14 मार्च, कार्ल मार्क्स यांच्या 140 व्या स्मृतिदिनानिमित्त

पूजा

अडथळ्यांपासून मुक्त जीवन

माझ्यासाठी नाही,

नाही, माझ्या उत्स्फूर्त मनाला हे स्वीकार नाही

मला तर हवे आहे एक महान उत्तुंग लक्ष्य

आणि त्यासाठी आयुष्यभर

संघर्षाची एक अतूट साखळी!

– कार्ल मार्क्स

जगाला कामगारांच्या सत्ता स्थापनेचं एक उदात्त, महत्तम स्वप्न, एक घनगंभीर लक्ष्य देणारा आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी एक विज्ञाननिष्ठ रस्ता दाखवणारा व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स! आज जगभरात कामगार वर्गीय बाजू निवडणारी, कष्टकऱ्यांची श्रम संस्कृती स्वतःत रुजविण्याचा प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती घट्ट मूठ वळून, पाठीचा कणा ताठ करून, हात वर उचलून तितक्याच जिद्दीने एक नारा देते जितक्या जिद्दीने मार्क्स हा नारा देत असे – ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’ देशा-देशांतील, राज्या-राज्यांतील, जात, धर्म, लिंग, भाषा, वेष, खान-पान ह्या सगळ्यांच्या सीमा पार करून जगातील सर्व श्रमिकांमध्ये वर्गीय एकजूट निर्माण करण्याची जमीन तयार करण्यामध्ये मार्क्सचे योगदान अमूल्य आहे. मार्क्सचे सहयोगी आणि मित्र एंगल्सच्या शब्दांत सांगायचे तर, ‘समाजवाद आणि वर्तमानकाळातील संपूर्ण कामगार आंदोलनाला वैज्ञानिक आधार मिळवून देणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणजे मार्क्स!’ मार्क्सची बुद्धी, शरीर, मन हे सर्व काही सुईपासून जहाजपर्यंत सर्व काही बनवणाऱ्या, जगातील सर्व संपत्ती निर्माण करणाऱ्या, दिवस रात्र कष्टाचे डोंगर उपसणाऱ्या कामगार वर्गाप्रती समर्पित होते.

5 मे 1818 रोजी प्रशाच्या राईन क्षेत्रातील त्रियेर नावाच्या शहरात कार्ल मार्क्सचा जन्म एका समृद्ध परिवारात झाला. त्रियेरमध्ये हायस्कूल पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्सने प्रथम बोन आणि बर्लिन मध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि नंतर पूर्णपणे आपले लक्ष इतिहास आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर केंद्रित केले. इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाने मार्क्सला कम्युनिझमकडे वळवले. मार्क्सचं म्हणणं होतं की वैयक्तिक स्वार्थ साधण्याची मानसिकता आणि वर्गीय पूर्वाग्रहांची डोळ्यांवर असलेली पट्टी, यापासून मुक्त असलेली, पक्षपाती नसलेली व्यक्ती कम्युनिझमच्या विचारांपर्यंत पोहोचणे स्वाभाविक आहे.

मार्क्सचे योगदान

जर्मन तत्त्वज्ञान, ब्रिटीश राजकीय अर्थशास्त्र आणि फ्रेंच समाजवादाच्या सर्वोत्तम परंपरांना पुढे विकसित करत, आणि त्यांची योगात्मक एकता स्थापित करत मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवादाचे विज्ञान आणि द्वंद्वात्मक भौतिकवादाचे तत्त्वज्ञान विकसित केले, जगाकडे बघण्याचा वैज्ञानिक विश्व-दृष्टीकोन आणि अन्वेषण पद्धतीचा पाया घातला.  इतिहासाच्या वैज्ञानिक, भौतिकवादी, समजदारीला मार्क्सने तीन महत्त्वाची योगदाने दिली:

ऐतिहासिक भौतिकवादाचे विज्ञान: उत्पादक शक्तींचा विकास आणि प्रस्थापित उत्पादनाचे संबंध यात असलेला अंतर्विरोध हा समाजाचा पायाभूत अंतर्विरोध आहे. वर्गसमाजांमध्ये हा अंतर्विरोध विकासाच्या विशिष्ट टप्प्यात वर्गसंघर्षांच्या रूपात प्रकट होतो, व तात्कालिक प्रेरक शक्ती बनतो.

