ऋषी सुनाक: युकेचा पहिला “गुंतवणूक बॅंकर” प्रधानमंत्री

आशय

ऋषी सुनाक हा युके(युनायटेड किंग्डम)चा पहिला “हिंदू” अथवा “भारतीय मूळाचा” अथवा “आशियाई” प्रधानमंत्री असल्याबद्दल हिंदुत्ववादी प्रसारमाध्यमे, भारतातील वा जगातील इतर प्रसारमाध्यमे प्रचार करत आहेत. एक गोष्ट जिच्यावर ते जोर देत नाहीयेत, आणि जी खरी महत्त्वाची गोष्ट आहे ती ही की ऋषी सुनाक हा युकेचा पहिला इन्व्हेस्टमेंट बॅंकर (गुंतवणुक संदर्भात सल्ला देणारा तज्ञ) प्रधानमंत्री आहे. ऋषी सुनाकने गोल्डमन सॅक्स या जगातील प्रचंड मोठ्या अश्या अमेरिकन “गुंतवणूक बॅंके”त (इन्वेस्टमेंट बॅंक) काम केले आहे. त्याने इंग्लंडमध्ये संसद-सदस्य होण्याअगोदर 14 वर्षे या क्षेत्रात काम केले आहे. त्याला प्रधानमंत्री करण्याचा ब्रिटनच्या कंझर्वेटीव्ह पार्टीसाठी अर्थ  हिंदू वा आशियाई वा भारतीय व्यक्तीचे प्रधानमंत्री करणे नाहीये तर वित्तीय भांडवलाच्या एका प्रतिनिधीला प्रधानमंत्री करणे हा आहे. कंझर्वेटीव्ह पक्षातून ऋषी सुनाक यांची दुसऱ्या प्रयत्नात बिनविरोध निवड झाली आहे, याचा अर्थ आहे ब्रिटनच्या आर्थिकराजकीय व्यवस्थेवर, सत्तेवर आता बड्या वित्तीय भांडवलदारांचे अत्यंत प्रत्यक्ष नियंत्रण स्थापित होणे. ऐतिहासिकरित्या पाहिले तर वित्तीय भांडवलदार वर्ग सत्तेला प्रत्यक्ष नियंत्रणापासून एक पाऊल दूर राहत आल्याचे दिसते. परंतु युकेमध्ये डेव्हिड कॅमरून प्रधानमंत्री असताना युरोपियन युनियन मधून युकेने बाहेर पडावे याकरिता झालेल्या “ब्रेक्झिट”च्या सार्वमताचा कौल आल्यानंतर 2016 पासून चालत आलेल्या राजकीय संकटाची परिणती आहे की वित्तीय भांडवलदार वर्गाने आता शासनाची दोरी “करियर राजकारण्यांच्या” हाती न देता, आपल्या स्वत:च्या हाती घेऊन आपला माणून 10, डाऊनिंग स्ट्रीट येथे बसवला आहे.

ऋषी सुनक यांनी “येणारे निर्णय कठीण असतील” असा इशारा दिला आहे, कारण युकेची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट स्थितीला जाऊन पोहोचली आहे. याच बिकट अर्थव्यवस्थेला कसे सावरावे याबद्दल तेथील भांडवलदार वर्गामध्ये असलेल्या मतभेदाचा परिणाम आहे की यूकेने गेल्या आठ आठवड्यांत तिसर्‍या प्रधानमंत्री नेमला आहे. यापूर्वीच्या 45 दिवसांत (यूकेच्या इतिहासातील पंतप्रधान म्हणून सर्वात लहान कार्यकाळ) सुनाकच्या पूर्ववर्ती लिझ ट्रस सत्तेवर असताना, राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूने एक पर्व संपले असताना ट्रसच्या “छोट्या-अर्थसंकल्पा”मुळे वाढलेल्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी लिझ ट्रसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी एकामागून एक राजीनामे दिले आणि लिझ ट्रसना सुद्धा राजीनामा द्यावा लागला.

