निवडणुका जवळ येताच धार्मिक व जातीय तणाव, सीमेवरील तणाव आणि राष्ट्रवादी उन्मादात वाढ!
जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच खेळले जातात हे सर्व खेळ!

निखिल

कधी आपण विचार केला आहे का की देशात निवडणुका जवळ येतात तेव्हा, किंवा सरकारं विविध आघाड्यांवर अयशस्वी होतात तेव्हा, किंवा सामान्य जनतेचा आपल्या वास्तव प्रश्नांना घेऊन आक्रोश वाढतो, जनसंघर्ष सुरू होतात तेव्हा किंवा आर्थिक-राजकीय व्यवस्था संकटात असते तेव्हा विविध धार्मिक, जातीय, अस्मितावादी, छद्म राष्ट्रवादी मुद्दे अचानक समोर कसे येतात? चर्चाविश्व लगेच कसे जनतेच्या भौतिक जीवनाशी जोडलेल्या वास्तव प्रश्नांपासून दूर तथाकथित भावनिक, अस्मितावादी मुद्द्यांवर पोहोचते? हे इतिहासात अनेक वेळा झालेले आहे आणि अत्यंत सुचिंतितरित्या घडवले जाते. तरीही आज सामान्य जनतेची बहुसंख्या वर्गचेतनेच्या आणि इतिहासबोधाच्या अभावामुळे ह्या मागील खरी कारणे न समजल्यामुळे, प्रचाराच्या लाटेसोबत वाहवत जात आपलेच नुकसान करून घेत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात इंग्रजांनी फोडा आणि झोडाचे राजकारण केले हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य आपण अनेकदा बोलतो, ऐकतो परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्ताधारी देशी मालक, व्यापारी, ठेकेदार, धनी शेतकरी वर्गाने त्यापेक्षा वेगळे काय केले आहे? आज परत मोठ्या प्रमाणात सुरू असलेले धर्मवाद-जातीयवाद-अंधराष्ट्रवादाचे राजकारण कोणत्या वर्गाच्या फायद्याचे आहे आणि कोणत्या वर्गाच्या भविष्याला मातीमोल करणार आहे? जास्त उशीर होण्याच्या आत आपण खडबडून जागे होण्याची वेळ आलेली आहे.

आज देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आर्थिक विषमतेने कळस काढला आहे. देशातील कामगार कष्टकरी एका अभूतपूर्व संकटातून जात आहेत. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही भाषणबाजी खूप केली, त्यांची ‘मन कि बात’ आपल्याला खूप ऐकवली, अनेक भुलवणारी आश्वासणं दिली परंतु कामगार कष्टकरी जनतेचे जीवन त्यांनी नरक बनवले आहे हे धडधडीत सत्य आहे. मोदी सरकारच्या काळात जनतेची लूट आणि महागाई दोन्ही अभूतपूर्वरित्या वाढवली गेलेली आहे. त्यामुळे जनता कधी नव्हती एवढी त्रस्त झालेली आहे. अशा स्थितीत जनता फार काळ शांत राहू शकत नाही म्हणूनच सर्वसामान्य जनतेला त्यांच्या परिस्थिती विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी आणि सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  कामगार-कष्टकऱ्यांना धर्मांधता, जातीयवाद आणि अंधराष्ट्रवाद अशा खोट्या मुद्यांमध्ये अडकवून आपल्या वास्तव परिस्थितीबद्दल आंधळे आणि उदासीन बनवू बघत आहे.

