महाराष्ट्रात विविध अपघातांमध्ये कामगारांचे मृत्यू
नफेखोर व्यवस्थेचे अजून किती बळी?
पवन
जुलै महिना सुरू होत नाही तर, पुणे, मुंबई, नाशिक, कल्याण येथे पावसामुळे झालेल्या विविध अपघातांमध्ये 35च्या वर कामगारांचे मृत्यू झाले आहेत.
पुण्यामध्ये कोंढवा येथे तालब मशिदी जवळील आल्कन स्टायलस या इमारतीच्या पार्किंगची भिंत 29 जूनच्या रात्री दीडच्या सुमारास कोसळली. भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या बांधकाम कामगारांच्या वस्ती वर, सर्व कामगार झोपलेले असताना, ही भिंत कोसळून 15 कामगार ठार झाले, ज्यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. याशिवाय 3 कामगार जखमी सुद्धा झाले. आल्कन स्टायलसचे बांधकाम 2011 पासून 2019 पर्यंत पूर्ण करण्यात आले. तिचे काम येथील आल्कन लॅंडमार्क बिल्डर या कंपनीने केले, ज्याचे कॉन्ट्रॅक्टर जगदीश अग्रवाल, विपुल अग्रवाल, विवेक अग्रवाल हे बिल्डर होते. बिल्डींग मधील राहणाऱ्या रहिवासी वर्गाने या पार्किंगच्या भिंतीवरील भेगा पडल्याचे सतत निदर्शनास आणले असण्याबद्दल फेब्रुवारी पासून सतत सांगून सुद्धा या बिल्डरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. अल्कोन लॅंडमार्क बिल्डरांनी मूठभर पैसे वाचवण्याच्या व स्वतःचा नफा वाढवण्याच्या उद्देशाने या तक्रारीकडे सतत दुर्लक्ष केले. कांचन बांधकाम प्रकल्पाच्या तब्बल 50 ते 70 कामगारांची राहण्याची सोय या पार्किंगच्या भिंतीच्या पलीकडे पत्र्यांच्या खोलीमध्ये करण्यात आली होती. कांचन संस्थेचे बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मीकांत गांधी हे आहेत. बांधकाम मजुरांच्या सततच्या तक्रारी होत्या की आम्हाला इथे राहायला देऊ नका कारण भिंत अंगावर कोसळू शकते पण कांचन बिल्डरने दुर्लक्ष करून त्यांना सांगितले की राहायचे तर इथेच या पत्रांच्या खोल्यांमध्ये राहा. पर्यायी जागा नसल्याने कामगारांना मजबुरीने येथे राहणे भाग होते. घटना घडल्यानंतर उरलेल्या सर्व कामगारांना तात्काळ दुसऱ्या जागी हलवण्यात आले.
याच प्रकारच्या दुसऱ्या एका दुर्घटनेमध्ये पुण्यातच आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड कॉलेज कॅम्पमध्ये पाच घरांवर सीमाभिंत कोसळून सहा जण ठार झाले आहेत. हे कामगार छत्तीसगढ मधून आलेले होते. ही घटना 1 जुलै रोजी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान झाली. याच दिवशी मुंबईमध्ये मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ७८ जण जखमी आहेत. कल्याणच्या दुर्गाडी परिसरातील उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन वर्षांचा चिमुकला, त्याची आई आणि आणखी एक महिलेचे प्राण गेले आहे. नाशिकमध्ये सातपूर येथेही पाण्याची टाकी कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.
अशाच प्रकारची एक दुर्घटना पुण्यामध्येच फुरसुंगी येथे दोन महिन्यापूर्वी साड्यांच्या होलसेल व्यापाराच्या दुकानांमध्ये घडली होती. रात्रीच्या वेळी मालक दुकानाला बाहेरून लॉक लावून निघून गेला होता. दुकानाला खिडक्या दरवाजे नसल्या कारणाने आतून आग लागल्यानंतर चार कामगार जळून खाक झाले. कोंढव्या मध्ये ठार झालेले हे कामगार बिहार मधील कटियार जिल्ह्यातील होते, तर फुरसुंगी येथे कामगार राजस्थान मधून आलेले होते.
