तुमच्या सदाचाराचा ऱ्हास – 1
राहुल सांकृत्यायन (अनुवाद – प्रविण सोनवणे)
लेखकाचा परिचय
राहुल सांकृत्यायन खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.
जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ शकते की, ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा, साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती. इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?, बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.
राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”
राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं गतिरोध. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.
समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरूद्ध तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.
—————————————-
- व्यभिचार
सत्-आचार म्हणजे थोर माणसांचे आचरण. थोर कोणाला म्हणले जाते? थोरांच्या कोटीमध्ये त्या गरिबाला मोजले जाऊ शकते का, ज्याला इमानदारीने मिळविलेल्या आपल्या कमाईस खाण्याचाही अधिकार नसून जो दाण्या-दाण्यासाठी मोताद आहे? नाही. इथे थोर म्हणजे जुने-नवे राजे, राजऋषी, मोठ-मोठ्या सम्राटांचे राज पुरोहित आणि गुरु-ऋषी-मुनी, ज्यांनी सदाचार प्रकट करणारे शास्त्र आणि स्मृती रचल्या आहेत. थोर म्हणजे पीर-पैगंबर, मूसादाऊद जे की स्वतः राजे किंवा शासक होते, किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मोठ्या जन-धनाचे मालक बनले होते. अशा “थोर” व्यक्तींचं वागणं हे जगाचा सदाचार बनलेले आहे. त्यांचा सदाचार सुद्धा एकसारखा नाहीये. कुठे सोळा-सोळा हजार बायका कृष्ण आणि दशरथासारख्या सदाचाऱ्यांकडे होत्या असे सांगितले जाते. सुलेमान, दाऊद तसेच इतर पैगंबर सुद्धा या बाबतीत खूपच “उदार” होते. आज सुद्धा आपल्याकडे वाजिद अली शहांची कमतरता नाहीये. नुकतेच एक महाराज मेले आहेत, जे याबाबतीत दुसरे वाजिद अली शहाच होते. सत्य तर हे आहे की जर असे धनाढ्यच आमच्या सदाचाराचे आदर्श असतील तर असा सदाचार नसलेलाच बरा. एखादा पुरुष एक पत्नी असताना दोन-दोन, चार-चार आणि त्यापेक्षाही जास्त विवाह करू शकतो, तरी सुद्धा हिंदू आणि मुस्लिम धर्मानुसार त्याच्या सदाचारी असण्याबद्दल थोडीशीही शंका घेतली जाऊ शकत नाही. परंतु याच धर्मांनुसार ह्याच स्वातंत्र्याला धरून जर कोणत्याही स्त्रीने एकाच वेळी दोन पती केले तर तो दुराचार होईल. असं असलं तरीही जगात असेही देश आहेत जिथे एका स्त्रीने अनेक पती करणे जरासेही अनैतिक समजले जात नाही. तिबेटमध्ये ही प्रथा सामान्य आहे. तिथे चुकूनच एखादी स्त्री असेल जिचे अनेक पती नाहीत आणि ही बाब तर आपल्या जुन्या इतिहासात देखील आढळते. पाच नवरे असूनही द्रौपदी ही भारतातील प्रात:स्मरणीय पंचकन्यांपैकी एक होती. शेवटी यामध्ये कोणता सदाचार आहे? असे अनेक देश आहेत जिथे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत बहुपती-बहुपत्नी विवाहाला योग्य मानले गेले आहे, आणि अनेक असे देश आहेत जिथे बहुपत्नी विवाहाला तितकेच अनुचित समजले जाते जितके बहुपती विवाहाला. युरोप, अमेरिका, जपान हे अशा देशांपैकीच आहेत. न्यायाच्या दृष्टीने पाहिल्यास हे स्पष्टपणे जाणवते की जर एका स्त्रिचे अनेक पती असणे अनुचित आहे, तर एका पुरुषाच्या अनेक पत्नी असणे सुद्धा तेव्हढेच अनुचित आहे. आज जिवंत असलेल्या प्रमुख धर्मामध्ये असा एकही धर्म नाही, की जो एक पती आणि एक पत्नी विवाहालाच फक्त योग्य ठरवतो तसेच दोन्ही प्रकारच्या बहुविवाहांना प्रतिबंध करतो.
