क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका- 2
काही मूलभूत गोष्टी ज्या समजून घेणे आवश्यक आहेत- 1

अभिनव

यावेळी आपण थेट राजकीय अर्थशास्त्राची चर्चा सुरू करण्याऐवजी काही अगदी मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करू. या अंकात प्रकाशित या लेखातील अनेक मुद्दे काही साथी आता पूर्णतः समजू शकणार नाहीत, तर केवळ अंशतःच समजू शकतील असे होऊ शकते. परंतु यात काही नुकसान नाही. जस-जसे आपण भांडवली समाजाचे आर्थिक संबंध, कामगार वर्गाच्या शोषणाचे वास्तव, भांडवलशाहीतील संकटांची मूळ कारणे आणि भांडवली समाजातील मूलभूत आणि प्रधान अंतर्विरोध समजून घेत जाऊ तस-तसे प्रस्तुत लेखात स्पष्ट केलेल्या मूलभूत संकल्पनांचे आकलन आणखी विकसित होत जाईल. हा लेख पुढेसुद्धा तुमच्यासाठी एक संदर्भ स्रोत म्हणून काम करेल. तुम्हाला विविध गोष्टी सखोलपणे समजून घेण्यासाठी आणि त्याबाबत वैज्ञानिक समज बनवण्यास याची मदत होईल. त्यामुळे प्रस्तुत लेखातील काही मुद्दे समजून घेण्यात अडचण येत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही.

ह्या लेखात आणि पुढील अंकात प्रकाशित होणाऱ्या त्याच्या पुढील भागात आपण ज्या बाबींची चर्चा करणार आहोत त्याला आपण ऐतिहासिक भौतिकवादाच्या म्हणजेच इतिहासाच्या वैज्ञानिक भौतिकवादी समजेच्या काही तत्वांवरील चर्चा म्हणू शकतो. हे समजून घेतल्यावर, भांडवलशाही समाजाचे संपूर्ण आर्थिक विश्लेषण तुमच्यासाठी खूप सोपे होईल आणि त्याच्या गुंतागुंतीच्या संकल्पनासुद्धा अधिक सहजपणे तुम्ही समजून घेऊ शकाल. त्यामुळे सुरुवातीला आम्ही तुमची थोडी गैरसोय करत आहोत, परंतु आम्हाला खात्री आहे की ही गैरसोय तुमच्यासाठी खूप उपयुक्त गैरसोय ठरेल.

उत्पादन, उत्पादक शक्ती, उत्पादन संबंध आणि समाजाचा आर्थिक आधार

मनुष्याच्या जीवनाचे भौतिक उत्पादन आणि पुनरुत्पादन हा कोणत्याही समाजाचा पाया असतो. माणूस जिवंत असेल तरच तो राजकारण, विचारधारा, शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, वैज्ञानिक प्रयोग, खेळ, मनोरंजन अशा कार्यात संलग्न होऊ शकतो. मनुष्य आपल्या जीवनाच्या भौतिक उत्पादन आणि पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निसर्गासोबत एक निश्चित संबंध बनवतो आणि निसर्गात बदल घडवून नैसर्गिक संसाधनांना आपल्या गरजेनुसार रूप देतो. याच क्रियेला आपण उत्पादन म्हणतो. मनुष्याच्या भौतिक जीवनाच्या पुनरुत्पादनासाठी उपयुक्त वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी मनुष्य निसर्गात रूपांतरण करतो. उत्पादनासाठी म्हणजेच आपल्या गरजेनुसार निसर्गाच्या रूपांतरणासाठी हा माणसाचा संघर्ष आहे. मानवासाठी काय उपयुक्त आहे आणि काय नाही ही काही आधीपासून किंवा जन्मजात ठरलेली गोष्ट नसते, तर ती समाजाच्या विकासाबरोबर ऐतिहासिकदृष्ट्या बदलणारी गोष्ट आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, वाफेचे इंजिन अश्मयुगातील माणसासाठी उपयुक्त नव्हते, परंतु 19 व्या शतकातील मनुष्यासाठी होते आणि अजूनही आहे. त्याचप्रमाणे, दगडी अवजारे आज माणसाला उपयुक्त नाहीत, कारण आज मनुष्याची उत्पादकता दगडी हत्यारांपेक्षा कैकपटीने पुढे गेली आहे. एखाद्या आदिमानवाच्या हातात मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर दिला तर त्याचा त्याला काय उपयोग होणार? म्हणजेच, कोणत्या वस्तू किंवा सेवा मानवासाठी उपयुक्त आहेत किंवा दुसऱ्या शब्दांत, त्यांचे उपयोग-मूल्य आहे, ही ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या निर्धारित होणारी गोष्ट आहे. मनुष्याला जगण्यासाठी केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याच गोष्टी आवश्यक नाहीत हे उघड आहे. माणसाच्या श्रमाची उत्पादकता जसजशी विकसित होत गेली तसतशी त्याच्या मूलभूत गरजांच्या व्याख्याही बदलत गेल्या. ‘बायबल’मध्येच लिहिले गेले होते: “मनुष्य केवळ भाकरीच्या आधारे जगणार नाही.”

