23 मार्च शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी संघटनांकडून देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन
सुस्मित
23 मार्च शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनांकडून शहीद स्मृति संकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात आणि देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांमध्ये पथनाट्य, बूकस्टॉल, पत्रक वाटप, क्रांतीकारी गीत सादरीकरण, फिल्म स्क्रीनिंग, चर्चासत्र, शहीद मेळा सारख्या माध्यमातून शहरांमध्ये, गावांमध्ये युवकांमध्ये तसेच प्रौढांमध्ये शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मील, अशफाकउल्ला खान यांचा क्रांतिकारी वारसा पोहचवण्यात आला.
नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटना, पुणे मिळून 23 मार्च रोजी “शहीदांच्या स्मृतीत” या सभेचे आयोजन केले होते . “कारवा चलता रहेगा” या क्रांतिकारी गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला शहीद क्रांतिकारकांचे जीवन व क्रांतिकारकांच्या विचारांची प्रासंगिकता याची मांडणी केली गेली. यानंतर गौहर रजा दिग्दर्शित “इन्कलाब” या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थी आणि युवक चळवळी समोरील आव्हाने या विषयावर नौभास आणि दिशाच्या कार्यकर्त्यांनी मांडणी केली. कुठलेही ज्ञान हे सामाजिक संपत्ती आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी म्हणून विद्यार्जन करत असताना सामाजिक प्रश्नांबाबत विचार करणे आणि त्यावर काम करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. तसेच कुठलाही विद्यार्थी सामाजिक वास्तवापासून आणि त्याच्या समस्यांपासून विलग राहू शकत नाही, त्यामुळेच समाज बदलण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सामूहिकरीत्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत मिराज यांनी मांडले. त्यानंतर सुस्मित यांनी देशातील देशातल्या शिक्षण, बेरोजगारी, महागाईच्या परिस्थितीवर भाष्य केले आणि मांडले की आज देशामध्ये फॅसिस्ट शक्ती सत्तेत असताना तरुणांची विशेष जबाबदारी आहे की त्यांनी कामगार कष्टकऱ्यांना संघटित करत या समाजविरोधी शक्तींचा सामना केला पाहिजे . यानंतर जोरदार घोषणा देत शहराच्या मुख्य भागात अभिवादन रॅली काढण्यात आली.
अहिल्यानगरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात “भगतसिंह तू जिंदा है” आणि “आरे नौजवान” या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली. महिलांचे समाजातील दुय्य्म स्थान आणि महिला अत्याचारांकरिता महिलांनाच दोष देण्याची मानसिकता यावर भाष्य करणारे “बाईचीच चूक” नाटकाचे सादरीकरण झाले. त्यांनंतर भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या क्रांतिकारी विचारांची आजच्या समस्यांच्या संदर्भात प्रासंगिकता मांडण्यात आली. मुंबईमध्ये शहीददिनानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे मानखुर्द, गोवंडी भागातल्या कामगार वस्त्यांमधून काढली गेली. रॅलीदरम्यान पत्रके वाटली गेली, अणि क्रांतिकारी गीते गायली गेली.