धार्मिक, जातीय व अस्मितावादी हिंसाचार

ह्या संबंधातील काही आकडे बघितले तर ही स्थिती स्पष्ट होईल. सरकारी आकडेवारी नुसार 2017 ते 2021 ह्या कालावधीत देशभरात 2900 पेक्षा जास्त छोट्या किंवा मोठ्या धार्मिक दंगली झालेल्या आहेत. ज्यात 2017 साली 723, 2018 साली 512, 2019 साली 438, 2020 साली 857, 2021 साली 400 पेक्षा जास्त दंगलींचा समावेश आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी उन्मादाच्या घटना आता अपवादात मोडत नाहीत तर अशा घटना ज्या पद्धतीने आणि ज्या पातळीवर घडल्या आहेत त्यावरून हे अत्यंत स्पष्ट आहे की छोट्या दंगली घडवणे, जमातवादी उन्मादी तणावपूर्ण वातावरण तयार करणे, मुस्लिमांवर हिंसक हल्ले करणे हे सर्व प्रकार अत्यंत नियोजित पद्धतीने घडवले जात आहेत. महाराष्ट्रात कट्टरतावादी हिंदुत्ववादी संघटनांकडून नोव्हेंबर 2022 पासून ‘हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या’ नावाखाली राज्यातील 36 जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त कार्यक्रम, 50 पेक्षा जास्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा जनआक्रोश जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी सारख्या कुठल्याच वास्तव प्रश्नाच्या विरोधात नव्हता तर ह्यात मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर घोषणा दिल्या गेल्या आणि मुस्लिम विरोधी द्वेष पसरवणारी जहरी भाषणे झाली. परिणामी मागील काही महिन्यात राज्याच्या 10 शहरांमध्ये धर्मांध उन्माद पसरवत हिंसा घडवली गेली आहे.

यात गंभीर बाब ही आहे की हे मागील काही वर्षातच नव्याने घडते आहे असे नाही. ह्याला एक प्रदीर्घ इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हे इंग्रजांनी अनेक वेळा केले त्यातील एक उदाहरण बघा. 23 मार्च 1931 रोजी झालेल्या भगतसिंह-सुखदेव-राजगुरू ह्यांच्या फाशीच्या शिक्षेमुळे देशभरात आणि विशेषतः तरुणांमध्ये अत्यंत आक्रोश होता जो रस्त्यांवरही व्यक्त होऊ लागला त्यामुळे 24 मार्च 1931 ला कानपुर मध्ये इंग्रजानी कट कारस्थान करून दंगली भडकवल्या आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत आगीत तेल ओतून खऱ्या मुद्द्यापासून जनतेला भरकटवले. ही तीच दंगल आहे ज्यात शहीद गणेश शंकर विद्यार्थी ह्यांचा दंगल रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांना दंगलखोरांकडून खून करण्यात आला. इंग्रजी सत्तेविरोधातील राग अशाप्रकारे एकमेकांचे गळे कापण्याकडे वळवला गेला.

स्वातंत्र्यानंतरही अनेक वेळेला हिंदुत्ववाद्यांकडून दंगली घडवल्या गेल्या. ह्यात बऱ्याचदा ते विशिष्ट निमित्तांचा सोयीने आणि नियमित वापर करतात. अनेकदा धार्मिक मिरवणुकांच्या वेळी दंगली भडकवल्या गेलेल्या आहेत. याची अनेक उदाहरणं देता येतील; जसे ‘द वायर’ मधील एका लेखानुसार सोलापूर 1967 दंगल—निमित्त गणपती मिरवणूक, भिवंडी, जळगांव व महाड 1970 दंगल—निमित्त शिवजयंती मिरवणूक, जमशेदपूर 1979 दंगल—निमित्त रामनवमी मिरवणूक, कोटा 1989 दंगल—निमित्त अनंत चतुर्दशी मिरवणूक, भागलपूर 1989 दंगल—निमित्त रामशीला मिरवणूक, इ. अशा अनेक दंगलींचे सरकारी अहवालही हे दाखवून देतात की फाशीवाद्याकडून मिरवणूकीचा मार्ग ठरवताना तणाव वाढेल हे केंद्रस्थानी ठेवले गेले व सुनियोजित पद्धतीने हिंसाचार भडकवला गेला. ह्या सर्व इतिहासातून आपण सर्व धर्मीय कष्टकरी कामगार काही शिकणार आहोत की नाही? आज तर डीजे सारखे अत्याधुनिक साधनं आणि सरकारचे पाठबळ वापरून विविध सणांना समारंभांना हिडीस मिरवणूका काढायच्या, त्यात प्रक्षेभक नारेबाजी करायची, गाणी वाजवायची आणि प्रत्येक सणाला भय आणि हिंसक वातावरण निर्मितीचे माध्यम म्हणून वापरायचे हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.  हिंदू सामान्य नागरिकांच्या धार्मिक सणांना उत्सवाचे स्वरूप द्यायचे व त्यांना दंगलीचे उत्सव बनवण्याकडे घेऊन जायचे हे सुनियोजित पद्धतीने घडते आहे. ह्याच वर्षी राम नवमीच्या निमित्ताने दंगली झाल्यामुळे जवळपास 12 लोकं मारली गेली. ही मारली गेलेली सर्व जनता सामान्य कामगार कष्टकरी पार्श्वभूमीतून येतात. हिंसेत भाग घेणारे आणि त्यात मारले जाणारे कोणीही नेत्यांची मुलं किंवा श्रीमंतांची मुलं असत नाहीत. मग अशा स्थितीत आपण त्याच चुकांची पुनरावृत्ती होऊ देणार आहोत की इतिहासातून योग्य धडे घेऊन फाशीवादाला उत्तर द्यायला सुसज्ज होणार आहोत?

