गिरीश कर्नाड: एका निर्भय कलाकारास आदरांजली
नागेश
ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, विद्वान, उदारमतवादी, आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर परखड आणि राज्यसत्तेविरुद्ध भुमिका घेण्यास न कचरणारा एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. दिनांक 10 जून रोजी आजारामुळे गिरीश कर्नाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन वर्षापासून आजारी होते. गिरीश कर्नाड यांना त्यांच्या साहित्य आणि कला क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले होते. 1999 मध्ये’ ज्ञानपीठ ‘पुरस्कार त्यांना मिळाला.
कर्नाडांचा जन्म माथेरान येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले. गिरीश कर्नाड यांचा गणित, इतिहास, याचबरोबर तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. पुराणकथा आणि वास्तवाची सांगड घालणारी नाटके गिरीश कर्नाडांनी लिहिली. ययाती, हयवदन, तुघलक, नागमंडल, अग्नि आणि पाऊस ही महत्त्वपूर्ण नाटके त्यांनी लिहिली. विजय तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश, अशा महान नाटककारांच्या बरोबरीने गिरीश कर्नाड यांचे नाव नाट्यकलेची उंची वाढवणाऱ्यांमध्ये घेतले जाते. आपल्या सर्व नाटकांमधून गिरीश कर्नाड यांनी पौराणिक कथांचा वापर करून आधुनिक जगातील मानवी जीवनातील कोलाहल आणि अंतर्विरोधांना समोर आणण्याचे काम केले.
बहुआयामी प्रतिभा असलेल्या गिरीश कर्नाड यांनी सिने सृष्टीवरही आपली छाप सोडली. सामाजिक मुद्द्याला हात घालणाऱ्या नाटकांच्या लेखनाबरोबरच कर्नाडांनी सामाजिक मुद्द्याला हात घालणारे सिनेमे देखील केले. 1970 साली ‘संस्कार’ या ब्राह्मणी मुल्यमान्यतांना आव्हान देणाऱ्या सिनेमाचे लेखक गिरीश कर्नाड होते. जब्बार पटेल दिग्दर्शित अशाच एका ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका केली. त्याचबरोबर त्यांनी काही कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले. ‘निशांत’, ‘मंथन’, ‘स्वामी’, ‘पुकार’ सारख्या हिंदी समांतर सिनेमात देखील त्यांनी कलाकार म्हणून काम केले . ‘वंश वृक्ष’ सिनेमासाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थानमध्ये लढणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रणी होते. आपल्या उदारमतवादी वैचारिक भूमिकांमुळे गिरिश कर्नाड नेहमीच चर्चेत राहिले. कलाकारांनी सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भुमिका घेतल्या पाहिजेत या मताचे ते होते. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांनी राजकारण- समाजकारण यावर निर्भीडपणे आपली परखड मते मांडली त्यमुळे त्यांना काही वेळा टीकेला देखील सामोरे जावे लागले. त्यांनी नुसतीच भूमिका घेतली नाही तर वेळ पडली तेव्हा ते रस्त्यावर देखील उतरले. हिंदुत्ववादी शक्ती आणि धार्मिक कट्टरपंथीयांच्या विरोधात ते कायम आवाज उठवत राहिले. 1992 साली बाबरी मशिद पाडण्याचा निषेध, तस्लिमा नसरीन यांना दिलेल्या धमक्यांच्या विरोधात कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनात बोलणे, बीफ वर बंदी च्या विरोधात, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर झालेल्या पुण्यातील विरोध प्रदर्शन, गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधातील आंदोलन, मॉब लिंचींग सारख्या घटनांवर, स्टीलच्या फ्लायओव्हरच्या विरोधात, अर्बन नक्षल च्या नावाखाली चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अटके विरोधात झालेले आंदोलन, इत्यादी मुद्यांवर भुमिका घेण्यात कर्नाड कधीच कचरले नाहीत. शेवटच्या दिवसांमध्ये आजारी असतानाही अनेक विरोध प्रदर्शनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर ‘पुरस्कार वापसी’च्या आंदोलनामध्ये सुद्धा कर्नाडांनी भाग घेतला होता. त्यांच्या या भुमिकांमुळे, गौरी लंकेश यांच्या अगोदर गिरीश कर्नाड यांचे नाव हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या हिट-लिस्ट वर होते असे नुकतेच उघड झाले आहे. एक मोठी शोकांतिका आहे की आपल्याकडे गिरीश कर्नाडांसारखे सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर भूमिका घेणारे बोटावर मोजण्याइतकेच कलाकार आहेत.
गिरीश कर्नाडांनी त्यांचे जीवन साधेपणात घालवले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार शासकीय इतममात अंत्यसंस्कार न करता साधेपणाने त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अशा प्रतिभाशाली, लोकशाहीवादी, निर्भय सच्च्या कलाकारास विनम्र आदरांजली.