क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका- 8: मार्क्सच्या आर्थिक विश्लेषणाच्या विकासाचे प्रमुख टप्पे

✍ अभिनव

आत्तापर्यंत आपण हे अभ्यासले की कशाप्रकारे मूल्याचा श्रम सिद्धांत ॲडम स्मिथपासून सुरु होऊन डेव्हिड रिकार्डो व नंतर मार्क्सच्या वैज्ञानिक मूल्याच्या श्रम सिद्धांतापर्यंत पोहोचला. भांडवली समाजाचा अभ्यास केवळ मालापासूनच सुरू होऊ शकतो कारण भांडवली समाजात संपत्ती मालाच्या प्रचंड साठ्याच्या स्वरूपात दिसून येते हे आपण पाहिले. दुसऱ्या शब्दांत, भांडवली समाजात अधिकाधिक वस्तू आणि सेवा मालांमध्ये रूपांतरित होतात. माल म्हणजे त्या वस्तू ज्या मानवी श्रमाने तयार केल्या जातात आणि विनिमयासाठी तयार केल्या जातात. म्हणजेच मालाला उपयोग-मूल्य आणि विनिमय-मूल्य असते. उपयोग-मूल्य त्याच्या सामाजिक उपयुक्ततेवर अवलंबून असते तर विनिमय मूल्य इतर मालासोबत त्याच्या विनिमयाचे गुणोत्तर दर्शवते. परंतु दोन मालांचा विनिमय तेव्हाच शक्य असतो जेव्हा त्यांच्यात असे काहीतरी समान असेल ज्याची तुलना करता येईल. स्पष्ट आहे की दोन मालांच्या विशिष्ट उपयोग-मूल्यांमध्ये, म्हणजे त्यांच्या विशिष्ट सामाजिक उपयुक्ततेत काहीही समान नाही आणि कोणताही माल उत्पादक त्याच्या मालाचा विनिमय त्याच मालासोबत करणार नाही जो तो स्वतः उत्पादित करत आहे, तर कुठल्यातरी दुसऱ्या मालासोबतच करेल. अशामध्ये त्यांच्यात समान काय आहे? आपण पाहिले की कोणत्याही दोन भिन्न मालामध्ये तुलना करता येणारी एकमेव गोष्ट जी आहे ती म्हणजे मानवी श्रम. परंतु विविध प्रकारच्या विशिष्ट किंवा ठोस मानवी श्रमांमध्ये देखील साम्य नाही. उदाहरणार्थ, एक सुतार आणि एक लोहार यांच्या विशिष्ट प्रकारच्या ठोस श्रमांत काय समान आहे? काहीही नाही. मार्क्सने स्पष्ट केले की हे विशिष्ट प्रकारचे ठोस श्रम वेगवेगळ्या मालांमध्ये विशिष्ट उपयोग-मूल्यांना जन्म देतात. तर मग दोन्ही मालांमध्ये काय साम्य आहे? दोन्ही मालांमध्ये जे साम्य आहे ते म्हणजे ते सामान्यतः सामान्य अमूर्त मानवी श्रमाची उत्पादने आहेत. दुसऱ्या शब्दांत या दोन्ही मालाला बनवण्यासाठी सामान्यतः सामान्य अमूर्त मानवी श्रमच लागलेले आहे, म्हणजेच मार्क्सच्या शब्दात, त्यांना बनवताना “माणसाचा मेंदू, त्याच्या नसा आणि स्नायू” खर्च झाले आहेत. या प्रक्रियेत त्यांनी कोणते विशिष्ट ठोस स्वरूप धारण केले, याकडे आपण मालांचे मूल्य ठरवताना दुर्लक्ष करतो आणि त्याचे अमूर्तन करतो. त्यामुळे मालांचे मूल्य त्यांच्यामध्ये लागलेल्या अमूर्त मानवी श्रमातून निर्माण होते.

आपण हे देखील पाहिले की कुशल आणि अकुशल श्रमाच्या प्रश्नामुळे मूल्य निश्चित करण्यात कोणतीही अडचण येत नाही कारण जटिल किंवा कुशल श्रमाच्या प्रत्येक तासाला साध्या किंवा अकुशल श्रमाच्या निश्चित संख्येत रूपांतरित केले जाऊ शकते. जर आपण त्या कौशल्याच्या उत्पादनात खर्च झालेल्या श्रमाच्या आधारावर एका गुणकाने त्याला गुणले तर प्रत्येक कुशल श्रमाला अकुशल सामान्य श्रमात बदलता येऊ शकते. दुसऱ्या शब्दांत, एक कुशल कामगार केवळ त्याच्या श्रमशक्तीसहच नव्हे तर त्याच्या कौशल्याच्या निर्मितीमध्ये खर्च झालेल्या सर्व श्रमशक्तींसह उत्पादन आणि श्रम प्रक्रियेत सहभागी होतो. ॲडम स्मिथला हे अंशतः समजले होते, परंतु कुशल श्रमाला अकुशल श्रमांत रूपांतरित करण्याचा संपूर्ण प्रश्न मार्क्सने पूर्णत्वाने सोडवला. अशा प्रकारे आपण पाहिले की मालाचे मूल्य ही एक आंतरिक (intrinsic) गोष्ट आहे जी मालाचे विनिमय मूल्य, म्हणजे त्याचे सापेक्ष मूल्य किंवा विनिमयाचे गुणोत्तर ठरवते. दोन मालाचे मूल्य अगदी समान प्रमाणात आणि एकाच दिशेने बदलून त्यांच्या विनिमय मूल्यांमध्ये कोणताही फरक न येणे किंवा एका मालाचे मूल्य बदलून दुसऱ्या मालाचे मूल्य समान राहणे आणि परिणामी त्यांची विनिमय मूल्ये बदलणे हे शक्य आहे. हे मूल्य-रूपाचे वैशिष्ट्य आहे.

आपण हे देखील पाहिले की मालाचे मूल्य त्यांच्यामध्ये लागलेल्या अमूर्त साधारण सामाजिक श्रमांचे प्रमाण आहे आणि अशा प्रकारे मूल्य हे दुसरे काही नसून वस्तुरूप ग्रहण केलेले (objectified) किंवा “थिजलेले” (congealed) अमूर्त श्रम आहे. मूल्याशी संबंधित गुणात्मक प्रश्न सोडवल्यानंतर, म्हणजे त्याचे सार स्पष्ट केल्यावर, मार्क्स त्याच्या परिमाणात्मक प्रश्नाकडे येतो आणि स्पष्ट करतो की मूल्याचे परिमाण सामाजिकदृष्ट्या आवश्यक अमूर्त मानवी श्रमाद्वारे ठरवले जाते. याचा अर्थ असा की उत्पादनाच्या कोणत्याही शाखेत सामाजिक उत्पादनाच्या सरासरी परिस्थितीतील उत्पादनावरून मालाचे मूल्य ठरते, ना की सर्वात कुशल उत्पादकाला लागलेल्या श्रमवेळेनुसार किंवा सर्वात अकुशल उत्पादकाला लागलेल्या श्रमवेळेनुसार. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट गुणवत्तेचा बूट बनवण्यासाठी त्या उद्योगात उत्पादनाच्या सरासरी सामाजिक परिस्थितीत 4 तास लागत असतील तर मालाचे सामाजिक किंवा बाजार मूल्य त्यावरून ठरेल, जरी त्याच शाखेतील काही उत्पादक ते 6 तासात बनवू शकत असले आणि काही इतर उत्पादक ते फक्त 2 तासात बनवू शकत असले तरीही. अशाप्रकारे उपयोग-मूल्य ही एक पूर्णपणे गुणात्मक आणि वैयक्तिक संकल्पना आहे आणि दोन उपयोग-मूल्यांमध्ये स्वतःमध्ये काहीही समान नाही, तर मूल्य ही एक पूर्णपणे परिमाणात्मक आणि सामाजिक संकल्पना आहे आणि दोन मालांच्या मूल्यांना केवळ आणि केवळ अमूर्त श्रमाच्या विविध प्रमाणांच्या रूपात वेगळे करून बघितले जाऊ शकते, ज्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या वेगळे काहीही नाही.

या संक्षिप्त आढाव्यानंतर आपण आता पुढे जाऊ शकतो.