जातीय अत्याचार आणि हिंसाचाराच्या बाबतीत सरकारी आकडेवारी नुसार 2014 ते 2021 या मोदी सरकारच्या राजवटीच्या 7 वर्षात जातीय अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या संख्येत 26 टक्के वाढ झाली आहे.  हे सगळे जातीय हिंसाचार आणि जातीय अस्मितांचे लढे परत जनतेच्या एका हिश्श्याला दाबण्यासाठी, जनतेला विभागण्याचे आणि आपापसात लढवण्याचे एक मोठे हत्यार म्हणून सत्ताधारी वर्गाकडून वापरले जाते.

मागील 3 मे पासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू आहे. तिथेही अस्मितेच्या आधारावर हिंसाचार भडकवला गेलेला आहे, आणि यात पुढाकार भाजपचा आहे. ह्या हिंसाचारादरम्यान 4 मे रोजी एक अत्यंत निर्घृण घटना घडली ज्यात उन्मादी जमावाकडून 2 कुकी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली गेली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. मागील जवळपास 110 दिवसांपासून मणिपूर जळते आहे. ज्यात आजपर्यंत 181 लोकांचा मृत्यू, 300 लोक गंभीर रित्या जखमी, अनेक महिला आणि लहान मुलांवर अत्याचार, 65,000 पेक्षा जास्त लोकं विस्थापित झालेली आहेत. भाजपाचे पक्षपाती राजकारण आणि नाकर्तेपणामुळेच राज्यातील हिंसाचाराची स्थिती ह्या अवस्थेपर्यंत गेलेली आहे की शेजारी राहणारे सामान्य नागरिक सुद्धा एक-दुसऱ्याचे मुडदे पाडत आहेत. राज्यातील आणि  केंद्रातील सत्ताधारी मात्र मजेत आहेत. मणिपूर जळत असताना भारताचे ‘प्रचारमंत्री’ मोदी मात्र आधी कर्नाटक प्रचार आणि नंतर अमेरिका, फ्रान्स, तुर्की, सौदी अरब वगैरे देशाचे दौरे करत होते.

युद्धउन्माद, सीमेवरील तणाव आणि राष्ट्रवाद

भारत पाकिस्तान किंवा भारत चीन सीमेवर जवळपास दररोज छोट्या मोठ्या तणावाच्या घटना घडतात. परंतु आज भांडवली मीडिया ह्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या तणावाच्या घटनेला अशा पद्धतीने प्रसारित करतो जसे काही भयंकर युद्ध छेडले गेले आहे; किंवा युद्ध छेडले तरी जावे ह्याचा जोरदार प्रचार सतत सुरू असतो. ह्यात पहिली लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की दोन देशांमधील सीमेवरील तणाव, झडप किंवा युद्ध ह्यामागे कधीच दोन्ही देशांच्या सामान्य लोकांचे हित किंवा शत्रुत्व असत नाही. ह्या देशांमधील सत्ताधारी भांडवलदार वर्गाचे हित किंवा साम्राज्यवादी विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असतात. दुसरी गोष्ट ही की सीमेवरील तणाव, झडपा, युद्ध ह्यात लढण्याचे काम कोण करतात, कोण मारले जातात? ते उन्माद पसरवणारे भांडवली सत्ताधारी, सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी, भांडवली सेलिब्रिटी पत्रकार किंवा या घटना टीव्ही-मोबाईल वर बघत स्वतःचे मनोरंजन करवून घेणारा उच्चमध्यम वर्गातील कोणीही नसतात. तिथे सामान्य कामगार,कष्टकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं असतात. आपलं शोषण करत आणि आपल्याच टाळूवरच्या लोण्यावर जगणारी ही जमात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून पसरवल्या जातं असलेल्या युद्ध उन्मादाला विरोध केलाच पाहिजे.

