कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा (तिसरे पुष्प)
कामगारांचा आर्थिक संघर्ष आणि राजकीय प्रचाराचा प्रश्न
✍ सनी
देशातील क्रांतिकारकांसमोर कामगार आंदोलनात असलेले अर्थवादी विचलन हे एक मोठे आव्हान आहे. केंद्रिय ट्रेड युनियन्सच्या दुरुस्तीवादी दगाबाजी तर आहेतच, सोबतच अनेक तथाकथित “क्रांतिकारी” सुद्धा अर्थवादाच्या पुरात वाहून गेले आहेत. कामगारवाद, अराजकतावादी संघाधिपत्यवाद आणि दुसरीकडे डाव्या अतिरेकपंथाचा गैर-क्रांतिकारी प्रवाह कामगारांमध्ये क्रांतिकारी राजकारण स्थापित होऊ देत नाहीत. या लेखमालेच्या मागच्या भागात आम्ही कामगार वर्गाच्या पक्षाच्या राजकीय प्रचारावर महत्त्वाचे वक्तव्य केले होते. परंतु याचा अर्थ हा होत नाही की कामगार वर्गाचा पक्ष आर्थिक मागण्या करत नाही. कामगार वर्गाचा पक्ष कामगारांच्या आर्थिक संघर्षांमध्ये सुद्धा सहभागी होतो कारण हा आर्थिक संघर्ष श्रम आणि भांडवलामधील अंतर्विरोधाचीच अभिव्यक्ती असतो आणि त्याला नेतृत्व देऊनच कम्युनिस्ट क्रांतिकारी शक्ती या अंतर्विरोधाला राजकीय अभिव्यक्ती देऊ शकतात, म्हणजेच त्याला भांडवलदार वर्ग आणि सर्वहारा वर्गामधील राजकीय अंतर्विरोधाचे स्वरूप देऊ शकतात. दुसऱ्या शब्दांमध्ये, फक्त याच माध्यमातून समाजवादाचे आदर्श आणि तत्त्वे, म्हणजेच समाजवादी राजकीय चेतना कामगार आंदोलनामध्ये आणली जाऊ शकते. कम्युनिस्ट या अर्थवादी तर्काला विरोध करतात की आर्थिक संघर्षांच्या प्रक्रियेत कामगार स्वत:हून, स्वत:स्फूर्तपणे, राजकीय चेतना प्राप्त करतात. लेखमालेच्या या पुष्पामध्ये आम्ही आर्थिक संघर्षांवर पक्षाचा रोख, ट्रेड युनियन राजकारण आणि कम्युनिस्ट राजकारणातला फरक तसेच अतिडावे विचलन आणि ट्रेडयुनियनवादी राजकारणाच्या संदर्भात थोडक्यात आमचे मत मांडत आहोत.
कम्युनिस्ट पक्ष आपल्या प्रचारात कामगारांना फक्त आर्थिक संघर्षांपुरतेच मर्यादित ठेवत नाही, तर तो कामगारांना एका राजकीय वर्गाच्या रूपाने जागृत, एकत्रित, संघटित करून त्यांना त्यांच्या ऐतिहासिक लक्षाशी परिचित करवतो. लेनिन म्हणतात की : “कामगारांमध्ये राजकीय वर्ग-चेतना बाहेरूनच आणली जाऊ शकते, म्हणजे फक्त आर्थिक संघर्षांच्या बाहेरून, कामगार आणि मालकांच्या संबंधांच्या क्षेत्राबाहेरून. ती ज्या एकमात्र क्षेत्रातून येऊ शकते, ते राज्यसत्तेचे तसेच सरकार सोबत सर्व वर्गांच्या व स्तरांच्या संबंधांचे क्षेत्र आहे, ते सर्व वर्गांच्या आपसातील संबंधांचे क्षेत्र आहे.”
“… सामान्य कामगारांकडून त्यांच्या आंदोलनाच्या प्रक्रियेत विकसित स्वतंत्र विचारधारेचा प्रश्न निर्माण होत नाही, म्हणून फक्त हेच मार्ग शिल्लक राहतात: एक तर भांडवली विचारधारेला निवडावे किंवा समाजवादी विचारधारेला. मधला कोणताच मार्ग नसतो. (कारण मानवजातीने कोणतीच “तिसरी” विचारधारा निर्माण केलेली नाही, आणि याशिवाय जो समाज वर्गविरोधांमुळे विभाजित आहे, त्यामध्ये कोणतीही गैर-वर्गीय किंवा वर्गेतर विचारधारा असूही शकत नाही). त्यामुळे समाजवादी विचारधारेच्या महत्त्वाला कोणत्याही प्रकारे कमी करून जोखणे, तिला थोडेही नाक मुरडणे याचा अर्थ आहे भांडवली विचारधारेला मजबूत करणे.”
