छावा : फॅशिस्ट भोंग्यांतून बाहेर आलेला आणखी एक चित्रपट 

सूरज (अनुवाद: राहूल साबळे)

मूल हिन्‍दी पोस्‍ट को पढ़ने के लिए इस लिंक पर क्लिक करें 

फॅशिस्ट राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची प्रचार यंत्रणा. इतिहासाचं मिथकीकरण करणं आणि मिथकांना इतिहास म्हणून सादर करण्यासाठी फॅशिस्ट शक्ती आपली प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वापरतात. भारतात हे काम प्रसारमाध्यमांपासून ते संघाच्या गल्लीबोळांतील शाखांपर्यंत होत आहे. पण आजच्या काळात या द्वेष पसरवणाऱ्या प्रचार यंत्रणेमध्ये चित्रपट आणि सोशल मीडियावरील लहान व्हिडिओ व रील्स यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजपा आणि संघाचं आयटी सेल लहान-लहान व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुस्लिमविरोधी प्रचार पसरवत आहेत, तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांना झपाट्याने चालना दिली जात आहे, जे थेट भाजपा आणि आरएसएसच्या प्रचार यंत्रणेसारखे काम करत आहेत. या काळात द केरळ स्टोरी, जहाँगीर नॅशनल युनिव्हर्सिटी, द काश्मीर फाइल्स, आरआरआर, बाहुबली यांसारख्या अनेक चित्रपटांचा एक पूर आला आहे, जे थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपा आणि आरएसएसचा प्रचार (किंवा असं म्हणूया की द्वेषाचं विष) जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.

याच मालिकेतील पुढचा चित्रपट म्हणजे छावा. हा चित्रपट सतराव्या शतकातील मराठा राजे शिवाजी यांचे पुत्र संभाजी यांच्या जीवनावर आधारित आहे. इतिहास आणि तथ्यांवर जितका  अन्याय आणि अत्याचार या चित्रपटकारांनी केला आहे कदाचित  तितका अन्याय आणि अत्याचार  या चित्रपटातील पात्र संभाजींवर झाला नसेल. खरं तर या चित्रपटातील जवळपास सर्वच दृश्ये ऐतिहासिक तथ्यांद्वारे खोडून काढता येतील आणि हे दाखवता येईल की संपूर्ण चित्रपटच मिथकं, खोटं आणि तथ्यांची मोडतोड यावर आधारलेला आहे. मात्र, लेखाच्या मर्यादेमुळे आपण या चित्रपटातील काही निवडक दृश्यांचा विचार करणार आहोत, जे या चित्रपटाचं खरं रूप उघड करण्यासाठी पुरेसे ठरतील.

चित्रपटातील एका दृश्यात एका हिंदू राजाचा प्रसंग येतो, जो एका क्रूर मुघल बादशहासमोर साखळदंडात जखडलेला दाखवला आहे. तो रक्ताने माखलेला आहे आणि त्याच्या सभोवताली उभे असलेले मुस्लिम शिपाई लांब दाढ्यांचे दाखवले आहेत. या दृश्याच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मुघल सम्राट औरंगजेबने एका हिंदू राजांवर केवळ यासाठी अत्याचार केला कारण तो हिंदू राजा हिंदू धर्म आणि “हिंदवी स्वराज्य” वाचवण्यासाठी लढत होता. पण यावर इतिहासकार काय म्हणतात? इतिहासकार सेतु माधवराव पगडी यांनी “हिंदवी स्वराज्य” या संकल्पनेला स्पष्टपणे नाकारलं आहे आणि “हिंदवी स्वराज्य” संदर्भात मिळालेल्या पुराव्यांची वैधताही अनेक इतिहासकारांनी नाकारलेली आहे. शिवाय, ज्यांच्या “हिंदवी स्वराज्य” च्या स्वप्नाचा उल्लेख या चित्रपटात केला आहे, त्या शिवाजींच्या स्वतःच्या पुत्राने, संभाजी यांनी, त्यावर  दिलेर खानाच्या सोबत मिळून हल्ला केला होता. वस्तुतः, “हिंदवी” या शब्दाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नव्हता. हा शब्द एका विशिष्ट भौगोलिक भागात राहणाऱ्या आणि विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी वापरण्यात यायचा, आणि या लोकांमध्ये हिंदू व मुसलमान दोघेही समाविष्ट होते. हा शब्दच मुळात अरबी भाषेतील ‘हिंद’ या शब्दावरून बनलेला आहे.

