कामगार वर्गाचा राजकीय पक्ष कसा असावा? (पुष्प दुसरे)
कामगार वर्गाच्या पक्षाचा प्रचार क्रांतिकारी असतो

सनी

कामगार वर्गाच्या पक्षाचा प्रचार क्रांतिकारी असतो. हा प्रचार कामगार वर्ग आणि सामान्य कामकरी जनतेतूनच ठरतो. म्हणजे, क्रांतिकारी प्रचारासाठी योग्य विचार, योग्य नारे, आणि योग्य धोरणे सामान्य कामकरी जनतेच्याच योग्य विचारांना संकलित करून्, त्यांच्यातून योग्य विचारांना छाटून आणि त्यांचे सामान्यीकरण करूनच सूत्रबद्ध केले जाऊ शकतात. लेनिन म्हणतात की, “कामगारांच्या सर्वसामान्य हितांच्या आणि आकांक्षांच्या आधारावर,  विशेषत: त्यांच्या सर्वसामान्य संघर्षांच्या आधारावर, कम्युनिस्ट प्रचार आणि आंदोलनाच्या कारवायांना असे चालवले जावे की त्यामुळे कामगारांमध्ये पाय रोवता येतील.” हीच गोष्ट सामान्य कामकरी जनतेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रचाराला सूद्धा लागू होते. याचा अर्थ हाच होतो की कामगर वर्गाच्या पक्षाचा प्रचार क्रांतिकारी जनदिशेच्या तत्त्वाने निर्देशित असतो. पक्षाने जनतेमध्ये विखुरलेल्या योग्य विचारांना एकत्र करून, त्यांच्यातून मूलभूत मुद्दे वेगळे करून, त्यांचे सामान्यीकरण करून एक योग्य राजकीय कार्यदिशा सूत्रबद्ध केली पाहिजे आणि तिला परत जनतेमध्ये घेऊन गेले पाहिजे. जेव्हा हे विचार नाऱ्यांच्या आणि प्रचार सामग्रीच्या रुपात जनतेपर्यंत पोहोचतात, तेव्हाच जनता त्यांना स्विकारते. जेव्हा जनता कामगार वर्गीय पक्षाच्या योग्य विचारांना आत्मसात करते, तेव्हा “हे विचार एका अशा भौतिक शक्तीत बदलतात, जे समाजाला आणि दुनियेला बदलून टाकतात.” (माओ)

जनतेची चेतना उन्नत करण्यासोबतच आंदोलनांमध्ये जनतेला नेतृत्व  देण्यासाठी कामगार पक्षाने आपल्या प्रचाराला अत्यंत गांभिर्याने तयार केले पाहिजे. विशेषत: आजच्या काळात आणि भारतासारख्या देशांमध्ये जिथे कामकरी जनतेची मोठी संख्या क्रांतिकारी चेतनेपर्यंत पोहोचलेली नाही, आपण कम्युनिस्ट प्रचाराच्या नवनवीन रूपांचा सतत शोध घेतला पाहिजे. लेनिन याबद्दल म्हणतात की “त्या भांडवली देशांमध्ये जिथे कामगार वर्गाची मोठी बहुसंख्या क्रांतिकारी चेतनेच्या स्तरावर अजून पोहोचलेली नाही, कम्युनिस्ट आंदोलनकर्त्यांनी या मागे पडलेल्या कामगारांच्या चेतनेला ध्यानात घेऊन आणि क्रांतिकारी फळीमध्ये त्यांचा प्रवेश सोपा करण्यासाठी सतत कम्युनिस्ट प्रचाराच्या नवनवीन रूपांचा शोध घेतला पाहिजे. त्या फुलणाऱ्या, अचेतन, अपूर्ण, डगमगणाऱ्या आणि अर्धभांडवली क्रांतिकारी प्रवृत्तींना समोर आणले पाहिजे ज्या कामगारांच्या डोक्यामध्ये भांडवली परंपरा आणि संकल्पनांवर हावी होण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांना आपल्या नाऱ्यांमधून कम्युनिस्ट प्रचाराचे साधन बनवले पाहिजे. सोबतच, कम्युनिस्ट प्रचाराने जनसमुदायांच्या मर्यादित व अस्पष्ट मागण्या आणि आकांक्षांपर्यंत संतुष्ट राहता कामा नये. या मागण्या आणि आकांक्षांमध्ये क्रांतिकारी भ्रूण अस्तित्वात असतात आणि ते कामगार वर्गाला कम्युनिस्ट  प्रचाराच्या प्रभावात आणण्याचे साधन असतात.”

