धीरेंद्र शास्त्री सारख्या पाखंडी बाबा बुवांचे भांडवली, फॅसिस्ट, स्त्री विरोधी, जनता विरोधी चरित्र ओळखा!
अंधश्रद्धेच्या गर्तेत जाण्यापासून स्वतःला आणि समाजाला वाचवा!!
✍पूजा
धर्म आणि राजकारण यांची हातात हात घालून जनतेची वैज्ञानिक, तार्किक चेतना चिरडून टाकण्याची खेळी काही नवीन नाही! ह्या खेळात वेगवेगळे फासे, वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपांत ‘प्रकट’ होताना दिसतात. अनेक बाबा बुवा, साध्वी माता सामान्य जनतेच्या सामाजिक असुरक्षिततेचा बाजार मांडून, त्यांना खोट्या आशा दाखवत, त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता आधी बोथट आणि नंतर नष्ट करत स्वतःचा एक भक्तांचा ताफा बनवतात. असाच एक बाबा, बागेश्वर सरकार उर्फ धीरेंद्र शास्त्री गर्ग सध्या चर्चेत आहे. ज्या देशाचा प्रधानमंत्री छाती ठोकून देश महासत्ता होण्याचे, चौतर्फा विकासाचे मनोरे बांधण्याचे आश्वासन देतो, त्याच देशात त्याच प्रधानमंत्र्याच्या पक्षाच्या छत्र छायेखाली ह्या बागेश्वर सरकारचा ‘दिव्य दरबार’ फुलत आणि बहरत आहे. दरदिवशी अनेक प्रकारे विज्ञानाला पायदळी तुडवत, अंधश्रद्धा पसरवण्याचे काम उघड उघड पणे टीव्ही, सोशल मीडिया यांद्वारे केले जात आहे. भक्तांच्या मनातले सगळे प्रश्न त्यांनी न सांगताच ओळखून त्यावर मंत्र जापाचा किंवा तत्सम अवैज्ञानिक उपाय सांगून आपल्या ‘चमत्काराने’ भक्तांना मोहून टाकणारा हा बाबा नागपुरात रामकथा पारायणासाठी आला असतांना त्याच्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप आवण्यात आला व त्याला स्वतःच्या दिव्य शक्ती सिद्ध करण्याचे त्याला आव्हान देण्यात आले; परंतु आव्हान फेटाळून कार्यक्रम संपण्याच्या निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच बाबा पळून गेला! करोडोच्या संपत्तीचा मालक असलेला धीरज शास्त्री आता गोदी मीडियाच्या पत्रकारांना बोलावून स्वतःच्या चमत्कारांचे धडे गिरवत आहे, त्यांच्या तोंडून त्याच्या ‘सत्यतेची’ ग्वाही वदवून घेत आहे. गणवेशात असलेले पोलीस देखील त्याच्या समोर दंडवत घालतांना दिसत आहेत. भांडवली प्रसार माध्यमे, चॅनल्स देखील जोमाने ह्या सर्व अंधश्रद्धेला पसरवण्याचं काम करत आहेत.
‘दिव्य दरबारात’ दरदिवशी विज्ञानाचा गैरवापर आणि त्याला साक्ष देणारे हजारो अंधभक्त!