आपण पुढे उपयोग-मूल्य, विनिमय-मूल्य (जे मूल्याचे रूप आहे) आणि मूल्याचा गाभा  (म्हणजे श्रम) यावर अधिक तपशीलवार चर्चा करू आणि नंतर हे पाहू की समाजातील श्रम विभाजनाच्या विकासासह वस्तूंचा विनिमय कसा सुरू झाला आणि मालाच्या उत्पादनाची सुरुवात कशी झाली, कशाप्रकारे वाढत्या विनिमयामुळे श्रमाचे सामाजिक विभाजन आणखी वाढले, कशा प्रकारे मालाच्या मूल्याचे रूप, म्हणजे विनिमय मूल्य, अनेक टप्प्यांतून विकसित होत पैशाच्या स्वरूपापर्यंत पोहोचले, जे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहित आहे. आपण हेसुद्धा बघू की पैशाच्या जन्माबरोबरच कशाप्रकारे माल अंधभक्ती (commodity fetishism) शिखरावर पोहोचली आणि कशाप्रकारे तिने समाजातील मानवांमधील नातेसंबंध पैशाच्या चकचकीत, गूढ पडद्यामागे झाकून टाकले. आपण बघू की साधारण माल उत्पादनाचे सामान्य सूत्र काय आहे, पैशाचे भांडवलात रूपांतर कसे होते, कशाप्रकारे भांडवल अतिरिक्त मूल्य निर्माण करते आणि नंतर अतिरिक्त मूल्याचेच भांडवलात रूपांतर होते, भांडवलाचा कसा संचय होतो आणि समाजात एका टोकाला संपत्ती भांडवलदार वर्गाच्या हातात केंद्रित होते आणि दुसऱ्या टोकाला दारिद्र्य आणि दु:खाचा समुद्र तयार होतो ज्यात समाजातील सामान्य कष्टकरी आणि विशेषतः कामगार वर्ग बुडत राहतो; आणि कशाप्रकारे भांडवलदार वर्गाची अधिकाधिक नफा कमाविण्याची लालसा ही पुन्हा-पुन्हा येणाऱ्या चक्रीय भांडवली संकटांचे कारण बनते जे एका नवीन आणि चांगल्या समाजव्यवस्थेच्या उदयासाठीच्या पूर्वअटींना जन्म देते.

परंतु या दीर्घ मात्र अतिशय रंजक प्रवासाला निघण्यापूर्वी हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल की, ज्यांनी म्हणजे मार्क्स आणि एंगल्स यांनी भांडवली समाजाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याच्या गतीचे नियम शोधले त्यांच्या आर्थिक विश्लेषणाच्या विकासाचा प्रवास काय होता. हे जाणून घेतल्याशिवाय आपण हे समजू शकणार नाही की मार्क्स आणि एंगल्स यांना भांडवली शोषणाचे घृणास्पद क्षुद्र रहस्य कसे समजले? निश्चितच यात इतिहासाच्या त्या काळाची भूमिका होती ज्यामध्ये मार्क्स आणि एंगल्स यांचा जन्म झाला होता. पण त्याच वेळी, या वस्तुस्थितीचीही यात मध्यवर्ती भूमिका होती की मार्क्स आणि एंगल्स हे पहिले सर्वहारा क्रांतिकारक होते ज्यांनी सर्वहारा वर्गाच्या मुक्तीच्या महान ध्येयासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. आणि शेवटी यात मार्क्स आणि एंगल्सच्या महान आणि युगप्रवर्तक प्रतिभांचीही महत्त्वाची भूमिका होती. या गोष्टी समजून घेतल्यास मार्क्स व एंगल्स यांच्या आर्थिक विश्लेषणाच्या विकासाचे टप्पे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्याच बरोबर मार्क्स व एंगल्सचे क्रांतिकारी आर्थिक शोध समजून घेऊन आपल्या मुक्तीचा मार्ग प्रकाशित करू शकतो.

मार्क्सच्या आर्थिक विश्लेषणाच्या विकासाचे प्रमुख टप्पे

मार्क्स आणि एंगल्सचा जन्म अशा युगात झाला जेव्हा युरोपातील प्रमुख भांडवलशाही देशांत व्यापारी भांडवलशाहीचे युग मूळात आणि मुख्यत्वे  संपले होते आणि औद्योगिक भांडवलाचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. मार्क्सचा जन्म 5 मे 1818 रोजी ट्रियर, राईन प्रांत, प्रशिया (सध्याचे जर्मनी) येथे झाला, तर एंगल्सचा जन्म 28 नोव्हेंबर 1820 रोजी बरमेन, प्रशिया (सध्याचे जर्मनी) येथे झाला. जगातील प्रगत भांडवली देशांमध्ये भांडवलशाहीचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले होते. एकीकडे भांडवलदार वर्गाच्या हातात समृद्धी आणि भांडवलाचा वाढता संचय आणि दुसरीकडे कामगार वर्गाचे ढासळते जीवनमान, दरिद्री, रोगराई आणि गरिबी. त्या काळात कामगारांना कारखान्यांमध्ये 10 ते 12 तास काम करायला लावले जात असे आणि काही देशांमध्ये तर त्याहूनही अधिक. कामगार वर्गाच्या जीवनाच्या भयंकर स्थितीवरच एंगल्सने 1845 मध्ये त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘इंग्लंडमधील कामगार वर्गाची स्थिती’ लिहिला, जेव्हा ते केवळ 25 वर्षांचे होते. कामगार वर्गाच्या जीवनाची हीच स्थिती त्या काळातील विविध कादंबरीकारांना ह्या जीवनाचे चित्रण करण्यास भाग पाडत होती, तर इंग्लंड आणि फ्रान्स सारख्या प्रगत भांडवली देशांतील भांडवलदार वर्गातील दूरदर्शी लोक, विचारवंत, मानवतावादी कारखाना निरीक्षक आणि डॉक्टर इ. भांडवलशाही राज्याकडे मागणी करत होते की कामगारांना कामाची परिस्थिती, कामाचे तास आणि राहणीमानाशी संबंधित काही कायदेशीर अधिकार आणि संरक्षण प्रदान केले जावेत. 1840च्या दशकाच्या उत्तरार्धात युरोपमधील कामगार वर्गही आपल्या लढाऊ आणि क्रांतिकारी राजकीय चळवळींना सुरुवात करत होता, जेव्हा अजूनही अनेक देशांमध्ये भांडवलदार वर्ग स्वतः राजेशाहीला आणि सरंजामशाही अभिजात वर्गाला राज्यसत्तेतून बाहेर करण्याचा प्रयत्न करत होते किंवा राजकीय शक्तीतील प्रमुख भागीदार बनण्याचा प्रयत्न करत होते. सर्वहारा वर्गाची राजकीय जाणीव आणि त्याचा वर्गसंघर्ष विकसित होत होता.

हाच तो संपूर्ण सामाजिक-आर्थिक संदर्भ होता ज्यामध्ये मार्क्स आणि एंगल्स यांनी जग बदलू इच्छिणाऱ्या गंभीर आणि विचारी तरुणांच्या रूपात त्यांच्या विचारांची आणि राजकीय कार्याची सुरुवात केली. दोघांनीही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विचार आणि लेखनापासून सुरुवात केली आणि हेगेलचे भाववादी तत्त्वज्ञान, तरुण हेगेलियन्सचा मनोगत भाववाद आणि नंतर लुडविग फायरबाख नावाच्या जर्मन यांत्रिक भौतिकवादी तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीची टीका प्रस्तुत केली आणि शेवटी त्यांचे तत्त्वज्ञान आणि विज्ञान, म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद तथा ऐतिहासिक भौतिकवाद विकसित केले. त्यांच्या क्रांतिकारी बौद्धिक जीवनाची सुरुवात तत्त्वज्ञान आणि राजकारणावर चिंतन आणि लेखनाने झाली.

