22 ऑक्टोबर, क्रांतिकारी अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिनानिमित्त
✍प्रवीण एकडे
22 ऑक्टोबर महान क्रांतिकारी अश्फाकउल्ला खान यांचा जन्मदिवस. अश्फाकउल्ला खान यांना आज फक्त एका क्रांतिकारकाच्या रूपात, ज्याने भारतीय स्वातंत्र लढ्यात स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून आठवले जाते. परंतु त्यांच्या राजकीय आणि विचारधारात्मक प्रवासाबद्दल समाजाच्या बहुसंख्य हिश्श्याला कमीच माहिती आहे. बहुसंख्य जनता आजही अश्फाकउल्ला खान यांच्या क्रांतिकारी राजकारणासोबत परिचित नाही. अश्फाकउल्ला खान यांच्या बद्दलच्या महत्वाच्या प्रश्नांवर पडदा पडलेला आहे. जसे की हा प्रश्न की अश्फाकउल्ला खान यांनी कशा समाजाचे स्वप्न बघितले होते ज्यासाठी त्यांनी बलिदान दिले.
22 ऑक्टोबर 1900 रोजी अश्फाकउल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील शाहजहाँपुर जिल्ह्यात एका श्रीमंत जमीनदार घराण्यात झाला. क्रांतिकारी चळवळीमध्ये त्यांचा प्रवेश हा मैनपूरी कटाच्या घटनेनंतर झाला. मैनपूरी कटाच्या घटनेनंतर अश्फाकउल्ला खान यांच्या शाळेवर पोलिसांनी धाड टाकली होती. राजाराम भारतीय या मैनपूरी कटात सहभागी विद्यार्थ्याला पोलिसांनी या शाळेतून अटक केली. या घटनेनंतर अश्फाकउल्ला खान यांनी तेव्हाच्या संयुक्त प्रांतात काम करत असलेल्या क्रांतिकारी गटांसोबत संपर्क करण्यास सुरुवात केली. मैनपूरी कटात सहभागी असलेले रामप्रसाद बिस्मिल यांच्या सोबत सुद्धा त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. 1920 मध्ये मैनपूरी कटातील सर्व आरोपींना सोडून देण्यात आले. रामप्रसाद बिस्मिल सुद्धा शाहजहाँपुरला परत आले. अश्फाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या मैत्रीची सुरुवात याच काळात झाली.
1920 नंतरची पुढची काही वर्षे अश्फाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांनी अनेक ब्रिटिश साम्राज्यवाद विरोधी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. असहकार आंदोलनात सहभागी होण्या पासून ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन च्या साम्राज्यवाद विरोधी क्रांतिकारी कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 9 ऑगस्ट 1925 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन च्या क्रांतिकारकांनी काकोरी येथे ट्रेन लुटली. या कटामध्ये अश्फाकउल्ला खान सहभागी होते. या घटनेनंतर अनेक क्रांतिकारकांना या कटात सहभागी असल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. अटक टाळून अश्फाकउल्ला खान नेपाळला पळून गेले. तिथून ते कानपूरला गेले जिथे त्यांची भेट प्रताप या नामांकित पत्रिकेचे संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांच्याशी झाली. कानपूर नंतर ते झारखंड आणि तिथून दिल्लीला गेले. एक सहकाराच्या गद्दारीमुळे मात्र अश्फाकउल्ला खान पोलिसांच्या तावडीत सापडले. काकोरी कटामध्ये सहभागी क्रांतिकारी अश्फाकउल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल आणि रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 रोजी फासावर लटकवण्यात आले. शहीद राजेंद्र नाथ लाहीरी यांना दोन दिवस आधीच फासावर लटकवण्यात आले होते.