भांडवलशाहीतील शोषणाचे मर्म: उत्पादक शक्तींचा विकास आणि उत्पादनाचे संबंध यातील अंतर्विरोध भांडवलशाहीत उत्पादनाचे सामाजिक चरित्र आणि वरकडाचे खाजगी हस्तगतीकरण या रुपांनी प्रकट होतो.  भांडवली अर्थव्यवस्थेचे सर्व अंतर्विरोध तिच्या कोषिकेतून, म्हणजेच उपयोग मूल्य व विनिमय मूल्याचा अंतर्विरोध समाविष्ट करणाऱ्या ‘माल’ उत्पादनातून, विकसित होतात. भांडवली उत्पादन व्यवस्थेत कामगार मालकाला आपली श्रमशक्ती विकतो (श्रम नव्हे), त्याला मिळणारा मोबदला म्हणजेच त्याच्या श्रमशक्तीचे मूल्य, आणि या मूल्याहून अधिक काम करून कामगारच अतिरिक्त मूल्य निर्माण करतो जे मालकांची संचित संपत्ती बनते. भांडवलशाहीत अंतर्भूत अंतर्विरोधामुळेच ती नफ्याच्या दराच्या घसरणीच्या प्रवृत्तीला जन्म देते आणि आर्थिक संकटे निर्माण करते.

आजच्या अन्याय्य व्यवस्थेच्या, म्हणजे भांडवलशाहीच्या विरोधात लढून समाजवाद प्रस्थापित करू शकणारी अग्रणी ताकद म्हणजे कामगारवर्ग, ज्याच्याकडे हरवण्यासाठी काही नाही मात्र जिंकण्यासाठी संपूर्ण जग आहे.

तत्कालिन नैसर्गिक आणि समाजविज्ञानातील सर्वोत्तम परंपरांना आत्मसात करत, मार्क्स-एंगल्सने द्वंद्वात्मक भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करत हेगेलच्या भाववादी द्वंद्ववादाला भौतिकवादाच्या आधारावर विकसित केले आणि “डोक्याऐवजी पायावर उभे केले”.  अंतर्विरोधांच्या एकतेचा नियम, निषेधाच्या निषेधाचा नियम आणि संख्यात्मक बदलांमधून गुणात्मक बदलांचा नियम या द्वंद्ववादाच्या नियमांना भौतिकवादी चौकटीत सर्व विज्ञानांचे सामान्यीकृत नियम म्हणून स्थापित केले, आणि अशाप्रकारे जगाकडे बघण्याचा एक विश्वदृष्टीकोन आणि अन्वेषण पद्धत स्थापित केली.

मार्क्स-एंगल्सने मांडलेले ऐतिहासिक भौतिकवादाचे विज्ञान आणि द्वंद्वात्मक भौतिकवादाचे तत्वज्ञान आजही जगातील क्रांतिकारी चळवळींचा मार्ग आलोकित करत आहे.

मार्क्स आणि एंगल्सची मैत्री, क्रांतिकारी समाजवादाच्या पायाभरणीत अभूतपूर्व योगदान

मार्क्स आणि एंगल्सच्या लिखाणाने कामगारवर्गीय आंदोलनाला ‘काल्पनिक समाजवादाच्या’ भुलाव्यातून बाहेर काढत वैज्ञानिक समाजवादाकडे आणले. ‘राईचे फ्रांजोसिस्शे यारबुखेर’ ह्या पत्रिकेच्या कामासाठी, जिच्यात मार्क्सने स्वतःच्या समाजवादी लेखमालेला सुरुवात करत हेगेलच्या भाववादाची समीक्षा लिहिली, मार्क्स पॅरिसला गेले आणि तिथे एंगल्स आणि मार्क्सची घनिष्ठ मैत्री जुळली. दोघांनी मिळून ‘पवित्र परिवार’ ह्या पुस्तकात तरुण हेगेलवादी (यंग हेगेलियन) गटांवर टीका लिहिली. पुढे ह्याच पुस्तकाबद्दल रशियन कामगार क्रांतीचे नेते लेनिन म्हणतात की, ‘ह्या लिखाणाने वैज्ञानिक क्रांतिकारी भौतिकवादी समाजवादाचा पाया घातला.’ पॅरिसच्या क्रांतिकारी गटांमध्ये दोघांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यायोगे जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आव्हानांना देखील स्वीकारले. 1847 मध्ये प्रूधोच्या मतांचे (‘दारिद्र्याचे तत्त्वज्ञान’ लेख) खंडन करत ‘तत्वज्ञानाचे दारिद्र्य’ हे पुस्तक लिहून निम्न-भांडवली समाजवादाच्या धारणांशी संघर्ष करत त्यांनी क्रांतिकारी कामगारवर्गीय समाजवादाच्या सिद्धांतांची आणि कार्यनितीची पायाभरणी केली. 1848च्या वसंत ऋतूत मार्क्स आणि एंगल्स कम्युनिस्ट लीग या भूमिगत संघटनेचे सदस्य झाले. कम्युनिस्ट लीगच्या दुसऱ्या काँग्रेसच्या निर्देशानुसार त्यांनी जगप्रसिद्ध पुस्तक ‘कम्युनिस्ट पार्टीचे घोषणापत्र’ लिहिले, जे फेब्रुवारी 1848ला प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात त्यांनी कामगार वर्गाची विश्व ऐतिहासिक क्रांतिकारी भूमिका स्पष्ट करत कामगार वर्गीय आंदोलनाला वैज्ञानिक दिशा दिली, इतिहास-वर्तमान-भविष्याकडे बघण्याचा भौतिकवादी विश्व दृष्टिकोन दिला.

