पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प नववे)
आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.
कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले. पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.
पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या मार्च 2021 अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात केली आहे. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.
या साखळीतील पहिल्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणून घेतले की कामगारांनी कशाप्रकारे भांडवलाच्या सत्तेविरोधात लढण्याची सुरूवात केली आणि कशाप्रकारे चार्टीस्ट आंदोलन आणि 1848 च्या क्रांत्यांमधून जात कामगार वर्गाची चेतना आणि संघटितपणा वाढत गेला. आपण कामगारांच्या मुक्तीच्या वैज्ञानिक विचारधारेचा विकास आणि कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल (इंटरनॅशनलबद्दल) जाणले. गेल्या अंकात आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशाप्रकारे झाली आणि तिच्या रक्षणाकरिता कामगार वर्गीय जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. आपण हे देखील पाहिले की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या नियमांना इतिहासात पहिल्यांदा व्यवहारात कसे लागू केले आणि हे दाखवले की “जनतेची सत्ता” खरोखर काय असते. आता आपण त्या चुकांवर नजर टाकूयात ज्यांच्यामुळे कम्युनचा पराजय झाला. या चुकांना योग्य रितीने समजणे आणि भांडवलशाही विरोधात निर्णायक लढाईत विजयासाठी त्यातून धडे घेणे कामगारवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे.
— संपादक मंडळ
कामगार वर्गासाठी पॅरिस कम्युनचे ऐतिहासिक धडे
-
कम्युनने जी ऐतिहासिक पाऊले उचलली, त्यांना ती खूप पुढे नेऊ शकली नाही. तिच्या जन्मापासूनच कम्युन शत्रूंनी घेरलेली होती, जे तिला नेस्तनाबूत करण्यासाठी टपलेले होते. ‘कम्युनिस्ट घोषणापत्रा’तील शब्दांनुसार म्हाताऱ्या युरोपला जे “कम्युनिझमचे भूत” 1848 पासूनच सतावत होते, त्याला पॅरिस मध्ये वास्तवात उभे राहताना पाहून भांडवलदार वर्गाचे काळीज थरथर कापायला लागले. कम्युनला नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्या प्रतिक्रियावादी शक्ती एकत्र आल्या. पॅरिसच्या कामगारांच्या विद्रोहाच्या ठीक अगोदर मार्क्स आणि एंगल्स यांचे आकलन होते की अजून परिस्थिती तयार झालेली नाही. त्यांचे असे म्हणणे होते की क्रांती अजून चांगली तयारी झाल्यावर सुरू केली पाहिजे. पण जेव्हा कम्युन अस्तित्वात आली तेव्हा त्यांनी तिचे क्रांतीचे अभिवादन आणि जोरदार समर्थन केले. मार्क्सने समाजवादाच्या त्या बाल्यावस्थेतील प्रयोगाचा बारकाईने चांगला अभ्यास केला, जो पॅरिसच्या कामगारांनी आपल्या पुढाकाराने आणि सामुदायिक रचनात्मकतेवर उभा केला होता. यासोबतच मार्क्स कम्युनच्या भवितव्याबाबत कायम चिंतेत होते आणि आपल्या संपर्काव्दारे तसेच आंतरराष्ट्रीयच्या फ्रांस शाखेव्दारे कम्युनला सतत प्रस्ताव पाठवत होते.
- मार्क्स हे स्पष्टपणे समजून चुकले होते की, बिस्मार्कची प्रशियाई फौज जी पॅरिस शहरा जवळ उभी होती, ती कम्युनला चिरडण्यासाठी एकतर थियेरला मदत करेल किंवा स्वत:च पॅरिसवर चाल करेल. म्हणून ते सतत प्रस्ताव देत होते की,पॅरिस कम्युनचा विजय कायम करण्यासाठी पॅरिसच्या कामगार फौजेने पॅरिस मधील प्रतिक्रांतिकारी फौजेला चिरडून आणि न थांबता व्हर्सायच्या दिशेने आगेकुच केली पाहिजे; तेच व्हर्साय जे थियेर सरकार सहीत पॅरिस मधील श्रींमत लोकांचे आश्रयस्थळ बनले होते. त्यांचे म्हणणे हे होते की, यामुळे कम्युनचा विजय पक्का झाला असता आणि कामगार क्रांती पूर्ण देशात पसरली असती. हे रहस्य तर नंतर उलगडले की थियेर जवळ त्यावेळी एकूण फक्त 27 हजार हिंमत हारलेली फौज होती ज्यांना पॅरिसच्या एक लाख “नॅशनल गार्ड”ने चुटकीसरशी धुळ चारली असती.