मध्यप्रदेशातील छत्तरपूर स्थित बागेश्वर धाम आश्रम इथे धीरेंद्र शास्त्रीचा दिव्य दरबार भरवला जातो. यात देशाच्या काना कोपऱ्यातून रोजच्या जीवनाच्या विविध समस्या घेऊन लोकं येतात. ह्या दरबारात हजेरी लावण्याआधी ऑनलाईन नोंदणी सर्वांसाठी गरजेची असते. नोंदणी नंतर बागेश्वर धाम येथे जाऊन पेटीत एका कागदावर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, गाव, जिल्हा, संपर्क क्रमांक, पिनकोड, इत्यादी तपशील लिहून टाकावा लागतो. समस्या जर सामान्य असेल तर लाल कपड्यात, विवाहासंबंधी असेल तर पिवळ्या कपड्यात आणि भूत, प्रेत बाधा असल्यास काळ्या कपड्यात नारळ बांधून धामाच्या परिसरातील हनुमान मंदिरात ठेवून जायचा असतो. त्यानंतर आश्रम धीरज शास्त्रीच्या संमत्तीने एक तारीख कळवतो, ज्या तारखेलाच दरबारात हजेरी लावणे गरजेचे असते. दरबारात तुमचा प्रश्न घेतला जाईलच असे नाही, कुणालातरी मंचावर बोलावून त्याच्या समस्या आणि उपाय कागदावर त्याने सांगण्याअगोदर लिहून काढण्याचा ‘चमत्कार’ धीरज शास्त्री करत असतो. ह्या दरबाराचे अनेक व्हिडिओज् सोशल मीडिया, यु ट्युब वर उपलब्ध आहेत. विज्ञानाला तथाकथित “आव्हान” देणारा हा बाबा सर्वच सोशल मीडियावर सक्रिय आहे. ‘विज्ञानाच्याच एका आविष्काराची’ म्हणजे इंटरनेटची मदत घेत अनेक लाख व्ह्यूज कमावून अंधश्रद्धेचा सर्रास प्रचार, प्रसार केला जात आहे. गुडघे दुखी, सांधे दुखी, मणक्याचे आजार, इत्यादींना शस्त्र क्रियेची गरज नसून मंत्राचा जाप केल्याने ठीक होतील असे खुले आम सांगितले जात आहे आणि देशातील सरकार गप्प आहे! डाऊनस् सिंड्रोम, मती मंदता, सेरेब्रल पाल्सी यांसारख्या जन्मजात असलेल्या आणि कधी पूर्ण बऱ्या न होऊ शकणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांना सरळ सरळ 2 वर्षांत, 3 वर्षांत मूल पूर्णपणे बरे होईल अशी ग्वाही दिली जाते! नोकरी, लग्न अशा समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना देखील ह्या ना त्या मंत्राचा जाप करायला सांगितले जाते. प्रत्येक वर्षी 23-29,000 मुलं भारतात डाऊनस् सिंड्रोम हा अनुवंशिक विकार घेऊन जन्म घेतात तर प्रत्येक जन्म घेणाऱ्या 1000 मागे 3 मुलांना सेरेब्रल पल्सी ने ग्रासलेले आहे! जागोजागी उपचारांसाठी खस्ता न खाता, ह्या सर्वांनी सरळ धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारात हजेरी लावली पाहिजे! नफा आधारित व्यवस्थेत स्वास्थ्य व्यवस्थेच्या झालेल्या खाजगीकरणामुळे अशा मुलांचे पालक आयुष्यभर मानसिक, सामाजिक, आर्थिक अस्थिरतेत जगतात. त्यांच्या भावनांना, भीतीला एक पोकळ आधार देऊन अशा दरबारांत क्षणभराचा दिलासा दिला जातो. 2-4 वर्षांत धीरेंद्र शास्त्रीच्या ह्या आश्वासनांची सत्यता चौकस व्यक्तींच्या समोर येईल यात शंका नाही पण दैववादाने पछाडलेल्या समाजात प्रत्येकापर्यंत ते पोहोचेल की नाही याची खात्री नाही! गरिबी, बेरोजगारी यांसारख्या आजच्या घडीला देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या समस्यांवर धीरज शास्त्री सारख्या बाबा बुवांकडे उपाय उपलब्ध असतांना देशात इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबी, बेरोजगारी का? हा प्रश्न तसा बाळबोधच! कारण ह्या समस्या असलेल्या देशांतच अशा बाबा-बुवांचे ‘दुकान’ सर्वाधिक प्रमाणात चालते. लंडन, अमेरिकेसकट परदेशांत देखील हा दरबार भरतो, ज्यात भूत-प्रेत, मानसिक आजार, नात्यांमधलले तणाव, संपत्ती इत्यादी कारणे घेऊन लोकं येतात कारण ह्या व्यवस्थागत समस्या जगभरात अस्तित्वात आहेत. वर्ग चेतनेच्या, वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे कष्टकरी जनता वर्तमान व्यवस्थेच्या जटीलतेला समजू शकत नाही आणि आपल्या समस्यांच्या खऱ्या कारणांना न समजता दैववादाचा आसरा घेत आपल्या भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी धर्म, कर्म-कांड, भाग्य यांसारख्या गोष्टींना जवळ करते.
