“भारत जोडो यात्रा” : कामगार वर्गाचे हित भांडवलदारांशी जोडणारी यात्रा!
कामगार वर्गाने कॉंग्रेसच्या बतावणीला फसू नये!
सर्वधर्मसमभावाचा राग आळवून, आणि “तिरस्कारा”विरोधात याचना करून फॅसिझमशी लढणे शक्य नाही!
✍संपादक मंडळ
पराजयबोध जेव्हा मनाची पकड घेतो, तेव्हा विजयाची खोटी आशा दाखवणाऱ्या कोणाचाही हात पकडावासा वाटू लागतो. देशातील उदारवाद्यांचे तेच झाले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने काढलेल्या “भारत जोडो यात्रे”मुळे देशभरातील सर्वच उदारवादी, समाजवादी हर्षोल्हासित झाले आहेत आणि जणू काही देशामध्ये मोठे परिवर्तनच येऊ घातले आहे अशा आरोळ्या ठोकत आहेत. भाजपच्या फॅसिस्ट, धर्मवादी, जातीय राजकारणाला वैतागून पर्याय शोधू बघणारे आता कामगार वर्गाला सुद्धा कॉंग्रेसमध्ये आसरा शोधण्यास सांगत आहेत. भांडवलदारांच्या पैशातून होणारी ही यात्रा ना कोणते आमूलाग्र परिवर्तन घडवणार आहे, ना फॅसिझमला आव्हान उभे करणार आहे. आम्ही कामगार वर्गाला आवाहन करत आहोत की या भूलाव्याला न फसता कॉंग्रेसचे खरे वर्गचरित्र ओळखावे, कॉंग्रेसच्या सर्वधर्मसमभावाच्या राजकारणाचा फसवेपणा ओळखावा, अशा यात्रांनी फॅसिस्ट शक्तींना किंचितही फरक पडत नाही हे समजून घ्यावे, आणि योग्य कामगार वर्गीय राजकारणाचा पर्याय निवडत, “तिरस्कारा” विरोधात याचना करत नाही तर संघर्षाचा मार्ग स्विकारून फॅसिझमशी लढण्यास सज्ज व्हावे.
कोण “एकत्र” येत आहेत?
यात्रेदरम्यान लोकांची गर्दी उसळून येत आहे, रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे आहेत, गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत आणि सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींपर्यंत समाजाच्या विविध हिश्श्यांमधून लोक सामील होत आहेत, राहुल गांधींसोबत चालायला, राहुल गांधींशी हस्तांदोलन करायला, राहुल गांधींना पहायला झुंबडीच्या झुंबडी येत आहेत, या यात्रेने एक चैतन्य निर्माण केले आहे, भारावलेले वातावरण तयार केले आहे, वगैरे, वगैरे बातम्या आता रोज येत आहेत. निश्चितपणे यात्रेमध्ये अनेक लोक सामील होत आहेत. अनेक ठिकाणी कॉंग्रेसी नेत्यांनी आपल्या शिक्षणसंस्था, इतर-संस्थांमधले कर्मचारी, विद्यार्थी यांना यात्रेला “धाडले” आहे, “राहुल बाबा” म्हणून “मोठा माणूस” आहे, त्याला फक्त बघण्यासाठी सुद्धा लोक येत आहेत, हे सुद्धा सर्वज्ञात आहे. रोज राहुल गांधींचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. हे सर्व पैसे देऊन व्यावसायिकरित्या करवले जात आहे. राहुल गांधीचे फुटबॉल खेळताना, दांडिया खेळताना, क्रिकेट खेळताना, लोकांसोबत चहा पिण्यापासून ते सोबत जेवताना, कराटे खेळताना, लेझिम खेळताना, ढोल वाजवताना, नाचताना, खांद्यावर हात ठेवून चालताना, हातात हात धरून चालताना, धावताना, वगैरे, वगैरे फोटो आणि सोबतच भावनेला हात घालणारे संगीत वाजवत गरीब जनतेसोबत चालतानाचे व्हिडिओ पाहून याची खात्री नक्कीच पटू शकते की भाजपच्या तुलनेत कॉंग्रेस पक्ष सुद्धा “प्रतिमा निर्मिती”च्या हातखंड्यांमध्ये तरबेज आहे!