राजकीय अर्थशास्त्रावर चिंतन आणि लेखन सुरू करणारे पहिले व्यक्ती मार्क्स नव्हे तर एंगल्स होते. 1844 मध्ये त्यांनी ‘राजकीय अर्थशास्त्राच्या टीकेची एक रूपरेखा’ हा निबंध लिहिला, जो मार्क्सनेही वाचला आणि ते खूप प्रभावितही झाले. स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारा एंगल्स हा पहिला माणूस होता. तसे तर एंगल्सची व मार्क्‍सशी एक छोटीशी भेट 1842 मध्येच ‘राईनिश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या कार्यालयात झाली होती ज्याचे संपादन मार्क्स करत होते, परंतु व्यवस्थितपणे त्यांची पहिली भेट 28 ऑगस्ट 1844 रोजी झाली, जिथपासून दोन महान सर्वहारा क्रांतिकारकांच्या आणि सर्वहारा वर्गाच्या शिक्षकांच्या एका अशा मैत्रीची सुरुवात झाली जी आजही एक दाखला आहे. एंगल्स पॅरिसमध्ये मार्क्ससोबत 10 दिवस राहिले आणि याचदरम्यान दोघांनी एकत्र लिहिलेल्या ‘पवित्र परिवार’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकावर काम सुरू केले, ज्याने त्या वेळी जर्मनीमध्ये फॅशनेबल बनलेल्या तरुण हेगेलियन तत्त्वज्ञान आणि राजकारणाच्या ठिकऱ्या उडवल्या आणि वैज्ञानिक भौतिकवाद व क्रांतिकारी समाजवादाच्या तत्त्वांचा पाया घातला. यानंतर दोघांनी मिळून 1846 मध्ये ‘जर्मन विचारधारा’ नावाचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी प्रथमच ऐतिहासिक भौतिकवादाची मूलभूत तत्त्वे व्यवस्थितरित्या मांडली. त्यांच्या हयातीत हे पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर 1932 साली समाजवादी सोव्हिएत संघामध्ये ते प्रथम प्रकाशित झाले. याचे कारण म्हणजे प्रकाशकाने ते छापण्यास नकार दिला होता. परिणामी, मार्क्सच्या शब्दात, त्यांनी (मार्क्स आणि एंगल्स यांनी) या पुस्तकाचे हस्तलिखित “उंदरांद्वारे कुरतडून केल्या जाणाऱ्या टीकेसाठी” सोडून दिले. पण शेवटी जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा त्याने संपूर्ण जगाच्या बौद्धिक जगतात खळबळ उडवली आणि आजपर्यंत दरवर्षी या पुस्तकावर आधारित संशोधन कार्य विविध विद्यापीठांमध्ये प्रकाशित होत आहे. या पुस्तकामुळे मार्क्सवादी तत्त्वज्ञान आणि विज्ञान, म्हणजेच सर्वहारा वर्गाची वैज्ञानिक विश्वदृष्टी (द्वंद्वात्मक भौतिकवाद) आणि समाजाचे विज्ञान (ऐतिहासिक भौतिकवाद) प्रस्थापित करण्याचे कार्य नवीन पातळीवर पोहोचले.

राजकीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची सूचना एंगल्सने मार्क्‍सला केली आणि तत्त्वज्ञानाबरोबरच अभिजात राजकीय अर्थशास्त्राचा म्हणजे ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, फिजिओक्रॅट धारेचे अर्थशास्त्र, माल्थस इत्यादींचा सखोल अभ्यास करावा यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकला. एंगल्सचा ‘राजकीय अर्थशास्त्रावरील टीकेची एक रूपरेखा’ हा निबंध 1844 मध्ये प्रकाशित झाला होता, तर त्याच वर्षी मार्क्सचा प्रसिद्ध ग्रंथ  ‘1844 ची आर्थिक व तत्त्वज्ञानाची हस्तलिखिते’ हाही लिहिला गेला होता (जरी तो मार्क्सच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनी प्रकाशित होऊ शकला) ज्यामध्ये मार्क्सने प्रथमच भांडवली राजकीय अर्थशास्त्रावर काही प्रारंभिक टीकात्मक टिपण्या केल्या आणि कामगार वर्गाच्या परात्मभावाचा सिद्धांत मांडला. ‘पवित्र परिवार’ 1845 मध्ये प्रकाशित झाले आणि ‘जर्मन विचारधारा’चे लेखन 1846 मध्ये झाले. येथून मार्क्स आणि एंगल्सचे लिखाण दोन भिन्न विकास मार्ग अवलंबतात. मार्क्स 1848 पासूनच राजकीय अर्थशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित करतात, आणि तरीही 1848 ते 1852 हा कालावधी ऐतिहासिक भौतिकवादावर मार्क्सच्या काही उत्कृष्ट कृती लिहिण्याचासुद्धा कालावधी आहे. एंगल्सने द्वंद्वात्मक व ऐतिहासिक भौतिकवाद आणि नैसर्गिक विज्ञानांवर अभ्यास आणि लेखन करण्यासोबतच मार्क्सवादाच्या मूलभूत सिद्धांतांचे रक्षण करण्याचे आणि त्यांना कामगार वर्गामध्ये लोकप्रिय करण्याचे कार्य आपल्या हाती घेतले. मार्क्सचे आर्थिक विश्लेषण अनेक टप्प्यांतून पुढे जात विकसित होते, ज्याची थोडक्यात चर्चा करणे उपयुक्त ठरेल आणि पुढे विविध मुद्दे समजून घेण्यास आपल्याला मदत करेल.

पहिला टप्पा (1844 ते 1846)

एंगल्सच्या प्रोत्साहनामुळे आणि दबावामुळे मार्क्सने भांडवलशाही आणि तिची श्रम प्रक्रिया व उत्पादन प्रक्रियेचा गांभीर्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. या अभ्यासाचा पहिला परिणाम ‘1844 मधील अर्थशास्त्र व तत्वज्ञानविषयक हस्तलिखिते’ च्या स्वरूपात पुढे आला ज्यामध्ये मार्क्सने प्रथमच परात्मभावाच्या परिघटनेचा उल्लेख केला आणि स्पष्ट केले की भांडवली उत्पादन प्रक्रियेत कामगाराच्या श्रमाचे उत्पादन त्याच्यापासून वेगळे केले जाते; केवळ त्याच्या श्रमाचे उत्पादनच त्याच्यापासून वेगळे केले जाते असे नाही तर त्याच्या श्रमाची क्रियासुद्धा त्याच्यासाठी परकी बनते, कारण ती भांडवलदाराच्या नियंत्रणात असते; श्रम करत असताना तो स्वत:ला स्वतःपासून परका असल्याचा अनुभव करतो, मात्र जेव्हा तो श्रम करत नसतो तेव्हा त्याच्या जैविक क्रियांमध्येच (खाणे, पिणे, पुनरुत्पादन इ.) तो स्वतःला माणूस समजतो. हे त्याचे वि-मानवीकरण करते आणि त्याला त्याच्या मानवीय सारतत्त्वापासून वंचित ठेवते. त्याचे श्रम आणि त्याच्या श्रमाचे उत्पादन मालकाद्वारे त्याच्यापासून विलग केले जाते, हडपले जाते, त्यामुळे तो श्रमापासून तसाच दूर पळतो जसे एखादा व्यक्ती प्लेगपासून दूर पळतो. परिणामी, उत्पादक कार्याची जी क्रिया माणसासाठी सर्वात नैसर्गिक आहे आणि जी त्याच्यासाठी आनंदाची बाब असली पाहिजे, ती भांडवलशाहीच्या अंतर्गत त्याच्यासाठी एक शाप बनते. मार्क्‍सची राजकीय अर्थशास्त्राची समीक्षा विकसित होण्यासोबतच कामगार वर्गाच्या परकेपणाची ही संकल्पना अधिक गहन होत गेली आणि शेवटपर्यंत ही संकल्पना आपण त्यांच्या आर्थिक लेखनात बघू शकतो.