निवडणुका जवळ येतील तशा सीमेवरील तणावाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकेल त्यामुळे आपण सजग राहिले पाहिजे. या संबंधातील कारनाम्यांबद्दल पूलवामा मधील हल्यासंबंधात भाजपनेच नेमलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपाल सत्यपाल मलिक ह्यांनी पोलखोल केलेली आहे. भाजपने गुप्तचर यंत्रणांनी धोक्याचे इशारे दिलेले असतानाही, सरकारनेच लष्कर-निमलष्कर दलाच्या वाहतुकीसाठी घालून दिलेली नियमावली न पाळता, विमानामार्फत जवानांना पोहोचवण्याची परवानगी नाकारून 14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना सुरक्षा दलाच्या वाहनात पाठवले. सुरक्षेचे नेहमीचे संकेत पाळले गेले नाहीत. त्यामुळे ह्या ताफ्यावर आर.डी.एक्स. ने भरलेल्या गाडीने हल्ला झाला आणि त्यात 40 सैनिकांचा जागेवर मृत्यू झाला. सत्यपाल मलिक ह्यांनी जबाबदारी स्वीकारत सरकारच्या अपयशाने हे झाले आहे असे जिम कॉरबेट उद्यानात शूटिंग करत असलेल्या मोदींना फोनवर कळवले. मोदींना त्यांना गप्प राहायला सांगितले. हे सर्व मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाले हा योगायोग होता का? त्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक झाली ज्याचा भाजप कडून निवडणुकीत प्रचारात जोरदार वापर केला गेला. ह्या काळात भडकवलेला युद्ध उन्माद ह्याचा भाजपला भरपूर फायदा झाला. झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित करायला सरकारने एक चौकशी समिती नेमली जिचा रिपोर्ट कधी बाहेर आलाच नाही. जबाबदारी निश्चित झाली नाही, कोणालाही शिक्षा झाली नाही हा काही योगायोग आहे का? उलट ह्या सर्व प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन सरकारने नंतरच्या काळात केले. ही आहे 40 मारलेल्या जवानांची जीवनाची किंमत.

आता परत निवडणुकीच्या तोंडावर सीमावाद आणि युद्ध उन्माद भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ह्यांनी जम्मू काश्मीर मध्ये एक भाषण दिले ज्यात ते म्हटले की, “भारत आता शक्तिशाली देश झाला आहे, आपण आता शत्रूंना सीमेअंतर्गत तर मारू शकतोच सोबत सीमापार जाऊन सुद्धा मारू शकतो.” अशी भाषणं कुठल्याही प्रयोजनाशिवाय दिली जात नाहीत. विशेष करून निवडणुकीच्या आधी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात हे प्रश्न निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनावे, सीमा तणाव वाढवणे ह्याच उद्देशाने हे अनेकवेळा केले जाते.  दुसऱ्या देशाविरोधात गरमागरम भाषणबाजीचा इतिहास खूप जुनाच आहे. कॉंंग्रेस सरकारांनी सुद्धा याचा पुरेपूर वापर केला आहे. भांडवली सत्ताधारी अंतर्गत समस्यांपेक्षा सीमा प्रश्नाला निवडणूक मुद्दा बनवतात आणि त्यायोगे जनतेची दिशाभूल करतात.

