क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 4
सामाजिक वरकडाच्या उत्पादनाची सुरुवात आणि सामाजिक श्रम विभाजन व वर्गांचा उदय

अभिनव

भांडवली समाजातील भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्त्रोत आणि कामगार वर्गाचे शोषण समजून घेण्यासाठी आपल्याला सामाजिक अधिशेष (सामाजिक वरकड),  सामाजिक श्रम विभाजन आणि वर्गांचा उदय यासारख्या इतर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. या गोष्टी समजून घेतल्यामुळे कामगार वर्गाचे शोषण आणि भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्रोत समजून घेणे आपल्याला सोपे होईल. त्यामुळे आपण या मूलभूत संकल्पनांसह सुरुवात करूयात.

आदिम काळात जेव्हा माणूस टोळ्यांमध्ये राहत होता तेव्हा त्याच्या उत्पादक शक्तींच्या विकासाची पातळी खूप कमी होती. अजून शेतीची सुरूवात झाली नव्हती आणि मानवी टोळ्या जेमतेम तेवढ्याच गोष्टी गोळा करू शकत होत्या आणि तेवढीच शिकार करू शकत होत्या जेवढी त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक होती. कंदमूळ गोळा करणाऱ्या आणि शिकारीवर अवलंबून असणाऱ्या समाजाच्या काळात अनिश्चिततेचे प्रमाण जास्त होते कारण या आदिम जमातींना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळू शकेल का याची कधीच खात्री नसायची. माणूस अजूनही निसर्गाच्या आंधळ्या शक्तींचा गुलाम होता. आपण त्यांना निसर्गाच्या आंधळ्या शक्ती म्हणतो कारण त्यामागे काम करणारा कार्यकारणभाव माणसाला अजून समजला नव्हता. निसर्गाच्या शक्तींमागील कारणे म्हणजेच निसर्गाच्या गतीचे नियम समजून घेण्यासोबतच मनुष्य स्वतंत्र होत गेला कारण आता तो निसर्गाच्या शक्तींबद्दलच्या त्याच्या वाढत्या आकलनानुसार निसर्गात त्याच्या गरजेप्रमाणे परिवर्तन करू शकत होता. ही समज माणसाच्या स्वतःच्या सामाजिक व्यवहारातून, म्हणजे उत्पादनासाठी माणसाच्या संघर्षातून आणि वैज्ञानिक प्रयोगातून विकसित झाली.

तथापि, आदिम टोळी समाजाच्या युगात मनुष्य अजूनही केवळ निसर्गाने दिलेलेच प्राप्त करत होता, परंतु तो अद्याप जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने निसर्गात बदल घडवून वा हस्तक्षेप करून काही तयार करत नव्हता, म्हणजेच तो उत्पादन करत नव्हता, कारण निसर्गाबद्दलचे त्याचे ज्ञान अजूनही अत्यंत अविकसित टप्प्यात होते. त्यामुळे ह्या आदिम जमाती अथवा टोळ्या कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून जेवढे आणि जे काही मिळवू शकत होते त्यात नेहमी एक अनिश्चितता असायची आणि आवश्यकतेपेक्षा जास्त ते क्वचितच मिळवू शकायचे. त्यामुळे टोळीतील सर्व लोकांनी जीवनासाठीच्या संघर्षाच्या या कामात गुंतून राहणे आवश्यक होते आणि समाजात श्रमविभागणी व कोणत्याही प्रकारची उच्च-नीच विभागणी होणे शक्यच नव्हते. तोपर्यंत श्रमांची केवळ लिंग आधारित आणि वयानुसार विभागणीच असू शकत होती, जी जैविक वैशिष्ट्यांमुळे झालेली विभागणी होती, ना की अतिरिक्त उत्पादनाच्या निर्मितीसह अस्तित्वात आलेली श्रमांची सामाजिक विभागणी. आदिम जमातीमध्ये शिकार इत्यादी कामांमध्ये शारीरिक किंवा मानसिक क्षमतेच्या आधारावर नेतृत्वाची भूमिका काही व्यक्तींना दिली जायची, परंतु या व्यक्तींना कोणताही विशेषाधिकार नसायचा. म्हणजे यामुळे हे लोक जास्त अन्न घेऊ शकत नव्हते. नेतृत्वाची जबाबदारी ही इतर जबाबदाऱ्यांसारखीच एक जबाबदारी होती. परंतु ज्याअर्थी या आदिम टोळ्या त्यांचे जीवनमान किमान स्तरावर टिकवून ठेवण्याइतपतच अन्न आणि संसाधने कसेबसे मिळवू शकत होत्या, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या किमान गरजेपेक्षा जास्त हडप करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यामुळे टोळीचे अस्तित्वच धोक्यात आले असते आणि टोळी फुटली असती. त्यामुळे टोळी समाज हा एक प्रकारचा आदिम साम्यवादी समाज होता, ज्यात एकप्रकारे अभाव आणि अज्ञानाने लादलेली समानता होती.

