उदारमतवादा विरोधात लढा
माओ त्से–तुंग (7 सप्टेंबर 1937)
(कामगार कष्टकरी वर्गाच्या राजकीय पक्षाने विविध भांडवली जीवनमूल्यांच्या विरोधात निरंतर अंतर्गत संघर्ष चालवणे ही त्याच्या अस्तित्वाची गरज आहे. उदारमतवादी प्रवृत्ती ही एक निम्न भांडवली प्रवृत्ती आहे आणि पक्षामध्ये तिच्या विरोधात निरंतर संघर्ष कसा चालवला गेला पाहिजे, यावर कामगार वर्गाचे महान शिक्षक माओ यांचा हा लेख इथे देत आहोत.- संपादक मंडळ)
आम्ही सक्रीय वैचारिक संघर्षाच्या बाजूने आहोत, कारण पक्षामध्ये एकता आणि आपल्या लढ्याच्या हितामध्ये क्रांतिकारी संघटना टिकवण्याचे ते हत्यार आहे. प्रत्येक कम्युनिस्टाने आणि क्रांतिकारकाने हे हत्यार उचलले पाहिजे.
पण उदारमतवाद वैचारिक संघर्षाला नाकारतो आणि तत्वहीन शांततेची बाजू घेतो, व यातून तो एका बेपर्वा, लयास जाणाऱ्या प्रवृत्तीला जन्म देतो व पक्ष आणि क्रांतिकारक संघटनांमधील काही युनिट्स आणि व्यक्तींमध्ये राजकीय अध:पतनाची सुरूवात करतो.
उदारमतवाद अनेक प्रकारांनी अभिव्यक्त होत असतो.
एखाद्या व्यक्तीकडून स्पष्टपणे चूक झालेली असल्यास, शांतता आणि मैत्रीसाठी गोष्टी सोडून देणे, जुनी ओळख, गावाकडचा माणुस, शाळकरी मित्र, जवळचा मित्र, प्रिय व्यक्ती, जुना कर्मचारी साथी, किंवा जुना हाताखालचा अधिकारी आहे म्हणून तत्वाला धरून वाद करायचे टाळणे. किंवा संबंध बिघडू नयेत म्हणून एखाद्या मुद्यामध्ये खोलात न जाता फक्त वरवर त्याची चर्चा करणे. परिणाम हा आहे की व्यक्ती आणि संघटना दोघांचेही नुकसान होते. हा एक प्रकारचा उदारमतवाद आहे.
स्वत:ची मते सक्रीयपणे संघटनेपुढे न ठेवता, खाजगीमध्ये बेजबाबदार टीकेचा सहारा घेणे. लोकांच्या तोंडावर काही न बोलता त्यांच्या पाठीमागे टवाळी करणे, किंवा एखाद्या मिटींग मध्ये काही न बोलता नंतर चकाट्या पिटणे. सामुहिक जीवनाच्या तत्वांची पर्वा न करता, स्वत:च्या कलानेच वागणे. हा दुसरा प्रकार आहे.
जर स्वत:ला फरक पडत नसेल, तर गोष्टींना वाहवत जाऊ देणे; एखादी गोष्ट एकदम चुकीची आहे हे माहित असतानाही शक्य तितके कमी बोलणे, ‘शहाणपणाने’ आणि सुरक्षितपणे वागणे आणि दोषारोप टाळणे. हा तिसरा प्रकार आहे.
स्वत:च्या मतांबद्दल गर्व बाळगत आदेश न पाळणे. संघटनेची शिस्त न पाळता तिच्याकडून विशेष वागणुकीची अपेक्षा ठेवणे. हा चौथा प्रकार आहे.
एकतेसाठी, प्रगतीसाठी, किंवा काम नीट व्हावे म्हणून वाद घालणे किंवा चुकीच्या दृष्टीकोणाविरुद्ध लढणे हे न करता वैयक्तिक आरोप करणे, भांडणं काढणे, व्यक्तिगत छीथू करणे वा बदला घेणे. हा पाचवा प्रकार आहे.
चुकीच्या मतांचा प्रतिवाद न करता ते ऐकून घेणे आणि अगदी प्रति-क्रांतिवादी मतसुद्धा ऐकून न कळवणे, आणि काहीच झालेले नाही असे भासवत शांत रहाणे. हा सहावा प्रकार आहे.
जनतेमध्ये राहून प्रचार आणि आंदोलन न करणे किंवा मिटिंग मध्ये न बोलणे, चौकशी व माहिती मिळवण्याचे काम न करता लोकांप्रती उदासीन असणे आणि त्यांच्या हिताबद्दल कोणतीही चिंता नसणे, हे विसरणे की आपण एक कम्युनिस्ट आहोत आणि एका सामान्य अ-कम्युनिस्टासारखे वागणे. हा सातवा प्रकार आहे.
एखादा व्यक्ती जनतेच्या हिताविरोधात बोलत आहे हे जाणूनही संताप न येणे, त्या माणसाला परावृत्त न करणे वा न थांबवणे किंवा त्याच्यासोबत वाद न घालणे, उलट त्याला बोलू देणे. हा आठवा प्रकार आहे.