मनुष्य त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी निसर्गाला रूपांतरित करण्याचा जो संघर्ष करतो, त्याचसोबत त्याचे निसर्गाबद्दलचे ज्ञानही विकसित होते. म्हणजेच, त्याची चेतना उन्नत होते, त्याची साधने उन्नत होतात आणि त्याचे कौशल्य विकसित होते. यासोबतच गरजेनुसार निसर्गात परिवर्तन घडवून आणण्याची त्याची क्षमताही विकसित होते. मनुष्य स्वतःसाठी उपयुक्त वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी निसर्गात क्रांतिकारी रूपांतरण करण्याची जी क्षमता विकसित करतो त्याला एकूणात आपण उत्पादक शक्ती म्हणतो.

परंतु माणूस उत्पादनासाठी कधीच निसर्गाचे रूपांतरण एकटा करत नाही. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन स्वभावतःच एक सामाजिक क्रिया आहे. जोपर्यंत उत्पादक शक्तींचा विकास फारच कमी होता तोपर्यंत समाजात श्रमविभागणी निर्माण होऊ शकत नव्हती आणि कुठलाही सामाजिक भेदभाव, म्हणजे गरीब-श्रीमंत यांच्यातील फरक, मालक आणि उत्पादक यांच्यातील फरक इत्यादी सुद्धा निर्माण होऊ शकत नव्हता. उत्पादक शक्तींचा एका विशिष्ट स्तरापर्यंत विकास झाल्यामुळे समाजात श्रम विभाजन होऊ लागते. म्हणजेच, वेगवेगळे उत्पादक वेगवेगळा माल तयार करतात आणि नंतर हवी ती वस्तू मिळवण्यासाठी आपापसात देवाणघेवाण करतात. हे निश्चितच शक्य आहे की समाजात विविध वस्तूंचे उत्पादन करणारे लाखो उत्पादक असतील. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून, हे संपूर्ण उत्पादन कोण्या एका उत्पादकाची क्रिया नसून लाखो-करोडो उत्पादकांची क्रिया आहे, भलेही ते त्याला वैयक्तिकरित्या पार पाडत आहेत. आजच्या काळात तर उत्पादनाने थेट सामाजिक स्वरूप धारण केले आहे. एखादी साधी पिन सुद्धा आज एक कामगार एकटा बनवत नाही. प्रत्येक वस्तू आणि सेवांचे हजारो कामगारांद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे, जरी हे उत्पादन भौगोलिकदृष्ट्या अनेक भागांमध्ये विभागले गेले असले तरीही. आज उत्पादनाचे हे सामाजिक चरित्र समजून घेण्यासाठी सखोल विश्लेषणाची गरज राहिलेली नाही. पण ते प्रत्यक्ष आणि स्पष्टपणे दिसत नव्हते तेव्हाही उत्पादन ही प्रत्यक्षात एक सामाजिक क्रियाच होती.

