8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने
क्लारा झेटकीन यांच्या व्ला.ई. लेनिन सोबतच्या चर्चेचा एक अंश
सामान्य लोकांमधील पुरुषसत्तावादी विचार आणि कष्टकरी महिलांच्या घरेलू गुलामीच्या संघर्षाबद्दल कम्युनिस्ट दृष्टिकोण

अनुवाद: अभिजित

जगातील पहिल्या समाजवादी क्रांतीचे महान नेते लेनिन यांनी जर्मन कम्युनिस्ट पक्षाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्त्री आंदोलनाच्या नेत्या क्लारा झेटकीन यांच्या सोबत ही चर्चा 1920 मध्ये मॉस्को मध्ये केली. या चर्चेमध्ये लेनिन यांनी स्त्रियांच्या घरेलू गुलामीबद्दल आणि पुरुषांंच्या पुरुषसत्तावादी मानसिकतेबद्दल तीव्र घृणा दर्शवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की कामगार वर्गामध्ये सुद्धा या गोष्टी खोलवर रूजलेल्या आहेत. कष्टकरी महिलांची घरेलू गुलामी आणि पुरुष कामगारांची “जुन्या दास स्वामींसारखी” मानसिकता यांच्याशी लढल्याशिवाय कामगार वर्गीय क्रांती थोडीही पुढे जाऊ शकत नाही. कष्टकरी महिलांच्या अर्ध्या लोकसंख्येला संघटित केल्याशिवाय कामगार वर्ग आपल्या मुक्तीच्या लढ्याला अजिबात पुढे नेऊ शकत नाही. लेनिन त्या कम्युनिस्टांवर तीव्र टीका करतात जे आतून रूढीवादी असतात आणि पुरुषसत्तावादी संस्कारांपासून मुक्त नसतात. ते स्त्री कामगारांना जागृत आणि संघटित करण्याच्या कामावर पुरेसा जोर न देण्याच्या प्रवृत्तीची सुद्धा तीव्र टीका करतात.

आजपासून 104 वर्षे अगोदर 1917 मध्ये कामगार वर्गाने रशियामध्ये समाजवादी क्रांती संपन्न केली. कामगार सत्तेने स्त्रियांना जगाच्या इतर कोणत्याही भांडवली लोकशाही गणतंत्राच्या तुलनेत अनेक पटीने अधिक समानतेची संधी आणि अधिकार दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रियतेची संधी देण्यासोबतच घरेलू गुलामीपासून सुटका मिळवून देण्यासाठी नवनवीन सामाजिक संस्था उभ्या केल्या. तरीही लेनिनचे मानणे होते की स्त्रियांच्या खऱ्या मुक्तीसाठी समाजवादाच्या संपूर्ण कालावधीत पुरुषसत्तावाद आणि भांडवली अवशेषांविरोधात सतत दीर्घ संघर्ष चालवावा लागेल.

– “…तत्वांच्या स्पष्ट समजदारीसह, आणि एका मजबूत सांघटनिक आधारावर स्त्री समुदायाला संघटित करणे कम्युनिस्ट पक्षांसाठी आणि त्यांच्या विजयासाठी एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. पण आपण स्वत:ला फसवले नाही पाहिजे. आपल्या राष्ट्रीय गटांमध्ये (म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे अंग म्हणून विविध देशांमधील कम्युनिस्ट पार्ट्यांमध्ये-अनुवादक) अजूनही या प्रश्नावर योग्य समजदारीचा अभाव आहे. जेव्हा कम्युनिस्ट नेतृत्वामध्ये कष्टकरी स्त्रियांचे जनांदोलन उभे करण्याचा मुद्दा येतो तेव्हा ते एक निष्क्रिय आणि ‘वाट बघत रहा’ सारखा दृष्टिकोण अंगिकारतात. त्यांना या गोष्टीची जाणीव होत नाही की अशा जनांदोलनांना विकसित करणे आणि नेतॄत्व देणे सर्व पार्टी कार्याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे, इतकेच नाही तर पार्टी कार्याचा अर्धा हिस्सा आहे. एका स्पष्ट दिशेने जाणाऱ्या, शक्तिशाली आणि व्यापक कम्युनिस्ट स्त्री आंदोलनाची गरज आणि मोल तर ते वेळोवेळी स्विकारतात, परंतु पार्टीच्या सततच्या चिंतेच्या आणि कार्यभाराच्या रुपाने त्याची स्विकृती होण्याऐवजी तो फक्त तोंडी जमाखर्चच असतो.”

