136वा कामगार दिन देशभरात क्रांतिकारी कामगारवर्गाकडून साजरा

बिगुल पत्रकार

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मे दिवसाचा वारसा स्मरून देशभरात क्रांतिकारी कामगार संघटनांनी कामगारांच्या एकजुटीचे प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि अहमदनगर येथे कामगार संघटनांनी कामगार दिवसाच्या इतिहासाला उजाळा दिला. पुण्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनने अप्पर डेपो येथे “कामगार दिन रॅली” आयोजित केली होती. ह्या रॅलीत शेकडो कामगारांनी सहभाग घेतला होता. “कामगार दिन चिरायू होवो”, “कामगार एकजूट जिंदाबाद”, “इंकलाब जिंदाबाद”च्या जनघोषाने सभोवतालचा परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीमध्ये भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, तसेच स्त्री मुक्ती लिगही सहभागी झाले. यावेळी युनियनचे साथी निमिष ह्यांनी उपस्थित कामगारांसमोर मे दिवसाचा इतिहास मांडला, तसेच कामगार चळवळीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन आज पुन्हा कामगारांनी आणखी झुंजारपणे संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. कॉम्रेड परमेश्वर जाधव ह्यांनी सभेला संबोधित करताना कामगारांनी इतिहासापासून शिकून संघटित होण्याचे महत्त्व मांडले आणि फॅसिस्ट राजवटीत महागाई, बेरोजगारीवरचे लक्ष भरकटवण्यासाठीच जातीय धार्मिक दंगली भडकावल्या जात आहेत असे मांडले. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाकडून (RWPI) रॅलीच्या समर्थनात कॉ. निखिल एकडे ह्यांनी सभेत मांडले की कामगारांनी आज केवळ कामाचे तास कमी करण्यासाठीच नव्हे तर आपले राजकारण उभे करण्यासाठी, आपले राजकीय प्रतिनिधी सत्तेत पोचवण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. स्त्री मुक्ती लीग तर्फे समर्थन जाहीर करताना साथी अश्विनी ह्यांनी स्त्री कामगारांच्या परिस्थितीचे चित्रण केले. स्त्रियांची मुक्ती आणि कामगारांची मुक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, व कामगारांच्या मुक्तिशिवाय स्त्रियांची मुक्ती देखील शक्य नसल्याचे सांगितले. सभेमध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्री मुक्ती लीग तर्फे ‘कहाणी कष्टकरी बाईची’ हे पथनाट्य सादर केले गेले. कामगार चळवळीतील काही क्रांतिकारी गीते देखील सादर करण्यात आली. जोषपूर्ण घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे मानखुर्द-गोवंडीतील वस्त्यांमध्ये सांस्कृतिक संध्येचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान मॉडर्न टाइम्स ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच 1 मे रोजी सांस्कृतिक संध्येसोबत रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले. ह्या संपूर्ण 5 दिवसीय कार्यक्रमाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान सफदर हाशमी लिखित “मशीन” नाटक सादर केले गेले तसेच क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती झाली. तसेच अहमदनगर येथे सिद्धार्थनगर भागात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमधे वस्तीतील कामगार, कष्टकरी सहभागी झाले. कॉ.अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये “आंतरराष्ट्रीय कामगार दिन चिरायू होवो”, “कामाचे तास 6 झालेच पाहिजेत”, “प्रत्येक हाताला काम मिळालेच पाहिजे”, “सर्वांना मोफत, दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कॉ. अतुल ह्यांनी मांडले की कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार फॅसिस्ट मोदी सरकार काढून घेत आहे, जातीयवाद आणि विषारी धर्मवादाचे विष पसरवले जात आहे, याविरोधात व्यापक कामगार, कष्टकरी जनेतेने एकजूट केली पाहिजे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे वाढती महागाई, बेरोजगारी, कामगार कायद्यांवरील आक्रमणाविरोधात आयोजित आंदोलनात दिल्ली स्टेट आंगनवाडी वर्कर्स एण्ड हेल्पर्स यूनियन, बिगुल मजदूर दस्ता, दिल्ली इस्पात उद्योग मजदूर यूनियन, बवाना क्षेत्र औद्योगिक मजदूर युनियन, दिल्ली घरेलू कामगार यूनियनसह इतर विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे दिल्लीतील मंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत रॅलीच्या रूपात हा निषेध करण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने शांतता राखण्याचे कारण देत कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती फेटाळून लावली. मात्र दिल्ली पोलिसांच्या या सर्व डावपेचांना न जुमानता कामगारांनी जंतरमंतरवर यशस्वीपणे आंदोलन आयोजित केले. गुडगावच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनतर्फे सरकारच्या या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कामगारांमध्ये कामगार दिनाच्या दिवशी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.