परंतु भव्यतेचे दैदिप्यमान दृष्य बघून अनेकांना भारावून जायला होते, आणि काहीतरी बदलत आहे असा भासही निर्माण होतो. प्रश्न हा नाहीये की यात्रेचे समोर येणारे वर्णन योग्य आहे की नाही. प्रश्न हा आहे की ह्या यात्रेकडून ज्या बदलाची अनेक जण अपेक्षा करत आहेत, तो होईल का? राहुल गांधी आणि कॉंग्रेसला खरेच कोणता बदल अपेक्षित आहे? तो बदल कामगार-कष्टकऱ्यांच्या जीवनात काय फरक आणणार आहे? ज्या आशेने अनेक लोक यात्रेत सहभागी होत आहेत, ती आशा काय आहे आणि ती कॉंग्रेसच्या नेतृत्वात किती खरी होऊ शकते?
या यात्रेत सहभागे होणारे कोण आहेत? भाजपशी, संघाशी, त्यांच्या विचारधारेशी लढण्याकरिता (लक्षात घ्या की राहुल गांधी फॅसिझम हा शब्दप्रयोग करत नाहीयेत!) म्हणून ही यात्रा निघाली आहे, “तिरस्कारा”ला “प्रेमा”ने उत्तर देण्याकरिता ही यात्रा आहे, असे म्हटले गेले आहे. अशामध्ये या यात्रेच्या प्रभावाने किती संघी-भाजपाई लोकांना याची जाणीव निर्माण होत आहे की आम्ही तिरस्कार, द्वेष पसरवत होतो, आणि त्यांपैकी किती लोक आपल्या पक्षाच्या विरोधात यात्रेला पाठिंबा देते झाले आहेत? देशामध्ये भाजप-संघाचा समर्थक मतदार 30 टक्क्यांच्या आसपास असल्याचे अंदाज अनेकदा समोर आलेत. अशामध्ये जर “ते” लोक सामील होणार नसतील तर सर्व लोकांची “एकता” होणार नाहीये, आणि मग तिरस्काराला कसे संपवले जाणार आहे? तिरस्कार करणारे आणि पसरवणारे जर या यात्रेत येतच नाहीयेत, तर “तिरस्कार” करू नका म्हणून तिरस्कार संपेल कसा?
या यात्रेत सहभागी होणारे लोक आहेत या देशातील उदारवादी, सामाजिक-लोकशाहीवादी (म्हणजे भांडवलाची सेवा करणारे “समाजवादी”) ज्यांना भाजप-संघाचा जाच होत आहे. या लोकांनी केलेल्या प्रचारापायी अनेक शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, संवेदनशील नागरिक सुद्धा यात्रेकडे आशेने बघत आहेत. भाजप-संघाचा हैदोस देशात चालला असताना त्याला वैतागलेला जनतेचा एक समुदाय “दिसणारा पर्याय” मजबूत करण्याकरिता यात्रेमध्ये जात आहेत. थोडक्यात ते लोक यात्रेत जात आहेत, जे अगोदरच भाजप-संघाशी असहमत होते. अशा लोकांनी हा प्रश्न नक्कीच विचारला पाहिजे की कॉंग्रेस खरोखर फॅसिझमशी लढू शकते का?
सर्वधर्मसमभाव फॅसिझमशी का लढू शकत नाही?
कॉंग्रेसचा सर्वधर्मसमभाव आणि भाजपचे हिंदुत्ववादी धार्मिक धृवीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अनेकांना ध्यानात येत नाही. धर्म आणि राजकारणाची पूर्ण फारकत करणारी धर्मनिरपेक्षता कॉंग्रेसची विचारधारा कधीच नव्हती. सर्व धर्मांना “समान” वागवणारा सर्वधर्मसमभाव हाच कॉंग्रेसप्रणित ‘भारताची कल्पना’ (आयडिया ऑफ इंडिया)चा हिस्सा होता आणि आहे. याचे मूळ कॉंग्रेसच्या वर्गचरित्रामध्ये आहे.
