आपल्या वाट्याचे आकाश परत मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?
सावित्री-फातिमा अभ्यास गटाच्या कार्यांचा एक अहवाल
✍ ललिता
देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा उघडली तेव्हा त्यांनी एक बीज रोवले. हे बीज एक झाड बनले आणि या झाडाने आपली मुळे दूरवर पसरवली, मुली आणि स्त्रियांना, विशेषत: ऐतिहासिकदृष्ट्या दडपलेल्या जातींतील मुली आणि स्त्रियांना शिक्षण घेण्याचे मार्ग खुले केले. हे झाड, जवळपास दोनशे वर्षांनंतरही फळ देत आहे आणि देशभरात ज्ञानाची बीजे रोवत गेले आहे. जातीवादी समाजाच्या रोषाचा सामना करणाऱ्या दलित, विधवांसाठी या दोघींनी शाळेचे दरवाजे उघडले आणि मुलींना व कामगारांना शिक्षण घेण्यासाठी रात्रीच्या शाळा आणि ग्रंथालये उघडली. फातिमा शेख यांच्यासमवेत सावित्रीबाईंनी एक क्रांती घडवून आणली जिने त्यांनंतर अनेक स्त्रियांना त्यांच्या घरातील अंधारातून बाहेर काढण्यासाठी, प्रगतीच्या प्रकाशात आणण्यासाठी, एक चांगले जग निर्माण करण्यासाठी त्यांच्या स्वप्नांना बळ दिले. फातिमाने सावित्रीबाईंना तिची शाळा चालवण्यासाठी घर वापरण्याचे निमंत्रण दिले आणि ब्राह्मणवादी समाजात समानता आणि न्यायाचा संदेश देणारे बंधन तयार केले. परंतु आज या झाडाच्या वाढीला वाळवीसारखे पोखरण्याचे काम भांडवली-बाजाराची व्यवस्था करत आहे आणि कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या स्त्री-पुरुषांकरिता शिक्षणाचे दरवाजे अधिकाधिक बंद करत आहे.
सावित्री-फातिमाचे स्वप्न जपत, सावित्री-फातिमा यांच्या क्रांतिकारी मैत्रीच्या वारशाचे स्वतःला मशाल वाहक मानणारी ‘स्त्री मुक्ती लीग’ भांडवली चौकटीला आह्वान देत स्त्री-मुक्तीच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे. आपल्यावर राज्य करणाऱ्या भांडवली आणि जातीयवादी फॅसिस्टांना आव्हान देणारी मैत्री वाढवण्याचा स्त्री मुक्ती लीगचा संकल्प दररोज अधिकाधिक वाढत आहे. स्त्री मुक्ती लीग अंधश्रद्धा, अज्ञानाच्या भरतीच्या विरोधात पोहत आहे आणि सत्य, न्याय, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि लैंगिक-समानतेसाठी लढत आहे.
आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. महिलांना त्यांची ओळख, त्यांची स्वप्ने, त्यांचे व्यक्तिमत्व हिरावले जाण्यापासून ते शिक्षण मिळवण्यापर्यंत पावलोपावली अनेक अडथळे आहेत. पितृसत्ताक कुटुंबे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत नाहीत. याच पितृसत्तेच्या विचारांना बळी पडलेल्या स्त्रिया स्वतःच्या स्वप्नांना पायदळी तुडवतात जेणेकरून भांडवली-ब्राह्मणी आणि पुरुषसत्ताक व्यवस्था त्यांच्यावर अत्याचार करत राहील. घरातील काळजीवाहकाच्या पारंपारिक भूमिकेबरोबरच, भांडवली व्यवस्थेत आज स्त्रिला इतरांच्या घरात घरगुती कामगार म्हणून किंवा व्यवसायासाठी कंत्राटी पद्धतीने दररोज 12 तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडले जाते. मालकांच्या आणि इतरांच्या हातून फसवणूक होण्याची शक्यता देखील खूप असते कारण ती आकडे वाचू शकत नाही आणि गणितही करू शकत नाही.
कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या अशाच सर्व महिला साथींसाठी स्त्री मुक्ती लीगने सावित्री फातिमा अभ्यास गट सुरू केले आहेत, जेणेकरुन महिलांना या शोषणकारी व्यवस्थेवर प्रहार करण्याचे शिक्षण मिळावे आणि त्याकरिता आशेचे बीज रोवले जावे. अभ्यास-गटातर्फे आठवड्यातून 2-3 दिवस मुंबईतील मानखुर्द-गोवंडी-शिवाजीनगर भागात रफिक नगर, गौतम नगर आणि साठे नगर येथे वर्ग चालवले जातात. तिन्ही अभ्यास केंद्रांमध्ये, दर आठवड्याला सुमारे 15-20 महिला उत्साहाने वर्गांना उपस्थित राहतात.
ही केंद्रे कोणत्याही सदस्याच्या घरात तात्पुरती जागा मिळवून चालवली जातात. यातून महिलांमध्ये या वर्गांबद्दल हक्काची भावना निर्माण होते आणि अभ्यासासाठी त्यांच्या वेळापत्रकातून त्या वेळ काढू शकतात. एकत्र येऊन सर्वजणी पुस्तक वाचतात, लिहितात आणि अनेक भाषांमधील वर्णमाला शिकण्यासाठी एकत्र अभ्यास करतात. महिलांना वर्गात जे शिकवले जाते त्यापेक्षा अधिक शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शिक्षणाला इतर उपक्रमांनी पूरक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
वर्ग आणि जातीच्या आधारावर शोषणमुक्त जगाची, प्रगती, आशा, समानतेची गाणी सर्व महिला मिळून गातात आणि जग बदलण्याचा निर्धार व्यक्त करतात. हे वर्ग महिलांना इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गणित शिकण्यासाठीच फक्त प्रोत्साहित करत नाहीत तर गोवंडी आणि मानखुर्दमधील महिलांवर परिणाम करणाऱ्या दैनंदिन समस्यांवरही चर्चा करतात. सर्व मिळून हवामान बदलावर चर्चा करतात आणि आसपास असलेल्या विषारी खराब हवेशी या प्रश्नाला जोडून पाहतात. दिल्लीजवळील खोरीगावातील लोकांची घरे पाडण्यापासून ते अंगणवाडी कामगारांच्या आंदोलनापर्यंत, या वर्गांमध्ये शिकणाऱ्या महिला त्यांची मते आणि त्यांची एकता व्यक्त करतात. वैज्ञानिक जाणीवेची गरज आणि समाजाने निर्माण केलेल्या भेदभावकारी लिंगभेदाविषयी सुद्धा सर्व मिळून चर्चा करतात.
मूलभूत जीवन कौशल्ये शिकण्यावर आम्ही जितका जोर देतो, तितकाच महिला, कामगार आणि या समाजाचे कष्टकरी सदस्य म्हणून आपल्यावर परिणाम करणाऱ्या असंख्य समस्यांबद्दलची जाणीव सुद्धा आम्ही स्वतःमध्ये निर्माण करू इच्छितो. अय्यंकाली, दुर्गा भाभी, प्रितिलता वड्डेदार यांसारख्या क्रांतिकारकांच्या संघर्षांची आठवण त्यांच्या जन्मदिनी घडवलेल्या चर्चांमधून केली जाते. महिलांना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर पुस्तके, वर्तमानपत्रे, कविता उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरुन त्यांचे अ-राजकीयीकरण करण्यासाठी निरंतर काम करणाऱ्या पितृसत्ताक शक्तीविरोधात लढता येईल. अभ्यासगटाद्वारे असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया जास्त वेळ काम करतात आणि शेवटी घरातील कामांसाठी घरी येतात त्या सुद्धा वेळ काढतात आणि स्वेच्छेने शिकण्यासाठी येतात.
जोपर्यंत शिक्षण ही केवळ पैसेवाल्यांसाठी असलेली वस्तू राहील, जोपर्यंत रोजगाराचा अधिकार प्रत्येक स्त्री-पुरुषापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत आपल्या जीवनाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारा समाज निर्माण होत नाही, भांडवलाच्या कचाट्यातून जोपर्यंत शिक्षण मुक्त होत नाही, शिक्षणाला अधिकार मानणारा समाज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कामगार-कष्टकरी स्त्रिया कधीही स्वत:ला मुक्त करू शकणार नाहीत. सावित्री फातिमा अभ्यास गट याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
(लेखिका स्त्री मुक्ती लीगच्या कार्यकर्त्या आहेत.)
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022