पहिली गोष्ट ही की जनतेच्या मागण्या आणि आकांक्षांची माहिती तेव्हाच मिळू शकते जेव्हा पक्ष कार्यकर्त्यांचा जनतेमध्ये पकड (पैठ) असेल आणि ते जनतेच्या जीवनाशी आणि त्यांच्या अडचणींशी परिचित असतील. दुसरे हे की जनतेच्या अस्पष्ट आणि अपूर्ण योग्य विचारांना आणि वर्गसंघर्षाच्या व्यवहाराच्या अनुभवाला एकत्र करून कामगार पक्ष मार्क्सवादी विज्ञानाच्या व तत्वज्ञानाच्या प्रकाशात त्यांच्या सारतत्वांना निवडून, तसेच त्यांचे सामान्यीकरण करून नारे व कम्युनिस्ट प्रचार सामग्री तयार करतो. पक्षाचे नारे तसेच प्रचार सामग्री मार्क्सवादी विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या प्रकाशात आणि क्रांतिकारी जनदिशेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातूनच तयार होऊ शकतात. “जनसमुदायांपासून जनसमुदायांपर्यंत” घेऊन जाण्याचा मार्ग हाच आहे. माओ समजावतात की “जनसमुदायाच्या विचारांना (विखुरलेल्या आणि अव्यवस्थित) एकत्र करा, त्यांचा सार काढा (अध्ययनाद्वारे त्यांना केंद्रित आणि सुव्यवस्थित विचारांमध्ये बदला), नंतर जनसमुदायांमध्ये जा, या विचारांचा प्रचार करा, आणि जनसमुदायांना समजवा जेणेकरून ते त्यांना आपल्या विचारांच्या रूपात स्विकारतील, त्यांच्यावर दृढतेने कायम राहतील, आणि त्यांना कृतीत बदलवतील तसेच या प्रकारच्या कारवाई दरम्यान या विचारांच्या अचूकतेची पडताळणी करतील. यानंतर पुन्हा एकदा जनसमुदायांच्या विचारांना एकत्र करून त्यांचे सार काढा आणि नंतर पुन्हा एकदा जनसमुदायांमध्ये जा जेणेकरून ते विचार जतन होतील आणि कार्यान्वित होत राहतील. या प्रकारच्या प्रक्रियेला एका अंतहिन चक्राच्या रूपामध्ये वारंवार करत राहिल्याने ते विचार प्रत्येक वेळी पहिल्यापेक्षा जास्त योग्य, पहिल्यापेक्षा जास्त सजीव आणि पहिल्यापेक्षा जास्त समृद्ध बनत जातील. असा आहे मार्क्सवादी ज्ञान सिद्धांत.”

जनांदोलने, कामगारांची आर्थिक आणि राजकीय आंदोलने यांच्यामध्ये कामगार पक्षाची प्रचार सामग्री तसेच ठोस नारे जिवंत शक्ती बनतात. पण इथवर पोहोचून ही प्रक्रिया थांबत नाही तर कामगार पक्ष पुन्हा जनतेमधील विचारांना एकत्रित करतो, त्यांचे सारभूत तत्व वेगळे करतो, आणि सामान्यीकरण, प्रचार सामग्री आणि ठोस नारे जनतेसमोर ठेवतो. ही प्रक्रिया अनंतकाळ पुनरावृत्त होत राहते.

माओंच्या “ठोकळेबाज पार्टी-लेखनाचा विरोध करा” या लेखामध्ये कम्युनिस्ट प्रचार कसा असावा याला लेनिनचा दाखला देत स्पष्ट केले आहे. लेनिनने 1894 मध्ये बाबुश्किनच्या मदतीने सेंट पीटर्सबर्ग मधील संपकरी कामगारांना उद्देशून एक पत्रक लिहिले. लेनिन नेहमीच ठोस पडताळणी आणि अभ्यासाच्या आधारावरच प्रचार सामग्री तयार करत असत. माओंनी दिमित्रोव आणि लेनिनच्या दाखल्याने सांगितले की प्रचाराची शैली स्पष्ट, सरळ आणि जनतेच्या भाषेत असली पाहिजे. त्यांनी बोल्शेविक पार्टीच्या इतिहासाच्या पुस्तिकेतील खालील भागाला उधृत केले आहे:

“लेनिनच्या मार्गदर्शनामध्ये ‘कामगार वर्गाच्या मुक्ती संघर्षाच्या सेंट पीटर्सबर्ग समिती’ ने सर्वात अगोदर रशियातील समाजवादाला कामगार आंदोलनासोबत जोडण्याची सुरूवात केली. कोणत्याही कारखान्यात संपाची सुरूवात होताच ही ‘संघर्ष समिती’, जिच्याकडे तिच्या गटांच्या सदस्यांमार्फत कारखान्यांच्या स्थितीबद्दल व्यवस्थित माहिती असायची, लगेचच पत्रके घेऊन आणि समाजवादी नारे घेऊन कामगारांचे समर्थन करत असे. या पत्रकांमध्ये उद्योगपतींद्वारे कामगारांच्या दडपशाहीचा पर्दाफाश केला जाई, कामगारांना हे सांगितले जाई की त्यांनी आपल्या हितांसाठी कशाप्रकारे संघर्ष केला पाहिजे, आणि त्यामध्ये कामगारांच्या मागण्या प्रस्तुत केल्या जात असत. ही पत्रके भांडवलशाहीच्या दुखऱ्या व्रणांबद्दल, कामगारांच्या गरिबीबद्दल, 12-14 तास कराव्या लागणाऱ्या कंबरतोड मेहनतीबद्दल आणि श्रमदिनाबद्दल, अधिकारांच्या पूर्ण अभावाबद्दल स्पष्टपणे सत्य प्रस्तुत करत असत. त्यांच्यामध्ये योग्य राजकीय मागण्यांना सुद्धा प्रस्तुत केले जाई.”

महत्त्वाची गोष्ट ही की कामगार पक्षाचा प्रचार क्रांतिकारी असण्याचा अर्थच हा आहे की हा प्रचार फक्त कामगारांच्या आर्थिक मागण्यांपर्यंत मर्यादित राहू शकत नाही. आर्थिक मागण्यांचा आशय फक्त व्यावसायिक वा ट्रेड युनियन मागण्यांशी जोडलेला आहे. या मुद्यावर रशियात लेनिनचा अर्थवाद्यांशी वाद झाला. अर्थवाद्यांचे म्हणणे होते की आर्थिक मागण्यांवर संघर्षाच्या माध्यमातूनच कामकरी जनतेला राजकीय संघर्षात ओढले जाऊ शकते आणि आर्थिक मागण्यांचा संघर्षच पुढे जाऊन स्वत: राजकीय संघर्ष बनतो. लेनिनने याला प्रतिक्रियावादी आणि हानिकारक विचार म्हटले. लेनिनने सांगितले की हा मध्यमवर्गीय बुद्धीजिवींचा पूर्वाग्रह आहे की कामगार फक्त त्यांच्या वेतन-भत्त्यांच्या मागण्यांवरच विचार करू शकतात आणि लढू शकतात आणि त्यांना शुद्ध राजकीय मुद्यांमध्ये कोणताही रस नसतो. लेनिनने या वादाच्या माध्यमातून ट्रेडयुनियनवादी प्रचार आणि क्रांतिकारी प्रचारामधील फरकही स्पष्ट केला. कामगार वर्गाच्या प्रचाराचा सार काय असावा हे ह्या वादामध्ये लेनिनच्या भुमिकेवरून स्पष्ट होते.