एक मित्र म्हणून एंगल्सची मार्क्सला वेळोवेळी साथ मिळाली. त्यांची मैत्री देखील कामगार राज्याच्या स्थापनेच्या ध्येयासाठी समर्पित होती आणि म्हणून इतकी घट्ट होती. निस्सीम मैत्रीचे एक उदाहरण दोघांनी जगासमोर ठेवले. मार्क्सच्या मृत्यूनंतर भांडवल ह्या ग्रंथाचे संपादन व प्रकाशन करण्याचे अत्यंत महत्वाचे काम एंगल्सने केले. ‘भांडवल’ ज्यात मार्क्सने दाखवून दिले की संपूर्ण जगातील संपत्ती कामगारवर्ग कसा निर्माण करतो आणि उत्पादन साधनांवर असलेल्या मालकीच्या जोरावर, कामगार वर्गानेच निर्माण केलेल्या वरकड मूल्यातून मालक नफा कसा कमावतो, आणि भांडवलशाहीच्या स्वत:च्याच अंतर्विरोधातून नफ्याच्या दराच्या घसरणीची प्रवृत्ती विद्यमान असते व ती आर्थिक संकटांना जन्म देत राहते. मार्क्सने शिकवले की कशा प्रकारे भांडवलशाहीमध्ये निर्माण होणारी मंदी, महागाई, बेरोजगारी, इत्यादी संकटांचे निराकरण हे भांडवली अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या भांडवली व्यवस्थेच्या चौकटीतील उपायांनी शक्य नाही, तर कामगारवर्गीय क्रांती, समाजवाद, हेच तिचे समाधान आहे, आणि पृथ्वीला भांडवली व्यवस्थेच्या विध्वंसापासून फक्त समाजवादच वाचवू शकतो. भांडवल ग्रंथावर मार्क्सने 40 वर्षे काम केले. डार्विनच्या लिखाणाने प्रस्थापित तत्त्वज्ञानाला, समजदारीला जे हादरे दिले, त्याच तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्त हादरे भांडवल ग्रंथाने दिले.

मार्क्सच्या एका सहयोगी मित्राच्या मुलीने लिहिले आहे की, ‘मार्क्ससाठी मैत्री ही निस्सीम असे. एकदा एका मित्राने मार्क्सकडे एंगल्सबाबत मांडले की एंगल्सची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली आहे की मार्क्सच्या आर्थिक प्रश्नांना सोडवण्यासाठी एंगल्स आणखी बरेच करू शकला असता. मार्क्सने काही शब्दांनीच त्या मित्राच्या विचारांतील कमीपणा दाखवून दिला, “माझे आणि एंगल्सचे नाते इतके जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे आहे की कुणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.” मार्क्स आणि एंगल्सने जर्मन विचारधारा, फायरबाखवर प्रबंध, राजकीय अर्थशास्त्राच्या टीकेची तोंडओळख, कम्युनिस्ट पार्टीचे घोषणापत्र, तत्वज्ञानाचे दारिद्र्य, फ्रान्समध्ये वर्गसंघर्ष, जर्मनीत क्रांती आणि प्रतिक्रांती, लुई नेपोलियनची अठरावी ब्रुमेर, जर्मनीत शेतकऱ्यांचे युद्ध, गोथा कार्यक्रमाची समीक्षा, समाजवाद: काल्पनिक आणि वैज्ञानिक सारख्या अनेक महान कृती दिल्यात ज्या आजही जगभरातील कामगार वर्गीय आंदोलनाला दिशा दाखवतात, समाजाच्या विकासाचे नियम शिकवतात, इतिहासाकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन देतात, ऐतिहासिक भौतिकवादाचे विज्ञान आणि द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देतात.

