क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका -3
काही मूलभूत संकल्पना ज्या समजून घेणे आवश्यक आहे -2

अभिनव

गेल्या वेळी आपण काही मूलभूत संकल्पना समजून घेण्यापासून सुरुवात केली जसे की उत्पादक शक्ती, उत्पादन संबंध, मूलाधार किंवा आर्थिक पाया, अधिरचना इत्यादी. सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेतले की आर्थिक पायामधील मूलभूत अंतर्विरोध काय आहे, अधिरचनेमध्ये मूलभूत अंतर्विरोध काय आहे तसेच आर्थिक पाया आणि अधिरचना यांच्यातील अंतर्विरोध संपूर्ण मानवी समाजाच्या गतीला कसा व्याख्यायित करतो. आपण हे सुद्धा समजून घेतले की आर्थिक आधारामध्ये अंतर्भूत असलेला आर्थिक अंतर्विरोध हा समाजाचा मूलभूत अंतर्विरोध आहे आणि या अंतर्विरोधाच्या स्वरूपावरूनच समाजाचे चरित्र निर्धारित होते आणि हा मूलभूत अंतर्विरोध जेव्हा स्वतःला वर्गीय स्वरूपात अभिव्यक्त करतो तेव्हा तो वर्गसंघर्षाच्या स्वरूपात प्रकट होतो आणि तीच इतिहास किंवा समाजाला गती देणारी तत्काळ प्रेरक शक्ती आहे. या वेळी आपण निसर्ग आणि समाजाबद्दल मानवी ज्ञान कसे विकसित होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.

हे समजून घेणे का महत्त्वाचे आहे? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण गोष्टी बदलण्यासाठी गोष्टी समजून घेणे आवश्यक असते. कामगार-कष्टकरी लोकांच्या शोषण आणि अत्याचारावर आधारित समाज बदलायचा असेल तर विद्यमान समाज समजून घ्यावा लागेल, त्याच्या इतिहासाचे ज्ञान मिळवावे लागेल. निसर्गाला बदलण्यासाठी सुद्धा ही बाब लागू होते. त्याचप्रमाणे समाज आणि निसर्ग बदलण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, त्याच्याशी थेट भिडल्याशिवाय त्याला जाणून घेता येऊ शकत नाही. म्हणूनच, निसर्गाच्या क्रांतिकारी परिवर्तनाचा प्रश्न असो किंवा समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाचा प्रश्न असो, त्याबद्दलच्या आपल्या ज्ञानाच्या विकासाची प्रक्रिया सखोलपणे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यावेळी आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत.

ज्ञानाकडे बघण्याचा कामगार वर्गाचा वैज्ञानिक दृष्टीकोन

माणसाचे ज्ञान निसर्गाविषयी असू शकते, ते समाजाबद्दल असू शकते किंवा विचारांबद्दल असू शकते. समाज हा निसर्गाचाच विस्तार आहे. निसर्गाच्या विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच जीवनाचा विकास झाला. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतच मानवी प्रजातींची उत्पत्ती आणि उत्क्रांती झाली. माणसाच्या विकासाबरोबरच विचारही प्रगत अवस्थेपर्यंत विकसित झाला. अशाप्रकारे निसर्ग, समाज आणि विचारांच्या क्षेत्राच्या विकासात सामान्यपणे निसर्गाचा पैलू मूलभूत आहे. आपल्या समोरील अस्तित्वात असलेल्या संपूर्ण भौतिक जगाचे किंवा वास्तवाचे हे तीनच भाग आहेत: निसर्ग, त्याचा विस्तार म्हणून समाज आणि या दोन्हींच्या विस्ताराच्या स्वरूपात विचार. आपले संपूर्ण वास्तव या तीन भागांमध्येच आहे. त्यामुळे आपले ज्ञानसुद्धा या तीन पैलूंच्या संदर्भातच विकसित होते.

आम्ही वर म्हटले आहे की गोष्टी बदलण्यासाठी गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पण गोष्टींना कसे समजले जाते? विद्वान माणसे त्यांच्या अभ्यास कक्षात निसर्ग आणि समाज तसेच विचारविश्वाचे ज्ञान निर्माण करतात का? ज्ञान आकाशातून टपकते का? म्हणजेच, ज्ञानाला जन्म देणारी या भौतिक जगताच्या वर कोणती दैवी शक्ती आहे का? काही लोकांचा असा विश्वास होता की ज्ञानाची निर्मिती माणसाच्या मनातून होते. ह्या लोकांचा असा विश्वास होता की ज्ञानाचा जन्म माणसाच्या मेंदूत होतो. इतरांचा असा विश्वास आहे की जग हे खरे तर देवाचे किंवा कुठल्यातरी दैवी कल्पनेचेच प्रकटीकरण आहे आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान हे कुठल्यातरी दैवी कायद्याने पूर्वनिर्धारित आहे आणि आपल्याला फक्त ते धार्मिक किंवा आध्यात्मिक नियम समजून घेणे आवश्यक आहे आणि नंतर आपण प्रत्येक गोष्टीबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो. जे ज्ञानाला मानवी मेंदूची उत्पत्ती मानतात त्यांना ‘मनोगत भाववादी’ म्हणतात. जे ज्ञानाचा स्रोत कुठल्यातरी अशा दैवी किंवा आध्यात्मिक सत्तेला मानतात जी या भौतिक जगाच्या आधीपासून आणि त्याच्यापलीकडे अस्तित्वात होती त्यांना ‘वस्तुनिष्ठ भाववादी’ म्हणतात. हे दोघेही भाववादी विचारसरणीवर विश्वास ठेवतात: म्हणजेच ते भौतिक वास्तवाला मूलभूत आणि प्राथमिक मानत नाहीत, परंतु कल्पनांना प्राथमिक मानतात. पहिला या विचाराचा उगम माणसाच्या मेंदूला मानतो, तर दुसरा या विचाराचा उगम ईश्वर किंवा अध्यात्मात बघतो.