परंतु हा लैंगिक सदाचार फक्त बाह्य बाब आहे. आतमध्ये डोकावून पाहिल्यास परिस्थिती अजूनच बिभत्स दिसून येते. प्रत्येक श्रीमंत आणि शक्तिशाली पुरुष प्राचीन काळापासून आजपर्यंत लग्नाच्या पत्नींशिवाय अनेक दास्या आणि रखेली ठेवत आलाय आणि वेश्यावृत्तीने तर धनाला सौंदर्य येते असे मानले जाते. जर पुरुष चंचल असेल तर तो मर्द बच्चा म्हणला जातो, परंतु ‘वेश्या’ शब्दाचे दूषण मात्र फक्त स्त्रिलाच लावले जाते. लहानपणापासूनच प्रत्येक माणूस तसेच प्राचीन काळापासून आपला समाज अशा वातावरणात वाढत आलाय, ज्यात पुरुषांसाठी नैतिकतेची जी कसोटी लावली जाते, तिच्यावर जेव्हा स्त्रिला तोलले जाते तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. संपूर्ण जगामध्ये ‘सदाचार-सदाचार’ ओरडले जात आहे. त्यामुळे भारतीयांनी असे समजू नये की सदाचाराचा ठेका फक्त त्यांनाच मिळालेला आहे. युरोप, अमेरिका, आशिया सर्वच प्रदेशांमध्ये यावर जोर दिला जात आहे. धर्म आणि ईश्वरावर विश्वास ठेवणारे तर विशेष करून यासाठी आकाश-पाताळ एक करतात. परंतु सदाचाराचे जेव्हढे कमी पालन धर्मानुयायी आणि ईश्वरभक्त करतात, या नियमाची जितकी अवहेलना त्यांच्याकडे होते, तेवढी इतर जागी होत नाही. रशिया मधून धर्म आणि ईश्वराचे राज्य नष्ट झाले आहे. परंतु संपूर्ण जगामध्ये तुम्ही तोच असा एक देश पहाल की जेथून वेश्यावृत्ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे. काय आपल्या देशामध्ये अशा सदाचाराची खिल्ली उडवणारे सर्वाधिक हिंदू-तीर्थ आणि हिंदू-मठ नाहीत? अयोध्येला जा आणि तिथल्या मोठ्यात मोठ्या अवतारी ईश्वरभक्त आणि सिद्ध महात्म्याला घ्या आणि ज्यांना मरून काहीच वर्षे झालेत त्यांच्याविषयी सुद्धा विचारा मग कळेल सदाचारा संबंधी कशा-कशा प्रकारचे भयानक घोटाळे तिथे होतात. या जागा नैसर्गिकच नाही, तर अनैसर्गिक व्यभिचाराचे सर्वात मोठे अड्डे आहेत. बाहेरून तेथे जाणारी भोळी-भाबडी जनता, ज्यांना ब्रह्मचर्य, सदाचाराची साक्षात मूर्ती समजून आपले तन-मन-धन अर्पण करते, तेच घृणास्पद कामुकतेचे साक्षात अवतार आहेत. अशा व्यक्तींच्या तोंडून ब्रह्मचर्य आणि सदाचाराचे मोठ-मोठे उपदेश ऐकून तर उपहासाने म्हणावे लागते—निर्लज्जते तुझा नाश होवो! साधू संन्यासांचे याबाबतीतील क्रियाशील विचार त्यांच्या श्रीमुखातून निघतात त्यापेक्षा एकदम वेगळेच आहेत. भारतातील कितीतरी धार्मिक मंडळं गुप्त व्यभिचार सुकर व्हावा म्हणून बनली आहेत. अनेक भगवद्भवन आणि भजनाश्रम लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहेत. भलेही संयुक्त प्रांतात जा वा गुजरातमध्ये किंवा पंजाब वा बंगाल पहा, भलेही नेपाळला जाऊन पहा, अथवा मद्रासला, घरोघरी मातीच्याच चुली आहेत, सर्व सापनाथ-नागनाथ एकसारखेच आहेत. सदाचाराबाबत जो जेवढा पतित आहे तो तेवढेच अधिक सुंदर अलंकारिक शब्दामध्ये त्यावर व्याख्यान देऊ शकतो. शहरे आणि देशांचे दर्शन करण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच घर आणि चार भिंतीच्या आत सभ्यता आणि दिखाऊपणाच्या पेहरावाला बाजूला सारून पहा. तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मचर्य आणि सदाचाराचे नियम जितके कठोर बनविले आहेत, तितक्याच सहजतेने ते तोडले पण जातात. आपल्या एका महान राजकीय नेत्याचा ब्रह्मचर्यावर अतिशय भर आहे परंतु त्यांच्याकडे त्याच्या छत्रछायेखालील मोठ-मोठ्या अनुयायांनी ज्या पद्धतीने वारंवार ते तोडण्याच्याच नियमांचे पालन केले आहे, त्याने हेच सिद्ध होते की बांधाने एक थेंब पाणी सुद्धा अडविले जात नसेल तर अशा बांधाची गरजच काय?
