पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (दहावे पुष्प )

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.
कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.
पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.
पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या मार्च 2021 अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात केली आहे. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.

या लेखमालेतील सुरूवातीच्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणले की भांडवलाच्या सत्तेविरोधात कामगारांचा संघर्ष कशाप्रकारे पावलोपावली विकसित झाला. आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशी झाली आणि तिच्या रक्षणासाठी कामकरी जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. आपण हे सुद्धा पाहिले की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या तत्वांना इतिहासात पहिल्यांदा लागू कसे केले आणि हे पण दाखवले की “जनतेची सत्ता” वास्तवात कशी अस्ते. गेल्या पुष्पामध्ये आपण हे पहात होतो की कम्युनचा पराजय कोणत्या कारणांमुळे झाला. या चूकांनी नीट समजणे आणि भांडवलशाहीच्या विरोधात निर्णायक लढाईत त्यांच्यापासून धडे घेणे कामगार वर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे.
— संपादक मंडळ

    1. .

      कम्युनच्या लाल झेंड्याखाली भांडवलदारांच्या सैन्याशी निकराचा सामना करण्यासाठी एकत्र आलेले नॅशनल गार्डचे सैनिक आणि पॅरिसचे शूर कामगार.

      कम्युनचे सभासद बहुमत (म्हणजे ब्लांकीवादी, ज्याची राष्ट्रीय गार्डच्या केंद्रीय समितीत मुख्य भूमिका होती) आणि अल्पमत (म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघ, प्रथम इंटरनॅशनलचे सदस्य, ज्यामधे मुख्यत: प्रुधोचे समाजवादी मत असलेले अनुयायी होते) यामध्ये विभागलेले होते. ब्लांकीवाद्यांचे मोठे बहुमत केवळ क्रांतिकारी कामगारांच्या सहज-प्रवृतीमुळे समाजवादी होते. त्यांच्यापैकी काही लोकांजवळच तुलनात्मकदृष्ट्या जास्त सैद्धांतिक समज होती. त्यामुळेच ही गोष्ट समजली जाऊ शकते की आर्थिक क्षेत्रात बरेचसे असे काम झाले नाही जे कम्युनने करायला पाहिजे होते. कम्युनचे कामगार बँक ऑफ फ्रान्सच्या दरवाज्यापुढे एखाद्या देवस्थानाप्रमाणे अदबीने उभे होते या गोष्टीवर मार्क्सने आपली उद्विग्नता व्यक्त केली. ही एक मोठी राजकीय चूक होती. कम्युनच्या हातात बॅंक असणे म्हणजे दहा हजार कैद्यांपेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट होती. असे झाले असते तर संपूर्ण फ्रेंच भांडवलदार वर्ग व्हर्साय सरकारवर कम्युनशी तडजोड करण्यासाठी दबाव टाकु शकला असता. परंतु या चुकी व्यतिरिक्त ब्लांकीवादी आणि प्रुधोवादी यांच्या द्वारे गठीत कम्युनने जे केले ते बहुतांशी योग्यच होते. कम्युनचे प्रुधोवादी सदस्य कम्युनच्या आर्थिक आदेशांसाठी, त्याच्या प्रशंसनीय आणि अप्रशंसनीय अशा दोन्ही पैलूंसाठी मुख्यतः जबाबदार होते. कम्युनच्या राजकीय कारवाया तथा चुकांसाठी मुख्यतः ब्लांकीवादी सभासद जबाबदार होते आणि मजेशीर गोष्ट ही आहे की या दोघांनीही त्यावेळेच्या परिस्थितीत आपापल्या विचारधारेच्या अगदी उलट कार्य केले.

    2. बॅरिकेड वर संघर्षासाठी तयारीत असलेली पॅरिसची कामकरी जनता. पॅरिस कम्युनच्या बहादुर रक्षकांनी शहरामध्ये कामगार वर्गाची पोलादी सत्ता कायम केली आणि बुर्जुआ वर्गाला कुठलीही सवलत दिली नाही, परंतु ते हे विसरले की पॅरिसच्या बाहेर थियेरच्या मागे फक्त फ्रांसचे नाही तर पूर्ण युरोपचे प्रतिक्रियावादी एकत्र होत आहेत. या चुकीची किंमत कम्युनला आपल्या रक्ताने चुकवावी लागली.