आता ज्याअर्थी उत्पादन स्वभावतःच एक सामाजिक क्रिया आहे, त्यामुळे उत्पादन करताना मनुष्य एकमेकांशी एक निश्चित नाते बनवतात. ज्या काळात उत्पादक शक्तींचा विकास फारच कमी होता, समाज आदिम अवस्थेत होता, ज्यामध्ये लोक शिकार करून, कंदमुळे गोळा करून आणि थोडीशी शेती करून जेमतेम सर्वांच्या किमान गरजा भागतील एवढे उत्पादन करू शकत होते, तोपर्यंत समाजात समानतेचे नातेसंबंध होते, कुठलाही उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब असा भेद नव्हता. तसे होऊही शकत नव्हते. कारण श्रीमंत आणि शोषक लोक तेव्हाच जन्माला येऊ शकतात जेव्हा समाजात अतिरिक्त उत्पादन असेल. याबद्दल अधिक विस्ताराने आम्ही पुढे बोलू. सध्या हे समजून घेणे आवश्यक आहे की उत्पादक शक्तींच्या विकासाच्या पातळीनुसारच उत्पादन प्रक्रियेत समाजातील मानवांमध्ये काही संबंध तयार होतात. याला आपण उत्पादन संबंध म्हणतो.

उत्पादन संबंध पलटून उत्पादक शक्तींच्या विकासाला प्रभावितसुद्धा करतात. जर उत्पादन संबंध उत्पादक शक्तींना अनुकूल असतील तर ते उत्पादक शक्तींच्या विकासास चालना देतात. जेव्हा उत्पादक शक्तींचा विकास पुढे जातो आणि उत्पादन संबंध तेच राहतात, तेव्हा हे उत्पादन संबंध उत्पादक शक्तींच्या पुढील विकासात अडथळे निर्माण करू लागतात. पुढे आपण या गोष्टी ऐतिहासिक तपशिलांवरून समजून घेऊ. आता एवढे समजून घेणे पुरेसे आहे की उत्पादनाच्या हेतूने निसर्गाच्या क्रांतिकारक रूपांतरणासाठी मनुष्याच्या क्षमतेच्या मोजमापाला उत्पादक शक्ती म्हणतात आणि उत्पादनाच्या या प्रक्रियेत मनुष्य एकमेकांशी जे निश्चित संबंध स्थापित करतात त्यांना उत्पादन संबंध म्हणतात. उत्पादक शक्तींच्या विकासाच्या पातळीनुसार तयार झालेल्या एकूण उत्पादन संबंधांना आपण आर्थिक आधार किंवा पाया म्हणतो.

उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंध यांच्यात सतत संघर्ष म्हणजेच अंतर्विरोध असतो आणि हाच समाजाला गती देणारा मूलभूत घटक किंवा मूलभूत अंतर्विरोध असतो. दुसऱ्या शब्दांत, हा अंतर्विरोध समाजाच्या आर्थिक पायामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत असतो. त्यांच्यातील अंतर्विरोध आणि त्याचे निराकरण आणि नंतर पुन्हा एका नव्या पातळीवरील त्यांच्यातील अंतर्विरोधातील विकासाच्या प्रक्रियेतच समाजाचा विकास होतो. आर्थिक आधार किंवा पाया हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये हा अंतर्विरोध सतत चालू राहतो आणि त्याच्या गतीसाठी जबाबदार असतो. परंतु उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंधांचा अंतर्विरोध स्वतः आर्थिक पाया गुणात्मकरित्या बदलू शकत नाही. हे केवळ राजकीय वर्गसंघर्षामुळेच शक्य होऊ शकते, जो अधिरचनेच्या क्षेत्रात सुरू असतो. अधिरचना काय असते?

अधिरचना आणि आर्थिक पाया

समाजाचा आर्थिक पाया म्हणजेच त्याच्या आर्थिक संबंधांची संपूर्ण रचना ज्यापद्धतीची असते त्यानुसारच एक संपूर्ण राजकीय आणि वैचारिक अधिरचना तिच्या वर उभी असते.

