घरकामगार महिलांसाठी कोरोना ठरला दुष्काळात तेरावा महिना
नेहा
घराची व्यवस्था नीट व सुरळीत ठेवण्यासाठी जी काही घरातली कामे करावी लागतात ती कामे करण्यासाठी बाहेरील व्यक्ती मोलमजुरी देऊन कामावर ठेवली जाते, त्याला आपण घरकामगार म्हणतो. घरकाम हे अतिशय मेहनतीचे व श्रमाचे काम आहे, परंतु इतर मेहनतीच्या कामांप्रमाणेच या कामालाही हलक्या दर्जाचेच काम म्हणून पाहिले जाते आणि सरकारी पातळीवर तर अनेक ठिकाणी त्याला कामाचा दर्जाही दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनुसार घरकाम करणाऱ्या महिलांचे म्हणजेच दुसऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण एक कोटीपेक्षा जास्त आहे.
घरकाम करणार्या महिला प्रामुख्याने असंघटित क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण प्राप्त नाही. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि छळाच्या विरोधात त्यांना कोणताही कायदेशीर दावा करता येत नाही. उलट मोठ्या प्रमाणामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना कामचुकार, आळशी, बेईमान, बेजबाबदार अशाप्रकारे हिणवले जाते आणि अनेकदा तर चोरीचे आळही घेतले जातात.घरकाम करणाऱ्या महिलांना मिळणारी मजुरी अत्यंत कमी प्रमाणात मिळते किंवा नगण्य मिळते. कधी कधी तर मजुरी कमी मिळत असल्यामुळे नाईलाजाने ज्या ठिकाणी त्या काम करतात त्या ठिकाणचे शिळे अन्न, चप्पल जोड्या फाटके कपडे यावर आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो. सहा तासापासून 10 ते 12 तासांपर्यंत काम करून सुद्धा त्यांना पुरेशी मजुरी मिळत नाही. घरकाम करणाऱ्या महिलांना कोणतीही आठवड्याची सुट्टी, आजारपणाची सुट्टी किंवा प्रसूतीची सुट्टी मिळत नाही. त्यांच्या मुलांना पाळणाघर सुद्धा उपलब्ध केले जात नाही. उदाहरणार्थ, पुणे येथील अप्पर इंदिरा नगर परिसरात मोठ्या संख्येने बिगारी कामगार व घरकामगार राहतात. दिवसभर मालकिणीकडे धुणी-भांडी करून थकून मग घरी येऊन घरातली कामे उरकणे हाच घरकामगार महिलांचा दिनक्रम. घरात शक्यतो शिक्षण घेणारी लहान मुले आणि दारू पिणारा नवरा अशीच परिस्थिती सगळीकडे असल्यामुळे आपल्यावर आलेली वेळ आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी त्या झटपटत असतात. बहुतांश घरकामगारांच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मग यासाठी मालकिणीसमोर कितीही हाजी-हाजी करावी लागली, कितीही गुलामीत दिवस काढावे लागले तरी चालेल पण घर सुरळीत चालले पाहिजे असल्या परिस्थितीत ते आपले दिवस काढत असतात. कोणीही मालक कधीही घरकामगाराला सांगू शकतो की उद्यापासून तू कामावर येऊ नको आणि बदल्यात त्यांना कोणतीही रक्कम नुकसानभरपाई (हर्जाना) म्हणून द्यावी लागत नाही. घरकामगारांच्या वेतनासंदर्भात सुद्धा कुठले नियम नाहीत की कोणतेही कायदे नाहीत वा रोजगाराचे कोणतेही संरक्षण नाही. अशा प्रकारचे अत्यंत असुरक्षित हे काम आहे.
दुष्काळात तेरावा महिना अशाप्रकारे स्थिती कोरोनाच्या बंधनांमुळे घरकामगारांची झाली. मागील गेले चार ते पाच महिन्यापासून घरकामगार महिला लॉकडाऊनमुळे कामावर जाऊ शकल्या नाहीत. या काळात लादलेल्या निर्बंधांमुळे घरकामगार महिलांच्या कुटुंबांची दैन्यावस्था झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने विविध बंधने घालून कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची आणि प्रत्येक कामाच्या ठिकाणी कामगारांची संख्या कमी करण्यावर भर दिला. ज्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य आहे अशा पांढरपेशा, आयटी उद्योगासारख्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची चलती झाली, पण ज्यांना कामावर जाणे भागच आहे अशा असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, घरकाम करणाऱ्या महिला यांच्यावर उपासमारीची वेळ आली. पुण्यासारख्या शहरात सुमारे १ लाखापेक्षा अधिक घरकाम करणाऱ्या महिला असून त्या विविध ठिकाणी काम करत असल्याने घरमालकांनी काेराेनाचा संसर्ग हाेण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी त्यांना सुटी दिल्याचे दिसून आले. यामुळे जवळपास ७० टक्के कामगार महिलांना फटका बसला.
आधीच वाईट असलेल्या या परिस्थितीत कोरोना विषाणूने थैमान घातले आणि समस्या आणखीनच बिकट झाली. सरकारने टाळेबंदी जाहीर करताच सोसायट्या व बंगल्यातील मालकिणींनी आपापल्या मोलकरणींना सांगितले कि उद्यापासून कामावर येऊ नका. गरज वाटल्यास आम्ही फोन करून बोलवून घेऊ. चार-पाच महिने काळ अनेक मालकिणीला फोन कधी करावासा वाटलाच नाही. फक्त स्वतःची गरज म्हणून नसू द्या पण आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरीणीकडे काम बंद असताना घरात चूल पेटतेय कि नाही याची थोडी दखलसुद्धा द्यावीशी वाटली नाही. सरकारने आश्वासन दिले होते की लॉकडाऊनच्या काळात सर्वांना तीन महिन्याचे राशन पोहचवू पण वास्तवात आज सुद्धा कित्येकांना फक्त एक महिन्याचे राशन मिळाले व काहींना ते सुद्धा नाही. काम नसल्यामुळे आपले घर कस चालवायचं? कुठे राहायचं? मुलांचं शिक्षण कस करायचं? व त्यासोबतच काम नाही तर चार महिन्याचे लाईट बिल कुठून भरणार? चार महिन्याचे घरभाडे कसे भरणार? घरात अँड्रॉईड मोबाईल नसताना सरकारने केलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा भार कसा उचलणार? घरात अन्नाचा कण नसताना पोटाची भूक कशी भागवणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं होती उपासमार, काळोख, शिक्षणाचा खेळखंडोबा, रस्त्यावर फेकले जाणे, उधार-उसनवारी-कर्ज!
इतर सर्व कामगारांप्रमाणेच घरकामगारांच्या रक्त आणि घामाच्या शोषणातून चालते ही भांडवली व्यवस्था. कोरोना सारख्या साथींमध्ये तिचे सर्वात कृर रुप दिसून येते. अत्याधिक असुरक्षित आणि असंघटीत क्षेत्रातील घरकामगारांनी संघटीत होणे आणि न्यायपूर्ण जीवनासाठी, कायदेशीर अधिकार मिळवण्यासाठी व नफ्याच्या व्यवस्थेला संपवण्यासाठी संघर्ष करणे हाच मार्ग शिल्लक आहे.
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020