आंदोलनाचा परिणाम: बांधकाम कामगारांच्या रखडलेल्या नोंदण्या पुन्हा चालू!
महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या नेतृत्वात बांधकाम कामगार होताहेत संघटित!
बिगुल पत्रकार
महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनतर्फे 31 ऑगस्ट 2020 रोजी केलेल्या आंदोलनाच्या परिणामी कामगारांच्या रखडलेल्या नोंदण्या पुन्हा चालू झाल्या आहेत आणि शेकडो कामगारांच्या नोंदण्या पूर्ण होऊन त्यांना नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे.
पुणे शहरातील कात्रज, बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपो कामगार नाका, गोकुळ नगर कामगार नाका, कात्रज कामगार नाका आणि दत्तनगर कामगार नाका येथे काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांनी रखडलेल्या नोंदण्या पूर्ण व्हाव्यात आणि “रोजगाराच्या हमीचा” कायदा सरकारने करावा या मागण्यांना घेऊन 31 ऑगस्ट 2021 रोजी भव्य आंदोलन केले होते. पुणे शहरातील मजुर अड्ड्यांवरील कामगारांनी कामगार नाके बंद ठेवून, संप करून केलेले हे पहिलेच आंदोलन होते.
कामगारांचा प्रचंड संताप आणि एकजूट पाहता कामगार आयुक्त कार्यालयातर्फे नोंदणी प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आंदोलनाच्या पुढील आठवड्यांमध्येच सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मजुर नाक्यांवर हजेरी लावून कामगारांना नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि ऑनलाईन अर्ज कसे भरावेत याबद्दलही मांडणी केली. यानंतर युनियन द्वारे केलेल्या नोंदण्या ज्या रखडवलेल्या होत्या त्यापैकी दोनशेच्या वर कामगारांच्या नोंदण्या पूर्ण होऊन त्यांना नोंदणी कार्ड आणि टूलकिटची पेटी आता मिळाली आहे.
या निमित्ताने बोलताना युनियनचे अध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी मांडले की बांधकाम कामगारांची मजुरी बुडवली जाणे सर्रास होत असते आणि विशेषत: लॉकडाऊन नंतरच्या काळात यात मोठी वाढ झाली आहे. युनियनने या संपूर्ण काळात कामगारांच्या वतीने हस्तक्षेप करत ठेकेदार-बिल्डराना युनियनच्या शक्तीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करवून देत शेकडो कामगारांच्या बुडवलेल्या मजुरी पुन्हा मिळवून दिल्या आहेत. काही कामगारांची प्रकरणे कामगार आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहेत आणि त्यांचा नियमित पाठपुरवठा चालू आहे.
नोंदणी प्रक्रिया पुन्हा चालू झाल्यामुळे, आणि मजुरी वसूल करण्याच्या अनुभवातून लढल्या शिवाय काहीच मिळत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे आणि लढून जिंकल्याच्या उत्साहामुळे, तसेच युनियनच्या लोकशाही कारभाराच्या पद्धतीमुळे युनियनच्या सदस्यसंख्येमध्ये जोमाने वाढही होत आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन ही त्या मोजक्या युनियन्सपैकी अशी असंघटित क्षेत्रातील युनियन आहे जी नियमितपणे कामगारांच्या स्तरोन्नयनाकरिता, शिक्षणाकरिता विविध मुद्यांवर अभ्यासवर्ग आयोजित करत असते; त्यासोबतच जनपक्षधर डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय शिबिरे, आणि बांधकाम कामगारांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या सामाजिक-राजकीय मुद्यांवर सतत आंदोलनही करत असते असेही त्यांनी मांडले. गेल्या 3 महिन्यांमध्ये युनियनने सतत कामगारांकरिता बेरोजगारी, महागाई, शेतकरी आंदोलनाचे धनिक शेतकरी धार्जिणे वर्ग चरित्र अशा प्रश्नांवर अभ्यासवर्गांचे आयोजन केले आहे. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात, जातीय अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासोबतच एस.टी. कामगारांच्या संपाला सक्रिय पाठिंबा सुद्धा दिला आहे आणि कामगार एकजुटीला पुढे नेले आहे. युनियनचे कामकाज लोकशाही पद्धतीनेच चालते आणि कामगार कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातूनच सतत विस्तार झाला आहे आणि आता एक हजारांवर कामगार युनियनचे सदस्य झाले आहेत असेही परमेश्वर यांनी मांडले.
ऑनलाईनचा आग्रह सोडून सरकारने नोंदणी मजूर नाक्यावर येऊन केली पाहिजे ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही; तसेच प्रत्येकाला रोजगाराच्या अधिकाराची मागणी ही कामगारांची सर्वात प्रमुख मागणी आहे. परंतु या मागण्यांना मिळवायचे असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगारांची एकजूट साध्य केल्याशिवाय आणि झुंझार लढा उभा केल्याशिवाय ही मागणी पूर्ण होऊच शकत नाही याची जाणीव आम्हाला आहे, महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन त्याकरिता कटिबद्ध आहे आणि येत्या काळात इतर समविचारी संघटनांसोबत मिळून या मागणीभोवती निरंतर वाढत जाणारे आंदोलन युनियन उभे करेल असा विश्वासही परमेश्वर यांनी व्यक्त केला.