बिगुल मजदूर दस्ताच्या वतीने उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, गोरखपूर, आंबेडकर नगर, लखनौ, मथुरा यांसह अनेक ठिकाणी मे दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलाहाबाद येथील एन.आर.एम.यू.च्या सभागृहात ‘कामगार दिनाचा वारसा आणि आपले सध्याचे कार्यभार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच अलाहाबाद येथील लेबर चौकात कामगारांमध्ये सभा घेऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले. गोरखपूरच्या बरगदवा औद्योगिक परिसरात बिगुल मजदूर दस्ता आणि टेक्सटाइल वर्कर्स यूनियनच्या वतीने परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मे दिनानिमित्त लखनौच्या खदरा भागात आणि तालकटोरा औद्योगिक परिसरात कोपरा सभा करून पत्रके वाटण्यात आली. मथुरेत चर्चासत्राचे आयोजन केले गेले आणि मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा व जातीयवादाच्या निषेधार्थ मिरवणूक काढण्यात आली. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरनगर जिल्ह्यात भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा (RWPI) तर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटक सादर करण्यात आले. यासोबतच आझमगड जिल्ह्यात आरडब्ल्यूपीआयने कोपरा सभा आयोजित केल्या.
बिगुल मजदूर दस्ताकडून हरिद्वार येथे आणि हरियाणाच्या नरवाना जिल्ह्यात कोपरा सभा आणि जनसंपर्क मोहीम राबवून पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. हरियाणामध्ये क्रांतिकारी मनरेगा मजदूर युनियन आणि आरडब्ल्यूपीआय तर्फे मनरेगा कामगारांमध्ये एक बैठक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान ‘देश पुढे जाऊ द्या’ हे नाटकही सादर करण्यात आले. पाटणा येथे आरडब्ल्यूपीआयच्या कार्यकर्त्यांनी मे दिनानिमित्त सभेचे आयोजन केले.
मे दिनाचा इतिहास असा आहे की 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील लाखो कामगारांनी ‘आठ तास काम, आठ तास विश्रांती आणि आठ तास मनोरंजन’ या राजकीय मागणीसाठी एकत्र येऊन संप करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 11 हजार कारखान्यांतील किमान 3 लाख 80 हजार कामगार संपात सहभागी झाले होते. कामगार संघटित होताना पाहून घाबरलेल्या मालक-भांडवलदारांनीही प्रत्युत्तर म्हणून कामगार वर्गावर वारंवार हल्ले केले. 4मे ला कामगारांच्या सभेवर भांडवलदारांच्या इशार्‍यावर पोलिसांनी बॉम्ब टाकले ज्यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जण जखमी झाले. या खटल्यात पोलिसांनी षडयंत्र करून आठ कामगार नेत्यांना अटक केली आणि त्यापैकी सात जणांना फासावर चढवले. अमेरिकेतील कामगारांच्या या राजकीय संघर्षाला आणि बलिदानाला स्मरून हा कामगार दिन जगभरात साजरा केला जातो. दक्षिण कोरिया, श्रीलंका, कंबोडीया, सर्बिया, टर्की, पाकीस्तान, ग्रीस, फ्रांस, सायप्रस आणि इतर देशांमध्ये हजारो कामगार आणि कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आणि मे दिवसाचा वारसा पुढे चालवला. तुर्कस्तानच्या इस्तांबुल येथे मे दिवसानिमित्त महागाईच्या विरोधात निदर्शने करणार्या 164 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले. फ्रांसमध्ये सामान्य जनतेप्रती निष्क्रीय सरकारच्या विरोधात डाव्या शक्तींनी हजारोंच्या संख्येने जवळपास 250 विरोध प्रदर्शने केली. इटलीच्या रोममध्ये स्लोवाकीया आणि चेक प्रजासत्ताक या देशांमध्ये कामगार आणि विद्यार्थांनी एकत्र येऊन युक्रेनच्या समर्थनात आणि रशियाच्या विरोधात निदर्शने केली. जगभरामध्ये अशाप्रकारे कामगार दिन साजरा केला गेला.
आज कामगार चळवळ जरी दुरूस्तीवाद, अर्थवादाच्या फेऱ्यात अडकून थंडावल्यासारखी दिसत असली तरी कामगार दिनाचा वारसा जगभरातील क्रांतिकारी कामगार विसरलेले नाहीत, आणि शिकागोच्या शहीदांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय रहाणार नाहीत.