चित्रपटाची सुरुवात अभिनेता अजय देवगण यांच्या आवाजाने होते, ज्यामध्ये काही चित्रांच्या माध्यमातून भारताचा इतिहास दाखवला जातो – जो प्रत्यक्षात एक मिथकीकृत कथा आहे. यात तथ्यसदृश काहीही नाही. या दृश्यांमध्ये दाखवलं जातं की औरंगजेबने भारताला – ज्याला चित्रपटात “मंदिर” म्हणून दाखवलं गेलं आहे – कसं नष्ट केलं, आणि शिवाजीने औरंगजेबाविरोधात लढा उभारत ते कसं वाचवलं. अशा प्रकारे हा चित्रपट मिथकांच्या आधारे एक गौरवशाली भूतकाळ उभा करण्याचं काम करतो. पण ज्या क्षणी आपण तथ्यांच्या आधारावर बघायला सुरुवात करतो, त्या क्षणीच या संपूर्ण मिथकीकृत इतिहासामागचं खरं स्वरूप उघड होतं.

सर्वात पहिलं सत्य हे आहे की हा चित्रपट कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून शिवाजी सावंत यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे. पण तो असा सादर केला जातो की जणू काही तो इतिहासच उलगडतो आहे. दुसरं म्हणजे, जर आपण ऐतिहासिक तथ्यांकडे बारकाईने पाहिलं, तर ही गोष्ट स्पष्ट होते की औरंगजेब आणि शिवाजी यांमधील लढाई ही कोणत्याही धर्माच्या रक्षणासाठीची लढाई नव्हती, तर ती पूर्णपणे राजकीय सत्तेच्या विस्तारासाठीची लढाई होती. शिवाजींच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्यात आणि दरबारात मोठ्या प्रमाणात हिंदू मंत्री, सरदार आणि सैनिक होते. जर औरंगजेबाचं उद्दिष्ट खरंच सर्वांना मुसलमान बनवणं असतं, तर सर्वप्रथम त्याने आपल्या दरबारात आणि सैन्यात नेतृत्वाच्या भूमिकेत असलेल्या हिंदूंना मुसलमान बनवलं असतं. त्याने जेव्हा धर्मांतराचा वापर केला, तोदेखील राजकीय वर्चस्व आणि अहंकाराच्या लढाईचा एक भाग होता—भारतावर मुस्लिम राजवट प्रस्थापित करण्याची मोहीम नव्हे.

अभ्यासक राम पुनियानी यांच्यासह अनेक इतिहासकारांच्या मते, औरंगजेब आणि इतर अनेक मुस्लिम शासकांनी अनेक मंदिरे उभारण्यासाठी दान दिले होते. उदाहरणार्थ, सोमेश्वर महादेव मंदिर स्वतः औरंगजेबाने बांधले होते आणि या मंदिराच्या धर्मदंडावर ही बाब नोंदवलेली आहे. श्रृंगेरी शारदा मंदिर हे याचे आणखी एक प्रतिनिधिक उदाहरण आहे, जे 1791 साली मराठा सैन्याने उद्ध्वस्त केले होते आणि त्याचे पुनर्बांधणी टीपू सुलतानाने केली होती. अशा अनेक उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की अनेक मुस्लिम शासकांनी मंदिरांसाठी केवळ दानच दिले नाही, तर काही मंदिरांचे निर्माणही करवले होते. त्यामुळे इतिहासाची माहिती असलेला कोणताही व्यक्ती अशा प्रकारच्या बालिश युक्तिवादावर फक्त हसू शकतो. पण फॅशिस्ट शक्ती हा खोटा प्रचार मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपात करतात की जेणेकरून ही  मिथकं  आपल्याला डोक्यात ‘सामान्य ज्ञान’ घर करतील — ज्यावर आपण प्रश्नही विचारणार नाही, फक्त सवयीने त्याला सत्य मानू लागू. या चित्रपटाने केलेली शेकडो कोटींची कमाई हेच दर्शवते की मोठ्या प्रमाणात लोकसंख्या या खोट्या प्रचाराच्या प्रवाहात वाहत चालली आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या (कु)तर्कांचे खंडन करणे अत्यंत आवश्यक आहे.