मार्क्सने कम्युनच्या प्रमुख नेत्यांना, फ़्राकेल आणि वाल्या यांना, सावध केले होते की पॅरिसला घेरण्यासाठी थियेर आणि प्रशियाई लष्कर यांच्या मध्ये सौदेबाजी होऊ शकते. तरी प्रशियाई सेनेला मागे ढकलण्यासाठी मोतंमात्र डोगंराच्या उतारावरील बाजूला नाकेबंदी केली पाहिजे. मार्क्स या गोष्टीमुळे खूप चिंतेत होते की कम्युन वाले फक्त आणि फक्त आपल्या बचावासाठी किंमती वेळ वाया घालवत आहेत आणि व्हर्साय वाल्यांना त्यांच्या सैन्यबळाची तटबंदी उभी करायची संधी देत आहेत. त्यांनी कम्युनार्डांना लिहिले की प्रतिक्रियावादीची गुहा उध्वस्त करून टाका, फ्रेंच राष्ट्रीय बॅंकेचा खजिना ताब्यात घ्या आणि क्रांतिकारी पॅरिस साठी प्रांतांचे समर्थन प्राप्त करा. -
मार्क्सला हे स्पष्टपणे दिसत होते की, वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित एका पक्षाचा अभाव त्या ऐतिहासिक परिस्थितीमध्ये कम्युनच्या कामांना वाईट प्रकारे प्रभावित करत होता. आंतरराष्ट्रीयची फ्रांसची शाखा कामगार वर्गाची राजकीय अग्रदल बनू शकली नाही. तिच्यात मार्क्सवादी विचार असलेल्या लोकांची संख्या सुद्धा कमी होती. फ्रेंच कामगारांमध्ये सैद्धांतिक बाजू सुद्धा खूप कमजोर होती. त्यावेळेपर्यंत ‘कम्युनिस्ट घोषणापत्र’, ‘फ्रांसमध्ये वर्ग संघर्ष’, ‘भांडवल’, इ. मार्क्सच्या प्रमुख रचना सुद्धा फ्रेंच भाषेमध्ये प्रकाशित झाल्या नव्हत्या. कम्युनच्या नेतृत्वामध्ये खूप सारे ब्लांकीवादी आणि प्रुधोंवादी सामील होते जे मार्क्सवादी सिद्धांत जाणत नव्हते, किंवा विरोधात होते. सामान्य कामगारांनी धक्का दिल्यावर त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली आणि खूप साऱ्या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या आणि येणाऱ्या पुढील कामगार क्रांत्यांसाठी बहुमोल शिकवणही दिली; परंतु आपल्या राजकीय चेतनेच्या कमतरतेमुळे त्यांनी खूप चुका सुद्धा केल्या.
