महाराष्ट्रात आणि देशात जातीय अत्याचार चालूच
कामगारांनी जातीय अत्याचारांविरोधात एल्गार पुकारला पाहिजे
बबन ठोके
जातीव्यवस्था आणि जातिगत अन्याय अत्याचार आपल्या समाजावरील एक घाणेरडा डाग आहे आणि हा डाग दिवसेंदिवस जास्तच दुर्गंधी पसरवत आहे. गेल्या 10 जूनला जळगाव येथील जामनेर तालुक्यात वाकडी गावांमध्ये दोन मातंग तरूणांना विहिरीत पोहल्याच्या कारणावरून फक्त बेदम मारलेच नाही, तर नागडे करून गावामध्ये फिरवत शेतात घेऊन गेले व व्हिडिओ बनवून व्हाट्सअप वर प्रसारित देखील करण्यात आला. या अगोदर मे महिन्यात लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी गावातील एका मातंग नवविवाहित जोडप्याला मारुतीच्या मंदिरात प्रवेशाच्या निमित्ताने मारहाण करण्यात आली होती व नंतर त्यांच्यासोबत गावातील सर्वच मातंग कुटुंबांचा बहिष्कार करण्यात आला होता. सार्वजनिक विहिरीतील पिण्याच्या पाण्यापासून ते किराणा दुकाण व पिठाची गिरणी अशा दैनंदिन जीवनातील सर्वच बाबी बंद करण्यात आल्या. यातील बरीच कुटुंब ही मजुरी करण्यासाठी गावातील उच्च जातीतील लोकांवर अवलंबून होती. विशेष म्हणजे गावाची सरपंच देखील एक मातंग महिलाच आहेत. सरपंचा सहित सर्वांवरीलच सामाजिक व आर्थिक बहिष्काराने त्यांना गाव सोडण्यासाठी मजबूर केले.
अशाप्रकारे विविध जातीय कष्टकरी दलितांवर अत्याचाराच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये मोठया संख्येने झाल्या आहेत. 2014 मधील पुण्यातील माणिक उंडगेचा खून, 2015 साली नगरमध्ये सागर शेजवळ या तरूणाची आंबेडकरांविषयीचा रिंगटोन ठेवल्यामुळे हत्या, 2014चे जवखेडा येथील हत्याकांड, 2014 मधीलच नितीन आगे हत्याकांड या घटना लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. जातीय़ अत्याचारांच्या अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये दररोज समोर येत आहेत. आत्ताच 25 मे ला तमिळनाडूमधील कयनाघम गावांमध्ये तीन दलितांच्या हत्या करण्यात आल्या व सोबतच कित्येक लोकांना जखमी करण्यात आले. या दलितांचा दोष फक्त एवढाच होता की हे आर्थिक बाबींमध्ये गावातील उच्चजातीय लोकांवर अवलंबून नव्हते, काही जणांनी तर चांगल्या नोकऱ्या देखील मिळवल्या होत्या. त्यामुळे उच्चजातीयांच्या अहंकाराला धक्का बसला आणि त्यांनी हल्ला केला. गुजरातमध्ये अहमदाबाद पासून 110 किलोमीटर दूर एका गावात तेरा वर्षाच्या दलित मुलाला यासाठी मारहाण करण्यात आली की त्याने चांगले कपडे घातले होते. मारणाऱ्या उच्चजातीय तरुणांचे म्हणणे होते की तो उच्चजातीय लोकांसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो म्हणून अशांना धडा शिकवणे गरजेचे होते.
आत्ताच्या काही घटनां सोबत मागील काही दशकांतील घटनांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, या सर्व घटनातील आरोपी हे सर्वाधिक ओबीसी/शेतकरी जमीनदार जातींमधील आहेत. गावातील दलित समुदायांपैकी बहुसंख्य वरच्या शेतकरी जातींकडे मजूरी करायला जातात. जेव्हा दलित आपली मजूरी वाढवण्याची मागणी करतात तेव्हा अशा प्रकारच्या घटना आपल्यासमोर येतात. काही ठिकाणी दलितांमधील एक हिस्सा शहरात छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आलेला आहे. तेथे उच्च जातीतील लोक यासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात की हे दलित आमच्यासमोर डोके वर करून जगण्याची हिंमत कशी करू लागले आहेत. याचे एक उदाहरण हरियाणात मिर्चपूर ची घटना आहे. या ठिकाणी एका ताराचंद नामक दलित वृद्ध व्यक्तीला त्यांच्या अपंग मुली सहित 2010 मध्ये जिवंत जाळण्यात आले होते.
आज आपला देश असंख्य जातीमध्ये विभागाला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्यापेक्षा खाली पाहण्यासाठी कोणतीतरी जात आहेच. देशात जातीवर आधारित असंख्य संघटना आहेत. सतत दलितांवरील हिंसेचे प्रकार सुरूच आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार देशात प्रत्येक दिवसाला तीन दलित महिलांवर बलात्कार होत आहे व दोन दलितांची हत्या केली जात आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यासोबत केला जाणारा जातिगत भेदभाव किती आहे हे यावरून समजून येते की 2007 पासून उत्तर भारत व हैद्राबाद विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या 25 आत्महत्यांपैकी 23 दलित विद्यार्थ्यांच्या आहेत.