लेनिनद्वारे प्रस्तुत या उक्तीचा विरोध करत रशियन अर्थवादी वर्तमानपत्र `रोबोचेये द्येलो’ त्यांच्या स्वत:स्फूर्ततावादी विचलनामुळे सांगत असे की कामगार वर्ग वेतन-भत्त्यांसाठी लढताना राजकीय चेतना स्वत:हूनच निर्माण करतो. कम्युनिस्ट राजकारणाला ट्रेडयुनियनवादी राजकारणात संकुचित करताना अर्थवादी या स्वत:स्फूर्ततेच्या सिद्धांताला “टप्प्यांचा सिद्धात” आणि “प्रक्रियेच्या रूपात कार्यनिती” च्या रूपाने व्याख्यायित करतात. “टप्प्यांच्या सिद्धांता”नुसार कम्युनिस्टांनी कामगारांच्या वर्गचेतनेच्या स्तरानुसारच लढले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये राजकीय प्रचार करू नये. “प्रक्रियेच्या रूपात कार्यनिती”नुसार जनतेमध्ये काम करण्यासाठी अगोदर एखादी योजना बनवणेच चुकीचे आहे, आणि अशी रणनिती आंदोलनादरम्यानच विकसित होत असते. अर्थवादाचे हे “टप्यांचा सिद्धांत” व “प्रक्रियेच्या रूपात कार्यनिती”चे सिद्धांत मार्क्सवाद-विरोधी आहेत. हे सिद्धांत कम्युनिस्ट पक्षाला कामगार वर्गाच्या अग्रदलाऐवजी शेपूट बनवण्याचेच प्रस्ताव आहेत. कम्युनिस्ट पक्ष स्वत:च कामगार वर्गाच्या सर्वात उन्नत तत्वांची फळी आहे, आणि तिचे कामच आहे कामगार वर्गातील व्यापक जनसमुदायांना एका योग्य विचारधारेच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून नेतृत्व देणे. स्वत:स्फूर्ततावादाचा प्रस्ताव पुढे आणणारा व्यक्ती इच्छा असो वा नसो, जाणीवपूर्वक वा अजाणतेपणी, कम्युनिस्ट राजकारणाला कमजोर करतो आणि कामगार वर्गावर भांडवलदार वर्गाच्या विचारधारेला प्रभावी होण्याची संधी देतो. अर्थवादी विचलनाचा हल्ला मार्क्सवाद-लेनिनवादावर असतो. इतिहासात अर्थवादाच्या प्रत्येक प्रकाराचा विचारधारात्मक निशाणा मार्क्सवादावरच होता. लेनिनच्या काळात ‘टीकेच्या स्वातंत्र्या’च्या आडून मार्क्सवादावर हल्ले केले गेले. आजसुद्धा मार्क्सवादामध्ये ‘सुधार’ आणि ’21 व्या शतकातील समाजवादा’च्या सर्व संकल्पनांचा निशाणा अनेकदा लेनिनवादी पार्टी, राज्यसत्ता तसेच क्रांतीची तत्त्वे आणि कामगारवर्गाच्या अधिनायकत्वाचा सिद्धांतच असतात. लेनिनने या प्रवृत्तींवर टीकेसोबतच त्यांच्या राजकीय आणि सांघटनिक अभिव्यक्तीवरही प्रहार केला. राजकीयरित्या त्या ट्रेडयुनियनवादी राजकारणाच्या रूपाने अभिव्यक्त होतात. त्या कामगार आंदोलन आणि समाजवादामध्ये एक दरी निर्माण करतात. जेव्हाकी “सामाजिक लोकशाही” (याला ‘कम्युनिझम’ असे वाचा – लेखक) कामगार आंदोलन आणि समाजवादाचा मेळ आहे. त्याचे काम कामगार आंदोलनाची प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेत निष्क्रियपणे सेवा करणे नाही, तर संपूर्ण आंदोलनाच्या हितांचे प्रतिनिधित्व करणे, या आंदोलनाला त्याचे अंतिम लक्ष्य तसेच त्याचे राजकीय कार्यभार सांगणे, तसेच त्याचे राजकीय आणि विचारधारात्मक स्वातंत्र्य वाचवणे हे आहे. सामाजिक लोकशाही (कम्युनिझम) पासून तुटून कामगार आंदोलन नगण्य