गुलाम समाजाच्या आर्थिक पायाबद्दल बोलायचे झाल्यास, त्या समाजातील गुलाम व्यवस्थेच्या आर्थिक संबंधांच्या आधारावर एक विशिष्ट प्रकारच्या राजकारणाची आणि विचारसरणीची एक संपूर्ण रचना उभी होते, जी शेवटी त्या विशिष्ट आर्थिक पायाची सेवा करते. गुलाम व्यवस्थेच्या युगात आपण आजच्या भांडवली लोकशाहीवर आधारित राजकारण आणि व्यक्तिवाद, अधिकाधिक नफा कमाविण्याचा विचार आणि भांडवली लोभ-लालसेच्या संस्कृतीची कल्पनाही करू शकत नाही. भांडवली लोकशाही आणि भांडवली विचारधारा शेवटी फक्त भांडवली आर्थिक पायाचीच सेवा करू शकते आणि त्या केवळ भांडवली आर्थिक पायाच्या आधारावरच उभे राहू शकतात. तसेच सरंजामशाही युगात भूदास प्रथा आणि सामंती कराच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पादकांच्या अतिरिक्त श्रमाची लूट करण्याचे काम सामंती जमीनदार आणि राज्यसत्ता करत असते. त्या काळातही आपण भांडवली लोकशाही आणि खाजगी नफ्यावर आधारित विचारांची आणि संस्कृतीची कल्पना करू शकत नाही. भांडवली समाजात कामगार दुहेरी अर्थाने औपचारिकपणे “मुक्त” असतो. प्रथम, तो उत्पादनाच्या साधनांपासून पूर्णपणे “मुक्त” झालेला असतो, म्हणजेच त्याला उत्पादनाच्या साधनांपासून पूर्णपणे वंचित केले जाते, ज्यामुळे तो त्याची काम करण्याची क्षमता, म्हणजेच श्रमशक्ती उत्पादनाच्या साधनांचा मालक असलेल्या भांडवलदाराला विकू शकतो. दुसरे, तो स्वत:चा मालक निवडू शकतो कारण तो आपली श्रमशक्ती भांडवलदाराला ठराविक कालावधीसाठीच विकतो. तो गुलामाप्रमाणे त्याच्या मालकाची मालमत्ता नसतो. रोमन समाजात गुलामाला तर गुलाम मालक ‘बोलू शकणारे अवजार’ म्हणायचे. भांडवली समाजात कामगार हा निरपेक्ष अर्थाने गुलाम नसून मजुरी गुलाम असतो. म्हणजेच तो श्रमशक्ती विकायला बाध्य असतो आणि मजुरीसाठी भांडवलदाराची गुलामी करतो. एकदा का त्याने आपली श्रमशक्ती भांडवलदाराला एका ठराविक कालावधीसाठी विकली की कामगाराचे त्याच्या श्रमशक्तीच्या वापरावर नियंत्रण नसते आणि भांडवलदार हवे तसे ती श्रमशक्ती वापरू शकतो. अशा व्यवस्थेत देवाण-घेवाणीची समानता अर्थात ‘विनिमयाची समानता’ असते. कामगार आपली श्रमशक्ती भांडवलदाराला ठराविक कालावधीसाठी विकतो आणि त्या बदल्यात त्याच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला मजुरी मिळते. वर-वर बघता यात कुठेही शोषण दिसत नाही. कामगाराचे शोषण आपण हे वरवरचे वास्तव भेदूनच बघू शकतो, कारण कामगार त्याच्या दिवसभराच्या कामात त्याच्या श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनासाठी लागणारे मूल्य कामाच्या दिवसाच्या एका भागातच निर्माण करतो आणि त्यानंतर तो भांडवलदारासाठी मोफत नफा तयार करतो, ज्याच्या बदल्यात त्याला काहीही मिळत नाही. जसेही आपण हे समजून घेतो की श्रमशक्ती ही एक अशी वस्तू आहे जी खर्च होण्याच्या प्रक्रियेत तिच्या किमतीपेक्षा जास्त मूल्य निर्माण करते, त्याबरोबर आपल्याला भांडवलदार वर्गाच्या नफ्याचे रहस्य लक्षात येते आणि देवाणघेवाणीच्या समानतेचे सत्यसुद्धा आपल्यासमोर येते. सर्व भांडवली आणि गैर-भांडवली (साधारण) माल उत्पादक देखील विनिमयाच्या समानतेच्या तत्त्वाच्या आधारावर त्यांच्या वस्तूंची बाजारात देवाणघेवाण करतात आणि खाजगी मालमत्तेवरील त्यांचा हक्क हा नैसर्गिक अधिकार मानतात. बाजारातील म्हणजेच वितरणाच्या क्षेत्रातील ही समान देवाणघेवाण आणि खाजगी मालमत्तेचा ‘नैसर्गिक हक्क’ हा भांडवली लोकशाहीचा पाया असतो, जेव्हाकी उत्पादनाच्या क्षेत्रात श्रमशक्ती विकत घेतल्यानंतर भांडवलदारासमोर कामगाराची पूर्ण अधीनता भांडवली हुकूमशाहीचा आधार असते.