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कॉंग्रेस हा देशातील भांडवलदार वर्गाचा प्रमुख प्रतिनिधी पक्ष म्हणून पुढे आला. ब्रिटीश सत्तेविरोधात लढण्यासाठी देशातील भांडवलदार वर्गाला राजकीय बळ एकवटणे आवश्यक होते. भांडवलदारांच्या मोठ्या हिश्श्याला याची जाणीव होती की हिंदू-मुस्लिम आणि सर्व जात-समुदायांचा पाठिंबा असल्याशिवाय ते शक्य नाही. परंतु 1917 च्या रशियन राज्यक्रांतीनंतर कामगार-कष्टकरी-शेतकरी वर्गाच्या एकजुटीची या वर्गाला भिती सुद्धा वाटत होती. भारतातील जमिनदार वर्गाचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदु महासभा, मुस्लिम लिग सारख्या संघटनांसोबत त्यामुळेच कॉंग्रेसचे मतभेद होते, परंतु जनतेच्या शक्तीला घाबरत जमिनदारी विरोधात क्रांतिकारी लढा उभारण्याचा मार्ग न स्विकारल्यामुळे, या संघटनांविरोधात आणि त्यांच्या धर्मवादी विचारांविरोधात क्रांतिकारी लढा न उभारण्याचे धोरण कॉंग्रेसने स्विकारले. गांधींचा स्वप्नाळू भांडवली मानवतावाद जमिनदारीच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाच्या विरोधात होता, आणि म्हणूनच भांडवलदार वर्गाला आकर्षक वाटत होता. या विचारधारेचाच परिणाम होता सर्वधर्मसमभावाचे राजकारण, ज्यामध्ये जमेल तसे सर्वच धर्मांचे तुष्टीकरण करावे हीच कार्यनिती निघत होती. गांधींचे खिलाफत चळवळीला समर्थन असो, कम्युनल अवार्ड सोबत केलेली तडजोड असो, वा सनातन धर्माचे समर्थन असो, याच राजकारणाचे निदर्शक होते! धार्मिक, जातीयवादी विचारांचा मोठा पगडा असलेल्या देशात मोठ्या संख्येने लोकांना राजकीय आंदोलनात उतरवण्यासाठी भांडवलदार वर्गाच्या मोठ्या हिश्श्याला त्यामुळेच कॉंग्रेस हाच सर्वात योग्य पर्याय वाटत होता.
आज याच भांडवलदार वर्गाला भाजप हा सर्वात योग्य पर्याय वाटत आहे. कारण देशांतर्गत जमिनदारी व्यवस्था (जर्मनीत झाले त्याप्रमाणे प्रशियन मार्गाने) संपली आहे, भांडवलाचे नागडे राज्य चालू आहे, खाउजा धोरणांचा जमाना आहे, आर्थिक संकट तीव्र झाले आहे, बेरोजगारी-महागाई-गरिबी विक्रम करत आहे आणि अशावेळी कामगार वर्गाच्या असंतोषाला भरकटवायला धार्मिक उन्माद भडकावणारे पक्षच जास्त कामाचे आहेत.
कॉंग्रेसच्या भांडवली आणि “सर्वधर्मसमभावी” राजकारणाचा परिणाम आहे की देशात धर्मवादी राजकारण रुजले आहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाने कॉंग्रेसने हिंदू-मुस्लिम व इतर धर्मियांच्या तुष्टीकरणाचेच राजकारण केले. हे तुष्टीकरण कधीही “समान” तर होऊच शकत नाही. यातूनच ती जमिन मजबूत होत गेली, जिने भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराला आधार दिला. अत्यंत सावधानी बाळगत काही कमजोर प्रगतीशील कायदे बनवत असताना कॉंग्रेसने हिंदू कोड बिल, शहाबानो खटला, राम मंदिराचे दरवाजे उघडणे, राम मंदिर आंदोलन होऊ देणे, संघ आणि संघप्रणित संघटनांना खुले रान देणे, मुस्लिम कट्टरपंथी संघटनांसोबत युत्या करणे, सावरकरांबद्दल दुतोंडी भुमिका घेणे, धार्मिक शिक्षण चालू देणे, धार्मिक यात्रांना घडवणे, अशा अनेक पावलांनी ती वैचारिक जमिन तयार ठेवली जिच्यामध्ये हिंदूंवर “अन्याय” होतो अशी हाकाटी देणे शक्य होते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे आहे की कॉंग्रेसने भांडवली व्यवस्थेचा रथ हाकत, खाउजा धोरणे लागू करून जी अपरंपार दैन्यावस्था देशातील कोट्यवधी जनतेवर थोपवली, बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, गरिबी, असुरक्षिततेसारख्या समस्यांना जनतेवर लादले, त्याच्या प्रतिक्रियेलाच चुकीचे वळण देण्यात भाजप यशस्वी झाला आहे. जनतेच्या असंतोषाला नकली शत्रूकडे वळवण्यात भाजप-संघाला आलेले यश मूळात या असंतोषामुळे होते हे विसरता कामा नये! संघ परिवाराचा विद्वेषाच्या राजकारणाचा महामेरू उधळत असताना आजवर कॉंग्रेसने पक्ष म्हणून त्यासमोर कधीही कोणतेही गंभीर वैचारिक आव्हान उभे केलेले नाही, आणि त्याच्या भांडवलदार वर्गाप्रति निष्ठेमुळे तो तसे कधी करूही शकत नाही!
