कथा – नागडा राजा / येह शेङ ताओ Story – The Emperor’s New Clothes / Yeh Sheng Tao
एक राजा होता. त्याला नवनवीन कपडे घालण्याचा नाद होता. या राजाला एके दिवशी दोन बदमाशांनी उल्लू बनवलं. त्या बदमाशांनी पैजेवर सांगितलं की ते राजासाठी एक असा सुंदर पोषाख तयार करतील ज्याचा कुणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही. आणि हो, या पोषाखाची एक आगळी मजा असणार आहे. हा पोषाख कुठल्याही मूर्ख किंवा आपल्या पदासाठी अयोग्य व्यक्तीला दिसणार नाही. राजाने ताबडतोब आपल्यासाठी पोषाख बनविण्याचा आदेश देऊन टाकला. मग काय, लगोलग बदमाशसुद्धा माप घेण्याचा, कापण्या-शिवण्याचा अभिनय करू लागले. पोषाख शिवण्याचं काम कसं चाललंय हे बघण्यासाठी राजानं वारंवार आपल्या मंत्र्यांना पाठवलं. प्रत्येक वेळी जाऊन ते राजाला सांगत, आम्ही आमच्या डोळयांनी पोषाख बघून आलोय. खरोखर, खूपच सुंदर पोषाख तयार होतोय. खरं तर त्यांनी काही ओ की ठो पाहिलं नव्हतं. पण स्वतःला मूर्ख म्हणवून कसं घ्यायचं? अन् त्याच्याही पुढे, आपल्या पदासाठी आपण अयोग्य आहोत हे म्हणवून घेणं तर त्यांना अजिबात नको होतं.