नवपाषाण युगात, सुमारे 12,000 वर्षांपूर्वी, सध्याच्या अरब जगाच्या (पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनॉन इ.) काही भागांमध्ये सर्वप्रथम शेतीची सुरुवात झाली. शेतीच्या माध्यमातून प्रथमच माणसाने निसर्गाने जे काही दिले ते जसेच्या तसे घेण्याऐवजी, निसर्गाला बदलून आपल्या गरजेनुसार गोष्टी तयार करण्यासाठी सुरुवात केली. शेकडो वर्षांत विकसित झालेल्या निसर्गाबद्दलच्या माणसाच्या ज्ञानामुळेच शेतीची सुरुवात झाली. यासोबतच, माणसाच्या निसर्गाच्या आकलनात आणि गरजेनुसार त्यात बदल करण्याच्या त्याच्या सामर्थ्यामध्ये गुणात्मक बदल झाला. दुसऱ्या शब्दांत, त्याच्या उत्पादक शक्तींचा गुणात्मक विकास झाला. समाजातील प्रत्येक नवीन टप्पा शेवटी उत्पादक शक्तींमधल्या गुणात्मक बदलांसह येत असतो, मात्र ही प्रक्रिया स्वतःहून घडत नाही तर माणसाचा सामाजिक व्यवहार त्यात मध्यवर्ती भूमिका बजावतो. नवपाषाण युगात एक क्रांती घडली, ज्यामुळे माणूस त्याच्या सामाजिक विकासाच्या नवीन टप्प्यावर जाण्यासाठी तयार झाला. शेतीच्या प्रारंभामुळे मनुष्याने प्रथमच त्याच्या किमान भौतिक गरजेपेक्षा वरकड उत्पादन करू शकण्याची पूर्वअट पूर्ण झाली. पण याचा अर्थ शेतीच्या सुरुवातीबरोबरच अतिरिक्त उत्पादनही सुरू झाले असा नव्हे. शेती सुरू झाल्यानंतरही आदिम जमाती दीर्घकाळ भटके शिकारी आणि कंद-मूळ गोळा करणारे म्हणून जगत राहिल्या आणि केवळ शेतीच्या विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर या जमाती भटक्या जीवनाचा मार्ग सोडून काही विशिष्ट भागात स्थायिक होऊ लागल्या. एका दीर्घ प्रक्रियेत कृषी उत्पादन समाजाच्या किमान गरजेपेक्षा जास्त उत्पादन करण्याच्या स्थितीत पोहोचले.