खरे तर सदाचाराच्या बाबतीत आपला समाज “मनसि अन्यत वचसि अन्यत” (बोलायचे एक, आणि करायचे दुसरेच) चा पक्का अनुयायी दिसून येतो. आतील सर्व ढोंग पाहत किती तन्मयतेने याची धार्मिक चर्चा आपण आपापसात करतो? त्यावेळी लक्षात येते की , आपल्या समाजात या नियमांची अवहेलना करणारा कोणीच नाहीये! किंवा आपण कोणत्यातरी दुसऱ्याच विश्वात बसून चर्चा करत आहोत. निश्चितच जेव्हा आपण सत्य परिस्थिती बद्दल विचार करतो, तेव्हा लक्षात येते की आपल्या समाजामध्ये ब्रह्मचर्य आणि सदाचार एका मोठ्या भंपकतेशिवाय काहीच महत्व ठेवत नाहीत. आश्चर्य वाटते की हजारो वर्षांपासून आपल्या समाजाने अशा आत्मवंचनेचा जोरदार प्रचार करून कोणता हेतू साध्य केला? ‘जितकं औषध घेतलं तेवढा आजार वाढत गेला’ नुसार जेवढी शतके उलटत गेली तसा आपल्या नैतिकतेचा स्तर ढासळतच गेला आहे. परिमाणामध्ये नाही, त्यामध्ये तर देश-काळाच्या मानाने फरक पडलेला नाही; घृणास्पद प्रक्रियेमध्ये मात्र नक्की फरक पडलाय.
ज्या देशांमध्ये स्त्री-संबंधी संबंधावर अतिशय कमी बंधने आहेत तेथील लोक याबाबतीत जास्त अनुकरणीय वर्तन ठेवतात. नियम आणि निर्बंधांचा भडिमार आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आपल्याला अधिक पटाईत बनविण्यास उपयोगी ठरला आहे. रोमन कॅथोलिक सारखे कित्येक धर्म अशा कुकृत्यांची कबुली देण्यावर खूपच जोर देतात. तिथे गृहस्थ स्त्री-पुरुष, साधू-साधूनी एखाद्या सन्माननीय व्यक्तीसमोर वेळोवेळी आपले अपराध मान्य करतात. कदाचित ही प्रथा यासाठी चालविली जाते की “बीजी ताही बिसारी दे, आगे की सुधी लेय” (झाले ते झाले, इथून पुढे सुधारू). पण याचा परिणाम काय होतो? सुरुवातीला एक-दोन वेळा गुन्हा स्विकारताना थोडासा संकोच वाटतो, तोही हळूहळू कमी होतो. मानसशास्त्रज्ञ बरोबर सांगतात की स्त्री-संबंधी अपूर्ण इच्छा आणखी उग्र रूप धारण करत माणसाच्या अंतरंगी संधीच्या शोधात टपून राहतात. धर्मांनी सर्वांत जास्त ज्यावर जोर दिला आहे, त्याची अशा प्रकारची, सार्वदेशिक, सार्वकालिक, सार्वजनिक अवहेलना पाहून हेच म्हणावेसे वाटते की ह्या ढोंगापासून, थोतांडापासून काय फायदा?