ज्ञानाचा जन्म कुठून आणि कसा होतो हे भाववादी विचारसरणी सांगू शकत नाही. कामगार वर्गाचा दृष्टीकोन भौतिकवादी आहे. भौतिकवादी दृष्टिकोन हाच योग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ज्ञानाचा भौतिकवादी दृष्टिकोन काय आहे?

भौतिकवादी दृष्टिकोन स्पष्टपणे सांगतो की विचार हे भौतिक पदार्थापासून वेगळे आणि त्यापासून स्वतंत्र अस्तित्वात नसतात. याउलट, विचार हा पदार्थाच्या विकासाच्याच प्रगत अवस्थेचा एक गुण आहे, म्हणजेच तो मेंदूचा एक गुण आहे. या मेंदूचा जन्म होण्यापूर्वी विचारांचे कुठलेही अस्तित्व नव्हते. भौतिक वास्तव चेतनेच्या बाहेर आणि स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे आणि चेतना हे याच भौतिक वास्तवाचे प्रतिबिंब किंवा सावली असते (खरे किंवा खोटे, किंवा अंशतः खरे किंवा खोटे). उदाहरणार्थ, तुम्ही सिंह पाहिला नसला तरीही सिंहाचे अस्तित्व आहे! सिंह तुम्ही पाहता म्हणून जन्माला येत नाही, तर सिंह असतो म्हणून तुम्ही त्याला बघू शकता आणि त्याबाबत तुमचे ज्ञान जन्माला येते!

पण कामगार वर्ग हा ज्ञानाबाबत केवळ भौतिकवादी नसून तो द्वंद्ववादीही आहे. याचा अर्थ काय?

याचा अर्थ हा आहे की जग जाणून घेणे आणि बदलणे हे एकमेकांशी निगडीत आहे. जग बदलल्याशिवाय जग ओळखले जाऊ शकत नाही आणि त्याला जाणून घेतल्याशिवाय योजनाबद्धपणे त्याला बदलताही येत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की जगाचे म्हणजेच भौतिक वास्तवाचे विचारांपासून स्वतंत्र अस्तित्व तर आहे, परंतु ते जाणून घेणे शक्य नाही कारण आपले डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा इत्यादी इंद्रिये आपल्याला जगाबद्दल अचूकपणे सांगत आहेत की नाही याची खात्री करण्याचा काही मार्ग नाही. अशा लोकांना अज्ञेयवादी म्हणतात. त्यांना अस्तित्व आणि चेतनेचे ऐक्य समजत नाही. ‘अज्ञेय’ म्हणजे जे जाणता येत नाही असे. परंतु कामगार वर्गाचे तत्त्वज्ञान अज्ञेयवादाला विरोध करते आणि जगाला जाणून घेता येते असे सांगते. जगाविषयीचे आपले ज्ञान बरोबर आहे की नाही याची कसोटीही व्यवहारच असते. एका अज्ञेयवादी तत्त्ववेत्त्याने विचारले: “माझे डोळे मला सांगतात की माझ्यासमोर एक सफरचंद आहे, पण ते सफरचंदच आहे हे मी खात्रीशीरपणे कसे मानू? माझे इंद्रिय म्हणजे डोळे मला बरोबर सांगत आहेत याची खात्री काय? कामगार वर्गाच्या तत्त्वज्ञानाने उत्तर दिले: “सफरचंद खा आणि त्याचा आकार बदला, तुम्हाला कळून जाईल की ते सफरचंद आहे की नाही!” कामगार वर्ग अज्ञेयवादाच्या विपरीत, जग ओळखले जाऊ शकते असा विश्वास ठेवतो. पण कामगार वर्गाचा असाही विश्वास आहे की जग सतत गतिमान आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्या इंद्रियांच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. त्यामुळे आपले ज्ञान नेहमीच अपूर्ण, सापेक्ष आणि सतत गतिमान असते हे कामगार वर्ग जाणतो. म्हणून निरपेक्ष ज्ञान वेगळे काही नसून केवळ सापेक्ष ज्ञानांची अनंत मालिका असते. अज्ञेयवादी लोक भौतिक जग आणि त्याबद्दलचे ज्ञान यांच्यातील संबंध तोडून टाकतात, त्यांची एकता समजून घेत नाहीत.

