समाजवादी सोविएत संघाने वेश्यावृत्ती कशी संपुष्टात आणली?

तजिंदर
अनुवाद : अभिजीत

वेश्यावृत्ती प्राचीन काळापासून आपल्या समाजात अस्तित्त्वात आहे. समाजाचे वर्गांमध्ये विभाजन होण्याबरोबर व स्त्रियांच्या दासतेबरोबरच वेश्यावृत्तीची सुरुवात झाली. परंतु भांडवलशाहीबरोबर देहव्यापाराचा हा धंदा एका व्यापक आणि संघटित रूपात अस्तित्त्वात आला. भांडवलशाहीने एक खुली बाजारपेठ निर्माण केली जेथे कारखान्यात निर्माण होणाऱ्या मालाबरोबर मानवी संबंध आणि शरीरसुद्धा नफ्यासाठी विकले आणि खरेदी केले जाऊ लागले. कलकत्ता, दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांपासून लहान शहरांपर्यंत देह व्यापाराचे बाजार आणि त्याचबरोबर जगभरात मानवी तस्करीचा एक व्यापक व्यवसाय निर्माण झाला.

A fight against prostitution Poster/Russian master /Lithograph/Soviet political agitation art/1930/State Russian Museum, St. Petersburg/Poster/

A fight against prostitution Poster/Russian master /Lithograph/Soviet political agitation art/1930/State Russian Museum, St. Petersburg/Poster/

एकट्या भारतात जवळपास ३० लाखांहून जास्त वेश्या आहेत. यांपैकी ३५ टक्के १२ ते १५ वयाच्या मुली आहेत ज्या या अमानवीय धंद्यात अडकल्या आहेत. दर वर्षी लाखो महिला आणि मुलींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तस्करी केली जाते व त्यांना बळजबरीने या धंद्यात ढकलले जाते. ही व्यवस्थासुद्धा या समस्येच्या निवारणासाठी प्रयत्न करते आणि बरेचसे एनजीओ आणि समाजसेवी संस्था या संदर्भात कार्यरत आहेत. परंतु या सर्वांचा खरा हेतू या समस्येच्या मूळ कारणांवर पांघरूण घालणे हाच आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आज या धंद्याला कायदेशीर रूप देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या व्यवस्थेच्या उष्ट्या-खरकट्यावर जगणारे बुद्धिजीवी या प्रकाराच्या बाजूने युक्तिवाद करीत आहेत आणि मीडियामार्फत या युक्तिवादांचे रूपांतर सर्वसामान्य मतामध्ये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिका आणि युरोपच्या भांडवली देशांमध्ये वेश्यावृत्तीच्या विरोधात जोरदार मोहिमा चालविल्या गेल्या. मात्र महिलांची अवस्था सुधारणे हा या मोहिमांचा उद्देश नव्हता. कारण त्यांमागे खरे कारण होते यौन रोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव. म्हणूनच या मोहिमा वेश्यावृत्ती-विरोधी नव्हत्या तर वेश्यांच्या विरोधात हो्त्या. या मोहिमांचे विश्लेषण अमेरिकन लेखक डायसन कार्टर यांनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक पाप आण विज्ञान मध्ये विस्तारपूर्वक केले आहे. त्याचबरोबर १९१७ च्या रशियन क्रांतीच्या आधी आणि नंतर रशियामधील वेश्यावृत्तीच्या स्थितीचे वर्णनसुद्धा केले आहे.

