देशभरात लपवले जात आहेत कोरोना मृत्यूचे आकडे !

अभिजित 

कोव्हिड-19 मुळे आत्तापर्यंत देशात जवळ्पास 1,89,000 मृत्यू झाल्याचा आकडा आहे. जगभरामध्ये  या आजारामुळे 31 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव आत्तापर्यंत गेला आहे. ब्राझिलमध्ये दर 100 केस मागे 2.71 लोकांच्या मृत्यूचे प्रमाण समोर आले आहे, अमेरिकेमध्ये हेच प्रमाण 1.78 आहे, तर भारतामध्ये ते 1.14 इतके कमी दिसून येते. दर दहा लाख लोकसंख्येमागे जिथे युरोपातील अनेक देशांमध्ये 2000 च्या वर लोक मेले आहेत, भारतात हा आकडा 130 इतका कमी आहे. भारतामध्ये जगाच्या तुलनेने मृत्यूदर कमी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती जास्त आहे असेही तर्क काही जण देत आहेत, आणि तसे असेल तर नक्कीच चांगली बाब ठरेल, परंतु भारतातील मृत्यूचे प्रमाण कमी दिसण्याचे एक मोठे कारण केंद्र आणि विविध राज्य सरकारांमार्फत आकडे लपवणे आहे! काही उदाहरणे पाहूयात.

गुजरातची स्थिती पाहूयात. गुजरातचे रंगवले गेलेले चित्र काय आहे? बडोदा महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बडोद्यामध्ये दिवसाला 3 पेक्षा कमी लोक मृत्यू पावत आहेत. सुरतमध्ये हाच आकडा 20 आहे,तर राजकोट मध्ये 15. पण बडोद्याच्या सर्वात मोठ्या एस.एस.जी. या एकाच रूग्णालयात एप्रिल मध्ये आठवड्यात 142 मृत्यू झाले आहेत. बडोद्यातच जी.एम्.सी.आर. रुग्णालयात 7 दिवसात 90 वर मृत्यू झाले आहेत. एकंदरीत 300 पेक्षा जास्त लोक तर एका आठवड्यात बडोद्यातच मृत्यू पावल्याचे आकडे आहेत. 12 एप्रिल रोजी 30 मृत्यूंची माहिती असताना महानगरपालिका मृत्यूचा आकडा फक्त 3 सांगत आहे. बडोदा महानगरपालिका खोटे बोलत आहे हे स्पष्ट आहे. अहमदाबाद मध्ये 13 एप्रिल रोजी 23 मृत्यूंची नोंद आहे, पण स्मशानात 80 ते 90 चिता कोव्हिड-बंधनांसहीत जाळल्या गेल्या. गुजरातमधील राजकोट शहरामध्ये 23 एप्रिल रोजी अनेक महिन्यांमध्ये झालेल्या एकूण मृत्यूंचा आकडा 148 होता, त्याच दिवशी संदेश या वर्तमानपत्रामध्ये एकाच दिवशी 285 शोक संदेश प्रसिद्ध झाले होते. हे लक्षात घ्या की वर्तमानपत्रांमध्ये शोक संदेश फक्त मध्यमवर्गीय-पैसेवाले लोकच प्रसिद्ध करू शकतात, म्हणजेच गरिब, कामगारवर्गीय मृत्यू मोजले तर 285 पेक्षा जास्त लोक मृत्यू पावले होते, पण सरकारी आकडा नगण्य होता. राजकोट मध्ये रोज सरासरी 170 पेक्षा मृत्यू होत असल्याचा अंदाज आहे. सुरत मध्ये सतत जळत असलेल्या चितांमुळे तर स्मशानभुमीतील भट्ट्यांची काच वितळली! तिथे रोज जवळपास 100 चिता जाळल्या जात आहेत आणि जाळण्यासाठी 8 ते 10 तास वाट बघावी लागत आहे. स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना मृत्यूचे कारण ‘आजारामुळे’ एवढेच लिहायला सांगितले जात आहे.

उत्तरप्रदेशातील कानपूर शहरामध्ये 22 एप्रिल रोजी एकाच दिवशी 476 चिता जाळल्या गेल्या, आणि दिवस-रात्र स्मशानभूमीतून धूर निघतच होता, पण सरकारी आकड्यांनुसार त्या दिवशी फक्त 3 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. 16 एप्रिल रोजी आग्रा, गाझियाबाद आणि झाशीमध्ये शून्य मृत्यूंची नोंद केली गेली. 15 एप्रिल रोजी 75 पैकी 46 जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. म्हणायला 16 एप्रिल रोजी राज्यभरात फक्त 103 मृत्यू झाले. गाझियाबाद मध्ये एप्रिल महिन्यात मिळून फक्त 4 मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु गाझियाबादच्याच स्मशानभुमीतील कर्मचाऱ्यांच्या मते 50 तरी मृतदेह 16 एप्रिल रोजी जाळले गेले. बरेलीमध्ये 15 एप्रिल रोजी एका मृत्यूची नोंद आहे, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये आता जवळपास 40 चिता रोज जळत आहेत. आग्र्याला 15 एप्रिल रोजी 3 मृत्युंची नोंद आहे परंतु त्या दिवशी 48 चिता जाळल्या गेल्या आणि रोज किमान 30 चिता जाळल्या जात आहेत. झाशीमध्ये दैनंदिन चितांमध्ये 3 ते 4 पट वाढ झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात राजधानी लखनौ मध्ये सरकारच्या मते 124 मृत्यू झाले, पण स्मशानात 400 चिता जाळल्या गेल्या. लखनौ मध्ये धडाधड जळत असलेल्या चितांचे फोटो सोशल मीडीयावर आल्यानंतर भाजपच्या योगी सरकारने स्मशानभूमीलाच झाकण्यासाठी पत्रे लावले. दिल्लीनजिक नोयडा मध्ये 2 दिवसात 12 मृत्यू झाल्याची नोंद आहे, पण स्मशानभुमीत 75 च्या वर कोव्हिड चिता जाळल्या गेल्या, ज्यात दिल्लीवरून येणारे मृतदेह पकडले तरी आकड्यातील फरक मोठाच आहे.