सुनाक यांची निवड ब्रिटनच्या संसदेत बहुमत असलेल्या कंझर्वेटीव्ह (परंपरावादी) पार्टीने एकमताने केली आहे. लिझ ट्रसच्या विरोधात सुनाक पहिल्या प्रयत्नात निवडणूक हरले होते, परंतु लिझ ट्रसच्या राजीनाम्यानंतर इतर उमेदवारांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर कंझर्व्हेटीव्ह पक्षाने सुनाकला एकमताने निवडले आहे. सुनाक स्वत: युके मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 73 कोटी पौंड असावी असा अंदाज आहे.  सुनाक भारतातील इन्फोसिस कंपनीचे संस्थापन नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांची करोडपती पत्नी अक्षता मूर्ती युकेमध्ये ‘नॉन-डोमिसाईल’ (अनिवासी) म्हणून स्थान धरून आहे, जेणेकरून तिला तिच्या वडिलांच्या आय.टी. साम्राज्यातून मिळणाऱ्या लाभांशाच्या (डिव्हिडंड) कोट्यवधींच्या कमाईवर टॅक्स वाचवता यावा. इन्फोसिस निगडीत शेअर्स मधून तिला गेल्या वर्षी 1.16 कोटी पौंड नफा झाला होता.  ‘अनिवासीदर्जा म्हणजे ब्रिटीश भांडवलदार वर्गाने कर द्यावा लागू नये म्हणून स्वत:करिता निर्माण केलेली एक कायदेशीर पळवाटच आहे. या नियमानुसार एखाद्याला ‘अनिवासी’ दर्जा दिला जाऊ शकतो जर असा व्यक्ती युके मध्ये रहात असेल, पण त्याचा “घरी” परतण्याचा इरादा असेल.  अशा लोकांना परदेशी झालेल्या कमाईवर युकेमध्ये कर भरावा लागत नाही. असे म्हणणे की युकेच्या प्रधानमंत्र्याच्या पत्नीला युकेमध्ये रहायचे नाहीये ही एक विडंबनाच आहे! परंतु ब्रिटीश भांडवलदार वर्गाला आणि त्याच्या विश्वासू कंझर्वेटीव्ह पार्टीला यामुळे फरक पडण्याचे कारणच नाही, कारणे सुनाक आणि त्याची पत्नी हे दोघेही या वर्गाचे विश्वासू साथीदार आहेत.

भांडवलदार वर्गाने “राष्ट्रा”ची कल्पना निर्माण केली जेणेकरून एका भूभागावर राष्ट्र-राज्य म्हणून संघटित होताना त्याला संसाधने आणि बाजारावर नियंत्रण ठेवता यावे, परंतु जगाच्या स्तरावर व्यापाराचा विस्तार करणाऱ्या भांडवलदारांना नफ्यासाठी राष्ट्र कल्पना कधीच आडवी येत नाही. वंश, रंगाचे भेद भांडवलदारांनी कामगार वर्गात भेद करण्यासाठी वापरले, परंतु कामगार वर्गाविरोधात एकत्र येताना भांडवलदार मात्र हे भेद दूर सारून एकत्र येतात. ऋषी सुनाक हा अशाच आंतरराष्ट्रीय भांडवलदार वर्गाच्या ‘कॉस्मोपोलिटन’  (‘बहुसांस्कृतिक’) संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. परंतु भारतातील अनेक प्रसारमाध्यमांनी मात्र त्याचे हे वर्गीय चरित्र लपवण्यासाठी आततायी प्रचार चालवला आहे, इथपर्यंत की काहींनी म्हटले की भगतसिंहाच्या शहादतीचा बदला घेतला गेला आहे, किंवा भुऱ्या भारतीयांनी गोऱ्या इंग्रजांवर विजय मिळवला आहे.