रशियामध्ये क्रांतीच्या पूर्वी वेश्यावृत्ती

रशियामध्ये जारशाहीच्या काळात वेश्यावृत्तीची एक संघटित अशी संरचना अस्तित्त्वात होती. ही एकूण संरचना रशियन बादशहा जारच्या सरकारच्या देखरेखीखाली चालत होती. याला पिवळ्या तिकिटाची व्यवस्था म्हटले जायचे. वेश्यावृत्तीचा व्यवसाय म्हणून अंगिकार करणाऱ्या स्त्रियांना पिवळे तिकिट दिले जायचे, परंतु याच्या बदल्यात त्यांना आपल्या पारपत्राचा (पासपोर्ट) त्याग करावा लागे. याचा अर्थ होता एक नागरिक म्हणून आपल्या सर्व अधिकारांवर पाणी सोडणे. एकदा या धंद्यात आल्यावर माघारी जाण्याचे सारे दरवाजे बंद केले जायचे. त्यानंतर कोणतीही महिला वेश्यावृत्ती सोडून दुसरे कोणतेही काम करू शकत नसे कारण पारपत्राशिवाय कुठेही नोकरी मिळत नसे. त्याचबरोबर या महिलांची सामाजिक प्रतिष्ठासुद्धा संपुष्टात येई. अशा महिलांसाठी वेगळ्या वस्त्या बनवण्यात येत, जशा भारतात रेड लाइट एरिया (वेश्यावस्त्या) आहेत. म्हणजेच या महिलांचे अस्तित्त्व अगदी खालच्या दर्जाच्या जीवांच्या रूपात शिल्लक राहायचे. ही व्यवस्था टिकवून ठेवण्यामागचा हेतू होता यातून सरकारला मिळणारे उत्पन्न. वेश्यांना आपल्या उत्पन्नाचा एक भाग जिल्हा प्रमुख किंवा अन्य एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला द्यावा लागत असे.

क्रांतीच्या आधी एकट्या पिटर्सबर्ग शहरात सरकारी लायसेंस-प्राप्त महिलांची संख्या ६० हजार होती. १० पैकी आठ वेश्या २१ पेक्षा कमी वयाच्या होत्या. अर्ध्यापेक्षा अधिक महिला अशा होत्या ज्यांनी १८ वर्षे वयाच्या आधी हा व्यवसाय पत्करला होता. रशियाच्या नैतिक पतनाचा हा चिखल एकीकडे उत्पन्नाचा स्रोत होता तर दुसरीकडे रशियाच्या कुलीन लोकांसाठी विदेशातून येणाऱ्या लोकांसमोर लांछनेचे कारणसुद्धा होता. म्हणूनच कुलीन लोकांनी जार सरकारवर दबाव आणला आणि जारने या मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी एक परिषदसुद्धा बोलावली. या परिषदेत कामगार संघटनांनीसुद्धा आपले सदस्य पाठवले. कामगारांच्या प्रतिनिधींनी परिषदेत जोरकसपणे हे म्हणणे मांडले की रशियामध्ये वेश्यावृत्तीचे मुख्य कारण जारशाहीची आर्थिक आणि राजकीय संरचना हेच आहे. अर्थातच, असे विचार दाबून टाकण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की चांगल्या घरातील महिलांवर प्रभाव पडू नये, यासाठी खालच्या जमातीच्या महिलांनी आयुष्यभर हा व्यवसाय करणे गरजेचे आहे.

ऑक्टोबर क्रांतीनंतर

ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात कामगार आणि शेतकऱ्यांनी बोल्शेविक पार्टीच्या नेतृत्त्वाखाली जारशाही उलथवून समाजवादी क्रांती केली. खाजगी मालकी नष्ट करून उत्पादनाच्या साधनांचे समाजीकरण करण्यात आले. फक्त आर्थिक गुलामीच्या बेड्या तोडून टाकणे एवढाच या क्रांतीचा हेतू नव्हता. या क्रांतीने लुटीवर आधारित जुन्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या तमाम सामाजिक रोगांवरही (यांमध्ये दारूबाजी, वेश्यावृत्ती, महिलांची गुलामी इत्यादी) प्रहार केला.

सोविएत शासनाने वेश्यावृत्तीवर पहिला हल्ला १९२३ मध्ये केला. वेश्यावृत्तीची समस्या समग्रपणे समजून घेण्यासाठी डॉक्टर, मनोविशेषज्ञ आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी १९२३ मध्ये एक प्रश्नावली तयार केली व रशियाच्या हजारो महिला आणि मुलींमध्ये वितरीत केली.

ज्या परिस्थितीमुळे आणि कारणांमुळे एक महिला आपले शरीर विकण्यासाठी तयार होते त्यांचा शोध घेणे हा या प्रश्नावलीचा हेतू होता. प्रत्येक स्तरावरील आणि वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांकडून या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात आणि गोपनीय पद्धतीने घेण्यात आली.