आज कॉंग्रेसचे अस्तित्व भांडवलदार वर्गासाठी तरीही गरजेचे आहे, कारण जनतेच्या रोषाला भांडवलशाहीपासून, शोषणापासून दुसरीकडे वळवायचे असेल, गैर-वर्गीय मुद्यांवरच राजकारण तापवायचे असेल तर भाजपच्या धर्मवादी फॅसिस्ट राजकारणाला पर्याय म्हणून सर्वधर्मसमभावाचा पर्याय जिवंत ठेवणे गरजेचे आहे.
खर्च कोण करत आहे?
“खर्च” कोण करत आहे, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अनेक खरी मर्म लपलेली असतात. भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीने चालू आहे, तिचे नियोजन आणि खर्च स्पष्टपणे दाखवतात की ही जनतेच्या चळवळीच्या रूपात आयोजित यात्रा नाही तर कॉर्पोरेट पद्धतीने निघालेली यात्रा आहे.
यात्रेकरिता खर्च किती होत आहे? या यात्रेमध्ये सामील असलेल्या 250 यात्रेकरूंसाठी 2 एकर जागेवर राहण्याची सोय केली जाते. याकरिता लागणारे तंबू, कंटेनर, वाहने, फ्लेक्स बॅनर्स, झेंडे, वीजेची सोय, सांडपाण्याची सोय, पाण्याची सोय, पुस्तके-पत्रके वाटण्याचा खर्च, वगैरे सर्व फक्त एका जागी केले जात नाही, तर पूर्णपणे वाहून नेले जाते. रोज एका नव्या जागी गाव बसवले जाते. राहुल गांधींसाठी व्हॅनिटी व्हॅनची सोय आहे, जिच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम, किचन, एसी, फ्रीज, एलसीडी, सोफा, सारख्या सर्व सोयी आहेत. रोज 2000 यात्रेकरू लोकांचे जेवण बनवायला 6 टीम आहेत. याकरिता 60 कंटेनरपासून बनवलेल्या मोबाईल खोल्यांचा पूर्ण ताफा तयार केला गेला आहे. यांमध्ये रोज 300 लोकांची राहण्याची सोय आहे. कंटेनर्समध्ये सुद्धा “वर्ग”वारी आहे. 2-4 लोकांसाठीचे स्वतंत्र शौचालय असलेले कंटेनर आहेत आणि 12 लोकांना फक्त झोपता येईल आणि शौचालय सार्वजनिक वापरावे लागेल अशीही सोय आहे. जेवण बनवण्यापासून ते इस्तरी करण्यापर्यंत सर्व सोय आहे. एकूण 100 पेक्षा जास्त पूर्णवेळ व्यावसायिक लोक या “इव्हेंट” चे “मॅनेजमेंट” करण्यासाठी लागलेले आहेत. यात्रेचे पूर्णवेळ शूटींग करण्यासाठी ड्रोन्स पासून ते अत्याधुनिक कॅमेरे वापरले जात आहेत. यात्रेचे रोज “प्रमोशन” करण्याकरिता “तीन बंदर” असे नाव असलेल्या एका व्यावसायिक टीमला कंत्राट दिले गेले आहे आणि सोशल मीडीयावर जे व्हिडियो, फोटो रोज टाकले जातात ते काम अशाप्रकारे पैसे मोजून करवले जात आहे.