निश्चित योजना किंवा दिशेशिवाय अर्ध्या-दिलाने काम करणे, वरवर काम करणे आणि लचांड लावणे की – “जोपर्य़ंत एखादा व्यक्ती साधू आहे, त्याला तर घंटा वाजवतच रहावी लागेल.” हा नववा प्रकार आहे.
असे मानणे की आपण क्रांतीसाठी काहीतरी महान कार्य केले आहे, स्वत: निवृत्त सैनिक असल्याबद्दल अभिमान बाळगणे, मोठ्या कामांची क्षमता नसताना छोट्या कामांबद्दल तुच्छता बाळगणे, कामांमध्ये गचाळ आणि अभ्यासामध्ये ढिले असणे. हा दहावा प्रकार आहे.
आपल्या चुकांची जाणीव असूनही त्यांना सुधारण्याचा प्रयत्न ना करणे, स्वत:बद्दल उदारमतवादी दृष्टीकोण बाळगणे. हा अकरावा प्रकार आहे.
आम्ही अजूनही यादी देऊ शकलो असतो. पणे हे अकरा मुख्य प्रकार आहेत.
या सर्व उदारमतवादाच्या अभिव्यक्ती आहेत.
एका क्रांतिकारक समुदायामध्ये उदारमतवाद अतिशय धोकादायक आहे. ही अशी क्षरणकारी शक्ती आहे जी एकतेला खाऊन टाकते, संलग्नतेला क्षीण करते, अनुत्साह निर्माण करते आणि तंटा निर्माण करते. क्रांतिकारी फळीला ती तिच्या आटोपशीर संघटनेपासून, कडक शिस्तीपासून दूर करते, धोरणांच्या अंमलबजावणीला अटकाव करते, आणि ज्या जनतेचे पार्टी नेतृत्व करत आहे, त्या जनतेपासून पार्टी संघटनेला दूर करते.
उदारमतवाद हा निम्न-भांडवली स्वार्थातून निर्माण होतो, तो वैयक्तिक हित अगोदर आणि क्रांतीचे हित नंतर बघतो, आणि यातूनच विचारधारात्मक, राजकीय आणि सांघटनिक उदारमतवादाचा जन्म होतो.
जे लोक उदारमतवादी आहेत ते मार्क्सवादी तत्वांना एक अमूर्त श्रद्धा म्हणून बघतात. ते मार्क्सवादाला मान्यता देतात, पण त्याच्यावर व्यवहार करायला किंवा त्यांना पूर्णत: व्यवहारात उतरवायला तयार नसतात; ते स्वत:च्या उदारमतवादाऐवजी मार्क्सवाद स्विकारायला तयार नसतात. या लोकांकडे त्यांचा मार्क्सवाद तर असतो, आणि स्वत:चा उदारमतवाद पण असतो — ते मार्क्सवादाबद्दल बोलतात, पण व्यवहार उदारमतवादी करतात; ते इतरांना मार्क्सवाद लागू करतात आणि स्वत:ला उदारमतवाद. ते दोन्ही प्रकारचा माल साठ्यामध्ये ठेवतात आणि प्रत्येकाचा वापर शोधतात. काही लोकांचा मेंदू असं काम करतो.
उदारमतवाद हा संधीसाधूपणाची अभिव्यक्ती आहे आणि त्याचा मार्क्सवादासोबत मुलभूत अंतर्विरोध आहे. हा नकारार्थी आहे आणि वस्तुगतरित्या शत्रूला मदत करणारा आहे, यामुळेच शत्रू आपल्यामधील उदारमतवादाचे स्वागत करतो. याचे असे स्वरूप असल्यामुळे, क्रांतिकारी फळ्यांमध्ये याला कुठलीच जागा नसली पाहिजे.
नकारात्मक उदारमतवादा विरोधात आपण मार्क्सवाद स्विकारला पाहिजे, जो चेतनेने सकारात्मक आहे. एका कम्युनिस्टाचे मन विशाल असले पाहिजे आणि त्याने खंदा व सक्रीय असले पाहिजे, क्रांतीच्या हितांना स्वत:चे जीवन मानून आणि क्रांतीच्या हितांसमोर वैयक्तिक हितांना अधीन केले पाहिजे; त्याने सतत आणि सगळीकडे तत्वांचे पालन केले पाहिजे आणि चुकीच्या कल्पना व कृतींविरोधात अथक संघर्ष चालवला पाहिजे, जेणेकरून पार्टीमध्ये सामुदायिक जीवन बळकट होईल आणि पार्टी व जनतेमधील बंध मजबूत होतील; पार्टी आणि जनतेबद्दल कोणत्याही खाजगी व्यक्तीपेक्षा त्याने जास्त चिंतीत असले पाहिजे, आणि स्वत:पेक्षा इतरांबद्दल जास्त चिंतीत असले पाहिजे. फक्त अशाप्रकारे तो स्वत:ला कम्युनिस्ट समजू शकतो.
सर्व एकनिष्ठ, प्रामाणिक, सक्रीय आणि सचोटीच्या कम्युनिस्टांनी आपल्यातील काही लोकांमध्ये असलेल्या उदारमतवादी प्रवृत्तींविरोधात एकत्र आले पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे. हे आपल्या विचारधारात्मक आघाडीवरचे एक कार्य आहे.