भांडवलशाहीतून निर्माण होणाऱ्या सामाजिक असुरक्षिततेचा बाजार : बागेश्वर धाम
इथे प्रश्न घेऊन येणारे सर्वच भौतिक, वास्तववादी प्रश्न घेऊन येतात. शोषणावर आधारित, नफाकेंद्री व्यवस्था व्यक्तीला स्वतःपासूनच दूर करून अनेक मानसिक समस्यांना जन्म देते. आर्थिक, सामाजिक जीवनातील अस्थिरता लोकांना भितीत जगायला भाग पाडते. समस्यांची उत्तरं व्यवस्थेत, आजूबाजूला कुठेही मिळत नाहीत. भारतासारख्या देशात जिथे भांडवलशाही एका संथ, क्रमिक, मंथर गतीने आली, कुठल्याही क्रांतिकारी मार्गाने आली नाही, तिथे जुन्या समाज व्यवस्थेतील गुलाम मानसिकता, मागासलेली मूल्ये कायम आहेत. त्यामुळे असलेला वैज्ञानिक तर्कणेचा अभाव, भौतिक प्रश्नांची उत्तरे भौतिक परिस्थितीत न शोधता काहीतरी चमत्कारिक, शॉर्ट कट, मनाला तात्पुरता का होईना दिलासा देणाऱ्या मार्गांमध्ये शोधू लागतो आणि अशा बाबा-बुवांसाठी जमीन तयार होते. ह्या दरबारांत कधीच हे सांगितले जाणार नाही की तुमच्याकडे नोकरी का नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मानसिक आजार का होतात, जीवनात स्थिरता का नाही, तुमचे शत्रू कोण आहेत, तुमचे शोषण कोण करतंय? धीरेंद्र शास्त्री असो की आसाराम, नित्यानंद, राधे मा असो, सर्वांची वर्गीय बाजू स्पष्ट आहे. धर्माचा बाजार मांडून स्वतः भांडवलदार बनण्याची किंवा भांडवलदारांना, नेत्यांना स्वतःचा ‘भक्त’ बनवण्याची ह्यांना अवगत असलेली ‘कला’ आपण सर्व जाणतोच. धीरेंद्र शास्त्रीला देखील आधीच सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक दडपणात जगणाऱ्या ह्या लोकांच्या मनाबरोबर खेळणे, त्यांच्या मानसिकतेला स्वतः नुसार वळवणे जमते. बागेश्वर धाम मध्ये भरणाऱ्या ‘प्रेतांच्या’ दरबारात महिला, मुली मोठमोठयाने किंचाळतात, उड्या मारतात. पितृसत्तात्मक व्यवस्थेतील दडपणातून स्त्रियांमध्ये अंगात येण्याचे, भूत बाधा होण्याचे प्रकार जास्त आहेत आणि हा एक मानसिक आजार आहे हे सिद्ध झाले आहे. मंचावर बसून फुंकणे, टाळ्या पिटणे, राम राम जाप करणे अशा हावभावांच्या, आवाजाच्या चढ उताराच्या खेळांमुळे धीरेंद्र शास्त्रीला आधीच गरीबी, भूक, आजारपण, बेरोजगारीने त्रस्त जनतेला भुलवणे, नशीब, चमत्कार यांवर विश्वास ठेवायला लावणे सहज शक्य होते. ह्या सर्व समस्यांचे खरे कारण असलेल्या भांडवली व्यवस्थेवर लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर असा अतार्किकतेचा, नशिबाच्या खेळीचा पत्त्यांचा महल रचला जातो जो दिसायला चमत्कारिक, क्षणभराचा आनंद देऊन जातो पण हवेच्या एका लहानशा झुळुकेने उध्वस्त होतो. भांडवली व्यवस्थेने आज पूर्णपणे धर्माचे भांडवलीकरण, धंदाकरण केले आहे. भांडवली व्यवस्था जनतेवर आपले वर्चस्व कायम करण्यासाठी धर्माचा सोयीनुसार वापर करते.धीरेंद्र शास्त्री सारखे कित्येक पाखंडी बाबा – बुवा स्वतः सगळे ‘स्वर्गसुख’ इथे पृथ्वीवरच अनुभवतात पण जनतेला त्याग, दान-पुण्य, आहे त्यात समाधानी असणे, नशिबात असेल तेच मिळेल सारखे ‘दिव्य’ उपदेश देतात. जीवनात असलेली असुरक्षा आणि भय एका काल्पनिक शक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी लोकांना भाग पाडते.