त्याच वेळी, असेही काही लोक आहेत जे मुळात जगाला अपरिवर्तनीय मानतात. ते मानतात की जगातील सर्व बदल संख्यात्मक आहेत, म्हणजेच ते वाढण्याच्या किंवा कमी होण्याच्या रूपात किंवा फक्त त्यांच्या स्थितीतील बदलाच्या रूपात घडतात. ज्याअर्थी त्यांच्यासाठी पदार्थात काही गुणात्मक बदल होत नाहीत त्यामुळे जग त्यांच्यासाठी गतिमान नसते आणि त्याबद्दलचे ज्ञानही गतिमान नसते. अशा लोकांना अधिभूतवादी (metaphysical) म्हणतात. म्हणजेच ते लोक जे गुणात्मक बदल आणि गतिमानतेवर विश्वास ठेवत नाहीत आणि संख्यात्मक परिवर्तनालासुद्धा ते गोष्टींमधील अंतर्गत विरोधाभासाऐवजी बाह्य शक्तींना जबाबदार मानतात.

पण सत्य हे आहे की जगातील प्रत्येक गोष्ट तिच्यामधील आंतरिक अंतर्विरोधाने बनलेली आहे आणि त्या आंतरिक अंतर्विरोधाने सतत गतिमान आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व गोष्टींबद्दलचे ज्ञान देखील सतत गतिमान आहे, स्थिर नव्हे. आपण कोणत्याही गोष्टीबद्दल कुठलेही अंतिम निरपेक्ष सत्य शोधू शकत नाही आणि जर काही अंतिम निरपेक्ष सत्य असेलच तर ते फक्त हेच की सर्व काही गतीमध्ये आहे आणि त्याबद्दल मानवी ज्ञान देखील सतत गतिमान आहे.

आता आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊ: शेवटी मानवी ज्ञान कसे विकसित होते? जसे आम्ही आधी म्हटले आहे की जर काही बदलायचे असेल तर ते जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कामगार वर्गाच्या शोषणावर आधारित विद्यमान भांडवली समाज बदलायचा असेल तर तो समजून घेतला पाहिजे. पण समजून घेण्याचे काम अभ्यासखोलीत बसून करता येत नाही, जरी जाणून घेण्याच्या प्रक्रियेत अभ्यासाचे महत्त्वही खूप मूलभूत आहे. पुढे आपण बघूयात, का आणि कसे?

गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात येणे आवश्यक आहे. निश्चितच आज आपल्याला जगातील विविध गोष्टींबद्दल, लोकांबद्दल, ठिकाणांबद्दल सर्व माहिती पुस्तकांतून, दूरचित्रवाणीवरून, रेडिओवरून, वर्तमानपत्रांमधून (जरी भांडवलदार वर्गाच्या ताब्यातील मीडियाची ही विविध रूपे ज्ञानापेक्षा जास्त अज्ञानच पसरवणारी आहेत) मिळू शकते. आपल्यासाठी हे अप्रत्यक्ष ज्ञान आहे. परंतु आपल्यासाठी जे अप्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणजेच जे आपल्याला या गोष्टी, लोक, ठिकाणे इत्यादींच्या संपर्कात आल्याने मिळालेले नाही, ते देखील कुणाचेतरी प्रत्यक्ष ज्ञानच आहे. असे कोणतेही ज्ञान असू शकत नाही जे एखाद्याचे प्रत्यक्ष ज्ञान नसेल, मग ते वस्तूंचे असो, व्यक्तींचे असो अथवा ठिकाणांचे असो. खरं तर, कोणत्याही वस्तू किंवा प्रक्रियेबद्दल कोणतेही ज्ञान हे मुळात प्रत्यक्ष ज्ञानच असते, जरी ते विविध माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत अप्रत्यक्षपणे पोहोचले असले तरीही. म्हणूनच ज्ञानाचा स्त्रोत हा सामाजिक व्यवहार आहे. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनासाठीच्या उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी निसर्गाच्या संपर्कात येतो, जेव्हा तो समाजाच्या वर्गसंघर्षात जाणीवपूर्वक किंवा नकळत सहभागी होतो आणि जेव्हा तो विचारांतील परिवर्तनासाठी वैज्ञानिक प्रयोग करतो तेव्हाच तो निसर्ग, समाज आणि विचार जगताबद्दल आपले ज्ञान निर्माण आणि विकसित करू शकतो. याशिवाय जग जाणून घेण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही.

जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाच्या उत्पादन आणि पुनरुत्पादनाच्या भौतिक गरजा आणि पूर्वअटी पूर्ण करण्यासाठी निसर्गात परिवर्तन करतो (कारण उत्पादन हे मुळात निसर्गाच्या परिवर्तनानेच शक्य आहे) तेव्हा तो निसर्गाबद्दलचे त्याचे ज्ञान टप्प्याटप्प्याने विकसित करत जातो. शेतीविषयीच्या ज्ञानाची सुरुवात शेतीपासून होते, शेतीविषयी लिहिलेल्या पुस्तकांतून नव्हे! सर्व वस्तू बनवण्याचे ज्ञान देखील उत्पादनाच्या प्रक्रियेतून म्हणजेच निसर्गासोबत आंतरक्रियेच्या प्रक्रियेतून जन्माला येते, मग त्या वस्तू धातू, लाकूड, खनिजे अथवा रसायने इत्यादी कशानेही बनलेल्या असू द्या, कारण प्रत्येक उत्पादनाच्या निर्मितीसाठी कच्चा माल आपल्याला निसर्गापासूनच मिळतो. आजच्या युगात काही अशी उत्पादने बनवली जात आहेत, जी काही उपयुक्त सेवा किंवा परिणामाच्या रूपात आहेत आणि ज्यांना स्पर्श करता येत नाही, त्यांचे उत्पादनही निसर्गाशी आंतरक्रिया साधल्याशिवाय शक्य नाही, जरी ते प्रत्यक्षपणे तसे दिसत नसले तरीही. उदाहरणार्थ, संगणक सॉफ्टवेअर. परंतु संगणक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी संगणक हार्डवेअर देखील आवश्यक असते, ज्याच्या निर्मितीसाठी विविध स्वरूपाचा कच्चा माल आवश्यक असतो, जो मुळात निसर्गाकडूनच प्राप्त केला जातो. जसजसे उत्पादन विकसित होते, तसतसे माणसाचे निसर्गाबद्दलचे ज्ञान विकसित होते. त्यामुळेच भौतिक वास्तवाच्या मूलभूत पैलूचे, म्हणजेच निसर्गाबद्दलचे मनुष्याचे ज्ञान सामाजिक व्यवहाराच्या मूलभूत स्वरूपातून, म्हणजे उत्पादनासाठीच्या संघर्षातून तयार होते आणि विकसित होते.