पण ही परिस्थिती येताच टोळी समाजाच्या सामुदायिक आणि सामूहिक जीवनाच्या अंताची सुरुवात झाली. कारण जेव्हा अतिरिक्त सामाजिक उत्पादन अस्तित्वात येते तेव्हाच या अतिरिक्त सामाजिक उत्पादनाच्या ताब्यासाठी संघर्ष सुरू होतो. म्हणजेच जेव्हा समाजातील मानवाच्या उत्पादक शक्तींचा विकास अशा पातळीवर पोहोचतो की ते नियमितपणे त्यांच्या किमान गरजेपेक्षा जास्त उत्पादन करू लागतात, तेव्हा हे अतिरिक्त उत्पादन बळकावण्याचा झगडाही सुरू होतो. टोळी समाजात पूर्वी अस्तित्वात असलेली सामुदायिकता आणि सामूहिकता टंचाईच्या परिस्थितीमुळे आणि निसर्गाबद्दलची  समजदारी अगदी आदिम पातळीवर असण्याच्या स्थितीने लादलेली होती. पण त्यामुळे समाजात उच्च-नीच भेट नव्हता, शोषण-दडपशाही नव्हती आणि समता होती. म्हणून जेव्हा मानवाच्या उत्पादक शक्तींच्या विकासाबरोबर सामुदायिक आदिम समाजाचा ऱ्हास झाला तेव्हा ती गुलामगिरी, अधीनता आणि शोषणाला जन्म देणारी एक वेदनादायक प्रक्रिया होती. पण ऐतिहासिकदृष्ट्या ते एक पुढचे पाऊल होते. या अतिरिक्त उत्पादनाशिवाय समाजात ना कारागीर तयार होऊ शकले असते, ना शेतकरी, ना कलाकार, ना शास्त्रज्ञ, ना तत्त्वज्ञ-विचारवंत निर्माण होऊ शकले असते. त्याशिवाय माणूस निसर्गाच्या आंधळ्या शक्तींचा गुलाम बनून राहिला असता, असुरक्षितता, अभाव आणि अनिश्चिततेत आपले जीवन जगत राहिला असता. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्या उत्पादक शक्तींच्या विकासासह आदिम टोळी समाजाचे विघटन आणि पहिल्या वर्ग समाजाचा उदय ही ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रगतीशील घटना होती, जेव्हा की तात्कालिकदृष्ट्या यामुळे आदिम समाजाची ओळख असलेल्या सामुदायिकता आणि सामूहिकतेच्या भावनेचे विघटन झाले. आणि तसाही इतिहासाचा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. त्याला टंचाईतून लादलेल्या सामूहिकतेकडून विपुलतेतून जन्माला आलेल्या उन्नत आणि सजग सामूहिकतेकडे, म्हणजेच समाजवादाच्या संक्रमणातून जात साम्यवादाकडे जाणे आवश्यक आहे, कारण समाजाचे ज्ञान आपल्याला सांगते की कुणाच्याही इच्छेपासून स्वतंत्र अशी ही समाजाच्या गतीची दिशा आहे, जे आपण तथ्ये आणि पुराव्यांसह पुढे पाहू.

तथापि, जेव्हा समाजात अतिरिक्त उत्पादन शक्य होते, तेव्हा समाजाचे एकूण श्रम केवळ अनिवार्य किंवा आवश्यक श्रमाच्या श्रेणीत येत नाही. आवश्यक श्रम म्हणजे ते श्रम जे समाजातील लोकांच्या किमान भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक किंवा अनिवार्य आहे. आता जेव्हा समाजातील उत्पादक शक्तींचा विकास यापेक्षा उच्च पातळीवर पोहोचला आहे, तेव्हा हे उघड आहे की या आवश्यक श्रमाव्यतिरिक्त समाजातील लोक अतिरिक्त श्रम देखील करत आहेत, जे किमान गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाच्या वर अतिरिक्त उत्पादन किंवा सामाजिक अधिशेष निर्माण करत आहे. हे अतिरिक्त श्रम समाजाच्या एका हिश्श्याला उत्पादक श्रमात सहभागी होण्याच्या आणि उत्पादनात भाग घेण्याच्या अनिवार्यतेतून मुक्त करू शकते आणि शेवटी अपरिहार्यपणे असेच करते सुद्धा. जे लोक टोळी समाजात किंवा कुठल्याही सामुदायिक समाजात नेतृत्वाची भूमिका बजावत होते किंवा कुठल्याही रूपात विशिष्ट भूमिकेत होते, त्यांनी या वरकड उत्पादनावर कब्जा करण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ काही सभ्यतांमध्ये सुरुवातीला टोळी प्रमुख किंवा प्रधानांनी धान्य कोठारांच्या संरक्षकांची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. पुढे ते त्याचे मालक बनून बसले. तसेच अन्य काही ठिकाणी या अतिरिक्त उत्पादनावर हिंसक मार्गाने कब्जा करण्यात आला. या सामाजिक अधिशेषाच्या निर्मितीनेच समाजातील सत्ताधारी वर्गांना जन्म दिला. ही प्रक्रिया शेकडो वर्षांमध्ये चालली आणि आदिम टोळी समाजाचे विघटन झाले. यासोबतच वर्ग समाज अस्तित्वात आला.

हा टप्पा आल्यानंतर समाजातील उत्पादक श्रम दोन भागात विभागले जाऊ शकतात: अनिवार्य श्रम आणि अतिरिक्त श्रम. अनिवार्य श्रमाने उत्पादित केलेले उत्पादन हे उत्पादक वर्गाच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेले उत्पादन आहे आणि त्याला आवश्यक किंवा अनिवार्य उत्पादन म्हणता येईल. जेव्हा की उत्पादक वर्ग जे अतिरिक्त श्रम करतात त्यातून वरकड किंवा अतिरिक्त उत्पादन तयार होते, जे शासक वर्गाद्वारे हडप केल्या जाते.