सारांशात हे की समाजाचा आर्थिक पाया ज्या पद्धतीचा असतो, म्हणजे त्यातील उत्पादन संबंध ज्या प्रकारचे असतात, त्याच आधारावर समाजात एक राजकीय आणि वैचारिक अधिरचना तयार होते. त्यानुसारच, राजकीय सत्तेची संपूर्ण रचना म्हणजे कायदा, संविधान, पोलीस, संसद, विधानसभा इत्यादींची स्थापना होते, त्याच प्रकारची शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था आणि विविध विचारसरणींची संरचना उभी होते. ही अधिरचना शेवटी आर्थिक पायाचीच सेवा करते, परंतु प्रत्येक क्षणी नाही, तर अंततः ती आर्थिक पायाची सेवा करते. म्हणजेच स्वतः आर्थिक पाया आणि अधिरचना यात सुद्धा अंतर्विरोध असतो.

कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यातील संघर्षाची सुरुवात कामगारांच्या आर्थिक आणि भौतिक मागण्यांपासून होते, परंतु हा संघर्ष जसजसा विकसित होत जातो तसतसे कामगार वर्गाला प्रथम हे समजते की त्यांच्या शोषणाला यंत्रे नव्हे तर मालक जबाबदार आहेत, नंतर तो हे समजतो की त्याचा शत्रू एक मालक नसून संपूर्ण मालक वर्ग म्हणजेच भांडवलदार वर्ग आहे, मग तो हे समजतो की भांडवलदार वर्ग त्याचे शोषण, अत्याचार आणि दमन सतत चालू ठेवण्याचे काम त्याच्या राज्यसत्तेच्या माध्यमातून करतो. कामगार वर्गाची ही जाणीव जसजशी विकसित होत जाते तसतशी त्याला आपल्या राजकीय हितसंबंधांची आणि ध्येयांची जाणीव होते आणि त्याला हे समजते की खरा प्रश्न राज्यसत्तेचा आहे आणि जोपर्यंत भांडवलदार वर्गाची राज्यसत्ता कायम आहे, तोपर्यंत त्याने कितीही लढाऊपणे आर्थिक संघर्ष लढला तरी त्याचे शोषण संपणार नाही. या राजकीय जाणिवेच्या विकासासोबत कामगार वर्ग स्वतःच्या संघर्षांच्या माध्यमातून स्वतःला एक राजकीय वर्ग म्हणजेच सर्वहारा वर्ग म्हणून एकत्रित करतो आणि संघटित होतो. म्हणजेच एका अशा वर्गाच्या रूपात, ज्याचे उद्दिष्ट भांडवली राज्यसत्ता नष्ट करून स्वतःची राज्यसत्ता स्थापन करणे आहे. या राजकीय जाणीवेचे सर्वोच्च स्वरूप म्हणजेच पक्षाची गरज समजून घेणे, म्हणजेच पक्ष राजकीय जाणीवेचा विकास होय. सर्वहारा वर्गाच्या उन्नत तत्वांद्वारे सर्वहारा वर्गाच्या अग्रदल पक्षाच्या निर्मितीद्वारेच सर्वहारा वर्ग भांडवलदार वर्गाच्या राज्यसत्तेच्या नाशासाठी एक राजकीय वर्ग म्हणून स्वत:ला संघटित करण्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचतो आणि केवळ त्याच्या माध्यमातूनच तो व्यापक कामकरी जनता, म्हणजे गरीब आणि मध्यम शेतकरी, निम्न मध्यमवर्ग, छोटे माल उत्पादक इत्यादींना भांडवलदार वर्गाच्या राजकीय आणि वैचारिक प्रभावापासून मुक्त करून त्यांना आपल्या वैचारिक आणि राजकीय नेतृत्वाखाली आणू शकतो. जेव्हा सर्वहारा वर्ग त्याच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कष्टकरी जनतेचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत पोहोचतो, तेव्हाच तो भांडवलदार वर्ग आणि त्याची राज्यसत्ता उलथून टाकण्याच्या स्थितीत पोहोचू शकतो. जर तो तसे करू शकला नाही तर भांडवलदार वर्ग व्यापक सामान्य जनतेमध्ये आपले वैचारिक आणि राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यात आणि अशा प्रकारे आपली