1861 मध्ये रशियामध्ये भूदास प्रथा समाप्त झाली होती आणि शेतीमध्ये प्रशियन मार्गाने क्रमिक भांडवली विकास झाला. फॅक्टऱ्या-कारखान्यांमध्ये 1880 पासून तेजी आली. नवनव्या विकसित झालेल्या उद्योगांमध्ये कामगारांचे जीवन नरकासमान होते. या नरकासमान जीवनाच्या विरोधातच रशियात 1890 पासून फॅक्टऱ्या कारखान्यांमध्ये संपांचे सत्र सुरू झाले. संपांची तीव्रता नव्या सहस्त्रकात अजूनच वाढली आणि तिच्यामध्ये क्रांतिकारकांचा हस्तक्षेपही वाढत गेला. कामगार वर्गाचे आंदोलन 1905 च्या पहिल्या रशियन लोकशाही क्रांतीची एक प्रमुख शक्ती बनले. कामगार फक्त आपल्या आर्थिक मागण्यांसाठीच संघर्ष करत नव्हते, तर ते झारकालीन रशियात सरळ राजकीय लोकशाहीच्या मागणीसाठी सुद्धा लढत होते. संप आंदोलनात कम्युनिस्टांनी हिरीरीने नेतृत्व दिले. यामध्ये लेनिनची प्रमुख भुमिका होती. लेनिनने 1894-95  मध्ये सेंट पीटर्सबर्गच्या कामगारांचा संप संघटीत केला आणि सोबतच या आंदोलनांमध्ये सघन क्रांतिकारी प्रचारही केला. कारखान्यांमधील नरकासमान स्थितीचा भंडाफोड करण्यासाठी कामगार मोठ्या संख्येने छपाई करू इच्छित होते. लेनिन सांगतात की अशा “पत्रकां”मध्ये बहुतेक कारखान्यांच्या स्थितीचा भंडाफोड लिहीला जाई, आणि लगेचच कामगारांना अशाप्रकारचा भंडाफोड करण्याचा नाद लागला. जसे कामगारांच्या लक्षात आले की कम्युनिस्ट गट त्यांना एक नव्या पद्धतीचे पत्रके देऊ पाहतात आणि देऊ शकतात, ज्यामध्ये गरिबीने ग्रस्त त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कंबरतोड मेहनतीबद्दल, अधिकारांच्या अभावाबद्द्ल पूर्ण सत्य लिहिलेले असेल, तसे कारखान्यांमधून आणि फॅक्टऱ्यांमधून पत्रांची रांगच लागली.  या ‘भंडाफोड करणाऱ्या साहित्या’मधून ज्यांच्या स्थितीचा भंडाफोड केला गेला आहे त्या विशेष कारखान्यांमध्येच नाही तर जिथे कुठे बातमी पोहोचत असे त्या सर्व कारखान्यांमध्ये खळबळ माजत असे. वेगवेगळ्या उद्योगांमधील तसेच वेगवेगळ्या पेशांमधील कामगारांच्या गरजा आणि संकटे ढोबळमानाने एकसारखीच आहेत, त्यामुळे ‘कामगारांच्या जीवनाबद्दलचे सत्य’ सर्व कामगारांना आंदोलित करत असे.” (लेनिन, काय केले पाहिजे?)

परंतु एकंदरित पाहता या संघर्षांमध्ये कामगार आपल्या श्रमशक्तीरूपी मालाला जास्तीत जास्त चांगल्या भावाला विकण्याकरिता “खरेदीदाराशी झगडायला शिकत होते.” फॅक्टऱ्यांच्या स्थितीचा भंडाफोड करण्यापासून पुढे जाऊन त्याला सर्वांगीण राजकीय भंडाफोडीपर्यंत पोहोचवणे लेनिनच्या मते कामगार पक्षाचे महत्त्वाचे काम होते. लेनिन स्पष्ट सांगतात की कामगार वर्गाचा पक्ष फक्त श्रमशक्तीच्या विक्रीची चांगली किंमत मिळवण्यासाठीच नाही तर त्या सामाजिक व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी कामगार वर्गाच्या संघर्षाचे नेतृत्व करतो “जी संपत्तीहीन लोकांना धनिकांच्या हाती विकले जाण्याची सक्ती करते”.   लेनिन स्पष्ट करतात की कामगार वर्गाचा पक्ष फक्त मालकांच्या संदर्भातच कामगारांचे अग्रदल नसते, तर वास्तवात लेनिनच्या शब्दांंमध्ये “समाजातील प्रत्येक वर्गासोबतच तसेच एका संघटित राजकीय शक्तीच्या रूपाने राज्यसत्तेशी संबंधित प्रत्येक मामल्यात” अग्रदल असते. कामगार वर्ग एका राजकीय वर्गाच्या रूपाने पक्षामार्फतच संघटित होऊ शकतो. कामगार वर्ग एका राजकीय वर्गाच्या रूपात संघटित होण्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ आहे कामगार वर्गाच्या उन्नत तत्वांना एका राजकीय प्रकल्पाच्या संकल्पनेने सज्ज करणे; दुसऱ्या शब्दांमध्ये राजकीय वर्ग तो वर्ग असतो, ज्याचे लक्ष्य भांडवली राज्यसत्तेचा ध्वंस आणि आपल्या राज्यसत्तेची स्थापना करणे असते. भांडवलदार वर्गासाठी सुद्धा ही भुमिका त्यांचे अग्रदल निभावतो आणि कामगार वर्गासाठी  सुद्धा ही भुमिका त्यांचे अग्रणी तत्वच निभावतात. या अग्रणी तत्वांना मार्क्सवादी तत्वज्ञान आणि विज्ञानाने सज्ज करणाऱ्या आणि क्रांतिकारी जनदिशा लागू करणाऱ्या पक्षाच्या नेतृत्वातच गोलबंद आणि संघटित केले जाऊ शकते. त्याशिवाय कामगार वर्ग फक्त जनसमुदायांचे अंग बनून राहतो, त्यांना नेतृत्व देणारी अग्रणी शक्ती म्हणजे एका राजकीय वर्गाच्या, कामगार वर्गाच्या रूपात बदलू शकत नाही.