कम्युनार्डांची एक मोठी चूक ही होती की ते शत्रूच्या शांततेच्या वाटाघाटींच्या फसवणुकीचे शिकार झाले आणि त्यादरम्यान शत्रूने युद्धाची तयारी पूर्ण केली. शत्रूचा पूर्णपणे नायनाट न करणे, व्हर्साय वर हल्ला न करणे आणि क्रांतीला पूर्ण देशात पसरू न देणे ही सगळ्यात मोठी चूक होती आणि सत्य हे आहे की नेतृत्वात मार्क्सवादी विचारधारेच्या अभावामुळे ह्या चुका होणारच होत्या. - मार्क्सने नंतर लिहिले की, “जेव्हा व्हर्साय आपल्या शस्त्रांना धार लावत होते तेव्हा पॅरिस मतदान करत होते; जेव्हा व्हर्साय युद्धाची तयारी करत होते तेव्हा पॅरिस वाटाघाटी करत होते. ” याचा परिणाम असा झाला की, 1871 चा मे उजाडेपर्यंत थियेरच्या सैनिकांनी पॅरिसवर हल्ला चढवला होता. व्हर्सायच्या लुटखोरांच्या भाडोत्री सेनेचा तर कम्युनार्डांनी ठामपणे प्रतिकार केला आणि एकावेळेला तर त्यांना मागे ढकलले सुद्धा; परंतु व्हर्सायची सेना पॅरिसला घेराव घालून गोळीबार करत राहिली. याच वेळी फ्रान्सने कैद केलेल्या हजारो कैद्यांना मुक्त करून प्रशियाने थियेरला मोठी मदत केली. थियेरची सेना दक्षिण बाजूचे दोन किल्ले जिंकून पॅरिसच्या उंबरठ्यावर पोहचली. प्रशियाच्या सेनेने सुध्दा पुढे जाण्यासाठी त्यांची अप्रत्यक्ष मदत केली. 21 मे 1871 ला व्हर्सायचे डाकू आपले खाटकाचे सुरे घेवून पॅरिस मध्ये घुसले. शहराच्या चौका-चौकात आणि विशेषत: कामगार वस्त्यांमध्ये घनघोर लढाई झाली.
-
शहरातील चौका-चौकात आणि विशेषत: कामगार वस्त्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी 8 दिवसांच्या शौर्यशाली संघर्षानंतर पॅरिसचे शूर कामगार योद्धे पराजित झाले. या खूनी आठवड्यात 30,000 कामगार कम्युनचे रक्षण करताना शहीद झाले. विजयी प्रतिक्रियावाद्यांनी रस्त्यांवर जे तांडव केले ते आश्चर्यकारक होते. नागरिकांना रांगेत उभे करून हातावर पडलेले घट्टे पाहून कामगारांना वेगळे करून गोळी मारत असत. पकडलेल्या लोकांव्यतिरिक्त चर्चमध्ये शरण घेतलेले लोक आणि हॉस्पिटलमधले जखमी सैनिक यांना सुद्धा गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांनी म्हाताऱ्या कामगारांना हे सांगून गोळ्या घातल्या की “यांनी वेळो-वेळी बंड केली आहेत आणि हे खरे सरावलेले अपराधी आहेत.” स्त्री कामगारांना असे म्हणत गोळ्या घातल्या की, “स्त्रिया म्हणजे अग्नी-बॉंब आहेत” आणि या फक्त मेल्यानंतर “स्त्री सारख्या” वाटतात. बाल कामगारांना हे म्हणत गोळी घातली की हे “मोठे होवून बंडखोर बनतील.” हा नरसंहार पूर्ण जून महिन्यापर्यंत चालू होता. पॅरिस प्रेतांनी भरले होते. सैन नदी रक्ताची नदी झाली होती
-
कम्युनला रक्ताच्या समुद्रात बुडवून टाकले गेले. कम्युनार्डांच्या रक्ताच्या इतिहासाने कामगारासाठी कटू शिकवण लिहिली गेली की कामगार वर्गाला शेवटपर्यंत लढले पाहिजे. सत्ता शांतीने मिळणार आणि शांतीने तिचे रक्षणही होणार नाही. कम्युनची ही शिकवण आहे की पळणाऱ्या डाकूचा शेवटपर्यंत पाठलाग केला पाहिजे, पाण्यात बुडणाऱ्या उंदराला किनाऱ्यावर येण्याची संधी दिली नाही पाहिजे, शत्रूला दम घेवू दिला नाही पाहिजे आणि तोपर्यंत थांबता कामा नये जोपर्यंत भांडवली शत्रू कोणत्याही कोपऱ्यात जिंवत असेल. पॅरिस कम्युन नंतर सुध्दा जगाच्या इतिहासात कामगार वर्ग जेव्हा जेव्हा या शिकवणीला विसरला, तेव्हा तेव्हा त्याला शिकस्त मिळाली.