मध्यप्रदेशामध्ये सुद्धा भयंकरच लपवाछपवी चालू आहे. 12 एप्रिल रोजी भोपाळच्या एका स्मशानभुमीत 37 चिता जाळल्या गेल्या, पण भाजप सरकारच्या  मते त्या दिवशी संपूर्ण राज्यभरात 37 मृत्यू झाले, याच पद्धतीने 8 एप्रिल रोजी 35 चिता जाळल्या गेल्या, पण राज्याचा आकडा होता 27, असे रोजच चालू आहे. 16 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान स्मशानघाट, स्मशानभूमीतून मोजलेल्या मृत्यूंची संख्या भोपाळमध्ये 597 होती पण राज्य सरकारी आकडा 348च होता. 21 एप्रिल रोजी सरकारी आकडा भोपाळसाठी 5होता, पण याच दिवशी 137 चिता जाळल्या गेल्या.

राजस्थानामध्ये सुद्धा कोटा, भिलवाडा, उदयपूर, अजमेर येथे सरकारी आकड्यांच्या 3 ते 4 पट चिता जाळल्या गेल्याचे दिसून आले आहे. भीलवाड्यामध्ये तर हा आकडा 6 पट आहे. उदाहरणार्थ, कोट्यामध्ये 30 मृत्यूंची नोंद आहे तर स्मशानात कोव्हिड-19 नियमांतर्गत 145 चिता जाळल्या गेल्या.

दिल्लीमध्ये 20 एप्रिल पर्यंत नगरपालिकांकडे कोव्हिड-19 सुरू झाल्यापासून 15,161 मृत्यूंची नोंद होती तर राज्य सरकारकडे 12,638. थोडक्यात 2,500 मृत्यूंची नोंद कमी केली गेली आहे.

झारखंड राज्यामध्ये 20 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान 63 मृत्यूंची नोंद आहे. पण फक्त रांचीच्या एकाच विद्युत स्मशानभूमीत या काळात 69 चिता जाळल्या गेल्या.

असे दिसून आले आहे की कोव्हिड संशयितांचे मृत्यू कोव्हिडमुळे मरण पावलेल्यांच्या यादीमध्ये न मोजण्याचे काम किमान महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली आणि पॉंडीचेरी मध्ये नक्की चालू आहे.

या कमी आकड्यांमागे दोन कारणे दिसून येत आहेत. पहिले हे की जर रुग्ण इतर रोगाने मेला असेल्, पण कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असेल तर त्याची कोव्हिड मृत्यू म्हणून नोंद होत नाही. दुसरे हे की जर मृत्यूवेळी कोव्हिड रिपोर्ट आलेला नसेल तरी ही नोंद घेतली जात नाही.   आय.सी.एम.आर. या संस्थेने दिलेल्या सुचनांनुसार नोंदी केल्या जात असल्याचा दावा सर्वच राज्य सरकारे करत आहेत. परंतु आकड्यांमधल्या प्रचंड तफावती मात्र वेगळेच सत्य सांगत आहेत.

भारतात, जिथे नोंदी ठेवण्याची संस्कृतीच मुळात नाही आणि दुसरीकडे सरकारे आकडे लपवतच चालली आहेत, कोव्हिडमुळे होणारे खरे मृत्यू किती याचा अंदाज येण्यास बराच काळ नक्की जावा लागेल आणि अप्रत्यक्ष आकड्यांच्या अभ्यासातूनच माहिती समोर येईल. एक अंदाज जो आत्ता केला जात आहे तो असा:  सिरोप्रिव्हेलंस सर्वे (किती जणांमध्ये कोव्हिड-19 च्या ॲंटीबॉडी सापडल्या याचे सर्वेक्षण) द्वारे संसर्ग मृत्यू दर (Infection Fatality Rate) काढला जाऊ शकतो आणि मृत्यूंचा एक वेगळा अंदाज बांधता येतो. याद्वारे जे अंदाज केले जात आहेत त्यानुसार 0.15 टक्के ते 0.33 टक्के दरम्यान मृत्युदर मोजल्यास 5 ते 11 लाख लोक कोव्हिड-19 मुळे मृत्यू पावले असावेत.

एकाही माणसाचा मृत्यू ही गंभीर बाब आहे. इथे तर सरकार लाखो मृत्यूंचे आकडे लपवत आहे हे स्पष्ट आहे

कामगार बिगुल, एप्र‍िल 2021