जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेतील पोलिसांकडून निर्घृण हत्या – पोलिसांचे वर्गचारित्र्य पुन्हा एकदा उघड!
अमेरिकेतील पोलिसांकडून अश्वेत नागरिकांवर अत्याचार व बेकायदेशीर, अमानुष हत्या होतच आल्या आहेत. इतर कोणत्याही भांडवली-लोकशाही देशाप्रमाणेच अमेरिकेतील पोलिसांचा इतिहास बघितला तर अमेरिकेतील पोलीस व्यवस्था ही अश्वेत गुलामांच्या दडपशाहीसाठी आणि गुलामी व्यवस्था संपल्यानंतर कामगार-कष्टकऱ्यांच्या दडपशाहीसाठीच बनवलेली व्यवस्था आहे हे लक्षात येईल. अठराव्या शतकात अमेरिकेत गोऱ्या नागरिकांमधूनच, अश्वेत गुलामांवर नजर ठेवण्यासाठी, आणि नियम कायदे मोडणाऱ्या, किंवा मालकांच्या तावडीतून पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या गुलामांना शिक्षा करण्यासाठी काही तुकड्या बनवल्या गेल्या. गुलामांचा उठाव होऊ नये म्हणून दहशतीचे वातावरण तयार करून ठेवणे हे सुद्धा ह्या तुकड्यांचे काम होते. ह्या तुकड्या हेच अमेरिकेतील पोलीस यंत्रणेचे प्राथमिक स्वरूप होय.