आपल्या देशातील एक नावाजलेले व्यक्ती आहेत ते धर्माबद्दल खूपच आसक्ती दाखवतात. देवाचे नाव घेत आनंदाने नाचू लागतात आणि अशा कार्यक्रमांवर खूपच पैसे खर्च करत असतात. त्यांची अवस्था ही आहे, की जेव्हा ते लठ्ठ पगाराच्या नोकरीवर होते, तेव्हा कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय करत नसत आणि स्त्रियांच्या बाबतीत सर्व नियम धाब्यावर बसविण्याची जणू काही ईश्वराकडूनच त्यांना आज्ञा मिळाली आहे.
एका प्रातःस्मरणीय राजाला मरून खूप दिवस झालेले नाहीत. त्यांची ईश्वरभक्ती अनन्य अशी होती. सकाळी ईश्वरावर एखादी ओळ बनविल्याशिवाय ते बाजेच्या खाली उतरत नव्हते आणि तासनतास पूजाविधी करायचे. परंतु दुसरीकडे त्यांची स्थिती अशी होती की आपल्या शहर आणि राज्यामध्ये एखादी सुंदर स्त्री असल्याचे त्यांना जसे समजले की ते तिला मिळवल्याशिवाय शांत होत नसत.
एक तरुण विधवा राणी होती. तिच्याकडे गडगंज संपत्ती होती. एका महान तिर्थावर ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन होत ती आपला दिवस घालवायची. धार्मिक उत्सव, पूजापाठ यावर मुक्तहस्ते धन खर्च करत होतीच, त्यासोबतच तिच्याकडे अनेक विद्यार्थ्यांना बोलावून जेवू घातले जायचे. राणीसाहेब आपल्या नजरेनेच हेरून विद्यार्थ्याला सामील करून घ्यायची आणि तरुण विद्यार्थी रात्र-रात्र पार्थिव पूजेमध्ये तिची साथ द्यायचे. अतिशय वयोवृद्ध होऊनही तिच्या अपार काम-पिपासेमध्ये काहीच फरक पडला नव्हता.
एका अतिशय वजनदार हिंदू धर्माचे नेते आणि विष्णूचा साक्षात अवतार म्हणविल्या जाणाऱ्या महात्म्याबद्दलची गोष्ट आहे. त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार आणि रक्षणासाठी अतिशय मोठे आयोजन केले होते. ज्यामध्ये भारतातील मोठ-मोठे राजे, शेठ-सावकार सामील होते. धार्मिक जगावर त्यांचा जेवढा दबदबा राहिला तेवढा कदाचित कोणाचाच नसावा. परंतु त्यांच्या खाजगी जीवनातील लीला पाहिल्या तर असे लक्षात येते की जणू काही साक्षात कृष्णच रासलीला करण्यासाठी अवतरीत झाले आहेत. सुंदर विधवांकडे तर त्यांचा विशेष ओढा असायचा.
आणखी एक असे महाराज होऊन गेलेत ज्यांच्या शास्त्रीय विद्वत्ता, धर्म-परायणता, दान आणि सदाचाराची छाप संपूर्ण भारतावर राहिलेली आहे. परंतु वरवर उपासना आणि कुमारी-पूजा इत्यादी धार्मिक अनुष्ठानांच्या नावाखाली ते आपल्या सर्व वासनांची पूर्ती करून घेण्यासाठी मोकळे होते आणि अशा धार्मिक पुरुषापासून कुटूंब असलेले चार हात लांब राहणेच पसंत करायचे.
(पुढील अंकामध्ये याच लेखाचा राहिलेला भाग: मद्यपान, असत्य, चोरी-लाच, तुमच्या न्यायाचा ऱ्हास)
कामगार बिगुल, फेब्रुवारी 2021