बागेश्वर सरकार : स्त्रीविरोधी चरीत्र, हिंदुत्वाचे प्रचार तंत्र!!
सर्वधार्मिक बाबा-बुवा हे सर्वच आकंठ स्त्री विरोधी असतात याची असंख्य उदाहरणे आजवर आपल्या समोर आहेत. मग याला बागेश्वर सरकार अपवाद कसा असेल? दरबारात प्रश्न घेऊन येणाऱ्या, नवऱ्याने टाकलेल्या, परीक्षेत कमी गुण आलेल्या वयस्कर मुलीला, नवऱ्याशी भांडण होणाऱ्या, नवऱ्याचा मार खाणाऱ्या, घटस्फोट घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या, संपत्तीत आपला अधिकार मागणाऱ्या स्त्रियांना अपमानित करत, त्यांच्या चारित्र्यावरच प्रश्न उचलत त्यांनाच सुधरण्याचा, स्वतःवर ताबा ठेवण्याचा आदेश देत धीरेंद्र शास्त्रीने स्वतःचा महिला विरोधी चेहरा स्पष्ट केला आहे. बाबा – बुवा स्वतःचा धंदा चालवण्यासाठी जनतेत धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करतात. भांडवली सत्तेने आधीच जनतेत पसरवलेल्या हिंदुत्वाच्या विषाला अधिक जहाल करून भांडवली सत्तेच संरक्षण करण्याचं काम करतात. ‘काला धन, काला धन’ करत आकाश पाताळ एक करणारा पण मोदी सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसणारा रामदेव बाबा असो की ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या नावाखाली जनतेला आपल्या हक्क अधिकारांसाठी न लढता स्वाभिमानाला मारून, नशीब समजून आहे त्या परिस्थितीत खुश राहण्याचे प्रवचन देणारा श्री श्री रविशंकर असो, हिंदुत्वाचे राजकारण करून सामान्य जनतेला विभागून ठेवण्याचे काम यांनी नेहमीच केले आहे. धीरेंद्र शास्त्रीने पळ काढताच नागपुरात विश्व हिंदू परिषद त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. धीरेंद्र शास्त्री रामभद्राचार्यला आपला गुरु मानतो ज्याच्या भक्तांमध्ये योगी आदित्यनाथ सुद्धा सामील आहे. भांडवली सत्तेला कायम ठेवण्याचे काम सगळे भांडवली पक्ष प्राणपणाने करतात. धीरेंद्र शास्त्रीला मोठं करण्याचं काम सुरवातीला स्थानिक काँग्रेसी आमदार आलोक चतुर्वेदीने केलं आणि त्यानंतर भाजपाने आपली निष्ठा बागेश्वर सरकारला अर्पण करण्यात कुठलीच कसर शिल्लक ठेवली नाही. इथल्या भक्तांच्या यादीत कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा तसंच नितीन गडकरी आणि गिरीराज सिंह असे केंद्रीय नेते देखील येतात. बागेश्वर धाम दरबारांत फक्त भक्तांच्या समस्यांवर त्यांना मूर्ख बनवण्याचे काम केले जात नाही तर सनातन धर्म, हिंदू राष्ट्राच्या फसव्या सुखाचे स्वप्न देखील त्यांना दाखवले जाते. काश्मीर फाईल्स बघण्यासाठी सांगितले जाते तर पठाण न बघण्यास सांगितले जाते. धार्मिक तिरस्कार निर्माण करणारे वाक्य, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मावर आघात करत लोकांना वेळोवेळी विभागणारे वाक्य, ‘घरवापसी’ बद्दल वक्तव्य, अस्पृश्यतेचे पालन अशा अनेक विष पसरवणाऱ्या घटना ह्या दरबारात घडतात. स्वतःचा फोलपणा समोर येऊन नये म्हणून स्वतःचे ‘दिव्य चमत्कार’ सिद्ध करण्याचे आवाहन मिळाल्यानंतर पळ काढलेल्या धीरेंद्र शास्त्रीचं 23 जानेवारी रोजी एक वक्तव्य – “नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं की ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा.’ आज आम्ही भारतात नव्या इतिहासाची नवी घोषणा केली आहे – ‘तुम मेरा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनाऐंगे’. भारतातल्या लोकहो, बांगड्या भरून घरात बसू नका. बोट फक्त बागेश्वर धामकडे दाखवलं नाहीये, तर प्रत्येक सनातन्यावर बोट दाखवलं आहे.” अवैज्ञानिक, अतार्किक, खोटं बोलून लोकांना मूर्ख बनवणाऱ्यांच्या मनात सतत सत्य समोर येण्याची भीती असते, ज्यामुळे मूळ मुद्दा सोडून अशा प्रकारे लोकांना भडकावणारी विधानं सर्रासपणे केली जातात. हीच नाही अशी अनेक भडकाऊ विधानं धीरेंद्र शास्त्रीने केली आहेत. उदाहरणादाखल काही पुढील प्रमाणे –
“33 कोटी देवी-देवता आहेत तर चंद्राची पूजा करण्याची काय गरज?”, “डरपोक हिंदुनो उठा, जागे व्हा, हत्यार हातात घ्या, म्हणा – आम्ही सगळे एक आहोत.”, “सरकार किती दिवस बुलडोझरने पाडणार? हिंदुंना पाडावं लागेल. सगळ्या हिंदुंनो एक व्हा, दगड मारणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवा.” हिंदुत्वाच्या गलिच्छ राजकारणाला समर्थन देणारे, गर्दीला भडकवणारी वाक्यं बोलल्या नंतरही बागेश्वर सरकारला अटक झाली नाही याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! हिंदुत्वाचे गलिच्छ राजकारण करत सत्तेत आलेल्या, देशाच्या भांडवलदारांच्या सेवेत अहोरात्र हजर असलेल्या भाजपाचा प्रत्यक्ष वरदहस्त ज्याच्या मस्तकावर आहे त्याला भीती कशाची? यूएपीए सारख्या काळ्या कायद्यांचा वापर करून देशभरात मानवाधिकार कार्यकर्त्यांना, भाजपावर टीकेची झोड उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनतेला खऱ्या प्रश्नांपासून दूर नेत जाती – धर्माच्या मुद्द्यांमध्ये अडकवून ठेवून भांडवलशाहीला शाबूत ठेवण्याच्या काळ्या उद्दिष्टांना पूर्ण करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री सारख्यांना मोकाट सोडणे हा भाजपासाठी आता डाव्या हाताचा मळ असल्यासारखा आहे. श्रम न करता कष्टकऱ्यांच्या श्रमाचा एक हिस्सा त्यांना मूर्ख बनवून घेऊन त्यावर ऐय्याशी करण्यात धीरेंद्र शास्त्री समवेत सगळे पाखंडी धाम, आश्रम अग्रेसर आहेत. भांडवलशाही आणि भांडवलशाहीचा सर्वात किळसवाणा चेहरा असलेल्या फॅसिझमचे समर्थन करणे, धर्म, अध्यात्मिकतेचा वापर करून त्याचा प्रचार प्रसार करणे यांवरच धीरेंद्र शास्त्री सारख्या बाबा बुवांचा श्रीमंतीचा डोलारा उभा आहे.
आजच्या काळात तार्किकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचाराची अत्यंतिक गरज!