“स्त्रियांमध्ये उद्वेलन आणि प्रचाराच्या कामांना, त्यांना जागृत आणि क्रांतिकारी बनवण्याच्या कामाला ते दुसऱ्या प्राथमिकतेवर ठेवतात आणि याला फक्त स्त्री कम्युनिस्टांचे काम समजतात. जर हे काम वेगाने आणि मजबुतीने पुढे गेले नाही तर त्यासाठी त्यांनाच (म्हणजे स्त्री कम्युनिस्टांनाच–अनुवादक) दोष देतात. हे चुकीचे आहे, तत्वत: चुकीचे आहे. एकदम चुकीचे आहे. महिलांच्या समानतेला नाकारण्यासारखीच ही बाब आहे.”

“आपल्या राष्ट्रीय गटांच्या (वेगवेगळ्या देशांमधील कम्युनिस्ट पक्ष-अनुवादक) या चुकीच्या दृष्टीकोणाच्या मूळात काय आहे? (मी इथे सोवियत रशियाबद्दल बोलत नाहीये.) अंतिम विश्लेषणामध्ये, हे स्त्रियांना आणि त्यांच्या कतृत्वाला कमी करून मोजणे आहे. हो, असंच आहे. दुर्दैवाने, आपल्या बहुतेक कॉम्रेड्स बद्दल आपण अजूनही म्हणू शकतो: ‘कम्युनिस्टाला ओरखडून पहा, एक बुद्धिविरोधी व्यक्ती समोर येईल.’ या गोष्टींची खात्री करण्यासाठी तुम्हाला संवेदनशील मुद्यांवर—जसे की स्त्रियांसंबंधात त्यांच्या मानसिकतेला—ओरखडून पहावे लागेल. याचा यापेक्षा जास्त मोठा पुरावा काय असू शकतो की एक पुरुष, शांततेने, एका महिलेला तिच्या घरेलू कामासारख्या किरकोळ, एकसुरी कामामध्ये खपताना बघत राहतो आणि तिच्या आत्म्याला संकुचित होताना, तिच्या मेंदूला कुंद होताना, तिच्या हृद्याचे ठोके मंद होताना आणि तिच्या आकांक्षांना कमजोर होताना बघत राहतो? नक्कीच मी त्या भांडवली (बुर्झ्वा) महिलांबद्दल बोलत नाहीये ज्या आपल्या सर्व घरेलू कामाच्या आणि आपल्या मुलांच्या देखभालीच्या जबाबदाऱ्या नोकरांवर सोपवतात. मी जे म्हणत आहे ते स्त्रियांच्या विशाल बहुसंख्येला लागू होते ज्यामध्ये कामगारांच्या पत्नी सुद्धा सामील आहेत आणि त्या स्त्रियाही सामील आहेत ज्या दिवसभर कारखान्यात खटतात आणि पैसे कमावतात.”

“खूपच थोडे पती, सर्वहारा वर्गाचे पतीसुद्धा यात सामील आहेत, जे विचार करतात की जर त्यांनी या ‘महिलांच्या कामात’ हातभार लावला, तर ते त्यांच्या पत्नींवरचे ओझे आणि चिंता किती कमी करू शकतात, किंवा ते त्यांना पूर्णत: भारमुक्त करू शकतात. पण नाही, हे तर ‘पतीच्या विशेषाधिकारांच्या आणि प्रतिष्ठेच्या’ विरोधात जाईल. त्याची मागणी आहे की त्याला आराम आणि निवांतपणा पाहिजे. महिलेच्या घरेलू जीवनाचा अर्थ आहे एक हजार किरकोळ कामांमध्ये आपल्या ‘स्व’चे सतत बलिदान देत राहणे. तिच्या पतीचे, तिच्या मालकाचे, परंपरागत अधिकार टिकून राहतात, आणि त्यांच्यावर लक्षही जात नाही. वस्तुगतरित्या, त्याची दासी बदला घेत असते, छुप्या रुपात सुद्धा. तिचे मागासलेपण आणि आपल्या पतीच्या क्रांतिकारी आदर्शांच्या समजदारीचा अभाव पुरूषाच्या झुंझार भावनेला आणि संघर्षाप्रती दृढनिश्चयाला मागे ओढण्याचेच काम करतात. या गोष्टी वाळवीसारख्या, अदॄश्य रूपाने, हळूहळू पण निश्चितपणे आपले काम करत राहतात. मी कामगारांचे जीवन जाणतो, आणि फक्त पुस्तकांतून नाही. स्त्रियांमध्ये आपले कम्युनिस्ट काम, आणि सामान्यत: आपले राजकीय काम, पुरुषांकडून अधिक शिक्षणाची मागणी करते. आपल्याला जुन्या दास-स्वामी दृष्टीकोणाला संपवावेच लागेल, पार्टी मध्ये आणि जनसमुदायामध्ये सुद्धा. हा आपल्या राजकीय कार्यभारांपैकी एक आहे, एक असा कार्यभार ज्याची तितकीच तातडीने गरज आहे जितकी कष्टकरी महिलांमध्ये पार्टी कार्याच्या गहन सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षणाने सज्ज स्त्री आणि पुरुष कॉम्रेड्सचा एक स्टाफ बनवण्याची.”