वास्तवामध्ये ऋषी सुनाकचे प्रधानमंत्री बनणे हे युकेमधील गेल्या 6 वर्षात वाढलेल्या राजकीय गोंधळाची परिणती आहे, ज्यामध्ये तेथील भांडवलदार वर्ग भांडवलशाहीने निर्माण केलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यात आटापीटा करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नफ्याच्या घसरत्या दराने निर्माण केलेल्या आर्थिक संकटात ब्रेक्झिटने जी भर टाकली, तिच्यानंतर युकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे गडबडली आहे. अशातच बोरिस जॉन्सन यांच्या प्रधानमंत्री पदावरून झालेल्या गच्छंतीनंतर प्रधानमंत्री पदावर आरूढ झालेल्या लिझ ट्रस यांची कारकीर्द अधिकच वादग्रस्त ठरली आणि ऋषी सुनाक हाच सर्वमान्य पर्याय बनत गेला. लिझ ट्रस यांनी अर्थव्यवस्थे संदर्भात घेतलेल्या आपत्तीजनक निर्णयांमुळे वित्तीय भांडवलदार वर्गाचा भरवसा त्यांवरून उडाला आणि त्यांनी 45 दिवसांच्या काळातच आपले वजन ऋषी सुनाकच्या पारड्यात वाढवले. ट्र्स कर-कपात आणि वेगवान-विकासाचे आश्वासन देत कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतृत्वस्थानी आल्या होत्या. याचा खरा अर्थ होता धनदांडग्यांसाही कर-कपात आणि त्यांच्याच उत्पन्नात वेगाने वाढ. प्रधानमंत्रीपदी आरूढ झाल्यावर लिझ ट्र्स यांचे अर्थमंत्री (चान्सलर) क्वासी क्वारतेंग यांनी श्रींमंतांवर असलेल्या सर्वाधिक कराचा टप्पा रद्द करणारे ‘पॅकेज’ जाहीर केले. करकपातीसहीत त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची तरतूद केली होती. यामुळे राजकीय़ असंतोष वाढू लागला आणि “बाजार” भडकले. पौंडाचा दर कोसळला, युकेचे कर्ज वाढले, व्याजाचे दर वाढले आणि अगोदरच भडकलेल्या महागाईत भर पडली आणि राजकीय असंतोष वाढू लागला. बॅंक ऑफ इंग्लंडला अब्जावधी खर्च करून पेंशन बाजार स्थिर करावा लागला. परिणामी ट्र्स यांना सर्व पावले माघारी घ्यावी लागली, क्वार्तेग आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीतून धावत परत आले ते पदच्युत व्हायला. यानंतर ट्रस यांनी जेरेमी हंट यांना नवीन चान्सलर नेमले, परंतु हंट यांनी सर्व निर्णय फिरवावे लागतील असे सूतोवाच केले आणि लिझ ट्रसची पकड संपली आहे हे स्पष्ट झाले. यानंतर ट्र्स यांचा राजीनामा फक्त औपचारिकता उरली होती.