दिल्लीमध्ये विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. करावल नगर, दिल्ली येथे सरदार उधम या फिल्मचे स्क्रिनिंग आणि चर्चा झाली. शाहबाद डेअरी इथे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाकडून दोन दिवसीय ‘शहीद मेळा“ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रोग्रेसिव आर्टिस्ट लीगच्या कलाकारांकडून भगतसिंह यांच्या जीवनावर आधारीत आणि क्रांतिकारी आंदोलनाच्या महत्वाच्या घटनांवर आधारित कला प्रदर्शन लावण्यात आले. मेळ्यामधे क्रांतिकरी गीत सादरीकरण केले गेले. शाहबाद डेअरी आणि आसपासच्या भागातून जवळपास 4-5 हजार लोक शहीद मेळ्यामधे सामील झाले. बुराडीच्या सावित्री–फातिमा पुस्तकालयातून आलेल्या मुलांनी भगतसिंह यांचे विचार आणि सध्याचा काळावर आधारीत नाटक सादर केले. काही मुलांनी त्यांनी भगतसिंह यांवर स्वतः लिहिलेल्या कवितांचे वाचन केले. स्थानिक मुलांनी प्रेमचंद यांच्या ईदगाह या कथेवर आधारित एक नाटक सादर केले तसेच समूहनृत्य सुद्धा सादर केले. मेळ्यामधे जादूचे प्रयोग दाखवले गेले ज्यामध्ये चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे मुलांना सांगितली गेली. यानंतर मेळ्याच्या आयोजन समितीकडून “हमे तुम्हारा नाम लेना हैं” या नाटकाचे सादरीकरण केले. नाटकात काकोरीच्या शहीदांच्या फाशीचे दृश्य दाखवताना अशफाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मील यांच्या एकतेचा संदेश जनतेसमोर प्रामुख्याने मांडला गेला. हजारो लोक मेळ्यात सहभागी झाले. पण मेळा यशस्वी होण्यामध्ये सुद्धा त्यांचा तितकाच सहभाग होता. मेळ्याचे तंबू लावण्यापासून सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग होता. यासोबतच मेळ्याचा पूर्ण खर्च हा जनतेच्या सहयोगावर उभा राहिला होता. दिशा विद्यार्थी संघटना कडून जे.एन,यु. आणि दिल्ली विद्यापिठात पथनाट्य, ओपन माईक, क्रांतिकारी गीत सादरीकरण करून क्रांतिकारकांचे विचार विद्यार्थांपर्यंत पोहचवले गेले.
ग्रेटर नोएडा मधील कुलेसरा येथील शहीद भगतसिंह वाचनालयावर “भगतसिंह आणि आजचा भारत” या विषयावर परिसंवाद आयोजित केला. सिरसा, हरियाणा येथे सुद्धा ”भगतसिंह यांचा क्रांतिकारी वारसा आणि वर्तमानात त्यांची प्रासंगिकता” यावर परिसंवाद आयोजित केला. नौजवान भारत सभेतर्फे “भगतसिंह व उनके साथियों की वैचारिक विरासत और युवाओं के कार्यभार” या विषयावर अभ्यासक, वरिष्ठ पत्रकार, आणि भगतसिह समग्र साहित्याचे संपादक सत्यम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. धनास, चण्डीगढ़ येथे नौभासतर्फे लहान मुलामध्ये ‘द लेजेंड ऑफ़ भगतसिंह’ फ़िल्मचे प्रदर्शन आयोजित केले गेले.
आज आपल्याला विविध मार्गांनी आपल्या शहीद क्रांतिकारकांचा वारसा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जावा लागेल. शहीदांच्या स्वप्नातला भारत अजूनही बनलेला नाहीये. आपल्या देशात जो कामगार कष्टकरी वर्ग त्याच्या मेहनतीने या देशाला चालवतो तो दोन वेळेच्या अन्नाला सुद्धा मोताद आहे. त्याला ना राहायला चांगले घर आहे, जेवायला अन्न ना शिक्षण. याच वर्गाच्या श्रमाची लूट करून या देशातला अंबानी-अडाणी सारखे बडे भांडवलदार आणि भांडवलदार वर्गाचे सर्व हिस्से दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत. आज कामगार कष्टकऱ्यांमध्येच धर्म आणि जातीच्या नावाने फूट पाडण्याचे काम केले जात आहे. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर आज भारताला शासक वर्ग खूप चतुराईने करत आहे. अशा वेळेस या सर्व क्रांतिकारकांनी जो संदेश दिला होता तो आपल्याला प्रत्येक वस्तीपर्यंत, कारखान्यापर्यंत पोहोचवावाच लागेल. म्हणून आज गरज आहे ती या देशातल्या युवकांनी कामगार कष्टकऱ्यांनी संघटीत होण्याची. तेव्हाच आपण क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत बनवू शकू.