सोवियत रशियातील तात्कालिक स्थितींबद्दल माझ्या (क्लारा झेटकीनच्या-अनुवादक) प्रश्नांना उत्तर देताना लेनिनने म्हटले:

“सर्वहारा अधिनायत्कत्वाचे सरकार—स्पष्ट आहे की कम्युनिस्ट पार्टी आणि ट्रेड युनियन्स सोबत मिळून—स्त्री-पुरुषांच्या मागासलेल्या विचारांवर विजय मिळवण्यासाठी आणि अशाप्रकारे गैरकम्युनिस्ट मानसिकतेला संपवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. सांगायची गरज नाही की कायद्यासमोर सर्व स्त्री आणि पुरुष पूर्णत: समान आहेत. या कायदेशीर समानतेला प्रभावी बनवण्याची खरी इच्छा प्रत्येक क्षेत्रात स्पष्ट बघता येईल. आम्ही अर्थतंत्र, प्रशासन, कायदे बनवणे आणि सरकार चालवणे यामध्ये महिलांना सामील करत आहोत. त्यांच्यासाठी सर्व अभ्यासक्रम आणि शिक्षणसंस्थांचे दरवाजे खुले आहेत, जेणेकरून आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षमतांना त्या सुधारू शकतील. आम्ही सामुदायिक स्वयंपाकघर, सार्वजनिक भोजनालय, लॉंड्री आणि दुरुस्तीची दुकाने, बालवाड्या, शिशुशाळा(किंडरगार्टेन), बालगृह तसेच सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था संघटित करत आहोत. थोडक्यात, आम्ही लोक घरेलू आणि शिक्षणासंबंधी कामांना व्यक्तिगत गृहस्थीच्या कक्षेतून समाजाच्या कक्षेमध्ये आणण्याच्या आपल्या कार्यक्रमाच्या शर्तींना पूर्ण करण्यासाठी पुरेसे गंभीर आहोत. अशाप्रकारे महिला आपल्या जुन्या घरेलू गुलामीतून आणि आपल्या पतीवरच्या प्रत्येक प्रकारच्या अवलंबित्वातून मुक्त होत आहेत. त्यांना सक्षम बनवले जात आहे जेणेकरून त्या समाजातील आपल्या क्षमता आणि आवडींनुसार आपली भुमिका पूर्णत: निभावू शकतील. मुलांना घराच्या तुलनेत, विकासाच्या अजून चांगल्या संधी दिल्या जात आहेत. आमच्याकडे स्त्री कामगारांसाठी जगातील सर्वाधिक प्रगतीशील श्रम कायदे आहेत आणि संघटित कामगारांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे त्यांचे प्रशिक्षण केले जात आहे. आम्ही प्रसुतीगृह, आया आणि मुलांच्या देखभालीसाठी केंद्र, अर्भके आणि मुलांच्या सांभाळासंबंधी अभ्यासक्रम, आया आणि मुलांच्या देखभाली संदर्भात प्रदर्शने आणि अशा अनेक गोष्टी संघटित करत आहोत. आम्ही गरजू आणि बेरोजगार महिलांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहोत.”

“आम्ही चांगल्या पद्धतीने समजतो की कष्टकरी स्त्रियांच्या गरजांना पाहता हे सगळे फारच कमी आहे, आणि त्यांच्या खऱ्या मुक्तीच्या दृष्टीने तर हे एकदमच अपुरे आहे. तरीही, झारकालीन आणि भांडवली रशियामध्ये जे काही होते, त्याच्या तुलनेत हे एक पुढे टाकलेले पाऊल आहे. सोबतच, ज्या देशांमध्ये अजूनही भांडवलशाहीचा बोलबोला आहे, तेथील स्थितीच्या तुलनेत तर आम्ही चांगलेच आहोत. ही योग्य दिशेने एक चांगली सुरुवात आहे, आणि आम्ही याला सतत पुढे नेणार आहोत, आणि सगळी ऊर्जा लावून पुढे नेणार आहोत. तुम्ही, इतर देशांमधले साथी, आश्वस्त राहू शकता. कारण जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक हे स्पष्ट होत आहे की कोट्यवधी स्त्रियांना सोबत घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.”