परंतु इथपर्यंत मार्क्सने भांडवली राजकीय अर्थशास्त्रातीलच संज्ञा स्वीकारल्या होत्या आणि त्यांचा वापर ते क्रांतिकारी उद्देश्यासाठी करत होते. मार्क्सने अद्याप या संज्ञांची संपूर्ण समीक्षा प्रस्तुत केली नव्हती. याच काळात मार्क्सने भांडवली अर्थव्यवस्थेच्या ठोस आकडेवारीचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मार्क्स आणि एंगल्स ठोस अनुभवजन्य अभ्यास, तथ्ये आणि आकडेवारीच्या मजबूत आधारावर त्यांचे सिद्धांत मांडत होते. त्यांचे आर्थिक सिद्धांत सुद्धा अभ्यासकक्षात निर्माण झाले नाहीत किंवा कल्पनेच्या दुनियेतून जन्माला आले नाहीत, तर वास्तविक वर्गसंघर्षातील सहभागाच्या अनुभवांवर आणि वास्तविक भांडवली अर्थव्यवस्थेचे ठोस आकडे आणि तथ्यांचा अभ्यास, त्यांचे सामान्यीकरण आणि विश्लेषणावर आधारित होते. म्हणूनच ते भांडवलशाहीचे वास्तव अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने समजू शकत होते, त्याच्या गतीच्या विज्ञानाला समजू शकत होते आणि म्हणूनच ह्या बाबीच्या अनिवार्यतेला समजत होते की भांडवलशाही समाजातील वर्गसंघर्षाला त्याच्या आंतरिक गतीने सर्वहारा वर्गाच्या अधिनायकत्वाकडे आणि साम्यवादाकडे जावे लागेल किंवा पाशविकता आणि विनाशाकडे. त्यामुळे या काळात मार्क्स भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे व्यापार चक्र, तिच्या संकटांची वारंवारता इत्यादींच्या आकड्यांचा बारकाईने अभ्यास करत होते आणि त्याच्या कारणांची पडताळणी करत होते.

दुसरा टप्पा (1846 ते 1848)

मार्क्सचे आर्थिक चिंतन ह्या काळात आश्चर्यकारक गतीने पुढे गेले. या काळात त्यांच्या आर्थिक चिंतनात झालेला विकास त्यांच्या ‘तत्वज्ञानाचे दारिद्र्य’ या पुस्तकात स्पष्टपणे दिसून येतो, ज्यात प्रूधों नावाच्या निम्न-भांडवली समाजवादी विचारवंताच्या विचारांवर कठोर टीका करण्यात आली होती. त्या काळातील युरोपियन कामगार चळवळीवर प्रूधोंचा बराच प्रभाव होता हे उल्लेखनीय आहे. वर्गसंघर्षाच्या माध्यमातून कामगार वर्गाच्या मुक्तीऐवजी, प्रूधों कामगारांच्या छोट्या उत्पादक गटांच्या आणि त्यांच्यातील व्यापाराच्या व्यवस्थेबद्दल बोलत होते, निम्न-भांडवली उत्पादकांमधील समान विनिमयावर आधारित व्यवस्थेबद्दल बोलत होते; संपामुळे मजुरी वाढेल आणि मजुरी वाढली म्हणजे किमती वाढतील या त्यांच्या चुकीच्या संकल्पनेमुळे ते संपालाही विरोध करत होते! मार्क्सने सांगितले की वाढलेल्या मजुरीमुळे नफा कमी होतो, ना की किमती वाढतात. मार्क्सने प्रूधोंच्या संपूर्ण भाववादी (idealist) तत्त्वज्ञानावर आणि राजकीय अर्थशास्त्रावर जोरदार टीका केली, ज्याने कामगार चळवळीतील या निम्न-भांडवली प्रवृत्तीला परिघावर फेकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1847 मध्येच मार्क्सने ब्रुसेल्समधील कामगारांच्या समूहांमध्ये काही व्याख्याने दिली, जी नंतर ‘वेतनी श्रम आणि भांडवल’ या नावाने प्रकाशित झाली. मार्क्सने अद्याप त्यांच्या अनेक प्रगत संकल्पना विकसित केल्या नव्हत्या, जसे की श्रमशक्तीची संकल्पना, परिवर्तनशील भांडवल आणि स्थिर भांडवल यांच्यातील फरकाची संकल्पना किंवा त्यांचा संकटाचा सिद्धांत. परंतु टप्प्याटप्प्याने ते राजकीय अर्थशास्त्राची समीक्षा विकसित करत होते आणि त्याच्या अवैज्ञानिक संज्ञांच्या जागी वैज्ञानिक संज्ञा स्थापित करत होते. त्यांच्या या व्याख्यानांचा संग्रह नंतर एंगल्सने मार्क्सच्या परिपक्व संकल्पनांना अनुसरून संपादित करून प्रकाशित केला. हा संग्रह आजही आम्हा कामगारांसाठी वाचनीय आहे.

1848 मध्येच ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ हा ऐतिहासिक दस्तऐवज प्रकाशित झाला ज्यामध्ये मार्क्सने भांडवलशाहीची उत्पत्ती, तिचा विकास आणि भांडवल संचयाच्या सामान्य नियमांची पद्धतशीरपणे चर्चा केली. यामध्ये मार्क्स भांडवलशाहीच्या विकासात जागतिक बाजारपेठेच्या उदयाची भूमिका दर्शवितात. मार्क्सने स्पष्ट केले की भांडवली समाजाच्या विकासाचा एक सामान्य नियम असा आहे की श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत जाते, समाजाच्या एका टोकाला संपत्ती-समृद्धी तर दुसर्‍या टोकाला गरिबी जमा होते. यावेळेपर्यंत मार्क्स अभिजात भांडवली राजकीय अर्थशास्त्रातील अनेक चुकीच्या संकल्पनासुद्धा वापरत होते, जसे की ‘मजुरीचा पोलादी नियम’ (iron law of wages) ज्यानुसार मजुरी नेहमीच कामगारांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांना खरेदी करण्याएवढ्या स्तरावरच राहते. मार्क्‍सच्या स्वत:च्या अभ्यासातून नंतर असे दिसून आले की भांडवल संचयाने लादलेल्या मर्यादेत मजुरी दोन घटकांमुळे श्रमशक्तीच्या किमान मूल्यापेक्षा वर किंवा खाली जाऊ शकते. हे दोन घटक म्हणजे श्रमशक्तीची मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण, जे स्वतः नफ्याच्या सरासरी दराच्या स्थितीवरून ठरते आणि दुसरे, जे पहिल्यापेक्षा महत्त्वाचे आहे, ते म्हणजे कामगार वर्गाचा वर्ग संघर्ष. वर्गसंघर्षाच्या माध्यमातून कामगार वर्ग नवीन उत्पादित मूल्यामध्ये आपली मजुरी त्या मर्यादेपर्यंत वाढवू शकतो जिथपर्यंत भांडवल संचय होण्यास आणि भांडवलदार वर्गाच्या नफ्यालाच बाधा येणार नाही. हे फक्त भांडवलशाही व्यवस्थेच्या मर्यादेतच शक्य आहे कारण जर कामगार वर्गाच्या वर्गसंघर्षामुळे आणि संघटनेमुळे मजुरी एवढी वाढली की भांडवलदार वर्गाचा नफाच धोक्यात येईल, तर खाजगी मालमत्तेच्या अधिकाराच्या व्यवस्थेत भांडवलदार वर्ग स्वतः “गुंतवणूक संपावर” जाऊ शकतो. पण मार्क्सने हे शोध त्याच्या परिपक्व कृतींमध्ये लावले.

त्याच वेळी, मार्क्स अजूनही संकटाचे कारण म्हणून वाणिज्यिक संकटाच्या संकल्पनेवर भर देत होते. नंतर मार्क्सने स्पष्ट केले की संकटाचे मूळ कारण नफ्याचा सरासरी दर घसरण्याची दीर्घकालीन प्रवृत्ती आहे. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि माल्थस यांच्याकडून मार्क्स ह्या सर्व संज्ञा घेत होते. आपल्या वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावर मार्क्स या व्याख्या आणि संकल्पना नाकारतात आणि नफ्याचे मूळ म्हणजेच अतिरिक्त मूल्याच्या सिद्धान्तापर्यंत पोहोचतात. पण त्याचे संकेत 1846 ते 1848 च्या त्यांच्या लिखाणातच दिसू लागले होते.