अश्फाकउल्ला खान यांना वाचनाची आवड होती. ते एक कवि सुद्धा होते. हसरत आणि वारसी या नावांनी त्यांनी लिखाण केले आहे. वॉल्टर स्कॉट, थॉमस मकौल्स (macaulays) तसेच लेनिन यांसारख्या अनेक लेखक आणि क्रांतिकारकांचा उल्लेख अश्फाकउल्ला खान यांनी त्यांच्या लिखाणात केला आहे. अश्फाकउल्ला खान यांनी मित्र बनारसीलाल यांना लिहलेल्या पत्रामध्ये रशियाच्या ऑक्टोबर क्रांतीचे नेते लेनिन यांना पत्र लिहण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली होती.
अश्फाकउल्ला खान यांना फासावर लटकवण्याच्या काही दिवस आधी फैजाबादच्या कारागृहातून त्यांनी जनतेला उद्देशून एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी ते कशा प्रकारच्या स्वातंत्रासाठी लढत आहेत हे लिहले आहे. या पत्रात त्यांनी लिहले आहे की त्यांना देशासाठी असे स्वातंत्र्य हवे आहे जिथे गरीब जनता सुद्धा आनंदाने आणि समाधानाने राहू शकेल. पत्रात त्यांनी दोन प्रकारच्या समानतेचा उल्लेख केला आहे. एक आर्थिक समानता आणि दुसरी समाजिक आणि सांस्कृतिक समानता. त्यांना या दोन्हीही समानता हव्या होत्या. त्यांनी पत्रामध्ये लिहिले होते की त्यांना गरीब शेतकरी आणि असहाय कामगारांची परिस्थिती बघून दु:ख होते. ते लिहीतात की पोलिसांपासून बचाव करत असताना ते गरीब शेतकारी आणि कामगारांच्या वस्त्यांमध्ये राहिले आहेत आणि त्यांना हे समजते की शेतकरी आणि कामगारांमुळेच शहरे चालतात, शहरातील कारखाने चालतात. पुढे लिहितात की गरीब शेतकरी आणि कामगार जे पिकवतात, जे उत्पादन करतात त्याचा त्यांना वाटा मिळत नाही, ते नेहमीच गरिबी आणि दुःखात जगतात. अश्फाकउल्ला खान पुढे लिहितात की “जमीनदारांची संपत्ती ही शेतकऱ्यांच्या शोषणावर आधारित आहे, तर भांडवलदार हे जळूप्रमाणे आहेत, जे कामगारांचे रक्त शोषतात.”
अश्फाकउल्ला खान शेतकरी आणि कामगारांच्या या परिस्थितीला इंग्रजांना आणि देशातील त्यांच्या दलालांना जबाबदार ठरवतात. याच पत्रामध्ये अश्फाकउल्ला खान तेव्हाच्या देशातील कम्युनिस्टांना त्यांचा पाठिंबा दर्शवतात आणि लिहीतात की “तुमच्या राजकीय ध्येयासोबत मी सहमत आहे आणि तुम्ही गावांमध्ये, कारखान्यांमध्ये जावे आणि गरीब जनतेला राजकीय दृष्ट्या जागरूक करावे.” अश्फाकउल्ला खान यांनी कारागृहात असताना छोटे आत्मचरित्र सुद्धा लिहिले आहे ज्यात त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दल लिहिले आहे. त्यांच्या मते कुठलेही सरकार जर भांडवलदार आणि जमिनदारांचे हित जोपासत असेल, आणि शेतकरी आणि कामगारांच्या समान सहभागावर आधारलेले नसेल तर ते अशा सरकारला बेकायदेशीर मानतात. ते लिहितात “देशाला स्वातंत्र्य मिळून देशवासी गोऱ्या इंग्रजांकडून सत्ता आपल्या हातात घेत असतील आणि तरीही गरीब आणि श्रीमंतांमध्ये तसेच जमीनदार आणि शेतकऱ्यांमध्ये असमानता आहे तशीच राहत असेल, तर मी ईश्वराला प्रार्थना करेल की तो पर्यंत देशाला स्वातंत्र्य देऊ नकोस जो पर्यंत समानता स्थापित होत नाही. मला या विचारांसाठी कम्यूनिस्ट म्हंटले जात असेल तरी मला काही फरक पडत नाही.”