परंतु उत्पादनाच्या विकासासोबत समाजही नवीन टप्प्यात प्रवेश करतो. जेव्हा उत्पादन कमी प्रमाणात विकसित होते आणि आदिम जमाती शिकार करून आणि कंदमुळे गोळा करून आणि थोडीशी लागवड करून जमातीच्या सर्व सदस्यांसाठी जेमतेम पुरेल एवढेच अन्न तयार करू शकत होत्या, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतेही वर्ग जन्माला येऊ शकत नव्हते. काही लोक उत्पादनाच्या मोठ्या हिश्श्यावर ताबा तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा सामाजिक वरकड (अधिशेष) निर्माण होण्याइतपत उत्पादन होत असेल. सामाजिक वरकड म्हणजे उत्पादनाची ती मात्रा जी उत्पादन साधनांच्या आणि श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनासाठी खर्च झाल्यानंतर शिल्लक राहते. अशा वेळी मुठभर लोक या अतिरिक्त उत्पादनावर त्यांचे नियंत्रण स्थापित करतात आणि नंतर मालकी स्थापित करतात आणि याच्या आधारावर कालांतराने ते उत्पादक श्रमापासून स्वतःला वेगळे करतात.

ज्यांचे सामाजिक अधिशेषावर म्हणजे वरकड उत्पादनावर नियंत्रण आहे ते हळूहळू उत्पादनाची साधने आणि जमिनीचेसुद्धा खाजगी मालमत्तेत रूपांतर करण्यात यशस्वी होतात. उत्पादन साधनांच्या मोठ्या हिश्श्यावर ज्यांचे नियंत्रण आणि मालकी असते आणि ज्यांच्याकडे सामाजिक अधिशेषाचा ताबा असतो तेच समाजात शासक वर्गाचे रूप घेतात. उर्वरित लोकसंख्या शासित लोकसंख्या असते, ज्यामध्ये प्रत्यक्ष उत्पादक वर्ग आणि मधले असे वर्ग समाविष्ट असतात जे प्रत्यक्ष शासक वर्गही नाहीत आणि प्रत्यक्ष उत्पादनातसुद्धा गुंतलेले नाहीत, परंतु बौद्धिक आणि इतर प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत किंवा ते शासक वर्गाचे सहायक आहेत. उत्पादक शक्तींच्या विकासासह अतिरिक्त उत्पादनाशिवाय समाजाचे वर्गांमध्ये विभाजन होणे शक्य नाही. जेव्हा समाजात वर्ग निर्माण होतात, तेव्हा शासक वर्गाला आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी एका साधनाची आवश्यकता असते, जे शासित वर्गांना जोरजबरदस्तीने आपल्या ताब्यात ठेऊ शकेल आणि त्याच वेळी त्यांच्यावर वैचारिक प्रभाव प्रस्थापित करण्याची भूमिका बजावेल. अशा पद्धतीने लष्कर, सशस्त्र दल, पोलीस, नोकरशाही, न्यायव्यवस्था इत्यादी अस्तित्वात येतात. या संस्थांना एकत्रितपणे राज्यसत्ता म्हणतात. म्हणून, उत्पादक वर्गांद्वारे निसर्गाच्या रूपांतरणासह उत्पादक शक्तींचा विकास जसजसा होतो आणि आणि जसजसे उत्पादन वाढते आणि सामाजिक अधिशेष निर्मितीच्या टप्प्यावर पोहोचते, तसतसे वर्गांच्या उदयाची प्रक्रिया सुरू होते, वर्ग समाज अस्तित्वात येतो, वर्ग संघर्ष सुरू होतो आणि राज्यसत्ता उदयास येते.