फक्त 2000 लोकांचे रोजचे 1 वेळचे जेवण धरले, तरी 150 दिवसात, प्रत्येक दिवशी रु. 100 प्रमाणे 3 कोटी एकूण खर्च निघतो. तेव्हा संपूर्ण यात्रेकरिता लागणार शेकडो कोटींचा खर्च कोण करत आहे? कन्याकुमारी ते श्रीनगर प्रवासात, 150 दिवस करायचा हा सर्व खर्च जनतेने स्वखुशीने दिलेल्या घामाच्या कमाईच्या पैशातून केला जातोय का? नक्कीच नाही! हा सर्व खर्च कॉंग्रेस पक्ष करत आहे, आणि त्याकरिता लागणारा निधी भांडवलदार वर्गाच्या एका हिश्श्यानेच दिलेला आहे. स्पष्ट आहे की भांडवलदार वर्ग भांडवली लोकशाहीच्या तमाशामध्ये जनतेसमोर दिखाव्यासाठी लागणारा दुसरा पर्याय जिवंत ठेवू इच्छितो आणि त्याकरिताच या यात्रेला मोठ्या प्रमाणात फंडीग केले गेले आहे.
नोकऱ्या मिळणार आहेत का?
“आम्ही नोकऱ्यांकरिता चालत आहोत” अशा घोषणा घेऊन चालणारे अनेक युवक यात्रेत दिसत आहेत. इतिहास विसरणे सोपे असते, आणि प्रचारातून निर्माण झालेल्या भ्रमाला बळी पडणे सुद्धा. 2014 च्या अगोदर कॉंग्रेसप्रणित यु.पी.ए. सरकारच्या काळात असलेल्या प्रचंड बेरोजगारीला वैतागूनच मोदींच्या “2 कोटी” रोजगारांच्या घोषणेला लोक भुलले होते. देश स्वतंत्र झाल्यापासून सतत बेरोजगारी राहिली आहे. खाउजा धोरणे जी खाजगीकरणाला पुढे नेतात, ती पुढे नेणार हे आजही राहुल गांधी सांगतात. अशामध्ये रोजगार कुठून येणार आहे?
बेरोजगारी भांडवलशाहीचे अपत्य आहे, आणि बेरोजगारांची फौज टिकणे ही भांडवलदारांची नेहमीच गरज असते. आपल्या उद्योगांना चालवण्यासाठी श्रमशक्तीचा स्वस्त पुरवठा तेव्हाच खात्रीपूर्वक होऊ शकतो, जेव्हा देशात बेरोजगारांची फौज असेल. शिवाय भांडवलशाही आज नफ्याच्या दराच्या घसरणीच्या संकटातून निर्माण झालेल्या आर्थिक अरिष्टामध्ये सापडली आहे. या दराला सावरण्याकरिता आवश्यक आहे की कामगार वर्गाचे अधिकाधिक शोषण केले जावे, जास्तीत जास्त काम कमीत कमी लोकांकडून करवले जावे, उद्योगांना कंत्राटीकरणाची मोकळीक दिली जावी, मजुरीचे दर कमी केले जावेत, इत्यादी. या सर्व धोरणांना लागू करण्यात कोणतेही कॉंग्रेस सरकार आजही अजिबात मागे नाही आणि याबाबतीत कॉंग्रेसमध्ये आजही एकमत आहे.
“छोट्या उद्योगांना चालना देऊन” रोजगार निर्माण करू असा प्रचार राहुल गांधी करत आहेत. एकीकडे प्रचंड भांडवल असलेल्या बलाढ्य कंपन्यांना मोकळे रान द्यायचे आणि दुसरीकडे छोट्या उद्योगांना त्यांच्याशी स्पर्धेत उतरवायचे, असे हे दुटप्पी धोरण. आणि “छोटे उद्योग” किती शोषण करतात हे प्रत्येक कामगार जाणतो! सरकारी नोकऱ्या कॉंग्रेसनेच संपवल्या आणि खाजगीकरण-कंत्राटीकरण लागू केले आणि आता मात्र सरकारी रोजगार देण्याची कॉंग्रेस वल्गना करत आहे. या सर्व थापेबाजीपासून देशातील युवकांनी सावध झाले पाहिजे!