बनते आणि अनिवार्यपणे भांडवली बनते. परंतु आर्थिक (याला अर्थवादी असे वाचा – लेखक) संघर्ष करून कामगार आपले राजकीय स्वातंत्र्य हरवतात…आपले मूख्य आणि मूळ काम कामगार वर्गाचा राजकीय विकास आणि राजकीय संघटनेच्या कार्यामध्ये मदत करणे आहे. जे लोक या कामाला मागे ढकलतात, सर्व विशेष कामांना आणि संघर्षांच्या विशिष्ट पद्धतींना या मुख्य कामाच्या अधीन आणण्यास नकार देतात, ते चुकीच्या मार्गावर चालले आहेत, आणि आंदोलनाचे मोठे नुकसान करत आहेत.” (लेनिन)
दुसरी गोष्ट, याचा अर्थ असा नाही की कम्युनिस्ट कामगारांच्या जीवनातील दैनंदिन ठोस प्रश्नांना उचलत नाहीत. नक्कीच कम्युनिस्ट पक्ष हे करेल. कम्युनिस्ट कामगारांच्या जीवनाच्या ठोस प्रश्नांना उचलतात कारण फक्त याच माध्यमातून ते कामगार वर्गाला राजकीयदृष्ट्या जागृत करू शकतात, दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर संघटित होण्याच्या माध्यमातून या प्रश्नांचे भांडवली व्यवस्थेशी असलेले नाते ते कामगारांसमोर उघड करू शकतात, त्यांना हे समजावू शकतात की त्यांच्या जीवनाचे आणि कामाच्या जागी असलेले प्रश्न काही अकस्मात निर्माण झालेले नाहीत, तर भांडवली व्यवस्थेने जन्माला घातलेले प्रश्न आहेत, त्यांचा शत्रू एक मालक नाही तर मालकांचा संपूर्ण वर्ग आणि त्याची राज्यसत्ता आहे. आणि याच माध्यमातून ते कामगार वर्गाला एका राजकीय वर्गाच्या रूपाने म्हणजेच सर्वहारा वर्गाच्या रूपात संघटित करू शकतात आणि त्याच्या राजकीय चेतनेला सर्वात उच्च म्हणजेच पक्षाच्या राजकीय स्तरावर विकसित करू शकतात. म्हणूनच लेनिन सांगतात: “कम्युनिस्टांनी कामगारांच्या सर्व सुरूवातीच्या संघर्षांमध्ये आणि आंदोलनांमध्ये भाग घेतला पाहिजे, तसेच कामाचे तास, कामाची परिस्थिती, मजुरी इत्यादींवरून तसेच भांडवलदारांमध्ये होणाऱ्या सर्व संघर्षांमध्ये कामगारांच्या हितांचे रक्षण केले पाहिजे. कम्युनिस्टांनी कामगार वर्गाच्या जीवनातील ठोस प्रश्नांवरही लक्ष दिले पाहिजे. या प्रश्नांची योग्य समजदारी प्राप्त करून देण्यासाठी कामगारांची मदत केली पाहिजे. त्यांनी कामगारांचे लक्ष सर्वात स्पष्ट अन्यायांकडे वेधले पाहिजे आणि त्यांच्या मागण्यांना व्यावहारिकरित्या तसेच अचूकपणे सूत्रबद्ध करण्यात मदत केली पाहिजे. याप्रकारे ते कामगार वर्गामध्ये एकजूटीची चेतना आणि देशातील सर्व कामगारांमध्ये एका एकीकृत कामगार वर्गाच्या रूपाने, जो कामगार वर्गाच्या जागतिक सेनेचा एक हिस्सा आहे, सामुदायिक हितांची चेतना जागृत करू शकतील. फक्त अशाप्रकारच्या सुरूवातीच्या दैनंदिन कर्तव्यांना पूर्ण करून तसेच कामगार वर्गाच्या सर्व संघर्षांमध्ये भाग घेऊनच कम्युनिस्ट एका खऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या रूपात विकसित होऊ शकतात. फक्त या प्रकारच्या पद्धतींना अवलंबूनच ते घासून गुळगुळीत झालेल्या, तथाकथित शुद्ध समाजवादी प्रचार करणाऱ्या, फक्त नवीन सदस्य भर्ती करणाऱ्या