उदाहरणार्थ, भारतातील प्राचीन सोळा जनपदांच्या कालखंडापूर्वी म्हणजे वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात, आजपासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी कृषी उत्पादन करणाऱ्यांच्या टोळी सरदारांनी आणि सुरु होत असलेल्या राज्यसत्तेला चालवणाऱ्यांनी ‘स्वैच्छिक कर’ घेण्याची सुरुवात केली होती. भारतातील हा काळ लोखंडाच्या वापराने गंगेच्या मैदानातून जंगले साफ करण्याचा काळ होता. याच काळात सुपीक गंगेच्या मैदानात लागवडीचा विस्तार होत होता आणि अतिरिक्त उत्पादन वाढत होते. या काळात बलि नावाच्या ‘स्वैच्छिक करांची’ सुरुवात झाली, जे प्रत्यक्ष कृषी उत्पादकांना अनिवार्यतः शासक वर्गांना द्यावे लागायचे. नंतर त्याचे अनिवार्य कर प्रणालीमध्ये रूपांतर झाले. आजपासून सुमारे 2,600 वर्षांपूर्वी गंगेच्या मैदानात उदयास आलेल्या या सोळा राज्यांमध्ये, राज्यसत्ता आणि सत्ताधारी वर्ग या लगान आणि करांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पादकांचे अतिरिक्त श्रम हिसकावूनच आपले अस्तित्व टिकवू शकले. या शासक वर्गांच्या आश्रयानेच समाजातील तत्कालीन बौद्धिक वर्ग, म्हणजे कलाकार, नाटककार, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, इ. अस्तित्वात आला, जो सामान्यतः शासक वर्गाच्या सेवेत गुंतला होता. तसेच असेही बुद्धिजीवी तयार झाले जे भौतिकवादी होते, सर्वत्र सत्ताधारी वर्गाच्या भूमिकेत असणाऱ्या ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या वर्चस्वाला आव्हान देत होते, आणि त्याच वेळी जनतेची बाजू घेत होते. परंतु असे बुद्धिजीवी सुद्धा समाजात सामाजिक अतिरिक्त उत्पादन व सामाजिक वर्गविभागणी निर्माण झाल्याशिवाय तयार होऊ शकले नसते. तथापि, जसजशी लगान आणि करांची ही संपूर्ण प्रणाली विकसित होत गेली तसतसे या शासक वर्गाने कारागीरांवरही कर लावणे सुरु केले. बलि, भाग, कर इत्यादी नावाने असे विविध लगान आणि कर आता प्रत्यक्ष उत्पादक लोकांकडून वसूल केले जात होते. या सोळा जनपदांपैकी एकाचा म्हणजेच मगधचा विस्तार झाल्याने मौर्य साम्राज्याच्या जन्मासाठी जमीन तयार झाली. मौर्य साम्राज्य हा पहिला राजवंश होता आणि तो जन्माला आल्यानंतर राज्यसत्तेचा आणखी विस्तार झाला. प्रथमच कायमस्वरूपी सैन्य आणि नोकरशाही अस्तित्वात आली, जमीन महसूल व्यवस्था सुरळीत झाली, एकसमान मापे आणि वजने परिभाषित केली गेली, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला यांचा विकास एका नवीन स्तरावर पोहोचला आणि यासह सत्ताधारी वर्ग आणि त्यांच्या सेवेत जोडलेल्या मध्यमवर्गीय बुद्धिजीवी, कलाकार इत्यादींचा वर्ग विस्तारला. या काळात उत्पादकतेतही मोठी वाढ झाली. गुलामी काम यापूर्वीच अस्तित्वात आले होते, परंतु भारतीय इतिहासात प्रथमच गुलामांचा घरगुती कामांसाठी वापर करण्यासोबतच त्यांना उत्पादक कामांमध्येही लावले गेले. सरकारी मालकीच्या जमिनीवर (ज्याला मौर्य काळात सीता भूमी म्हणून ओळखल्या जायचे) मुक्त शेतकर्‍यांना जमिनीचे भूखंड वाटप करण्याबरोबरच गुलामांच्या श्रमावर सुद्धा शेती केली जायची. याबरोबरच अतिरिक्त श्रम आणि त्याच्या अतिरिक्त उत्पादनाला प्रत्यक्ष उत्पादकांकडून हडप करण्याच्या पद्धतीही विस्तारल्या. नव-नवे कर, लगान इत्यादीद्वारे अतिरिक्त उत्पादन सत्ताधारी वर्ग हडप करू लागला. भारतीय इतिहासात आपण सामाजिक अधिशेषाच्या जन्माची, वर्ण (जो त्याच्या जन्माच्या वेळी वर्गच होता) तयार होण्याची व राज्यसत्तेचा जन्म होण्याची पूर्ण प्रक्रिया स्पष्टपणे पाहू शकतो.