जनतेला आकर्षित करण्यासाठी “शहरी रोजगार योजने”बद्दल राहुल गांधी बोलत आहेत, हा देशातील बेरोजगारी विरोधातील युवक आंदोलनाने, असंतोषाने निर्माण केलेल्या दबावाचा परिणाम आहे, ना की कॉंग्रेसच्या अंत:प्रेरणेचा. मनरेगा सारखी तोकडी योजना हा रोजगार अधिकार नाही, तर रोजगाराची मलमपट्टी आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने पक्क्या, चांगल्या वेतनाच्या, मूलभूत अधिकार म्हणून रोजगाराच्या अधिकारासाठी आपला क्रांतिकारी संघर्ष पुढे नेणे, ना की कॉंग्रेसच्या थापांवर विश्वास ठेवणे, हाच युवकांचा कार्यभार बनतो. कॉंग्रेस: आजही भांडवलदार वर्गाचा विश्वासू पक्ष आहेच!
कॉंग्रेसने लागू केलेल्या खाजगीकरण, उदारीकरण,जागतिकीकरणाच्या (खाउजा) धोरणांविरोधात आंदोलने करणारे, कॉंग्रेस सरकारांच्या काळात “पी.एम.सी.एम. कौन है, टाटा-अंबानी के दलाल है” अशा घोषणा देणारे लोक आज राहुल गांधींच्या यात्रेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत. महाराष्ट्रातील तर झाडून सगळे सामाजिक-जनवादी, उदारवादी भारावून गेल्यासारखे यात्रेबद्दल बोलत आहेत. कॉंग्रेसपेक्षा “वाईट” पर्याय समोर आल्यावर आता या लबाड, ढोंगी उदारवादी लोकांना कॉंग्रेसचा पर्याय योग्य वाटू लागला आहे. म्हणूनच की काय “तिरस्कारा”च्या मुद्याला समोर करून बाकी सर्व मुद्दे जणू काही गायब आहेत अशाप्रकारे या यात्रेचा प्रचार उदारवादी मंडळी करत आहेत.
वस्तुस्थिती ही आहे की कॉंग्रेसने ना खाउजा धोरणांवर स्थिती बदलली आहे, ना भांडवलदारांची तळी उचलण्यावर. शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी यांचे नाव फक्त राहुल गांधी घेत आहे, परंतु ते तर मोदी-भाजप-संघ सुद्धा करतातच की? सत्तेवर आल्यावर कॉंग्रेस तीच धोरणे राबवणार आहे जी तिने 1991 पासून लागू केली आहेत. “अडानी-अंबानी” अशा “२-३” भांडवलदारांच्या हातात सर्व पैसा चालला आहे हा यात्रेमध्येच टाळ्या मिळवण्यासाठी राहुल गांधींनी चालवलेला प्रचार धादांत खोटारडेपणा आहे. वास्तवात बड्या भांडवलदारांपैकी टाटा, बिर्ला, मित्तल, अडानी, अंबानी, बजाज, फिरोदिया, दमानी, नाडर, जिंदल, हिंदुजा, संघवी, किर्लोस्कर, पूनावाला, कोटक, गोदरेज, प्रेमजी, इ. अनेक डॉलर “अब्जपती”, प्रादेशिक उद्योगपती, अशा सर्वांचीच संपत्तीवाढ मोदींच्या काळात चालू आहे, आणि कॉंग्रेसच्या राजवटीतही होत होती! गौतम अडानी जरी जगातील तिसरा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेला असला, तरी देशातील अब्जाधिशांची एकूण संपत्ती 800 अब्ज डॉलर झाली आहे! यापैकी बहुतेक सर्वजण भाजपला जास्त निधी देत असले, तरी कॉंग्रेस त्यांचा लाडका आहेच! तेव्हा फक्त अडानी-अंबानीचे नाव घेऊन राहुल गांधी “बड्या भांडवलदारांना” विरोध करण्याचा कितीही आव आणत असले तरी हे सत्य लपलेले नाही की कॉंग्रेस हा आजही बड्या भांडवलदारांचा विश्वासू पक्ष आहे!