राज्यसत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतो. केवळ स्वतःची राज्यसत्ता प्रस्थापित करूनच सर्वहारा वर्ग आर्थिक पायामध्ये उपस्थित असलेले उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंध यांच्यातील द्वंद्व सोडवू शकतो, म्हणजे समाजाच्या विकासासाठी बाधा बनलेले खाजगी मालमत्तेचे संबंध संपुष्टात आणून सामूहिक मालमत्तेची स्थापना करू शकतो, उत्पादक शक्तींच्या उत्तरोत्तर विकासाला निर्बंध करू शकतो, मूठभर लुटारुंच्या खाजगी नफ्यासाठी आणि बाजाराच्या अराजक शक्तींनुसार नव्हे तर सामाजिक गरजांनुसार योजनाबद्ध पद्धतीने देशाच्या स्तरावर उत्पादन आणि वितरणाला संघटित करू शकतो, शोषण समाप्त करू शकतो आणि एक नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. भांडवली समाजात सर्वहारा वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यातील हा राजकीय अंतर्विरोध म्हणजेच राजकीय वर्गसंघर्षच तो प्रधान अंतर्विरोध असतो, जो समाजाची तात्कालिक प्रेरक शक्ती असतो आणि समाजाच्या विकासाला एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यावर नेतो. वास्तवात, प्रत्येक समाजात राजकीय वर्गसंघर्षच समाजाच्या तात्कालिक गतीमागील प्राथमिक प्रेरक शक्ती असते. म्हणूनच वर्गसंघर्षाला मार्क्सने समाजाची ‘तात्कालिक प्रेरक शक्ती’ आणि माओने ‘प्रमुख अंतर्विरोध’ म्हटले आहे. त्याच्या निराकरणातूनच मूलभूत अंतर्विरोध म्हणजेच आर्थिक पायामध्ये अंतर्भूत असलेल्या अंतर्विरोधाचे तसेच इतर सर्व अंतर्विरोधांचे निराकरण करणे शक्य होते. लेनिनच्या शब्दात सांगायचे तर वर्गसंघर्ष हाच मुख्य दुवा आहे.

थोडक्यात, आर्थिक पायातील अंतर्विरोधाचे म्हणजे उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंधांच्या द्वंद्वाचे निराकरण स्वतःहून होऊ शकत नाही, तर केवळ राजकीय वर्गसंघर्ष आणि त्याच्या परिणामी राज्यसत्ता म्हणजे राजकीय अधिरचनेच्या क्रांतिकारी परिवर्तनाद्वारेच आर्थिक पायाचे क्रांतिकारी परिवर्तन सुरू होऊ शकते. आर्थिक पाया आणि अधिरचना यांच्यातील द्वंद्वाचे हे एक उदाहरण आहे जे क्रांतीनंतरही विविध स्वरूपात सुरू असते. कारण राजकीय अधिरचनेचे क्रांतिकारी परिवर्तन आणि त्यानंतर आर्थिक पायाचे क्रांतिकारी परिवर्तन सुरू झाल्यानंतरसुद्धा जुनी वैचारिक अधिरचना लगेच नष्ट होत नाही तसेच केवळ खाजगी मालमत्तेच्या कायदेशीर निर्मूलनाने आर्थिक पायाचे क्रांतिकारी परिवर्तन पूर्ण होत नाही. एकीकडे समाजाच्या आर्थिक पायातही माल उत्पादन अजून चालू असते, म्हणजे वस्तूंचे उत्पादन केवळ समाजासाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंच्या रूपातच होते असे नाही तर माल म्हणून त्यांची देवाणघेवाण एका वेगळ्या स्वरूपात अजूनही चालू असते. दुसरीकडे भांडवली समाज आणि त्याच्याही आधीच्या शोषणकारी समाजाच्या काळापासून चालत आलेली विषमता, शोषण, अत्याचार व दडपशाही, व्यक्तिवाद, लोभ-लालसा, खाजगी नफ्यावर आधारित विचार, मूल्य-मान्यता आणि सवयी यांचा प्रभाव अजूनही टिकून असतो. परिणामी, आर्थिक पाया आणि अधिरचना यांच्यातील अंतर्विरोध नवीन आणि गुंतागुंतीच्या स्वरूपात अस्तित्वात राहतात.