      लहान शेतकरी आणि कारागिरांचा समर्थक प्रुधो संघबध्दतेशी कठोर घृणा करत होता. त्याचे म्हणणे होते की संघबध्दतेमध्ये चांगल्या पेक्षा वाईट गोष्टी जास्त आहेत कारण ते कामगाराच्या स्वतंत्रतेसाठी बंधन आहे. केवळ मोठ्या प्रमाणातील उद्योग आणि संस्थांमध्ये, उदाहरणार्थ रेल्वेमध्ये, ज्याला प्रुधोने अपवाद म्हटले, तिथेच कामगारांचा संघ उपयुक्त होता. परंतु 1871 मध्ये कलात्मक कारागिरीचे केंद्र असलेल्या पॅरिसमध्ये सुद्धा मोठ्या आकारातील उद्योग अपवाद राहिला नव्हता. कम्युनच्या तुलनात्मकदृष्ट्या सर्वात महत्वपूर्ण आदेशपत्राव्दारे मोठ्या आकारातील उद्योगाचे, मॅनुफॅक्चरचे सुद्धा संघटन उभे केले गेले जे केवळ प्रत्येक कारखान्यातील कामगार संघावरच आधारीत नसेल. उलट या सर्व संघांना एका मोठ्या युनियन मध्ये सामील करायचे होते, म्हणजेच एक अशी संघटना जिने अनिवार्यतः शेवटी कम्युनिझम, म्हणजेच प्रुधोच्या मताच्या अगदी उलट अशा गोष्टीच्या विकासाचा मार्ग मोकळा केला असता

    3. कम्युनच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभ्या केलेल्या बॅरिकेडची मोठी भुमिका होती. वरील चित्रात जनतेने बनवलेले एक मशिन दाखवले आहे. त्याचा उपयोग बॅरिकेड बनवण्यासाठी केला जात होता.

      एका बॅरिकेडवर तैनात नॅशनल गार्डचा योद्धा लाल झेंड्या सोबत.

      ब्लांकीवाद्यांसाठी क्रांतीचा अर्थ होता षडयंत्र. त्यांचा हा दृष्टीकोन होता की तुलनेने थोडे दृढसंकल्प असलेले आणि संघटित लोक योग्य संधी मिळताच राज्याची यंत्रणा आपल्या हातात घेवू शकतात आणि जबरदस्त व कठोर शक्तीचे प्रदर्शन करत तोपर्यंत सत्तेला आपल्या मुठीत ठेऊ शकतात जोपर्यंत ते सामान्य जनतेला क्रांतीपर्यंत आणत नाहीत तसेच त्यांना नेत्यांच्या एका छोट्या गटाभोवती एकत्र करण्यात यश येत नाही. याचा अर्थ असा होतो की नव्या क्रांतिकारी सरकारच्या हातात संपूर्ण सत्ता कठोर स्वरूपात केंद्रीत असली पाहिजे. पण वास्तवात ब्लांकीवाद्यांचेच बहुमत असलेल्या कम्युनने काय केले? प्रांतांमध्ये वसलेल्या फ्रान्सच्या जनतेच्या नावाने केलेल्या आपल्या सर्व घोषणांमध्ये त्यांनी आवाहन केले की त्यांनी पॅरिस सोबत सगळ्या फ्रेंच कम्युनचा एक संघ बनवावा, एक अशी राष्ट्रीय संघटना बनवावी, जी प्रथमच स्वतः राष्ट्राद्वारे निर्मित केली जाईल.

    4. कम्युन सुरवातीपासूनच हे जाणत होता की कामगारांच्या हातात एकदा सत्ता आल्यानंतर तो जुन्या राज्य यंत्रणेद्वारे काम चालवू शकत नाही. त्यांना हे समजले होते की आपले प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी कामगार वर्गाने एकीकडे आतापर्यंत त्याच्याविरुद्ध वापर केल्या जात असलेल्या जुन्या दमनकारी राज्यतंत्राला नष्ट केले पाहिजे आणि दुसरीकडे कम्युनने आपले प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांपासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी हे घोषित केले पाहिजे की ते कोणालाही, विना अपवाद, कोणत्याही क्षणी हटवू शकतात. कम्युनच्या पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकारी आणि न्यायाधीशापर्यंत सगळे जनतेद्वारे निवडले जात होते आणि त्यांना हटवले जावू शकत होते.
    5. पॅरिसच्या एका स्मशानभूमीत कामगारांनी शेवटची आघाडी लढली.