अश्फाकउल्ला खान यांना अपेक्षित भारत आज अस्तित्वात आहे का? आज देशातील 10 टक्के लोकांकडे देशातील एकूण 89 टक्के साधनसंपत्ती एकवटली आहे तर खालच्या 50 टक्के जनतेकडे फक्त 2 टक्के साधनसंपत्ती आहे. बेरोजगारीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे सर्व पब्लिक सेक्टर भांडवलदारांना विकला जात आहे. आज तरुण बेरोजगारीमुळे नैराश्येच्या खाईत ढकलल्या जात आहे. महागाई बद्दल तर बोलावे तेवढे कमी आहे. महागाई दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. कामगार-कष्टकऱ्यांचे महागाई ने कंबरडे मोडले आहे. दोन वेळचे आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कामगारांना 12-12 तास खटावे लागत आहे.
जनतेचे त्यांच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी जनतेमध्ये जातीय, धार्मिक, प्रांतीय भेद निर्माण करण्याचे काम भांडवली पक्ष करतात. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्या पासून देशभरात अल्पसंख्याखांवरील सांप्रदायिक हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मंदिर-मशिद, गाय, धर्मांतर यांसारख्या मुद्द्यांच्या नावाने संघ परिवार आणि त्यांच्या सर्व पिलावळ संघटना दंगली भडकावत आहेत. आज जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रातील मोदी सरकार पुरस्कृत अल्पसंख्याकांवरील सांप्रदायिक हल्ले वाढले आहेत तेव्हा अश्फाकउल्ला खान यांसारख्या क्रांतिकारकांनी दिलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश जनतेमध्ये घेऊन जाणे आपले कर्तव्य आहे. अश्फाकउल्ला खान यांनी देशवासियांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात धर्मावर आधारीत एकजुटीचा विरोध करून “तबलीग” आणि “शुद्धी” सारख्या मुलतत्ववादी आंदोलनांवर टीका केली होती. त्यांनी जनतेला सूचना केली होती की अशी आंदोलणे स्वातंत्र्याच्या लढाईला कमजोर करत आहेत. त्यांनी लिहिले होते की “जसे 7 करोड मुस्लिमांना शुद्ध करणे अशक्य आहे त्याप्रमाणेच 25 करोड हिंदूंना इस्लाम स्वीकारवल्या जाऊ शकतो हा विचार करणे सुद्धा मूर्खपणाच ठरेल. परंतु, हे नक्की की आपण सर्वांनी स्वतःला गुलामीच्या जोखडात अडकवून ठेवणे सोपे आहे.” अश्फाकउल्ला खान यांचा ठाम विश्वास होता की सांप्रदायिक विष पसरवून ब्रिटीश साम्राज्यवाद धर्माचा ‘फोडा आणि राज्य करा’च्या नितीसाठी अवजार म्हणून उपयोग करत होता. अश्फाकउल्ला खान हे कुठल्याही जाती-पातीच्या भेदांना मानत नव्हते. ते धर्माच्या राजकीय वापराचे विरोधक होते आणि धर्माला खाजगी आयुष्यापुरते मर्यादीत ठेवण्याच्या बाजूचे होते. त्यांनी आपल्या जनतेला उद्देशून केलेल्या शेवटच्या पत्रात जनतेला आव्हान केले होते की जनतेने धार्मिक भेदांना दूर सारून ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध संघटित व्हावे. वाढत्या सांप्रदायिकतेच्या या काळात अश्फाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिसमिल या दोन क्रांतिकारकांच्या मैत्रीची आठवण येणे साहजिक आहे. 19 डिसेंबर 1927 रोजी फ़ैझाबाद जेल मध्ये अश्फाक उल्ला खान यांना फाशी दिली गेली. त्यांचे जीवलग मित्र, क्रांतिकारी साथी राम प्रसाद बिस्मिल यांनाही याच दिवशी फाशी दिली गेली. अश्फाकउल्ला खान यांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी जाती-धर्माचे सर्व भेद विसरून संघटित होणे हीच खरी त्यांची आज आठवण काढणे असेल.
कामगार बिगुल, ऑक्टोबर 2022