स्वातंत्र्या नंतर सत्तेत आलेल्या काळ्या इंग्रजांनी जातीचा वापर प्रत्येक वेळेस जनतेतील असंतोषाला दाबण्यासाठी केला आहे. 1990 च्या दशकात जेव्हा उदारीकरण व खाजगीकरणाच्या माध्यमातून देशातील लोकांपासून बरेच काही हिसकावून घेण्यात येत होते तेव्हा मंडल कमिशनच्या राजकारणाच्या माध्यमातून जनतेला जातीजातींमध्ये गोलबंद करण्यात आले. आज सुद्धा जेव्हा आर्थिक संकट भीषण झालेले आहे व सरकारी नोकऱ्या संपण्याच्या मार्गावर आहेत, तेव्हा मराठा, जाट, गुज्जर, पटेल यांना जातीच्या आधारावर संघटित करून शासक वर्ग आपला डाव खेळत आहे. महाराष्ट्रामध्ये मागील दोन-तीन वर्षांत जातीच्या आधारे जे मोर्चे निघाले त्यांचा भयंकर परिणाम येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतील.
तसं तर सर्वच सरकारं जातीय भेदभावाचा फायदा उचलून जनतेला एकमेकात लढविण्याचे काम करतात जेणेकरून लोकांनी आपल्या हक्क अधिकारासाठी जागृत होऊन आवाज उठवला नाही पाहिजे, पण यामध्ये भाजपा सर्वात पुढे आहे. भाजपला नियंत्रित करणारी आर.एस.एस. जातिव्यवस्थेवर घोषित स्वरूपात विश्वास ठेवते. याच कारणामुळे भाजपा सत्तेत येताच आरक्षणाला अघोषित पद्धतीने संपवण्यासाठी तयारी केली जात आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी कायद्याला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सरकारचे जातीयवादी चरित्र यातूनही स्पष्टपणे दिसून येते की भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये खऱ्या आरोपींना अटक करणे सोडून निर्दोषांनाच अडकवण्याचे काम हे सरकार करत आहे. यामुळेच आज जातिव्यवस्थेविरुद्ध आणि जातीय़ अत्याचारांविरुद्धचे कोणतेही आंदोलन या सर्व निवडणुकबाज पक्षांच्या विरुद्ध सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या एकतेद्वारेच पुढे जाऊ शकते.
इतर सर्व जातीतील कष्टकरी कामगार मित्रांना, तरुणांना आज हे प्रकर्षाने समजून घ्यावे लागेल की, जोपर्यंत कष्टकरी, कामगार वर्ग जातीच्या नावाखाली विभागून राहील तोपर्यंत संपूर्ण कष्टकरी समाज दुर्दशेत राहील. आज तरुणांना आरक्षणाच्या नावाखाली लढवले जात आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित नाही का की आज सर्व सरकारी नोकऱ्या संपण्याच्या मार्गावर आहेत? एका पदासाठी हजार उमेदवार अर्ज करत आहेत. आता या पदावर आरक्षण असो किंवा नसो, बाकी हजारो तरुणांना तर बेरोजगार फिरावेच लागत आहे. अशामध्ये आपल्याला आरक्षण संपविण्यासाठी किंवा एखाद्या जातीला आरक्षण वाढवून देण्याच्या मागणीसाठी आपली ऊर्जा निरर्थक वाया घालवली नाही पाहिजे. उलट सर्वांसाठी मोफत शिक्षण आणि कायम स्वरूपाच्या रोजगार हमीसाठी सरकार विरोधात संघर्ष उभा करणे गरजेचे आहे.
सर्व दलित बंधू-भगिनींना आज भगतसिंहाचे हे शब्द ध्यानात ठेवावे लागतील, “उठा, आपल्या शक्तीला ओळखा! संघटीत व्हा! खरंतर स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अशी म्हण आहे कि, ‘लातों के भूत बातो से नही मानते.’ म्हणजे संघटीत होऊन आपल्या पायावर उभे राहा व सर्व समाजाला आव्हान द्या! तेव्हा बघा, कोणीसुद्धा तुम्हाला तुमचे अधिकार देण्यापासून नकार देण्याची हिंमत ठेवणार नाही. तुम्ही दुसऱ्याचा खुराक बनू नका, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहू नका. परंतु ध्यानात ठेवा, नोकरशाहीच्या भुलाव्याला फसू नका. हे तुमची कोणत्याच प्रकारे मदत करू इच्छित नाहीत. उलट तुम्हाला आपलं प्यादं बनवू पाहत आहेत” (‘अस्पृश्य समस्या’, भगतसिंह). असे वाटते की शहीद भगतसिंहांचे हे शब्द जणू आजच्यासाठीच लिहिले आहेत. आज आपल्याला याच कार्य दिशेला समजण्याची गरज आहे.
सर्वच कष्टकरी कामगार बंधू-भगिनींनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर तुम्ही तथाकथित खालच्या जातीतील कष्टकऱ्यांना गुलाम समजाल, तर विसरू नका की तुम्ही सुद्धा या नफ्या-तोट्यावर आधारित भांडवली व्यवस्थेत गुलाम म्हणून जगण्यास अभिशप्त रहाल! भगतसिंहाने सांगितले होते की, कामगार क्रांती व मजुरांची सत्ता स्थापित होण्यासाठी कामगारांची वर्गीय एकजुटता ही पूर्वशर्त आहे. वर्गीय एकजुटता तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण या जातीपातीच्या भुताला कायमचे गाडून टाकू. त्यामुळे जातीव्यवस्थेविरोधात एकत्र येऊन एल्गार पुकारणे हे कामगार वर्गाचे कर्तव्य बनते.
कामगार बिगुल, जुलै 2018
this is reality. A1 article