प्रचंड बेरोजगारीने त्रासलेले असे असंख्य कामगार देशातील विविध भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी येत असतात. हा कामगार वर्ग दिवसाला 200-300 रुपयावर सुद्धा काम करायला आणि जीवाचा धोका पत्करून अत्यंत असुरक्षित अशा ठिकाणी रहायला तयार होतो. बिल्डर कामगारांना अतिशय धोकादायक, तकलादू आणि पत्र्याच्या आवासात रहाण्याची सोय करतात – त्याचे कारण त्यांना कामगारांची काळजी नसून, त्यांचे उद्दिष्ट कामगारांनी कामाच्या ठिकाणीच रहावे आणि जास्त काम करावे हे आहे. सर्व उद्दिष्ट फक्त बिल्डरांचा, मालकांचा नफा वाढवणे हे असल्यामुळे कामगारांच्या जीवाची पर्वा केली जात नाही. त्यामुळे आज कामगारांच्या जिवाची किंमत कवडीमोल झाली आहे आणि नफ्यासाठी चालणाऱ्या या भांडवली समाजाला काडीमात्र फरक पडत नाही. भारतातील दलाल धंदेबाज वृत्तवाहिन्या आणि काही वृत्तपत्र यांनी कोंढव्यातील घटनेला पावसाचा प्रकोप म्हणून देखील जाहीर केले आहे. पण हा पावसाचा प्रकोप नसून, बिल्डरांच्या नफ्यासाठी बळी गेलेले हे कामगार अपघाताचे बळी नाहीत, तर नफेखोर, भांडवली व्यवस्थेने केलेले खून आहेत.
भारतामध्ये बांधकाम उद्योग हा शेतीनंतर ‘रोजगार’ देणारा सर्वात मोठा उद्योग आहे. कामगारांच्या रक्ता-घामातून प्रचंड मोठ्या प्रमाणात बिल्डींग्स बांधल्या जात आहेत. परिणामी 2013 मध्ये जवळपास 54,000 कोटींच्या बिल्डींग्स बांधल्या गेल्या होत्या, तर 2018 मध्ये हा आकडा 98,000 कोटींवर गेला आहे. देशभरामध्ये सर्वत्र असुरक्षित कामाच्या स्थितीमुळे शेकडो कामगार कधी उंचावरून पडून, तर कधी वीजेच्या झटक्याने, तर कधी मलब्याखाली दबून मारले जातात. यापैकी बहुसंख्य अपघात दाबून टाकले जातात आणि मीडीय़ा त्यांच्या बातम्याही देत नाही. बेपर्वाईची हद्द तर इतकी आहे की ना या कामगारांची कुठे कामगार म्हणून नोंद असते, ना अपघातांची ना मृत्यूंची. संसदेच्या ‘मंदिरामध्ये’, लोकसभेमध्ये, सादर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 2012 ते 2015 मध्ये फक्त 77 कामगारांचे मृत्यू झाले. हा आकडा तर कीव करावी असाच आहे, कारण फक्त वर्तमानपत्रांच्या बातम्या जरी एकत्र केल्या तरी मोठा आकडा मिळेल.
पुण्यामध्ये कोंढव्यात अपघात झाल्यावर लगेचच मंत्री-संत्री, विरोधी पक्षाचे नेते, इत्यादी धावत आले. सरकारने या कामगारांना मेलेल्या कामगारांच्या जीवाची किंमत नातेवाईकांना चार लाख रुपयाची देण्याचे कबूल केले व कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बांधकाम बिल्डरांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कामगारांची नोंदणी का नव्हती वगैरे घोषा लावला. आपण या सगळ्यांचे हे मगरीचे अश्रू ओळखले पाहिजेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपची सरकार आहेत. यांच्यापैकी कोणीही अजूनही कामगारांची साधी नोंदणी सुद्धा केलेली नाही. जी कारवाई झाली आहे ती फक्त आत्ता निवडणूका समोर आहेत म्हणून झाली आहे हे स्पष्ट आहे. वास्तवामध्ये हे सर्व पक्ष आजपर्य़ंत मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबीच्या पैशावरच पोसलेले पक्ष आहेत. विधानसभेमध्ये आणि बाहेर कितीतरी वेळा या सर्वांनी, एकमेकांवर बिल्डरांना हजारो कोटींचा फायदा पोहोचवल्याचे आरोप लावले आहेत. अनेकदा ते विसरतात की त्यांच्या हमाममध्ये सगळेच नंगे आहेत. महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कामाच्या जागी सुरक्षिततेच्या तरतुदी मांडणारा 1996 सालचा कायदा आणि त्यानुसार बनवलेले 2007 सालचे नियम पूर्णपणे कागदावरच आहेत. यातूनच आपण समजले पाहिजे की सर्व भांडवली पक्ष आणि बिल्डर यांचे किती संगनमत आहे! राजकारणी-बिल्डर लॉबी आणि भांडवलदारांच्या एकजुटीच्या विरोधात, सुरक्षिततेच्या सोयीसाठी आज सर्व कामगारांनी एकत्र येऊन लढलेच पाहिजे.