2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आणि आर.डब्ल्यु.पी.आय.ची कामगिरी
भांडवली निवडणुकांच्या खेळात साधारपणे तोच जिंकतो ज्याच्याकडे मोठमोठ्या कंपन्या, ठेकेदार, धनिक दुकानदार, जमीनमालक आणि विविध प्रकारच्या दलालांचे धनबळ आणि बाहुबळ असते. याच शक्ती निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा, दारू, लांड्यालबाड्या, ईव्हीएम घोटाळा, मतांची खरेदी सारखे निर्लज्ज खेळ खेळू शकतात. अशामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये, मर्यादीत शक्तीनिशी केलेल्या, समाजवादी परीवर्तनाच्या प्रचाराच्या जोरावर मिळालेल्या पाठिंब्यामुळे पक्षाच्या व्हॉलंटीअर्समध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी याची जाणीव पक्षास नक्की आहे की अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. मिळालेली सर्व मते ही स्पष्टपणे कामगार वर्गीय राजकारणाला असलेल्या पाठिंब्याचीच मते आहेत, आणि झालेली छोटी संख्यात्मक वाढ सकारात्मक बाब असली, तरी पक्षाला याची पूर्ण जाणीव आहे की पुढील काही वर्षांमध्ये कामगार कष्टकऱ्यांच्या रोजगार, वेतन, शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, घरकुलासहित जीवनाच्या प्रश्नांवर संघर्ष उभे करणे, आणि कठोर परिश्रमातून निरंतर वैचारिक प्रचार यातूनच पक्ष आणि कामगार वर्गीय राजकारण बळकट होऊ शकते.