क्रांतीच्या उद्दिष्टाला समर्पित मार्क्स; एक शिक्षक, एक अभ्यासक, एक साहित्यप्रेमी

कामगार राज्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या क्रांतिकारकांच्या जीवनात अनेक आव्हानं, त्याग, अप्रिय, दुःखी क्षण येतात, त्याला मार्क्सही अपवाद नव्हते. ह्या महत्तम ध्येयाच्या लक्ष्यपूर्तीची गरज त्यांना सतत प्रेरणा देत राहिली व अत्यंत कठीण जीवनस्थितीत त्यांनी कामगार वर्गीय आंदोलनाला योगदान दिले. मार्क्स खूप मेहनती होते आणि स्वत:च्या शरीराकडून क्षमतेहून कितीतरी जास्त मेहनत ते करवून घेत असत. एका निर्वासिताचे (emigrant) जीवन जगताना दिवसा काम करण्यासाठी अनेक अडचणी येत, ज्यावर मात करण्यासाठी, शांतता मिळावी ह्या साठी मार्क्सला रात्रभर जागून काम करावे लागत असे. त्यांची कामाची खोली अत्यंत साधी असे. एक टेबल, पुस्तकांचे कपाट आणि सोफा! दिवसा काम करताना मार्क्स थोडावेळ सोफ्यावर झोप घेत असत. भुकेच्या कमतरतेने देखील त्यांना ग्रासलं होतं. एकूणच अभावांच्या जीवनस्थितीमुळे मार्क्सला पन्नाशी नंतर अनेक व्याधींची तक्रार सुरू झाली होती. त्यांना रात्री जागून काम न करण्याची, समुद्र किनारी निरोगी हवेत फिरण्याची, व्यायाम करण्याची डॉक्टरांकडून सक्ती करण्यात आली. काही दिवस सूचनांचं पालन केल्यानंतर मार्क्स पुन्हा लिखाण पूर्ण करण्यासाठी रात्री काम करणं सुरू करत असत. मार्क्स सकाळी फिरायला जाताना देखील स्वतःजवळ वही पेन काही महत्त्वाच्या नोंदी करायला जवळ ठेवत असत. त्यांचं काम कधीही वरवरचं नसे. गोष्टींच्या अगदी खोलात जाऊन त्यांची फेरतपासणी ते करत असत. अगदी लहानशा संदर्भासाठी देखील ते शंका निरसन होईपर्यंत तपशीलवार, मोठ-मोठ्या नोंदी घेत, कागदपत्रं, पुस्तकं वाचून काढत असत. मार्क्सला थकणे माहीत नव्हते. अगदी शारीरिक थकवा आल्यानंतर देखील ते थकवा आल्याचे कोणतेही लक्षण

दाखवत नसत. मार्क्स खोटी महानता, द्वेष, मत्सर, अहंकार, दिखावेबाजी यांच्या अत्यंत विरोधात होते. ते एक सच्चे मनुष्य होते.

कुणी जिज्ञासू व्यक्ती त्यांच्यापर्यंत आल्यास ते स्वतः त्याला वेळ देत, अध्ययनासाठी प्रोत्साहित करत असत. पण असे लक्षात आल्यास की कुणी व्यक्ती अभ्यासात आळस, टाळाटाळ करत आहे तर मार्क्स आपला वेळ तिथे खर्च करणं अपव्यय मानत व कटाक्षाने टाळत असत. मार्क्स तरुणांना जोशाने, उत्स्फूर्ततेने मार्गदर्शन करत कारण कम्युनिझमचा विचार जिवंत राहणे, प्रसार होत राहणे हे सर्वाधिक महत्त्वाचे त्यांना वाटे. मार्क्स नेहमी आंदोलनातील साथींना फक्त राजकीय अर्थशास्त्रातच नाही तर इतर अनेक गोष्टींत शिक्षित करण्याचे काम करत. त्यांना प्राचीन आणि आधुनिक भाषांचे उत्तम ज्ञान होते. व्याकरण, उच्चारण अचूकतेवर ते भर देत व इतरांनीही त्यावर भर द्यावा यासाठी आग्रही असत. मार्क्सने 1850 ते 1851 दरम्यान राजकीय अर्थशास्त्रावर व्याख्याने दिली. विस्तृत श्रोतावर्ग असलेल्या त्या व्याख्यानमालेत मार्क्सने ज्ञान प्रचाराची प्रतिभा कशी असावी हे दाखवून दिले. त्यांची शिकवण्याची तऱ्हा एका निपुण आणि हाडाच्या शिक्षकाप्रमाणे होती. कामगारांसमोर बोलताना त्यांना न समजणाऱ्या शाब्दिक अभिव्यक्ती टाळत ते संकल्पनेची विस्तृत व्याख्या करत ती समजावून सांगत असत. त्यानंतर ते श्रोत्यांना प्रश्न विचारण्यास सांगत. कुणीच प्रश्न नाही विचारला तर ते स्वतः फेरतपासणी करत. मुद्द्याच्या समजदारीमध्ये कोणतीही कमी, गैरसमज, अस्पष्टता त्यांच्या नजरेतून सुटत नसे. ब्रिटिश म्युझियमच्या वाचनालयात बसून मार्क्स वाचन करत असत, इतरांनाही वाचन करण्यास सांगत असत. तरुणांना ते तार्किक चिंतन आणि स्पष्ट अभिव्यक्तीच्या महत्त्वाबद्दल सांगत असत. मार्क्स एक प्रोत्साहित करणारे कठोर शिक्षक होते. ते सर्वांना आत्मटीका करण्यासाठी बाध्य करत असत, स्वतःच्या कामगिरीवर आत्मसंतुष्ट न राहण्यास सांगत असत.