वास्तवात, शासक वर्ग अतिरिक्त श्रम आणि त्यातून निर्माण होणारे अतिरिक्त उत्पादन कुठल्या पद्धतीने हडप करतो, यावरूनच समाज विकासाच्या कुठल्या टप्प्यावर आहे हे ठरते. उदाहरणार्थ, भांडवलशाहीच्या आधीच्या सामाजिक व्यवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास, अतिरिक्त श्रम कुठल्यातरी आर्थिकेतर मार्गाने, म्हणजे शासकीय नियम-कायदे, धर्म, सामाजिक परंपरा इत्यादींच्या आधारावर वसूल केले जात होते. उदाहरणार्थ, जातक कथांवरून माहीत पडते की सोळा जनपदांच्या काळात धार्मिक ग्रंथांमध्ये असे नियम-कायदे लिहिले गेले होते ज्यानुसार शेतकरी, (जे त्यावेळी प्रामुख्याने वैश्य वर्णाच्या लोकसंख्येतून येत होते) अधिनस्थ मजूर आणि गुलामांना (जे त्यावेळी प्रामुख्याने शूद्र जातीतून यायचे)  काही विशिष्ट कर, लगान द्यावे लागत होते, जे न दिल्यास त्यांना शिक्षा केली जायची. तसेच अनेक कर होते जे सत्ताधारी वर्ग जबरदस्तीने वसूल करायचे, जसे की टुंडिया आणि अकासिया कर अधिकार्‍यांद्वारे जबरदस्तीने गोळा केले जायचे. त्याचप्रमाणे कारागीर, अधीनस्थ मजूर यांना महिन्यातील ठराविक दिवशी राजा आणि सत्ताधारी वर्गाच्या लोकांसाठी काम करावे लागत असे. म्हणजे आर्थिकेतर बळजबरीद्वारे भूदास, अवलंबित शेतकरी, कारागीर इत्यादींच्या अतिरिक्त श्रमाला आणि त्याच्या अतिरिक्त उत्पादनाला शासक वर्ग आणि त्याच्या राज्यसत्तेद्वारे हडप केले जायचे. काही ठिकाणी ते श्रम लगान किंवा श्रम कराच्या रूपात असायचे, जसे की आठवड्याच्या किंवा महिन्याच्या ठराविक दिवसांसाठी प्रत्यक्ष उत्पादकांना शासक वर्गासाठी विनामूल्य काम करावे लागत होते, त्या बदल्यात त्यांना काहीही मिळत नव्हते. त्याचप्रमाणे हे उत्पादनाचे स्वरूप घेऊ शकते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश हिस्सा राजा किंवा जमीन मालकाला द्यावा लागायचा. त्या काळात ब्राह्मण-क्षत्रिय वर्ण मिळून सत्ताधारी वर्ग बनला होता. आणि नंतरच्या काळात लगान अथवा कराने पैशाचेसुद्धा रूप घेतले, त्यानुसार प्रत्यक्ष उत्पादकाला पैशात निश्चित कर किंवा लगान द्यावे लागायचे. भांडवलशाहीपूर्व काळातील सर्व वर्गव्यवस्था, मग तो गुलाम समाज असो, मौर्य काळातील शूद्र आणि वैश्य जातींच्या प्रत्यक्ष उत्पादकांच्या श्रमावर आधारित शेती अर्थव्यवस्था असो किंवा गुप्तकाळापासून सुरू झालेली भारतीय सरंजामशाही व्यवस्था असो, सुल्तनत काळ आणि नंतर मुघल काळातील निरंकुश सरंजामशाही व्यवस्था असो. वसाहतवादाच्या काळातही खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडून आर्थिकेतर बळजबरी करून आर्थिक वरकड वसूल करण्याची पद्धत ब्रिटिश वसाहतवाद्यांनी बदलली नाही, तर स्वत: त्यात सर्वोच्च स्थानी बसून जहागिरदार, जमिनदारांना स्वतःच्या हाताखाली करून घेतले.