एका मर्यादित चौकटीत, ओळख, मूलभूत माहिती आधीच गोळा करून धीरेंद्र शास्त्री भक्तांच्या मनातलं ओळखण्याचा जो दावा करतो ती ‘मेंटॅलिझम’ नावाची एक कला (एक जादूचा प्रकार) असल्याचं सुहानी शहा ह्या यु-ट्यूबरने सांगितलं आहे. दावा खरा – खोटा सिद्ध करणे, बाबा-बुवांवरचे आरोप सिद्ध होणे, न होणे, तुरुंगवास होणे, त्यातून सुटका होणे हे तर सुरू होते आणि सुरू राहील. खरी गरज आहे त्या मूळावर प्रहार करण्याची जे अशा बाबा बुवांना वाढीसाठी मदत करतात. तार्किकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अविरत प्रचार प्रसार करून अंधश्रद्धॆला नष्ट करण्याचे सतत प्रयत्न करावे लागतील. याद्वारे एका सीमेपर्यंत अंधश्रद्धा, कूपमंडूकता नष्ट होतील परंतु हे लक्षात घ्यावे लागेल की अशा पाखंडी बाबा बुवांना निर्माण करण्याचे काम भांडवलशाही स्वतः करते! लोकांच्या भीतीचा, असुरक्षिततेचा बाजार मांडणाऱ्या बाबा बुवांच्या, मुल्ला-मौलवींच्या, धर्म गुरूंच्या अंधश्रद्धा आणि पाखंडाच्या जाळ्यात अडकण्यापासून जनतेला तोपर्यंत वाचवता येणार नाही जोपर्यंत ह्यांना निर्माण करणाऱ्या अन्याय्य व्यवस्थेला समूळ नष्ट केले जाणार नाही. वैज्ञानिक मूल्यांचा प्रचार प्रसार आणि ह्या शोषणकारी व्यवस्थेचे पितळ उघडे पाडणे एकमेकांशी संलग्न आहेत. वैज्ञानिक मूल्यांच्या सोबतच लोकांसमोर गरिबी, असमानता, बेरोजगारी, आर्थिक लूट ह्यांच्या खऱ्या कारणांना देखील आणले पाहिजे. जेव्हा अंधश्रद्धा आणि सामाजिक असुरक्षितता यांना जन्म देणारे खरे कारणच संपुष्टात येईल तेव्हा यांचे अस्तित्व देखील मिटेल. आज देशातील व्यापक कष्टकरी जनता जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी, बेरोजगारी, महागाई यांसारख्या प्रश्नांमध्ये खोलवर अडकली आहे. ज्याचा परिणाम म्हणून अंधश्रद्धेला बळी पडून काहीही विचार, तर्क न करता ह्या अंधाऱ्या गर्तेत फसत जाते. भांडवली व्यवस्थेला आणखी घट्ट करत अशा अंधश्रद्धांमार्फत जनतेसमोर सत्याला धूसर केले जाते आणि सांगितले जाते की त्यांच्या गरिबीला, अनावस्थेला पूर्वजन्मीचे पाप, नशीब जबाबदार आहे, कष्टकऱ्यांच्या शोषणावर टिकलेली आजची भांडवली व्यवस्था नाही!
आजच्या घडीला देशात मागच्या 45 वर्षांत असलेली सर्वाधिक बेरोजगारी आहे. कोविड महामारी नंतर जवळपास 2 करोड नोकऱ्या नष्ट झाल्या आहेत. जागतिक भूक निर्देशांक अनुसार भारत 107 व्या क्रमांकावर आहे. बेरोजगारी, भूकबळी, गरीबी, इत्यादी सर्व समस्यांमध्ये भारत सध्या अनेक देशांना मागे टाकत आहे. ह्या सर्व समस्यांचे खरे कारण आजच्या भौतिक परिस्थितीत, नफाकेंद्री, भांडवली व्यवस्थेत आहे. ह्या व्यवस्थेविरुद्ध बंड करत व्यापक कष्टकरी जनतेला वर्गीय जाणिवेच्या आधारे एकजूट व्हावे लागेल. ह्याच वर्गचेतनेला बोथट करत धीरेंद्र शास्त्री, श्री श्री रविशंकर, रामपाल, राम रहीम, आसाराम, निर्मल बाबा यांसारखे बाबा – बुवा कष्टकरी जनतेच्या वर्गशत्रूच्या रूपांत काम करत भांडवली व्यवस्थेची सेवा करतात. धीरेंद्र शास्त्री तर सरळपणे फॅसिस्ट प्रचाराचे काम करत भाजपाला फायदा पोहचवत आहे. अशा बाबा-बुवांचे पितळ उघडे पाडणे हे कामगार वर्गासमोर चे खूप महत्वाचे काम आहे कारण यामुळे वर्गीय एकजूट निर्माण होण्यात बाधा निर्माण होते. मानवतेला ह्या पाखंडापासून वाचवायचं असेल तर एक क्षणही न दवडता वैज्ञानिक मूल्यांचा प्रचार प्रसार आणि भांडवलशाहीचे खरे शोषक स्वरूप व्यापक कष्टकरी जनतेसमोर आणत जनतेला एकजूट केल्याशिवाय गत्यंतर नाही!
कामगार बिगुल, फेब्रुवारी 2022