वर्गसंघर्षात सहभागी होऊन, शासक वर्ग आणि शासित वर्ग समाजाबद्दलचे त्यांचे ज्ञान विकसित करतात. स्पष्ट आहे की या ज्ञानाचे सरळ सरळ एक वर्ग चरित्र असते. शासक वर्गाचे “ज्ञान” खरेतर सत्य लपवण्याचे काम करते म्हणजे ते विचारधारात्मक असते, कारण त्यांचे हित शोषण, अत्याचार, अन्याय आणि असमानता यांना चालू ठेवण्यात आहे. याउलट, कामगार वर्गाचे समाजाबद्दलचे ज्ञान सत्याचे प्रतिनिधित्व करते कारण त्याचे हित शोषण, अत्याचार, अन्याय आणि विषमता संपवण्यात आहे आणि म्हणूनच ते वैज्ञानिक आहे. यामुळेच सर्वहारा वर्ग समाजाबाबत सुद्धा खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्राप्ती वर्ग संघर्षाद्वारेच करतो. केवळ सर्वहारा वर्गच हे करू शकतो कारण तो उत्पादनाच्या सर्व साधनांपासून वंचित असतो, “दुहेरी अर्थाने मुक्त” (म्हणजे कोणत्याही भांडवलदाराला आपली श्रमशक्ती विकण्यास मुक्त आणि उत्पादनाच्या साधनांपासून मुक्त!) असतो, उन्नत औद्योगिक उत्पादनात लागलेला असतो, मोठ्या प्रमाणावरील सामाजिक उत्पादनात लागलेला असतो, आणि त्याच्यामध्ये संकुचित बौद्धिक सीमा ओलांडण्याची क्षमता असते. ज्याचे अतिरिक्त श्रम हडप करून भांडवलदार वर्ग नफा कमावतो तो सर्वहारा वर्गच असतो आणि हाच नफा भांडवलदार वर्ग आणि भांडवली समाजाचा आधार असतो. पण सर्वहारा वर्गाच्या पूर्वीही त्या त्या युगात आणि त्या त्या वर्गांच्या प्रकृतीच्या मर्यादांमध्ये शोषक आणि सत्ताधारी वर्गांविरुद्ध शोषित आणि दमित वर्गाचे बंड आणि त्यांच्या विरोधात त्यांचा वर्गसंघर्ष हाच समाजाबद्दल ज्ञानाचा स्रोत राहिला आहे.

सर्वहारा वर्ग हा, पहिल्या जागतिक आणि सर्वात गतिमान उत्पादन पद्धतीसह म्हणजेच, भांडवलशाहीसह अस्तित्वात येतो, आणि म्हणूनच तो इतिहासातील सर्वात क्रांतिकारी वर्ग आहे कारण सर्व प्रकारच्या खाजगी मालमत्तेपासून वंचित असल्याकारणाने त्याच्यात एक सार्वभौमिकता आहे आणि खाजगी मालमत्तेची व्यवस्था नष्ट करून सामूहिक मालकीवर आधारित एक जास्त वैज्ञानिक व्यवस्था म्हणजेच समाजवादाची स्थापना करण्यासाठी व्यापक कष्टकरी जनतेला नेतृत्व देण्याचे काम तोच करू शकतो. पण त्याआधी गुलाम, शेतकरी, कारागीर यांनी आपापल्या कालखंडात आणि एका युगात विशेषतः क्रांतिकारी भांडवलदार वर्गाच्या वर्गसंघर्षांनीही त्यांच्या कालखंडाच्या मर्यादेत ज्ञान विकसित केले. सर्वहारा वर्ग हा या संपूर्ण ज्ञानाचा खरा वारस आहे आणि तो वर्ग पूर्वाग्रह किंवा संकुचित मर्यादा नाकारून त्याचा अधिक विकास करू शकतो. आज भांडवलदार वर्गाने शासक आणि जुलमी वर्ग बनण्यासोबतच ती क्रांतिकारी भूमिका गमावलेली आहे जी त्याच्यामध्ये स्वतः एक शासित वर्ग असताना सरंजामशाहीशी लढेपर्यंत होती. जेव्हा तो स्वतःच सत्ताधारी वर्ग बनला तेव्हा तो स्वतःच एक अत्याचारी आणि अत्याचार करणारा वर्ग बनला आणि आता तो समाज आणि त्याबद्दलचे ज्ञान पुढे नेण्याचा अभिकर्ता (एजंट) राहिलेला नाही, तर यथास्थिती कायम ठेवणारा, म्हणजेच इतिहासाला मागे नेणारा बनलेला आहे, म्हणजेच तो एक प्रतिगामी शक्ती बनला आहे.

आज समाजाला आणि त्याबद्दलच्या ज्ञानाला विकसित करण्याचे कार्य इतिहासातील सर्वात क्रांतिकारी वर्ग म्हणजे सर्वहारा वर्गच त्याच्या वर्गसंघर्षातून करू शकतो. तथापि, इतके स्पष्ट आहे की ज्ञानाचा दुसरा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे सामाजिक व्यवहाराचे हे दुसरे स्वरूप वर्ग संघर्ष होय. वर्गसंघर्ष हा केवळ आर्थिक स्वरूपातच घडत नाही, तर राजकीय आणि वैचारिक स्वरूपातही घडत असतो आणि वर्गसंघर्षांची ही तिन्ही रूपे एकमेकांशी नाळबध्द असली तरी समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनासाठी राजकीय आणि वैचारिक संघर्षाला विशेष महत्त्व असते. ज्ञानाचे हे स्वरूप समाजाच्या परिवर्तनासाठी केल्या जाणाऱ्या संघर्षासोबतच विकसित होऊ शकते आणि पालटून हे ज्ञान समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाला मार्गदर्शन करू शकते आणि या प्रक्रियेत ते सतत उच्च स्तरावर विकसित होऊ शकते.