सरळ, सच्चे, स्वच्छ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पारदर्शक असलेले मार्क्स त्यांच्या सर्व लिखित कृतींमधून तसेच समोर आलेत. परिश्रमपूर्वक लिहिलेल्या कुठल्याही सैद्धांतिक निष्कर्षाची निरुपयोगीता लक्षात आल्यास मार्क्स लगेच त्याचा त्याग करत असत. मार्क्सची लिखाणशैली ही मार्क्सच्या व्यक्तिमत्त्वास अनुरूप कणखर अशीच होती. भांडवल, अठरावी ब्रुमेर, श्रीमान फोगाट, इत्यादी त्यांच्या कृतींमध्ये त्यांची वैविध्यपूर्ण पण तरीही अचूकतेचा आग्रह असलेली लेखनशैली दिसून येते. भांडवल ग्रंथाच्या शैलीला कठीण मानले जाते, पण विज्ञानाचा कोणता साधा, सरळ मार्ग नसतो, त्याच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथक परिश्रमांची गरज असते, असे मार्क्सनेच मांडले आहे. त्यामुळे भांडवल ग्रंथाची शैली त्याच्या विषयवस्तू प्रमाणेच स्पष्ट आणि सटीक असणे आवश्यक होते. भाषाक्षेत्रात गटे, शेक्सपिअर, लेस्सिंग, दान्ते आणि सर्वांतीसला ते आपले गुरू मानत. अगदी रोज त्यांच्या साहित्यकृती ते वाचत. हाईने, गटे आणि शेक्सपिअर त्यांना कंठस्थ होता. त्यांच्या संपूर्ण परिवाराचा शेक्सपिअर आवडता होता. जेनी शेक्सपिअरची अभ्यासक होती, मार्क्सच्या मुली देखील शेक्सपिअरच्या नाटकातील संवाद पाठ म्हणून दाखवत. मार्क्स अनेक चांगल्या कवींचे निष्ठावान वाचक होते. टॉम जोन्स, चार्ल्स लेवर, पोल द’ कॉक, वॉल्टर स्कॉट त्यांचे आवडते कादंबरीकार होते. बाल्जाक आणि सर्वांतीसला मार्क्स सर्वोत्तम कादंबरीकार मानत. मार्क्सला सर्व युरोपीय भाषा येत असत. ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश भाषांचे मार्क्स उत्तम जाणकार होते. सोबतच जर्मन, फ्रेंच, इंग्लिश सुद्धा उत्तम प्रकारे त्यांना येत असे. जीवन संघर्षात विदेशी भाषा एक हत्यार आहे असे ते नेहमी म्हणत. रशियन भाषा मार्क्सने वयाच्या 50 व्या वर्षी, आजारांनी पिडलेले  असताना शिकली आणि पुश्किन, गोगोल, श्चेद्रिनच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेतला. गणित आणि विज्ञान मार्क्सला अतीव प्रिय होते. जीवनाच्या दुःखी क्षणांमध्ये मार्क्स तासंतास गणितं सोडवण्यात बुडून जात असे. डार्विनच्या सिद्धांतावर, प्राकृतिक विज्ञानाच्या क्षेत्रात लागणाऱ्या नवनवीन शोधांवर मार्क्स न थकता चर्चा करत असे.