“तपस्वी” राहुल गांधी, “वो चल रहा हैं”, “जहर निगल रहा हैं”, “वो आया हैं इंकलाब लेकर” सारखी स्तुतीसुमने राहुल गांधींवर उधळली जात आहेत! राहुल कोणासाठी तपस्या करत आहेत, आणि कोणता “इंकलाब” घेऊन येणार आहेत? यात्रा सुरू असतानाच राजस्थानातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आयोजित केलेल्या गुंतवणूकीच्या कार्यक्रमात गौतम अडानी यांनी हजेरी लावली! यावर राहुल गांधींनी म्हटले की ते “कॉर्पोरेटच्या विरोधात नाहीत तर मक्तेदारीच्या विरोधात आहेत”! वास्तवात कॉर्पोरेट कंपन्या ह्याच मक्तेदारीच्या प्रवर्तक आहेत आणि राहुल गांधींनी चालवलेला हा शब्दछळ त्यांना मूर्ख म्हटले तरी लपू शकत नाही! राहुल गांधींनी शेवटी आपला “प्रामाणिकपणा” दाखवत म्हटलेच की “अडानींनी 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे आणि कोणताही मुख्यमंत्री ही ऑफर कशी नाकारू शकेल?” त्यांनी याची सुद्धा आठवण करून दिली की कॉंग्रेसनेच उदारवादी धोरणांची सुरूवात केली तर कॉंग्रेस उद्योगपपतींच्या विरोधात कशी असेल? थोडक्यात राहुल गांधीं “दोन–तीन” कंपन्या श्रीमंत होण्यासाठी ढाळत असलेले अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत!
असेही “विद्वान” आहेत की जे राहुल गांधींना इतर कॉंग्रेसपेक्षा वेगळे करून बघा असे सांगत आहेत! आता राहुल गांधी हेच कॉंग्रेसचे “खरे” नेते आहेत हे शेंबडं पोरही सांगेल, तेव्हा हा मुद्दाच हास्यास्पद आहे. दुसरे म्हणजे, राहुल गांधी कॉंग्रेसचे मोठे नेते नसते, तरीही हा मुद्दा गैरलागूच असता. प्रत्येक पक्ष अशा व्यक्तींचा बनलेला असतो जे सर्व एखाद्या वर्गाच्या हितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र येतात. त्यात बारीकसारिक मतभेद राहू शकतात, परंतु वर्गीय हितसंबंधांवर वाद असूच शकत नाही! त्यामुळे कोणताही व्यक्ति एखादी पक्षात असेल तर त्या पक्षाच्या विचारधारेवरूनच व्यक्तीचे मूल्यमापन होईल, ना की उलटे!
फॅसिझमला निवडणुकांनी हरवता येणार नाही!
फॅसिझमला फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित करणे, आणि संघाच्या राजकारणाला फक्त हिंदुत्वापर्यंत मर्यादित करणे हा आज उदारवादी, समाजवाद्यांनी चालवलेला सर्वात भ्रामक खेळ आहे! या यात्रेनिमित्ताने सुद्धा सर्व गणिते केली जात आहेत ती शेवटी निवडणुकीतील बेरीज-वजाबाक्यांची.
फॅसिझम हे एक प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन (“आंदोलन” शब्दाला अनेक जण सकारार्थी मानतात, परंतु सर्वच “आंदोलने” योग्य नसतात!) असते ज्याचा आधार भांडवलदार वर्ग, निम्न-भांडवलदार वर्ग, धनिक शेतकरी-कुलक वर्ग, लंपट सर्वहारा, उच्च-मध्यमवर्ग यांमध्ये असतो. फॅसिझम कॅडर आधारित संघटनांमार्फत, तळागाळात अनेक आघाड्यांमार्फत खोट्या शत्रूची, अंधराष्ट्रवादाची, धर्मजातीवादाची पेरणी करून व्यापक खोटा-प्रचार करणारी यंत्रणा राबवतो, आणि निवडणूका लढवणारा पक्ष हा त्याचा फक्त एक घटक असतो. फॅसिझम सैन्य-पोलिस-नोकरशाही पासून ते वर्तमानपत्रे, मीडीया चॅनेल्स आणि न्यायालयांपर्यंत सर्व यंत्रणांमध्ये आपली माणसे घुसवून काम करतो. फॅसिझमचा प्रमुख शत्रू नेहमीच कम्युनिस्ट असतात, आणि इतर समाजवादी, उदारवादी, लोकशाहीवादी यांनाही तो सोडत नाही. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॅसिझम तो हिंस्त्र कुत्रा आहे ज्याची साखळी भांडवलदार वर्गाच्या हातात आहे, आणि आर्थिक संकटाच्या काळात ती साखळी ढिली केली जाते जेणेकरून कामगार-कष्टकरी वर्गाच्या आंदोलनाचे दमन करता येईल. 2013 पासून देशातील सर्व उद्योगपती, भांडवलदारांच्या निधीचा प्रचंड मोठा ओघ भाजपकडे वळलेला आहे आणि हे त्यांच्या सत्तेचे एक प्रमुख गुपित आहे.