याशिवाय माणूस आपल्या वैज्ञानिक प्रयोगातून आपल्या विचारांच्या जगात क्रांती घडवून आणतो. हे वैज्ञानिक प्रयोग केवळ विज्ञान-प्रयोगशाळांमध्येच होत नाहीत, तर स्वतः उत्पादन प्रक्रियेत आणि वर्गसंघर्षातही होतात. वैज्ञानिक प्रयोग हे वास्तवात विचारांच्या क्रांतिकारी परिवर्तनासाठी असतात. उदाहरणार्थ, समाजवादी रशियामध्ये जेव्हा कामगारांची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा तेथील कामगारांनी भांडवली तज्ञांच्या प्रयोग आणि उत्पादनाला तांत्रिक रूपाने विकसित करण्याच्या मक्तेदारीला आव्हान दिले आणि हे काम स्वतःच्या हातात घेतले. अशा प्रकारे कामगारांनी उत्पादनात अस्तित्वात असलेल्या भांडवली श्रम विभागणीवर आणि मानसिक आणि शारीरिक श्रमांच्या विभागणीवर हल्ला केला. उत्पादनासाठी सुरू असलेल्या संघर्षात हा एक वैज्ञानिक प्रयोग होता ज्याने कामगारांची चेतना उन्नत केली. चीनमध्येही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आणि विशेषत: माओच्या नेतृत्वाखाली कामगार वर्ग आणि गरीब शेतकऱ्यांनी उत्पादन प्रक्रियेत मोठे वैज्ञानिक प्रयोग केले आणि शेती आणि उद्योगाच्या उत्पादनात ताचाई आणि ताचिंगसारखे प्रयोग उभे केले. याने केवळ झपाट्याने उत्पादकता वाढवली एवढेच नाही तर प्रयोग आणि नवनिर्मिती यातील भांडवली तज्ञ आणि बुद्धिजीवी यांच्या मक्तेदारीवर हल्ला करून मानसिक आणि शारीरिक श्रमांच्या विभागणीवर हल्ला केला. त्याचप्रमाणे समाजात सुरू असलेल्या वर्गसंघर्षात सर्वहारा वर्गाने अनेक प्रयोग केले, त्यात कामगार समित्यांची स्थापना, सोव्हिएत संघटित करणे, कम्युनची स्थापना करणे इ. आहेत. वर्गसंघर्षातील या वैज्ञानिक प्रयोगांनी सर्वहारा वर्गाच्या विचारांमध्ये क्रांती घडवून आणली. समाजवादी समाजात, वैज्ञानिक प्रयोगांच्या प्रक्रियेत कामगार-कष्टकरी वर्गाचा सहभाग वाढतो आणि वैज्ञानिक प्रयोग हे जनसमुदायाच्या कक्षेत येतात, कारण आता कामगार वर्ग आणि कष्टकरी लोकांनाही वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ उपलब्ध होतो. ते भांडवली शोषण, अत्याचार आणि भांडवलदारांच्या नफ्यासाठी 10-12 तास कंबरतोड मेहनत करण्यापासून मुक्त होतात. त्यांच्याकडे आता या वैज्ञानिक प्रयोगांसाठी वेळ, इच्छा आणि सर्जनशीलता असते. आता त्यांना हे माहीत असते की एक वर्ग म्हणून त्यांचा देशाच्या संपूर्ण संपत्तीवर सामूहिक अधिकार आहे आणि तो भांडवलदारांच्या हुकुमाच्या अधीन नाही.

पण भांडवलशाही समाजात एक वर्ग म्हणून कामगार वर्ग आणि एक समूह म्हणून संपूर्ण कष्टकरी जनता वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होऊ शकत नाही कारण भांडवलशाही समाजातील सामान्य कष्टकरी लोकसंख्येचे जीवन असे नसते की ते वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होऊ शकतील, ते मग उत्पादनाच्या प्रक्रियेतील असोत, वर्ग संघर्षातील असोत किंवा वैज्ञानिक प्रयोगशाळांमधील असोत. भांडवलशाही समाजात वैज्ञानिक प्रयोगामध्ये एकतर भांडवली आणि निम्न-भांडवली बुद्धिजीवी किंवा कामगार वर्गाचा पक्ष भागीदारी करतात. जेथपर्यंत भांडवली बुद्धिजीवींचा संबंध आहे, ते भांडवलदार वर्गाची सेवा करतात आणि वैज्ञानिक प्रयोगही ते भांडवलदार वर्गाच्या हितासाठीच करतात आणि त्यांच्या पैशावर गुजराण करत करतात. जेथपर्यंत निम्न-भांडवली आणि मध्यमवर्गीय बुद्धिजीवींचा संबंध आहे, ते सामान्यतः व्यक्तिवादाचे शिकार आहेत. कामगार वर्गाची ताकद त्याची सामूहिकता असते. भांडवली समाजात वैयक्तिक कामगाराची कोणतीही शक्ती नसते आणि केवळ त्याच्या एकता आणि संघटनेच्या बळावरच तो भांडवलदार वर्ग आणि त्याच्या राज्यसत्तेवर विजय मिळवू शकतो. पण बुद्धिजीवी व्यक्तीचे जीवन असे असते की त्याला वाटते त्याच्या जीवनातील सर्वकाही तो त्याच्या वैयक्तिक प्रतिभा किंवा त्याच्या वैयक्तिक ज्ञानाच्या बळावर करतो. वरवर पाहता, जीवनातील कोणतीही कामगिरी किंवा स्थान तो त्याच्या वैयक्तिक क्षमतेच्या बळावर प्राप्त करतो. त्याचे अलिप्त राहणीमान त्याला क्वचितच हे समजून घेण्याची कुवत देते की त्याची क्षमता, त्याचे ज्ञान आणि त्याची प्रतिभा प्रामुख्याने समाजात निर्माण होते आणि कामगार वर्गाचे श्रम हाच त्याचा पाया आहे. त्याच्या भौतिक अस्तित्वाच्या सर्व गरजा देखील कामगार वर्गाकडून पूर्ण होतात आणि त्याच्या ज्ञानाचा स्त्रोत देखील सामाजिक व्यवहारच आहे. त्यामुळे अशा निम्न-भांडवली म्हणजेच मध्यमवर्गीय बुद्धिजीवींनी औपचारिकरित्या जरी मार्क्सवाद स्वीकारला, तरी त्यांना कामगार वर्गाची सामूहिकता स्विकारायला, संघटनेची शिस्त स्विकारायला आणि क्रांतीच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःच्या वैयक्तिक आवडी-निवडीचा त्याग करायला कठीण जाते.