भांडवली मीडिया सुद्धा ह्यात आपली भूमिका अत्यंत  जोरदार रित्या निभावत आहे. दैनिक जागरण हे वृत्तपत्र हिंदी  प्रदेशात मोठ्या खपाचे वृत्तपत्र आहे. ह्या वृत्तपत्राने 22 ऑगस्टला मोदी सरकारची स्तुती करत भारत सरकारने नवीन सर्जिकल स्ट्राईक केल्याची बातमी छापली. त्यावर बरीच टीका झाल्यावर भारतीय सेनेलाही त्याचे खंडण करावे लागले. तरीही दैनिक जागरणने ना ती बातमी वेबसाईट वरून काढली ना त्यासाठी माफी मागितली. ह्यामागील उद्देश समजून घ्या आणि सजग व्हा!

तरुणांचा निवडणुकीतील वापर

देशभरात तसेच महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी संघटना, विविध पक्ष तसेच बहुविध अस्मितावादी संघटनांनी अनेक मित्र मंडळ, तरुण मंडळ इत्यादी तयार केलेली आहेत. विविध संघटना-पक्ष त्यांना निधीही देतात. कामगार कष्टकरी पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणांनी ह्या बद्दल विचार करण्याची गरज आहे की  ह्यातून काय साध्य होत आहे? एका बाजूला ह्या माध्यमातून सण, समारंभांना उत्सवी स्वरूप द्यायचे आणि उत्सवांना बाजारू बनवायचे, तर दुसऱ्या बाजूने तरुणांना त्यांच्या सर्व समस्यांचा त्या उत्सवी स्वरूपातील धांगडधिंग्यातून विसर पाडायचा, ह्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुत्ववादी आज मोठ्या प्रमाणात ह्यांचाच उपयोग द्वेषाच्या लागवडी साठी सुद्धा करत आहेत. ह्याच माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात मालकांच्या बाजूचे राजकारण करणाऱ्या विविध भांडवली पक्षांच्या मतांच्या बेगमीसाठी सुद्धा वापरले जाते आहे. लोकसभा आणि पुढे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे त्यामुळे ह्या वर्षभरात हे अजून व्यापक पातळीवर केले जाणार आहे. तरुणांनो जागे व्हा, आपण कोणाच्या पालखीचे भोई बनत आहोत हे स्वतःला विचारा आणि हे ओळखा की जेव्हा धर्माचा सामाजिक आणि राजकीय जीवनात कुठलाही हस्तक्षेप होतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त तोटा सामान्य कामगार कष्टकरी जनतेला व तरुणांना होतो.

धार्मिक हिंसाचार, अंध-राष्ट्रवादाचा मतांच्या ध्रुवीकरणासाठी, जनतेच्या खऱ्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी आणि आपल्या जनद्रोही व भांडवलधार्जिण्या चरित्रापासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाला ह्याचा जबरदस्त फायदा होतो हे लहान मुलं सुद्धा सांगू शकतील इतके स्पष्ट आहे. मग आपल्याला ठरवायचे आहे  की आपण सामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या हातातील खेळणे बनून राहणार आहोत का? ते म्हणतील तेव्हा आणि ते म्हणतील त्यासाठी आपल्या भावना दुखावल्या जातील आपला आक्रोश होईल आणि आपण  एकमेकांचे अविचारी पद्धतीने माथी फोडायलाही तयार होणार आहोत का?

आज जेव्हा भाजपा-आर. एस. एस. आणि एकंदरीत भांडवली राज्यसत्ता जातीयवादी, धर्मवादी आणि अंधराष्ट्रवादी विचारांना चालना देण्याचे काम करत आहे कारण शेवटी हे विचार जनतेला विभागण्याचे आणि सत्ताधारी वर्गाच्या फायद्यासाठी खोटी चेतना निर्माण करून भांडवलशाहीला अजून मजबूत करण्याचे काम करत आहेत तेव्हा आपल्याला कामगार कष्टकरी जनतेला अजून जोमाने जीवनाशी निगडित वास्तविक समस्यांवर एकजूटता निर्माण करून लढावे लागेल. खरा शत्रू आपली दिशाभूल कसा करतो हे ओळखावे लागेल आणि सतत भांडवलदार वर्गाच्या चलाखीपासून सावध राहावे लागेल. आणि आपले मूलभूत हक्क म्हणजे शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा, घरकूल मिळवण्यासाठी आणि महागाईचा बोजा कमी करवण्यासाठी सरकारला घेरावे लागेल.