क्रांतिकारी सोवियत संघातील आरोग्य सेवा

मुनीश मैंदोला, अनुवाद:  निखिल एकडे

आजच्या नवीन पिढीला क्रांतिकारक सोव्हिएत संघाच्या समाजवादी मॉडेलबद्दल (1917-1956) एक तर काहीही माहिती नाही किंवा भांडवली प्रसारमाध्यमांमध्ये समाजवादाबद्दलचा जो कुत्सा-प्रचार केल्या जातो फक्त तोच माहिती आहे—जो माहिती नसण्याच्या समानच असतो. बरेच लोक ज्यांना समाजवादाची विचारधारा आणि तिच्या यशाबद्दल जाणूनही घ्यायचे असते, ते बऱ्याचदा इंटरनेट आणि विकिपीडिया किंवा हिस्टरी चॅनेल, जिओग्राफी चॅनेल इत्यादींमधून त्याची सुरुवात करतात. भांडवली चॅनेल/मीडिया/इंटरनेट यांवर सचेतनअचेतन स्वरूपात समाजवादाच्या विचारधारेबद्दल भ्रम पसरवण्याचे काम केले जाते आणि समाजवादाच्या प्रचंड यशांना जाणून बुजून कमी करणे किंवा गायबच करून टाकण्याचं षड्यंत्र केले जाते जेणेकरून लोकांनी भांडवली शोषण आणि लूटीला सहन करणंच आपलं नशीब समजावं आणि भांडवलशाहीला एकमात्र पर्याय असलेल्या समाजवादाकडे दुर्लक्ष करावं. अशा परिस्थितीत आवश्यकता आहे की नव्या पिढीला समाजवादाच्या यशाबद्दल सांगितलं जावं. या क्रमात आपण सोवियत संघातील 1917 ते 1956 मधील काळाची तपासणी करत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की ह्या काळात सोवियत संघात आरोग्य क्षेत्रामध्ये काय काय साध्य करण्यात आले.

1956 च्या विसाव्या पार्टी काँग्रेसनंतर निकिता ख्रुश्चेव्हने समाजवादासोबत गद्दारी करून तिथे भांडवलशाही परत प्रस्थापित केली. त्यानंतर तिथे समाजवादी धोरणं आणि व्यवस्थेला तोडून श्रमाच्या लुटीवर टिकलेली आधीची भांडवली धोरण पुन्हा सुरू केली गेली. परिणामी काही काळातच तेथील परिस्थिती परत झारकालीन रशिया किंवा कुठल्याही इतर भांडवली देशाप्रमाणे झाली. आजच्या भांडवली रशियात, फक्त श्रीमंत लोकांसाठीच उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत, सामान्य जनतेच्या वाट्याला श्रीमंतांचं उरलं-सुरलं येतं आणि हीच परिस्थिती आजच्या भारताची किंवा इतर कोणत्याही भांडवली देशाची आहे.