तिसरा टप्पा (1848 ते 1850)

मार्क्स आणि एंगल्स हे सर्वप्रथम सर्वहारा वर्गाचे क्रांतिकारक होते, केवळ वैज्ञानिक किंवा विचारवंत नाही. 1848 ते 1850 हा काळ युरोपमधील क्रांती आणि बंडांमुळे झालेल्या सामाजिक-आर्थिक उलथापालथीचासुद्धा काळ होता. 1847 मध्येच युरोपातील भांडवली देशांना मोठ्या आर्थिक संकटाने वेढले होते. त्यामुळे अनेक देशांमध्ये बेरोजगारी, उपासमार आणि अनिश्चितता वाढत होती. भांडवलदार वर्ग प्रजासत्ताक आणि लोकशाहीसाठी लढत होता, परंतु सर्वहारा वर्गाने आपल्या बाल्यावस्थेतच आपल्या मुक्तीसाठीच्या राजकीय संघर्षाचीसुद्धा सुरुवात केली होती आणि त्यामुळे भयभीत होऊन भांडवलदार वर्ग स्वतःच तडजोडीकडे वाटचाल करत होता.

मार्क्स आणि एंगल्स यांनी या काळातील क्रांतिकारी लोकशाही आणि सर्वहारा संघर्षांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. परंतु सर्वहारा वर्गाच्या चळवळी आपल्या बाल्यावस्थेत केलेल्या या पहिल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकल्या नाहीत. मार्क्सने आपल्या विश्लेषणात असे दाखवून दिले की सर्वहारा वर्गाच्या अग्रदलात अनुभवाचा अभाव, संपूर्ण युरोपातील सर्वहारा लोकांमध्ये परस्पर संपर्क आणि ऐक्याचा अभाव आणि सोबतच निम्न-भांडवलदार वर्गाची डगमगणारी वृत्ती हे याचे कारण होते. मार्क्सने हे देखील दाखवून दिले की 1848 मध्ये क्रांतीच्या ज्वाला भडकण्यामागील खरे कारण 1847 मध्ये आलेले गंभीर आर्थिक संकट होते. सर्वहारा वर्गाच्या आंदोलनाच्या या पहिल्या अनुभवांनंतर मार्क्सने आर्थिक अभ्यासात स्वतःला अधिक खोलवर गुंतवून घेतले. मार्क्सला हे चांगले समजले होते की सर्वहारा वर्गाच्या क्रांतिकारी चळवळींच्या भविष्यातील यशासाठी योग्य रणनीती आणि सामान्य डावपेच तेव्हाच सूत्रबद्ध केले जाऊ शकतात जेव्हा भांडवली अर्थव्यवस्थेची संपूर्ण कार्यप्रणाली सखोलपणे समजून घेतली जाईल. आपल्या आर्थिक विश्लेषणाच्या आधारावरच मार्क्सने भाकीत केले होते की पुढील गंभीर संकट सुमारे 10 वर्षांनी येण्याची शक्यता आहे. मार्क्सचे हे भाकीत अंशतः खरे ठरले कारण संकट आले, परंतु मार्क्स आणि एंगल्सच्या अपेक्षेइतके ते व्यापक आणि गंभीर नव्हते.

चौथा टप्पा (1857 ते 1867)

मार्क्सने 1850 ते 1857 मधील त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष एका हस्तलिखितात घाईघाईने संकलित केले कारण त्यांना शंका होती की भांडवली अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीबद्दलचे जे शोध त्यांनी लावले आहेत ते प्रकाशित होण्यापूर्वीच कदाचित क्रांतीच्या लाटेदरम्यान किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 1857 मध्ये आलेले संकट इतके गंभीर नव्हते आणि त्यामुळे 1848 प्रमाणे क्रांत्याही घडून आल्या नाहीत. त्यानंतर मार्क्सने या हस्तलिखिताच्या वेगवेगळ्या भागांना पुस्तकांची मालिका म्हणून प्रकाशित करण्याची योजना आखली. 1857 च्या ह्या हस्तलिखितांना आज ‘ग्रुण्डरिस्स’ म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ ‘विखुरलेली टिपणे’ किंवा ‘कच्ची टिपणे’ असा आहे. या कृतीमध्ये मार्क्सने आपले मूलभूत शोध विस्कळीतपणे मांडले होते. त्या वाचताच हे स्पष्ट होते की मार्क्सने ही टिपणे आपल्या विचारांची मांडणी व्यवस्थित करण्याच्या हेतूने घेतली होती. नंतर ‘भांडवल’च्या तीन खंडांमध्ये अधिक पद्धतशीर स्वरूपात प्रकाशित झालेले बहुतेक शोध त्यांच्या मूळ स्वरूपात ‘ग्रुण्डरिस्स’मध्ये पाहता येतात. या हस्तलिखिताचे तीन भाग आहेत: परिचय, पैशासंबंधात अध्याय आणि भांडवलाबाबत अध्याय. यात त्यांनी बास्तियाट आणि कॅरी इत्यादी अनेक समकालीन राजकीय अर्थशास्त्रज्ञांची तसेच रिकार्डो आणि स्मिथ सारख्या अभिजात राजकीय अर्थशास्त्रज्ञांची टीकाही प्रस्तुत केली. आपण पाहू शकतो की त्यांच्या याच रचनेत मार्क्स त्यांचा मूल्याचा सिद्धांत, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, अतिरिक्त मूल्याच्या नफा, भाडे आणि व्याजामधील वाटणीचा सिद्धांत, किमतीचा मूळ आधार म्हणून मूल्याची ओळख आणि मूल्याचे किमतीत रूपांतरित होणे तसेच नफ्याचे मूळ म्हणून अतिरिक्त मूल्याच्या सिद्धान्तापर्यंत पोहोचले होते. याच रचनेत मार्क्‍स प्रथमच परिवर्तनशील भांडवल आणि स्थिर भांडवल यांच्यात पद्धतशीरपणे फरक करतात, अतिरिक्त मूल्य वाढवण्याच्या दोन पद्धतींबद्दल म्हणजे निरपेक्ष अतिरिक्त मूल्य आणि सापेक्ष अतिरिक्त मूल्य याबाबत बोलतात. हे हस्तलिखित प्रथमतः 1939 मध्ये समाजवादी सोव्हिएत युनियनमध्ये जर्मन भाषेत प्रकाशित झाले होते आणि 1973 मध्ये पहिल्यांदा इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते आणि ते अद्याप हिंदीमध्ये प्रकाशित व्हायचे आहे. मार्क्सच्या या महान रचनेचे हिंदीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून प्रकाशित करणे हे आपल्या देशातील तरुण सर्वहारा क्रांतिकारकांचे कर्तव्य आहे, ज्यामध्ये मार्क्सने प्रथमच भांडवली अर्थव्यवस्थेची सविस्तर मांडणी केली होती. मार्क्सच्या राजकीय अर्थशास्त्राची पद्धत समजून घेण्यासाठी ही रचना अपरिहार्य आहे.

1857 नंतर मार्क्सने ‘ग्रुण्डरिस्स’ मधील ‘पैशासंबंधातील’ भाग संपादित करून त्याला पुस्तकरूप दिले. तेच 1859 मध्ये ‘राजकीय अर्थशास्त्रावरील टीकेत एक योगदान’ या नावाने प्रकाशित झाले, जी मार्क्सवादी राजकीय अर्थशास्त्राची एक उत्कृष्ट रचना आहे. ही रचना खूपच गुंतागुंतीची होती आणि त्याकाळी ती लोकप्रिय झाली नाही. त्याच्या प्रकाशनानंतर, मार्क्सने ‘ग्रुण्डरिस्स’मधील ‘भांडवलाबाबत’ भागाला देखील पुस्तक स्वरूपात संपादित केले, परंतु प्रकाशकाने पहिल्या पुस्तकाची कमी लोकप्रियता लक्षात घेऊन ते छापण्यास नकार दिला. हे हस्तलिखित कोठे आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

त्यानंतर लगेचच मार्क्सने ‘भांडवल’ लिहिण्याच्या प्रकल्पावर काम सुरू केले. ‘भांडवल’च्या संपूर्ण प्रकल्पाचासुद्धा काळानुरूप बदलत जाण्याचा स्वतःचा एक इतिहास आहे. एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणेच मार्क्सचे विविध प्रश्नांवरचे मत काळानुसार बदलत गेले आणि विकसित झाले. ‘भांडवल’ ही त्यांची सर्वात महान रचना आहे, ज्यामध्ये त्यांचे 1857 पासून ते मृत्यूपर्यंतचे संपूर्ण आयुष्य खर्च झाले आणि या रचनेच्या तीन खंडांत त्यांचे अत्यंत परिपक्व विचार प्रकट होतात. ‘भांडवल’चा मूळ प्रकल्प खूप मोठा होता. त्यांनी ‘ग्रुण्डरिस्स’ मध्येच पहिल्यांदा या प्रकल्पाबद्दल लिहिले होते. 1867 मध्ये त्यांनी हा संपूर्ण प्रकल्प बदलला.