या सर्वेक्षणानंतर जी तथ्ये समोर आली ती पुढीलप्रमाणेः

  • ज्या महिलेला जाणुनबुजून दुसऱ्या लोकांनी फूस लावली होती तीच स्त्री देह व्यापारासाठी तयार झाली. कोणत्या लोकांनी? ज्यांनी पहिल्याप्रथम तिच्याशी शरीराचा सौदा केला त्यांनी नाही, तर अशा पुरुष आणि स्त्रियांनी जे वेश्यावृत्तीच्या व्यापारातून भलामोठा नफा कमावत होते किंवा ते जे व्यभिचाराचे अड्डे चालवीत होते.
  • मोठ्या संख्येने उपाशी नग्न मुली अस्तित्त्वात आहेत म्हणून व्यभिचार टिकून आहे, कारण व्यभिचाराच्या व्यापारातून चांगला नफा हाती येत असतो.
  • सोविएत विशेषज्ञांच्या हे लक्षात आले की बहुतेक मुली इतक्या गरीब होत्या की थोड्याशा पैशांची लालूच त्यांना वेश्यावृत्तीत फरफटत आणत होती.
  • बहुतेक मुलींनी सांगितले की त्यांना जर एखादे चांगले काम मिळाले तर त्या हा धंदा सोडून देतील.

या तथ्यांच्या प्रकाशात सोविएत सरकारने सर्वप्रथम १९२५ साली वेश्यावृत्तीच्या विरोधात एक कायदा संमत केला. देशातील सर्व सरकारी संस्था, ट्रेड युनियन आणि स्थानिक संघटनांना निर्देश देण्यात आले की खाली दिलेल्या उपायांची त्वरित अंमलबजावणी केली जावा :

(येथे आम्ही पाप आणि विज्ञान या पुस्तकातून या कायद्याशी संबंधित संदर्भ देत आहोत)

कामगार संघटनांच्या सहकार्याने कामगारांच्या एका हत्यारबंद सुरक्षा तुकडीने कामगार स्त्रियांची कामावरून कपात कोणत्याही परिस्थितीत बंद करावी. कोणत्याही परिस्थितीत आत्म निर्भर, अविवाहित स्त्रिया, गर्भवती स्त्रिया, लहान मूल असणाऱ्या स्त्रिया आणि घरापासून वेगळ्या राहणाऱ्या मुलींना कामावरून कमी करण्यात येऊ नये.

१.  त्या वेळी पसरलेल्या बेरोजगारीवर आंशिक उपाय म्हणून स्थानिक सत्ताधारी संस्थांना निर्देश देण्यात आले की त्यांनी सहकारी फॅक्टरी आणि शेती संघटित करावी जेणेकरून निराधार महिलांना काम देता येईल.

२. स्त्रियांना शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे, तसेच स्त्रियांना गिरण्या-फॅक्टरँमध्ये काम करता कामा नये या भावनेच्या विरोधात कामगार संघटनांनी संघर्ष केला पाहिजे.

३. ज्या स्त्रियांना राहण्यासाठी निश्चित जागा नाही व ज्या मुली गावांतून शहरांमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आवास अधिकाऱ्यांनी वास्तव्यासाठी सहकारी घरांची व्यवस्था करावी.

४. बेघर मुले आणि तरुण मुलींच्या सुरक्षेचे नियम सक्तीने लागू केले जावेत.

५. यौन रोग आणि वेश्यावृत्तीच्या धोक्याच्या विरोधात सामान्य लोकांना जागृत करण्यासाठी अज्ञानावर हल्ला केला जावा. आपल्या नव्या लोकतंत्राद्वारे आपण या रोगांना उपटून फेकू शकतो याची जाणीव सामान्य लोकांमध्ये जागवण्यात यावी.

ठेकेदार, वेश्या आणि ग्राहक यांच्याप्रति तीन वेगळ्या भूमिका

ठेकेदार आणि वेश्यागृहांचे मालक (यांमध्ये घरमालक आणि हॉटेलांचे मालक यांचाही समावेश होता) यांच्या विरोधात कडक भूमिका घेण्याचे आदेश सोविएत सरकारने दिले. सैन्याला आदेश देण्यात आले की माणसांचा व्यापार करणारे आणि वेश्यावृत्तीतून फायदा कमावणाऱ्यांना अटक करून कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी.