ज्यांनी खऱ्या अर्थाने मार्क्सवाद आणि सर्वहारा वर्गाचे ध्येय आत्मसात केले आहे आणि क्रांती व संघटनेचे हित सर्वोपरी ठेवत व्यक्तिवाद, अहंकार इत्यादी भांडवली विचारसरणीच्या विरोधात निर्दयीपणे संघर्ष केला आहे, असे मध्यमवर्गीय बुद्धिजीवीच केवळ खऱ्या अर्थाने सर्वहारा वर्गाचे क्रांतिकारी बुद्धिजीवी होऊ शकतात. सर्वहारा वर्गाच्या वर्गसंघर्षात सहभागी होणारे बुद्धिजीवीच हे करू शकतात. माओने सांगितल्याप्रमाणे मार्क्स, एंगल्स, स्टॅलिन आणि लेनिन हे सर्वहारा वर्गाचे क्रांतिकारी सिद्धांत यामुळेच विकसित करू शकले कारण त्यांनी सर्वहारा वर्गाच्या वर्गसंघर्षात भाग घेतला आणि स्वतःचे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. तसेच, क्रांतिकारी संदर्भात बुद्धिजीवीचा आणखी एक अर्थ असू शकतो: ते उन्नत कामगार जे क्रांतीचे शास्त्र म्हणजे मार्क्सवाद वाचून-लिहून समजतात, त्याला लागू करतात आणि त्याला त्यांच्या जीवनाचे आणि कर्मांचे मार्गदर्शक तत्त्व बनवतात.

तथापि, भांडवली समाजात वैज्ञानिक प्रयोगांद्वारे विचारांच्या जगाचे क्रांतिकारी परिवर्तन करण्याचे काम पक्ष किंवा बुद्धिजीवी करतात. केवळ समाजवादी समाजातच वैज्ञानिक प्रयोगात लोकसहभाग वाढतो आणि तो व्यापक जनसामान्यांचा विषय बनतो, जरी हे केवळ एका पक्षाच्या रूपात संघटित सर्वहारा वर्गाच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते आणि समाजातून भांडवली श्रम विभाजनाच्या संपूर्ण निर्मूलनासह आणि अलिप्ततेच्या पूर्ण समाप्तीनंतरच पक्ष नेतृत्वाची गरज कमी होऊ शकते. वर्गहिन समाज म्हणजेच साम्यवादाकडे वाटचाल केल्यावरच हे शक्य होईल.

शेवटी, आपण असे म्हणू शकतो की निसर्ग आणि त्याचेच अंग आणि विस्तार असलेले समाज आणि विचारांच्या जगाचे रूपांतरण हे तीन प्रकारच्या सामाजिक व्यवहाराद्वारे होत असते: उत्पादनासाठी संघर्ष, वर्ग संघर्ष आणि वैज्ञानिक प्रयोग. उत्पादनाचा संघर्ष हा मूलभूत आहे कारण तो मानवी जीवनाच्या भौतिक उत्पादनासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहे आणि तो निसर्गाच्या रूपांतरणाशी जोडलेला आहे, जो सर्व भौतिक वास्तवाचा एक मूलभूत पैलू आहे. या संघर्षाचा सामाजिक पैलू स्वतःला उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंधांच्या संघर्षाच्या स्वरूपात व्यक्त करतो, जो समाजाच्या विकासाच्या विशिष्ट टप्प्यावर वर्ग संघर्षाच्या रूपात प्रकट होतो. वर्गसंघर्ष हा समाजाला गती देणारा मुख्य अंतर्विरोध असतो कारण तोच समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाची तात्कालिक प्रेरक शक्ती असतो. विचारांच्या जगाचे परिवर्तन वैज्ञानिक प्रयोगांद्वारे घडते, जे भांडवलशाही समाजात पक्ष आणि बुद्धिजीवी करतात आणि केवळ समाजवादी समाजात सर्वसाधारणपणे जनता वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेते आणि विचारांच्या जगाच्या क्रांतिकारी परिवर्तनाला अभूतपूर्वपणे पुढे नेते.