चित्रपटात काही दृश्यं अशा पद्धतीने चित्रीत केली गेली आहेत की जणू मुस्लिम सैन्य हिंदू भागांमध्ये जाऊन सामान्य लोकांवर अत्याचार करत आहेत. यात असं दाखवलं गेलं आहे की हिंदू मुलांना ठार मारणं, त्यांच्या घरांना आग लावणं, महिलांवर बलात्कार करणं – हे सगळं इस्लाम धर्म मानणाऱ्यांच्या स्वभावातच आहे. मात्र ऐतिहासिक तथ्यांवर नजर टाकल्यास दिसून येतं की दिल्ली सल्तनतपासून मुघल काळापर्यंत अशा प्रकारचं वागणं ना मुसलमानांनी केलं आहे ना हिंदू शासकांनी. त्या काळातल्या बहुतांश लढाया ह्या  साम्राज्यं, संस्थानं यामधील सत्ता-संघर्षांतुन होत असत – धर्म त्याच्यात मुख्य मुद्दा कधीच नव्हता. जवळजवळ सर्वच युद्धांमध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही असायचे. शिवाजींना पुरंदर किल्ल्यात घेरून औरंगजेबाशी तह करण्यास, 23 किल्ले  सुपूर्द करण्यास आणि त्याची अधीनता मान्य करण्यास भाग पाडणारा राजा  जयसिंह देखील एक हिंदूच होता.

मुसलमानांची त्याच-त्याच एक जुनाट प्रतिमेला आधार बनवून त्यांना एका खास प्रकारच्या वेषभूषेत दाखवून हा चित्रपट एका विशिष्ट पद्धतीने लोकांच्या मनात अशा वेषभूषेप्रती आणि मुसलमानांविरोधात द्वेषाची बीजं पेरण्याचं काम करतो. एका बाजूला या दृश्यांद्वारे तो मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवतोच, पण दुसऱ्या बाजूला आज मुसलमानांवर होणाऱ्या हिंसाचाराला ग्राह्य ठरवण्याचाही प्रयत्न करतो. गुजरात दंग्यांदरम्यान जी भयावह दृश्यं आपल्यासमोर आली होती — ज्या वेळी संघ परिवाराच्या गुंड वाहिन्यांनी त्रिशूलाने गर्भवती महिलांची पोटं फाडून आपल्या ‘शौर्याचं’ प्रदर्शन केलं होतं, गावोगावी जाऊन संघी गुंड मुस्लिम महिलांवर बलात्कार करून त्यांना ठार करत होते — ती दृश्यं आजही कोणत्याही न्यायप्रिय आणि संवेदनशील व्यक्तीच्या मनातून गेली नाहीत; किंवा धर्माच्या नावावर जमावाकडून मुस्लिम तरुणांना मारहाण करून ठार करणं, प्रत्येक सणानिमित्ताने दंगे घडवून आणणं, सोशल मीडियावर मुस्लिम महिलांविरोधात छेडछाड व बलात्कार यासारख्या गुन्ह्यांचं प्रचार करणारे ‘जालिम हिंदू’सारखे पेज तयार करणं — हे सगळं हा  चित्रपट एका प्रकारे योग्य ठरवतो. परंतु हेही समजून घेता येऊ शकतं कारण संघीयांचे एक ‘गुरू’ सावरकर यांनी मुसलमानांविरोधात बलात्कार व हत्या यांना वैध हत्यार म्हणून मान्यता दिली होती.

हा चित्रपट अतिशय धूर्त पद्धतीने प्रेक्षकांच्या मनात हे ठसवण्याचा प्रयत्न करतो की जसा त्या काळात मुस्लिम शासकांनी हिंदूंवर अमानुष अत्याचार केले (जे प्रत्यक्षात एक मिथक आहे आणि इतिहासकारांनी स्पष्टपणे फेटाळून लावले आहे), तसाच आज हिंदूंनी — खरंतर संघ आणि त्याच्या गुंड वाहिन्यांनी — मुसलमानांवर तसाच अमानुष अत्याचार करायला हवा. हाच या चित्रपटाचा खरी हेतू आहे: धार्मिक तेढ निर्माण करून देशभरात मुसलमानांविरोधात एक साम्प्रदायिक वातावरण तयार करणे आणि याचे परिणाम नागपुरात हळूहळू दिसायला लागले आहेत.

पद्मावती, छावा, पानीपत यांसारख्या चित्रपटांचा आधार भलेही ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि कालखंड (जसा की हे चित्रपट स्वतःला सादर करतात) असला, तरी या सगळ्या आधुनिक चित्रपटांचा खरा हेतू आजच्या काळातील फॅशिस्ट प्रचाराला चालना देणं हा आहे. हे चित्रपट खऱ्या इतिहासाची आणि वस्तुनिष्ठ तथ्यांची गळचेपी करून त्यांना फॅशिस्ट आणि सांप्रदायिक प्रचारासाठी वापरण्याचे काम करतात.

फॅशिझमचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो एक पूर्णतः काल्पनिक समुदाय (उदाहरणार्थ “हिंदू राष्ट्र”) निर्माण करतो आणि स्वतःला त्या समुदायाचा एकमेव प्रवक्ता म्हणून मांडतो. त्याचबरोबर या विचारसरणीच्या समुदायाच्या विरुद्ध दुसऱ्या समुदायाला एक बनावट शत्रू म्हणून उभं करतो — जसं की संघ परिवार आणि मोदी सरकारने मुसलमानांच्या बाबतीत केलं आहे. या बनावट शत्रूला बहुसंख्यक जनतेच्या सर्व समस्यांचं — जसं की बेरोजगारी, महागाई इत्यादी — कारण ठरवलं जातं. यामुळे या समस्यांना प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या भांडवलशाही व्यवस्थेला आणि भांडवलदार वर्गाला मोदी सरकार व संघ परिवार यांसारख्या फॅशिस्ट गटांकडून जबाबदारीच्या चौकटीबाहेर ठेवलं जातं. जर्मनीमध्ये हा बनावट शत्रू होता — ज्यू , आणि तिथं ‘शुद्ध’ जर्मन आर्य राष्ट्र ही पूर्णतः काल्पनिक ओळख निर्माण करण्यात आली होती. प्रत्यक्षात असं काही आर्य राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. जर्मनीत आर्यत्वाची एकमेव ओळख म्हणजे ‘ते ज्यू नाहीत’, हेच होतं. भारतातही संघाचं ‘हिंदू राष्ट्र’ याच कल्पनेवर आधारित आहे — त्या राष्ट्रातील सदस्यांमध्ये एकमेव साम्य म्हणजे ‘ते मुसलमान नाहीत’. हे यावरच थांबत नाही, तर फॅशिस्ट शक्ती हळूहळू या बनावट शत्रूच्या परिघाचा विस्तार करतात. जो कोणी फॅशिस्ट नेता किंवा संघटनेविरोधात आवाज उठवतो, त्यालाही त्या बनावट शत्रूच्या गटात ढकललं जातं. जर्मनीत या ओळखीची स्थापना करण्यासाठी तिथल्या मीडिया यंत्रणेसह रेडिओ आणि इतर कलाक्षेत्रांचा वापर करण्यात आला, आणि आज भारतातही फॅशिस्ट प्रचारतंत्र दिवस-रात्र हेच काम करत आहे.

आज या फॅशिस्ट प्रचारयंत्रणेच्या विरोधात आपल्याला जनतेचे खरे मुद्दे आणि त्याची मुळ कारणं  समाजात पोहोचवावी लागतील. कारण फॅशिस्ट प्रचारयंत्रणेचा अंतिम हेतू हाच असतो की जनतेला त्यांच्या खऱ्या गरजांपासून दूर ठेवावं आणि त्यांच्यातच फूट पाडावी, जेणेकरून काही मोजकी लोक देशाच्या संसाधनांची लूट करत राहतील. पण या सर्व प्रचंड प्रचारयंत्रणांनाही एक मर्यादा आहे — फॅशिस्ट राजकारण संपूर्णतः खोटेपणावर उभं असतं. त्याच्या विरुद्ध, क्रांतिकारकांकडे असते ती सत्याची ताकद. हेच सत्य आहे ज्याचा रोज रोज अनुभव सामान्य जनता घेत असते. हेच सत्य आपल्याला फॅशिस्टांच्या खोट्या प्रचाराची भांडं फोडण्याची ताकद देतं.

पण यासाठी कामगार कष्टकऱ्यांनी जनतेच्या संसाधनांच्या आधारावर स्वतःची  प्रचारमाध्यमे उभारली पाहिजेत. त्याच्याच माध्यमातून आपण फॅशिस्ट राजकारणाला हाणून पाडू  शकतो. ‘छावा’ सारख्या फॅशिस्ट प्रचारपटाच्या खोटेपणावर, बाष्कळपणावर प्रकाश टाकणे देखील या लढ्याचाच एक भाग आहे. आपल्याला, कामगार- कष्टकरी, सामान्य जनतेला आपल्या देशाचा खरा इतिहास समजून घ्यावा लागेल. कारण तेव्हाच आपण इतिहासाच्या फॅशिस्ट विकृतीला ओळखून उत्तर देऊ शकू