वेश्यावृत्तीच्या कचाट्यात सापडलेल्या महिलांबद्दल लोकांना आणि सैन्याला ताकीद देण्यात आली की त्यांना चांगली वागणूक दिली जावी. छाप्याच्या वेळी त्यांना समान नागरिक समजले जाण्याविषयीसुद्धा सांगण्यात आले. असेही कलम होते की अशा महिलांना अटक केले जाऊ नये. त्यांना न्यायालयात फक्त ठेकेदारांच्या विरोधात साक्ष देण्यासाठीच आणले जात होते.

ग्राहकांप्रति सामाजिक दबावाची भूमिका घेण्यात आली. ग्राहकांना अटक करण्यात येत नसे तर त्यांचे नाव, पत्ता आणि नोकरीच्या स्थळाचा पत्ता घेण्यात येत असे. नंतर बाजारात एक तक्ता लावण्यात येत असे, ज्यावर ग्राहकांच्या नाव आणि पत्त्यासह लिहिलेले असायचे – महिलांचे शरीर विकत घेणारे! अशा नावांच्या याद्या सर्व मोठमोठ्या इमारती आणि गिरण्या-फॅक्टरँच्या बाहेर लागलेल्या असायच्या.

सामाजिक पुनर्वसन

अशा महिलासुद्धा होत्या ज्यांची इस्पितळे व आरोग्य केंद्रांमध्ये देखभाल केली जायची, ज्या स्वतःला समाजाच्या अनुकूल बनवू शकत नव्हत्या. त्यामुळे अशा महिला पुन्हा देहव्यापाराकडे जाण्याची शक्यता शाबूत होती. मग सामाजिक पुनर्वसनाची एक योजना बनवण्यात आली. ही योजना थोडक्यात पुढीलप्रमाणे होती.

१.  रोग्याला तेव्हाच सुट्टी देण्यात येत होती जेव्हा समाजाच्या एखाद्या हिश्श्यामध्ये त्याच्या राहण्याचा संपूर्ण बंदोबस्त झालेला असायचा. तेथे त्याचा भूतकाळ गोपनीय राखला जाई. या भूतकाळाबद्दल त्या थोडक्या लोकांनाच माहिती असायची ज्यांच्याशी इस्पितळात राहताना शेवटच्या काही महिन्यांमध्ये रोग्याने पत्रव्यवहार केलेला असे. सामाजिक कार्याचे हे स्वयंसेवक अगोदरच अशी एखाद्या नोकरीची तजवीज करून ठेवीत जिच्यासाठी महिला रोग्याला खास शिक्षण दिले गेले असायचे. हे स्वयंसेवक तिच्या राहायाची सोय एखाद्या कुटुंबात करून देत. अशा महिलेच्या एखाद्या नवीन कुटुंबात येण्यासंबंधीच्या प्रत्येक लहानसहान बाबीवर लक्ष ठेवण्यात येईल जेणेकरून तिच्या पूर्वायुष्याबद्दल कोणाला काही शंका येऊ नये.

२. मोजक्या लोकांचा गट प्रत्येक स्त्रीला दीर्घ कालावधीपर्यंत मदतीची शाश्वती देत असे. आपल्या देशातही पडताळणीचा वेळ देण्याची व्यवस्था आहे. परंतु हा सांभाळ मूलभूतरित्या वेगळा होता. या सांभाळाचा आधार होता समानतेच्या आधारावर व्यक्तीगत मैत्री. रोगी आपल्या नव्या कामधंद्यात यशस्वी होईल या गोष्टीला जास्त महत्त्व दिले जात असे. सांभाळ करणारी कमीत कमी एक व्यक्ती त्या महिलेसोबत काम करीत असे.

३. प्रत्येक जिल्ह्यात सांभाळ करणाऱ्यांचे वेगवेगळे गट मिळून साहाय्यता समित्या बनवीत होते. डॉक्टर, मनोविशेषज्ञ आणि फॅक्टरी मॅनेजर यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या समित्यांची महिन्यातून तीन वेळा बैठक होत होती. कोणत्याही रोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गडबड दिसून येताच विशेषज्ञ आणि अनुभवी साहाय्यक यांची ताबडतोब मदत घेतली जायची. जसजसा काळ जाऊ लागला तसतशा या स्त्रिया या समित्यांचे काम अधिक चांगले करण्यासाठी त्यांच्यामध्ये सहभागी होऊ लागल्या.