सोवियत संघात आरोग्य सेवासुविधा सर्व जनतेसाठी निशुल्क उपलब्ध होत्या; तिथे ना गोरखपुर प्रमाणे ऑक्सिजन सिलेंडर च्या अभावी लहान मुलं मरत होती, ना भूक कुणाचा जीव घेत होती. सोवियत रशियात गृहयुद्धाच्या (1917-1922) काळात आरोग्य सेवा फारच मागे पडली होती. 1921 मध्ये जेव्हा गृहयुद्धात सोवियत सत्ता जिंकली तेव्हा रशियामध्ये सर्व ठिकाणी युद्धामुळे प्रचंड वाईट परिस्थिती होती. देशभरात टायफॉईड आणि देवी सारख्या आजारामुळे अनेक लोक मरत होते. साबण, औषधे, आहार, घर, शाळा, पाणी इत्यादी तमाम मुलभूत सुविधांचा चारही दिशांनी दुष्काळ होता. मृत्युदर कित्येक पट वाढला होता आणि  प्रजनन दर कमी झाला होता. चारही दिशांनी अव्यवस्थेची परिस्थिती होती. संपूर्ण देश आरोग्य कर्मचारी, दवाखाने, खाटा, औषधं, विश्रामगृह ह्या सगळ्यांच्या अभावाच्या समस्येशी झगडत होता. या परिस्थितीत सोवियत सत्तेने एका केंद्रीकृत आरोग्यव्यवस्थेला स्वीकारण्याचा निर्णय घेतला, जिचे लक्ष्य  नजिकच्या काळात उपचार करणे आणि दूरच्या काळात रोग थांबवणे, रोगांपासून बचावाची साधने आणि पद्धती विकासावर भर देणे हा होता जेणेकरुन लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारावी. या व्यवस्थेचे उद्दिष्ट नागरिकांना त्यांच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी सर्व मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून करून देणे होतं, जेणेकरून त्यांना दुरच्या शहरांमध्ये नाही तर घराजवळ उपचार मिळेल. देशांतर्गत सर्वात प्रथम सहायता स्टेशन, नंतर पॉली क्लिनिक, जिल्हा आणि शहरांमध्ये मोठे दवाखाने तयार करण्यात आले. सर्व सरकारी विभाग, कारखाने, खाणी, शेती इत्यादींमध्ये काम करणारे कामगार, शेतकरी, कर्मचारी, नागरिक यांना त्यांच्या काम करण्याच्या आणि राहण्याच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या व लोकांना त्यांच्या आरोग्य हक्क आणि अधिकारांबद्दल जागृत करण्यात आलं. सोवियेत संघाच्या राज्य घटनेमध्ये 1936 मध्ये लिहिण्यात आलं की जनतेला मोफत आरोग्य सुविधा देणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ह्याला पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलं. सोवियत संघात आजारांवर फक्त उपचार नाही तर रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रोगांच्या प्रतिबंधावर योग्य लक्ष देण्यात आले. देशभरात विविध प्रकारचे दवाखाने खोलण्यात आले ज्यांच्यात दारूबंदी, टीबी व अन्य प्रकारच्या रोगाशी लढण्याची कौशल्ये उपस्थित होती. 1919 मध्ये सोवियत संघात लसीकरण अनिवार्य करण्यात आले, त्याचा परिणाम लगेच दिसून आला आणि मृत्युदर कमी झाला. सोवियत संघात 1917 मध्ये 17,785 डॉक्टर होते जे 1928 मध्ये वाढून 63,219 झाले. 1917 मध्ये आरोग्यावरील खर्च 128 मिलियन रुबल पासून वाढून 1928  पर्यंत 660 मिलियन रुबल पर्यंत पोहोचला. 1917 मध्ये दवाखान्यातील खाटांची संख्या 1,75,000 होती जी 1928 मध्ये वाढून 2,25,000 झाली. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या (1932-1933) शेवटापर्यंत डॉक्टरांची संख्या वाढून 76,000 झाली, दवाखान्यातील खाटांच्या संख्येत अर्ध्यापेक्षा जास्त वाढ झाली आणि नर्सेसची संख्या 2,56,000 पासून वाढून 57,50,000 झाली. सोबतच 14 नवी वैद्यकीय महाविद्यालये व 133 सेकंडरी वैद्यकीय महाविद्यालय खोलण्यात आले. झारकालीन रशियामध्ये 9 शिशू आणि मातृत्व कल्याण केंद्र होती जी 1938 मध्ये वाढून 4,384 झाली. माता आणि मुलांसाठी मोठ्या प्रमाणात किंडरगार्डन, नर्सरी, विश्रामगृह इत्यादी  बनवले गेले. स्टालिन काळात सर्व प्रकारचे उपचार- दवाखान्यातील उपचार, फिजियोथेरेपी, रेडिओथेरपी, सॅनिटोरिम इलाज, दंतचिकित्सा, मातृत्व सेवा इत्यादी सोव्हिएत मधील जनतेला मोफत उपलब्ध होते. 1937 मध्ये सोव्हिएत संघात सार्वजनिक आरोग्याचे बजेट 1913 च्या 75 पट होते. 1913 मध्ये आरोग्यसेवांवर प्रतिव्यक्ती खर्च केवळ 90 कोपेक होता जो 1937 मध्ये वाढून 60 रुबल झाला. 1938 पर्यंत बालमृत्यू दर 50 टक्क्यांनी कमी झाला, क्षयरुग्णांची संख्या 80 टक्क्यांनी कमी झाली, सीफिलिस रुग्णांची (गुप्तरोग) संख्या 90 टक्क्यांनी कमी झाली. 1937 मध्ये मृत्युदर 1913 मधील मृत्यू दराच्या 40 टक्क्यांनी कमी झाला होता, म्हणजे लोकांचं आयुर्मान वाढलं होतं. याव्यतिरिक्त सोव्हिएत संघात 1938 मध्ये खाद्य उद्योगाचे एकूण उत्पादन 1913 च्या झारकालीन रशियाच्या जवळपास 6 पट होते आणि जनतेच्या खूप मोठ्या भागाला उत्तम पौष्टिक भोजन उपलब्ध करून दिल्या जात होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत फळांचा खप 3 पट आणि मांसाचा खप 5 पट वाढला होता.