वरील उदाहरणांवरून आपण अतिरिक्त श्रम आणि आवश्यक किंवा अनिवार्य श्रम या संकल्पना समजू शकतो. मौर्य राजवंशाच्या राजवटीत जेव्हा एखादा आश्रित किंवा अधीनस्थ शेतकरी आपल्या भूखंडावर तीन दिवस शेती करायचा आणि चार दिवस तो जमीनदार किंवा राज्याच्या सीता भूमी वर शेती करायचा, तेव्हा पहिले तीन दिवस तो आवश्यक किंवा अनिवार्य श्रम करायचा जे त्याच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक होते, तर पुढचे चार दिवस तो सत्ताधारी वर्गासाठी कोणत्याही मोबदल्याशिवाय अतिरिक्त श्रम करीत असे, ज्याच्या बळावर सत्ताधारी वर्गाची राज्यसत्ता, त्यांची ऐयाशी, त्यांच्यावर अवलंबित बुद्धिजीवी व कारकून वर्गाचे जीवन चालायचे. त्याचप्रमाणे सोळा जनपदांच्या काळात जेव्हा कारागिराला महिन्यातील चार दिवस राजासाठी नियमित काम करावे लागत असे, तेव्हा ते त्याचे अतिरिक्त श्रम होते, जे त्याच्याकडून धार्मिक आणि राज्याच्या नियम-कायद्यांद्वारे वसूल केले जात होते. सर्वसाधारणपणे सांगायचे तर, सामाजिक अतिरिक्त उत्पादन हा एकूण सामाजिक उत्पादनाचा तो भाग असतो जो आवश्यक उत्पादनापेक्षा जास्त असतो. आवश्यक उत्पादन म्हणजे खर्च केलेल्या श्रमशक्तीच्या (जी भांडवलशाहीपूर्व काळात माल बनलेली नसते) आणि उत्पादनाच्या  साधनांच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेले उत्पादन. सामाजिक अतिरिक्त उत्पादन सुद्धा आवश्यक उत्पादनाप्रमाणेच प्रत्यक्ष उत्पादक वर्गांद्वारे उत्पादित केले जाते, परंतु ज्याला शासक वर्गाद्वारे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हडप केले जाते.  ही पद्धत आणि स्वरूप कुठलेही असू शकतात, जसे की श्रमाच्या स्वरूपात, श्रमाच्या उत्पादनाच्या स्वरूपात किंवा श्रमाचे उत्पादन विकून मिळवलेल्या पैशाच्या स्वरूपात.

भांडवलशाही समाजातील उद्योजकीय नफा, लगान, व्याज आणि व्यापारी नफ्याचे स्त्रोत असलेले अतिरिक्त मूल्य हे वास्तवात दुसरे काही नसून  समाजातील प्रत्यक्ष उत्पादकांच्या, म्हणजे सर्वहारा वर्ग, लहान वस्तू उत्पादक जसे की कारागीर आणि छोट्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त श्रमातून तयार होणाऱ्या अतिरिक्त  उत्पादनाचेच एक निश्चित स्वरूप असते. अतिरिक्त उत्पादनाचे हे निश्चित रूप म्हणजे मुद्रा (पैसा) रूप आहे, जे एका विशिष्ट पद्धतीने हडप केले जाते. ही पद्धत आर्थिकेतर बळजबरी, थेट हिंसाचार आणि जबरदस्तीवर आधारित नसून ती आर्थिक शोषणावर आधारित आहे. अतिरिक्त मूल्याची ही केवळ एक प्राथमिक व्याख्या आहे, ज्याची आपण नंतर तपशीलवार चर्चा करू. परंतु आता एवढे समजून घेणे आवश्यक आहे: अतिरिक्त मूल्य आणि त्याची नफा, भाडे, व्याज इत्यादी विविध प्रकारांमध्ये विभागणी हे दुसरे काही नसून प्रत्यक्ष उत्पादकांच्या श्रमाच्या उत्पादनाचा तो भाग आहे ज्याचा आपण अतिरिक्त उत्पादन किंवा सामाजिक अधिशेष उत्पादन म्हणून वर उल्लेख केला आहे. म्हणजे हे दुसरे काही नसून प्रत्यक्ष उत्पादकांच्या जीवनाचे उत्पादन आणि पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाच्या अतिरिक्त ते वरकड उत्पादन आहे ज्याच्या बळावर आजचा शासक वर्ग, म्हणजे भांडवलदार वर्ग, त्याचे सरकार, त्याची राज्यसत्ता, त्याची सेवा करणारे वर्ग टिकलेले आहेत आणि त्यांचे ऐशोआराम  व ऐयाशी चालू आहे. हा उत्पादक वर्गाच्या श्रमाचा तो भाग आहे जे ते मालकांसाठी करतात, परंतु ज्यासाठी त्यांना कोणताही मोबदला किंवा मजुरी मिळत नाही. म्हणजेच, हे सामाजिक अधिशेष अथवा वरकड उत्पादन ते उत्पादन आहे जे प्रत्यक्ष उत्पादकाने उत्पादनाच्या साधनांच्या मालकांसाठी मोफत केलेल्या श्रमातून तयार होते.