यातील काही बदल यामुळे होते कारण ‘भांडवल’च्या पहिल्या खंडाच्या संपादनाबरोबरच मार्क्सला काही पूर्वनियोजित खंड आता अनावश्यक वाटू लागले होते कारण त्यांचा मजकूर पहिल्या खंडातच समाविष्ट झाला होता. परंतु काही बदल मार्क्सने यामुळे सुद्धा केले होते कारण त्यांच्या हयातीत ते हे काम पूर्ण करू शकणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती. याशिवाय, एक दुसरे कारण म्हणजे मार्क्सचा बराचसा वेळ इतर जबाबदाऱ्यांमध्ये गेला. उदाहरणार्थ, त्यांच्या काळातील सर्वहारा चळवळीवर वर्चस्व असलेल्या विजातीय प्रवृत्तींविरुद्धचा संघर्ष, विविध विजातीय प्रवृत्ती आणि प्रति-क्रांतिकारी घटकांद्वारे केला जाणारा वैयक्तिक दुष्प्रचार, ज्याला मार्क्सने केवळ तेव्हाच प्रतिवाद केला जेव्हा ते राजकीयदृष्ट्या आवश्यक होते. याव्यतिरिक्त ते जमीन-भाड्याच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत या निष्कर्षापर्यंत पोहोचले की युरोप आणि अमेरिकेतील जमीन मालकी आणि जमीन-भाड्याचा इतिहास जाणण्याबरोबरच रशियामधील जमीन मालकी आणि जमीन भाड्याचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांनी रशियन भाषा शिकली! तसेच नफ्याच्या सरासरी दराच्या गतीसंबंधी गणना करत असताना कॅल्क्युलस शिकणे आवश्यक आहे हे लक्षात आल्याने त्यांनी गणिताचाही अभ्यास सुरू केला! आश्चर्याची बाब म्हणजे आज त्यांची ‘गणितीय हस्तलिखिते’ सुद्धा प्रकाशित झाली आहेत ज्यावर अनेक संशोधक आज संशोधन करत आहेत. याशिवाय त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना मानववंशशास्त्रातही रस निर्माण झाला होता आणि त्यांनी विविध मानववंशशास्त्रीय अभ्यास देखील केले जे नंतर त्यांच्या ‘मानववंशशास्त्रीय नोटबुक्स’च्या स्वरूपात प्रकाशित झाले. यावरून मार्क्सच्या ज्ञानाची खोली आणि व्यापकता किती अफाट होती, तसेच त्यांच्या अद्वितीय प्रतिभेची जाणीव होते.

गरिबी, अभाव, रोगराई आणि प्रति-क्रांतिकारकांच्या वैचारिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना ‘भांडवल’चा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेता आला नाही. त्याला त्यांचे जवळचे सहकारी आणि मित्र फ्रेडरिक एंगल्स यांनी काही प्रमाणात पूर्ण केले, ज्यांनी आपले उर्वरित आयुष्य त्यांच्या हस्तलिखितांचे संपादन करण्यात आणि मृत्यूपूर्वी ‘भांडवल’चा दुसरा आणि तिसरा खंड प्रकाशित करण्यात व्यतीत केले.

आता आपण ‘भांडवल’ चे विविध प्रकल्प कसे विकसित झाले ते पाहू.

1857 साली प्रस्तुत ‘भांडवल’चा पहिला प्रकल्प

1857 मध्ये प्रस्तुत झालेला ‘भांडवल’चा हा प्रकल्प सहा विस्तृत पुस्तकांची मालिका होती. ती अशाप्रकारे होती:

पुस्तक – 1

भांडवलाबाबत

खंड 1 – भांडवलाची उत्पादन प्रक्रिया (मजुरीबाबत काही मूलभूत चर्चेसह) – हा पहिला खंड म्हणून सप्टेंबर 1867 मध्ये प्रकाशित झाला.

खंड 2 – भांडवलाच्या अभिसरणाची प्रक्रिया (यात मुळात उत्पादक आणि अनुत्पादक श्रम यावरही चर्चा करायची होती, पण नंतर ही चर्चा या खंडात अगदी थोडक्यात करण्यात आली, कारण नंतर मार्क्सने संपूर्ण प्रकल्पच बदलून टाकला.) – याला मार्क्सने तयार हस्तलिखित स्वरूपात अपूर्णच संपादित केले होते आणि त्याच स्वरूपात ते सोडून दिले, ज्याला नंतर एंगल्सने कुशलतेने पूर्ण स्वरूपात संपादित केले आणि 1885 मध्ये खंड -2 म्हणून प्रकाशित केले.

खंड 3 – संपूर्णतेमध्ये भांडवली उत्पादनाची प्रक्रिया (यामध्ये स्पर्धेचे मूलभूत नियम, संकटाचा सिद्धांत, कर्ज आणि भाड्याचा सिद्धांत यांचा समावेश केला जाणार होता) यामध्ये मार्क्स कर्जाच्या संपूर्ण व्यवस्थेवर फारशी पद्धतशीर चर्चा समाविष्ट करू शकले नाही. मार्क्सने या तिसर्‍या खंडात भाड्याच्या सिद्धांताचा पाया घातला होता आणि नफ्याचा सरासरी दर घसरण्याच्या दीर्घकालीन प्रवृत्तीचा संकट सिद्धांतही मार्क्सने त्यात मांडला होता. – याला मार्क्सने केवळ असंग्रहित आणि असंपादित हस्तलिखितांच्या स्वरूपात सोडले, ज्याला नंतर एंगल्सने संकलित, व्यवस्थित आणि संपादित करून 1894 मध्ये अगदी त्याच्या मृत्यूच्या आधी ‘भांडवल’चा तिसरा खंड म्हणून प्रकाशित केले.

हे तिन्ही खंड मिळून ‘भांडवल’ या मूळ प्रकल्पाचे पहिले पुस्तक होते हे लक्षात घेण्यासारखे आहे! या मूळ प्रकल्पात एकूण सहा पुस्तके होती. पहिल्या पुस्तकाच्या या तीन खंडांपैकी मार्क्सला त्याच्या हयातीत फक्त पहिलेच प्रकाशित करता आले. त्यांनी दुसऱ्या खंडाचे अर्धे संपादन केले होते आणि तिसरा खंड पूर्णतः असंपादित हस्तलिखिते आणि वह्यांच्या स्वरूपात होता. त्याला एंगल्सने असामान्य प्रतिभा आणि कौशल्याच्या बळावर संपादित करून प्रकाशित केले. हे करण्याची क्षमता त्या वेळी निःसंशयपणे केवळ एंगल्सकडे होती.

पुस्तक – 2

जमिनीच्या मालकीबद्दल

या दुसऱ्या पुस्तकात मार्क्सने जमिन मालकीच्या विविध स्वरूपांचा आणि भाड्याच्या विविध स्वरूपांचा विस्तृत अभ्यास मांडण्याची योजना आखली होती. त्यासाठी ते अमेरिका, युरोप आणि रशियामधील जमीन मालकी आणि भाड्याच्या स्वरूपाच्या संपूर्ण इतिहासाचा सखोल अभ्यास करत होते. त्यासाठी त्यांनी रशियन भाषाही शिकली. परंतु जीवनाने मार्क्सला या विषयावरील त्यांच्या विस्तृत अभ्यासाचे निष्कर्ष पद्धतशीरपणे मांडण्याची संधी दिली नाही.

