची दुसरी ओळख सुद्धा आहे आणि ती म्हणजे याच जागेत सरकारी छत्रछायेत आणि स्थानिक पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्या मदतीने प्रचंड नफा कमावत असलेला माफिया!

भंगार, डम्पिंग, प्लॅस्टिकचे गोदाम, बेकायदेशीर केमिकल, ज्वलनशील पदार्थ यांचा प्रचंड साठा असल्यामुळे या आगीला वेळेत नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही पण यात मूळ प्रश्न आहे की हा सर्व साठा इथे आला कसा? असे  बेकादेशीर उद्योग कोणत्याही परवानगीशिवाय गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहेत. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांना नियमित हप्ते पोहचवून हा सर्व प्रकार सुरु आहे. वर्षभरात अशा घटना 2-3 तरी होतातच आणि तरी देखील यावर अजून सुद्धा राज्य सरकार गांभीर्याने काहीही करायला तयार नाही. घटना घडल्यावर मिडिया मधून 2 दिवसाच्या चर्चेनंतर मंडाला, मानखुर्दची बातमी वृत्तवाहिन्या आणि वर्तमान पत्रातून गायब होतात आणि त्यावर पुन्हा चर्चा तेव्हाच चालू होते जेव्हा 4-6 महिन्यानंतर पुन्हा अशीच एक आग लागत नाही.  कारण ज्या घटनेमध्ये बीएमसी, पर्यावरण विभाग, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार आणि स्थानिक माफिया आणि पोलीस प्रशासन याचे सरळ-सरळ हितसंबंध जोडल्याचे दिसून येते त्या ठिकाणी मिडियाचे काम घडलेल्या घटनेला दुर्घटना म्हणून दाखवण्यापेक्षा जास्त काही शिल्लक राहत नाही. ही जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत येते असे असतांना या ठिकाणी बेकायदेशीर कारखाने  चालवले जातात त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात केमिकल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असतात. आग लागल्या नंतर हा सर्व साठा जाळून खाक झाल तर त्यातील एक भाग तरल पदार्थ असल्यामुळे वाहून बाजूला असलेल्या नाल्याला मिळाला, जो नाला सरळ वाशी खाडीला जाऊन मिळतो. यातून जे पाणी प्रदूषण होते ते अत्यंत भयंकर आहे. असे असून देखील पर्यावरण विभाग आणि संबंधित पर्यावरण मंत्री मुंबई शहरात मधोमध राजरोसपपणे चाललेला प्रकार नजरेआड कसा आणि का करत असावेत? राज्य सरकार यावर अजून देखील कारवाई करण्यासाठी तत्परता का दाखवत नाही? ही आग लागल्या नंतर 5 किलोमीटर पर्यंत प्रचंड धुराचे साम्राज्य पसरले होते. यातून होणारे प्रदूषण हे फक्त मानखुर्द-गोवंडी लाच प्रभावित करत नाही तर संपूर्ण मुंबईला प्रदूषित करते. अशात मंडाला येथील आगीमुळे योगायोगाने  कोणतीही जीवितहानी झाली नाही पण उद्या तस काही झाले तर? परिसर पाहिल्यावर अशा अग्नितांडवाने शेकडो लोक मारल्या जाण्याची शक्यता उद्या अजिबात नाकारली जाऊ शकत नाही.

अशा प्रकारच्या घटनांमधून सत्ताधारी, सरकारी यंत्रणेची सर्व अंग, पोलिस, आणि बेकायदेशीर पणे धोकादायक व्यवसाय चालवणारे माफिया यांच्यामधील संगनमत स्पष्टपणे दिसून येते, आणि सत्तेच्या सर्व अंगांना पोसणाऱ्या माफियांची ताकदही दिसून येते.  नफ्यासाठीच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जीव मात्र जातो आहे तो गरीब कष्टकरी-कामगारांचा.

कामगार बिगुल, फेब्रुवारी 2021