मार्क्सच्या मृत्यूनंतर फ्रेडरिक लेसनर या एका कामगाराने मार्क्स बद्दल लिहिले की, ‘‘कार्ल मार्क्सचा फार लवकर मृत्यू झाला हे सर्वांचेच एकमत असेल. मार्क्सला अगदी जवळून ओळखणारे बऱ्याच काळापासून त्यांच्या तब्येतीला घेऊन खूप चिंतित असायचे, पण जेव्हा प्रश्न त्यांच्या वैज्ञानिक साहित्याचा आणि कामगार वर्गाचा असे, तेव्हा मार्क्स स्वतःला सूट देऊ शकत नसत. त्यांचे कुणीही मित्र, कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी ह्याबाबतीत जिंकू शकत नसत. मृत्यू नंतर देखील मार्क्स आपल्याला नवीन ज्ञान, नवीन दृष्टीकोन देत आहेत, त्यांचे साहित्य झपाट्याने लढणाऱ्या कामगार वर्गापर्यंत पोहचत आहे; सर्वत्र कामगार वर्गीय आंदोलन त्यांच्या साहित्याच्या प्रभावात येत आहे. मार्क्सने फक्त हा शक्तिशाली नारा ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’ दिला नाही तर एक सैद्धान्तिक आधार दिला ज्यावर ही एकजूट होऊ शकेल आणि होत आहे. इंटरनॅशनल, जिचा मार्क्स आत्मा होते, पुन्हा उभी राहिली आहे, पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि प्रबळ रूपात! जो झेंडा घेऊन आंतरराष्ट्रीय कामगार वर्गीय आंदोलनाच्या बटालियन पुढे कूच करत आहेत, तो झेंडा मार्क्सने 1848 मध्ये उचलला होता आणि संपूर्ण आयुष्यभर लढणाऱ्या कामगारांसमोर नेला. आज त्याच झेंड्याखाली कामगार वर्गाची सेना एका पाठोपाठ एक विजयाकडे कूच करत आहे.’’

मार्क्स आणि जेनीक्रांतिकारी प्रेमाचा एक अखंड निर्झर

मार्क्सची जीवनसाथी जेनी वेस्टफॉलन ही नेहमी मार्क्सच्या राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्याचा अविभाज्य भाग होती. जेनी आणि मार्क्स लहानपणापासून मित्र होते, एकत्र मोठे झाले, 1843 साली त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर ते नेहमी एकमेकांसोबत राहिले. एका अभिजात जर्मन परिवारात जन्म घेतलेली जेनी, जिचा भाऊ प्रशियाई मंत्री होता, समतेची अत्यंत आग्रही पुरस्कर्ती होती. कामगारवर्गाच्या सत्ता स्थापनेसाठी तिने स्वतःला वाहून घेतले होते. मार्क्स आणि जेनीच्या आयुष्यात सततचे निर्वासित जीवन, गरिबी, राजकीय घडामोडींमुळे अत्यंत चढउतार आलेत. मार्क्स आणि जेनीची 4 मुलं गरिबीमुळे आजारपणात हवे ते उपचार न घेता आल्याने, निरोगी हवा, प्रकाश यांच्या अभावामुळे दगावली. इतक्या कठीण काळात देखील जेनीने मार्क्स सोबत जीवन जगण्याचा मार्ग सोडला नाही, कारण जेनी सुद्धा मार्क्सप्रमाणेच क्रांतिकारी विचारांना वाहिलेली होती. जेनीची तर्कशुद्ध समीक्षा करण्याची क्षमता आणि बुद्धी यांचा मार्क्स खूप सन्मान करत असे. आपले प्रत्येक नवीन लिखाण मार्क्स जेनीला दाखवत असे व तिच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदलही करत असे. मार्क्सने लिहिलेल्या लेखांचं, पुस्तकांचं, पत्रकांचं प्रेससाठी प्रती तयार करण्याचं, प्रूफरीड करण्याचं काम जेनीच करत असे. कामगार वर्गाच्या तत्वज्ञानाला आणि विज्ञानाला विकसित करण्याच्या कामाचे ऐतिहासिक महत्त्व जेनी अत्यंत सखोलतेने जाणत होती आणि त्यामुळेच मार्क्सचं काम थांबू नये यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न ती करत होती. मार्क्स आणि जेनीच्या जगलेल्या तिन्ही मुलींनी मार्क्स-जेनी कडून त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल भरभरून लिहिले आहे. मार्क्स-जेनीच्या मुलींनी पुढे जाऊन समाजवादाच्या प्रचार प्रसाराचे काम केले. त्याच्या काळातील कामगार वर्गीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांचे जीवनसाथी देखील ह्याच उद्दिष्टाला समर्पित होते.