कामगार पक्षाच्या प्रचारात राजकीय शिक्षण कसे असावे, याचे ठोस उत्तर देताना लेनिन म्हणतात की:

कम्युनिस्टांचा आदर्श “आदर्श ट्रेड युनियनचा सचिव नाही, तर एक असा जननायक असला पाहिजे ज्यामध्ये अत्याचार आणि दडपशाहीच्या प्रत्येक उदाहरणाने, मग ते कोणत्याही जागी झालेले असो आणि कोणत्याही वर्गाशी किंवा स्तराशी त्याचा संबंध असो, विचलित होण्याची क्षमता असेल, ज्याच्यामध्ये त्या सर्व उदाहरणांचे सामान्यीकरण करून पोलिसांची हिंसा तसेच भांडवली शोषणाचे एक अविभाज्य चित्र बनवण्याची क्षमता असेल; ज्याच्यामध्ये प्रत्येक घटनेचा, मग ती कितीही छोटी का असेना, फायदा घेऊन आपल्या समाजवादी विश्वासांना तसेच आपल्या लोकशाही मागण्यांना सर्व लोकांना समजावू शकण्याची आणि सर्व लोकांना कामगार वर्गाच्या मुक्ती संग्रामाचे विश्व-ऐतिहासिक महत्व समजावू शकण्याची क्षमता असेल.” कामगार वर्गाच्या पक्षाने कामगार वर्गाला सर्व जनतेच्या जीवनाचे आणि व्यवहाराचे भौतिकवादी मूल्यांकन करायला शिकवले पाहिजे. लेनिनच्याच मते, “कामगार वर्गाची चेतना तोपर्यंत खरी राजकीय चेतना बनू शकत नाही, जोपर्यंत कामगारांना अत्याचार, दडपशाही, हिंसा आणि अनाचाराच्या सर्वच मामल्यांचे उत्तर देणे, मग भले त्यांचा संबंध कोणत्याही वर्गाशी असो,  शिकवले जात नाही. आणि त्यांनी कम्युनिस्ट दृष्टीकोनातून उत्तर दिले पाहिजे, ना की इतर एखाद्या दृष्टिकोनातून. सामान्य कामगारांची चेतना तोपर्यंत खरी वर्गचेतना बनू शकत नाही जोपर्यंत कामगार ठोस आणि तत्कालिक राजकीय तथ्य आणि घटनांमधून दुसऱ्या प्रत्येक सामाजिक वर्गाचे त्याच्या बौद्धिक, नैतिक आणि राजकीय जीवनाच्या सर्व अभिव्यक्तींमध्ये अवलोकन करणे शिकत नाहीत, जोपर्यंत कामगार जनसमुदायांच्या सर्व वर्गांचे, स्तरांचे आणि समुहांचे जीवन तसेच कामांच्या सर्व बाजूंचे भौतिकवादी विश्लेषण आणि भौतिकवादी मूल्यांकन व्यवहारात करणे शिकत नाहीत.” फक्त याच माध्यमातून कामगार वर्ग विद्यार्थी, शेतकरी, निम्न-भांडवलदार आणि इतर स्तरांची आर्थिक प्रकृती आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय गुणांचे स्पष्ट चित्र बनवू शकतो. फक्त तेव्हाच कामगार वर्ग तसेच सामान्य कामकरी जनता त्या नाऱ्यांचा आणि बारीक सूत्रांचा अर्थ समजू शकते ज्यांच्यामागे प्रत्येक वर्ग आणि त्याचा प्रत्येक स्तर “आपल्या मनातील गोष्ट लपवतो.” यालाच लेनिन सर्वांगीण राजकीय भंडाफोड म्हणतात जो कामगार वर्ग आणि सामान्य कामकरी जनतेच्या क्रांतिकारी क्रियाशीलतेला प्रशिक्षित करण्याची मूलभूत अट आहे.