      पॅरिस कम्युन फ्रांस मधील सर्व मोठ्या औद्योगिक केंद्रांसाठी उदाहरण बनणार होते. पॅरिस तथा माध्यमिक केंद्रांमध्ये सामुदायिक शासन व्यवस्थेची एकदा स्थापना झाल्यानतंर प्रांतांमध्येसुद्धा जुन्या केंद्रीय सरकारला हटवून तेथे उत्पादकांचे स्वशासन कायम झाले असते. राष्ट्र बांधणीच्या एका प्राथमिक साच्यात, ज्याला विस्तृत बनवण्यासाठी कम्युनला वेळ मिळू शकला नाही, कम्युनने हे स्पष्ट स्वरूपात सांगितले होते की छोट्यात-छोट्या मोहल्ल्याचा राजकीय साचा कम्युन असेल आणि ग्रामीण भागात स्थायी सेनेचे स्थान राष्ट्रीय मिलीशिया घेईल, तिची सेवा अवधी अल्पकालीन असेल. प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण कम्युन आपल्या केंद्रीय नगरामध्ये, प्रतिनिधींच्या सभेद्वारे आपल्या समाविष्ट मुद्द्यांचे नियोजन करेल. या जिल्हा सभा पॅरिस स्थित राष्ट्रीय प्रतिनिधी सभेमध्ये आपले प्रतिनीधी पाठवतील. प्रत्येक प्रतिनिधी कोणत्याही वेळेला परत बोलावला जाऊ शकेल आणि तो आपल्या निर्वाचकांच्या औपचारिक सल्ल्यांना बांधील असेल. कम्युनच्या शासनात राष्ट्राची एकता भंग झाली नसती, उलट कम्युनच्या संविधानाव्दारे ती संघटीत केली गेली असती आणि भांडवली राज्य-सत्तेच्या विनाशाव्दारे वास्तविक राष्ट्रीय एकता कायम झाली असती. जुन्या शासन संस्थेचे जे भाग दमनकारी होते ते वेगळे केले गेले असते, पण त्यांचे कायदेशीर काम समाजाच्या प्रति जबाबदार अभिकर्त्यांच्या हातात सोपवले गेले असते. परंतु या कामांना पुढे नेण्यासाठी कम्युनला वेळ मिळाला नाही.

    6. ज्या क्षणी सर्वहारा आपल्या वेगळ्या हितासाठी आणि आपल्या वेगळ्या मागण्यांना घेऊन एका वेगळ्या वर्गाच्या स्वरूपात उभे राहण्याचे धाडस करेल त्यावेळी सूड घेण्यासाठी भांडवलदार वर्ग कश्या प्रकारे वेडेपणा आणि क्रुरता यांचा नंगानाच दाखवू शकतो हे 1848 च्या क्रांतीवेळी प्रथमच भांडवलदार वर्गाने दाखवून दिले. परंतु 1871 मध्ये भांडवलदारांनी जसा रानटीपणा दाखवला त्या तुलनेत 1848 काहीच नव्हते.

      कम्युनमध्ये मुख्यतः केवळ कामगार किंवा कामगारांचे प्रतिनिधी बसत असत. म्हणून त्यांच्या निर्णयाला, निश्चित रूपाने, सर्वहारा स्वरूप होते. कम्युनने असे अनेक आदेश जारी केले होते जे सरळ-सरळ कामगार वर्गाच्या हिताचे होते आणि काही प्रमाणात जुन्या समाजव्यवस्थेवर मोठा आघात करत होते. परंतु अशा शहरात जे सतत शत्रूच्या छायेत आहे, खूप झाले तर अशा गोष्टींना पूर्ण करण्याची सुरुवातच होऊ शकत होती. मे 1871 च्या सुरवातीपासूनच कम्युनची सर्व शक्ती व्हर्साय-सरकारच्या सतत वाढणाऱ्या सैन्याशी लढाई करण्यात गेली. पॅरिसवर सतत गोळीबार केला जात होता—त्या लोकांकडून ज्यांनी प्रशियाच्या सैन्याने या शहरावर केलेल्या गोळीबाराला धर्म-विरोधी आचरण म्हटले होते. आता तेच लोक प्रशियाच्या सरकारकडे भिक मागत होते की सेदान आणि मेत्ज मध्ये बंदी केलेल्या फ्रेंच सैनिकांना लवकर सोडा जेणेकरून ते येवून पॅरिस वर परत ताबा मिळवतील.

    7. स्त्री कम्युनार्डांची तुकडी पुरुषांच्या खांद्याला-खांदा मिळवत लढाईवर जाताना.