मार्क्स आपल्या मुलींसाठी नेहमी एक मित्र होते. मुली त्यांना प्रेमाने ‘मूर’ म्हणत असत. मुली लहान असताना तासंतास मार्क्स त्यांच्यासोबत खेळत असे. केवळ घरातीलच नाही तर परिचित अनेक लहान मुलांना ते प्रिय होते. मार्क्सच्या काही सहकारी, मित्रांच्या मुलांनी देखील त्यांच्या लाडक्या ‘मार्क्स अंकल’ बद्दल, त्यांच्या विनोदी, सर्वांमध्ये मिसळून जाणाऱ्या स्वभावाबद्दल लिहिले आहे. मार्क्सचे सहयोगी विल्हेल्म लिबनेख्त लिहितात की ,‘ते जेव्हा कामगार, गरीब वस्त्यांमध्ये सभांसाठी, इतर कामांसाठी जात असत तेव्हा नेहमी मार्क्स तिथे उंबरठ्यावर बसलेल्या लहानग्यांना आंजारत, गोंजारत, त्यांच्याशी खेळत बसत. अपार प्रेमाने मार्क्सचे हृदय ओतप्रोत भरलेले होते.’ मार्क्स-जेनीचा दुसरा मुलगा मूश दीर्घ आजारानंतर मृत्यू पावला तेव्हा मार्क्स दुःखाने विव्हळ झाले होते. लीबनेख्त लिहितात की त्या दिवशीचे दृश्य ते कधीच विसरू शकत नाहीत. मार्क्स दोन्ही हातांवर डोकं टेकवून उदास कुठेतरी हरवले असल्यासारखे बसून होते, हेलेन रडत होती, जेनी तिन्ही मुलींना जवळ घेऊन अस्वस्थ उभी होती, जणू मूशला त्यांच्यापासून हिरावणाऱ्या मृत्यूपासून तिला तिघी मुलींचे रक्षण करायचे आहे. मुली मौन क्रंदन करत होत्या. मूशला जर समुद्र किनारी, मुबलक निरोगी हवा आणि उजेड असलेल्या जागी राहायला मिळाले असते तर तो जगला असता परंतु निर्वासनाची शिक्षा झाल्यामुळे जीवनात सतत इथून तिथे जाणे, त्या जगण्यातील कठोरता, अनेक आर्थिक अडचणी, ह्या सर्वांत मार्क्स-जेनीचे प्रेम मूशला वाचवू शकले नाहीत. जेनी त्यांच्या एका वर्षाच्या मुलीच्या, फ्रांझिस्काच्या, मृत्यूबद्दल लिहिते की, “तिला गंभीर स्वरूपाचा ब्राँकायटिस झाल्याने खूप वेदना सहन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. फ्रांझिस्काच्या, आमच्या लहान-कोवळ्या चिमणीच्या मृत्यूच्या वेळी आमची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. मदत करू शकणारे कोणतेही मित्र जवळपास नव्हते. आमच्या छोट्याशा परीचे निष्प्राण शरीर दोन खोल्यांच्या लहान घरातील मागच्या खोलीत आम्ही ठेवले आणि मी, मार्क्स आणि आमच्या तिन्ही मुली पुढच्या खोलीत एकमेकांना जवळ घेऊन पडून होतो. तिन्ही मुली त्यांच्या लहान बहिणीसाठी रडत होत्या. दुसऱ्या दिवशी जवळ राहणाऱ्या एका फ्रेंच निर्वासित परिचिताकडून मी 2 पाउंड आणलेत आणि त्यानंतर आम्ही आमच्या बाळासाठी कॉफिन घेऊन तिला शांत निपचित पडून राहण्यासाठी एक हक्काची जागा देऊ शकलो. तिचा जन्म झाला तेव्हा तिला पाळणा देखील मिळू शकला नाही आणि मृत्यू झाला तेव्हा मृत्यू नंतर मिळणाऱ्या हक्काच्या जागेसाठी सुद्धा तिला वाट बघायला लागली.”

मार्क्सचा मृत्यू!