ह्या सोवियत प्रणालीने आपली श्रेष्ठता आणि उपयोगिता 1941 ते 1945 काळातील दुसऱ्या महायुद्धात सिद्ध केली, जेव्हा तेथील आरोग्य कर्मचारी अनेक लाख आजारी आणि घायाळ सैनिकांना परत मोर्चावर पाठवण्यात यशस्वी झाले. आरोग्याच्या क्षेत्रात सोवियेत संघाने सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम केलं ते गरिबी आणि बेरोजगारी मुळापासून संपवण्याचं. खरंतर अनेक आजारांचं मूळ कारण गरिबी आणि बेरोजगारी असते, त्यामुळेच आरोग्यासंबंधी इतर अनेक प्रश्न तयार होतात. सोव्हिएत संघात सगळ्यांना रोजगार देण्यात आला, मोफत शिक्षण, चिकित्सा, आवास इत्यादी सुविधा दिल्या गेल्या, जनतेला सन्मान, निश्चिंततेचं, सुख-समृद्धीचं जीवन देण्यात आलं, त्यामुळे सोव्हिएत संघात आरोग्य क्षेत्रात वरील प्रमाणे चमत्कारिक बदल घडवणे आणि प्रचंड यशाला गवसणी घालणे शक्य झाले. भांडवली देशांमध्ये श्रम करणाऱ्या जनतेला जाणून बुजून गरिब ठेवण्यात येते, कित्येक प्रकारचे कर लावून त्यांना लुटल्या जाते, त्यामुळे तेथे गरिबीमुळे उत्पन्न होणारे आजार जनतेला त्रस्त करून सोडतात. गरिब उपचार-प्रतिबंध यांच्या अभावी मरतो कारण चांगला उपचार खूप महाग असतो जो फक्त श्रीमंतच खरेदी करू शकतात. सोवियत संघात ह्याच्या उलट सगळ्यांना रोजगार, नि:शुल्क शिक्षण आणि स्वास्थ्य सुविधा देऊन लोकांची अनेक भूक व कुपोषणजन्य आजारांपासून सुटका करण्यात आली. तुम्ही ह्याची तुलना आजच्या भारतासोबत करा.  मागच्या 70 वर्षात जवाहरलाल नेहरूं पासून नरेंद्र मोदी पर्यंत सर्वांच्या नेतृत्त्वातील भारतीय भांडवलशाही जनतेला मूलभूत आरोग्य सेवा-सुविधा देण्यात पूर्णतः अयशस्वी आणि निकामी सिद्ध झाली आहे.

 

 

कामगार बिगुल, जानेवारी 2019