त्यामुळे भांडवलदार वर्गाला प्राप्त होणारे अतिरिक्त मूल्य दुसरे काही नसून आर्थिक शोषणाच्या एका विशिष्ट पद्धतीने हडप केलेले अतिरिक्त उत्पादन होय, जे सामान्यतः पैशाचे रूप धारण करते, आणि जे कामगार वर्गाच्या त्या अतिरिक्त श्रमातून तयार होते ज्याच्या बदल्यात त्याला काहीही मिळत नाही आणि जे श्रम तो भांडवलदारांसाठी फुकटात करतो. फरक फक्त एवढाच आहे की एखाद्या गुलामाद्वारे किंवा सरंजामदारावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याने केलेल्या अतिरिक्त श्रमाप्रमाणे हे स्पष्टपणे दिसत नाहीत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनाचा काही भाग जबरदस्तीने घेतला जायचा किंवा दास वा भूदास स्वत:ला दिलेल्या जमिनीवर तीन दिवस काम करायचे आणि सत्ताधारी वर्गाच्या जमिनीवर चार दिवस अतिरिक्त श्रम करायचे. येथे अतिरिक्त श्रम आणि/किंवा अतिरिक्त उत्पादन ठिकाण आणि वेळेनुसार स्पष्टपणे वेगळे बघितले जाऊ शकते. पण भांडवलशाहीमध्ये अतिरिक्त उत्पादनाला हडप करण्याच्या या प्रक्रियेवर पडदा पडतो आणि तो लपतो. आता हे शोषण समजून घेण्यासाठी आपल्याला विश्लेषणाची गरज पडते आणि हेच  विश्लेषण पहिल्यांदा कार्ल मार्क्सने केले आणि भांडवलशाही शोषणाचे घृणास्पद क्षुद्र रहस्य काय आहे हे दाखवून दिले. मार्क्सने ज्या सिद्धांताद्वारे भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्रोत उघड केला, तो सिद्धांत आपण अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत म्हणून ओळखतो. पुढे आपण हा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत समजून घेऊ आणि भांडवलदार वर्ग आपल्याला कसे लुटतो, आपले शोषण कसे करतो हे जाणून घेऊ. पूर्वीच्या व्यवस्थांच्या उलट आज हे शोषण प्रत्यक्षपणे दिसत नाही त्यामुळे विश्लेषणाद्वारे त्याला समजून घ्यावे लागते. या विश्लेषणाची सुरुवात मालापासून होते, कारण मालच ती वस्तू आहे ज्यामध्ये भांडवलशाही समाजातील सर्व विरोधाभास भ्रूण स्वरूपात अस्तित्वात आहेत आणि माल स्वरूपातच भांडवलशाही समाजाच्या सर्व संपत्तीचा बहुसंख्य भाग अस्तित्वात आहे. भांडवलशाही समाजात, प्रत्येक वस्तू, प्रत्येक उत्पादन आणि प्रत्येक सेवा मालाचे रूप धारण करते, अगदी श्रमशक्ती म्हणजेच उत्पादकाची श्रम करण्याची क्षमता देखील मालामध्ये रूपांतरित होते. म्हणूनच भांडवलशाही समाजाच्या शास्त्रीय विश्लेषणाची सुरुवात मालापासूनच होऊ शकते.

(मूळ लेख- मजदूर बिगुल, सप्टेंबर 2022)
अनुवाद- जयवर्धन

कामगार बिगुल, एप्रिल 2023