कार्ल मार्क्स, वयाच्या 65 व्या वर्षी, 14 मार्च, 1883 रोजी, काम करत असताना खुर्चीत बसल्या जागीच मृत्यूने त्यांना कवेत घेतले. मार्क्सच्या मृत्यूच्या काही महिने अगोदर जेनीचा कर्करोगाने मृत्यू झाला. प्रिय जेनीच्या जाण्यानंतर मार्क्स फार काळ जगू शकले नाहीत. मार्क्सच्या वैज्ञानिक समाजवादाच्या सिद्धांतांवरच स्थित पुढे रशियात (1917 साली) आणि चीन (1949साली) मध्ये क्रांती झाली, कामगारांचे राज्य आले आणि इतिहास घडवला गेला. आज चीन व रशिया कम्युनिस्ट राष्ट्रे नाहीत, कामगारांचे राज्य आज तिथे नाही, परंतु दोन्ही देशांच्या समाजवादी असण्याच्या काळातच त्यांची प्रगत राष्ट्रे म्हणून ओळख निर्माण झाली. विज्ञान, कला अशा सर्वच क्षेत्रांत कामगारांच्या राज्यांनी अभूतपूर्व प्रगती केली. आज भांडवलशाही तिच्या सर्वोच्च अन्यायी, मानवद्रोही, विनाशकारी, नवनिर्माणाची क्षमता नष्ट झालेल्या अवस्थेत पोहचली असताना त्यातून बाहेर येण्याचा, मानवतेला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मार्क्सवाद!

आपल्या प्रिय मित्रासाठी एंगल्सचे मृत्यूसमयीचे शब्द

“मार्क्स सर्वात आधी एक क्रांतिकारक होते. आयुष्यात त्यांचे वास्तविक लक्ष्य ह्या नाहीतर त्या मार्गाने भांडवली व्यवस्था आणि तिने उभारलेल्या राज्यसत्तेच्या यंत्रणांना फेकून देण्यात, आधुनिक कामगार वर्गाला मुक्ती देण्यात अधिकाधिक सहयोग देणे हेच होते; कामगार वर्गात स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आणि गरजांबद्दल, मुक्तीच्या पूर्व अटींबद्दल चेतना निर्माण करणारे ते पहिले व्यक्ती होते. लढणं हा त्यांचा पिंड होता. ते अशा उत्कटतेने, दृढतेने आणि यशस्वीपणे लढले की फार थोडे लोक त्यांना टक्कर देऊ शकले असते. त्यांचे रायनिशे झायटंग (1842), पॅरिस वोरवॉर्ट्स (1844), ड्यूशे ब्रुस्लर झायटंग (1847), न्यू रायनिशे झायटंग (1848 – 49), द न्यू यॉर्क ट्रीब्यून (1852 – 61) ह्या वृत्तपत्रांमधील काम आणि यात आणखीन भर म्हणून अनेक बंडखोर पत्रकांचे लिखाण, लंडन, पॅरिस, ब्रुसेल्स मध्ये संघटनात्मक काम आणि ह्या सर्वांवर जिरेटोप म्हणजे महान आंतरराष्ट्रीय कामगारांच्या संघटनेची (ग्रेट इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन) स्थापना! ही स्वतः मध्येच एक अभिमान वाटण्याजोगी कामगिरी आहे.

आणि परिणामी मार्क्स हा त्याच्या काळातील शत्रूंकडून सर्वाधिक द्वेष आणि अपमानित केला गेलेला व्यक्ती होता! निरंकुश आणि प्रजासत्ताक दोन्ही सरकारांनी नेहमी मार्क्सला आपल्या राज्यांतून निर्वासित केले. भांडवलदार वर्गात, मग ते पुराणमतवादी असो किंवा अति-लोकशाहीवादी, मार्क्सला अपमानित करण्यात चढाओढ होती. त्याने ह्या सर्वांकडे एखाद्या जळमटाप्रमाणे दुर्लक्ष केले, अतिशय गरज भासल्यावरच त्याने उत्तरं दिली. करोडो क्रांतिकारी साथी आणि सायबेरिया ते कॅलिफोर्नियातील खाणींपासून, युरोप, अमेरिकेतील प्रत्येक भागांतून कामगारांच्या मनातील अपार प्रेम, आदर आणि अश्रूंसोबत मार्क्सने मृत्यूशय्येवर विसावा घेतला, आणि मी आज हे निश्चितपणे सांगू शकतो की मार्क्सला अनेक विरोधक होते पण वैयक्तिक शत्रू कुणी नव्हते! मार्क्सचे नाव आणि मार्क्सचे काम युगानुयुग जिवंत राहील!”

कामगार बिगुल, मार्च 2023