निसर्ग, समाज आणि विचाराचे रूपांतरण आणि त्याच्याशी निगडित तीन सामाजिक व्यवहार हा मनुष्याच्या सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. मानवी ज्ञानाचा इतर कुठला चौथा स्रोत नाही. सामाजिक व्यवहाराच्या या तिन्ही प्रकारांतून ज्ञान उत्पन्न होते आणि ते पालटून त्याची सेवा करते. जर निसर्गाविषयीचे ज्ञान पालटून निसर्गाच्या रूपांतरणाचे काम करत नसेल, तर ते ज्ञान निरुपयोगी आहे, तसेच ते ज्ञान मृत होईल. कारण ज्ञानाचा सतत विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ते पालटून व्यवहाराची सेवा करेल. ज्ञानाचा जन्म व्यवहारातून होतो आणि त्याला पुन्हा व्यवहाराकडे जावे लागते, त्याचे मार्गदर्शन करावे लागते आणि या प्रक्रियेत सतत स्वतःचा विकास करावा लागतो. जर समाजाविषयीच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज बदलण्यासाठी केला गेला नाही, तर ते ज्ञान त्याची जीवनशक्ती गमावून समाप्त होईल कारण ते त्याच्या उगमापासून तोडले जाईल. निश्चितपणे, सामाजिक व्यवहाराच्या अनुभवाचे अमूर्तन, सामान्यीकरण आणि सारांश करून वैज्ञानिक ज्ञान विकसित केल्याशिवाय व्यवहारसुद्धा आदिम अवस्थेत राहील. आणि जर ज्ञानाने व्यवहाराची सेवा केली नाही तर ते देखील नष्ट होईल. हीच व्यवहार आणि ज्ञानाची एकता आहे, हीच अस्तित्वाची आणि विचारांची एकता आहे आणि हाच त्यांचा अंतर्विरोधही आहे.

व्यवहार आणि ज्ञानाचे हे तत्व कामगार वर्गाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच त्याला समजेल की योग्य विचार ‘आकाशातून खाली पडत नाहीत’ किंवा त्या ‘तेजस्वी विद्वानांच्या बुद्धीची उपज’ नाहीत. ते केवळ आणि केवळ तीन प्रकारच्या सामाजिक व्यवहारांमधून निर्माण होतात: उत्पादनासाठी संघर्ष, वर्ग संघर्ष आणि वैज्ञानिक प्रयोग. व्यवहाराची ही रूपे सामाजिक आहेत कारण ते समाजातील कष्टकरी घटकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहेत. या स्वरूपात, व्यापक जनतेचा सामाजिक व्यवहार हाच ज्ञानाचा स्त्रोत आहे. भांडवलशाही समाजात कष्टकरी जनतेच्या जीवनाची परिस्थिती अशी असते की ते स्वतःच वैज्ञानिक ज्ञानापासून म्हणजेच वैचारिक ज्ञानापासून दूर फेकले जातात. ज्ञान ही मुळात एक सामाजिक मालमत्ता आहे, परंतु भांडवलशाही समाजातील इतर सर्व गोष्टींप्रमाणे ती देखील खाजगी मालमत्ता बनविली जाते. केवळ समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाने, म्हणजेच समाजवादी समाज आणि कामगारांच्या सत्तेच्या स्थापनेद्वारेच, ज्ञानाला परत सामाजिक मालमत्तेचे स्वरूप प्राप्त होते, जेव्हाकी भांडवली समाजातही त्याचे मूळ सामाजिकच असते. स्वतः या क्रांतिकारी परिवर्तनासाठी कामगार वर्गाला विद्यमान समाज आणि राज्यव्यवस्था, त्याचे वर्ग चरित्र आणि स्वतःची शक्ती याबद्दल ज्ञान मिळवावे लागेल. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा कामगार वर्गातील प्रगत घटक स्वतःला क्रांतिकारी पक्षाच्या रूपात संघटित करतील, कारण केवळ हा पक्षच कामगार वर्गाच्या ज्ञानाचे आणि संघर्षाचे मुख्यालय असू शकतो, कामगार वर्गाच्या अनुभवांचे अमूर्तीकरण, सामान्यीकरण आणि सारांश करून त्याच्या वैज्ञानिक ज्ञानाची निर्मिती करू शकतो आणि त्याला पद्धतशीर करू शकतो. आणि या वैज्ञानिक ज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग आणि व्यापक कष्टकरी जनतेचे नेतृत्व करत त्यांना क्रांतीच्या मार्गावर नेऊ शकतो.

या काही मूलभूत गोष्टी होत्या ज्या प्रत्येक कामगाराने आणि क्रांतिकारकाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहेत. पुढच्या अंकात, आपण भांडवली समाजाच्या आर्थिक विश्लेषणाकडे जाऊ आणि टप्प्याटप्प्याने आणि पायरीपायरीने त्याचे सत्य उघड करू.

अनुवाद: जयवर्धन
(मूळ लेख, मजदूर बिगुल, ऑगस्ट 2022 मध्ये प्रकाशित)

कामगार बिगुल, मार्च 2023