आपण राजकीय प्रचाराच्या सारतत्वाची गोष्ट थोडक्यात समजून घेतली. परंतु कामगार पक्षाच्या प्रचारात या सारतत्वाला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जाते. कामगार वर्गाच्या पक्षाचे क्रांतिकारी प्रचार करण्याचे दोन प्रकार असतात: प्रचारात्मक (प्रोपगेंडा), आणि  क्षोभकारक (एजिटेशन). हे दोन्ही वेगवेगळे प्रचार नाहीत, तर एकाच सारतत्वाला मांडण्याच्या भिन्न पद्धती आहेत. लेनिन प्रचारक आणि क्षोभकारक प्रचारातील फरक सांगताना म्हणतात: जर “… बेरोजगारीच्या प्रश्नावर प्रचारक बोलत असेल, तर त्याने आर्थिक संकटांच्या भांडवली स्वरूपाला समजावले पाहिजे, त्याने सांगितले पाहिजे की सध्याच्या समाजात अशी संकटे येणे का अनिवार्य आहे आणि त्यामुळे समाजाला समाजवादी समाजात बदलणे गरजेचे आहे, इत्यादी. थोडक्यात हे की प्रचारकाने जनतेसमोर अनेक-सारे विचार प्रस्तुत केले पाहिजेत, इतके-सारे विचार की फक्त (तुलनेने) थोडेसे लोकच त्यांना एका अविभाज्य आणि संपूर्ण एककाच्या रूपात समजू शकतील. परंतु या प्रश्नावर जेव्हा कोणी क्षोभकारक बोलेल, तर तो एखाद्या अशा गोष्टीचे उदाहरण देईल, जी सर्वाधिक ज्वलंत असेल आणि ऐकणारे जिला सर्वात व्यापक रूपाने समजत असतील – उदाहरणार्थ, भुकेने झालेला एखाद्या बेरोजगार कामगाराच्या परिवारातील मृत्यू, वाढती गरिबी, इत्यादी – आणि मग उदाहरणांचा वापर करत, ज्यांच्याशी सर्वजण परिचित आहेत, तो “सामान्य जनते”समोर फक्त एक विचार ठेवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे हे की हा अंतर्विरोध किती विसंगत आहे की एकीकडे तर धनसंपत्ती वाढतेय तर दुसरीकडे गरिबी वाढत आहे. या घोर अन्यायाविरोधात क्षोभकर्ता जनतेमध्ये असंतोष आणि राग निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तसेच या अंतर्विरोधाचे आणि पूर्ण स्पष्टीकरण देण्याचे काम तो प्रचारकासाठी सोडेल.  थोडक्यात, प्रचारक छापिल सामग्रीचा वापर करतो, तर क्षोभकर्ता जिवंत शब्दांचा वापर करतो.”

प्रचारक भांडवली व्यवस्थेच्या अंतर्विरोधांना त्यांच्या समस्त क्लिष्ठतेत समजतो आणि म्हणूनच जनतेच्या समोर विचारांच्या संपूर्ण साखळीद्वारे पूर्ण चित्र रंगवतो, जेव्हाकी क्षोभकर्ता या अंतर्विरोधाच्या एका प्रातिनिधिक बाजूला पकडून असंतोष आणि राग निर्माण करतो.

कामगार पक्षाच्या प्रचाराशी जोडलेला शेवटचा मुद्दा प्रचाराच्या रूपांचा आहे. कामगार वर्गाच्या पक्षाच्या प्रचाराची तीन रूपं असतात: व्यक्तिगत रूपाने केलेले तोंंडी अभियान, राजकीय आणि कामगार आंदोलनांमध्ये केलेला प्रचार, तसेच मासिके-नियतकालिकांद्वारे आणि साहित्याद्वारे केला जाणारा प्रचार. कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या या तीन रूपांमध्ये नियमाने कोणत्या ना कोणत्या रूपाने भाग घेतला पाहिजे. पुढील लेखामध्ये आपण कामगार पक्षाद्वारे सामान्य जनतेच्या संघर्षांमध्ये भागिदारी आणि राजकीय संघर्षांवर बोलू.

(मूळ हिन्दी लेख मजदूर बिगुल, जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित)

अनुवाद: अभिजित

(अपूर्ण, पुढील अंकांमध्ये चालू राहील.)