      मे च्या सुरवातीला ते सैनिक हळू-हळू परत आल्यामुळे व्हर्सायच्या सैन्याची शक्ती निश्चितपणे अधिक वाढली होती. व्हर्सायच्या सैन्याने दक्षिण बाजूच्या मोर्च्यावर मूलै-साकेच्या किल्ल्याचा 3 मे ला ताबा घेतला, 9 तारखेला इस्सी-किल्ला त्यांनी ताब्यात घेतला जो गोळीबाराने पूर्णत: भग्न झाला होता, आणि 14 मेला वांव-किल्ला त्यांच्या हाती गेला. पश्चिम मोर्च्यावर ते शहराच्या भिंतींपर्यंत पसरलेल्या अनेक गावांवर आणि इमारतींवर ताबा मिळवत हळू-हळू पुढे जात ते मुख्य संरक्षक किल्ल्यापर्यंत पोहचले.

      लढाईमध्ये जिंकल्यानंतर भांडवली सेनेने कामगारांचे भंयकर दमन करणे सुरू केले. कम्युनच्या लढाऊ स्त्रियांवर सैन्याने आणि अधिकाऱ्यांनी सगळ्यात जास्त राग काढला.

    8. तोडेदार बंदुकीमुळे लोकांना लवकर मारता येत नव्हते; म्हणून शेकडोंच्या संख्येने हरलेल्या लोकांना एकाच वेळी मित्रैयोज (एक प्रकारची मशिनगन) व्दारे गोळी मारून ठार केले जात होते. शेवटचे हत्याकांड झाले त्या पेयर-लाशेजच्या समाधीस्थळी “फेडरलांची भिंत” आजही या गोष्टीच्या मुक पुराव्याच्या स्वरूपात उभी आहे की कामगार वर्ग जेव्हा आपल्या अधिकारासाठी लढण्याचे साहस करत असतो तेव्हा शासक वर्गाच्या अंगात हिंसा संचारते.

      21 मे ला गद्दारीमुळे तथा त्या जागेवर तैनात असलेल्या राष्ट्रीय गार्डच्या हलगर्जीपणामुळे व्हर्सायची सेना शहरामध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली. पॅरिसवासियांनी त्या जागेच्या संरक्षणाचा बंदोबस्त युध्दविरामाच्या अटीवर विसंबून स्वाभाविकपणे ढिला सोडून दिला. याच्या परिणामी पॅरिसच्या पश्चिम भागात, म्हणजेच श्रीमंतांच्या खास भागात प्रतिरोध कमजोर राहिला; परंतु जसजसे आत घुसणारे सैन्य शहराच्या पूर्वेकडील अर्ध्या भागात, म्हणजेच कामगारांच्या भागाजवळ, येत गेले तसतसा खूप जोमाने त्यांचा प्रतिकार केला जाऊ लागला. पूर्ण आठ दिवसाच्या युध्दानंतर कम्युनचे शेवटचे रक्षक बेलवील आणि मेनीलमांतां येथील चढायांवर पराजित झाले. आणि तेव्हा निशस्त्र पुरूष, स्त्रिया आणि मुले यांचे हत्याकांड, जे वाढत्या प्रमाणात पूर्ण एक आठवड्यापासून चालु होते, ते अगदी टोकाला पोहोचले.

    9. .

      कम्यूनच्या रक्षकांचा शेवटचा मोर्चा. पहिल्या कामगार राज्याच्या सुरक्षेसाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले, परंतु ते सर्व बाजूंनी घेरले गेले होते आणि शत्रू त्यांच्यापेक्षा संख्येने खूप मोठा होता.

      जेव्हा सगळ्या लोकांना ठार मारणे अशक्य झाले तेव्हा सामान्य अटकसत्र सुरु झाले आणि कैद्यांमधून मनमर्जीने काहींना पकडून गोळ्यांनी उडवून दिले जाऊ लागले. तर काहींना मोठ-मोठ्या शिबिरात पोहचवले गेले जेथे त्यांना कोर्ट-मार्शलची वाट पहायची होती. पॅरिसच्या उत्तर-पूर्व बाजूला घेराव घातलेल्या प्रशियाच्या सैनिकांना कोणालाही पळून जाऊ न देण्याची आज्ञा होती. परंतु जेव्हा प्रशियन सैनिक या आज्ञेपेक्षा मानवी भावनेचा जास्त आदर करत होते, तेव्हा अधिकारीसुध्दा जाणून-बुजून दुर्लक्ष करत असत. यावेळी सॅक्सन सैन्य पथक विशेष रूपाने माणुसकीने वागले आणि त्यांनी अशा खूप साऱ्या लोकांना तेथून जाऊ दिले जे स्पष्टपणे कम्युनचे शिपाई होते.

      .
      ..पुढील अंकात चालू

       

कामगार बिगुल एप्रिल, 2022