-
पॅरिस कम्युनच्या शहीदांनी आपल्या रक्ताने एक अमिट इतिहास लिहिला. कामगार वर्गाच्या पुढील क्रांत्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी बहुमूल्य शिक्षण दिले आणि आपल्या शहादतीच्या प्रकाशात एक दीपस्तंभ उभा केला.
कम्युनच्या जीवन काळात मार्क्सने लिहिले होते. : “जरी कम्युनला नष्ट केले तरी संघर्ष फक्त स्थगित होईल, कम्युनचे सिद्धांत शाश्वत आणि अमर आहेत; जो पर्यंत कामगार वर्ग मुक्त होत नाही तोपर्यंत हे सिद्धांत सतत प्रकट होत राहतील.” कामगारांचे पहिले हत्यारबंद बंड आणि कामगारांच्या पहिल्या सर्वहारा सत्तेचे महत्त्व सांगत मार्क्सने म्हटले होते. “18 मार्चचे गौरवशाली आंदोलन मानव जातीला वर्ग शासनापासून नेहमी करता मुक्त करणाऱ्या महान सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे. - पॅरिस मध्ये कम्युनच्या पराजयाच्या दोन दिवसांनंतर मार्क्सने 30 मे 1871 ला आंतरराष्ट्रीयच्या सामान्य परिषदेच्या बैठकीत कम्युनचे मुल्यांकन करत एक अहवाल वाचला होता. हा रिपोर्ट ‘फ्रांस मध्ये गृहयुद्ध’ या शीर्षकाने प्रसिध्द कृती आहे; आणि ती आजही आपल्यासाठी एक महत्वाचे पुस्तक आहे.
मार्क्सने कम्युनच्या परिस्थितीचा, कारणांचा आणि अनुभवांचा सार काढून हा निष्कर्ष काढला की “कामगार वर्ग राज्यसत्तेच्या तयार यंत्रणेला जसेच्या तसे हातात घेवू शकत नाही, आणि तिला आपला हेतू साध्य करण्यासाठी वापरू शकत नाही. त्यांनी सांगितले की कामगार वर्गाने जुन्या राज्य यंत्रणेला तोडण्यासाठी आणि नेस्तनाबूत करण्यासाठी क्रांतिकारी हिंसेचा वापर केला पाहिजे आणि कामगारवर्गाचे अधिनायकत्व लागू केले पाहिजे.” - अशा प्रकारे मार्क्स आणि एंगल्सने पॅरिस कम्युनच्या अनुभवांच्या आधारे क्रांतीच्या विज्ञानात एक महत्त्वपूर्ण भर घातली. जसे की, लेनिनने म्हटले की मार्क्सवादी म्हणजे तो नाही जो वर्ग संघर्ष मानतो, तर तो जो वर्ग संघर्षासोबत कामगारवर्गाचे अधिनायकत्व सुद्धा मानतो.
मार्क्सने बुर्झ्वा आणि कामगारवर्गीय राज्यसत्तेच्या प्रश्नावर जो महत्वाचा विचार ठेवला आणि लेनिनने ज्याला पुढे नेले, त्याचा स्पष्ट प्रस्थानबिंदू पॅरिस कम्युनच्या शिकवणीतच आहे. मार्क्सने हे स्पष्ट केले होते की सर्वहारा अधिनायकत्वाचा पहिला अवयव कामगार वर्गाची सेना आहे. कामगार वर्गाला आपल्या मुक्तीचा अधिकार युद्धभूमीत मिळवावा लागेल.
पॅरिस कम्युनच्या अपयशाचा सार काढत मार्क्स आणि एंगल्स यांनी हे अधिक स्पष्ट केले की कामगार वर्गाला सत्ता शस्त्रबळाने मिळते आणि त्याच्या सहाय्यानेच ती कायम राहू शकते. ती तेव्हाच टिकू शकते जेव्हा बुर्झ्वा वर्गाची सत्ता नष्ट झाल्यावर सुद्धा त्यांना परत सांभाळण्याची संधी दिली जाणार नाही आणि त्याचा समूळ नाश करण्यासाठी शेवटपर्यंत लढाई लढली जाईल.