अधिरचनेच्या क्षेत्रात मूळ अंतर्विरोध राजकीय अधिरचना आणि वैचारिक अधिरचना यांच्यात असतो. सर्वहारा वर्ग आपल्या विचारधारेद्वारे समाजातील भांडवली विचारसरणीविरुद्ध संघर्ष करतो. जर सर्वहारा वर्गाने आपला विचारधारात्मक संघर्ष योग्य मार्गाने चालवला आणि भांडवली विचारधारेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर त्याचा राजकीय वर्गसंघर्ष बळकट होतो आणि पुढेही जातो. परंतु जर कामगार वर्ग स्वतःच भांडवली विचारधारांच्या जसे की अर्थवाद, कामगारवाद, अराजकतावाद इत्यादींच्या प्रभावाखाली येऊन आपले ऐतिहासिक लक्ष्य आणि आपली अग्रणी भूमिका विसरला, तर ही बाब त्याच्या राजकीय वर्गसंघर्षाला मागे ढकलण्याचे काम करते आणि त्याला भांडवलदार वर्गाच्या वैचारिक आणि राजकीय वर्चस्वाखाली राहण्यास बाध्य करते. अधिरचनेत राजकीय वर्गसंघर्ष आणि वैचारिक वर्गसंघर्ष यांचा हा अंतर्विरोध सतत चालू राहतो आणि ज्याप्रमाणे उत्पादक शक्तींचा आणि उत्पादन संबंधांचा अंतर्विरोध हा आर्थिक पायाचा मूलभूत अंतर्विरोध आहे त्याचप्रमाणे हा अधिरचनेचा मूलभूत अंतर्विरोध आहे.

शेवटी, संपूर्ण मानवी समाजाच्या इतिहासाच्या गतीला व्याख्यायित करणारा अंतर्विरोध म्हणजे आर्थिक पाया आणि अधिरचना यांच्यातील अंतर्विरोध होय, ज्यामध्ये सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा आणि त्यात अंतर्निहित अंतर्विरोधांचा समावेश आहे.

या काही मूलभूत गोष्टी आणि संकल्पना आहेत, ज्या समजून घेऊन आपण आपले पुढील कार्यभार अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, म्हणजे भांडवली समाजातील कामगार वर्गाचे शोषण समजून घेणे, भांडवली समाजातील उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंध समजून घेणे, त्यांच्या द्वंद्वाला समजणे आणि हे समजणे की इतिहासातील इतर समाजाव्यवस्थांप्रमाणे भांडवली समाजालाही सुरुवात आणि अंत आहे, भांडवलशाही अमर नाही. त्याचे आंतरिक अंतर्विरोधच शेवटी नवीन प्रगत समाजाकडे घेऊन जातात.

पुढील अंकात आपण या लेखाच्या दुसऱ्या भागात मानवी ज्ञानाच्या विकासाच्या प्रक्रियेतील काही मूलभूत गोष्टी समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण भांडवली समाजाच्या क्रांतिकारी वैज्ञानिक आर्थिक विश्लेषणाकडे पुढे जाऊ.

अनुवाद: जयवर्धन. (मूळ लेख: मजदूर बिगुल, जुलै 2022)

कामगार बिगुल, फेब्रुवारी 2022