युके मध्ये चालू असलेल्या राजकीय उलथापालथींच्या मूळाशी तेथील अर्थकारणात चाललेले संकट आहे. भांडवलशाहीमध्ये दीर्घकाळात नफ्याचा दर घसरत जातो आणि “विकास” थंडावतो व आर्थिक संकट उभे राहते.  आणि ब्रिटनसहीत जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर आज नफ्याच्या दराच्या घसरणीचे संकट उभे आहे आणि त्यामुळेच अर्थव्यवस्था आणखी एका महामंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत.  या संकटाच्या लागलेल्या चाहूलीचाच परिणाम होता ब्रेक्झिटचा निर्णय. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेच्या बाजूने जास्त युत्या कराव्यात की युरोपियन युनियनच्या आर्थिक महासंघासोबत कराव्यात याबद्दल ब्रिटनच्या भांडवलदार वर्गामध्ये दोन गट उभे राहिले. अमेरिकन भांडवलदारांचा गट विरूद्ध युरोपियन भांडवलदारांचा गट यापैकी निवडीचे हा मुद्दा होता. या मतभेदांच्या परिणामी 2016 साली ब्रिटनने युरोपियन युनियनस सोडण्याचा (ब्रेक्झिट) निर्णय घेतला. परंतु या निर्णयाने भांडवलदारांच्या एका गटासमोर आह्वाने उभी राहिली कारण की तोपर्यंत युरोपियन युनियनसोबत खुला व्यापार असल्यामुळे या गटालाही व्यापाराची संधी होती, परंतु आता युरोपियन युनियन मधील देशांसोबत पुन्हा वाटाघाटी करून करार करावे लागत होते. या मतभेदाचे पडसात ब्रिटीश भांडवलदारांचीच सेवा करणाऱ्या कंझर्व्हेटीव्ह आणि मजूर पक्षातही  (जो फक्त नावालाच मजूर पक्ष आहे!) पडले. कंझर्वेटिव्ह पार्टीच्या डेव्हिड कॅमेरून आणि थेरेसा मे या गेल्या सहा वर्षातील 5 पैकी असलेल्या दोन माजी प्रधानमंत्र्यांसहीत अनेकजण युरोपियन युनियनच्या बाजूचे होते, आणि ॠषी सुनाक सहीत इतर अनेक ब्रेक्झिटच्या बाजूचे. स्वत:ला मजुरांचा पक्ष म्हणवणाऱ्या परंतु वास्तवात भांडवलदारांच्याच एका गटाचे प्रतिनिधित्व करत “सेफ्टी व्हॉल्व” चे काम करणाऱ्या मजुर पक्षातही हे दोन गट पडलेले होते.  आर्थिक संकटाच्या परिणामी उद्भवलेला भांडवलदार वर्गाच्या दोन प्रमुख गटांमधील अंतर्विरोधच राजकीय अंतर्विरोधात परिणत होऊन समोर येत आहे.

ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ब्रिटनमधील भांडवलदार वर्ग जास्त “लायक”, जास्त “आर्थिक समजदारी’ असलेल्या ऋषी सुनाककडे आशा लावून आहे.  ऋषी सुनाक या परिस्थितीमध्ये वित्तीय भांडवलदार वर्गाला वाटणारा सर्वात “लायक” पर्याय म्हणून प्रधानमंत्री झाला आहे, ना की भारतीयांप्रती वा हिंदूंप्रती वा आशियन लोकांप्रती कोणत्याही परोपकाराच्या, दयेच्या भावनेने किंवा त्यांची मते ध्यानात ठेवून! ऋषी सुनाकचे सत्तेवर येणे निश्चितपणे युकेमधील कामगार वर्गाकरिता अधिक धोक्याची घंटा आहे. वित्तीय भांडवलासारख्या तुलनेने अधिक पतनशील भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा सुनाक निश्चितपणे अशीच पावले उचलेल जी कामगार वर्गावर करांचा बोजा वाढवेल, कल्याणकारी खर्च कमी करेल, आणि जनतेचा पैसा भांडवलदारांच्या खिशाकडे वळवेल.  भांडवलदार वर्ग कोणत्याही “राष्ट्रीय़” उत्तरदायित्वाने काम करत नाही तर नफ्याच्या प्रेरणेने काम करतो. ब्रिटनमधील भांडवलदार वर्गाने त्यामुळेच ऋषी सुनाक सारख्या अर्थकारणात मुरलेल्या व्यक्तीला नेता निवडले आहे.

हे सुद्धा विसरता कामा नये की युके मधील हा राजकीय अंतर्विरोध कोणत्याही प्रकारे राज्यसत्तेकरिता आव्हान बनू शकत नाही कारण की पर्याय देऊ शकणारा कामगार वर्गाचा क्रांतिकारी पर्याय आज युकेमध्ये उभा नाही. हा पर्याय उभा करणे हा युके सहीत जगभरातील सर्व देशांमध्ये कामगार वर्गासमोर प्रमुख कार्यभार आहे.

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022