पुस्तक – 3

मजुरीबद्दल

हे पुस्तक नंतर मार्क्सने स्वतः प्रकल्पातून काढून टाकले कारण मजुरीच्या प्रश्नावरील दीर्घ चर्चा पुस्तक 1 ​​च्या खंड 1 मध्येच समाविष्ट झाली होती. या पुस्तकात मुळात मजुरीचे(वेतनाचे) स्वरूप, मजुरीतील चढ-उताराची कारणे व त्याची कमाल मर्यादा, मजुरीच्या विविध प्रकारांबद्दल विस्तृत अध्ययन प्रस्तुत केले जाणार होते. पण ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात त्याचा समावेश असल्याने मार्क्सनेच हे पुस्तक नंतर प्रकल्पातून काढून टाकले.

पुस्तक – 4

राज्यसत्तेबद्दल

राज्यसत्ता या विषयावर मार्क्सने स्वतंत्र पुस्तकाची योजना बनवली होती. यामध्ये राज्यसत्तेची आर्थिक भूमिका, कर आकारणीची भूमिका, चलन नियंत्रण करणारी संस्था म्हणून राज्याची भूमिका आणि भांडवलदार म्हणून राज्याची भूमिका यावर चर्चा केली जाणार होती, पण मार्क्सला या पुस्तकाची योजना पूर्ण करता आली नाही. ‘भांडवल’चे जे तीन खंड प्रकाशित झाले त्यामध्येच कर आकारणी आणि राज्यसत्तेच्या भूमिकेबद्दल काही विखुरलेल्या टिपण्या होत्या, ज्याच्या आधारे राज्यसत्तेचा संपूर्ण मार्क्सवादी सिद्धांत नंतर लेनिन आणि इतर मार्क्सवादी विचारवंतांनी विकसित केला.

पुस्तक – 5

आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल

मार्क्‍स हे पुस्तकही पूर्ण करू शकले नाहीत, जरी ‘भांडवल’च्या खंड 3 मध्ये थोडक्यात आणि ‘वरकड मूल्याचा सिद्धांत’ नावाने नंतर तीन खंडांमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या हस्तलिखितांमध्ये (ज्याला ‘भांडवल’चा चौथा खंड म्हणून ओळखले जाते) थोड्या तपशिलाने मार्क्सने जागतिक भांडवलशाही व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला आणि रिकार्डोच्या चुकीच्या सिद्धांताचे खंडन केले जो पैशाचे प्रमाण सिद्धांतावर आधारित होता, ज्यानुसार पैशाचे प्रमाण वाढले की किंमत वाढते आणि पैशाचे प्रमाण कमी झाले की किंमत कमी होते. रिकार्डोने हा निष्कर्ष या आधारावर काढला होता की मुक्त व्यापार सर्व देशांसाठी सारखाच चांगला आहे आणि तो स्वतःच देशांमधील फरक संतुलित करतो. असे होत नाही हे मार्क्सने दाखवून दिले. मुक्त व्यापार सर्वाधिक उत्पादनक्षमता असलेल्या देशाला फायदा पोहोचवतो, व्यापारात त्याला सकारात्मक संतुलन देतो आणि त्याला इतर देशांचा कर्ज पुरवठादार बनवतो. तर कमी उत्पादकता असलेल्या देशासाठी याच्या उलट घडते, म्हणजे तो केवळ व्यापारी तूटच सहन करत नाही तर तो कर्जदारही होतो. पण या विषयावर मार्क्सला जे संपूर्ण पुस्तक लिहायचे होते ते शक्य झाले नाही.

पुस्तक – 6

जागतिक अर्थव्यवस्था आणि संकट

या पुस्तकात संपूर्ण जागतिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आणि त्यात वारंवार येणाऱ्या चक्रीय संकटांचे तपशीलवार आणि सखोल विश्लेषण करण्याची योजना होती. हे काम नंतर इतर मार्क्सवादी विचारवंतांनी केले.

‘भांडवल’चा पहिला खंड प्रकाशित झाला तोपर्यंत मार्क्सला हे समजले होते की वरील प्रकल्पातील काही पुस्तकांची, उदाहरणार्थ, ‘मजुरीबद्दल’ची काही आवश्यकता नाही आणि मार्क्सने स्वत: त्यांना योजनेतून काढून टाकले. पण मार्क्‍सला हेही समजू लागले होते की त्यांची प्रकृती ज्या स्थितीत होती आणि ज्या गरिबीत ते जगत होते, त्यामध्ये ही संपूर्ण योजना पूर्ण करणे त्यांना शक्य राहिले नव्हते. म्हणून त्यांनी 1867 मध्ये ‘भांडवल’चा दुसरा प्रकल्प सादर केला.

‘भांडवल’चा दुसरा प्रकल्प

हा प्रकल्प मार्क्सने 1867 मध्ये त्याचा मित्र लुडविग कुगेलमन यांना लिहिलेल्या पत्रात सादर केला होता. तो काहीसा असा होता:

पुस्तक-1. भांडवलाची उत्पादन प्रक्रिया (मार्क्सने त्याच्या हयातीत पूर्ण केले आणि ‘भांडवल’ खंड-1 म्हणून प्रकाशित केले)

 

पुस्तक-2. भांडवल अभिसरणाची प्रक्रिया (अपूर्ण, अर्धवट संपादित, नंतर एंगल्सने संपादित केले आणि ‘भांडवल’ खंड -2 म्हणून प्रकाशित केले)

पुस्तक-3. संपूर्णतेमध्ये भांडवलशाही उत्पादनाच्या प्रक्रियेची संरचना (विखुरलेल्या हस्तलिखितांमध्ये उपलब्ध, नंतर एंगल्सने संकलित आणि संपादित केले आणि ‘भांडवल’ खंड -3 म्हणून प्रकाशित केले)

पुस्तक-4. सिद्धांताच्या इतिहासाबाबत (इतर राजकीय अर्थशास्त्रज्ञांचा अभ्यास करताना मार्क्सने काढलेल्या टीकात्मक नोट्स; याला नंतर कार्ल कौट्स्की यांनी संकलित आणि संपादित केले आणि तीन खंडांमध्ये प्रकाशित केले, ज्यांना ‘अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत’ म्हणून ओळखले जाते)

हा होता ‘भांडवल’च्या बदलत्या योजनांचा इतिहास आणि शेवटी त्याच्या प्रकाशनाचा इतिहास. पण 1867 मध्ये ‘भांडवल’च्या पहिल्या खंडाच्या प्रकाशनापासून ते 1878 पर्यंत मार्क्सने आपल्या हस्तलिखितांमध्ये अनेक दुरुस्त्या केल्या, त्यात अनेक गोष्टींची बेरीज-वजाबाकी केली. त्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

‘भांडवल’च्या पहिल्या खंडाच्या प्रकाशनापासून ते मार्क्सच्या मृत्यूपर्यंत

‘भांडवल’चा पहिला खंड मार्क्सच्या हयातीतच सप्टेंबर 1867 मध्ये प्रकाशित झाला. याच काळात ते भाड्याची स्वरूपे, गणित, कृषी रसायनशास्त्र, भूविज्ञान, शरीर-विज्ञान आणि रशियन भाषा यांचा एकाच वेळी अभ्यास करत होते.

1875 मध्ये मार्क्सने नफ्याच्या सरासरी दराच्या गणना केल्या आणि अतिरिक्त मूल्याच्या दराच्या अनेक गणना केल्या. एंगल्स त्यांच्या मृत्यूपूर्वी या हस्तलिखितांचे संपादन करू शकले नाहीत. ते कुठे ना कुठे उपलब्ध आहेत आणि आशा आहे की ते भविष्यात प्रकाशित देखील होतील.

1876 मध्ये मार्क्सने भाडे या विषयावर सैद्धांतिकदृष्ट्या एक अतिशय महत्त्वाचा भाग लिहिला, ज्याचा एंगल्सने ‘भांडवल’च्या तिसऱ्या खंडात 44वा अध्याय म्हणून समावेश केला. हा मार्क्सचा भाड्याचा महत्त्वाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी  एक आवश्यक अध्याय आहे.