४. विवाह, धंदा, पगार, भाडे यांसारख्या कोणत्याही अडचणींमध्ये अडकल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी समितीने खास कायद्याच्या मदतीचीही व्यवस्था केली होती.

५. ज्या महिलांचा अजूनही इस्पितळात उपचार सुरू होता, त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यासाठी जुन्या रोग्यांना प्रोत्साहन दिले जायचे. समाजात पुन्हा दाखल होण्याची इच्छा रोग्यांमध्ये वाढीस लागावी व लवकर त्यांनी समाजात परत यावे, हे यामागचे कारण होते.

सोविएत संघाच्या वेश्यावृत्तीच्या विरोधातील पंधरा वर्षांच्या संघर्षानंतर

  • अभियानाच्या पहिल्या पाच वर्षांच्या टप्प्यानंतरच, १९२८ मध्ये बिगरव्यावसायिक वेश्यावृत्ती पूर्णपणे नष्ट झाली. २५००० हून जास्त व्यावसायिक महिला इस्पितळांतून बाहेर बडून सन्मान्य नागरिक बनल्या. जवळपास ३ हजार व्यावसायिक वेश्या अजूनही होत्या.
  • ८० टक्क्यांहून थोड्या कमी महिला इस्पितळांतून बाहेर पडून उद्योग आणि शेतीचे काम करण्यास पोहोचल्या.
  • ४० टक्क्यांहून जास्त शॉक ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना जाऊन मिळाल्या किंवा देशासाठी प्रतिष्ठेचे काम करून त्यांनी नाव कमावले. बहुतेकींनी विवाह करून त्या माता झाल्या.

डायसन कार्टर यांच्या शब्दांत – व्यभिचाराच्या विरोधातील हा संघर्ष – जो आता गुलाम आणि पीडितांचा संघर्ष बनला होता – सोविएत जीवनातून युगांपासून चालत आलेला हा व्यभिचाराचा व्यापार कायमचा नष्ट करण्यात यशस्वी झाला. या संघर्षाने यौन रोगही नष्ट केले. रशियाच्या नव्या पिढीने वेश्या पाहिलेलीसुद्धा नाही.

रशियामध्ये समाजवादी काळात नशाखोरी आणि वेश्यावृत्तीसारख्या समस्यांच्या विरोधात लढा पुकारण्यात आला आणि या प्रवृत्ती नष्ट करण्यात यशही मिळाले. त्या काळात अवलंबिण्यात आलेले धोरण फक्त यामुळे यशस्वी झाले नाही की जारशाहीनंतर एक इमानदार सरकार सत्तेत आले होते. या समस्या सोडवण्यात यश येण्याचे खरे कारण हे होते की या अपप्रवृत्तींचे मूळ खाजगी मालकीवर आधारित संरचना रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या (बोल्शेविक) नेतृत्त्वाखाली झालेल्या ऑक्टोबर १९१७ च्या क्रांतीने नष्ट करून टाकली. उत्पादनाच्या साधनांवर समान मालकी असल्यामुळे उत्पादनसुद्धा समाजाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून केले जात होते. काही मूठभर लोकांच्या नफ्यासाठी नाही. म्हणूनच सोविएत सरकारद्वारा बनवलेली धोरणेसुद्धा बहुसंख्याक कष्टकरी जनतेला लक्षात घेऊन केली जात होती, मूठभर लोकांच्या नफ्यासाठी नाही.

आज भांडवली संरचना पूर्वीपेक्षा जास्त पतित झालेली आहे आणि नशाखोरी, वेश्यावृत्तीसारख्या अपप्रवृत्तींनी अधिक व्यापक रूप धारण केले आहे. आज जेव्हा समाजवादी काळाच्या सोनेरी इतिहासावर चिखलफेक केली जात आहे, अशा वेळी समाजवादी काळातील उपलब्धींचे वास्तव सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे, जेणेकरून सध्याच्या वयोवृद्ध रोगट व्यवस्थेला लोकांसमोर नागडे केले जाऊ शकेल. आज रशिया आणि चीनमध्ये समाजवादी संरचना शिल्लक नाही हे खरे, परंतु या काळातील उपलब्धी आजसुद्धा आपल्याला सध्याच्या लुटीवर आधारित व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि नवी समाजवादी व्यवस्था उभारण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

कामगार बिगुल, नॉव्‍हेंबर २०१५