यामुळेच भाजपला निवडणुकीत हरवणे म्हणजे फॅसिझमला हरवणे नाही! संघपरिवाराचे जमिनीवर असलेले अस्तित्व, शक्ति, आणि भांडवलाचा त्यांना आज असलेला पाठिंबा, आणि या जाणीवेतून सर्व भांडवली पक्षांची त्यांच्या अस्तित्वाशी असलेली तडजोड, यामुळेच आज देशात गैर-भाजप शासित राज्यांमध्ये सुद्धा भाजपने घेतलेले कोणतेही निर्णय फिरवले गेलेले नाहीत! इतकेच काय तर आम्ही सुद्धा हिंदू कसे, आम्ही सुद्धा हिंदूंचे तारणहार कसे हे सिद्ध करण्याची चढाओढ या पक्षांमध्ये चालू दिसते. सर्वधर्मसमभावाच्या विचाराच्या चिंधड्या उडवायला अशाप्रकारे इतर कोणाची गरज लागत नाही! त्यांचे भांडवली वर्गचरित्रच कॉंग्रेससहीत सर्व पक्षांना फॅसिस्ट शक्तींशी तडजोडीचे सहअस्तित्व टिकवण्यास भाग पाडते.
यात्रा कोणाला कोणाशी जोडेल?
त्यामुळे कॉंग्रेसने चालू केलेली “भारत जोडो” यात्रा ही सर्व जातधर्मातील सर्व लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी नाही , बेरोजगारी-गरिबी दूर करून, शोषण संपवून, देश जोडण्यासाठी नाही, कारण या सर्वांसाठीच जाती-अंताचा, कामगार-कष्टकऱ्यांच्या वर्ग एकतेचा, भांडवली व्यवस्थेला संपवणारा क्रांतिकारी लढा आवश्यक आहे! तर ही यात्रा फॅसिझमची भिती दाखवत कामगार–कष्टकऱ्यांच्या हितांना त्यांचे शोषण करणाऱ्या त्यांच्याच जात–धर्मांतील भांडवलदार वर्गाच्या हितासोबत जोडलेले ठेवण्यासाठी, फॅसिझमचा आधारस्तंभ असलेल्या भांडवलदार वर्गाचा दुसरा पर्याय टिकवण्यासाठी आहे.
सर्वधर्मसमभावाच्या नव्हे तर सत्ता आणि धर्म यांचा पूर्ण विच्छेद करणाऱ्या धर्मनिरपेक्षतेला साथ देऊन, “तिरस्कारा”विरोधात याचना करत नाही, तर फॅसिस्ट गुंडशक्तींना सडेतोड उत्तर देणाऱ्या क्रांतिकारी जनशक्तीच्या आधारावर, भांडवलदार वर्गासोबत नव्हे तर कामगार-कष्टकरी वर्गाच्या व्यापक वर्गयुतीने, उदारवादी भांडवली आर्थिक व्यवस्थेकरिता नव्हे तर सर्व उत्पादन साधनांवर जनतेची मालकी असणाऱ्या समाजवादी व्यवस्थेकरिता लढूनच फॅसिझमशी लढले जाऊ शकते. म्हणूनच कामगार वर्गाने उदारवादी-समाजवाद्यांच्या या भुलाव्याला न भुलता, आपला स्वतंत्र कामगार वर्गीय राजकीय पर्याय उभा केला पाहिजे जो फॅसिझमशी, जातीयवादी-ब्राह्मणवादी शक्तींशी, आणि या सर्वांना पोसणाऱ्या भांडवलदार वर्गाशी निर्णायक टक्कर घेऊ शकेल!
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022