1870 च्या दशकात तयार केलेल्या पुनरुत्पादन योजनेत मार्क्सने 1878 मध्ये सुधारणा केली. पुनरुत्पादन संरचना(स्कीमा) म्हणजे काय ते आपण पुढे सविस्तरपणे समजून घेऊ. 1878 मध्ये एंगल्सने ‘भांडवल’च्या दुसर्‍या खंडात सुधारित पुनरुत्पादन योजना समाविष्ट केली आणि आणि जिथे 1870 चे हस्तलिखित संपते आणि 1878 चे हस्तलिखित सुरू होते त्याठिकाणी एंगल्सने वाचकांसाठी एक टीप देखील समाविष्ट केली, ज्यावरून त्यांचे कुशल संपादन कौशल्य दृष्टीस पडते.

1878 पर्यंत मार्क्स इतके आजारी झाले होते की त्यांचे शरीर आता त्यांना कोणतेही नवीन संशोधन कार्य करू देत नव्हते. युरोपियन मानकांनुसार मार्क्स अजून तरुणच मानले गेले असते, कारण ते फक्त 60 वर्षांचे होते. पण संघर्ष, आजारपण, दु:ख, अभाव आणि त्रासाच्या दीर्घ जीवनाने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. 1881 मध्ये त्यांच्या जीवनसाथी आणि क्रांतीच्या पथावरील कॉम्रेड जेनी वॉन वेस्टफालनच्या मृत्यूने त्यांना खूप धक्का बसला होता. 1883 मध्ये त्याच्या मृत्यूपूर्वी मार्क्सने आपल्या मुलीला, एलनोरला बोलावले आणि त्याचा जवळचा मित्र एंगल्सला देण्यासाठी एक चिठ्ठी आणि असंपादित हस्तलिखिते तिच्या हाती दिली आणि म्हटले ‘फ्रेडला सांग या गोष्टींचा काही अर्थ लाव.’ त्यानंतर 14 मार्च 1883 रोजी मार्क्सने आपल्या आरामखुर्चीत शांतपणे झोपून जगातील सर्वहारा वर्गाचा शेवटचा निरोप घेतला. लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत त्यांची पत्नी जेनी यांच्या शेजारी त्यांचा मृतदेह पुरण्यात आला. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर त्यांची एक वही पडली होती, ज्याच्या मुखपृष्ठावर ‘वर्गांबाबत’ असे शीर्षक होते.

 ‘भांडवल’ हा एक निरंतर प्रकल्प आहे

मार्क्स सर्वप्रथम सर्वहारा वर्गाचे महान सर्वहारा क्रांतिकारक आणि सर्वहारा शिक्षक होते. आपले घनिष्ठ आणि प्रतिभाशाली मित्र कॉम्रेड एंगल्स यांच्यासमवेत त्यांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञान, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्राची पायाभरणी केली जी सर्वहारा वर्गाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

मार्क्सवाद हे क्रांतीचे शास्त्र आणि क्रांतीचे तत्त्वज्ञान आहे. कोणत्याही विज्ञानाप्रमाणे ते देखील सतत विकसित होत आले आहे. मार्क्स आणि एंगल्स यांच्या मृत्यूनंतर भांडवली व्यवस्थेत आलेल्या बदलांना अनेक मार्क्सवाद्यांनी मार्क्स आणि एंगल्सची पद्धत अवलंबून समजून घेण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही शास्त्रज्ञाप्रमाणेच त्यांनी काही गोष्टी योग्य प्रकारे समजल्या आणि काही गोष्टींबद्दल ते पूर्णपणे संतुलित समज बनवू शकले नाहीत. कोणत्याही विज्ञानाप्रमाणेच क्रांतीच्या विज्ञानाचा प्रवासही सामाजिक व्यवहारातून सिद्धांताचा विकास आणि सिद्धांताद्वारे सामाजिक व्यवहाराचे मार्गदर्शन आणि या प्रक्रियेत सिद्धांत आणि व्यवहार या दोन्हींचा उत्तरोत्तर विकास असाच होत असतो. काही लोक ही गोष्ट समजू शकले, आणि काही समजू शकले नाहीत. परिणामी, ‘भांडवल’ बद्दल तीन वेगवेगळे दृष्टिकोन असणारे तीन प्रकारचे लोक आहेत.

पहिल्या प्रकारात ते लोक आहेत जे फक्त खंड -1 ला शुद्ध आणि पूर्ण मानतात कारण तो मार्क्सने त्यांच्या हयातीतच पूर्ण करून प्रकाशित केला होता. त्या नंतरच्या खंडांना ते विचलन म्हणून पाहतात किंवा त्यांना त्यात रस नसतो. स्पष्ट आहे असे मार्क्सवादी खरे तर मार्क्सवादी नसतात, त्यांना मार्क्सवाद हे विज्ञान समजत नाही, उलट ते ‘भांडवल’ हा कोणत्यातरी पैगंबराचा पवित्र ग्रंथ मानतात.

दुसर्‍या प्रकारचे लोक असे आहेत जे तीन खंडांचे सातत्य पाहू शकत नाहीत, त्यांची एकता समजू शकत नाहीत आणि त्यांच्यातील विरोधाभास शोधू लागतात आणि कधीकधी त्याला मार्क्स आणि एंगल्स यांच्यातील विरोधाभास म्हणूनही मांडू लागतात. उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात की मार्क्सने नफ्याचा सरासरी दर घसरण्याच्या दीर्घकालीन प्रवृत्तीचा कोणताही सिद्धांत दिला नाही! हा तर एंगल्सचा सिद्धांत आहे! याने काही फरक पडत नाही, जर हा तुमच्यापैकी जरी कोणाचा सिद्धांत असेल तरी काही फरक पडत नाही! मुद्द्याची बाब ही आहे की तो बरोबर आहे की नाही. मार्क्सनंतरच्या जगाचा आर्थिक इतिहास हा सिद्धांत बरोबर सिद्ध करतो. आणि आज हा सिद्धांत खुद्द मार्क्सनेच दिला होता यात शंका घेण्याचा प्रश्नच नाही, अनेक संशोधकांनी हे संशयापलीकडे सिद्ध केले आहे. मार्क्सच्या हस्तलिखितांचे संपादन करण्याचे कार्य एंगल्सने उत्कृष्टपणे केले यात शंका नाही.

तिसरा प्रकार अशा लोकांचा आहे जे मार्क्सच्या संपूर्ण आर्थिक विचारांच्या मूलभूत द्वंद्वात्मक तर्काला समजतात, तिन्ही खंडांचे सातत्य आणि एकता समजतात आणि हे समजतात की ‘भांडवल’ हा प्रकल्प आजही चालू आहे, ज्याला मार्क्सच्या नंतरच्या काळात काउत्स्की (जोपर्यंत तो मार्क्सवादी होता तोपर्यंत), हिलफर्डिंग (तो मार्क्सवादी होता तोपर्यंत), लेनिन, बुखारिन इत्यादींसारख्या अनेक मार्क्सवादी विचारवंतांनी पुढे चालू ठेवले. आज आपण त्यापैकी काहींच्या विचारात काही चुका नक्कीच काढू शकतो. परंतु त्यांनी ‘भांडवल’ हा एक निरंतर चालू प्रकल्प समजला आणि हे समजले की जोपर्यंत भांडवलशाही व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत मार्क्सच्या राजकीय अर्थशास्त्राच्या आधारे तिच्या आर्थिक कार्यपद्धतीत होणारे बदल समजून घेणे आणि स्पष्ट करणे सर्वहारा वर्गाच्या क्रांतिकारी चळवळीसाठी आवश्यक आहे.

आजसुद्धा हा प्रकल्प पुढे चालू ठेवणे म्हणजे मार्क्सच्या महान वारशाशी क्रांतिकारी सर्वहारा वर्गाच्या अग्रदलाद्वारे खरे नाते प्रस्थापित करणे होय. हे कार्य पूर्ण करण्यासाठी, मार्क्सच्या राजकीय अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांची संतुलित, सुसंगत आणि संपूर्ण समज विकसित करणे आपण कामगार वर्गासाठी आवश्यक आहे. सध्याच्या या मालिकेत आपण याच दिशेने प्रयत्न करत आहोत.

(पुढील अंकात सामाजिक श्रम विभाजन, विनिमयाची सुरुवात, मूल्याचे रूप, चलन आणि मालाचे अभिसरण याबाबत)

(मूळ लेख: मजदूर बिगुल, जानेवारी 2023; मराठी अनुवाद: डॉ. जयवर्धन)