आणि सुधारणा तसेच सर्व असंसदीय शक्यता व अशक्यतांचा वापर करण्याच्या बाता करणाऱ्या प्रचारकांपासून स्वत:ला वेगळे करू शकतील. शोषकांविरोधात चालणाऱ्या शोषितांच्या दैनंदिन संघर्षांमध्ये आणि वादविवादांमध्ये पार्टी सदस्यांचा आत्मत्यागी आणि उत्साही सहभाग ना केवळ कामगारवर्गाच्या अधिनायकत्वाच्या विजयासाठी, तर त्यापेक्षाही अधिक या अधिनायकत्त्वाला कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. भांडवलशाहीच्या हल्ल्यांविरोधात छोटे-छोटे संघर्ष करण्याच्या प्रक्रियेतच कामगार वर्गाचे सुव्यवस्थित नेतृत्व करू शकण्याची क्षमता प्राप्त करत कामगारवर्गीय जनसमुदायांचे अग्रदल ते बनू शकतील.”
एकंदरीत हे की कम्युनिस्ट आंदोलन सुधारणांसाठीच्या लढाईला “समाजवादासाठीच्या क्रांतिकारी संघर्षाच्या अधीन अशाप्रकारे ठेवते, जसे की एखादा भाग त्याच्या पूर्णतेच्या अधीन असतो.” हीच ती समजदारी आहे जी एकीकडे आपल्याला अर्थवादी विचलनापासून रोखते तर दुसरीकडे “डाव्या” विचलनापासूनही वाचवते, जो वास्तव परिस्थितीबद्दल वस्तुगत समजदारी न बाळगता शेखचिल्लीप्रमाणे त्याच्या खूप पुढे उड्या मारत चालतो. या दोन्ही टोकांचा जन्म स्वत:स्फूर्ततावादापुढे नतमस्तक झाल्यामुळे होतो. “अर्थवादी आणि अतिरेकपंथी स्वत:स्फूर्ततावादाच्या वेगवेगळ्या टोकांसमोर नतमस्तक होतात. अर्थवादी `शुद्ध आणि सामान्य कामगार आंदोलना’पुढे नतमस्तक होतात, तर अतिरेकपंथी त्या बुद्धिजिवींच्या आक्रमक रोषापुढे नतमस्तक होतात जे क्रांतिकारी आंदोलन आणि कामगार वर्गाच्या आंदोलनाला एकजूट करण्याच्या क्षमतेत वा परिस्थितीत नसतात.” (लेनिन)
अतिडावे राजकारण आर्थिक मागण्यांना घेऊन लढण्याला आणि ट्रेडयुनियन बनवून संघर्ष करण्यालाच दुरुस्तीवाद घोषित करण्यापर्यंत पोहोचते. आपण या चुकीच्या समजदारीचा सुद्धा बुरखा फाडला पाहिजे. लेनिनने या विचलनावर टीका करत म्हटले की “कामगारांनी कामाच्या स्थितींमध्ये जुजबी सुधारणांना घेऊन चालवलेल्या आंदोलनांप्रति तिरस्काराचा रोष स्विकारणे किंवा कम्युनिस्ट कार्यक्रम आणि अंतिम लक्ष्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतिकारी संघर्षाच्या आवश्यकतेच्या नावाने त्याप्रती निष्क्रियतेचा रोख स्विकारणे ही कम्युनिस्टांसाठी मोठी चूक ठरेल. कामगार आपल्या ज्या मागण्यांना घेऊन भांडवलदारांशी लढण्यासाठी तयार आणि सहमत असतील, मग त्या कितीही छोट्या किंवा क्षुल्लक असोत, कम्युनिस्टांनी संघर्षात सामील न होण्यासाठी त्या मागण्या छोट्या असल्याचा बहाणा करता कामा नये. आपल्या आंदोलनात्मक कारवायांविरोधात अशाप्रकारच्या आरोपांना यत्किंचितही वाव नसावा की आपण कामगारांना मूर्खतापूर्ण संपांसाठी किंवा इतर बावळट कारवायांकरिता भडकावतो आणि भरीस पाडतो. संघर्षरत जनतेमध्ये कम्युनिस्टांनी ही प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ते हिंमतवान आणि संघर्षांमध्ये प्रभावी भुमिका निभावणारे लोक आहेत.”
लेनिनच्या शिकवणीच्या आणि रशियन क्रांतीच्या उजेडात आपण भारताच्या क्रांतिकारी आंदोलनात अर्थवादी व अराजकतावादी संघाधिपत्यवादी प्रवृत्तींचा उदय आणि विकास समजू शकतो. ‘मजदूर बिगुल’ या हिंदी वर्तमानपत्राच्या पानांवरच एका कामगार वर्तमानपत्राच्या चरित्रावर झालेल्या वादविवादात (‘सर्वहारा वर्ग का हिरावल दस्ता बनने की बजाय उसका पिछवाड़ा निहारने की ज़िद’, ‘मजदूर बिगुल’, ऑगस्ट 1999) आम्ही भारतात सुधारणावादी संधीसाधूपणाच्या दुसऱ्या टोकावर अतिरेकपंथ आणि संघाधिपत्यवाद निर्माण होण्याकडे लक्ष्य वेधले होते. ट्रेडयुनियन्सबाबत पक्षाच्या रोखाबद्दल वोइनोव (ए.वी. लुनाचार्स्की) च्या पुस्तकाच्या भुमिकेत लेनिनने लिहिले होते, “पश्चिम युरोपातील बहुसंख्य देशांमध्ये क्रांतिकारी संघाधिपत्यवाद हा सुधारणावाद, संधीसाधूपणा आणि संसदीय बटुकता यांचा एक प्रत्यक्ष आणि अपरिहार्य परिणाम होता. आपल्या देशामध्ये सुद्धा ‘संसदीय कारवाई’च्या सुरूवातीच्या पावलांनी संधीसाधूपणाला पसरण्याला मोठा वाव दिला आणि मेंशेविकांना कॅडेटांचे चापलूस बनवले. उदाहरणार्थ, प्लेखानोव त्यांच्या दैनंदिन राजकीय कामांमध्ये खरेतर प्रोकोपोविच आणि कुस्कोवा सारख्या लोकांसोबत मिसळून गेले. 1900 मध्ये त्यांनी रशियन कामगारवर्गाचा फक्त ‘पार्श्वभाग’ निरखत असण्याबद्दल बर्नस्टीनवर टीका केली होती (‘राबोचेये देलो’च्या संपादक मंडळासाठी वाडेमकुम, जिन्हीवा, 1900). पण 1906-07 मध्ये मतपत्रिकांनी आधीच प्लेखानोवला या सज्जनांच्या कवेत ढकलले जे आता रशियन उदारवादाचा ‘पार्श्वभाग’ निरखत आहेत. रशियाच्या जमिनीवरील या ‘प्रतिष्ठित’ सामाजिक लोकशाहीवाद्यांच्या लाजीरवाण्या वर्तनाविरोधात प्रतिक्रियेच्या स्वरूपात संघाधिपत्यवाद उत्पन्न झाल्याशिवाय राहू शकत नाही.”
आपल्या देशातसुद्धा तेलंगणा संघर्षाच्या पराभवानंतर दुरूस्तीवादी राजकारण प्रभावी राहिले, ज्याच्या अति-प्रतिक्रियेच्या रूपातच चारू मुजूमदारांचे “डाव्या” अतिरेकपंथाचे विचलन निर्माण झाले. दुरुस्तीवादाची एक प्रतिक्रिया जर “डाव्या” अतिरेकपंथाच्या धारेच्या रूपात असेल तर दुसरी प्रतिक्रिया अराजकतावादी संघाधिपत्यवादाच्या रूपात समोर येते. हा लांगूलचालनवादच आहे जो क्रांतिकारकांना जनतेचे शेपूट (लांगूल) पकडून लटकण्याचा सल्ला देतो. आपण लांगूलचालनवाद आणि दुरूस्तीवाद, या दोघांचाही विरोध केला पाहिजे.
(मूळ लेख प्रकाशित: मज़दूर बिगुल, जुलै 2022)
(अनुवाद: राहुल)
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022